Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

पूर्णब्रह्माचा अपमान!!

आ
आनन्दा
Sun, 08/19/2018 - 18:45
💬 194 प्रतिसाद
बरेच दिवस पुण्यात एका नवीन हॉटेलची जाहिरात चालू होती.. त्या हॉटेलच्या मालकीण बाईंचा एक विडिओ पण बराच व्हाट्स अप वर देखील फिरत होता. विमानात veg food मिळालं नाही म्हणून तिने थेट रेस्टॉरंट टाकलं वगैरे. त्या प्रसिद्ध हॉटेलची फ्रेंचैझी पुण्यात चालू झाली होती, आणि बटाटेवड्यापासून पुरणपोळी आईस्क्रीमपर्यंत सगळं आहे असे कळलं. मग त्याचा आस्वाद घ्यायचा प्लॅन केला. अनायासे आज बिबवेवाडीत गेलो होतो. हॉटेल ला जायचं ठरवलं, पण रस्ता माहीत नव्हता, त्यामुळे गूगल मॅप वर सर्च केलं. आणि तिथूनच नाट लागायला सुरुवात झाली. मॅपवर 2 लोकेशन दिसली, एकाच भागात, त्यातलं एक निवडलं, आणि निघालो, तिथे पोचलो तर कळलं की हे हॉटेल या गल्लीत नाहीच, शेजारच्या गल्लीत आहे.. बरं शेजारची गल्ली म्हणजे कशी, तर सातारा रोड वर बाहेर यायचं, रांका पासून मार्केट यार्ड पर्यंत जायचं, आणि U टर्न मारून परत यायचं. आणि मग शोधत शोधत जायचं, रस्त्यावर बोर्ड नाही, एक बोर्ड होता तो झाडात लपलेला, कसाबसा तो मिळाला, आणि आम्ही आत गाडी टाकली. गाडी लावणे म्हणजे मोठे दिव्य होते. झाडांच्या मधून जागा शोधून गाडी लावायची, नो पार्किंग असिस्टंट. तिथे एक बाई होती ती आम्हाला बघून आत निघून गेली. बाहेर मेनू लावलेला होता पालकाची भाजी, लाल भोपळा, पुरणपोळी, कढी वगैरे. मेनू बघून आत जाऊ की नको असा प्रश्न पडला होता, पण केव्हातरी जायचेच आहे तर आताच जाऊया म्हणून गेलो. आत गेल्यावर पुणेरी पद्धतीने थंड स्वागत झालं, फक्त इतकंच कळलं की यांच्याकडे थाळी आणि इतर मराठी पदार्थ पण आहेत. एकंदर वातावरण बघून बायको तर परत जाऊया म्हणत होती, पण तिला थांबवलं. आणि मेनुकार्ड मागवलं. एका इंजिनीरिंग च्या पुस्तकाएव्हढं मेनूकार्ड होतं.. साधारण चाळल्या वर इतकं कळलं की आज 350 रु वाली महालक्ष्मी थाळी आहे. *लिमिटेड थाळी - 3 पोळ्या, एक पुरणपोळी, भोपळा, पालक, कढी, वरण, भात, लोणचे, चटणी, भजी, साबुदाणा वडा, पापड इत्यादी. थाळी लिमिटेड, किंमत 350 रु* . खरे तर शहाण्या माणसाने इथेच मागे फिरायला हवे होते, पण विनाशकाले विपरीत बुद्धी. आम्ही 2 थाळ्या ऑर्डर केल्या आणि बसलो. जेवण आलं, आता आपण लिमिटेड पदार्थांचा आस्वाद घेऊ. *साबुदाणा वडा -* मोठ्या पेढ्याइतक्या आकाराचे 2 वडे. टेस्ट ओके. काकडीची कोशिंबीर - फ्रीजमध्ये साठवलेल्या काकडीची कोशिंबीर असावी बहुतेक. ठीक म्हणावी इतपत. *पुरणपोळी 1 नग -* 100 टक्के फ्रोझन पोळी गरम करून दिली असणार. आम्ही त्याला एक फुलकाच समजत होतो, पण तो थोडा गोड होता, म्हणून त्याला पुरणपोळी म्हणणे भाग होते. जाड पापुद्रा, पुरणाचा अभाव, आणि खात जावे तशी चामट होत जाणारी. ज्यांनी अमेरिकेत मिळणारी फ्रोझन पोळी खाल्ली असेल त्यांना नक्की कळेल. पुण्यात त्या पदार्थाला पुरणपोळी म्हणण्याची हिंमत मी करु शकत नाही. *साधी चपाती -* 3 चपात्या, थोड्या जास्त भाजलेल्या, आणि गार होतील तश्या चामट होत जाणाऱ्या. या पण फ्रोझन असाव्यात. तिसरी चपाती, जी गार झाली ती चावतच नव्हती. एक गोष्ट सांगायची राहिलीच, पहिली चपाती अर्धी खाऊन झाल्यावर त्यांनी *वेलकम ड्रिंक* आणून दिले, guess what? एक कटिंग चहा इतके ताक!! म्हणे वेलकम ड्रिंक. हे वेलकम ड्रिंक बघून अक्षरशः डोळे पाणावले. फोटो काढायचा मोह कटाक्षानं आवरला. हं, तर पुढचे पदार्थ *भजी* - सुपारीच्या आकाराची 3 भजी. मीठ वाढतो तितकी शेंगदाण्याची चटणी आणि मेतकूट. *भोपळ्याची भाजी -* सालीसकट केलेली लाल भोपळ्याची भाजी, जी अर्धी मी बटाट्याचा रस्सा समजून खाल्ली, अर्ध्यात बायकोने आठवण करून दिली की तो भोपळा आहे! *पालक रसभाजी* - दाणे, खोबरं आणि मसाला घातला की काहीही खपतं असा त्यांचा बहुधा गैरसमज असावा. त्यात पालक शोधावाच लागत होता, पण त्यातल्या त्यात तीच चांगली लागत होती . *कढी -* आंबट दही तसेच घट्ट घुसळून त्याची कढी केलेली. ना आपण घरी करतो तशी मिरचीची फोडणी वगैरे असलेली होती, किंवा ना कढी खिचडी सारखी. मेस मध्ये असते तशी चव साधारण होती. आणि खारट! *वरण* - खारट! *आणि भात!!* तो सुंदर असणार, कारण त्यांनी तो दिलाच नाही. आम्ही पण मागायला गेलो नाही! इतकं सुंदर जेवण जेऊन पोट भरलं होतं!! आपण अन्न हे पूर्णब्रह्म म्हणतो, पण साडेतीनशे रुपयात असले जेवण विकणे हा त्या पूर्णब्रह्माचा अपमान आहे! परदेशात चालेल हे असले जेवण, पण पुण्यात तर नाहीच नाही! आता सर्विस बद्दल बोलूया - *अत्यंत मितभाषी स्टाफ* असणार! कारण *आम्हाला जेवण दिल्यावर कोणी ढुंकून सुद्धा बघितलं नाही* . हवं नको वगैरे फारच लांब राहिलं!! जेवण झाल्यावर बिलाचे पैसे द्यायची वेळ आली, बिलात 350 रु ची थाळी आणि वरती सर्विस टॅक्स बघून माझी सटकलीच होती.. *जी एस टी सकट 735 रु फक्त!* *बिल देताना विचारले, की आजच्या थाळीत भात होता का? तर फक्त सौजन्याने त्यांनी विचारले, तुम्हाला मिळाला नाही का? (सॉरी वगैरे जाऊदे, पण पुढे बोलणे पण नाही, किमान आतल्या माणसाला काय झाले आहे ते विचारावे इतकीच अपेक्षा होती)* केवळ मला भांडायची इच्छा नव्हती, त्यामुळे शांतपणे मी पैसे देऊन बाहेर निघालो होतो, पण तेव्हढ्यात त्यांनी कळ काढली!! मला त्या बाई पुढच्या वेळेस आलात तर डिस्काउंट कूपन देते म्हणून सांगू लागल्या!! मग मात्र माझी सहनशक्ती संपली. शांतपणे मी त्यांना म्हणालो, काळजी करू नका, मी परत येणार नाही!!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 84946 views

💬 प्रतिसाद (194)
व
वरुण मोहिते Mon, 08/20/2018 - 11:49 नवीन
हॉटेल ला . 4 पेग मारून थाळी खाऊन येईन. कोकम सरबत मिळते का? वोडका नि सरबत कोणाला काही कळणार नाही मग अजून 2 पेग. पुरणपोळी चालेल चकण्याला.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 08/20/2018 - 14:44 नवीन
बाईंच्या बोलण्यातून हा प्रयोग एकूणच पाणचट असणार आहे अशी कल्पना आली होती. स्वयंस्तुतीचा अतिरेक केला आहे त्यांनी त्या व्हिडिओत. वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे मूळात मेन्यु कार्डात पदार्थ आणि किंमत पाहून तुम्ही थाळी मागवायलाच नको होती असे वाटते.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Tue, 08/21/2018 - 06:14 नवीन
अगदी १००% सहमत! बाईंचा व्हिडियो म्हणजे आत्मकेंद्रित वृत्तीचा एक उत्तम नमुना आहे. गिर्‍हाईकांना चांगली सेवा द्यावी यापेक्षा कुणाची तरी खोड मोडावी अशा भावनेतून उद्योग सुरु केला आहे की काय असे वाटत रहाते! पूर्णब्रह्माला माझ्यातर्फे पूर्णविराम.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 08/20/2018 - 15:01 नवीन
एक व्यावसायिक म्हणून मत मांडू इच्छितो. यात कुणाला खरे खोटे ठरविण्याचा किंवा कोणाची बाजू घेण्याचा प्रश्न नाही. बहुधा बर्‍याच आस्थापनांमधे एक पाटी लावलेली असायची की आमची सेवा खराब असली तर आम्हाला सांगा आणि चांगली असली तर इतरांना सांगा. सोशल मिडिया आपल्या हातात आल्यापासुन आपण नेमेके उलटे वागतोय काय ? आपणास तिथली सेवा आवडली नसल्यास तेथील व्यवस्थापकांना भेटून तिथे काय वाईट होते हे सांगावयास हवे होते. इथे आंतरजालावर लिहून त्यांची सेवा सुधारेल असे वाटत नाही. आपल्या टीकेमुळे त्यांचा व्यवसाय आणि पर्यायाने पोटपाणी धोक्यात येऊ शकते. मागे काही वर्षांपुर्वी इथे ठाण्यातल्या "मेतकुट" हॉटेल बद्दल देखिल असाच नकारात्मक अनुभव सांगणारा लेख आला होता. त्याही धाग्यावर मी अशाच प्रकारे मांडलेल्या मताचे समर्थन कोणीही केले नाही तरी देखील स्वत:कडे वाईटपणा घेऊन ही गोष्ट पुन्हा सांगाविशी वाटते. ग्राहक म्हणून आपणांस चांगली सेवा मिळण्याचा हक्क आहेच आणि ती नाही मिळाली तर तक्रार करण्याचा हक्क देखील १००% आहे. मात्र जालावर तक्रार करताना समोरच्याचे नुकसान किती प्रमाणात होऊ याचा अंदाज आपल्याला येत नाही म्हणून हा प्रतिसाद प्रपंच (अर्थात समोरच्याचे नुकसान व्हावे असा आपला हेतू नसतो पण तसे होते खरे) ! तक्रार करण्यापुर्वी समोरच्या पार्टीचा थोडा सहानुभुतीपुर्वक विचार व्हावा ही विनंती ! अगदीच चुकीला माफी नाही असा अ‍ॅप्रोच नको ! प्रतिसादामुळे कोणाला वाईट वाटले असल्यास क्षमस्व !
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 08/20/2018 - 15:28 नवीन
१) कसं आहे की चांगल्या सेवेत काहीशी उणीव असेल तर व्यवस्थापनाला 'सुधारणेस वाव आहे' असे सांगण्यात उत्साह वाटतो पण सेवा फारच गंडली असेल तर असे काही सांगण्याचा उत्साह वाटत नाही. २) शिवाय आपण अतिशय वाईट सेवा देतोय याची त्या व्यवस्थापनाला किंचितही कल्पना नसावी हे पटत नाही.. तिथले व्यवस्थापक , कर्मचारी हे देखील कुठेतरी ग्राहक म्हणून जात असतीलच ना. ३) ज्यांना अधिकाधिक चांगली सेवा द्यायची आहे ते स्वतःहून अभिप्राय जाणून घेण्याची तत्परता दाखवतात. बार्बेक्यू नेशनमध्ये एकदा जावून बघा.. ते किती लोकप्रिय आहेत याची त्यांना चांगली कल्पना आहेच पण तरी गर्व नाही ..तुम्हाला स्टार्टर्स आवडलेत ना हे आवर्जुन विचारता, स्टार्टर्समध्ये आणखी काय हवं हे पण विचारतात..शेवटी टॅबमधून पुन्हा औपचारिक अभिप्रायही घेतात... ४) पण "आपल्याला आपले पैसे मिळाले ना झालं तर मग.. ग्राहक संतुष्ट आहे की नाही काय पडलीये आपल्याला" असंच वागणं दिसत असेल तर काय अभिप्राय देणार. इथे लेखकानं लिहिलंय की
शांतपणे मी त्यांना म्हणालो, काळजी करू नका, मी परत येणार नाही!!
त्यावरही त्या बाईंनी लेखकाला असं का वाटलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाहीये.. मग येवू दे की अशा लोकांचं पोटपाणी धोक्यात .. त्यांचं पोटपाणी चालावं म्हणून अनभिज्ञ लोकांनी त्यांच्याकडे जात रहाण्यापेक्षा लोकांना सावध करुन लेखकाने चांगलंच केलंय
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 08/21/2018 - 08:22 नवीन
माझी देखील साधारण अशीच भावना आहे. अनेक ठिकाणी मी जेवण झाल्यावर management ला फीडबॅक देऊन जातो. इतका क्रूर फीडबॅक देण्याची ही माझी देखील पहिलीच वेळ आहे. आणि बहुधा या गोष्टीला त्यांचे जेवण कारणीभूत नसून कस्टमर management कारणीभूत आहे असे वाटतेय. बघू, जमले तर कुठे काय कसे चुकत गेलं याचा एक प्रतिसाद पण टाकेन. मला स्वतःला पण हे खूप लागून राहिले आहे.
  • Log in or register to post comments
P
pawar.sujit Wed, 08/22/2018 - 03:23 नवीन
sahamat
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 08/20/2018 - 15:03 नवीन
मी काय म्हणतो, त्या पूर्णब्रह्माची क्वालिटी ओकेटोके असती, गेलाबाजार अ‍ॅव्हरेज असती तर त्या बाईंना इतक्या शिव्या पडल्या असत्या का? म्हणजे त्यांनी भाषणात जे काही विठाई थाळी, अक्कलकोटाची स्वामीसमर्थ थाळी आदी फिरुन संशोधन करुन सिध्द केल्या गेलेल्या थाळ्यांचे वेगळेपण नावाची चीज काही चेक केली गेली आहे का? केवळ फॅन्सी नावे मेनूत टाकून त्याच त्याच भाज्या वाढणे म्हणजे आंत्रप्रुनरशिप मिरवणारे खरोखरीच डोक्यात जातात. त्यातल्या त्यात ह्या प्रकारासाठी मोजली जाणारी किंमत तर दिव्य आहे. खरोखर पुण्यात ६०० रुपयाचा पिझ्झा, ३५० रुपयाची थाळी, २८० रुपयाची एखादी पंजाबी भाजीची डिश, ८०-१०० रुपयाचा नान व रोटी अशा किंमती केवळ स्थानमाहात्म्यामुळे आहेत की केवळ लोक देतात तेवढा पैसा म्हनून आकारायची पध्दत आहे? म्हणजे लोक इतके पैसे कशासाठी मोजतात हा मला पडलेला प्रश्न आहे. पूर्णब्रह्माची गोष्ट बाजुलाच पण वीकेंडास गर्दीने वेटींग पण ओसंडून वाहणार्‍या हॉटेलात लाजवाब, कधी चाखली नाही इतपत स्वादिष्ट, अप्रतिम अशी मनापासून दाद द्यावी असे अन्न सापडलेच नाही. गागुचका म्हणलात तरी हरकत नाही पण माझी सोलापुरी जीभ अशा अन्नाचे इतके पैसे देऊन इतके कौतुक करायला धजत नाही हेच खरे. संधी मिळाली तर टाकणार भो आपण पण हाटेल....पुण्यात.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 08/20/2018 - 15:11 नवीन
प्रतिसादांत उल्लेख असलेला व्हिडीओ युट्युबवर आहे का?
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 08/20/2018 - 15:39 नवीन
https://youtu.be/AHoABEdAFmQ
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 08/21/2018 - 06:36 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 08/21/2018 - 11:12 नवीन
हा व्हिडीअो. पोशाखापासूनच ‘जितं मया’ शैली इरिटेटिंग अाहे. मी बाहेर जाऊन थाळी खाण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. तथापि, मराठी जेवण महाराष्ट्राबाहेर अाणि देशाबाहेरही पोहोचवत अाहेत, हे अावडले.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Tue, 08/21/2018 - 09:03 नवीन
बाई मुळच्या कुठल्या हे माहीत नाही . पण व्हिडीओ बघताना त्यांच्या बोलण्यात प्रत्येक वाक्याला अहंकार ओसंडून वाहत होता . सतत स्वतःचे कौतुक चालले होते . अहंकार मुळे ग्राहकांना गृहीत धरण्याची वृत्ती वाढीस लागते व त्याचा परिणाम क्वालिटी वर झाला असेल .
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 08/21/2018 - 11:26 नवीन
सहमत, १७ वर्षे आयटीत काम केल्यावर बर्‍यापैकी पैसे साठवून नविन व्यवसाय सुरु केला असणार. पण हालाखीच्या परीस्थीतीतून, शुन्यातून हातात काहीच नसताना कीतीतरी महीला पोळीभाजी आणि अन्य खाद्यपदार्थ विकून चांगले पैसे कमावत आहेत. पण अशी जाहीरात कधी पाहीली नाही. उदाहरणादाखल खालील लिंक पहा https://www.youtube.com/watch?v=2zY5NkswIow
  • Log in or register to post comments
ब
बोलघेवडा Mon, 08/20/2018 - 19:05 नवीन
पुण्याला नाव ठेवायची फॅशन आहे. त्यामुळे फार लक्ष देत नाही. चांगली महाराष्ट्रीय थाळी पाहिजे असेल तर आपटे रोड वरील श्रेयस आणि Law College रोड वर कृष्णाला पर्याय नाही. स्वस्तात उत्तम दर्जा हवा असल्यास आपटे रोड वर आशा डायनिंग हॉल भेट द्या. सिहगड रोड वरील आनंदी डायनिंग हॉल हि चांगला आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 08/21/2018 - 07:01 नवीन
सकळ त्रिखंडातलं सगळंच सर्वोत्तम, त्याला कोण काय करणार? चांगल्या गोष्टींना नावे ठेवत नाहीये कोणी, पण जे चूक आहे त्याला कोणी चूक म्हणत असेल तर उगाच खुपवून घेण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 08/20/2018 - 19:35 नवीन
फेसबुकवर पुणे इट आऊट म्हणून ग्रुप आहे त्यावर हे लेखन आहे, ते तुम्हीच टाकलं आहे का तिथे?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 08/21/2018 - 05:51 नवीन
हो..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 08/21/2018 - 06:50 नवीन
अच्छा.. ओके.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 08/21/2018 - 12:31 नवीन
http://www.purnabramha.com/feedback---compliments-.html हि लिंक त्यांच्या वेबसाईटवर आढळली. धर्मराजमुटकेंप्रमाणे खुपणं हे संबंधीतांना कळवणे केव्हाही चांगले असे वाटते. त्या नंतर अनुभव चांगला आला तर ठिकच आहे आणि नाही आला तर सोशल मिडिया चर्चेस जो काही अनुभव असेल तो शेअर करण्यास उपलब्ध आहेच.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 08/21/2018 - 13:10 नवीन
खरे आहे.. सामान्यपणे मी तेच करतो. पण त्या दिवशी फसवणूक, अपमान, अपेक्षाभंग वगैरे अनेक भावना साठल्या होत्या ज्याचा परिपाक म्हणून सोशल मिडिया पोस्ट घडली. कधी वाटते मझे चुकले की काय. पण त्या दिवशी फेसबूक वर टाकल्यावर ज्या पोस्ट आल्या त्यातून असे जाणवले की पुण्यात तरी हॉटेलच्या मॅनेजमेंटने या गोष्तींचा विचारच केलेला नाही. असंख्य लोक त्यांना फीडबॅक देऊन आलेत, पण त्यांची क्वलिटी तशीच आहे. त्यामुळे त्याना कोणीतरी असा प्रसाद देणारच होते. योगायोगाने ते काम मझ्याकडुन घडले इतकेच. दुसरे म्हणजे, जेव्हा त्यानी सोशल मिडिया चा जाहिरातीसाठी वापर केला तेव्हा त्यानी हा विचार करायला हवा होता की जर आपण तो दर्जा देऊ शकलो नाही तर हे सारे प्रकरण आपल्या अंगाशी येऊ शकते. तेव्हाची मिळालेली गुड पब्लिसिटी चांगली आणि ही वाईट असे नाही चालणार. आणि तसेही बाइ मराठी मानसाना त्यांच्या चिन्धीगिरीसाठी शिव्या घालताना दिसतातच, त्यामुळे त्याना या साधनाच्या मर्यादा माहीत असाव्यात अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी. असो, हा माझ्यासाठी खुप मोठा लर्निंग अनुभव होता. लवकरच मी तो त्यांच्यासाठीच शब्दबद्ध करुन मांडणार आहे. शिव्या घालण्यापेक्शा काहीतरी कन्स्त्रक्टिव्ह करणे केव्हाही चांगले, नाही का?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 08/21/2018 - 14:11 नवीन
असो, हा माझ्यासाठी खुप मोठा लर्निंग अनुभव होता. लवकरच मी तो त्यांच्यासाठीच शब्दबद्ध करुन मांडणार आहे. शिव्या घालण्यापेक्शा काहीतरी कन्स्त्रक्टिव्ह करणे केव्हाही चांगले, नाही का?
तुम्ही सोशल मिडियावर लिहिलेत त्या बद्दल काहीच म्हणणे नाही, पण सोबत त्यांच्या मुख्य मॅनेजमेंटला लिहिणेही उत्तम. हवे तर आता पर्यंत आलेल्या निवडक फिडबॅकची जंत्री बनवून दिल्यासही हरकत नाही. तो युट्यूब मधले सादरीकरण पाहून आभिमान आणि आत्मप्रौढी मधला फरकही कुणितरी नजरेस आणून देणे गरजेचे असावे असे मलाही वाटले. पण शेवटी कुणि मराठी उद्योजक प्रयत्न करताहेत तेव्हा आपण फुल न फुलाची पाकळी एकदा कल्पना देऊन पहावी एवढेच.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Tue, 08/21/2018 - 15:27 नवीन
' तो ' व्हिडिओ पाहून सुद्धा त्या थंड बाईच्या थंड हॉटेल मध्ये थंड जेवण करायला धागा मालक गेलेच कसे ? हा मुख्य मुद्दा आहे . व्हिडिओ पहिल्या नंतर त्या ऍरोगंट बाईच्या हॉटेल मध्ये पैसे घालवून जेवण करणे शुद्ध मूर्खपणा आहे तरीपण बाकी मिपाकरांना सावध केल्या बद्दल धन्यवाद .
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 08/21/2018 - 18:16 नवीन
खरे तर परवा पूर्णब्रह्म वर पोस्ट टाकल्यावर इतका गदारोळ होईल अशी अपेक्षा नव्हती. बऱ्याच लोकांनी मला पाठिंबा दिला तर काही लोकांनी तू मुद्दाम नेट-पिकिंग करतोयस असे आरोपही केले. मी देखील स्वतःचे परीक्षण केले. कदाचित हे हॉटेल इतके खराब नसेल ही, किंबहुना ते तसे नसावे अशी मला देखील अपेक्षा आहे. म्हणून मग माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी अजून एक लेख लिहायचा निर्णय घेतला. साधारण 10 वर्षे मी पुण्यात वेगवेगळ्या मराठी रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवत आहे. अगदी गिरीजा आणि आनंदी पासून मयूर, पंचवटी आणि सुकांता पर्यंत सगळ्या थाळ्या मी टेस्ट केल्या आहेत. आणि पूर्वी देखील कुठेतरी लिहिल्याप्रमाणे या सर्व थाळ्या एकसुरी आहेत, म्हणजे त्याच भाज्या, कोशिंबिरी, आणि मुख्य म्हणजे स्वीट चे तेच ते प्रकार. श्रीखंड, गुलाबजाम, फ्रुटसलाद किंवा बासुंदी. पुरणपोळी किंवा मोदक म्हणजे चैन अशी स्थिती काही दिवसांपूर्वी होती, सध्या थोडा फरक पडलाय. राजस्थानी असेल तर सोबत जिलबी आणि अन्य काही वेगळे स्वीट असतात. महाराष्ट्रात डेलिकेसी इतक्याच आहेत का? कोकणातच श्रावणात होणारे वेगवेगळे प्रकार बघितले तरी 10 तरी वेगळे पदार्थ मिळतील. पण कोणत्याही कारणाने का असेना हे पदार्थ इथे मिळतंच नाहीत, त्यामुळे या साऱ्या थाळ्या मध्ये एकप्रकाराचा एकसुरीपणा आहे. या पार्श्वभूमीवर अश्या प्रकारच्या वेगवेगळ्या डेलिकेसी देणारे एक मराठी रेस्टॉरंट सुरू करावे असे साधारण 3-4 वर्षे डोक्यात चालू आहे, पण इतर अनेक जबाबदाऱ्या आणि काही कारणाने ते जमत नाहीये.. पण त्याची रूपरेषा माझ्या डोक्यात होती.. योगायोगाने जयंती कठाळे यांचा स्वयं मधला व्हिडिओ कुठेतरी पाहण्यात आला, आणि कुठेतरी आत भिडला. असं जाणवलं की माझ्या स्वप्नात हे हॉटेल आहे, तेच या ताई प्रत्यक्षात आणत आहेत.. तेव्हाच ठरवलं होतं की केव्हातरी या नेमकं काय करतायत हे बघायला हवे. त्यावेळेस हा फ्रेंचैझी वगैरे प्रकार डोक्यात नव्हता, पण जयंती कठाळे या माझ्या रोल मॉडेल होत्या, या बाबतीत. पुण्यात जेव्हा यांचं उदघाटन झालं तेव्हा मी नेमका दुसऱ्या कामात स्वस्त होतो, आणि तसे बिबवेवाडी लांबही होते, त्यामुळे जाणे झाले नाही. म्हणून शेवटी एका रविवारी संध्याकाळी तळजाई आणि पूर्णब्रह्म असा प्लॅन केला. पण तिथे जाण्यापासून धक्क्यावर धक्केच बसत गेले आणि त्याची परिणती एका मोठ्या पोस्टमध्ये झाली, ज्याचा मला स्वतःलाच खूप त्रास झाला.. विचार करत गेलो तसे मला कळत गेले की कुठे काय चुकत गेले ते. नुसते जेवण खराब असते तर मला इतका त्रास झाला नसता. मी काउंटरवर सांगून बाहेर पडलो असतो की मला जेवण नाही आवडलं, पण यावेळेस योगायोगाने चेन ऑफ इनसिडेंट घडत गेली, ज्याने शेवटी कडेलोट झाला, त्यामुळे मी आता या सगळ्या गोष्टी एक एक करून घेणार आहे, काय चुकलं, आणि काय करता आले असते ते. या सगळ्या सांगण्यामध्ये एका मल्टिनॅशनल चेन माझ्या काय अपेक्षा होत्या ते ही मी विशद करीत जाणार आहे. सुरुवात झाली ती navigation पासून, गूगल मॅप वर दोन लोकेशन असणे हे धंद्याच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. विशेषतः जेव्हा येणाऱ्याला 4 सिग्नल फिरून यावे लागते तेव्हा. आणि हॉटेलच्या नावाचा साइन बोर्ड रस्त्यावर व्यवस्थित असणे आवश्यक आहे. हॉटेल शोधायला आम्हाला साधारण 25 मिनिटे लागली, यावरून ते किती कठीण होते याचा अंदाज येईल. पत्त्यामध्ये जवळची लँडमार्क असणे आवश्यक आहे. मला त्या हॉटेलात जायचेच होते म्हणून मी शेवटी ते हॉटेल शोधून काढले. पण आत गेल्यावर साधारण 20x20 च्या जागेत गाड्या लावायच्या होत्या, आणि त्यात मध्यभागी 2 आंब्याची झाडे होती. ती झाडे चुकवून माझी 4.25 मीटरची गाडी लावायची होती. आणि ती देखील अन्य कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन. बाहेर बसलेल्या एक ताई आमची गाडी बघून आत निघून गेल्या. मग मी थोडं मागे पुढे करुन गाडी लावली, ती बहुधा नीट लावली गेली नव्हती, पण माझा नाईलाज होता. यात काय सुधारणा करता येऊ शकते? आखलेले पार्किंग हा यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. आखलेले पार्किंग असते तर नेमकी कशी गाडी लावली की रस्ता अडणार नाही हे मला कळले असते. पुढची गोष्ट मेनू ची - माझ्या माहितीनुसार हे मुख्यतः a la karte रेस्टॉरंट आहे, मग थाळी ची जाहिरात का? लिमिटेड थाळी ही एक कोम्बो ऑफर आहे, पण हॉटेलचा USP वेगवेगळे पदार्थ हा आहे. पण बाहेर लावलेला खानावलीसारखा "आजचा मेनू" हा एका थाळी रेस्टो चा फील देत होता. मेनू मध्ये देखील थाळी ची व्हरायटी पहिल्या पानावर, आणि मग थाळी तुम्हाला नको असेल तर बाकीचे पदार्थ अशीच मांडणी होती, त्यामुळे आम्ही थाळी ऑर्डर करणे साहजिक होते. काय सुधारता येईल? तुमचा USP काय आहे ते आधी ठरवा, थाळी असेल तरच थाळी ठेवा, नाहीतर a la karte असेल तर ते हायलाईट करा. आधी तो बाहेरचा फलक काढून टाका, ते तुमच्या स्टॅंडर्ड ला शोभत नाही. आता कस्टमर एंगेजमेंट बद्दल- हे माझ्या आयुष्यातले पहिले रेस्टो होते जिथे जेवण दिल्यानंतर कोणीही काही विचारायला आले नाही.. सामान्यपणे एखादा कस्टमर आल्यावर आपण त्याला आपल्याकडील सर्वोत्तम ऑफर करतो.. मला बाहेर पडताना दिसले की हॉटेलमध्ये अतिशय सुंदर भारतीय बैठक होती. पण ती मला दिसलीच नाही. माझ्याकडे छोटी मुलगी होती, जिने टेबलावर धिंगाणा घातला. खरे तर अश्या वेळेस हॉटेलमालक स्वतः होऊन काय सुटेबल आहे ते सजेस्ट करतात. थोडेसे प्रोऍक्टिव्ह कस्टमर management करायला हवी.. त्याचप्रमाणे गिऱ्हाईकांचे पान रिकामे व्हायला लागले की नवीन पदार्थांची ऑर्डर मिळायची संधी असते. पण ते तितकेच लिमिटेड नाही, तर त्या निमित्ताने फीडबॅक पण मिळतो. जर तेव्हा मला कोणी ऑर्डर विचारायला आले असते तर मी तिथेच बोललो असतो की मला जेवण आवडले नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे, आणि मला वाटतं हा अप्रोच ठेवला तर माझ्यासारखे बरेच unhappy customers तिथेच mitigate होतील. आठवा, UPA2 का पडलं, त्यांना ऐकू जात नव्हतं.. बाकी जेवणाबद्दल अगोदरच बोलून झाले आहे, त्यामुळे परत बोलत नाही, फक्त काही गोष्टी नमूद करतो 1. फ्रीजमधली काकडी काढून किसणे, आणि संध्याकाळच्या कोशिंबिरीसाठी सकाळी काकडी किसून फ्रीजमध्ये ठेवणे, याने चवीत खूप फरक पडतो. 2. त्याचप्रमाणे फ्रिजमधून पुरण काढून पोळी लाटणे आणि सकाळी पोळी करून अर्धी भाजून मग संध्याकाळी पुन्हा गरम करणे, याने चवीत खूप फरक पडतो. असे जर तुम्ही करत नसाल तर पोळ्या का चामट होतात यावर अभ्यास केलाच पाहिजे. मी प्रामाणिकपणे सांगतो, शेवटची पोळी खायला आणि तोडायला त्रास होत होता. तुम्ही कदाचित 2-2 महिने फ्रीज करत नसाल, पण पोळी अर्धी भाजून ठेवल्याने पोळीची वाट लागते. परदेशामध्ये हेच करतात, आणि म्हणून तिथल्या तसल्या पोळ्या खाणाऱ्यांची पोटे बिघडतात. 3. मीठाचा वापर कमी असलेलाच बरा. कढी आणि वरण मी केवळ खारट असल्यामुळे खाऊ शकलो नाही. 4. मोठ्या वाट्या भरून लिमिटेड देण्यापेक्षा छोट्या वाट्या भरून द्या आणि परत सर्व करा. सर्व करायचे कष्ट वाचवायचे असतील तर भरलेल्या वाट्या टेबलावर ठेवा. लोक पाहिजे तर घेतील. पण केवळ पानात आहे म्हणून माझ्यावर वाटीभर वरण संपवायची सक्ती कशाला? असो, बोलण्यासारखे बरेचकाही आहे, पण किती बोलणार? फक्त आमच्या तुमच्याकडून थोड्या जास्त अपेक्षा आहेत हे कृपया ध्यानात घ्या आणि मुख्य म्हणजे पुण्यात तुमची स्पर्धा सरावना भुवनशी नसून श्रेयस पंचवटी कृष्णा सुकांता किंवा दुर्वांकुर बादशाही आणि स्वीकार शी आहे इतके लक्ष्यात असू द्या म्हणजे झाले. इत्यलम।
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 08/21/2018 - 18:58 नवीन
थोडक्यात 'व्हॅल्यू फॉर मनीचा अभाव' म्हणता येइल. हे पुर्ण्ब्रह्मा चेनचे स्वतःच्या मॅनेजमेंटकडुन चालवले जाणारे असल्यास फारच वाईट स्थिती म्हणावी लागेल. पण माझ्या अंदाजाने बढाईत बुडालेली मुख्य कंपनी प्रत्यक्षात सपोर्टला कमी पडते, सपोर्ट कमी झाला अथवा अपेक्षीत उत्पन्न हाती लागले नाही की फ्रँचाईझी इंटरेस्ट कमी होतो, मलातरी इनिशीयल इंटरेस्ट संपलेल्या फ्रँचाईजीची केस असण्याची शक्यता अधिक वाटतीए. असो.
  • Log in or register to post comments
ल
लई भारी Wed, 08/22/2018 - 11:45 नवीन
आपल्या मुद्द्यांशी अगदी सहमत आहे. ग्राहक म्हणजे मी राजा आहे अशी वागणूक द्यावी अशी अपेक्षा नाही, पण सौजन्यपूर्वक बोलणे, अभिप्राय दिल्यास त्याची वेळीच दखल घेणं महत्वाचं आहे. उत्तम जेवण मिळावं ही अपेक्षा अगदीच रास्त आहे. त्यातूनही एखाद्या दिवशी काही अपरिहार्य कारणांमुळे काही वाईट अनुभव येऊ शकतो पण अशा वेळी ग्राहकांशी नीट संवाद ठेवणं अपेक्षित आहे असं वाटतं. पुण्यात बऱ्याच महाराष्ट्रीयन जेवणाच्या ठिकाणी अभिप्राय दिला तरी 'आमच्याकडे असंच असतं' असा आविर्भाव असतो, पण जवळपास सर्व ठिकाणी बहुतांश लोकांना आवडेल असे जेवण असते त्यामुळे चालून जातंय.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/25/2018 - 15:12 नवीन
आनंदराव तुम्हाला त्या हॉटेलचा अनुभव सर्वतोपरी वाईट आला हि वस्तुस्थिती आणि त्याबद्दल तुम्ही मुद्देसूद लिहिले आहे मग त्याबद्दल तुम्ही स्वतःला दोषी वाटून घेण्याचे कारण नाही. त्या "ताई"नि जर आपलीच लाल म्हणून व्हिडीओ प्रसारित केला आणि सार्वजनिक न्यासावर आपली भलामण करणारे लेख लिहिले असतील तर त्याचा वाईट अनुभव सुद्धा प्रसारित होणारच आणि व्हायलाच पाहिजे. एकदा खिडकीत बसले कि खालून लोक शुकशुक करणारच, म्हणून कुणाला चिडण्याचे कारण नाही. असा अभिप्राय घेऊन त्या ताईंना सुधारायचे आहे कि इडली वाल्या कामतांच्या वाटेवर जायचे आहे हे त्यांनी ठरवायचे आहे. तुम्ही कुणाला आपल्या लेखनाचे समर्थन देण्याचे कारण नाही.तुम्ही दमड्या मोजल्या आहेत चिंचोके नाहीत. भिकार असेल तर भिकारच म्हटले पाहिजे उगाच मारुतीच्या बेंबीत बोट घालून इतरांना खड्ड्यात पाडण्यात हशील नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 08/25/2018 - 15:52 नवीन
कामतांनी भारंभार फ्रांचाईझी दिलेली हाटेलं तद्दन भिकार आहेत.
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 08/21/2018 - 18:24 नवीन
नुकतेच सुरू झाले आहे, स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराकडून धनेश्वर कडे जाताना डाव्या हाताला जेमतेम पन्नास पावलांवर पहिल्या मजल्यावर आहे. रोज बदलता मेनू असतो, मिष्टान्न अमर्यादित तरी वाजवी दरात , अनुभव हीच खात्री, फक्त सोमवारी बंद, आणि हो चतुर्थी ला उकडीचे मोदक असतात अनुभवी नाखु
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 08/21/2018 - 19:52 नवीन
पंडित कुलकर्णींचे ना? चांदीच्या ताटात वाढतात ते? आम्ही वर्षानुवर्षे त्यांच्याकडून स्वयंपाक मागवतो..उत्तम चव! परवाच मासवडी, पुरणपोळी, मसालेभात वगैरे जेवण मागवलं होतं. छानच होतं. Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 08/22/2018 - 12:45 नवीन
व्हाट्सऍप वरची पोस्ट बघून दोनच दिवसांपूर्वी ट्राय केले, खेदाने सांगावे वाटते अजिबात चांगले वाटले नाही जेवण. साधारणपणे आमच्या हापिसात असतात तसल्या पोळ्या, पिठले, मटार रस्सा, मसालेभात, कढी यापॆकी काहीच व्वा म्हणण्यासारखे नव्हते. खव्याच्या पोळ्या म्हणून जे काय होते ते बाहेरून आणलेले पेढे + बेसन असे काहीसे मिश्रण घातल्यासारखे वाटत होते. आणि ओल्या नारळाच्या करंजीत घालायचे सारण हा हि एक गोड पदार्थ असतो हे माहितीच नव्हते, नारळाचा हलवा कि काहीतरी नाव दिले होते. त्यांचे वैयक्तिक केटरिंग कसे असते ते माहिती नाही, पण थाळी नाही आवडली. अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव असू शकतो. सध्या चिंचवड मध्ये अगदी आवर्जून (माझ्यामते) खाण्यासारखी थाळी म्हणजे "रागा" थाळी. चिंचवड स्टेशन चौकात द्वारकादास शामकुमारच्या समोर, जस्ट कॅजुअल्स च्या बाजूला. छान व्यवस्था आणि छान जेवण. उगाच भरमसाठ पदार्थांचा भडीमार न करता ताटातले सगळे पदार्थ (आणि खासकरून भाज्या) खाता येतील असा मेनू. दोन स्वीट्सपैकी बरेच वेळेस उकडीचे मोदक + तूप हे एक असते. थरमॅक्स चौकातील संस्कृती डायनिंग हॉल पण ट्रे करण्यासारखा आहे.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 08/22/2018 - 13:02 नवीन
हो? अरेरे... मी स्वतः थाळी नाही खाल्ली जाऊन पण केटरिंग मात्र अनेक वर्ष झाले घेत आहोत.. डांगे चौकात रसरंग की असेच काही तरी नाव असलेले हॉटेल आहे. तिथे पण बरी थाळी मिळते असं आई म्हणत होती.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 08/22/2018 - 13:25 नवीन
रसगंध नाव आहे. मी एकदा गेलो होतो. चांगले आहे पण अप्रतिम नाही. भाज्या ठीक वाटल्या , बाकी पदार्थ तुलनेने चांगले होते .नेमकं आठवत नाही पण बहूधा छोटे बटाटेवडे होते , ते चांगले होते. गोड पदार्थ काय होता आठवत नाही पण चांगला होता. पण अगदी आवडीने खावीशी वाटावी अशी एकही भाजी वाटली नाही त्यामुळे नंतर पुन्हा गेलो नाही. तरी अजून एखाद वेळेस जाईन कधीतरी.
  • Log in or register to post comments
र
रीडर Tue, 08/21/2018 - 21:27 नवीन
सेल्फ obsessed वाटत आहेत या बाई.
  • Log in or register to post comments
र
रीडर Tue, 08/21/2018 - 21:34 नवीन
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Wed, 08/22/2018 - 05:24 नवीन
बाईंनी मोठ्या घमेंडीत सांगितले की त्या हल्ली फक्त नऊवारीत वावरतात. पण नंतर बोलताना मुले त्यांना ममा की मामा असे म्हणतात असे कळले. नऊवारी साडी नेसलेल्या आईला आई म्हणणे मागासलेले वाटते का की पोरे तिला ममा म्हणणे पसंत करतात? बाईंची भाषाही अशुद्ध आहे. "मी गेली होती" "मी वापस गेली" वगैरे हे कुठले मराठी आहे? नागपूर? डी एस केंची काही भाषणे ऐकली आहेत त्यातही असाच एक अहंकार जाणवतो. पण थोडा सौम्य. बाईंचा अहंगंड म्हणजे त्यापुढे गगनही ठेंगणे!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 08/22/2018 - 08:56 नवीन
...बाईंची भाषाही अशुद्ध आहे. "मी गेली होती" "मी वापस गेली" वगैरे हे कुठले मराठी आहे? नागपूर?...
उर्वरीत टिका ठिक, पण अशुद्ध भाषाशास्त्राचे येथे प्रयोजन साशंकीत असावे किंवा कसे.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 08/22/2018 - 10:40 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 08/22/2018 - 13:10 नवीन
अहंकारापाई त्या बाईने माती खाल्ली हे व्हिडिओ मध्ये दिसलेच होते . ' आमची कुठेही शाखा नाही ' नंतर आता असले व्हिडिओ म्हणजे स्वकौतुक करण्याचा नवीन प्रकार दिसतोय जे व्यवसायाला मारक आहे . स्वकौतुक करणारे कुठल्याही जातीधर्माचे किंवा गरीब , श्रीमंत असुद्या ते डोक्यातच जातात . कष्ट करून बांधकाम क्षेत्रात नाव कमावलेला डी एस के साळसूदपणे गुंतवणूकदारांचे पैसे अवैधरीत्या त्याच्याच वेगवेगळ्या कम्पन्या मध्ये फिरवत होता हे तपासात सापडले च ना ? बरं ही फिरवा फिरवी करताना वर परत अहंकाराचीच भाषा .
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Mon, 06/10/2019 - 20:37 नवीन
त्या नाग पुर च्या आहेत
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Wed, 08/22/2018 - 12:11 नवीन
मी काय म्हणतो. महाराष्ट्रीयन लोक खास ठरवुन मराठमोळे जेवण देणार्‍या होटेलात का जातात? म्हणजे कधीतरी लहर आली थाळी खायची, बाहेर पडलोच आहोत, चला हॉटेलात असे म्हणुन महाराष्ट्रीयन थाळी खायला जायचे समजु शकतो किंवा घरी काही कार्यक्रम आहे, बरेच लोक येणार आहेत कुठे घरी करत बसणार म्हणुन थाळी पार्सल आणले समजु शकतो किंवा म्हातारे कोतारे असलेला ग्रूप आहे आणि त्यांना पार्टी द्यायची म्हणून महाराष्ट्रीय थाळी खायला गेलो हे पण कळु शकते. पण मुद्दाम ठरवुन, महाराष्ट्रीय जेवणाचा आस्वाद घ्यायचा म्हणुन २५ मिनिटे शोधत थाळी खायला जावेच कशाल? रोज घरी खाणारे पदार्थ खायला? असो. लेखाच्या निमित्ताने काही पुणेद्वेष्ट्या लोकांनी नेहमीप्रमाणे हात धुवुन घेतले आहेत. चांगली महाराष्ट्रीयन थाळी कुठे मिळते याची काही उत्तरे: १. फडके डायनिंग हॉल (शैलेश रसवंती जवळ, एसपी कॉलेजच्या समोरच्या गल्लीत. २. दुर्वांकुर ३. शबरी ४. श्रेयस ५. आशा डायनिंग हॉल ( थाळी म्हणाण्यापेक्शा राइस प्लेटला जवळची). ६. पुना बॉर्डिंग ७. पुणे गेस्ट हाउस वगैरे वगैरे वगैरे पुण्यात वर्‍हाडी, खानदेशी पदार्थ देणारी हॉटेल्स पण ढिगाने आहेत. अर्थात ती फार प्रसिद्ध नाहित कारण एवढा जळजळीत माल पुणेकरांना मानवत नाही. शिवाय मागणीप्रमाणे पुरवठा असतो. जर मुळात मासवडी खायची इच्छा होणारे लोकच हाताच्या बोटावर असतील तर हॉटेल वाला कश्याला तोट्यात जाण्यासाठी उफराटे धंदे करेल. शिवाय मला हे कळत नाही वळचणीतल्या कुठल्यातरी गावातुन येउन " च्यामारी आमच्या ***** सारखे ***** मिळत नाही पुण्यात" असले गळे काढुन काय उपायोग? पुणेरी (पद्द्धतीचे) जेवण तुझ्या गावात मिळते तरी का रे? बाकी पुण्याला खाद्यसंस्कृती शिकवणे म्हणजे सामान्य माणसाने देवाला धर्म, आनंदला बुद्धीबळ आणि तेंडुलकरला क्रिकेट शिकवण्याएवढे हास्यास्पद आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 08/22/2018 - 13:55 नवीन
माझा विषय मुळातच वेगळा आहे - मी त्या हॉटेलला थाळी खायला गेलो होतो असे तुमचे म्हणणे असेल तर तसे मुळीच नाही - मी का गेलो होतो ते पहा -
साधारण 10 वर्षे मी पुण्यात वेगवेगळ्या मराठी रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवत आहे. अगदी गिरीजा आणि आनंदी पासून मयूर, पंचवटी आणि सुकांता पर्यंत सगळ्या थाळ्या मी टेस्ट केल्या आहेत. आणि पूर्वी देखील कुठेतरी लिहिल्याप्रमाणे या सर्व थाळ्या एकसुरी आहेत, म्हणजे त्याच भाज्या, कोशिंबिरी, आणि मुख्य म्हणजे स्वीट चे तेच ते प्रकार. श्रीखंड, गुलाबजाम, फ्रुटसलाद किंवा बासुंदी. पुरणपोळी किंवा मोदक म्हणजे चैन अशी स्थिती काही दिवसांपूर्वी होती, सध्या थोडा फरक पडलाय. राजस्थानी असेल तर सोबत जिलबी आणि अन्य काही वेगळे स्वीट असतात. महाराष्ट्रात डेलिकेसी इतक्याच आहेत का? कोकणातच श्रावणात होणारे वेगवेगळे प्रकार बघितले तरी 10 तरी वेगळे पदार्थ मिळतील. पण कोणत्याही कारणाने का असेना हे पदार्थ इथे मिळतंच नाहीत, त्यामुळे या साऱ्या थाळ्या मध्ये एकप्रकाराचा एकसुरीपणा आहे. या पार्श्वभूमीवर अश्या प्रकारच्या वेगवेगळ्या डेलिकेसी देणारे एक मराठी रेस्टॉरंट सुरू करावे असे साधारण 3-4 वर्षे डोक्यात चालू आहे, पण इतर अनेक जबाबदाऱ्या आणि काही कारणाने ते जमत नाहीये.. पण त्याची रूपरेषा माझ्या डोक्यात होती.. योगायोगाने जयंती कठाळे यांचा स्वयं मधला व्हिडिओ कुठेतरी पाहण्यात आला, आणि कुठेतरी आत भिडला. असं जाणवलं की माझ्या स्वप्नात हे हॉटेल आहे, तेच या ताई प्रत्यक्षात आणत आहेत.. तेव्हाच ठरवलं होतं की केव्हातरी या नेमकं काय करतायत हे बघायला हवे. त्यावेळेस हा फ्रेंचैझी वगैरे प्रकार डोक्यात नव्हता, पण जयंती कठाळे या माझ्या रोल मॉडेल होत्या, या बाबतीत.
मी पार्टीसाठी सहसा थाळीमध्ये जात नाही. कारण तेच आपण नेहमी खातो, पण संकष्टीचा उपास सोडायचा असेल, किंवा सार्‍या कुटुंबाला झेपेल असे जेवण हवे असेल तर थाळीमध्ये जातो. पण तिथे पण इतका एकसुरीपणा आहे की त्याचा कंटाळा आलाय. या ताईंनी काहीतरी वेगळे केलय असे त्यांचे व्हिडिओ बघुन वाटले, म्हणून केवळ मी तिथे गेलो, २५ मिनिटे शोध घेऊन. समोरच बासुरीसारखे सुंदर रेस्तो असताना. अर्थात तिथे जाऊन सगळा विचका झाला हा भाग वेगळा
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Wed, 08/22/2018 - 14:26 नवीन
तुमचा अपेक्शाभंग मी समजु शकतो.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 08/22/2018 - 13:58 नवीन
बाकी पुण्याला खाद्यसंस्कृती शिकवणे म्हणजे सामान्य माणसाने देवाला धर्म, आनंदला बुद्धीबळ आणि तेंडुलकरला क्रिकेट शिकवण्याएवढे हास्यास्पद आहे.
Aur ye laga sixer!! Sandy
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/23/2018 - 09:05 नवीन
हायला ! हा खरा पुणेरी तडका ! घ्या आता !
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 08/22/2018 - 12:24 नवीन
खेड शिवापूर आणि पुढेमागे इतकी, घरगुती, गावरान, चुलीवरची, तुपातली (चिकन, मटण, वांगी सर्व शुद्ध घरगुती तुपात, लोण्यात इ.)... अशी हॉटेल्स आहेत की घरगुती, गावरान शब्द आलटून पालटून नजरेसमोर स्क्रोल होत राहतात. तिथे कधीकधी विचारावंसं वाटतं "मला शहररान, बाजारगुती, डालडायुक्त जेवण हवं आहे, कुठे मिळेल का या भागात?" ;-)
  • Log in or register to post comments
च
चिनार Wed, 08/22/2018 - 13:10 नवीन
अगदी अगदी अस्संच होतं गवि सर.. मलातर नेहमी "मला हॉटेलातलं चिकन खायचंय हो, घरातलं नाही" असं ओरडायची इच्छा होते.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 08/22/2018 - 13:26 नवीन
विडिओ बघितल्यानंतर एक ना एक दिवस अशा प्रतिक्रिया वाचायला मिळतील असे वाटलेच होते :) इतर राज्यांतील लोक ह्या असल्या पुरणपोळ्या खातात आणि मग हमारे स्वीट्स खाके देखो वगैरे बढाया मारतात :). कसलाही मोठेपणाचा ढोल न वाजवता चविष्ट नॉन-व्हेज थाळी देणारे दाजी (दाजीचा ढाबा, रावेत-वाल्हेकरवाडी रोडवर) लै धान्य म्हणावे लागतील :).
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड गुरुवार, 08/23/2018 - 07:20 नवीन
देवाला प्रश्न विचारायचा प्रमाद पत्करून विचारू इच्छितो
पुण्यात प्रॉपर पुण्याचा म्हणावा असा कुठला पदार्थ खायला मिळेल ?
खास स्पष्टीकरण १. मला पुणे द्वेष असण्याचे काहीच कारण नाहीये २. पुणे पुणेकर वगैरेंपैकी कोणीच माझे कुठलेच घोडे मारलेले नाहीये. ३. पुण्यात मिळणाऱ्या उत्तम थाळी पद्धतीच्या जेवणाला कोणीच नावे ठेवलेली मला तरी खपणार नाही. ४. भिकार खायच्या जागांना भिकार म्हणल्यावर जळफळाट होऊन पुणेरीपण जागृत व्हायचं प्रयोजन समजलं नाही.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 08/23/2018 - 07:34 नवीन
पुण्यात प्रॉपर पुण्याचा म्हणावा असा कुठला पदार्थ खायला मिळेल ? म्हणजे शिक्रण, मटारउसळ, काकडी कोशिंबीर (खमंग काकडी) इ. का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 19 hours ago
  • सुंदर !!
    6 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा