पूर्णब्रह्माचा अपमान!!
बरेच दिवस पुण्यात एका नवीन हॉटेलची जाहिरात चालू होती.. त्या हॉटेलच्या मालकीण बाईंचा एक विडिओ पण बराच व्हाट्स अप वर देखील फिरत होता. विमानात veg food मिळालं नाही म्हणून तिने थेट रेस्टॉरंट टाकलं वगैरे.
त्या प्रसिद्ध हॉटेलची फ्रेंचैझी पुण्यात चालू झाली होती, आणि बटाटेवड्यापासून पुरणपोळी आईस्क्रीमपर्यंत सगळं आहे असे कळलं.
मग त्याचा आस्वाद घ्यायचा प्लॅन केला. अनायासे आज बिबवेवाडीत गेलो होतो.
हॉटेल ला जायचं ठरवलं, पण रस्ता माहीत नव्हता, त्यामुळे गूगल मॅप वर सर्च केलं. आणि तिथूनच नाट लागायला सुरुवात झाली. मॅपवर 2 लोकेशन दिसली, एकाच भागात, त्यातलं एक निवडलं, आणि निघालो, तिथे पोचलो तर कळलं की हे हॉटेल या गल्लीत नाहीच, शेजारच्या गल्लीत आहे.. बरं शेजारची गल्ली म्हणजे कशी, तर सातारा रोड वर बाहेर यायचं, रांका पासून मार्केट यार्ड पर्यंत जायचं, आणि U टर्न मारून परत यायचं. आणि मग शोधत शोधत जायचं, रस्त्यावर बोर्ड नाही, एक बोर्ड होता तो झाडात लपलेला, कसाबसा तो मिळाला, आणि आम्ही आत गाडी टाकली.
गाडी लावणे म्हणजे मोठे दिव्य होते. झाडांच्या मधून जागा शोधून गाडी लावायची, नो पार्किंग असिस्टंट. तिथे एक बाई होती ती आम्हाला बघून आत निघून गेली.
बाहेर मेनू लावलेला होता पालकाची भाजी, लाल भोपळा, पुरणपोळी, कढी वगैरे. मेनू बघून आत जाऊ की नको असा प्रश्न पडला होता, पण केव्हातरी जायचेच आहे तर आताच जाऊया म्हणून गेलो.
आत गेल्यावर पुणेरी पद्धतीने थंड स्वागत झालं, फक्त इतकंच कळलं की यांच्याकडे थाळी आणि इतर मराठी पदार्थ पण आहेत. एकंदर वातावरण बघून बायको तर परत जाऊया म्हणत होती, पण तिला थांबवलं. आणि मेनुकार्ड मागवलं.
एका इंजिनीरिंग च्या पुस्तकाएव्हढं मेनूकार्ड होतं.. साधारण चाळल्या वर इतकं कळलं की आज 350 रु वाली महालक्ष्मी थाळी आहे.
*लिमिटेड थाळी - 3 पोळ्या, एक पुरणपोळी, भोपळा, पालक, कढी, वरण, भात, लोणचे, चटणी, भजी, साबुदाणा वडा, पापड इत्यादी. थाळी लिमिटेड, किंमत 350 रु* .
खरे तर शहाण्या माणसाने इथेच मागे फिरायला हवे होते, पण विनाशकाले विपरीत बुद्धी. आम्ही 2 थाळ्या ऑर्डर केल्या आणि बसलो. जेवण आलं, आता आपण लिमिटेड पदार्थांचा आस्वाद घेऊ.
*साबुदाणा वडा -* मोठ्या पेढ्याइतक्या आकाराचे 2 वडे. टेस्ट ओके.
काकडीची कोशिंबीर - फ्रीजमध्ये साठवलेल्या काकडीची कोशिंबीर असावी बहुतेक. ठीक म्हणावी इतपत.
*पुरणपोळी 1 नग -* 100 टक्के फ्रोझन पोळी गरम करून दिली असणार. आम्ही त्याला एक फुलकाच समजत होतो, पण तो थोडा गोड होता, म्हणून त्याला पुरणपोळी म्हणणे भाग होते. जाड पापुद्रा, पुरणाचा अभाव, आणि खात जावे तशी चामट होत जाणारी. ज्यांनी अमेरिकेत मिळणारी फ्रोझन पोळी खाल्ली असेल त्यांना नक्की कळेल. पुण्यात त्या पदार्थाला पुरणपोळी म्हणण्याची हिंमत मी करु शकत नाही.
*साधी चपाती -* 3 चपात्या, थोड्या जास्त भाजलेल्या, आणि गार होतील तश्या चामट होत जाणाऱ्या. या पण फ्रोझन असाव्यात. तिसरी चपाती, जी गार झाली ती चावतच नव्हती.
एक गोष्ट सांगायची राहिलीच, पहिली चपाती अर्धी खाऊन झाल्यावर त्यांनी *वेलकम ड्रिंक* आणून दिले, guess what? एक कटिंग चहा इतके ताक!! म्हणे वेलकम ड्रिंक. हे वेलकम ड्रिंक बघून अक्षरशः डोळे पाणावले. फोटो काढायचा मोह कटाक्षानं आवरला.
हं, तर पुढचे पदार्थ
*भजी* - सुपारीच्या आकाराची 3 भजी.
मीठ वाढतो तितकी शेंगदाण्याची चटणी आणि मेतकूट.
*भोपळ्याची भाजी -* सालीसकट केलेली लाल भोपळ्याची भाजी, जी अर्धी मी बटाट्याचा रस्सा समजून खाल्ली, अर्ध्यात बायकोने आठवण करून दिली की तो भोपळा आहे!
*पालक रसभाजी* - दाणे, खोबरं आणि मसाला घातला की काहीही खपतं असा त्यांचा बहुधा गैरसमज असावा. त्यात पालक शोधावाच लागत होता, पण त्यातल्या त्यात तीच चांगली लागत होती .
*कढी -* आंबट दही तसेच घट्ट घुसळून त्याची कढी केलेली. ना आपण घरी करतो तशी मिरचीची फोडणी वगैरे असलेली होती, किंवा ना कढी खिचडी सारखी. मेस मध्ये असते तशी चव साधारण होती. आणि खारट!
*वरण* - खारट!
*आणि भात!!* तो सुंदर असणार, कारण त्यांनी तो दिलाच नाही. आम्ही पण मागायला गेलो नाही! इतकं सुंदर जेवण जेऊन पोट भरलं होतं!!
आपण अन्न हे पूर्णब्रह्म म्हणतो, पण साडेतीनशे रुपयात असले जेवण विकणे हा त्या पूर्णब्रह्माचा अपमान आहे! परदेशात चालेल हे असले जेवण, पण पुण्यात तर नाहीच नाही!
आता सर्विस बद्दल बोलूया - *अत्यंत मितभाषी स्टाफ* असणार! कारण *आम्हाला जेवण दिल्यावर कोणी ढुंकून सुद्धा बघितलं नाही* . हवं नको वगैरे फारच लांब राहिलं!!
जेवण झाल्यावर बिलाचे पैसे द्यायची वेळ आली, बिलात 350 रु ची थाळी आणि वरती सर्विस टॅक्स बघून माझी सटकलीच होती.. *जी एस टी सकट 735 रु फक्त!* *बिल देताना विचारले, की आजच्या थाळीत भात होता का? तर फक्त सौजन्याने त्यांनी विचारले, तुम्हाला मिळाला नाही का? (सॉरी वगैरे जाऊदे, पण पुढे बोलणे पण नाही, किमान आतल्या माणसाला काय झाले आहे ते विचारावे इतकीच अपेक्षा होती)* केवळ मला भांडायची इच्छा नव्हती, त्यामुळे शांतपणे मी पैसे देऊन बाहेर निघालो होतो, पण तेव्हढ्यात त्यांनी कळ काढली!! मला त्या बाई पुढच्या वेळेस आलात तर डिस्काउंट कूपन देते म्हणून सांगू लागल्या!!
मग मात्र माझी सहनशक्ती संपली. शांतपणे मी त्यांना म्हणालो, काळजी करू नका, मी परत येणार नाही!!
💬 प्रतिसाद
(194)
च
चांदणे संदीप
Sun, 08/19/2018 - 20:10
नवीन
थाळी प्रकारात आधी कोणाचातरी अनुभव ऐकून जाणेच योग्य असे माझे मत.
रच्याकने, हा लेख आधी कायप्पाला दाखवून आणलाय का?
Sandy
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 08/20/2018 - 05:16
नवीन
कायप्पा वर मी अगदी पर्सनल ग्रुप ना टाकलाय. पण चेपू वर जाम फेमस झालाय हा लेख.. तिथून कोणीतरी टाकला असेल कायप्पा वर.
काय आहे, तिथे जाऊन फ्रस्ट्रेट झालेले बरेच जण असणार आहेत, त्यामुळे असा लेख मिळाला की ढकलत असतील पुढे..
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 08/20/2018 - 05:39
नवीन
हॉटेलच नाव सांगा भो, जाहिररित्या सांगून औचित्यभंग होत असेल तर व्यनित कळवलंत तरी चालेल.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 08/20/2018 - 05:44
नवीन
ओह्हो. शीर्षकातच नाव दिसतंय :)
- Log in or register to post comments
स
सुचिता१
Sun, 08/19/2018 - 20:12
नवीन
छान आहे समीक्शा :) :) तो विडीओ म्हणजे मला आत्मस्तुती चा बॉंम्ब च वाटला होता . त्यांच े आदर्श आहेत,
मँकडॉनाल्ड आणि डॉमीनोज मग काय फ्रोजन फुड वर च सगळी मदार असेल .
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Mon, 08/20/2018 - 02:06
नवीन
आमच्या वरच्यावाडीच्या पारावर कोणी उतारा म्हणून ठेवलं तर काळं कुत्रं बी खाणार नाही. पुरणपोळी पुरणपोळीच असते, ती पुण्यात खावा का आणि कुठं (तुम्ही खाल्लेली खचितच नव्हती, पण ती कुठंही खाल्ली असती तरी पुरणपोळी म्हणवले नसतेच).
एकंदरीत हॉटेलानुभव पाहता निगेटिव्ह रेटिंग पण कमीच पडेल असे वाटते. पण त्याला जोडून असलेला "पुण्यातच काय ती सुग्रास जेवायची अक्कल आहे" हा ओव्हरटोन पण काही तितका खास आवडला नाही, असोच.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 08/20/2018 - 05:02
नवीन
पुणेरी टोन वगैरे काही नाही. उलट पुण्यात म्हणून हे सगळं खपतय.. कोल्हापूर सारख्या छोट्या शहरात या हॉटेल ने 2 महिन्यात गाशा गुंडाळला असता..
मी पुण्यात राहतो म्हनून मी पुण्याचं नाव घेतो. इतकंच!! परंतु हे अस्सल मराठी जेवण नाही, त्यामुळे कोणत्याही शहराचे नाव टाकले म्हणून काही फरक पडणार नाही.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Mon, 08/20/2018 - 06:48
नवीन
माफी असावी एकडाव, बाकी ग्रामीण जेवणाचा अभाव आहे पुण्यात खुद्द शहरात पण नशिबाने लाभलेल्या आजूबाजूच्या मावळांत मिळून जातं उत्तम
- Log in or register to post comments
ल
लई भारी
Mon, 08/20/2018 - 07:18
नवीन
एक झकास पोस्ट होऊन जाऊ दे की या खादाडीची! आम्हाला पण ४ ठिकाणं म्हायती पडतील!
रच्याकने: मी "बैजवार" हा शब्द वापरणार होतो; पण परत गोंधळलो कि खरंच असा शब्द(अर्थात: बोलीभाषेत) आहे का?
आईला,गावाला जाऊन लै दिस झाले म्हणजे!
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 08/20/2018 - 05:05
नवीन
बाकी हे खरं आहे. आणि पुण्यात अस्सल मराठी, (ज्यात खान्देशी आल्या, वर्हाडी आल्या, कोकणी पण आल्या) डिलेकसी कुठे मिळतच नाहित असे माझेही मत आहे. पण या बाईंचा विडिओ बघून अपेक्षा वाढल्या होत्या..
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sat, 08/25/2018 - 16:05
नवीन
डेलिकसीज मिळतात की. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या मिळतात. तुम्हांला अपेक्षित असलेल्यापैकी कुठला प्रकार मिळाला नाही?
- Log in or register to post comments
ग
गवि
Mon, 08/20/2018 - 03:23
नवीन
अनेक, म्हणजे शेकडो शाखा दणादणा उघडत गेलेल्या (विशेषतः निष्काळजीपणे चुकीच्या फ्रॅंचायजी देऊन) अनेक रेस्टॉरंट चेन्समधे असाच अनुभव येतो.
हायवेवर जागोजागी असलेल्या कामत रेस्टॉरंटच्या चवीविषयीही असंच मत आहे.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 08/20/2018 - 05:17
नवीन
कामत बद्दल तर न बोललेलं बरं..
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 08/20/2018 - 03:33
नवीन
त्यापेक्षा चिंचवड बेष्ट,गावात गोडाधोडासकट वर दिलेल्या पैश्यापेक्षा कमी किंमतीत "अब्ब" म्हणेपर्यंत चापून खा,रोज बदलता मेनू.
आणि हो नुकताच एक मिपाकर जाऊन आला आहे
खुलाशी नाखु
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 08/20/2018 - 04:57
नवीन
सुहास भोजनालय का?
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Mon, 08/20/2018 - 14:54
नवीन
सुहासचं जेवण चांगलं असतं (म्हणजे फार अप्रतिम नसलं तरी) पण बाकी गोष्टी डोक्यात जातात.
दुपारी अंधारलेलं असलं तरी दिवे बंद असतात, ग्राहकाने विनंती केली तर दिवे लावले जातात.
मी एकदा दुपारी एकटाच गेलो होतो तेव्हा काहीशी गर्दी होती आणि मी बसून बराच वेळ झाला मात्र ताट आले नाही, बहूधा पुरेशा चपात्या वगैरे तयार नसतील असा विचार करुन मी शांतपणे वाट बघत बसलो. मात्र बाजूच्या टेबलावर माझ्या नंतर आलेल्या काही ग्राहकांकडे ताटे आली तेव्हा माझं डोकं फिरलं. सरळ उठलो आणि काउंटरवर जावून म्हणालो "माझ्या नंतर आलेल्या ग्राहकांना तुम्ही ताटं वाढता ? ती काय स्पेशल आहेत का की मी एकटा (म्हणजे हॉटेलला कमी उत्पन्न) म्हणून असं" आणि मग तिथून निघालो पण कुणी ना दिलगिरी व्यक्त केली ना थांबवण्याचा प्रयत्न केला. असो.
हिंजवडीला जाताना वृंदावन - अंगत-पंगत अशी हॉटेलची जोडी आहे..म्हणजे वृंदावन हे डिश पध्द्तीचे तर अंगत-पंगत हे थाळीचे.. ते एकदा नक्की बघा, .. स्विगीवरुनही त्यांची थाळी पार्सल मागवता येते. . चवही चांगली आहे. एका थाळी पार्सलमध्ये दोघे खावूनही बरेच अन्न उरते... एका थाळी पार्सलमध्ये चार भाज्या , सहा चपात्या, भजी वा तत्सम पदार्थ , गोड पदार्थ्, गोड कढी, दोन प्रकारचे वरण , भात असं बरंच काही येतं.
तिथे जावून खाण्याचा अनुभवही चांगलाच आहे (पार्सलपेक्षा थोडा महाग वाटला तरी) !!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 08/21/2018 - 04:57
नवीन
अंगत पंगत वरुन तर दररोजचा जाण्यायेण्याचाच रस्ता आहे पण अतापर्यंत कधी जाणं झालं नाही तिथं, तुम्ही म्हणताय तर एकदा थाळी खाउन पाहतो तिथली. बाकी हिंजवडीत पोलीस स्टेशनच्या बाजूलाच इंडियन थाळी हाऊस नामक अमर्यादित थाळी रेस्टोरंट आहे. १०० रुपयात विदाऊट स्वीट अमर्यदित थाळी अआणि १५० रुपयात स्वीटसकट अमर्यादित. चव खरोखरच छान आहे.
- Log in or register to post comments
च
चिनार
Tue, 08/21/2018 - 08:16
नवीन
अंगत पंगत उत्तम आहे. पुण्याला असताना तीन- चार वेळेला गेलो आहे.
आता पुण्यात आल्यावर एकदा जाईन म्हणतो..
- Log in or register to post comments
प
पुंबा
Tue, 08/21/2018 - 08:25
नवीन
कट्टा करण्यासारखे आहे का?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 08/21/2018 - 08:53
नवीन
कट्टा करण्यासारखे नाही, तुलनेने जागा खूप कमी आहे. साताठ टेबल्स फक्त.
- Log in or register to post comments
ल
लई भारी
Wed, 08/22/2018 - 11:50
नवीन
त्यांनी आता जवळच, कल्याण-भेळ/हयात च्या बाजूला मोट्ठ्या जागेत स्थलांतर केलंय. नवीन ठिकाणी गेलो नाही पण जागा मोट्ठी आहे.
ह्यांचं जेवण थोडं मसालेदार वाटलं.
डबा नसेल तर पर्याय म्हणून जवळच 'चामुंडा' ची थाळी बेश्ट आहे.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 08/22/2018 - 12:49
नवीन
तिथेही जाउन आलोय. आधीच्या जागेपेक्षा जरा मोठी असली तरिही त्यामानाने अपुरीच आहे.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Tue, 08/21/2018 - 15:13
नवीन
इंडियन थाळी हाऊसच्या माहितीबद्दल धन्यवाद.. नक्कीच बघेन एकदा
- Log in or register to post comments
च
चामुंडराय
Mon, 08/20/2018 - 03:45
नवीन
अशा पुरणपोळीला आम्ही पुरण-दा-प्राठ्ठा म्हणतो.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 08/20/2018 - 06:28
नवीन
ठ्ठो! चपखल शब्द आहे.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Mon, 08/20/2018 - 04:29
नवीन
कुझिन महाराष्ट्रीयन
टाईप कॅज्युअल
एव्हरेज कॉस्ट फॉर टू ९०० फक्त
घरातल्या जेवणाला एवढे पैसे??!!
बाकी तुम्ही केलेल्या वर्णनावरून गाळा/खानावळ टाईप वाटलं होतं, पण फोटो तर पॉश हॉटेलसारखे आहेत.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 08/20/2018 - 06:31
नवीन
हॉटेल खूप पॉश आहे. स्वच्छता वगैरे माहीत नाही, पण ठीकठाक असावी. ऐसपैस आहे. पण पुण्यात त्यांची स्पर्धा सरावनाभुवनशी नसुन गल्लोगल्ली असलेल्या खाणावळी, आणि श्रेयस, सुकांता, पंचवटी सोबत आहे हे कसे विसरुन चालेल?
- Log in or register to post comments
द
दिगोचि
Mon, 08/20/2018 - 04:31
नवीन
विमानात शाकाहारी जेवण मिळत नाही हे शक्य नाही. या बाईनी अगोदर विमान कम्पनीला सान्गितले नसेल. म्हणुन तसे झाले असेल कारण अगोदर सान्गितलेल्यानाच फक्त तसे जेवण मिळते. तसेच रु. ३५०च्या थाळिला जीएसटी धरुन ७३५ रुपये कसे पडले? कारण जीएसटी फक्त १० टक्केच आहे ना? म्हणजे ७७० रुपये २ थाळ्यान्चे मिळून पडले असते.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Mon, 08/20/2018 - 04:58
नवीन
5% आहे ना रेस्टॉरंटना..
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 08/20/2018 - 04:59
नवीन
2 थाळ्या, 5 टक्के जी एस टी
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Mon, 08/20/2018 - 04:45
नवीन
असल्या उद्धट , आगाउ आणी दिखाउ हॉटेलपासुन सावध केल्याबद्दल धन्यवाद . तरी नशीब , तिथल्या स्टाफने "इतने पैशेमें इतनाहिच मिलेगा " असली उत्तरे दिली नाहीत .
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Mon, 08/20/2018 - 04:58
नवीन
व्हिडीओ मध्येच बाई डोक्यात गेल्या होत्या.
350 मध्ये लिमिटेड थाळी, ते पण इतका सुमार मेन्यू.. गेलातच कसे काय!!
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 08/20/2018 - 06:26
नवीन
खर सांगु? पुण्यात थाळी म्हणून जे विकले जाते ते इत्के सरधोपट एकसुरी आहे की त्याचा कंटाळा आलाय आता. त्यामुळे मी स्वतःच कित्येक दिवस या बाबतीत काय वेगळे करता येईल असा विचार करतोय, त्याची काहीतरी रुपरेषा मनात आहे पण, फक्त सध्या ग्रुहकर्जात अडकलोय म्हणून उडी मारता येत नाही.
या बाईंचा व्हिडिओ बघितला आणि वाटलं की अरेच्चा, आपल्या मनात जे आहे तेच तर यांनी केलंय. त्यामुळे एक सॉफ्ट कॉर्नर मनात निर्माण झाला, आणि त्यामुळे काहीही झाले तरी पुण्यात हे हॉटेल सुरु झाल्यावर एक्दा तरी जायचंच असं ठरवलं.
असो..
साधरणपणे बे एरिया च्या इन्डिअन स्टोर मध्ये जे पदार्थ मिळायचे ते पदार्थ काल पुन्हा एकदा खाल्ले आणि एकदम परत आम्रविकेत गेल्याचा फील आला. ३५० रु मध्ये असा जगप्रवास दुर्मिळच!
- Log in or register to post comments
ल
लई भारी
Mon, 08/20/2018 - 07:15
नवीन
थाळीच्या एकसूरीपणाबद्दल अगदी सहमत! आपला मनोदय लवकरच प्रत्यक्षात येवो :)
शेवटचा "जगप्रवास" चा टोमणा जबरी आहे :)
रच्याकने: झोमॅटो वर अजून 'Opening soon' दाखवतंय.
त्याच्याआधीच बंद पडतंय वाटतं! :D
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Mon, 08/20/2018 - 15:02
नवीन
दुर्वांकूर चांगलं आहे की ? अर्थात मी ही तिथे मोजून दोन तीन वेळा गेलो असेन पण जेव्हा गेलो तेव्हा आवडलं होतं.. मी चिंचवड मध्ये रहात असल्याने पुण्यातले हॉटेल्स फारसे माहित नाही. चिंचवडमध्ये मयूरची लोकप्रियता आहे बर्यापैकी पण बरेच महागडे आहे, मी फारसा गेलो नाही. दुसर्या एका प्रतिसादात मी हिंजवडीच्या अंगतपंगत चा उल्लेख केला आहे. ते चांगले आहे.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 08/21/2018 - 04:59
नवीन
मयुर खूपच महाग आहे. ३५० रु. अमर्यदित थाळी फक्त जिलेबीसह. इतर काही स्वीट हवे असल्यास ८० रु, १०० रु. एक वाटी असे. मात्र जेवणाची चव अप्रतिम आहे.
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
Fri, 08/24/2018 - 12:55
नवीन
मी सुकांता, दुर्वांकुर, श्रेयस येथील थाळी खाल्ली आहे आणि बर्यापैकी आवडली सुद्धा. डेक्कनचे मथुरा पण छान आहे. (विशेषतः सकाळी मिळणारे व्हेज प्लॅटर ज्यात कोथिंबीर वडी, बटाटा वडा, आळु वडी. सुरळीची वडी वगैरे असते) थाळी नको असल्यास भाजी भाकरी वगैरे सुद्धा मस्त.
बादशाही आणि पुना बोर्डींग हाउसबद्दल तर काय सांगावे?
काही वर्षा पुर्वी डेक्कनला एक हॉटेल होते, नाव आठवत नाही पण थाळी मस्त घरगुती. गेलाबाजार शनिवारातले रसोई डायनिंग पण ठीक.
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Fri, 08/24/2018 - 15:15
नवीन
हॉटेल सुजाता हे एके काळी डेक्कन ( कि लक्ष्मी रोड ? ) भागात चांगले हॉटेल होते . नंतर ते बंद पडले .
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Tue, 08/21/2018 - 06:23
नवीन
बे एरियात प्रचंड संख्येने भारतीय रेस्टॉरंटे आहेत पण सरसकट अत्यंत सुमार दर्जा. पूर्णब्रह्माची बे एरियातील जेवणाशी तुलना म्हणजे खास शालजोडीतला हाणला आहे!
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 08/20/2018 - 08:00
नवीन
पुण्यासारख्या शरात सुद्धा बुंबई प्रमाणेच दोन घटका बसण्यासाठी सार्वजनिक जागांची उपलब्धता कमी झालेली आहे. हाटेलात काही मिंटे ते तासभर केवळ बसण्यासाठीच पैसे द्यायचे असतात. हे लक्षात घेतले म्हणजे खाण्यास उपलब्ध केले गेलेले पदार्थ बसण्यास मिळालेल्या जागेचे काही मिंटांचे भाडे मोजल्यामुळे मिळालेला बोनस समजून, चवीपुरते चाखुन सोडून द्यावे, म्हणजे मनाला ताण येत नाही.
- Log in or register to post comments
य
योगी९००
Mon, 08/20/2018 - 09:15
नवीन
बंगलोरला त्यांच्या दोन्ही रेस्टारंट मध्ये जाऊन आलो. चांगला अनुभव आला. झुणका भाकरी आवडली. पुण्यातच यांना काय झाले कोणास ठाऊक...
त्या व्हीडीओ मध्ये ती बाई म्हणाली की विमानात तिला शाकाहारी नाही मिळाले. कित्येक तास उपाशी राहीली वगैरे...आणि नंतर थोड्या वेळाने म्हणाली की माणूस सोडून काहीही खाऊ शकते....!! काय टोटल लागली तर मला सांगा..
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Mon, 08/20/2018 - 09:34
नवीन
मला त्या बैंचा टोन आवडलाच नाही म्हणून मी पूर्ण पाहिला नाहीये तो व्हिडीओ, पण शाकाहारी जेवण मिळालं नाही हा काय किस्सा आहे? मी जे काही दोन चार वेळा फ्लाईटमध्ये बसलेय त्यात कधीही प्रॉब्लेम आला नाही. घरात बाकीचे लोक आहेत जे सतत फिरत असतात, त्यांनाही कधी असा त्रास झाला नाही...
- Log in or register to post comments
ग
गवि
Mon, 08/20/2018 - 09:40
नवीन
+१
का ते सांगता येत नाही पण काहीतरी इरिटेटिंग होतं त्यात हे खरं.
- Log in or register to post comments
म
मृण्मयी१
Mon, 08/20/2018 - 18:14
नवीन
त्या बाईंच्या बोलण्यात फार कृत्रिमपणा आहे. केवळ मार्केटींगच्या दृष्टीने केलेले हे विडीओज आहेत. मला त्यात प्रामाणिकपणाचा अभाव जाणवला. मी शहाणी, मला सगळं समजतं असाही आव वाटला. बाई डोक्यात गेल्यात खरं.
- Log in or register to post comments
त
तिमा
Tue, 08/21/2018 - 08:58
नवीन
कंंठाळीपणा, आत्मस्तुती, माजोरीपणा हे सर्व एकत्र आले की इरिटेटिंग होणारच की !
कानडी उच्चार असल्यामुळे, वार्यावरची वरात, मधल्या कडवेकर मामी आठवल्या. कंठाळा आला की वो!
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Mon, 08/20/2018 - 10:10
नवीन
हे शक्य आहे, अधूनमधून माझ्याही बाबत होतं. नुकताच आलेला अनुभव फिन एअरचा. अर्थात हे भारताला जाणार्या 'लेग'मध्ये होत नाही, आणि आगोदर व्हेज ऑर्डर करायची सोय सगळीकडे असतेच. मीच कधीकधी आळशीपणा करतो.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Mon, 08/20/2018 - 11:23
नवीन
हो म्हणजे सोय असतेच. ऑर्डर द्यावी लागत असेल आधी इतकंच काय ते. आज काल विमानात व्हेज जेवण मिळत नाही हे पटत नाही.
एनिवे, मी तशीही लाल भोपळ्याची भाजी खायला कधीच पैसे मोजणार नाही! मी मेन्यू वाचूनच मागे फिरले असते!
आणि अजून एक म्हणजे.. लिमिटेड.. मी फारशी थाळी खात नाही, पण तरी स्वीट लिमिटेड हे ऐकलंय, सगळंच जेवण लिमिटेड ते ही 350 मध्ये, काही चुकल्या सारखं वाटत नाही का? मला वाटतं सुकांता वगैरे फेमस थाळ्या साधारण ह्याच कॉस्ट मध्ये अनलिमिटेड जेवण देतात ना?
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Tue, 08/21/2018 - 11:24
नवीन
हे सगळ्यांनाच जमत नाही. याला संक कॉस्ट फॅलसी म्हणतात.
The Misconception: You make rational decisions based on the future value of objects, investments and experiences.
The Truth: Your decisions are tainted by the emotional investments you accumulate, and the more you invest in something the harder it becomes to abandon it.
- Log in or register to post comments
य
योगी९००
Mon, 08/20/2018 - 11:41
नवीन
मलाही टोन आवडला नाही. फार गर्विष्ठ असा टोन वाटला. एक दोन वाक्यानंतर असेही वाटले की ही बाई दोन पेग मारून आली आहे.
- Log in or register to post comments
स
सुचिता१
Mon, 08/20/2018 - 14:04
नवीन
१००% सहमत !!
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »