ट्रेक करताना...

"ट्रेकिंग" या अनुभवावर अनेक धागे येत आहेत. अनेक जण नवनवीन किल्ल्यांना भेटी देत आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु हे धागे वाचत असताना; ट्रेकर्सचे त्या त्या ठिकाणचे अनुभव वाचत असताना "धाडस आणि अनावश्यक धोका" या दोन गोष्टींमधला फरक लक्षात न घेवून अपघाताच्या अगदी जवळ जाणार्या काही घटना वारंवार दिसल्याने हा माहितीपर धागा.
सर्वप्रथम - "मी निष्णात ट्रेकर नाही" त्यामुळे इथे दिलेले सल्ले / सूचना हे अत्यंत सामान्य परिस्थितीमध्ये लागू होण्यासारखे आहेत व माझ्या अनुभवातून आलेले आहेत. दुरूस्त्या असल्या तर जरूर सुचवा.
"लोकं ट्रेकिंग का करतात..?", "काय मिळते..?", "याचे फलीत काय..?" वगैरे प्रश्न विचारू नयेत.
उत्तर दिले जाणार नाही!! :-D
सुरूवात -
१) सर्वप्रथम आपण कोणत्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणाची व्यवस्थित माहिती घेवून / ऐतिहासीक दृष्टीने अभ्यास करून जावे. त्या ठिकाणी फिरताना या माहितीचा उपयोग होतो.
२) आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत ते ठिकाण नक्की कसे आहे याचीही माहिती घेणे आवश्यक आहे. गड / भुईकोट किल्ला / दरी / कडा वगैरे ठिकाणी भेट देताना वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य सोबत बाळगावे लागते त्यानुसार तयारी करावी.
३) ठरवलेल्या ठिकाणी आधी कोणी गेले असेल तर "सध्याची परिस्थिती काय आहे" याची माहिती जरूर घ्यावी. बहुतांश गडकिल्यांवर दर पावसानंतर पडझड होण्याची शक्यता असते. शिड्या / पायर्या / गडावर जाणारे रस्ते नाहीसे झाले असतील तर पायथ्यावरून परत यावे लागते.
४) सोबत काय साहित्य घ्यायचे ते ठरवावे. एक दिवसाचा ट्रेक असेल तर फार विचार करावा लागत नाही मात्र मुक्कामाचा ट्रेक असेल तर व्यवस्थित तयारी करावी लागते. तसेच सुरूवातीपासून शेवटपर्यंत सोबत असलेल्या बॅगा आणि बाकीच्या वस्तू सर्वांच्या पाठीवर वागव्या लागणार आहेत याची योग्य ती कल्पना सहकार्यांना असावी.
५) ट्रेकमधील सहकारी निसर्गाच्या सान्निध्यात आनंद शोधणारे असावेत.
६) प्रवासासाठी बस / सार्वजनीक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणार असल्यास वेळापत्रक 'योग्य ऑथॉरिटीकडून' व्यवस्थीत पडताळून घ्यावे. बसचे वेळापत्रक ऑनलाईन मिळाले तरी ते न चुकता जवळच्या आगारातून तपासून घ्यावे.
प्रवासासाठी खाजगी वाह्न वापरणार असल्यास व डोंगरदर्यांचा प्रवास असल्यास एकदा वाहनाचे चेकअप करून घ्यावे.
७) Plan B चा विचार करून ठेवावा व त्यानुसार तयारी करावी - या पर्यायी वेळापत्रकाबाबत ट्रेक लीड्स मध्ये एकवाक्यता असावी.
८) निघण्यापासून ते परतीच्या प्रवासापर्यंतचे वेळापत्रक (Plan B सह) ट्रेक ला न येणार्या एखाद्या व्यक्तीकडे देवून ठेवावे.
नेहमी सोबत असाव्यात अशा वस्तू -
१) उन्हापासून संरक्षण होईल अशी टोपी
२) पुरेसे पाणी
३) खाद्यपदार्थ
४) औषधे व फर्स्ट एड बॉक्स
५) स्वीस नाईफ
६) काडेपेटी - दोन ठिकाणी, किंवा लाईटर - काडेपेटी भिजून पटकन निरूपयोगी होवू शकते - लाईटरच्या बाबतीत ही शक्यता कमी असते.
७) प्लॅस्टीक पिशव्या
८) जुनी वर्तमानपत्रे
९) हळद - जंगलामध्ये फिरताना जळू चिकटल्यास हळद हा एक उत्तम उपाय आहे. आणखी एक जालीम उपाय म्हणजे तंबाखू - निकोटीनमुळेही जळू गळून पडते. परंतु हळदच ब्येष्ट!
१०) या शिवाय आपल्याला आवश्यक वाटेल ते साहित्य.
आता काही महत्वाच्या सूचना.
१) ट्रेकिंग सॅक - ट्रेकला जाताना शक्यतो ट्रेकिंग सॅक न्यावी. या सॅकमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची सेटींग असतात. या सॅकमध्ये प्रचंड प्रमाणात वजन भरता येते व हे वजन शोल्डर लोड, बॅक लोड, वेस्ट लोड असे विभागलेले असते. दुहेरी शिवण आणि मजबूत कापडामुळे या सॅक ट्रेकदरम्यान दगा देत नाहीत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सॅकच्या बॅकसाईडला व्यवस्थित कुशन असते व त्या कुशनच्या आत अॅल्युमिनीयम रॉड असतात. या रॉडना आपली पाठ व खांदे यांच्या सर्वसाधारण नैसर्गीक आकाराप्रमाणे बारीकसा बाक दिलेला असतो. हे रॉड सॅकला आधार देतात, सॅकमधील वजनाला एकाच आकारात ठेवतात व वजन सम-समान विभागण्यास मदत करतात.
सॅक पाठीवर वागवताना ती शरीराच्या शक्य तितक्या जवळ असावी, यामुळे वजन जाणवत नाही व चालताना योग्य नियंत्रण राहते. ट्रेकिंग सॅकला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने पट्टे दिलेले असतात. त्यांचा सुयोग्य वापर करावा. ही सॅक आपल्या शरिराचा एक भाग होईल अशा प्रकारे सांभाळावी.
सॅकसोबत रेन कव्हर असावे
सॅक व्यवस्थीत भरणे हा ही एक शिकण्याचा विषय आहे.
२) शूज - ट्रेकला जाताना शक्यतो ट्रेकिंग शूज अथवा सवयीचे असे मजबूत शूज असावेत. ट्रेकिंगच्या मुहूर्तावर नवीन शूज चे उद्घाटन करू नये, जर नवीन शूज व्यवस्थीत बसणारे नसतील अथवा सवयीचे नसतील तर ट्रेक दरम्यान त्यांच्यामुळे त्रास होवू शकतो.
ट्रेकमधे दगडधोंड्यांवरून चालताना पावलांजवळ तयार होणारी उष्णता + घाम यांमुळे पायाची त्वचा मऊ होते व यामुळे दुखापती / जखमा (ब्लिस्टर्स) होवू शकतात. वेळोवेळी शूज व सॉक्स काढून, घाम टिपून पायांची शक्य तितकी काळजी घ्यावी.
३) कपडे व जर्कीन - ट्रेकदरम्यान जंगलाशी एकरूप होणारे व साध्या हलक्या रंगाचे कपडे असावेत. खूप भडक कपड्यांमुळे प्राणी व पक्षी विचलीत होण्याची शक्यता असते. कपड्यांचे जादा जोड सोबत असावेत.
पावसाळ्यामध्ये ट्रेक असेल तर जर्कीन सोबत बाळगावे. शक्यतो रेनकोट टाळावा त्यातही रेनकोटची पँट. कारण एखादा काटा / टोकदार फांदीमुळे रेनकोट लगेच फाटतो. जर्कीनला जोडलेली टोपी असेल तर उत्तम. कारण मान व शर्टाची / जर्कीनची कॉलर यातून पावसाचे पाणी मार्ग काढू शकत नाही.
फुलपँट व फुल टीशर्ट असावा. थ्री फोर्थ वगैरे प्रकारांमुळे पायांचा जंगलातील वनस्पती व पर्यायाने त्यावरील जीवजंतूंशी बिनविरोध संपर्क येतो व जळवा, सुरवंट वगैरेंचा त्रास जास्ती तीव्रतेने होवू शकतो.
४) सहकारी - सहकारी शक्यतो नवीन परिस्थितीशी जुळवून घेणारे व कोणत्याही आव्हानास तोंड देणाची तयारी असणारे असावेत. किरकोळ अपघात किंवा एखाद्याचा पाय मुरगळणे, पडणे वगैरे साध्या प्रकारांमुळे ट्रेक दरम्यान विलक्षण परिस्थिती उद्भवू शकते. अशा प्रसंगानुरूप जबाबदारीने वागणारे व सर्वतोपरी मदत करणारे सहकारी असावेत.
जंगलातून चालताना चित्र विचित्र आवाज काढून प्राणी पक्ष्यांना त्रास देणे, एखाद्या पाण्याच्या टाक्यामधले पाणी विनाकारण गढूळ करणे; कचरा टाकून खराब करणे. आजूबाजूला वावरणार्या लहान प्राण्यांना त्रास देणे (उदा. खेकडे!) हे व असे प्रकार टाळावेत.
ट्रेकदरम्यान सोबत असणारे सर्वजण एकाच वयोगटातील व एकाच शारिरीक क्षमतेचे असतीलच असे नाही. अनोळखी ठिकाणी / नवीन जागी ट्रेक आखला असेल तर संपूर्ण ग्रूपने एकमेकांसोबत ट्रेक पार पाडावा. टीम मधल्या अतीउत्साही मंडळींना अशावेळी उत्साहाला आवर घालावा लागतो तसेच चालण्याचा वेगही कमी करावा लागतो. अशा वेळी काय निर्णय घ्यायचा हे संपूर्णपणे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते. दोन ग्रूप करून गड सर करणे सोपे वाटत असेल तरी एखाद्या प्रसंगाला तोंड द्यायची क्षमता निम्मी होते याचेही भान राखणे गरजेचे ठरते.
ट्रेकदरम्यान व्यसनांना पूर्णपणे फाटा द्यावा.
५) पाणी व खाद्यपदार्थ - ट्रेकदरम्यान सोबत पाणी आणि अन्नपदार्थांचा भरपूर साठा सोबत बाळगावा. पाणी जास्ती असेल तर परतताना वाटेतल्या झाडांना घातले तरी चालेल मात्र एखाद्या कड्यावर, गडाच्या वाटेवर पाणी संपल्यानंतर दमलेल्या अवस्थेमध्ये टाके शोधण्यामध्ये कोणताही शहाणपणा नसतो.
पाण्याच्या टाक्यामधले पाणी शुद्ध आहे का पहावे. प्लॅस्टीक पिशव्या, केरकचरा वाले पाणी रूमालाने गाळून घ्यावे व "मेडीक्लोअर-एम" या औषधाचे दोन लिटरला एक दोन थेंब टाकून पाणी वापरता येते.
टाक्यामधले पाणी बाहेर काढल्यानंतर बाकीचे पाणी गढूळ करू नये.
ट्रेकदरम्यान सोबत्यांना किंवा अगदी अनोळखी ट्रेकर्सना पाण्याची गरज लागेल या हिशेबानेही सोबत पाणी बाळगावे आणि अशा ठिकाणी पाणी देताना विचार करू नये - अगदी पाणी न बाळगण्यामध्ये त्या लोकांची चूक असली तरी त्या ठिकाणी तत्वांना चिकटून निर्णय घेवू नयेत.
६) निसर्ग - निसर्गाच्या ताकदीला कमी लेखू नये - कधीही!!
धबधबा, कडे, पाण्याचे साठे, विहीर अशा ठिकाणी जपून वावरावे. "विनाकारण धोका पत्करण्याची गरज आहे का..?" हा प्रश्न स्वतःला विचारावा.
Mountains have their ways of dealing with overconfidence. हे विसरू नये!
पाऊस, ओले गवत, कडे, भर्राट वारा, धबधबा, धुके, मोठमोठाले दगड व त्यांवरून केलेली चढउतार या गोष्टी आनंददायी असतात परंतु एखादा छोटासा अपघात, पाय मुरगळणे, दगडावर हात पाय आपटून जायबंदी होणे या कांही क्षणात घडणार्या गोष्टी असतात. पाऊस पाणी वगैरे सगळ्या आनंददायी गोष्टी एखादा अपघात होईपर्यंत चान चान वाटतात परंतु अपघातानंतर त्या व्यक्तीला सांभाळत गडावरून खाली उतरणे प्रचंड कठीण काम असते.
७) प्राणी / पक्षी - आपण ट्रेक करताना प्राणीपक्ष्यांच्या अधिवासातून जात असतो. आपला वावर / मुक्काम त्यांच्यासाठी त्रासदायक होणार नाही याची काळजी घ्यावी. साप, खेकडे, विंचू वगैरे प्राणी विपुल प्रमाणार आढळतात. त्यांच्या क्षेत्रात विनाकारण ढवळाढवळ करू नये. साप दिसला की खडे मारणे, काठीने ढोसणे वगैरे प्रकार कोणत्याही परिस्थितीमध्ये करू नयेत. सापाचा एखादा दंश, विंचू खेकड्याने घेतलेला चावा खूप महाग पडू शकतो.
८) अन्न शिजवताना - ट्रेकदरम्यान अन्न शिजवताना चूल पेटवायची असल्यास अत्यंत काळजीपूर्वक हवे तितकेच वाळलेले लाकूड / फांद्या तोडाव्यात - हे ही टाळता येणे शक्य असेल तर टाळावे.
स्वयंपाक झाल्यानंतर चूल व्यवस्थीत विझवावी. राहिलेले लाकूड / जळण एखाद्या छ्ताखाली / गुहेमध्ये ठेवावे ज्यायोगे नंतर येणार्या ट्रेकर्सना त्याचा वापर करता यावा.
चूल पेटवणे टाळण्यासाठी सोबत रॉकेलचा छोटासा स्टोव्ह बाळगावा - प्रवासादरम्यान त्यातले रॉकेल बाटलीत काढावे कारण रॉकेलने भरलेला स्टोव्ह हिंदकळून रॉकेल बाहेर येते व वाया जाते.
गॅसच्या छोट्या शेगड्या मिळतात - हा सर्वोत्तम उपाय, मात्र या शेगड्या वजनाने थोड्या जड असतात.
अनेक ठिकाणी / देवळांमध्ये / गुहेमध्ये स्वयंपाकासाठी भांडी ठेवलेली असतात. यांचा आपल्याआधी वापर कधी केला गेला असेल याची कल्पना नसतेच त्यामुळे ही भांडी स्वच्छ धुवून घ्यावीत व आपल्या स्वयंपाकानंतर तितकीच स्वच्छ करून ठेवावीत.
अनोळखी वनस्पती, झाडांची मुळे यांचा अन्नाशी संपर्क येवू देवू नये. (दातपाडीची कथा सर्वांना माहिती असेलच! ;-))
स्थानीक नियम / श्रद्धांना धक्का पोहोचवू नये. गावकर्यांशी सौदार्हपूर्ण संबंध ठेवावेत. ऐनवेळी कांही झाले तर हेच लोक आपल्या मदतीला येणार आहेत याची जाणीव ठेवावी.
आपण सर्वसाधारणपणे ६ / ७ जण ट्रेकला जातो. एखाद्या आडगावामध्ये जाताना तिथल्या ग्रामस्थांसाठी उपयोगी असे काहीतरी घेवून जावे. ६ / ७ जणांमध्ये प्रत्येकी १५ / २० रूपये जमा केले तरी त्या रकमेमध्ये क्रोसीन सारखी डोकेदुखीवरची औषधे, डेटॉल, कापूस वगैरे प्रथमोपचाराचे साहित्य येवू शकते. अगदी तिथल्या लहान मुलांसाठी बिस्कीटचे पुडे नेले तरी त्यांना त्यामध्ये आनंद वाटू शकतो.
आपण घरगुती व्यवस्थेमध्ये जेवण करणार असल्यास काही गोष्टी "अॅडजेस्ट" करण्याची तयारी असावी. आपल्या घरामध्ये आपण अनेकदा अनेक गोष्टी "अॅडजेस्ट" करतोच. एखादे हॉटेल व रिसॉर्ट असेल तर त्याची गोष्ट वेगळी मात्र खेड्यापाड्यांमधील लोकांना अनेक गोष्टींसाठी लांब अंतर चालत किंवा दिवसातून एक दोनदा येणार्या बसवर अवलंबून रहावे लागते याची जाणीव ठेवावी.
९) पायवाटा व नकाशे - होकायंत्र व नकाशे सोबत असावेत. आपण जाताना एखाद्या खुणेच्या आधाराने स्टार्टिंग पॉईंट व मार्ग बघून ठेवावा. गूगल मॅप्स, GPS वगैरे बाबींबर फारसे अवलंबून राहू नये कारण या यंत्राने, मोबाईलच्या रेंजने किंवा कनेक्टिवीटीने दगा दिला तर आपण अक्षरश: हतबल होतो.
समजा रस्ता चुकला आणि मोबाईलला रेंज जरी असेल तरी "आपण कुठे आहोत" हे कोणत्या आधारावर सांगणार..?
गड किल्ल्यांवर पायवाटा तयार झालेल्या असतात. शक्यतो त्यावरूनच जावे. विनाकारण वेगळे मार्ग वापरणे, कड्यावरून उतरताना नवीन ठिकाणाहून उतरणे वगैरे प्रकार करू नयेत. कडे उतरताना कोणत्याही परिस्थितीमध्ये ओढण्या, कच्ची दोरी वगैरेंचा वापर करू नये.
अनोळखी ठिकाणी पायवाटा व गुरांच्या वाटांमध्ये गोंधळ होवून रस्ता चुकू शकतो. त्याची काळजी घ्यावी.
रस्ता चुकल्यावर ग्रूपमध्ये रहावे. रस्ते शोधण्यासाठी सर्वांनी सर्व दिशेला जाण्यापेक्षा अनुभवी लोकांनी दोन तीनच्या ग्रूपने बाहेर पडावे. समजा ग्रूपमध्ये दोनच अनुभवी लोक असतील तर एकाने रस्ता शोधण्यासाठी व एकाने संपूर्ण ग्रूपसोबत रहावे. सहकार्यांचा आत्मविश्वास हरवू देवू नये.
जंगलातून वावरताना कोणत्याही परिस्थितीमध्ये कचरा व प्लॅस्टीक फेकू नये. खास कचर्यासाठी एक मोठी पिशवी सोबत बाळगावी. तसेच चालता चालता दिसणारा व सहज हाताशी येणारा कचराही गोळा करावा.
ट्रेकदरम्यान प्रातर्विधी आवरताना पाण्याचे साठे दुषीत होवू देवू नयेत. शौचास जाताना शक्यतो वाहत्या पाण्यापासून लांब व शक्य असेल तर एखादा खड्डा करून पाणी प्रदुषीत होणार नाही याची काळजी घ्यावी.
**********************************************************
There have been joys; too great to be described in words, and there have been griefs upon which I have not dared to dwell, and with these in mind I say, climb if you will, but remember that courage and strength are naught without prudence, and that a momentary negligence may destroy the happiness of a lifetime. Do nothing in haste, look well to each step, and from the beginning think what may be the end.
— Edward Whymper.
**********************************************************
हा धागा इंटरॅक्टीव्ह स्वरूपाचा असावा अशी अपेक्षा आहे. नवीन सूचनांचे स्वागत आहे!
**********************************************************
"सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका. पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका" ---इति वल्लीहे खरे होईल.सापाचे विष पाण्यासारखे प्यायले तर शरीराला अपाय होत नाहीआदूबाळ आणि इनिगोय - बरोबर. "आपल्या पोटामध्ये असलेली जहाल अॅसीड्स त्या विषाला त्वरीत नमोहरम करतात" असे मी वाचले आहे.If someone is bit by non venomous snake and if u give him anti venom then it acts as venom on human body and he/she may die.यावर अधिक माहिती असेल तर कृपया द्यावी. मराठीकरण करणे / मराठी टाईपिंग शक्य नाही म्हणून माहिती देण्याचे थांबवू नये ही विनंती. तुम्हाला जमेल तशी आणि जमेल त्या स्वरूपात माहिती दिली तरी चालेल.The medicine which we give for scorpion bite id vaso-dilater Prazocine.बरोबर. महाडच्या डॉ. हिम्मतराव बावस्करांनी याचा शोध लावला, याबद्दल त्यांचे लेख लॅन्सेटमध्येही छापून आले आहेत.एक जिलबी टाकावी काय ? संकोच होत आहे.नेकी और पूछ पूछ..?? आनेदो.ट्रेक वर लागणारी वैद्यकीय मदतसंकोच नको येवुद्या.