Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

ट्रेक करताना...

म
मोदक
Mon, 05/13/2013 - 20:03
💬 142
. "ट्रेकिंग" या अनुभवावर अनेक धागे येत आहेत. अनेक जण नवनवीन किल्ल्यांना भेटी देत आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु हे धागे वाचत असताना; ट्रेकर्सचे त्या त्या ठिकाणचे अनुभव वाचत असताना "धाडस आणि अनावश्यक धोका" या दोन गोष्टींमधला फरक लक्षात न घेवून अपघाताच्या अगदी जवळ जाणार्‍या काही घटना वारंवार दिसल्याने हा माहितीपर धागा. सर्वप्रथम - "मी निष्णात ट्रेकर नाही" त्यामुळे इथे दिलेले सल्ले / सूचना हे अत्यंत सामान्य परिस्थितीमध्ये लागू होण्यासारखे आहेत व माझ्या अनुभवातून आलेले आहेत. दुरूस्त्या असल्या तर जरूर सुचवा. "लोकं ट्रेकिंग का करतात..?", "काय मिळते..?", "याचे फलीत काय..?" वगैरे प्रश्न विचारू नयेत. उत्तर दिले जाणार नाही!! :-D सुरूवात - १) सर्वप्रथम आपण कोणत्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणाची व्यवस्थित माहिती घेवून / ऐतिहासीक दृष्टीने अभ्यास करून जावे. त्या ठिकाणी फिरताना या माहितीचा उपयोग होतो. २) आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत ते ठिकाण नक्की कसे आहे याचीही माहिती घेणे आवश्यक आहे. गड / भुईकोट किल्ला / दरी / कडा वगैरे ठिकाणी भेट देताना वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य सोबत बाळगावे लागते त्यानुसार तयारी करावी. ३) ठरवलेल्या ठिकाणी आधी कोणी गेले असेल तर "सध्याची परिस्थिती काय आहे" याची माहिती जरूर घ्यावी. बहुतांश गडकिल्यांवर दर पावसानंतर पडझड होण्याची शक्यता असते. शिड्या / पायर्‍या / गडावर जाणारे रस्ते नाहीसे झाले असतील तर पायथ्यावरून परत यावे लागते. ४) सोबत काय साहित्य घ्यायचे ते ठरवावे. एक दिवसाचा ट्रेक असेल तर फार विचार करावा लागत नाही मात्र मुक्कामाचा ट्रेक असेल तर व्यवस्थित तयारी करावी लागते. तसेच सुरूवातीपासून शेवटपर्यंत सोबत असलेल्या बॅगा आणि बाकीच्या वस्तू सर्वांच्या पाठीवर वागव्या लागणार आहेत याची योग्य ती कल्पना सहकार्‍यांना असावी. ५) ट्रेकमधील सहकारी निसर्गाच्या सान्निध्यात आनंद शोधणारे असावेत. ६) प्रवासासाठी बस / सार्वजनीक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणार असल्यास वेळापत्रक 'योग्य ऑथॉरिटीकडून' व्यवस्थीत पडताळून घ्यावे. बसचे वेळापत्रक ऑनलाईन मिळाले तरी ते न चुकता जवळच्या आगारातून तपासून घ्यावे. प्रवासासाठी खाजगी वाह्न वापरणार असल्यास व डोंगरदर्‍यांचा प्रवास असल्यास एकदा वाहनाचे चेकअप करून घ्यावे. ७) Plan B चा विचार करून ठेवावा व त्यानुसार तयारी करावी - या पर्यायी वेळापत्रकाबाबत ट्रेक लीड्स मध्ये एकवाक्यता असावी. ८) निघण्यापासून ते परतीच्या प्रवासापर्यंतचे वेळापत्रक (Plan B सह) ट्रेक ला न येणार्‍या एखाद्या व्यक्तीकडे देवून ठेवावे. नेहमी सोबत असाव्यात अशा वस्तू - १) उन्हापासून संरक्षण होईल अशी टोपी २) पुरेसे पाणी ३) खाद्यपदार्थ ४) औषधे व फर्स्ट एड बॉक्स ५) स्वीस नाईफ ६) काडेपेटी - दोन ठिकाणी, किंवा लाईटर - काडेपेटी भिजून पटकन निरूपयोगी होवू शकते - लाईटरच्या बाबतीत ही शक्यता कमी असते. ७) प्लॅस्टीक पिशव्या ८) जुनी वर्तमानपत्रे ९) हळद - जंगलामध्ये फिरताना जळू चिकटल्यास हळद हा एक उत्तम उपाय आहे. आणखी एक जालीम उपाय म्हणजे तंबाखू - निकोटीनमुळेही जळू गळून पडते. परंतु हळदच ब्येष्ट! १०) या शिवाय आपल्याला आवश्यक वाटेल ते साहित्य. आता काही महत्वाच्या सूचना. १) ट्रेकिंग सॅक - ट्रेकला जाताना शक्यतो ट्रेकिंग सॅक न्यावी. या सॅकमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची सेटींग असतात. या सॅकमध्ये प्रचंड प्रमाणात वजन भरता येते व हे वजन शोल्डर लोड, बॅक लोड, वेस्ट लोड असे विभागलेले असते. दुहेरी शिवण आणि मजबूत कापडामुळे या सॅक ट्रेकदरम्यान दगा देत नाहीत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सॅकच्या बॅकसाईडला व्यवस्थित कुशन असते व त्या कुशनच्या आत अ‍ॅल्युमिनीयम रॉड असतात. या रॉडना आपली पाठ व खांदे यांच्या सर्वसाधारण नैसर्गीक आकाराप्रमाणे बारीकसा बाक दिलेला असतो. हे रॉड सॅकला आधार देतात, सॅकमधील वजनाला एकाच आकारात ठेवतात व वजन सम-समान विभागण्यास मदत करतात. सॅक पाठीवर वागवताना ती शरीराच्या शक्य तितक्या जवळ असावी, यामुळे वजन जाणवत नाही व चालताना योग्य नियंत्रण राहते. ट्रेकिंग सॅकला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने पट्टे दिलेले असतात. त्यांचा सुयोग्य वापर करावा. ही सॅक आपल्या शरिराचा एक भाग होईल अशा प्रकारे सांभाळावी. सॅकसोबत रेन कव्हर असावे सॅक व्यवस्थीत भरणे हा ही एक शिकण्याचा विषय आहे. २) शूज - ट्रेकला जाताना शक्यतो ट्रेकिंग शूज अथवा सवयीचे असे मजबूत शूज असावेत. ट्रेकिंगच्या मुहूर्तावर नवीन शूज चे उद्घाटन करू नये, जर नवीन शूज व्यवस्थीत बसणारे नसतील अथवा सवयीचे नसतील तर ट्रेक दरम्यान त्यांच्यामुळे त्रास होवू शकतो. ट्रेकमधे दगडधोंड्यांवरून चालताना पावलांजवळ तयार होणारी उष्णता + घाम यांमुळे पायाची त्वचा मऊ होते व यामुळे दुखापती / जखमा (ब्लिस्टर्स) होवू शकतात. वेळोवेळी शूज व सॉक्स काढून, घाम टिपून पायांची शक्य तितकी काळजी घ्यावी. ३) कपडे व जर्कीन - ट्रेकदरम्यान जंगलाशी एकरूप होणारे व साध्या हलक्या रंगाचे कपडे असावेत. खूप भडक कपड्यांमुळे प्राणी व पक्षी विचलीत होण्याची शक्यता असते. कपड्यांचे जादा जोड सोबत असावेत. पावसाळ्यामध्ये ट्रेक असेल तर जर्कीन सोबत बाळगावे. शक्यतो रेनकोट टाळावा त्यातही रेनकोटची पँट. कारण एखादा काटा / टोकदार फांदीमुळे रेनकोट लगेच फाटतो. जर्कीनला जोडलेली टोपी असेल तर उत्तम. कारण मान व शर्टाची / जर्कीनची कॉलर यातून पावसाचे पाणी मार्ग काढू शकत नाही. फुलपँट व फुल टीशर्ट असावा. थ्री फोर्थ वगैरे प्रकारांमुळे पायांचा जंगलातील वनस्पती व पर्यायाने त्यावरील जीवजंतूंशी बिनविरोध संपर्क येतो व जळवा, सुरवंट वगैरेंचा त्रास जास्ती तीव्रतेने होवू शकतो. ४) सहकारी - सहकारी शक्यतो नवीन परिस्थितीशी जुळवून घेणारे व कोणत्याही आव्हानास तोंड देणाची तयारी असणारे असावेत. किरकोळ अपघात किंवा एखाद्याचा पाय मुरगळणे, पडणे वगैरे साध्या प्रकारांमुळे ट्रेक दरम्यान विलक्षण परिस्थिती उद्भवू शकते. अशा प्रसंगानुरूप जबाबदारीने वागणारे व सर्वतोपरी मदत करणारे सहकारी असावेत. जंगलातून चालताना चित्र विचित्र आवाज काढून प्राणी पक्ष्यांना त्रास देणे, एखाद्या पाण्याच्या टाक्यामधले पाणी विनाकारण गढूळ करणे; कचरा टाकून खराब करणे. आजूबाजूला वावरणार्‍या लहान प्राण्यांना त्रास देणे (उदा. खेकडे!) हे व असे प्रकार टाळावेत. ट्रेकदरम्यान सोबत असणारे सर्वजण एकाच वयोगटातील व एकाच शारिरीक क्षमतेचे असतीलच असे नाही. अनोळखी ठिकाणी / नवीन जागी ट्रेक आखला असेल तर संपूर्ण ग्रूपने एकमेकांसोबत ट्रेक पार पाडावा. टीम मधल्या अतीउत्साही मंडळींना अशावेळी उत्साहाला आवर घालावा लागतो तसेच चालण्याचा वेगही कमी करावा लागतो. अशा वेळी काय निर्णय घ्यायचा हे संपूर्णपणे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते. दोन ग्रूप करून गड सर करणे सोपे वाटत असेल तरी एखाद्या प्रसंगाला तोंड द्यायची क्षमता निम्मी होते याचेही भान राखणे गरजेचे ठरते. ट्रेकदरम्यान व्यसनांना पूर्णपणे फाटा द्यावा. ५) पाणी व खाद्यपदार्थ - ट्रेकदरम्यान सोबत पाणी आणि अन्नपदार्थांचा भरपूर साठा सोबत बाळगावा. पाणी जास्ती असेल तर परतताना वाटेतल्या झाडांना घातले तरी चालेल मात्र एखाद्या कड्यावर, गडाच्या वाटेवर पाणी संपल्यानंतर दमलेल्या अवस्थेमध्ये टाके शोधण्यामध्ये कोणताही शहाणपणा नसतो. पाण्याच्या टाक्यामधले पाणी शुद्ध आहे का पहावे. प्लॅस्टीक पिशव्या, केरकचरा वाले पाणी रूमालाने गाळून घ्यावे व "मेडीक्लोअर-एम" या औषधाचे दोन लिटरला एक दोन थेंब टाकून पाणी वापरता येते. टाक्यामधले पाणी बाहेर काढल्यानंतर बाकीचे पाणी गढूळ करू नये. ट्रेकदरम्यान सोबत्यांना किंवा अगदी अनोळखी ट्रेकर्सना पाण्याची गरज लागेल या हिशेबानेही सोबत पाणी बाळगावे आणि अशा ठिकाणी पाणी देताना विचार करू नये - अगदी पाणी न बाळगण्यामध्ये त्या लोकांची चूक असली तरी त्या ठिकाणी तत्वांना चिकटून निर्णय घेवू नयेत. ६) निसर्ग - निसर्गाच्या ताकदीला कमी लेखू नये - कधीही!! धबधबा, कडे, पाण्याचे साठे, विहीर अशा ठिकाणी जपून वावरावे. "विनाकारण धोका पत्करण्याची गरज आहे का..?" हा प्रश्न स्वतःला विचारावा. Mountains have their ways of dealing with overconfidence. हे विसरू नये! पाऊस, ओले गवत, कडे, भर्राट वारा, धबधबा, धुके, मोठमोठाले दगड व त्यांवरून केलेली चढउतार या गोष्टी आनंददायी असतात परंतु एखादा छोटासा अपघात, पाय मुरगळणे, दगडावर हात पाय आपटून जायबंदी होणे या कांही क्षणात घडणार्‍या गोष्टी असतात. पाऊस पाणी वगैरे सगळ्या आनंददायी गोष्टी एखादा अपघात होईपर्यंत चान चान वाटतात परंतु अपघातानंतर त्या व्यक्तीला सांभाळत गडावरून खाली उतरणे प्रचंड कठीण काम असते. ७) प्राणी / पक्षी - आपण ट्रेक करताना प्राणीपक्ष्यांच्या अधिवासातून जात असतो. आपला वावर / मुक्काम त्यांच्यासाठी त्रासदायक होणार नाही याची काळजी घ्यावी. साप, खेकडे, विंचू वगैरे प्राणी विपुल प्रमाणार आढळतात. त्यांच्या क्षेत्रात विनाकारण ढवळाढवळ करू नये. साप दिसला की खडे मारणे, काठीने ढोसणे वगैरे प्रकार कोणत्याही परिस्थितीमध्ये करू नयेत. सापाचा एखादा दंश, विंचू खेकड्याने घेतलेला चावा खूप महाग पडू शकतो. ८) अन्न शिजवताना - ट्रेकदरम्यान अन्न शिजवताना चूल पेटवायची असल्यास अत्यंत काळजीपूर्वक हवे तितकेच वाळलेले लाकूड / फांद्या तोडाव्यात - हे ही टाळता येणे शक्य असेल तर टाळावे. स्वयंपाक झाल्यानंतर चूल व्यवस्थीत विझवावी. राहिलेले लाकूड / जळण एखाद्या छ्ताखाली / गुहेमध्ये ठेवावे ज्यायोगे नंतर येणार्‍या ट्रेकर्सना त्याचा वापर करता यावा. चूल पेटवणे टाळण्यासाठी सोबत रॉकेलचा छोटासा स्टोव्ह बाळगावा - प्रवासादरम्यान त्यातले रॉकेल बाटलीत काढावे कारण रॉकेलने भरलेला स्टोव्ह हिंदकळून रॉकेल बाहेर येते व वाया जाते. गॅसच्या छोट्या शेगड्या मिळतात - हा सर्वोत्तम उपाय, मात्र या शेगड्या वजनाने थोड्या जड असतात. अनेक ठिकाणी / देवळांमध्ये / गुहेमध्ये स्वयंपाकासाठी भांडी ठेवलेली असतात. यांचा आपल्याआधी वापर कधी केला गेला असेल याची कल्पना नसतेच त्यामुळे ही भांडी स्वच्छ धुवून घ्यावीत व आपल्या स्वयंपाकानंतर तितकीच स्वच्छ करून ठेवावीत. अनोळखी वनस्पती, झाडांची मुळे यांचा अन्नाशी संपर्क येवू देवू नये. (दातपाडीची कथा सर्वांना माहिती असेलच! ;-)) स्थानीक नियम / श्रद्धांना धक्का पोहोचवू नये. गावकर्‍यांशी सौदार्हपूर्ण संबंध ठेवावेत. ऐनवेळी कांही झाले तर हेच लोक आपल्या मदतीला येणार आहेत याची जाणीव ठेवावी. आपण सर्वसाधारणपणे ६ / ७ जण ट्रेकला जातो. एखाद्या आडगावामध्ये जाताना तिथल्या ग्रामस्थांसाठी उपयोगी असे काहीतरी घेवून जावे. ६ / ७ जणांमध्ये प्रत्येकी १५ / २० रूपये जमा केले तरी त्या रकमेमध्ये क्रोसीन सारखी डोकेदुखीवरची औषधे, डेटॉल, कापूस वगैरे प्रथमोपचाराचे साहित्य येवू शकते. अगदी तिथल्या लहान मुलांसाठी बिस्कीटचे पुडे नेले तरी त्यांना त्यामध्ये आनंद वाटू शकतो. आपण घरगुती व्यवस्थेमध्ये जेवण करणार असल्यास काही गोष्टी "अ‍ॅडजेस्ट" करण्याची तयारी असावी. आपल्या घरामध्ये आपण अनेकदा अनेक गोष्टी "अ‍ॅडजेस्ट" करतोच. एखादे हॉटेल व रिसॉर्ट असेल तर त्याची गोष्ट वेगळी मात्र खेड्यापाड्यांमधील लोकांना अनेक गोष्टींसाठी लांब अंतर चालत किंवा दिवसातून एक दोनदा येणार्‍या बसवर अवलंबून रहावे लागते याची जाणीव ठेवावी. ९) पायवाटा व नकाशे - होकायंत्र व नकाशे सोबत असावेत. आपण जाताना एखाद्या खुणेच्या आधाराने स्टार्टिंग पॉईंट व मार्ग बघून ठेवावा. गूगल मॅप्स, GPS वगैरे बाबींबर फारसे अवलंबून राहू नये कारण या यंत्राने, मोबाईलच्या रेंजने किंवा कनेक्टिवीटीने दगा दिला तर आपण अक्षरश: हतबल होतो. समजा रस्ता चुकला आणि मोबाईलला रेंज जरी असेल तरी "आपण कुठे आहोत" हे कोणत्या आधारावर सांगणार..? गड किल्ल्यांवर पायवाटा तयार झालेल्या असतात. शक्यतो त्यावरूनच जावे. विनाकारण वेगळे मार्ग वापरणे, कड्यावरून उतरताना नवीन ठिकाणाहून उतरणे वगैरे प्रकार करू नयेत. कडे उतरताना कोणत्याही परिस्थितीमध्ये ओढण्या, कच्ची दोरी वगैरेंचा वापर करू नये. अनोळखी ठिकाणी पायवाटा व गुरांच्या वाटांमध्ये गोंधळ होवून रस्ता चुकू शकतो. त्याची काळजी घ्यावी. रस्ता चुकल्यावर ग्रूपमध्ये रहावे. रस्ते शोधण्यासाठी सर्वांनी सर्व दिशेला जाण्यापेक्षा अनुभवी लोकांनी दोन तीनच्या ग्रूपने बाहेर पडावे. समजा ग्रूपमध्ये दोनच अनुभवी लोक असतील तर एकाने रस्ता शोधण्यासाठी व एकाने संपूर्ण ग्रूपसोबत रहावे. सहकार्‍यांचा आत्मविश्वास हरवू देवू नये. जंगलातून वावरताना कोणत्याही परिस्थितीमध्ये कचरा व प्लॅस्टीक फेकू नये. खास कचर्‍यासाठी एक मोठी पिशवी सोबत बाळगावी. तसेच चालता चालता दिसणारा व सहज हाताशी येणारा कचराही गोळा करावा. ट्रेकदरम्यान प्रातर्विधी आवरताना पाण्याचे साठे दुषीत होवू देवू नयेत. शौचास जाताना शक्यतो वाहत्या पाण्यापासून लांब व शक्य असेल तर एखादा खड्डा करून पाणी प्रदुषीत होणार नाही याची काळजी घ्यावी. ********************************************************** There have been joys; too great to be described in words, and there have been griefs upon which I have not dared to dwell, and with these in mind I say, climb if you will, but remember that courage and strength are naught without prudence, and that a momentary negligence may destroy the happiness of a lifetime. Do nothing in haste, look well to each step, and from the beginning think what may be the end. — Edward Whymper. ********************************************************** हा धागा इंटरॅक्टीव्ह स्वरूपाचा असावा अशी अपेक्षा आहे. नवीन सूचनांचे स्वागत आहे! **********************************************************

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 70711 views

💬 प्रतिसाद
अ
अक्षया Tue, 05/14/2013 - 08:30 नवीन
ट्रेकींग साठी उपयुक्त माहीती.. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 05/14/2013 - 08:37 नवीन
मिपावर लेखन करणारे डोंगरयात्री हे खरंतर पोहोचलेले गडी आहेत पण इकडे जरा आपली कशी फजिती झाली वगैरे ललित लेख लिहितात . बहुतेक सर्व सूचनांचा उल्लेख आला आहे .मी एकटाच भटकतो त्यामुळे मला थोड्या वेगळ्या वस्तु जवळ बाळगाव्या लागतात .
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 05/14/2013 - 08:42 नवीन
नाही म्हणजे कधी एकटा गेलो तर उपयोग होइल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 05/14/2013 - 18:58 नवीन
तुरटीचा खडा ,चिमटा (ट्विझर) आणि घडयाळवाले वापरतात ते भिंग जवळ असावे .पायात काटा मोडल्यास(बुट घालणाऱ्यांना नाही) भिंगाने पाहून चिमट्याने लवकर काढून टाकावा आणि तुरटी चोळावी .विशेषत: पावसाळयात जखम चिघळत नाही .डोळयातही काही गेल्यास अथवा लाल झाल्यास तुरटीच्या पाण्याने धुवावे .टॉच दोन जवळ ठेवावेत . पावसाळयात अडिच बाय दोन मिटरचे प्लास्टीक दोन टोकाशी बांधले की डोक्यावरून सैक झाकून घेता येते आणि फ्लैपवाली टोपी घालावी .सर्व खात्रीशीर कोरडे राहाते .उन्हाळयात टोपीपेक्षा काळी छत्री जास्ती गारवा देते ,टोपी घामाने भिजते . पाण्यासाठी दोरी लावलेला डबा असावा . अगोदर दोन दिवस केसांना खोबरेल तेल लावू नये ,देवळात झोपल्यास पिटुकले उंदिर केस कुरतडतात .भिंतीपासून फूटभर लांब झोपावे चिचुंद्रि वगैरे प्राण्यांची जाण्याची जागा असते .
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 05/14/2013 - 19:53 नवीन
फेवीकॉल / फेवीस्टीक (फेवीक्वीक नव्हे!!!!) अशा वस्तूंच्या सहाय्याने काटे लीलया काढता येतात. काटा मांसामध्ये घट्ट रूतला असेल व सहजासहजी निघत नसेल तर, काट्याच्या आजूबाजूला थोडे टोकरून जागा मोकळी करून घ्यावी तसेच काट्याचे डोके स्पष्ट दिसेल अशा प्रकारे सर्व स्किन काढून टाकावी. फेवीकॉलसारख्या अडेसिव्हचा पातळ थर द्यावा - तो काट्याच्या डोक्याला चिकटला पाहिजे. नंतर हे सगळे प्रकरण संपूर्णपणे वाळून द्यावे व ते अडेसिव्ह पातळ त्वचेप्रमाणेच ओढून काढावे. त्या पातळ थरासोबत काटाही चिकटून बाहेर निघून येतो. कृपया प्रतिसाद शांतपणे वाचावा ;-) फेवीक्वीक वापरू नये!!!!!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 05/15/2013 - 13:04 नवीन
फेविकॉल हाताशी नसल्यास रुईच्या पानांचा चीक सुद्धा हेच काम करतो.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 05/16/2013 - 15:35 नवीन
लोकांना वाचायला घाण वाटू शकेल, पण गायीच्या ताज्या शेणानीसुद्धा काटे निघून येतात. काधीकधी काही पानांवर अगदी बारीक काटे असतत आणि ते हातावार/ पायावर मोठ्या भागात एकदम चिकटतात. आणि तिथे आग व्हायला सुरुवात होते. अश्या वेळेस हम्मा किंवा तश्याच कुठल्याही प्राण्याचे ताजे गरम शेण बिन्धास्त फासावे. सगळे काटे निघून येतात. या उपायाचा अनुभव घेतलेला आहे.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 05/14/2013 - 08:48 नवीन
मी एकटाच भटकतो तुमच्या आवडीचा आणि सवयीचा आदर आहे.. परंतु हे चुकीचे आहे. दुर्दैवाने काही झाले तर निरोप* पोहोचवायला कुणीतरी हवे. निरोप पोहोचून मदत मिळेपर्यंत नेहमीच वेळ जातो. * प्लीज येथे "शेवटचा निरोप" असा अर्थ घेवू नये !!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 05/14/2013 - 18:03 नवीन
एकटे जाणे आवडीपेक्षा निरूपाय आहे .आपल्याला भटकायचे तर आहे पण प्रत्येकवेळी हव्या असलेल्या ठिकाणी शनिवार रविवार सोडून मधल्या वारी येणारा कोण मिळणार ? यावेळी सर्व गुहा रिकाम्या असतात आणि गाववाले तुम्हाला एक गिऱ्हाईक म्हणून पाहात नाहित . आपली सुखदु:खे सांगतात . जोखमीची जवळची वाट ( उदा: भिमाशंकर शिडी वाट) न धरता लांबची सोपी धरायची .काही संकटे आली आहेत .परंतू सकाळी सुरूवात करत असल्यामुळे पुढे बारा तासांचा उजेड मिळतो .मागे एकदा मे महिन्यात दुपारी ढाक भैरीला भरकटलो .पाणी संपले भोवळ येऊ लागली .पुस्तकात वाचलेले डीहायडरेशनचे वर्णन आठवले .मी विचार केला हेच असावे . उपायही आठवले .शेवटच्या थोडया पाण्यात रुमाल भिजवला ,चेहरा मानेवर टाकून झाडाखाली पाचोळ्यात पडून राहिलो .पाउण तासाने हुशारी आल्यावर खाली परत सांडशीला बोरवेलपाशी आलो .पाणी भराभर काढून चार डबे एकादमात प्यायलो .गाववाले म्हणाले "कोंडेशवर झाले का ?" "नाही ,आता पुढच्या वेळेला " .घरी आल्यावर मोजले तर आठ लिटर भरले .
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 05/14/2013 - 18:11 नवीन
वा कंजूसशेठ, आपला द्रुष्टिकोन आणि उत्साह आवडला. तरीहि काळजी घ्या ही विनंती.
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Tue, 05/14/2013 - 09:08 नवीन
लेख आणि बरेच प्रतिसाद हे 'अनुभवी' ट्रेकर्सच्या दृष्टिकोनातून आले आहेत असं वाटलं :-) मला हल्ली क्वचित संधी मिळते -पण मी कुठे जाणार असेन तर कोणता ग्रुप आहे (लीडर टीम) ते पाहते ; ओळखीच्या लोकांकडे चौकशी करते. बरेचदा असे ग्रुप आधी एक मीटिंग बोलावतात; त्याला जाते आणि मनात असलेल्या सगळ्या शंका बिनधास्त विचारते. आपल्याला काय झेपेल आणि काय नाही याचा अंदाज घेऊन सामील व्हायचे का नाही हे ठरवते. हं! गेलं पाहिजे आता एखाद्या ट्रेकला :-)
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Tue, 05/14/2013 - 09:22 नवीन
उपयुक्त माहिती आणी उत्तम लिखाण
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 05/14/2013 - 09:29 नवीन
गडावर एखादा भुकेला, दुर्गप्रेमी वाघ रात्री आला तर काय करणार ? आधी कोण याच्या चिठ्ठ्या काढणार का ?? समजा वाटाड्याच वाघाला आवडला तर .... ?? ( शुभ बोल रे नार्‍या ...असे म्हणून गप्प करू नका राव ....आम्ही शक्यता सांगितली. आपला वात्रट चौरा
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 05/14/2013 - 09:40 नवीन
काय नाय हो.. शिंपल हाये. धूम पळून जायचे. पळायला न जमणारे वयस्कर लोक त्यासाठीच तर ट्रेकमध्ये घ्यायचे असतात. (त्यांची शिंग मोडून कळपात शिरायची हौस अशी जिरवायची) ;-) कित्ती क्रूर रे मोदक ...असे म्हणून गप्प करू नका राव ....आम्ही वस्तुस्थिती (?) सांगितली. (संपूर्ण प्रतिसाद हलकेच घ्यावा!!)
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 05/14/2013 - 11:17 नवीन
वाघाचा पिवळा रंग आणखी गडद होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 05/15/2013 - 13:06 नवीन
वाघ पळता पळता घसरून पडूही शकतो!!
  • Log in or register to post comments
औ
औरंगजेब Fri, 09/16/2016 - 14:56 नवीन
वाघाला गरम वरण भात करुन वाढतो म्हणा म्हणजे वाघाला चक्कर येईल नी तुम्हाला पळता येईल :-)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 05/14/2013 - 09:40 नवीन
घ्या माझा एक सिलेंडर (आग लावण्याचा) काही गड आणि धोकदायक (अथवा जीवघेण्यासुध्दा)गोष्टी १.माहुलि - दरीत पडणे .२ईर्षाळगड - दरीकडच्या पायवाटेवरचे पडलेले बारीक पिवळे गवत यावर पाय ठेवल्यावर घसरते .३.सिध्दगड -गुहेनंतर वर जाण्याच्या वाटेवरचे धोंडे पाय ठेवल्यावर निसटतात .४ ढाक भैरी -वाटेत भरकटणे .५महाबळेश्वर- पावसाळयात पॉईंटजवळ फोटो काढणारे शेवाळयावरून घसरतात .६जीवधन -फाजील धाडस करून गडावर घाटघर कडून पावसात पायऱ्या( ??) चढणे .सह्याद्री अवघड समजून गेलात तर सोपा वाटेल ,सोप्पा म्हणून गेलात तर चांगलीच फजिती करेल .
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 05/14/2013 - 10:44 नवीन
सह्याद्री अवघड समजून गेलात तर सोपा वाटेल ,सोप्पा म्हणून गेलात तर चांगलीच फजिती करेल . क्या बात है!!! "The mountains have rules. they are harsh rules, but they are there, and if you keep to them you are safe. A mountain is not like men. A mountain is sincere. The weapons to conquer it exist inside you, inside your soul." — Walter Bonatti.
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Tue, 05/14/2013 - 10:57 नवीन
कोकणकडा? तिकडं गेल्यावर पायबिय घसरण्याचे सोडा, माणसाला परत येऊच नयेसे वाटते अशा आशयाच्या कथा एेकल्यात. :-(
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं गुरुवार, 04/27/2017 - 07:26 नवीन
मी तर हळवाच होतो, आवंढे गिळायचे बाकी असतात.
  • Log in or register to post comments
अ
अमित राव Tue, 05/14/2013 - 10:11 नवीन
उपयुक्त अशी माहिती नक्कीच उपयोगी पडेल.
  • Log in or register to post comments
म
मन१ Tue, 05/14/2013 - 10:25 नवीन
अत्यंत उपयुक्त माहिती. विशेषतः ग्रामस्थांशी जुळवून घ्यावे, व जाता येता त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून थोडेफार घेउन जावे हा तर अत्यंत योग्य असा सल्ला. व्यावहारिक दृष्टिकोनातूनही आणि माणूसकीच्या दृष्टीकोनातूनही. भटकायला जाताना मसालेदार्,चमचमीत्,तेल्कट वगैरे पदार्थ टाळा(ह्याने सारखी तहान लागेल म्सांगणाव त्याऐवजी भरपूर फळे न्या(सीझन नुसार जी कुठली असतील ती त्या त्या मोसमात ब्येष्ट) असे लिवणार होतो; पण तोही सल्ला वरती देउन झाला आहे. थ्री फोर्थ वगैरे नको असे धाग्यात म्हटले आहे, पण साधी प्यांटही किंवा जीन्सही कित्येकदा गैरसोयीची ठरते.सर्वात सोयीस्कर म्हणजे ट्रॅक प्यांट वाटते. टी शर्ट सुती, त्यातल्या त्यात होजिअरीवाला असला तर उत्तम. सर्व सीझनसाठी ब्येष्ट. अंगावर उगा डिओ वगैरे मारुन जाउ नयेत म्हणतात. त्याने प्राणी अस्वस्थ होतात म्हणे. मोकळ्या वातावरणात निढळाचा,श्रमातून आलेला घाम असेल तर तो येउ द्यावा, त्याला टाळायला कृत्रिम पावडरी वगैरे वापरु नयेत म्हणतात. ट्रेकिंग दरम्यान काही सुकन्या,सुबक सुंदर्‍या आलेल्या असतील तरी त्यांना इम्प्रेस करण्याच्या नादात अतिसाहस करु नये. गावी सुखरूप पोचल्यावर हवे तेवढे इम्प्रेस करता येइल हे ध्यानात घ्यावे. . ट्रेकिंगबद्दल अप्पा जोगळेकर वगैरे ट्रेकर मंडळी अधिक भर घालू शकतील.दुरुस्ती सुचवू शकतील. ता . क :- ट्रेकिंगला जाण्याचा माझा अनुभव नगण्य आहे. लांब लांब पायी फिरण्याचे उद्योग केलेत.(मळवली पासून आख्खा लोणावळा परिसर,लोहगड वगैरे) पण अवघड क्याटॅगरीतले ट्रेक केलेले नाहित.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 05/14/2013 - 10:58 नवीन
अगदी माहितीपूर्ण आणि उपयुक्त धागा! वाघ आल्यावर काय करावे हे सांगण्याची गरज नाही. काय करायचे ते तोच करील!
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Tue, 05/14/2013 - 11:16 नवीन
मी जेव्हा ट्रेकिंग करायचो- १९७०-८० तेव्हा एक स्लिंग व एक कॅराबिनर हमखास घेउन जायचोच. फार उपयोगी गोष्ट.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 05/14/2013 - 11:36 नवीन
अजून एक. जंगलात जाताना जवळ काठी बाळगावी. मुलींनी तर नक्कीच बाळगावी. नाहितर माकडे येतात पटकन अंगावर. करण मुलींकडे सहसा खाउची पिशवी असते अशी इन्फर्मेशन माकडांना असते. मला पुष्कळ अनुभव आहे! :)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 05/14/2013 - 11:38 नवीन
माकडांबद्दल सहमत. वरंधा घाटात, महाबळेश्वरातल्या आर्थर शीट प्वाइंटात अन गगनगड नीअर गगनबावडा इथे हा अण्भव घेट्लेला आहे.
  • Log in or register to post comments
ल
लाल टोपी Tue, 05/14/2013 - 11:57 नवीन
निसर्गाच्या ताकदीला कमी लेखू नये - कधीही!!
+१००० मूळचा लोणावळ्याचा रहिवासी असल्यामुळे भुशी डॅम मध्ये दरवर्षी पावसाळ्यात जाणारे अनेक बळी पाहीले आहेत. नियमीत ट्रेकर असल्यामुळे देखील अतिउत्साहाचे दुष्परीणाम पाहिले आहेत. ट्रेकिंग मध्ये अतिरीक्त मद्यपान करुन अनोळखी ठिकाणी पोहणे टाळावे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 05/14/2013 - 12:20 नवीन
छान माहिती येत आहे. वाचकांचा गैरसमज होऊ नयेत म्हणून फक्त काही अधिक माहिती... @ भटक्य आणि उनाड : horse's blood can resist venom of snake घोड्याला विष अत्यंत छोट्या प्रमाणात (सब-लिथल डोस) पण त्याचे शरीर antivenom करण्याची प्रक्रिया सुरू करे इतपतच तज्ञांच्या देखरेखीखाली दिले जाते. जर घोड्याला मोठा डोस दिला तर तोही विषबाधेने मरु शकतो. blood is extracted and dehydrated and powder form anti venom is ready. ही प्रोसेस् इतकी सरळ नाही. रक्तातून फक्त antivenom ---जे टोचलेल्या विषाविरुद्ध निर्माण झालेली antibody असते--- ते शुद्ध स्वरुपात (रक्ताच्या इतर घटकांच्या भेसळीविना) गोळा करण्यासाठी खास तंत्रयुक्त प्रोसेस वापरली जाते. If someone is bit by non venomous snake and if u give him anti venom then it acts as venom on human body and he/she may die. antivenom हे antibody म्हणजे घोड्याच्या शरिराने बनविलेले एक विषविरोधक प्रोटीन असते. ते प्रोटीन आणि त्याच्याबरोबर असलेले घोड्याच्या रक्तातील काही घटक (हे पुर्णपणे १००% वेगळे करणे शक्य / आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते) हे मानवी शरीरात परके (फॉरीन) असतात त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मानवी शरीरात अ‍ॅलर्जीक रिअ‍ॅक्शन होउ शकते. ही रिअ‍ॅक्शन कोणात आणि किती प्रमाणात होईल हे अगोदर सांगणे शक्य नसते. यात त्या व्यक्तीला विषारी / बिनविषारी सर्पदंश झाला याने काही फरक पडत नाही. याच करिता विषारी सर्पदंश झाल्याची खात्री करून मगच antivenom देणे योग्य आहे. @ बॅटमॅन : आणि विष कलेक्ट करण्यात अमुक एका जातीच्याच सापांचे विष घ्यायचे असेही काही तेव्हा दिसले नाही. यापद्धतीने पॉलिव्हॅलंट antivenom बनवले जाते. ते जर विषारी सापाची जात कळूच शकली नाही / मोनोव्हॅलंट antivenom उपलब्द्ध नसेल तरच वापरायचे असते. मात्र अचूक निदान व मोनोव्हॅलंट (एकाच प्रकारच्या सापाच्या विषबाधेला उपयोगी असलेले) antivenom हे जास्त सुरक्षीत आणि जास्त परिणामकारक असते. @ मोदकः महाडच्या डॉ. हिम्मतराव बावस्करांनी याचा शोध लावला, याबद्दल त्यांचे लेख लॅन्सेटमध्येही छापून आले आहेत. अगदी बरोबर ! महाडसारख्या दूरदराजच्या जागेवर राहून त्यांनी हे संशोधन १९७० च्या दशकाच्या पहिल्या भागात आणि विशेष म्हणजे केवळ MBBS ची पदवी असताना केलेले आहे. त्याकाळची महाड परिसरातलीची बिकट परिस्थिती पाहता आणि पद्व्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि कोणत्याही संशोधन व्यवस्थेचे पाठबळ नसतानाही त्यांनी केलेल्या या संधोधनाचे श्रेय दिसते त्यापेक्षा अनेक पटींनी मोठे आहे. त्यांचे विंचूदशावरचे मूलभूत संशोधन आणि अधिकार आता जगभर मान्य झाला आहे. अशा महाभागाबरोबर पद्व्युत्तर आभ्यासक्रम करण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले होते !
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 05/14/2013 - 12:29 नवीन
पॉलिव्हॅलंट आणि मोनोव्हॅलंट ही भानगड माहिती नव्हती, माहितीकरिता बहुत धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
भ
भटक्य आणि उनाड Tue, 05/14/2013 - 16:48 नवीन
चुका दुरुस्त केल्या बद्दल धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 05/14/2013 - 12:33 नवीन
डिस्कव्हरीवर की दुसरे कुठेशे पाहिले आहे की ३/४ वेळा साप चावुन व अ‍ॅन्टिव्हेनम देवुन वाचलेल्या माणसाला घोड्याची अ‍ॅलर्जी येवु/असु शकते.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प Tue, 05/14/2013 - 12:37 नवीन
या विषयीची अधिक महिती मिळालि तर उत्तम
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 05/14/2013 - 12:40 नवीन
तेच म्हणतोय. रायगडावर प्रत्यक्ष निनाद बेडेकरांकडून ही कथा ऐकायला मिळाली होती. मी शहाजहान-अकबर स्टाईलमध्ये त्या फुलाचा वास घेत होतो तर बेडेकर म्हणाले ते काय माहिती आहे का? मी म्हटले नाही. मग ते म्हणाले की त्याचा रस तोंडात इ. गेला तर हिरड्या कमकुवत होऊन दात पडतात. अशी टरकली, फेकून दिले मग ते फूल =)) =))
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 05/14/2013 - 13:17 नवीन
फक्त वास घेऊन रस तोंडात कसा जाईल. असो, असेल काहीतर तथ्य!!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 05/14/2013 - 13:54 नवीन
अर्थातच, वास घेऊन तोंडात रस जाणार नाहीच. पण चुकूनमाकून गेला तर उगीच रिस्क कशाला म्हणून ती भानगड नकोच असे म्हण्णे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 05/14/2013 - 13:54 नवीन
आय मीन चुकूनमाकून फूल ना फुलाची पाकळी चावली जाऊन रस गेला तर.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 05/14/2013 - 13:41 नवीन
६-जूनला (शिव-राज्याभिषेक) रायगडावर काही ट्रिप्स असतात का हो पुण्यातुन? संपर्क क्रमांक, इ-मेल देवू शकता का? निनाद बेडेकर आदी मंडळींकडून रायगड,राजे यांचा इतिहास ऐकायची इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 05/14/2013 - 13:56 नवीन
असतात असे ऐकले आहे पण माहिती नाही. मिपाकर याबद्दल माहिती सांगू शकतील. मी कॉलेजच्या ट्रिपबरोबर गेलो होतो.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प Tue, 05/14/2013 - 13:56 नवीन
मला एका नव्या वनस्पतीची माहिती मिळेल अशी अपेक्शा होती पण निराशा झाली.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 05/15/2013 - 06:22 नवीन
इंद्रावणी ( Citrus Colocynthis)चा वैद्य लोक दाताच्या रोगासाठी वापरत .फळाचा नुसता धूर वापरायचे .याचा जास्त वापर करू नये असे म्हणतात हिरड्या सुजतात किँवा सैल होतात .याचा अतिराक अथवा दुरुपयोग होऊन दात पडत असावेत .( शाळेतली मुले खाजकुईलीचा दुरुपयोग करतात ते केस खरं म्हणजे थोडयाप्रमाणात गुळाबरोबर पोटदु:खीचे रामबाण औषध आणि बियांपासून शक्तिवर्धक पाक बनतो .
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Tue, 05/14/2013 - 15:03 नवीन
त्याचा रस तोंडात इ. गेला तर हिरड्या कमकुवत होऊन दात पडतात
हिरड्या प्रचंड सुजून दात जवळपास बाहेरच येतात, आमच्या भागात याचे अनेक उपयोग करतात वैद्य पण आणि काही बाराचे लोक पण. जनावराच्या बाजारात गुरं विकायला न्यायाच्या आधी ह्याचा रस काढून वाळक्या गुरांना लावतात त्यामुळे गुरं तेवढ्यापुरती पुष्ट वाटतात… मग हे लोक चढ्या किमतीला विकून मोकळे
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 05/14/2013 - 15:40 नवीन
बाबौ! औघड आहे. बरं झालं ते फूल फेकून दिलं नैतर कवळीमॅन झाला असता माझा =)) =))
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 05/14/2013 - 13:19 नवीन
आता एक कामाचे सांगतो .एक प्लास्टीकचा डबा साधारण ५ बाय ४ आणि उंचीला ९ ईंचाचा घेऊन त्याला चाळीसेक फूट नायलॉनची दोरी गुंडाळून ठेवावी .हा डबा सैकमध्ये टोमाटो वगैरे मऊ गोष्टीसाठी वापरता येतो .नंतर गडावरच्या टाक्यातून ,गावाबाहेरच्या खोल विहिरीतून पाणी ओढण्यास,अथवा बोअरवेलचे पाणी भरून घेण्यास ,नदीवर आंघोळीला हा डबा फार उपयोगी पडतो .
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Tue, 05/14/2013 - 13:52 नवीन
तसचं एक प्लॅस्टीकची बाटली असु द्यावी जवळ.. सपाट बुडाची किंवा झाकणाची .. नाहीतर उगी धरुन बसायला लागते..
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Tue, 05/14/2013 - 14:03 नवीन
१ बॅग भरताना आतले कपडे आणि भिजून खराब होण्यासारख्या इतर वस्तू आधी प्लॅस्टीकच्या वेगवेगळ्या पिशव्यांत गुंडाळून मग बॅगेत भराव्या. २ आपल्याला सहज झेपेल इतकेच सामान भरावे. ३ शायनींग मारायला नी फोटो काढायला येणार्‍या मुली आणि मुलांना नेणे टाळावे. खूप त्रास आणि ताप होतो. जीन्स आणी स्पोर्ट्स शूज घालून आलेल्यांना फाट्यावर मारावे आणि परत पाठवून द्यावे. ४ रॅपलींग करायचे असो वा नसो, कायम रोप सोबत ठेवावा. धोधो पाऊस पडत असताना ओढ्यातून उतरताना कामी येतो. ५ ओढ्यातून उतरताना सावधान. पाण्यामुळे मातीची धूप होऊन दगड सैल झालेले असतात. सटकले तर ट्रेकर आणि अजून काही दगड घेऊन खाली गडगडतात. ६ जे कुणी ट्रेकला येणार आहेत त्यांना ट्रेकची अगोदरच पूर्ण कल्पना द्यावी. मेंबर जमवण्यासाठी टेपा लाऊन माणसं आणू नये. उदाहरणार्थ - '१-२ तासाचा सोप्पा ट्रेक आहे, चढण फारशी नाहीच' असे म्हणून त्यांना मे महिन्यात प्रबळगडावर नेऊ नये. ७ १ टॉवेल प्लॅस्टीकच्या पिशवीत ठेवावा. सिगारेट प्यायची असेल तर आधी हात कोरडे करायला उपयोगी पडतो. सोबत लायटर ठेवावा. ८ रात्रीचा ट्रेक असेल तर ट्रेकींग नाईफ वगरे जवळ बाळगावेत. झाडं कापायला आणि स्वसंरक्षणासाठी उपयोग होतो. Image removed. ९ फुकटची रिस्क घेऊ नये. दिसेल ते फळ खाऊ नये. दिसेल त्या रोपाला, झाडाला हात लाऊ नये. झाडांची, वेलींची पानं ओरबाडत जाऊ नये. १० इलेक्ट्रॉलची पाऊडर नुसती खाऊ नये. बेक्कार डिहायड्रेशन होतं. भरपूर लिंब न्यावीत. डिहायड्रेशन मधे उपयोगी पडतात. ११ खुणा करायला क्रेयॉन्स वापरावे. खडूनी केलेल्या खुणा पावसात पुसल्या जाऊन गोची होते. सद्ध्या इतकंच, सुचेल तसं अ‍ॅड करेनच.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 05/14/2013 - 14:08 नवीन
शायनींग मारायला नी फोटो काढायला येणार्‍या मुली आणि मुलांना नेणे टाळावे. खूप त्रास आणि ताप होतो.
+१११११ पण
जीन्स आणी स्पोर्ट्स शूज घालून आलेल्यांना फाट्यावर मारावे आणि परत पाठवून द्यावे
का बरे? बाकी,
खुणा करायला क्रेयॉन्स वापरावे. खडूनी केलेल्या खुणा पावसात पुसल्या जाऊन गोची होते.
सहमत आहेच. मात्र पावसाळ्यात आम्ही तीन दगड, त्यावर दोन, त्यावर एक असा छोटा पिरॅमिड रचतो खुणेसाठी. धुक्यात वगैरे त्या फुल्या अनेकदा दिसत नाहित.
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Tue, 05/14/2013 - 14:15 नवीन
का बरे? जीन्स काचून मांड्यांची वाट लागल्याने आणि स्पोर्ट शूज घालून पाय सारखे सरकल्याने चढण्याची स्पीड अर्ध्याहून कमी होतो. सगळे लटकतात. (३ तासांचा ट्रेक अशा लोकांमुळे ५ तासात केलेला) आदि जोशी :)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 05/14/2013 - 14:18 नवीन
जीन्सचं ठीके पण ट्रेकमध्ये बुटं पाहिजेतच, नाही का? तसे आम्ही चपलीने सिंहगड, लोहगड, पुरंदर, राजगड, तिकोना अन तुंग चढलोत, पण बुटं वापरायला सुरुवात केल्यावर मग त्यांचा ट्रेकमधला फायदा कळ्ळा. रॉक क्लाइंबिंगमध्ये तर बुटं मष्ट.
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Tue, 05/14/2013 - 14:23 नवीन
अहो मी स्लिपर घालून ट्रेक केलेत. आणि हंटर शूज / ट्रेकींग शूज असतील तर गोष्ट वेगळी. स्पोर्ट शूज हे ट्रेकसाठी नाहीत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 48 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा