✪ १३ योग केंद्रांमध्ये भेट आणि संवाद
✪ “निरामयचा" जानेवारीमध्ये पूर्ण झालेला सायकल यात्रा उपक्रम
✪ बंगलोर- उटी- ईशा आदि योगी- केरळ- कन्याकुमारी- रामेश्वरम- चेन्नै
✪ प्रचंड मोठे घाट, भितीदायक उतार आणि बेटावरचा प्रवास
✪ सुरूवातीला पुण्यातल्या चिन्मय विभूतीमध्ये भेट
✪ १८६१+ किलोमीटर अंतर आणि सायकलने दिलेली साथ
✪ निसर्ग- तीर्थयात्रा आणि अविश्वसनीय भारत
✪ सर्वांबद्दल कृतज्ञता आणि धन्यवादाची भावना
नमस्कार. गेल्या जानेवारीमध्ये दक्षिण भारतात "आरोग्यासाठी योग" हा विषय घेऊन १८६१ किलोमीटर सोलो सायकल प्रवास केला होता. परभणीच्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राचा हा उपक्रम होता. दक्षिण भारतातील योग संस्थांना भेट देणं, त्यांचं काम जाणून घेणं, लोकांसोबत योगाविषयी संवाद करणं, दक्षिण भारतातील संस्कृती व विविधता समजून घेणं अशी त्याची उद्दिष्ट होती. अगदी ठरवल्याप्रमाणे २० दिवसांमध्ये हा प्रवास ३१ जानेवारीला चेन्नैमध्ये पूर्ण झाला. प्रत्येक ठिकाणी खूप काही अनुभवता आलं. प्रत्येक दिवसामध्ये शिकायला आणि बघायला मिळालं. ते अनुभव लिहून काढण्याचा "योग" आता येतो आहे!
(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल आणि सायकल प्रवासातले फोटो इथे बघता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.)
.
.
.
सुरूवातीला ऑगस्ट २०२५ मध्ये ह्या सायकल प्रवासाचं नियोजन केलं होतं. तेव्हा बंगलोरला गेलोही होतो. पण तिथे जाऊन व्हायरलने आजारी पडल्यामुळे एक पेडलही सायकलिंग करता आलं नव्हतं. त्यामुळे १२ जानेवारीला विवेकानंद जयंतीच्या दिवशी बंगलोरमधील स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान, इथून हा प्रवास सुरू करायचं नियोजन केलं. सायकलिंग गेली १३ वर्षं करतो आहे, त्यामुळे तयारी, सराव, तांत्रिक पैलू, घाट रस्त्यांची तयारी हे सगळं नेहमीचंच होतं. डिसेंबरमध्ये उत्तरेला अगदी हिम शिखरांपर्यंत जाण्याचाही "योग" येऊन गेला. तिथून परत आल्यानंतर तीन आठवडे उरले होते. नेमका त्यावेळेस परत सर्दी- खोकला सुरू झाला. मनामध्ये परत शंका आली की, हा प्रवास खरंच जमेल ना? शंका बाजूला ठेवली आणि राईडस सुरू केल्या. दोन तीन राईड २०- २५ किलोमीटरच्या केल्यावर मग ४० आणि ६० किलोमीटरच्या राईडस केल्या. आणि हळु हळु आत्मविश्वास आला. जेसिका वॉटसन ह्या १६ वर्षांच्या मुलीने एकटीने केलेल्या जहाज प्रवासावरचा 'ट्रू स्पिरिट' पिक्चरही मित्रासोबत अगदी योग्य वेळी बघितला! त्यामुळेही शंका दूर होत गेल्या.
दक्षिण भारतात सायकलिंगच्या नियोजनाच्या वेळेस चिन्मय इंटरनॅशनल फाउंडेशन, केरळमधील संचालिका डॉ. गौरी माहुलीकर मॅडमसोबत परिचय झाला होता. डिसेंबरच्या शेवटी त्यांच्याशी बोललो व लवकरच सायकल प्रवास सुरू करत असल्याचं त्यांना सांगितलं. केरळमध्ये चिन्मय मिशनच्या केंद्रांना आवर्जून भेट दे, आमच्याकडे ये असं त्यांनी सांगितलं. आणि ३१ डिसेंबर २०२५ ला पुण्यातल्या चिन्मय विभूतीमध्ये एक विशेष कार्यक्रम आहे, हेसुद्धा सांगितलं. मूळचे केरळचे असलेल्या स्वामी चिन्मयानंदांनी योग प्रसाराचं कार्य १९५१ मध्ये पुण्यातून सुरू केलं. त्याला ७५ वर्षं पूर्ण होत आहेत म्हणून चिन्मय मिशनने देशभर एक योग- यात्रा आयोजित केली. आणि तिची सुरूवातच चिन्मय विभूतीमधून होणार होती.
३१ डिसेंबरच्या त्या कार्यक्रमाला सायकलवरून गेलो. ७६ किलोमीटरची छान राईड तर झालीच, पण चिन्मय विभूतीमधला कार्यक्रम खूप छान वाटला. त्यांचा परिसर, निसर्गरम्य ठिकाण आणि शांतता बघण्यासारखं होतं. शिवाय कार्यक्रमामध्ये स्वामी चिन्मयानंदांचे काही विचार ऐकायला मिळाले. योग किंवा अध्यात्म हे सामान्यत: रुक्ष वाटू शकतं. पण स्वामीजींनी अशा शैलीत आणि अशा प्रकारे ते विचार मांडले की, अगदी सहज पोहचले. योग- शास्त्र व ही विद्या आधुनिक प्रकारे आणि आजच्या भाषेत कशी मांडतात, ते त्यांना ऐकताना कळालं. “If you are an Indian and you don’t understand Geeta, then you own a palace, but you are staying only in its backyard!” त्यांचे इतरही विचार असेच स्पष्ट आणि थेट आहेत.
त्याशिवाय चिन्मय मिशनने त्यांच्या प्रवचनांचं, जीवन कार्याबद्दलच्या डॉक्युमेंटेशनचं छान सादरीकरण केलं आहे. आजच्या काळातल्या पिढीला कळेल अशा प्रकारे जुने फोटोज व व्हिडिओज ए. आय. वापरून आणखी समर्पक केले आहेत. ए.आय. च्यामदतीने त्यांची प्रवचनं त्याच शैलीत इतर भाषांमध्ये आणली आहेत! त्या कार्यक्रमातला एक प्रसंग म्हणजे गीतेचे तीन श्लोक एकाच वेळी संस्कृतमध्ये आणि इंग्रजी अर्थासह नृत्य व वाद्यांच्या मदतीने सादर केले गेले! कर्मणेsवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन- “Do your best and leave the rest” विद्यार्थिनींचं ते सादरीकरण खूप भावलं. त्याशिवाय स्वामी संपूर्णानंद, स्वामी अनुकूलानंद ह्यांचे प्रवचन ऐकता आले. चिन्मय मिशन काय काम करतं ते समजून घेता आलं. आणि कोचीच्या केंद्रात असलेल्या स्वामी सुधीर चैतन्यजींशीही भेट झाली. चिन्मय विभूतीमध्ये एका अर्थाने ह्या सायकल यात्रेचाही उपोद्घात झाला- एक प्रकारचा शुभारंभ झाला. आणि खूप वेगळ्या प्रकारे ३१ म्हणजे "थर्टी फर्स्ट" साजराही करता आलं!
निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र, परभणीच्या सगळ्या कुटुंबियांच्या मदतीने पुढचं नियोजन केलं. ह्या पूर्ण सायकल प्रवासातच त्यातल्या काही जणांना मी खूप त्रास दिला. श्रीधरजी कारेगांवकर सर आणि अर्चनाताई जाधव त्यांना तर वारंवार त्रास दिला. जितकं शक्य होतं तितक्या प्रमाणात दक्षिण भारतातल्या ह्या रूटवरच्या संस्थांना व लोकांना संपर्क केले. निरामय संस्थेकडून मेल पाठवले. नुसतं अंतर पार करण्यासाठीचं हे सायकलिंग नव्हतं. एक माध्यम म्हणून सायकलमध्ये जी क्षमता आहे तिचा उपयोग करून लोकांसोबत संवाद साधायचा होता.
जानेवारीमध्ये सायकलिंगची एक सर्व्हिसिंग करून घेतली. टायर्स नवे टाकले होतेच. बंगलोरला सायकल नेताना ट्रॅव्हल्समधून न्यायला सोयीची होती. पण अनेक ट्रॅव्हल्स सायकल इल्ले म्हणत होत्या. म्हणून थोडी शोधाशोध करावी लागली. नंतर कर्नाटक परिवहन महामंडळाची ऐरावत मदतीला आली आणि सर्व तयारी झाली! मित्र मंडळी व घरातल्यांचाही पाठिंबा होताच.
११ जानेवारीला बंगलोरला पोहचलो. डिकीत ठेवलेली सायकल बाहेर काढल्यावर कळालं की टायर पंक्चर झालंय! बहुतेक सर्विसिंगमध्ये जास्त हवा भरल्यामुळे वाटेतल्या धक्क्यांच्या आघातामुळे ट्युब फुटली असावी. बंगलोरमध्ये पहिलं पेडल मारण्यासाठी अजून थांबावं लागलं. बहिणीकडे गेलो. तिथे नंतर पंक्चरचं दुकान मिळालं. आणि तेव्हा कुठे पहिलं पेडल मारता आलं! आणि ० ते १ हे खूप मोठं अंतर ओलांडलं गेलं! पंक्चरवाल्याने टायर काढून पंक्चर लावलं आणि परत टायर जोडलं. नंतर बहीण व जिजाजी म्हणाले की, स्वामी विवेकानंद योग अनुसंधान- SVYASA संस्थेत आम्ही तुला सोडतो. त्यावेळी गाडीत सायकल ठेवताआ सायकलचे टायर्स परत काढले. पण पंक्चरवाल्या मॅकेनिकने एक टायर इतकं घट्ट बसवलं होतं की, आम्हांला ते काढता आलं नाही. अगदी साधं लीव्हर, पण हलतच नव्हतं. गंमत म्हणजे वॉचमनने ते अक्षरश: सेकंदाच्या आत काढलं- सवय आणि शरीराची क्षमता! अशा गमती होत होत ११ च्या संध्याकाळी SVYASA संस्थेत पोहचलो.
.
.
बंगलोरची हवा अगदीच पावसाळी, कुंद आणि थंड! शिवाय प्रवासात झालेली अर्धवट झोप. त्यामुळे मनामध्ये शंकाकुशंका आहेतच. पण फायनली SVYASA मध्ये पोहचलो, तिथे सायकल परत असेंबल केली तेव्हा मात्र सगळं मळभ दूर झाल्यासारखं वाटलं! एस- व्यासाचा परिसर खूप सुंदर आहे. तिथे नंतर निरामयचे जुने साधक श्री. धनंजय इंचेकर भेटले. नंतर डॉ. नागेंद्रजींचं भाषण ऐकता आलं. विद्यापीठाचे उपकुलगुरू ह्या नात्याने त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. नंतर त्यांना दोन मिनिट भेटून त्यांच्याही शुभेच्छा ह्या प्रवासासाठी घेता आल्या. एस- व्यासा ही योग संशोधन करणारी मोठी संस्था आणि विद्यापीठ आहे. विविध परिषदा, वेगवेगळे अभ्यासक्रम, योगाचा आरोग्यासाठी उपयोग अशा अनेक प्रकारे ती काम करते. तिथला दीक्षान्त समारंभ म्हणजेच convocation ceremony उद्या, १२ जानेवारीला आहे. त्याची तयारी तिथे सुरू आहे. भारतभरातले आणि विदेशातलेही विद्यार्थी दिसत आहेत. वैज्ञानिक पद्धतीने इथे योगावर काम चालतं. असा ११ जानेवारीचा दिवस पार पडला!
प्रत्यक्ष सायकलिंग सुरू करण्यापूर्वीचे हे टप्पेच खरं तर अवघड गेले. पेडलिंग किंवा सायकलिंगबद्दल कोणतीच शंका नव्हती. पण नवीन ठिकाणं, नवीन वातावरण, नवीन अन्नासोबत जुळवून घेणं, वातावरणातले बदल अशा गोष्टी मनात होत्या. ह्यावेळी सायकलिंगमध्ये माझं व्यक्तिगत उद्दिष्ट होतं की, अशा बदलणार्या स्थितीमध्येही स्वत:ची जुळवून घेण्याची क्षमता साकार करणं. सायकलिंग सुरू करण्यापूर्वी अर्थातच मानसिक स्थिती खूप महत्त्वाची असते. २० दिवसांचा प्रवास, रोजचे ९०- ९५ किलोमीटर ह्याचा ताण येऊ शकतो. त्यामुळे इथे मी एक सूत्र वापरत राहिलो. आणि ते सूत्र म्हणजे त्या त्या क्षणामध्येच थांबणं- moment to moment पुढे जाणं. उद्याच्या गोष्टींचा विचार आज नाही करायचा. त्या त्या टप्प्याचाच विचार करायचा. आणि पुढे सायकलिंग करताना तर अगदी पुढच्या १०- १५ किलोमीटरच्या अंतराचाच विचार करत गेलो. किंवा त्याहूनही छोटे टप्पे. त्यामुळे मनावर ओझं अजिबात येत नाही. भूत काळात व भविष्य काळात जाणारं मन वर्तमानात आणणं हा ध्यानाचा अभ्यास इथे खूप उपयोगी पडला.
त्यानंतर जो प्रवास सुरू झाला तो खूप अविश्वसनीय होता. सगळं करून झाल्यावरही कधी कधी मलाच ते खरं वाटत नाही! इतकं कुठे कुठे फिरायला मिळालं. निसर्गाचं विराट रूप दर्शन बघितलं. आपल्या देशातल्या कुटुंबियांशी- बहिण भावांशी- खूप वेगळ्या भेटी झाल्या. योगाचा एक अर्थ जोडणे- to connect and reconnet तोही खूप जाणवत राहिला. स्वत:सोबतही connect and reconnect होता आलं. प्रत्येक दिवशी असे खूप वेगवेगळे अनुभव आले. आपला देश किती समृद्ध आहे, किती संपन्न आहे हे बघता आलं. धनुषकोडीसारखे विलक्षण स्थान आणि तंजावरच्या बृहदीश्वरासारखे मंदिरं बघता आले! अवाक् व्हायला होतं ते आठवून. सायकलवर जरी मी एकटा असलो तरी सगळ्यांची सोबत मला होती. निरामयचे कुटुंबीय, कर्नाटक, केरळ व तमिळ नाडुतले भारतातले कुटुंबीय अशा सगळ्यांनी खूप सोबत आणि मदत केली. फक्त आणि फक्त कृतज्ञतेचा भाव त्यामुळे परत परत मनात येतो. ३१ जानेवारीला चेन्नैमध्ये राईड संपवतानाही तोच भाव मनात होता आणि लिहीतानाही तोच मनात आहे. पुढच्या लेखात पहिल्या दिवसाचे अनुभव शेअर करेन. धन्यवाद!
पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव २: बंगलोर ते मलावली ९३ किमी
वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 11 मार्च 2026.