हा सूर्य आणि......
जेव्हा अर्जुनाने जयद्रथाला मारायची प्रतिज्ञा केली तेव्हा कृष्णाला काय वाटले असेल??
---
कृष्णाने शिबीरात रथ आणला आणि त्याच्या हृदयाचा ठोका चुकला.
काहीतरी विपरीत घडले होते.
आज अर्जुनाला संशप्तकांनी फारच गुंतवून ठेवले होते. संख्येच्या बळावर आणि विवीध रथीच्या निपुणतेवर आजचा दिवस अर्जुनाला बांधून ठेवण्यात संशप्तक सफल
झाले होते. युधिष्ठीराला फसवून चक्रव्युहात आणून, युद्ध संपवायचा डाव होता हे कृष्णाला कळले होते. तो डाव कळल्यावर लगेच दूत युधिष्ठीराकडे पाठवून
त्याने सावधही केले होते. "मग आज कोण वीरगतीला प्राप्त झाला?" प्रश्न मोठा होत होता. अर्धा दिवस झाल्यानंतर संशप्तकांनी दूतांनासुद्धा आत/ बाहेर करू दिले नव्हते. "काय घडले असावे?" आपल्या दमलेल्या, रक्ताळलेल्या अश्वांना चुचकारत कृष्ण शिबीराच्या आत-आत शिरत होता. इतकावेळ बोलणारा अर्जुन सुद्धा शांत झाला होता. त्याच्या डोळ्यात भीती दाटून आली होती. "पांडवांपैकी कोणाला काहीही झाले नाही" हे कृष्णाला उमगले. जर उरलेल्या चार भावांपैकी कोणी धारातिर्थी पडलं असत तर, ती बातमी दोन्ही बाजूकडून कृष्णाला कळली असती. "मग कोण ?" कृष्णाने रथ अर्जुनाच्या शिबीराकडे वळवला. इथे गर्दी वाढू लागली. लोक कृष्णार्जुनाच्या नजरेला नजर भिडवत नव्हते. हलकेच अश्वांना चुचकारत कृष्णाने रथ अर्जुनाच्या बाजूच्या राहुटी समोर थांबवला. आता आतून हुंदक्यांचे आवाज येत होते. आतून युधिष्ठीर बाहेर आला आणि त्याने कृष्णाला वंदन केले.
कृष्णाच्या प्रश्नार्थक नजरेला, आपली आर्द्र नजर भिडवत, युधिष्ठीराने नाव उच्चारले, "अभिमन्यू ". आतून हुंदक्यांचा आवाज वाढला. अर्जुनाकडे न बघता कृष्ण रथातून उतरला त्याने दारूकाच्या मदतीने अश्व मोकळे केले आणि दारूकाला त्यांची चाकरी करायला सांगीतली. हे सगळे होईस्तोवर युधिष्ठीर समोर हात जोडूनच उभा होता. त्याच्या नेत्रांतून आसवांचा पूर वाहात होता. कृष्णाने त्याचे वंदन स्वीकारत, हात खाली केले आणि हलकेच दाबले. रथातून धनुष्य खाली पडल्याचा आवाज झाला. कृष्णाने जेव्हा वळून अर्जुनाकडे पाहीले तेव्हा, त्याचे दोन्ही हात रथावर घट्ट पकडलेले होते, तो पूढे झुकला होता आणि मान खालावली होती. दिसत नव्हते, तरी कृष्णाला अर्जुनाचे अश्रु जाणवत होते. "ऐकल नाही रे पोराने आमचे" कृष्ण युधिष्ठीराकडे वळला." आत गेला चक्रव्युहात." कृष्णाने डोळे मोठे करत, युधिष्ठीराचे हात दाबले. इतक्यात मागून, अर्जुन रथातून खाली उतरल्याचे जाणवले. आता त्याच्या डोळ्यांतून अश्रूची संततधार लागली होती. तिघे आत शिरले. समोरच्या शय्येवर दर्भ टाकून अभिमन्युचा मृतदेह ठेवला होता. आजुबाजुचे कापड रक्ताने माखून कडक झाले होते. कृष्णाने अभिमन्युच्या चेहन्याकडे पाहीले. हा वीर हसत हसत वर गेला होता. त्याची नजर खाली शरीराकडे जाणार तोच मागून एक दीर्घ उच्छवास ऐकू आला. कृष्णाने मागे बघण्याच्या ऐवजी नजर खाली नेली.
अभिमन्यूच्या संपूर्ण शरीरावर असंख्य घाव होते. डावा हात तुटलेला नुसता जोडून ठेवला होता. छाती, पोट, मांड्या, पाय. आज क्रौर्याची परिसीमा गाठली गेली होती. काहीही झालं तरी अभिमन्यू राजपुत्र होता. परंतु तो अर्जुनपुत्र असल्याचा त्याला दंड मिळाला होता.
युधिष्ठीराला जिथे बोलायला नको तिथे बोलायला लागते असे अर्जुन नेहमी म्हणायचा. आज त्याचेच प्रत्यंतर कृष्णाला आले. "सिंधूराज् जयद्रथाने आत मदतीला नाही जाऊ दिले वासुदेवा" कृष्णाच्या पोटात मोठा गोळा आला. आता काहीतरी आक्रित घडणार याचा त्याला पूर्ण अंदाज आला. "इतके रथी-महारथी त्या जयद्रथाने आज अडवून धरले.." कृष्णाने वाक्य पूर्ण होण्या आधी युधिष्ठीराला थांबवले. पण बाण प्रत्यंचेतून सुटला होता.
अर्जुनाचा अश्रूंचा बांध सुटलाच होता परंतु अर्जुन, रक्तवर्ण झाला होता. डोळ्यात अंगार पेटले होते. मानेवारची नस टरटरून फुगली होती. अर्जुन आख्खा थरथरत होता. कृष्ण काही बोलणार, काही करणार ,तेवढ्यात अर्जुन वळला आणि बाहेर निघून गेला. लगबगीने कृष्ण सुद्धा त्याच्या मागे निघाला. परंतु कृष्णाच्या लक्षात येईपर्यंत, अर्जुन उजव्या हातात पाण्याचे तर्पण घेऊन, डाव्या हातात गांडीव पकडून रथावर उभा झाला होता.
" मी पांडूपुत्र अर्जुन, अशी प्रतिज्ञा घेतो की उद्या सुर्यास्ताच्या आधी जयद्रयाला मारेन. अन्यथा मी स्वतः अग्नीत जाळून घेईन!"
अनर्थ घडला होता.
पाणी ओंजळीतून खाली पडले, गांडीवाच्या प्रत्यंचेचा ध्वनी घुमला, एकदा, दोनदा, तीनदा ... लालबुंद चेहऱ्याचा अर्जुन अजूनही रथातच होता. कृष्ण रथावर चढला, त्याने समोर उभे राहून अर्जुनाच्या दोन्ही खांद्यांवर हात टेकवले. अर्जुनाचे शरीर अजूनही थरकापत होते. कृष्णाने हळूहळू अर्जुनाच्या खांदयावरचा भार वाढवला. शून्यात गेलेली, लालबुंद अर्जुनाची नजर इहलोकात परतली, अजूनही अंगार पेटताच होता. कृष्णाने हातातले गांडीव बळेच घेतले आणि त्याच्या जागेवर ठेवले. कृष्ण वळून रथाच्या खाली उतरेस्तोवर अर्जुनाच्या नेत्रांतून जणू गंगेच्या धारा लागल्या होता. आता त्याची नजर त्याच्या दोन्हीं हातावर खिळली होती. हाताला पकडून कृष्णाने अर्जुनाला त्याच्या
शिबीरात आणले. सेवकांकरवी त्याला गरम पाण्याने अंघोळ घालून, तृणशय्येवर अर्जुनाला बसवले. एका तांब्याच्या भांडयातून गंगेचे उदक त्याला प्यायला दिले. त्याच्या समोर बसून त्याला श्वासोच्छ्वासाचा मंत्र करवला. हे सगळे होईस्तोवर युधिष्ठीर बाहेर उभा होता. अर्जुनाला शय्यासंपन्न करून कृष्ण बाहेर आला.
"झाडावर बसलेल्या त्या कर्णकर्कश्य कावळ्यानंतर मीच", युधिष्ठीराने परत वासुदेवाला वंदन केले. "अभिमन्यू तर वीरगतीला प्राप्त झाला, परंतु अर्जुनाने
अशी काय प्रतिज्ञा केली वासुदेवा?" कृष्णाने युधिष्ठीराच्या नजरेला नजर भिडवली. त्याचेही सांत्वन करून, बायकांचे सांत्वन करून कृष्ण त्याच्या शिबीरात आला. दारूकाकरवी पाणी आणून त्याने स्नान केले. दारूकाला त्याची तृणशय्या करताना कृष्णाने त्याला सांगीतले. "उदया तयार रहा. मी अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण करायचा निकराने प्रयत्न करीनच. मात्र जर ते मला साध्य झाले नाही. तर मीच शस्त्र हातात घेईन. उदया जर अर्जुन नाही राहीला, तर मी ही नाही राहणार. दारुका जसा मी पांचजन्य वाजवेन, तसा माझ्याकडे ये. कवच घालून, रथ शस्त्रांनी सज्ज करून तयार रहा."
साश्रु नयनांनी दारूकाने निरोप घेतला. वरच्या छताकडे पाहत, कृष्णाने झोपायचा प्रयत्न चालू केला. प्रयत्नच म्हणायचा. झोप कित्येक योजने दूर होती. अर्जुन उतावीळ, शीघ्रकोपी, परंतु कृष्णाचा अर्धा प्राण होता. इतर बरेच वेळा कृष्णाने त्याला सावरलं - आवरलं होतं. आज ते कौर्य पाहून, क्षणभर कृष्णसुद्धा विचारात पडला होता. आणि याच क्षणभरात अर्जुनाने नको ते केलं. युद्धात क्रौर्य असतेच, ते घडतेच. माणूस कितीही चांगला असला, तरीसुद्धा युद्ध वाईटच. पांडवातल्या राजकुमाराचीआणि ती ही इतक्या कोवळ्या राजकुमाराची लक्तरं तोडली होती आज. राजकुमार होता तो. युधिष्ठीराचा जेष्ठ पुत्र नव्हता तर अर्जुनाचा पुत्र होता. पांडवांचे राजकुमार युद्धात उतरले नव्हतेच. त्याच जिवंत राहणे अतिशय महत्वाचे होते. ती सुरक्षा बाकिच्यांना नव्हती. तेवढ्यात वासुदेवाला काहीतरी आठवले. त्याने सेवकाला हाक मारून पोथ्या-पंचांग आणवली. डोळ्यावरची झोप कुरुक्षेत्रापासून कित्येक योजने लांब गेली होती.
त्या लिखाणाच्या पसाऱ्यातून वासुदेवाने जेव्हा डोके बाहेर काढले, तेव्हा त्याच्या डोक्यात उद्याच्या चढाईचा डाव पक्का झाला होता. कृष्णाला पक्के माहीती होते की अर्जुनाची प्रतिज्ञा कौरव शिबीरात पोचली असणार आणि ती पूर्ण होऊ नये म्हणून यथार्थ प्रयत्न उद्या कौरव आणि मंडळी घडवणार. म्हणजे जयद्रथापर्यंत पोहोचणे हे अतिशय जिकरीचे असणार. मात्र एका गोष्टीचा वापर फक्त आणि फक्त कृष्ण स्वतःच करू शकते यावर त्याचा स्वतःचा नितांत विश्वास होता. त्याला उद्या तेच पुन्हा सिद्ध करायचे होते.
सुर्याच्या पहिल्या किरणाला अर्घ्य द्यायला वासुदेव छातीभर पाण्यात उभा होता. "सुर्यदेवा,आज थोडावेळ तुला झाकणार आहे मी. "
हे अर्घ्य खरे ठरणार होते....
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments