Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

दुर्योधनादिंना युद्धापूर्वीच श्रीकृष्णाने का संपवले नाही ? आणि अन्य काही प्रश्न

च
चित्रगुप्त
Mon, 08/28/2023 - 01:10
🗣 195 प्रतिसाद
महाभारत युद्धात अठरा अक्षौहिणी (म्हणजे नेमके किती लोक?) मरण पावले, हजारो जखमी झाले, त्या योद्ध्यांची लाखो बालके अनाथ झाली, लाखो स्त्रियांना वैधव्य प्राप्त झाले, लाखो वृद्ध आश्रयहीन झाले, अगणित घोडे, हत्ती वगैरे नष्ट झाले.... युद्धानंतर रणभूमिवरील एवढ्या शवांमुळे दीर्घकाळ पर्यंत रोगराई पसरून त्याची बाधा अनेकांना झाली असेल. सरतेशेवटी पांडव जिंकले खरे पण त्यांची पुढली पिढी पण नष्ट झाली. -- हे सगळे विचारात घेता काही प्रश्न पडतातः १. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ? २. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ? ३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ? ४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता? ५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ? ६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ? ७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ? ---- याबद्दल जाणकार, काथ्याकूटप्रवीण मिपाकरांचे काय मत आहे ?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 50356 views

🗣 चर्चा (195)
उ
उन्मेष दिक्षीत Tue, 08/29/2023 - 19:16 नवीन
फोटो छान आलाय तुमचा , क्युटच !
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 08/30/2023 - 18:58 नवीन
तरीच म्हटलं हा अवतार या अगोदर कुठे बघितला आहे =)) नावं कितीही बदलली तरी वृत्ती बदलत नाहि हेच खरं.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 08/30/2023 - 21:00 नवीन
तेच तर ! अख्ख्या मिपाला माहीत आहे कि निराकार गाढव म्हणजे कोण ते! ते वर प्रतिसादात , मी उल्लेख केलेले नाव , तो टिपिकल गाढ्वाचा फोटो कोणालाही उद्देशुन बोलले तर सदर व्यक्ती कन्फ्युज झाली असती की हे काय आहे , पण त्यांन्नी लगेच प्रत्युत्तर दिले ह्यावर सिध्दच झाले की सदर आय डी दुसरे तिसरे कोणी नसुन साक्षात गुर्देव निराकार गाढव च आहेत =)))) पण असुदे , आलेच आहेत तर चार दिवस बागडतील इथे परत, प्रत्येक धाग्यावर जाऊन ढाँन्चु ढाँन्चु करत लाथाडतील इतर मिपाकरांना. मग लोकांन्ना वात आणातील सर्वत्र प्रतिसादात घाण करुन अन फायनली संपादक त्यांचे अवतार कार्य संपुष्टात आणुन त्यांचे विसर्जन करतील .... फक्त मोजकेच काही दिवस ! शेवटी कसे आहे की काळ हा एक भास आहे #बेशर्त_स्वीकृती =))))
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Wed, 08/30/2023 - 21:10 नवीन
सदर ३ ही आय डी तुमचेच आहेत हे बरे झाले सांगितले ! आणखी एक , निराकार गाढव नसते !
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/31/2023 - 07:56 नवीन
सदर ३ ही आय डी
तुम्हाला अत्ता कळालं होय =)))) मी तर हे कधी पासुन सांगतोय पण तुम्ही तर तार स्वरात ढॉंन्चु ढाँन्चु करत सर्वत्र लाथा झाडत फिरत असता , तुम्हाला कसे ऐकु येईल ! अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन । विष्टभ्याहमिदं कृत्स्नतमेकांशेन स्थितो जगत् ॥ आतां पैं माझेनि एकें अंशें । हें जग व्यापिलें असे । यालागीं भेदू सांडूनि सरिसें । साम्यें भज ॥ ह्या चराचरातील प्रत्येक गोष्ट मीच एकांशाने व्यापुन राहिलो आहे. ह्या मिसळपाव वरील सर्व आयडी माझेच आहेत. जोवर "मीच काय तो एक सर्वज्ञ" हा अहंकार झटकुन , ही सर्व अहमंन्यता बाजुला सारुन विचार करता येत नाही तोवर तुला ह्या सत्याचे आकलन होणार नाही. शांत चित्ताने विचार कर, लगेच ढॉंन्चु ढाँन्चु करत प्रतिसाद टाईपू नकोस. तुझ्या पोकळ प्रतिसादांनी फक्त मिपाकरांचे (म्हणजे माझेच) मनोरंजन होणार आहे दुसरे काही नाही . =))))
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 08/31/2023 - 08:35 नवीन
छान व्यक्तिगत मारामार्‍या चालु आहे. कृपया ह्या मारामारीत गाढवाला घेउन गाढवाचा अपमान करु नये. उपलब्ध माहितीनुसार गाढव हुशार, कष्टाळु आणि प्रामाणिक प्राणी आहे. https://www.thedonkeysanctuary.org.uk/all-about-donkeys/behaviour/characteristics/donkey-intelligence https://www.thehindu.com/opinion/open-page/the-intelligent-donkey/article21822863.ece https://today.tamu.edu/2008/01/14/donkeys-are-the-ones-with-real-horse-sense-vet-says/ बाकी चालु द्या. मस्त करमणुक होते आहे.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत गुरुवार, 08/31/2023 - 08:46 नवीन
सदर ओवीतज्ञांनी गाढव हे निराकार असते असा शोध लावला आहे, काय टॅलेंट आहे बघा ! गांजा मारला की काहीही दिसू शकते.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/31/2023 - 16:04 नवीन
निराकार गाढव
तुम्हाला आजही निराकार गाढव ह्या शब्दाची व्युतपत्ती माहीत नाही म्हणजे आश्चर्यच आहे ! पहिल्यांदा तुम्ही चांगले लेखन करायचा म्हणुन मिपाच्या नेहमीच्याच हसत्या खेळत्या वातावरणात तुम्हाला लोकं "निराकार गुर्देव" असं संबोधायचे. पण ननंतर तुम्ही सर्वत्रच , सर्वच लेखनांवर जाऊन मीच एकटा सर्वज्ञ कसा , बाकी सगळेच निर्बुध्द कसे ह्याचे प्रदर्शन केले , तेही अतिषय कॉन्डिसेंडिंग भाषेत. सर्वत्र लाथाडी करायला लागलात गाढवासारखी . ढाँन्चु ढाँन्चु तर चालुच होते आधी पासुन . त्यामुळे तुम्हाला गाढव हे नामाभिधान प्राप्त झाले. आणि मग मिपास्टाईल मजेशीर काँबिनेशन म्हणुन लोकं तुम्हाला निराकार गाढव असे संबोधु लागली. गाढव निराकार असतं असं कोणी कुठेही म्हणलेलें नाहीये की लिहिलेलं ही नाहीये =)))) आता नवीन आयडी काढुन आल्यावर तुम्ही वेगळ्या पध्दतीने वागु शकला असतात, पण तुम्ही परत तेच केलेत , चित्रगुप्त ह्यांच्या धाग्यावर अहंमन्यतेचे प्रदर्शन , अर्धवटरावांशी जाणुन बुजुन भांडण काढणे , मी कोठेही तुमचा उल्लेखही केलेला नसताना माझ्या प्रतिसदांवर सर्वज्ञतेची गरळ ओकणे वगैरे. आधी तुम्ही साधुसंतांचा अवमान करायचात , ह्या वेळेला फ्रेडरिक नीचा ला देखील सोडले नाहीत. तुम्हाला कोणीही सांगितले अथवा विचारले नसताना भगवद्गीतेचा पोपटपंची , ज्ञानेश्वरीचा उल्लेख ओवी तज्ञ वगैरे करायला सुरुवात केलीत. कोणी तुम्हाला सांगायला आले होते का ? पण तुम्ही डूख धरलाय , स्कोअर सेटलिंग करताय हे कळतंय सर्व्वांन्नच ! आणि ह्यावेळेस तर पुढे जाऊन कहर केलात ते म्हणजे नावाचे विद्र्पीकरण - मार कश काय , मार्कस वॉटेवर काय =)))) अरे काय बालवाडीत आहात का तुम्ही की सीनीयर केजी , काय ए हे =)))) # जिनके घर शीशे के होते है वो दुसरों के घरोंपर पत्थर नही फेका करते, उनम्त्त मेष डीपशीट =)))) तुम्हाला कितीही समजाऊन सांगितले तरी - "हां , बरोबर आहे तुमचं , माझं थोडसं चुकलेच ." हे शब्द काही तुमच्या तोंडी येत नाहीत हा आजवरचा अनुभव आहे. त्या मुळे ह्या प्रतिसादवर तुमचा काय रीप्लाय येणार आहे हे देखील आम्ही जाणतो, सर्व मिपाकर जाणतात =)))) पण तुम्ही असलात की मजा येते मिपावर !!! लिहित रहा . ... आयडी उडे पर्यंत =))))) इत्यलम __________________________________
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत गुरुवार, 08/31/2023 - 16:28 नवीन
हे तुमचे खरे नाव आहे ? नाही ना ? मग त्याचे काहीही वर्जन केले तरी तुम्ही का चिडता ? माझे खरे नाव हाच माझा आयडी आहे ! तुम्हाला कितीही काहीही सांगा तुमच्या बुद्धीला पटणारच नाही मी संक्षी नाही ! त्यासाठी कमाल ऑब्सर्वेशन आणि किमान बुद्धीमता लागते, जी पोपटपंची करून येत नाही !
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत गुरुवार, 08/31/2023 - 17:38 नवीन
आणि ज्ञानेश्वरीला ओवी तज्ञ कशाला म्हणू मी? ते मी तुम्हाला म्हणालो.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/31/2023 - 19:37 नवीन
मी काही तुम्हाला कोणतीही ओवी ऐका , श्लोक ऐका असे सांगायला आलो नव्हतो पहिल्यांदा. बाकी हे असं नावाचे मार कश वॉटेवर वगैरे विद्रुपीकरण करणे , किंवा ओवीतज्ञ वगैरे नावे ठेवणे फारच बालीश आहे असं नाही का वाटत तुम्हाला ? तुम्ही स्पष्टपणे एकदा मान्यच करा ना की - होय , मार्कस , मी केवळ तुमच्या प्रतिसादावर स्कोअर सेटलिंग करायला आलोय =))))
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत गुरुवार, 08/31/2023 - 21:31 नवीन
आय डोंट हेट यु , तुम्ही जे लिहिले त्यावरच कमेंट केली.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Mon, 08/28/2023 - 21:33 नवीन
नंबर ६ बद्द्ल जे मी लिहिले काय मत आहे ? नसेल तर एक रिप्लाय देत नाही परत या धाग्यावर. तुम्हाला उत्तरे नको आहेत ! फक्त प्रश्न हवेत.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 08/29/2023 - 00:57 नवीन
@उन्मेष दिक्षितः क्षमा करा, हळू हळू येतो आहे एकेका प्रतिसादाकडे. माझ्या काही मर्यादांमुळे असे आहे. मला सर्वच मिपाकर आदरणीय आणि प्रिय आहेत. क्वचित प्रसंगी एकमेकांची मते पटत नसली, तरी हल्ली प्रत्यक्ष ओळखीची, नात्यातली माणसे दुरावलेली वाटू लागलेली असण्याच्या काळात मिपाकरांशी चर्चा हा केवढा मोठा मानसिक आधार आहे. -- खरेतर मला हा लेख प्रत्यक्ष लिहीण्यापूर्वी फक्त हा एकच प्रश्न (क्र. ६) विचारायचा होता. हा प्रश्न मला शाळकरी वयापासून पडलेला होता आणि मला स्पष्टपणे वाटत होते की कृष्णाने सुदर्शानचक्राने त्यांचा वध आधीच करून टाकायला हवा होता. तसे न करण्याचे मला तरी काही कारण दिसत नव्हते. इथे विविध विषयांचे उत्तम जाणकार, विचारी मिपाकर अनेक असल्याने मला ठाऊक नसलेले किंवा माझ्या कल्पनेपलिकडले जे काही उत्तर वा उत्तरे असतील, ती मिळावीत आणि फार वर्षापासून कुतूहल असलेल्या कोड्याचे उत्तर मिळावे म्हणून हा लेख लिहायला घेतल्यावर आणखीही प्रश्न सुचत गेले, आणि तेही लिहीले. -- इथे एक गोष्ट मान्य केली पाहिजे की श्रीकृष्ण हा 'दैवी चमत्कार' (उदा. द्रौपदी वस्त्रहरणाप्रसंगी वस्त्रपुरवठा इ.) लीलया करू शकणारा एक 'देव' वा 'महामानव' असून त्याच्याकडे चित्रात दाखवतात तसले 'सुदर्शनचक्र' नामक काहीएक दिव्य किंवा बूमरँगसारखे प्रभावी अस्त्र सदोदित असायचे, या गृहितकावरच हा प्रश्न उपस्थित होतो. तसे काही नसून तो (विलक्षण बुद्धिमत्ता, चातुर्य, विवेक असलेला का होईना, पण-) एक मर्त्य मानवच होता - सुदर्शनचक्र, विष्णुचा अवतार वगैरे गोष्टी काल्पनीक आहेत, असे म्हटले तर या प्रश्नात काही अर्थ उरत नाही - म्हणजे कुणालाही रजनीकांत वा अमूक तमूक हिरोसारखे प्रत्यक्षात काही करता येणे शक्य नसते, तेच कृष्णाच्या बाबतीत असणार. आता तुमच्या प्रतिसादाकडे वळतो:
ही डिड नॉट वाँट वॉर, तो शांती दूत म्हणून शेवटचा प्रयत्न करायला गेला होता आणि तसेच द्युतावेळच्या भीम आणि अर्जुन यांच्या "महादेव की सौगंध" मुळे त्याला तसे कराताही येत नव्हते ! शिवाय त्याने विराटरुप दाखवले कारण युद्ध होणार आणि पुढे काय होणार हे त्याला माहीत होते.
यापैकी "महादेव की सौगंध" म्हणजे काय हे मला समजले नाही (कृपया खुलासा करावा) तसेच "युद्ध होणार आणि पुढे काय होणार हे त्याला माहीत होते" म्हणून 'विराटरूप दाखवले' म्हणजे नेमके काय केले असावे, हेही मला सांगता येत नसले, तरी तुम्ही तसे लिहीले असल्याने कृपया त्याचाही खुलासा करावा. ('विश्वरूप दर्शन' या घटनेचे आकलन हल्लीच्या व्यावहारिक (सायंटिफिक म्हणा हवे तर) दृष्टीकोणातून कसे करता येईल ?)
ही डिड नॉट वाँट वॉर, तो शांती दूत म्हणून शेवटचा प्रयत्न करायला गेला होता
-- हे पटण्यासारखे असले, तरी इथे काही प्रतिसादात श्रीकृणाला युद्ध झालेले हवेच होते, ते त्यानेच घडवून आणले होते अशी मते मांडलेली आहेत, तीही मननीय वाटतात. गीता, महाभारत, गीताई वगैरेत 'विश्वरूप दर्शन' बद्दल काय सांगितले आहे ते बघून नंतर लिहीन. (आज इतनाही.)
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Tue, 08/29/2023 - 07:52 नवीन
पाहीले नाही का तुम्ही ? "महादेव की सौगंध" हे गमतीने लिहीले होते कारण जर तुम्ही महाभारत पाहीले तर प्रत्येक जण प्रतिज्ञा घेताना अशीच घ्यायचा ! द्युतावेळी भीम आणि अर्जुनाने प्रतिज्ञा घेतल्या होत्या, त्यामुळे त्याला आधीच तसे करता येत नव्हते. शिवाय श्रीकृष्णाला युद्धात भाग घ्यायचाच नव्हता , त्याला शस्त्र उचलायचे नव्हते. >> "युद्ध होणार आणि पुढे काय होणार हे त्याला माहीत होते" म्हणून 'विराटरूप दाखवले' म्हणजे नेमके काय केले असा ... जेव्हा दुर्योधन त्याला पकडायला गेला, तेव्हा त्याने विराटरुप दाखवले. श्रीकृष्णाला कळले की आता युद्ध अटळ आहे, आणि पुढे काय होणार आहे ते, त्याला काही करायची गरजच नव्हती. याच्यासाठी हा एपिसोड बघावा - https://www.youtube.com/watch?v=YJGT_tyE5ZQ&t=178s >> श्रीकृणाला युद्ध झालेले हवेच होते, ते त्यानेच घडवून आणले होते कशावरून हा निष्कर्श काढलेला आहे ? >> 'विश्वरूप दर्शन' या घटनेचे आकलन हल्लीच्या व्यावहारिक (सायंटिफिक म्हणा हवे तर) दृष्टीकोणातून कसे करता येईल ? मग द्रौपदी वस्त्रहरणाच्यावेळी साडी एपिसोड चे व्यवहारीक आकलन कसे करता येईल ? धन्यवाद !
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 08/29/2023 - 10:41 नवीन
महाभारत पाहीले नाही का तुम्ही ?
नाही. रामायण (१९८७-८८) आणि महाभारत (१९८८-९०) या काळात बहुतेक घरात टीव्ही नसावा. किंवा असला तरी त्यात स्वारस्थ्य नव्हते. त्याकाळी दिल्लीतल्या दाट वस्तीत रहायचो, आणि या धारावाहिकांचे वेळी सगळ्या सडका अगदी निर्मनुष्य होत असल्याने आम्ही मुलांना घेऊन मस्त फिरायला निघायचो. या सिरीयली अजूनही बघितलेल्या नाहीत, मात्र महाभारतावरील जेवढी मिळाली तेवढी सगळी पुस्तके वाचलेली आहेत. मिपावर काही वर्षांपूर्वी महाभारतासंबंधी काही लिखाणही केलेले आहे, त्यापैकी सगळ्यात आधी (माझ्या लेखनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात) 'चित्रगुप्त' या भूमिकेतून केलेले एक विनोदी लेखन : थेट चित्रगुप्ताच्या मूळ नोंद वहीतून: द्रौपदीची पाचजणात वाटणी का आणि कशी झाली याची हकीगत आणि श्रीकृष्णाचा धावा नंतरच्या काळात लिहीलेल्या आठ लेखांचे दुवे खालील लेखात दिलेले आहेतः अजब महाभारत श्रीकृणाला युद्ध झालेले हवेच होते, ते त्यानेच घडवून आणले होते.... कशावरून हा निष्कर्श काढलेला आहे ? -- असा निष्कर्श मी काढलेला नसून फक्त "इथे काही प्रतिसादात श्रीकृणाला युद्ध झालेले हवेच होते, ते त्यानेच घडवून आणले होते अशी मते मांडलेली आहेत, तीही मननीय वाटतात." असे लिहीलेले आहे. (अगदी पहिला, सौंदाळा यांचा प्रतिसाद बघावा)
मग द्रौपदी वस्त्रहरणाच्यावेळी साडी एपिसोड चे व्यवहारीक आकलन कसे करता येईल ?
याचे उत्तर माझ्या खालील विधानात आहे: ----"इथे एक गोष्ट मान्य केली पाहिजे की श्रीकृष्ण हा 'दैवी चमत्कार' (उदा. द्रौपदी वस्त्रहरणाप्रसंगी वस्त्रपुरवठा इ.) लीलया करू शकणारा एक 'देव' वा 'महामानव' असून त्याच्याकडे चित्रात दाखवतात तसले 'सुदर्शनचक्र' नामक काहीएक दिव्य किंवा बूमरँगसारखे प्रभावी अस्त्र सदोदित असायचे, या गृहितकावरच हा प्रश्न उपस्थित होतो. तसे काही नसून तो (विलक्षण बुद्धिमत्ता, चातुर्य, विवेक असलेला का होईना, पण-) एक मर्त्य मानवच होता - सुदर्शनचक्र, विष्णुचा अवतार वगैरे गोष्टी काल्पनीक आहेत, असे म्हटले तर या प्रश्नात काही अर्थ उरत नाही - म्हणजे कुणालाही रजनीकांत वा अमूक तमूक हिरोसारखे प्रत्यक्षात काही करता येणे शक्य नसते, तेच कृष्णाच्या बाबतीत असणार." --- थोडक्यात म्हणजे अनेकांप्रमाणे मलाही द्रौपदीस वस्त्रपुरवठा, विश्वरूपदर्शन वगैरे महाभारतातले अनेक चमत्कार कपोलकल्पित वाटतात. याच विषयावर पूर्वी एक पुस्तकही वाचलेले आहे त्याचा मतितार्थ असा होता की माहाभारतात जे जे 'चमत्कार' म्हणून प्रसंग वर्णित केलेले आहेत, ते सगळे काही ना काही (अप्रिय, लज्जास्पद, थोरांच्या कीर्तीला काळिमा लावणारे वगैरे..) सत्य/वस्तुस्थिती लपवण्यासाठी रचलेल्या कथा आहेत. मलाही असेच वाटते.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Tue, 08/29/2023 - 11:16 नवीन
मलाही असेच वाटते आहे आता !
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 08/29/2023 - 12:18 नवीन
महाभारताला केवळ एक महाकाव्य म्हणून जरी धरलं तरी, त्याकाळचे संदर्भ, त्यावेळच्या मान्यता आणि समाजमत हे लक्षात घेऊन मग या महाकाव्याकडे बघीतलं पाहिजे. आज जे आपण अमान्य करतो ते कदाचित त्याकाळी समाजमान्य असू शकेल.. त्यामुळे आज एखादी गोष्ट चूक धरली तरी तेव्हा ती बरोबर असू शकते. बाकी वाचतोय.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 08/29/2023 - 13:39 नवीन
आज जे आपण अमान्य करतो ते कदाचित त्याकाळी समाजमान्य असू शकेल
-- अगदी खरे . आणि हे सर्वच काळांविषयी लागू होते. आज अगदी लक्तरे लोंबणारे कपडे फॅशन म्हणून घालून स्त्रिया खुशाल हिंडतात, तशी पंधरा-वीस वर्षांपूर्वी कुणी कल्पनाही केली नसती (असे कपडे मी तरी स्त्रियांनीच घातलेले बघितेले आहे, म्हणून तसे लिहीले आहे पुरुषही घालत असल्यास 'लोक' असे वाचावे)
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Tue, 08/29/2023 - 16:37 नवीन
महाभारत किंवा रामायण मालिका पाहून मत बनवणे चुकीचे आहे. महाभारताच्या शेकडो( अक्षरशः) प्रती आज मितीस उपलब्ध आहेत आणि अनेक जण आपल्या आपल्या परीने त्यात भर टाकत आहे. त्यात बौध्द, जैन रामायण महाभारत असे सुद्धा विविध प्रकार आहे. (मी वाचलेल्या एका जैन महाभारतात गीता नाही, त्याऐवजी एक जैन साधु कृष्ण आणि पांडवांना उपदेश देतो आणि युद्ध न होतात पांडव संन्यास स्विकारुन हिमालयात जातात. ) भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळाने खुप मेहनत घेऊन, विविध स्रोतांचा आढावा घेऊन, प्रक्षिप्त श्लोक आणि संदर्भ यांचे ससंदर्भ विलगीकरण करुन चिकित्स्क आवृत्ती तयार केली आहे. ती बरीचशी मुळ महाभारताच्या आसपास आहे असे त्यांचे म्हणणे आहे आणि अनेक जण ते मान्य करतात. (अर्थात अनेक ते अमान्य सुद्धा करतात) अधिक माहिती : https://bori.ac.in/department/mahabharata/ बाकी, मुळातून वाचलेले आणि आजच्या काळातले विचार, संदर्भ बाजुला ठेवून केलेले तटस्थ वाचन वेगळा आनंद देते. आणि काही जणांना आपल्या पुर्वजांबद्द्ल आदर वाढल्याचा आनंद सुद्धा देते. (काहींना हे लाभत नाही, त्यांचे नशीव) बाकी चर्चा उत्तम चालू आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 08/29/2023 - 17:48 नवीन
तुमचा प्रतिसाद, विशेषतः. -- "मी वाचलेल्या एका जैन महाभारतात गीता नाही, त्याऐवजी एक जैन साधु कृष्ण आणि पांडवांना उपदेश देतो आणि युद्ध न होतात पांडव संन्यास स्विकारुन हिमालयात जातात."-- हे भारीच रोचक आहे. सदर पुस्तक जालावर वाचता येईल का? -- सध्या आपण ज्याला 'भारत'देश म्हणतो, त्यापलीकडील दूरदूरच्या प्रदेशांमधेही महाभारतविषयक/हिंदू देवीदेवतांच्या मूर्ती, भित्तिचित्रे, मंदिरे आणि अन्य पुरावशेष सापडतात त्यावरून कधिकाळी भारतीय संस्कृती केवढ्या विराट भूभागावर नांदत होती, हे समजते. तुम्ही दिलेला भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा दुवा उघडून बघता सगळे इंग्रजीत लिहीलेले आहे. मराठीतही आहे का ? आणि त्यांची 'महाभारताची संशोधित आवृत्ती' (मराठी) कुठे उपलब्ध आहे ? (जालावर किंवा पुस्तक विकत घेण्यासाठी)
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Wed, 08/30/2023 - 09:59 नवीन
जालावर उपलब्ध असलेले जैन महाभारत (लेखक प्रकाशचंद्र जैन ) https://www.jainfoundation.in/JAINLIBRARY/books/sankshipta_jain_mahabharat_023325_hr6.pdf इथे उपलब्ध आहे. या नुसार युद्ध झाल्यानंतर पांडव नेमिनाथाला शरण गेले व त्यानंतर वैराग्य वगैरे. मी वर उल्लेखलेले युद्धाच्या आधीच वैराग्य असे महाभारत मी तीस एक वर्षांपूर्वी एका जैन स्थानकातील मुनीशी चर्चा करतांना त्याने त्याच्याकडील प्रत मला दाखवली होती. तिचा संदर्भ (लेखक. प्रकाशक इत्यादी) मला आता गवसत नाहीत. पण कुठल्यातरी डायरीत मी नोंद केलेले आहे. शोधून कळवतो. भांडारकरांची मराठी आवृत्ती बहुधा नसावी. खुप थोर काम आहे ते आणि ते मराठीत आणण्याइतके संयमी आणि परखड व्यक्तिमत्व हल्ली निपजत नाहीत.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 08/30/2023 - 11:06 नवीन
@ अहिरावणः तुम्ही दिलेला दुवा उघडून जैन महाभारत थोडेसे वाचले. ते खूपच रोचक आणि वेगळे दिसते आहे. (देवकीला अनेक पुत्र झाले होते, त्यांचा सांभाळही यशोदेने केला होता वगैरे बरीच वेगळी माहिती दिसते आहे) सावकाशीने वाचून त्याबद्दल लिहीन. किंबहुना तुम्हाला शक्य झाल्यास जैन महाभारतावर एक स्वतंत्र लेख लिहून त्यातील वेगळेपण वगैरे स्पष्ट केल्यास अतिउत्तम होईल. नेमिनाथ हे महाभारतकालीन होते असे दिसते. युद्धाच्या आधीच वैराग्यवाल्या पुस्तकाविषयीपण उत्सुकता आहे. अनेक आभार.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Wed, 08/30/2023 - 11:32 नवीन
>>>ते खूपच रोचक आणि वेगळे दिसते आहे. अहो जैन महाभारतच काय, हिंदूंचे मानलेल्या महाभारतातील विविध प्रांतांमधील विविध प्रतींमधे विविध विचारधारा मिळतात. त्यांचा समग्र अभ्यास करणे आणि वेगळेपण शोधणे हे मज पामराकडून कसे होणार? >>नेमिनाथ हे महाभारतकालीन होते असे दिसते. प्रत्येक पंथ, संप्रदाय आपले प्रवर्तक आणि पुर्वसुरी, समाजाच्या जडणघडणीत मोलाची भर टाकणार्या प्रत्येक कालखंडात आहेत, होते असे मानतो.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 08/30/2023 - 10:28 नवीन
भांडारकर आवृत्ती संस्कृतात आहे आणि मला वाटते तिचे बहुधा इंग्रजीत भाषांतर केले गेले आहे. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरात मूळचे जगडव्याळ ग्रंथ पाहिले आहेत. मराठी भाषांतर मात्र उपलब्ध नाही. महाभारताची आजची मराठी भाषांतरे बहुतांशी शारदीय आणि कुंभकोणम प्रतींवर आधारित आहेत आणि अर्थासाठी बरेचदा नीलकंठी टीकेचा आधार घेतला जातो.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 08/30/2023 - 11:21 नवीन
@प्रचेतसः व्यासकृत महाभारतात जैन तिर्थंकरांचे उल्लेख आहेत का ? नसल्यास त्याचे कारण काय असावे ?
महाभारताची आजची मराठी भाषांतरे बहुतांशी शारदीय आणि कुंभकोणम प्रतींवर आधारित आहेत आणि अर्थासाठी बरेचदा नीलकंठी टीकेचा आधार घेतला जातो.
-- कुंभकोणम प्रत, नीलकंठी टीका वगैरे संदर्भ तुम्ही लीलया सांगून जाता याचे लईच कौतुक वाटते. हे शब्द फारा दिवसांनी वाचायला मिळाल्याने बहुत समाधान वाटते आहे. तरूणपणात मोठमोठे जुने ग्रंथ (एकसमयावच्छेदेकरून, जेणेकरून, पराकाष्ठेचा विस्मय, लंडी, तथापि, चर्येवरील हावभाव, लज्जेने गाल आरक्त होणे, वगैरे शब्द असलेले) वाचायचो त्याची आठवण होऊन नोस्त्याल्जिक का काय म्हणतात तसे झाले. अनेक आभार.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 08/30/2023 - 12:06 नवीन
प्रचेतसः व्यासकृत महाभारतात जैन तिर्थंकरांचे उल्लेख आहेत का ? नसल्यास त्याचे कारण काय असावे ?
येथे व्यासकृत महाभारत असे म्हणणे थोडे चुकीचे ठरेल, मुळात खुद्द महाभारताचीच रचना अशी आहे की ऋषीमुनी बसलेल्या बैठकीत सौती सर्वांना महाभारत कथा ऐकवतो जी जनमेजयाच्या सर्पसत्रातून सुरू होते, आणि जनमेजयाला त्याच्या पूर्वजांची व्यासांनी रचलेली कहाणी वैशंपायन सांगतात. त्यामुळे व्यासांनी रचलेला जय ग्रंथ ज्याचे सुमारे २५००० श्लोक आहेत त्यात वैशंपायन आणि सौतीचे मिळून एक लक्षांचे महाभारत बनते, व्यासप्रणित जय ग्रंथाचा काळ इसवी सन पूर्व ३२५० (भारती युद्ध) सर्वसाधारणपणे मानला जातो तर महाभारताचा काळ हा साधारण इसवीसनपूर्व २५० वर्षे हा असावा कारण ग्रीक प्रवासी डायनक्रॅस्टोसोम ह्याच्या एका शिलालेखात भरतखंडात एक लक्ष श्लोकांचे इलियड प्रचलित आहे याचा अगदी सुस्पष्ट उल्लेख आहे. एक लक्ष श्लोकी इलियड म्हणजे इकडलील महाभारतच हे अगदी उघड आहे कारण इतका मोठा ग्रंथ दुसरा कुठला झालाच नाही. याचाच अर्थ म्हणजे मूळच्या व्यासप्रणित श्लोकांत बौद्ध, जैन मतांचा उल्लेख अजिबात नाही, काही ठिकाणी बौद्ध मतांचा निर्देश आणि खंडन आले आहे पण ते नंतरचे मानता यावे कारण गौतम बुद्ध आणि महावीर यांचा काळ साधारणपणे इसवी पू ४५० इतका जवळपास सिद्ध आहे. महाभारतात बौद्धमताचे खंडन जरी आले असले तरी जैन मतांचा निर्देश जवळपास नाही, मात्र एका ठिकाणी जैनांचा उल्लेख क्षपणक असा आलेला आढळतो. महाभारतात हे उल्लेख अगदी कमी असल्याचे कारण म्हणजे मूळची व्यासप्रणित कथा अत्यंत प्राचीन असणे. शिवाय जैन महाभारतही त्यांच्यात प्रचलित असलेल्या महाभारत कथेवरूनही हेच सिद्ध करते की मूळचे व्यासांचे भारत अगदी प्राचीन आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 08/30/2023 - 12:27 नवीन
व्यासप्रणित जय ग्रंथाचा काळ इसवी सन पूर्व ३२५० (भारती युद्ध) सर्वसाधारणपणे मानला जातो तर महाभारताचा काळ हा साधारण इसवीसनपूर्व २५० वर्षे हा असावा
गौतम बुद्ध आणि महावीर यांचा काळ साधारणपणे इसवी पू ४५० इतका जवळपास सिद्ध आहे.
हे लिहीताना नजरचुकीने काही घोळ झालेला आहे किंवा कसे ? म्हणजे 'महाभारत युद्ध घडण्याचा काळ' आणि 'महाभारत ग्रंथ लिहीण्याचा काळ' वगैरेतले अंतर वगैरे ? नीटसे समजले नाही. १. महाभारत युद्ध घडण्याचा काळ २. महाभारत ग्रंथ लिहीण्याचा काळ - व्यास, सौती, वैशंपायन ( याच क्रमाने आहेत का?) ३. जैन तीर्थंकरांचा काळ (आदिनाथ ते नेमिनाथ या मध्यात खूप काळ असावा) ४. जैन महाभारत, जैन पांडवपुराण इ. ग्रंथ लेखनाचा काळ.. -- हे जरा स्पष्ट केल्यास बरे होईल.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 08/30/2023 - 12:53 नवीन
नाही, घोळ नाही, सांगायचा उद्देश म्हणजे जो इतिहास घडला म्हणजे भारतीय युद्ध (महाभारतात जरी अतिशयोक्ती आहे असे मानले तरी भारती युद्ध ही घटना मी सत्य मानतो) साधारणपणे ३२५० ख्रिस्तपूर्व मानावे लागते, हा काळ अर्थातच निर्विवाद नाही, काही संशोधक ख्रिस्तपूर्व ९०० मानतात. प्राचीनतेचा काळ सर्वसाधारणपणे काढणे म्हणजेच ज्या ग्रंथांचा काळ निर्विवादपणे सिद्ध झालेला आहे त्या ग्रंथात जर उपरोक्त घटनांचा उल्लेख असला तर तो उपरोक्त ग्रंथ अधिक प्राचीन होय. उदा बादरायण सूत्र, पातंजल योगसुत्रे ह्यांचा काळ निर्विवादपणे सिद्ध आहे, ह्या सूत्रांत महाभारताचा उल्लेख आहे मात्र महाभारतात ह्यां सूत्रांचा अजिबात उल्लेख नाही यावरून निश्चयाने महाभारत ह्या सूत्रांपेक्षा प्राचीन असे म्हणता यावे. गौतम बुद्ध आणि महावीर यांचा काळ आणि महाभारत रचना (म्हणजे सौतीकडून पडत गेलेली भर) ह्याचा काळ काहीसा समान येतो. मात्र वैशंपायन, सौती ह्यांनी घातलेली भर म्हणजे कुणी एकाच व्यक्तीने घातलेली असे नसून त्यांनी निर्माण केलेल्या शिष्यपरंपरेने घातलेली भर असे समजावे. सुलभीकरणासाठी ती फक्त व्यक्तिनामे आहेत वास्तविक ही भर हजार दीड हजार वर्षे पडतच होती. भार्गवी संस्करण हे देखील एक प्रमुख अंग आहे. भृगुकुल आणि क्षत्रियांचे वैराकडे हे संस्करण निर्देश करते, जिथे जिथे परशुरामाचे उल्लेख आहेत ते सर्व भार्गवी संस्करण समजावे, सौतीने मात्र सर्व मतांना एकत्रित केले उदा शिवाने केलेली विष्णुस्तुती किंवा कृष्णाने केलेली शिवस्तुती, अर्जुनाने युद्धारंभी केलेले दुर्गास्तवन. जैन तीर्थंकरांबाबत म्हणायचे तर शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर होते, त्यांनी जैन परंपरा सुरू केली असे मानले जाते, मात्र त्याआधीचे २३ तीर्थंकर प्रत्यक्षात होते की नाही ते सांगू शकत नाही, शिवाय जैन महाभारत, जैन पांडवपुराण ह्यांचा काळ कोणता तेही सांगता येणार नाही, त्याबाबतीत माझा बिलकुल अभ्यास नाही.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 08/29/2023 - 18:19 नवीन
आयुष्यभर ज्या गोष्टींची उत्तरे मिळाली नाही किंवा मिळविण्याचा प्रयत्न केला नाही त्या गोष्टींचा धांडोळा "नेत्र लागले सखया पैलतिरी" काळात घेऊन काय फायदा ? खरं तर या वयात आपण प्रश्नांच्या पलिकडे पाहायला शिकले तर जास्त बरे ! जो श्रीकृष्ण अधिकारवाणीने "सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज" म्हणतो त्याच्या अस्तित्त्वावर / बुद्धीमत्तेवर शंका घेऊन काय फायदा ? त्यापेक्षा त्याचा मोठेपणा मान्य केला तर झाला तर फायदाच होईल. पंगा घेऊन फायदा नाही. टीप :वरील विवेचन मला स्वतःलाच उद्देशून आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 08/30/2023 - 12:10 नवीन
जो श्रीकृष्ण अधिकारवाणीने "सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज" म्हणतो त्याच्या अस्तित्त्वावर / बुद्धीमत्तेवर शंका घेऊन काय फायदा ?
-- श्रीकृष्णाच्या थोरवीबद्दल, अस्तित्वाबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका अजिबात नाही (पंगा घेण्याचा तर प्रश्नच नाही) उलट अतिशय आदर आणि कमालीचा जिव्हाळाच आहे. त्याच्यासारखी अन्य व्यक्ती जगात कुणीही नाही याची मला खात्री आहे. मी उपस्थित करत असलेले प्रश्न 'पुराणे' म्हणजे प्राचीन साहित्याविषयीच्या जिज्ञासेतून जन्मलेले आहेत. आत्ताच जैन साहित्यातही 'पांडव पुराण' असल्याचे समजले, त्याविषयीही उत्सुकता आहे.
आयुष्यभर ज्या गोष्टींची उत्तरे मिळाली नाही किंवा मिळविण्याचा प्रयत्न केला नाही त्या गोष्टींचा धांडोळा "नेत्र लागले सखया पैलतिरी" काळात घेऊन काय फायदा ?
उलट आता सत्तरीतच आपली ऊर्जा, उत्साह, सृजनशीलता, आरोग्य वगैरे जपण्यासाठी, एकटेपण घालवण्यासाठी, अशा गोष्टींमधे चित्त रमवणे, 'कुतूहल' जागृत ठेवणे हे शक्य आणि आवश्यक आहे. यातून खूप आनंद, समाधान लाभते आहे. जालावर का होईना, नवनवीन जाणकार लोकांशी ओळखी होत आहेत, हा काय कमी फायदा आहे ?
खरं तर या वयात आपण प्रश्नांच्या पलिकडे पाहायला शिकले तर जास्त बरे !
-- हा एक मोठाच विषय आहे, त्यावर चर्चा होण्यासारखी आहे. जमल्यास त्यावर तुम्ही एक धागा काढा. रोचक विचार मंथन होईल. 'या वयात' सुद्धा "प्रौढत्वी निज शैशवास जपणे " हा 'बाणा' ठेवणे आल्हाददायक, आरोग्यदायक असतो. तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ।
टीप :वरील विवेचन मला स्वतःलाच उद्देशून आहे.
-- असे जरी असले तरी ते सर्वच 'पैलतिरी नेत्र' लागलेल्यांसाठी मननीय आहे. अनेक आभार.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 08/29/2023 - 18:36 नवीन
याला एक उत्तर म्हणजे शक्तीचा निचरा व्हावा म्हणुन. शक्ती निर्माण, शक्ती संचय आणि शक्तीपतन हि प्रक्रीया सतत सुरु असते. काहि कारणाने शक्ती निर्माण आणि संचयाचा वेग हा शक्ती उधळणीपेक्षा जास्त असेल तर योग्य परिस्थीती येताच शक्ती विस्फोट रुपाने dissipate होते. जगात सतत युद्धे होत असताना २० व्या शतकात दोन महायुद्धे का झाली ? कारण तेच. श्रीकृष्णाने हा शक्ती स्फोट त्यातल्यात्यात एका निर्धारीत रितीने व्हावा म्हणुन प्रयत्न केले. शक्ती dissipation नंतर आकाराला येणारी राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था कशी असावी याबद्दल श्रीकृष्णाने काहि आराखडे बांधले, व येन केन प्रकारेण हे शक्ती dissipation एका निर्णायक अवस्थेला जाईल यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. १. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ? -- पांडवांना, त्यातल्या त्यात युधीष्ठीराला राज्य मिळाले. भीमार्जुनाला सूड उगवल्याचं आणि द्रौपदीच्या डोळ्याला डोळा भिडवून जगण्याचं समाधान मिळालं. नकुल-सहदेव तसेही आपल्या जेष्ठ भावंडांच्या समाधानात आपलं समाधान शोधत असत. २. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ? -- कालप्रवाहाचा विचार करता हा प्रश्न गौण आहे. धर्म, सत्य वगैरे मूल्यांची भरती ओहोटी सतत होत असते. ३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ? ४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता? -- श्रीकृष्णाला हा अंदाज नक्कीच होता. त्याने पांडवांच्या राज्याचा आधार घेऊन एक राजकीय व्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न सातत्याने केले. कधी पांडवांच्या गफलतीमुळे तर कधी कौरवांच्या पांडवांप्रती असलेल्या दुष्टपणामुळे हि व्यवस्था आकाराला येऊ शकली नाहि. निर्णायक युद्ध टळत नाहि म्हटल्यावर श्रीकृष्ण पांडवांना विजयी करण्याच्या एकमेव उद्देशाने रणांगणात उतरला. पांडवांकडे officially इंद्रप्रस्थाचं सैन्य नव्हतं. त्यांना द्रुपद आणि मित्रराजांच्या सैन्याचा आधार होता. कौरव तसे well established राजे होते. दोन्ही parties ना आपापली बाजु जास्तीत जास्त बळकट करायची होती. हा इकडे आला म्हणुन तो तिकडे गेला असं करत करत संपूर्ण आर्यावर्त युद्धभूमीवर हजर झाला. ५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ? -- भीमाला ते चाललं असतं, कारण त्याला दुर्योधन-दु:शासनाचा संहार हवा होता. पण दुर्योधनाला असं personal द्वंद्व नको होतं. त्याच्या दृष्टीने ही लढाई वैयक्तीक स्वरुपाची कमी आणि राजकीय स्वरुपाची जास्त होती. किंबहुना पांडवांना त्रास द्यायला दुर्योधनाचं सर्वात हुकमी हत्यार म्हणजे त्याचं राजकीय वजन. ६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ? -- for that matter त्यांचा शिरच्छेद करण्याची आवष्यकता देखील नव्हती. कुठलासा शाप देणे, बेशुद्ध करणे, हतबल करणे, द्रोणांनी युधीष्ठीराला युद्धबंदी करण्याचा प्रयत्न केला तसं काहि दुर्योधनाच्या बाबतीत करणे.. असे अनेक पर्याय होते दुर्योधनाला neutralize करायला. कर्णाला पांडवांच्या बाजुने वळवायचा प्रयत्न करणे हा त्याच प्रयत्नाचा भाग होता. श्रीकृष्णाला दुर्योधन नामक व्यक्तीला संपवायचे नव्हते, तर तत्कालीन राजकारणाच्या निती-नियमांना पायदळी तुडविणारी एक राजकीय महत्वाकांक्षा संपवायची होती. ति देखील दुर्योधनाच्या official शत्रुच्या हस्ते. जर पांडव, आणि त्यातल्या त्यात अर्जुन, मारला गेला असता तर मात्र श्रीकृष्णाने मित्राच्या वधाचा प्रतिशोध घ्यायच्या भुमीकेतुन सुदर्शन चक्र फेकलं असतं. ७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ? -- कल्पना नाहि. पण युधीष्ठीराला विधवा बहुल राज्य मिळालं असा उल्लेख आहे. युद्धापूर्वी अर्जुनाने ज्या अनेक शंका उपस्थीत केल्या होत्या, जसे वर्णसंकर होणे, कुळाचार damage होणे वगैरे प्रकार झालेच असतील. युधीष्ठीराने एक राजा म्हणुन हि दाहकता शांत करायला काय प्रयत्न केले व त्याचे काय परिणाम झाले याची कल्पना नाहि. एक आश्चर्य मात्र वाटतं... भागवत कथेची पार्श्वभूमी वाचताना असं जाणवतं कि पांडवांच्या वंशजांना या सगळ्या घडामोडींचा detailed अभ्यास नव्हता. असं का व्हावं ? हे युद्ध आणि त्यामागची कारणं, सगळंच भयंकर होतं.. एका राजवंशाचा १०० वर्षांंचा इतीहास या युद्धाला कारणीभूत होता. व्यासांनी युधीष्ठीराच्या काळातच जय कथा रचली होती. मग परिक्षीत आणि जनमेजय यांना आपल्या आजोबा-पणजोबांच्या काळातल्या गोष्टी अगदी प्रकर्शाने माहित असायला हव्या होत्या. त्या त्यांना माहित असतीलही.. भागवत पुराण श्रीकृष्णाचं ईशत्व, विभूतीमत्व explain करायला रचलं गेलं. हे बहुदा पांडव-वंशीयांना नव्याने उमगलं असेल.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 08/30/2023 - 14:51 नवीन
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 'शक्तीचा निचरा' ची उदाहरणे जगभराच्या इतिहासात विपुल सापडतील. एका अर्थी इतिहासातली सगळी युद्धे 'जास्त शक्ती'वाल्यांनी त्यांच्या मते 'कमी शक्ती' वाल्यांवर लादली असेही म्हणता येईल. फ्रेंच राज्यक्रांतीत शेकडो वर्षांच्या Burbon घराण्याच्या राजशक्तीविरुद्ध सर्वसाथारण प्रजेची शक्ती हळूहळू वाढत जाऊन तिचा स्फोट झाला. बळवंतराव (लोकमान्य टिळक) म्हणायचेच की राजकारण हा 'शक्तीचा खेळ' आहे. (असे गंगाधर गाडगिळांच्या 'दुर्दम्य' मधे वाचले होते, ख.खो.दे.जा.)
श्रीकृष्णाने हा शक्ती स्फोट त्यातल्यात्यात एका निर्धारीत रितीने व्हावा म्हणुन प्रयत्न केले. शक्ती dissipation नंतर आकाराला येणारी राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था कशी असावी याबद्दल श्रीकृष्णाने काहि आराखडे बांधले, व येन केन प्रकारेण हे शक्ती dissipation एका निर्णायक अवस्थेला जाईल यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले.
-- हा विचार मननीय आहे. बाकी तुम्ही दिलेली सगळ्या प्रश्नांची उत्तरे पण उचित वाटली. शतशः आभार.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Wed, 08/30/2023 - 16:17 नवीन
अरांनी दिलेले पहिलेच स्टेटमेंट चूक आहे ! >> शक्ती निर्माण, शक्ती संचय आणि शक्तीपतन हि प्रक्रीया सतत सुरु असते Law of conservation of Energy काय सांगतो ? - energy is neither created nor destroyed. When people use energy, it doesn't disappear. Energy changes from one form of energy into another form of energy. मागे अश्याच काहीतरी अद्भूत थिअर्या त्यांनी इंजीन, इन्पुट वगैरे शब्द वापरून मांडलेल्या आहेत. यावेळी, शक्ती.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 08/30/2023 - 18:47 नवीन
भौतिक शक्ती आणि चित्तशक्ती वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माणसे तीच असली, तरी ती जेंव्हा एकाद्या कल्पनेने, भावनेने, विचाराने, उद्दिष्टाने भारून जातात तेंव्हा त्यांची शक्ती कैकपटीने वाढून, एकत्रित (फोकस) होऊन ती अचाट कर्मे करायला सक्षम होतात. (छत्रपतींनी मावळ्यांना हाताशी धरून बलाढ्य साम्राज्याला जेरीस आणणे, मिशेलँजेलोचे सिस्टीन चॅपेलचे चित्र, अशी शेकडो उदाहरणे मिळतील) -- याउलटही घडते. अतिशय सक्षम व्यक्ती हताश, वैफल्यग्रस्त झाल्यास अगदी साध्या गोष्टीही करण्यास असमर्थ होत असते. -- अर्थात याबद्दल माझा अभ्यास नसल्याने या विषयाला मी इथेच विराम देतो आहे. Will to power हा नित्शेचा ग्रंथ आणूनसुद्धा वाचायचा राहून गेला. आता वाचणे होणार नाही. Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 08/30/2023 - 19:04 नवीन
विज्ञान ज्याला energy म्हणतं आणि मानवी व्यवहारात/राजकारणात आपण ज्याला power म्हणतो, त्यांचे संदर्भ वेगवेगळे आहेत हे त्यांना कळत नाहि असं नाहि. पण आपल्या व्यतिरीक्त इतर कोणाचाही विचार मननीय असु शकतो हि कल्पनाच त्यांना करवत नाहि. जुनी खोड आहे ति...
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Wed, 08/30/2023 - 20:59 नवीन
मागच्यावेळी Silence आणि Peace घोळ यावेळी Energy आणि Power एव्हढाच फरक
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 08/30/2023 - 23:17 नवीन
तुम्हाला तुमचा घोळ लक्शात आला हे महत्वाचं.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत गुरुवार, 08/31/2023 - 08:40 नवीन
शक्तीपतन शक्तीसंचय असले अघाध शब्द लिहून , सत्तेला [ power ] पर्यायी शब्द शक्ती [ energy ] असा अर्धवटासारखा वापरून आणि त्यावर स्पष्टीकरण देण्याचा घोळ फक्त तुम्ही करु शकता !
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 08/31/2023 - 13:31 नवीन
शक्ती, सामर्थ्य, बळ वगैरे शब्दप्रयोग करणं हा मराठी भाषेचा घोळ आहे. निर्बुद्ध आत्ममग्नता नाहि ना तिच्याकडे... तिला क्षमा करा.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत गुरुवार, 08/31/2023 - 16:19 नवीन
मराठी भाषेत इतके शब्द असताना, तुम्ही चुकीचे शब्द चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वापरताय याला मराठी भाषा काय करणार ? मराठीने तुम्हाला क्षमा करायला हवी. आणखी एक, तुम्ही ज्या अर्थाने शक्तीप्रयोग केलेत, त्या अर्थाचा शब्द आहे Power [ सत्ता ] Superpower म्हणजे महासत्ता, महाशक्ती नव्हे ! डन ऑन धीस !
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 08/31/2023 - 16:59 नवीन
Narcissistic कंड शमवायला उगाच इतरांना चुकीचे ठरवणे हि तुमची नित्याची खोड. हि असली फालतुगिरी अपेक्षीत होतीच तुमच्याकडुन.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Wed, 08/30/2023 - 20:55 नवीन
द टायटल शुड बी The Power Gives Will To Power Nietzsche ला थोडे कळले नसावे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 08/30/2023 - 21:12 नवीन
द टायटल शुड बी: The Power Gives Will To Power--Nietzsche ला थोडे कळले नसावे.
-- तुमचे हे मत नित्शेचा मशारनिल्हे ग्रंथ समग्र अभ्यासिल्यावर झालेले आहे किंवा कसे, मज निरोपावे. -- अभ्यासिला असल्यास ग्रंथाचा थोडक्यात गोषवारा इथे सादर केल्यास 'बहुत जनांसि आधारु' होईल असे आम्हास वाटते. इति.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Wed, 08/30/2023 - 21:16 नवीन
टायटल अभ्यासून सांगतोय !
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 08/30/2023 - 21:46 नवीन
पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ॥ २२॥ अभिमानें उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार । पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥ २३॥ ऐसा अंतरी नासला । कामक्रोधें खवळला । अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ २४॥ कामक्रोधें लिथाडिला । तो कैसा म्हणावा भला । अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ २५॥ आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें । परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ २६॥ --- श्रीदासबोध दशक पहिला.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Wed, 08/30/2023 - 22:07 नवीन
गिव्स विल टू पॉवर ? नित्शे ?
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Wed, 08/30/2023 - 11:52 नवीन
उत्तंक कथा भाग महाभारतात आला आहे. त्यात श्रीकृष्णांच्या शिष्टाईत काय घडले? यावर उत्तंक आणि श्रीकृष्ण संवादातून महाभारतकार काय म्हणतात ते खालील लिंक उघडून पाहता येईल. ब्लॉग १ https://oakmangala.blogspot.com/2018/02/blog-post.html?m=0
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Wed, 08/30/2023 - 15:57 नवीन
अभिनंदन. नाडीविरहीत* प्रतिसाद दिल्याबद्द्ल ओक प्रशंसेस पात्र आहेत. * ह्या नाडीचा आणि पायजम्याच्या नाडीचा संबंध नाही.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 08/30/2023 - 13:59 नवीन
मी इतिहास संशोधक / तज्ञ / अभ्यासू नाही. सदर प्रतिसाद हा केवळ माझ्या तर्काधारे लिहिलेला आहे; पूर्णतः चूकही असू शकतो. --- एखाद्या प्रदेशातील कालगणनेची सुरुवात कोणत्यातरी ऐतिहासिकरित्या महत्त्वाच्या घटनेपासून होते. उदाहरणार्थ दोन हजार वर्षांपूर्वी ख्रिस्ती कालगणना सुरू झाली. तिचे २०२३वे वर्ष सध्या सुरू आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन राजा सातकर्णी याने शालिवाहन शक ही कालगणना सुरू केली. साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवराज्याभिषेकानंतर शिवशके सुरू झाले. त्याचप्रमाणे पाच हजार वर्षांपूर्वी युधिष्ठिर शके सुरू झाले. तिचे ५१२५ वे वर्ष सध्या सुरू आहे. (संदर्भ: राजंदेकर यांचे महाराष्ट्रीय पंचांग) निष्कर्ष: पाच हजार वर्षांपूर्वी युधिष्ठिरांचा राज्याभिषेक झाला. तो महाभारताचा काळ होता.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 11 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 25 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 27 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 31 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा