Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध

ह
हेमंतकुमार
Fri, 04/02/2021 - 06:40
🗣 230 प्रतिसाद
ok या विषयाचे आधीचे संदर्भ : १. हात, जंतू, पाणी आणि साबण २. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज ३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य ४. कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण ........................ पूरक विषय : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन ....... 31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे. या लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी निरोपाद्वारे अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची जागा बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो. ही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे : १. लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध २. औषधोपचार आणि ३. सामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय. गेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूंमध्ये इंजेक्शन द्वारा घ्यायच्या आहेत : १. कोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात अन्य वाहकविषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे. २. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे. दोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोसनंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे. अमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत. अमेरिकेत फायझर व भारतात कोवाक्सिनच्या संदर्भात २ डोस घेऊन झाल्यानंतर तिसरा डोसच्या आवश्यकतेबाबतचे शास्त्रीय प्रयोग सुरु झालेत. कुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :

१. लस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते. २. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.

अर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. या संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील. पुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील. लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा: “लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट). यासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा २५ टक्‍क्‍यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही. लसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते. करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी ५ हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे. सद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या उत्पादकांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात. शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, याचा उहापोह चालू आहे. इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एखाद्या व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे: १. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत. २. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत. लसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी : १. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने Bamlanivimab and Etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली. सौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो. 2. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील. ३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते. ४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्‍यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये कोविड संबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी. महासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल. .... तर असा आहे हा गेल्या २ महिन्यातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे. …………………………………………………

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 113841 views

🗣 चर्चा (230)
च
चौकस२१२ Fri, 11/12/2021 - 00:26 नवीन
अंधश्रद्धेचं इतकं प्राणघातक उदाहरण दुसरं काही आहे का? या आपलया प्रतिकाराला उत्तर एखाद्या वैद्यानेच दयावे ( कुमार, खरे ) ( पण मग असा व्यक्तीला तुम्ही "पांढऱ्या कपड्यातल्या आलोपाठी मेडिसिनल चर्चच्या कार्डीनल" असे बिरुद लावाल ! हे जे पालुपद आहे ना तुमचे "कि प्रश्नच विचाऱ्याला बंदी का?"... खूप झाला कांगावा एक सर्वसामान्यांचं विचारातून एवढे लोकांना समजते त्यासाठी कार्डीनल" चा फतवा लागत नाही भाऊ लस म्हणजे काय आणि ती कशी आणि कितीप उपयुक्त असू शकते यावर वर्षानुवर्षे जगभर अभ्यास झालं आहे त्याकडे दुर्लक्ष कार्याचा का ! एक साधा प्रश्न आहे अहो संपूर्ण जगातील विविध दावे आणि उजवे सगळी सरकारे या "थोतांडाला " गंडली असा तुमचा दावा आहे का? या कोविड चा दूरपुपयोग अनेकनै केला . सरकार, खाजगी उद्योग आणि व्यक्ती " आणि त्या बद्दल प्रश्न विचारायचे काहीच गैर नाही पण ते विचारताना काहीतरी तारतम्य ? हे सर्व थोतांड आहे हीच जर ठाम वृत्ती असले तर खरच "घोड्यास पाण्यापर्यंत नेता येतं. पाणी मात्र त्याचं त्यानेच प्यायचं असतं." एक काम करा भाऊ तुम्ही राहत असलेलया देशात / गावात ज्यांचे बालक किंवा पालक हे यामुळे मृत्यू पडले आहेत त्यांना जाऊन विचारा कि थोतांड आहे का हे !
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 11/12/2021 - 07:36 नवीन
कुठलंसं द्रव्य टोचल्याने तिला ती ताकद येणारे म्हणे. घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, गोवर, देवी, कांजिण्या, हिपॅटायटिस बी यांच्या लशी सुद्धा थोतांड आहेत म्हणा कि! एवढाच कशाला सर्प विष प्रतिबंधक द्रव्य सुद्धा त्याच श्रेणीत येतंय. मग काय नाग मण्यार घोणस चावल्यावर निंबाच्या पाल्यावर निजवायचं आणि अंबाबाईचा गोंधळ घालायचाय का ?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 11/12/2021 - 10:18 नवीन
सुबोध खरे,
घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, गोवर, देवी, कांजिण्या, हिपॅटायटिस बी यांच्या लशी सुद्धा थोतांड आहेत म्हणा कि!
या लशींविषयी इथे माझा एक लेख आहे : https://www.misalpav.com/node/48431 अर्थात, लेख जरी माझा असला तरी तो एका पुस्तकावर आधारित आहे. ते पुस्तक डॉक्टर सुझन हम्फ्रीज व रोमन बिस्त्रीयांक या द्वयींनी लिहिलेलं आहे. डॉक्टर सुझन हम्फ्रीज या अमेरिकेतल्या खऱ्याखुऱ्या म्हणजे मेडिकल डॉक्टर असून पेशाने मूत्रपिंडतत्ज्ञा आहेत. त्यांनी लशींकरणाविषयी प्रचंड शोधाशोध करून माहिती मिळवून २०१३ साली एक पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव : Dissolving Illusions - Disease, Vaccines, and The Forgotten History (2013) by Suzanne Humphries MD. हे पुस्तक येथे उपलब्ध आहे : https://drive.google.com/file/d/1ZAR7v0i5t62JOUqmPlWR2v90ntpJfXRD/view?usp=sharing या निमित्ताने तुम्हांस व डॉक्टर कुमार१ यांना विनंती करू इच्छितो. तुम्ही व/वा कुमार१ यांनी ते वाचून त्याची चिरफाड करावी. ही विनंती मी तुम्हांस यापूर्वीही केली आहे. त्यानिमित्ताने लशींचे धोके व परिणामकारकता यांविषयी बऱ्याच कल्पना स्पष्ट होतील. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/12/2021 - 16:50 नवीन
लशींचे धोके व परिणामकारकता यांविषयी बऱ्याच कल्पना स्पष्ट होतील.
तटस्थपणे चर्चा व्हायला पाहिजे. आता तसंही जवळ जवळ आपण सर्वच मिपाकरांनी लस घेतलीय. आता आपल्याकडे परतीचे कोणतेही ऑप्शन शिल्लक नाहीत. संदर्भ, नवी माहिती त्याबद्दल अभ्यासपूर्ण चर्चा, व्हायला काही हरकत नाही असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 11/18/2021 - 10:37 नवीन
चौकस२१२, १.
लस म्हणजे काय आणि ती कशी आणि कितीप उपयुक्त असू शकते यावर वर्षानुवर्षे जगभर अभ्यास झालं आहे त्याकडे दुर्लक्ष कार्याचा का !
कोण करतोय दुर्लक्ष ? उलट मी म्हणतोय की असा अभ्यास झालाय. तो डॉक्टर एलिझाबेथ हम्फ्री यांच्या पुस्तकात सविस्तर वर्णिलेला आहे. पण पुस्तक उघडून वाचणार कोण, इतकाच प्रश्न आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो : आजवर कुठल्याही लशीने कसलीही साथ आटोक्यात आलेली नाहीये. २.
एक साधा प्रश्न आहे अहो संपूर्ण जगातील विविध दावे आणि उजवे सगळी सरकारे या "थोतांडाला " गंडली असा तुमचा दावा आहे का?
हो. फक्त त्यास 'थोतांडाला गंडणे' म्हणंत नाहीत. त्यास 'जनोच्छेदक धोरण' म्हणजे genocidal policy असं म्हणतात. हा प्रकार सुमारे १०० वर्षांपूर्वीही घडला होता. मुद्दामून केलेल्या विपरीत उपचारांमुळे स्पॅनिश फ्लू ची साथ १९१८ च्या सुमारास आली होती. हे विधान १९४८ साली हेन्रीख म्युलर ( Heinrich Mueller) या गेस्टापो प्रमुखाने दिलेली कबुली आहे. संदर्भ (इंग्रजी दुवा) : http://themillenniumreport.com/2018/01/spanish-flu-a-genocide-carried-out-by-way-of-an-influenza-pandemic/ लेख वाचायचा असेल तर वाचा अन्यथा आपण आपल्या मर्जीचे मालक. फक्त एक प्रश्न उरतोच : तुम्हाला जिवंत राहायचं आहे की सरकारला? ३.
हे जे पालुपद आहे ना तुमचे "कि प्रश्नच विचाऱ्याला बंदी का?"... खूप झाला कांगावा
कांगावा? हे काय असतं? एक गंमत सांगतो. आंथनी फौचीने उघड कबुली दिलीये की पूर्वी दिलेल्या कोविड लशीची परिणामकारकता कमी होतेय. त्यामुळे लसधारकांची प्रतिकारक्षमता उणावतेय. हा घ्या इंग्रजी दुवा : https://www.nytimes.com/2021/11/12/podcasts/the-daily/anthony-fauci-vaccine-mandates-booster-shots.html?showTranscript=1 वरील लेखात waning immunity किती वेळा आलाय ते शोधा. तर मग लस घ्यायचीच कशाला? आपल्या प्रतिकारशक्तीचा ऱ्हास करवून घेण्यासाठी का? आता, यावर तुम्ही फौचीला काय प्रश्न विचाराल ? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 11/28/2021 - 12:10 नवीन
दक्षिण आफ्रिकेतून उगम पावलेला नवा प्रकार ओमायक्रोन त्याबद्दल विविध बातम्या येऊ लागल्या आहेत. तूर्तास त्याच्यावर अभ्यास चालू आहे आणि खात्रीशीर वैज्ञानिक काहीच जाहीर झालेले नाही. या उपप्रकारामुळे काय परिणाम होतील याचा अभ्यास तीन आघाड्यांवर चालू आहे : १. त्याची प्रसारक्षमता २. आजार अथवा लसीमुळे मिळालेल्या प्रतिकारशक्तीवर तो मात करू शकतो का ? ३. त्याच्यामुळे होणाऱ्या संभाव्य आजाराची तीव्रता जशी अधिकृत माहिती मिळेल तशी या मुद्द्यांमध्ये भर घालेन. तूर्तास अधिकृत सूत्रानुसार या प्रकारामुळे निर्माण झालेल्या नव्या केसेसचा खात्रीशीर आकडा असा आहे : जगभरात एकूण 113 (दक्षिण आफ्रिका 99 बोटस्वना 6 इंग्लंड व HK प्रत्येकी २ इतर 4)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 12/31/2021 - 17:46 नवीन
दोन लस घेउन झाल्यावरचे माझे अनुभव... मला कोव्हिड काळात [ लाट दुसरी ] कोव्हिड होउन गेल्यावर आलेले अनुभव [ कोव्हिड झाल्यावर अनुभवास आले होते तसेच ] म्हणजे गंध न समजणे, चव न समजणे [ हे हल्लीच परत झाले होते.] तसेच मला पुष्कळ सर्दी होऊ लागली आहे. मी काहीही गार पदार्थ,पाणी न घेता देखील मला सर्दी होते, या आधी असे कधीही झालेले नाही. माझ्या अंदाजाने कोव्हिड विषाणू काही काही काळाने शरीरावर परिणाम करत असावा आणि दुसर्‍या लाटेतुन शरीर मजबुत झाल्याने तसेच लसीचे डोस घेतल्याने घातक परिणाम व्हायरसला करता येत नसावा. मला २ वेळा भयानक सर्दी झाल्यावर मी ivermectin च्या गोळ्या घेतल्या आणि माझी सर्दी वेगाने कमी झाल्याचा अनुभव आहे. जाता जाता :- गेल्या काही दिवसांपासुन चीन मध्ये परत कोव्हिड [ ओमायक्रॉन नव्हे ] पसरत असल्याच्या बातम्या आणि व्हिडियो येत आहे. लॉक डाऊन लागण्याच्या आधी चीन मध्ये जी परिस्थिती होती [ २०२०] आणि त्यावेळी मी जसे व्हिडियो पाहिले आणि फॉरवर्ड केले होते जवळपास [ पूर्णपणे नाही. ] तसेच व्हिडियो आता चीन मधली परिस्थिती दर्शवतात. [ याच बरोबर चीन ने मोठ्या प्रमाणात अन्न-धान्य साठवण्यास काही काळा पासुन सुरुवात केली असुन, चीन कशाची तरी मोठ्या प्रमाणात सज्जता करत आहे याची ग्वाही त्यांची ही कृती करत आहे.] का कुणास ठावुक पण साधारण नविन वर्षातील फेब्रुवारी अखेरीस पासुन/मार्च च्या सुरवातीला आपल्या इथे परत प्रसार होईल अशी भिती वाटत आहे, ही भिती निराधार ठरावी हीच इच्छा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ना मशवरा ना राय चाहिए, ठंड बढ गई... एक ग्लास चाय चाहिए |
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 01/01/2022 - 02:42 नवीन
*भिती निराधार ठरावी हीच इच्छा. >> सहमत उत्तम आरोग्य शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 02/21/2022 - 15:08 नवीन
“लोकल प्रवासासाठी लस सक्तीचा माजी मुख्य सचिवांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नव्हता” ; मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी "आता सध्या नियंत्रणात आलेली करोना परिस्थिती पाहता, मुंबई उच्च न्यायालयाने आज काही टिप्पणी केली. ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की आता लोकल ट्रेन्स, मॉल या ठिकाणी जे दोन्ही लसीकरण झालेल्यांनाच केवळ प्रवेश दिला जात होता, तो निर्णय आता मागे घ्यायला हवा. आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. त्यामुळे केवळ आडमुठेपणा करून राज्याचं नाव जे करोना काळात देशात नावाजलं गेलं होतं, ते नाव आता तुम्ही खराब करू नका."
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 03/14/2022 - 11:04 नवीन
जगातील अनेक देशांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट होत आहे. कोरोना महासाथीचा अंत झाला आहे, हे समजण्यासाठी नेमके कोणते निकष, संकेत असावेत याबाबत जागतिक आरोग्य संघटनेत चर्चा सुरू आहे. कोरोना महासाथ संपुष्टात आल्याची घोषणा इतक्यात तरी होणार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. https://www.google.com/amp/s/marathi.abplive.com/news/world/coronavirus-updates-who-may-be-declare-corona-epidemic-end-in-world-discuss-with-experts-1041186/amp
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 03/14/2022 - 11:04 नवीन
जगातील अनेक देशांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट होत आहे. कोरोना महासाथीचा अंत झाला आहे, हे समजण्यासाठी नेमके कोणते निकष, संकेत असावेत याबाबत जागतिक आरोग्य संघटनेत चर्चा सुरू आहे. कोरोना महासाथ संपुष्टात आल्याची घोषणा इतक्यात तरी होणार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. https://www.google.com/amp/s/marathi.abplive.com/news/world/coronavirus-updates-who-may-be-declare-corona-epidemic-end-in-world-discuss-with-experts-1041186/amp
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 03/20/2022 - 09:51 नवीन
सध्याच्या युरोपीय युद्धामुळे युक्रेनचे सुमारे 30 लक्ष निर्वासित अन्य युरोपीय देशांमध्ये जमा झालेले आहेत. त्यापैकी सुमारे निम्मी मुले आहेत. या निर्वासितांच्या अन्य प्रश्नांच्या जोडीने आरोग्य समस्याही हाताळाव्या लागताहेत. त्यादृष्टीने युरोपीय समुदायाने या मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम हाती घ्यायचे ठरवले आहे. त्यामध्ये कोविडच्या जोडीनेच क्षयरोग, पोलिओ आणि गोवराच्या लसींचा समावेश आहे. युक्रेनमध्ये पूर्वीसुद्धा या सर्व लसी देण्याचे प्रमाण निर्धारित मानकापेक्षा कमीच होते.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 04/26/2022 - 07:15 नवीन
दिल्ली, तामिळनाडू, हरियाणा आणि कर्नाटक या राज्य सरकारांनी सार्वजनिक ठिकाणी आणि प्रवासात पुन्हा एकदा मुखपट्टी वापराची सक्ती केलेली आहे.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Tue, 04/26/2022 - 08:53 नवीन
कोविड सुसंगत व्यवहार याची डोळसपणे चिकित्सा कुणी करणार आहे की नाही असा प्रश्न पडतो. उदाहरणंच घेऊ या. निर्जंतुकीकरण सक्ती: या मध्ये ठराविक वेळेनंतर मुक्त हस्ताने द्रव फवारले जाते. हे चिकट द्रव अजूनच धूळ आणि सूक्ष्म जीव धरून ठेऊन इतर आरोग्याच्या समस्या निर्माण करत असतील. ऑफिस फर्निचर साबणाच्या पाण्याने पुसून नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाकता येणार नाही का? लिफ्ट, हॉटेल मधील टेबल, आणि ऑफिस फर्निचर या प्रकारे जास्त स्वच्छ ठेवता येईल. विक्रेता आणि ग्राहक यामध्ये मोठ्या पोलिथिलिनच्या शिटचा पडदा: याने कोंदटपणा वाढून उलट रोग पसरण्यास मदत होईल ना? वातानुकूलन कमी अथवा बंद करने: याने हवेतील ऊच्छवासामुळे निर्माण होणारी आर्द्रता वाढून रोग तीव्रतेने पसरू शकतो. मुखपट्टीची सक्ती: या सक्तीमुळे बाहेर टाकलेली हवाच परत मोठ्या प्रमाणावर शरीरात जाऊन प्राणवायूची कमतरता निर्माण होऊ शकते. मुखपट्टीच बऱ्याचवेळा इतकी मळकी असते की विचारू नका. दोन वर्षानंतर कोविड सुसंगत मार्गदर्शक तत्त्वांची चिकित्सा झाल्यास बरे या हेतूने हा प्रतिसाद देत आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 04/26/2022 - 09:04 नवीन
१. निर्जंतुकीकरण सक्ती >>> रसायनांचे उठसूट फवारे अनावश्यक. त्यातून एलर्जीच्या समस्या वाढतात. माझ्या घरी असे कुठलेही रसायन नाही. गेली तीन वर्षे फक्त साबण वापरून हात धुतले आहेत. २. पोलिथिलिनच्या शिटचा पडदा: काही फायदा होतो असे वाटत नाही ३. वातानुकूलन >>> मुळातच यापेक्षा खिडक्या उघड्या व पंखा किंवा कुलर बरे असे माझे मत आणि माझी व्यक्तिगत पसंती. ४. मुखपट्टीची सक्ती >>>या विषयावर मी या लेखमालेत यापूर्वीच्या भागांमध्ये सविस्तर लिहिले असल्याने आता पुनरावृत्ती करत नाही.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 12/31/2022 - 06:41 नवीन
बरोबर तीन वर्षांपूर्वी (31/ 12/ 2019) covid-19 या आजाराचे जागतिक पातळीवर नामकरण झाले. आज अखेरीस चीन वगळता अन्य बर्‍याच देशांमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. पुन्हा एकदा थोडीफार प्रवास बंधने, चाचण्या इत्यादी गोष्टी लागू झाल्यात. 2023 च्या उत्तरार्धापर्यंत तरी ही महासाथ पूर्णपणे संपावी अशी सदिच्छा व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 01/13/2023 - 11:52 नवीन
१. सध्या जगभरात असलेल्या या आजारात Omicron (XBB.1.5) हा प्रकार सर्वाधिक आढळतो. त्याची संसर्गक्षमता आतापर्यंतच्या सर्व प्रकारांपेक्षा अधिक आहे. २. मात्र त्याने बाधित रुग्णांमध्ये चव आणि वास याच्यावर सहसा परिणाम होत नाही. ३. या प्रकारामुळे अमेरिकेत एकदम रुग्णवाढ झालेली दिसते ४. लांब पडल्याच्या विमान प्रवासांमध्ये प्रवाशांनी मुखपट्टी वापरावीच असा जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला ५. 27 जानेवारीला संघटनेची महत्त्वाची बैठक. त्यात कोविड-19 ‘आणीबाणी’च्या समाप्तीची घोषणा करायची की नाही, यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाईल.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 01/31/2023 - 06:26 नवीन
वर उल्लेख केलेल्या डब्ल्यूएचओच्या बैठकीचा सविस्तर वृत्तांत इथे आहे Covid-19 ची महासाथ संध्या संक्रमण अवस्थेत आहे. अजूनही आरोग्य आणीबाणीची परिस्थिती चालू ठेवावी असे त्यात म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Wed, 02/01/2023 - 11:48 नवीन
कोविड्ची फेज उलटुन गेल्यानंतर अनेकांना सांधे दुखीचा त्रास जाणवत आहे असे ऐकीवात आहे . या त्रासाला avascular narcosis असे म्हणले जाते . यामुळे गुडघेदुखी किंवा मानेचे दुखणे अनेकांना झाले आहे .
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 02/01/2023 - 15:33 नवीन
avascular narcosis
सर्वप्रथम हा शब्द सुधारून घेतो: Avascular necrosis (necrosis =पेशींचा मृत्यू) खरे आहे की अशा प्रकारचे काही रुग्ण आढळलेले आहेत. १. प्रामुख्याने हा त्रास अशा रुग्णांना झाला आहे की ज्यांना स्टिरॉइड्स अधिक प्रमाणात आणि अधिक काळ द्यावी लागली होती. अधिकतर हा त्रास मांडीच्या हाडाच्या खुब्यातील भागाला होतो. २. काही रुग्णांच्या बाबतीत ती न देताही समस्या उद्भवलेली आहे. अर्थात यावर अधिक संशोधन झाल्यावरच चित्र स्पष्ट होईल.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 02/08/2023 - 12:01 नवीन
माणसांना होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी सुमारे 60 टक्के आजार विविध प्राण्यांकडून सूक्ष्मजंतू संक्रमित झाल्याने होतात ( बहुतांश जंगली प्राण्यांकडून). सध्याच्या महासाथीच्या मुळाशी चीनमधील वटवाघळे (Horseshoe bats) असल्याचे म्हटले जाते. यापुढची महासाथ उद्भवण्याची शक्यता कधी आहे, हा यक्षप्रश्न वैज्ञानिकांना सतावतो आहे. त्या दृष्टिकोनातून वटवाघळांच्या विशिष्ट प्रजातींचा (fruit bats) एक महत्वाकांक्षी अभ्यास हाती घेण्यात आलेला आहे. निसर्गतःच वटवाघळे स्वतःमध्ये विविध विषाणूंचा साठा उत्तम रीतीने करतात. त्या विषाणूंपासून त्यांना आजार होत नाही. मात्र त्यांच्या शरीरातून ते विषाणू माणसात संक्रमित झाल्यास आपल्याला विविध गंभीर आजार होतात. अशा प्रकारचे संक्रमण होण्यास खालील गोष्टी कारणीभूत असाव्यात: १. टोकाचे हवामान बदल २. जंगलतोड आणि तिथे चाललेला एकंदरीत मानवी हस्तक्षेप. अशा हस्तक्षेपामुळे वटवाघळांचे अन्नशोधासाठी मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. प्रस्तुत संशोधन प्रकल्पात जमैकातील वटवाघळे अमेरिकेत आणली जाणार आहेत. त्यांना विविध प्रकारचे खाद्य दिले जाईल तसेच काही प्रकारचे विषाणू त्यांच्या शरीरात सोडले जातील. त्यानंतर त्यांचा सखोल शारीरिक अभ्यास केला जाईल. या सगळ्यातून आपल्याला साथरोगांच्या प्रतिबंधासाठी काय करता येईल याचा अंदाज येईल.. या प्रकल्पात सात देशांमधील सत्तर वैज्ञानिक सहभागी होत आहेत. १. २.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 02/08/2023 - 12:01 नवीन
माणसांना होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी सुमारे 60 टक्के आजार विविध प्राण्यांकडून सूक्ष्मजंतू संक्रमित झाल्याने होतात ( बहुतांश जंगली प्राण्यांकडून). सध्याच्या महासाथीच्या मुळाशी चीनमधील वटवाघळे (Horseshoe bats) असल्याचे म्हटले जाते. यापुढची महासाथ उद्भवण्याची शक्यता कधी आहे, हा यक्षप्रश्न वैज्ञानिकांना सतावतो आहे. त्या दृष्टिकोनातून वटवाघळांच्या विशिष्ट प्रजातींचा (fruit bats) एक महत्वाकांक्षी अभ्यास हाती घेण्यात आलेला आहे. निसर्गतःच वटवाघळे स्वतःमध्ये विविध विषाणूंचा साठा उत्तम रीतीने करतात. त्या विषाणूंपासून त्यांना आजार होत नाही. मात्र त्यांच्या शरीरातून ते विषाणू माणसात संक्रमित झाल्यास आपल्याला विविध गंभीर आजार होतात. अशा प्रकारचे संक्रमण होण्यास खालील गोष्टी कारणीभूत असाव्यात: १. टोकाचे हवामान बदल २. जंगलतोड आणि तिथे चाललेला एकंदरीत मानवी हस्तक्षेप. अशा हस्तक्षेपामुळे वटवाघळांचे अन्नशोधासाठी मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. प्रस्तुत संशोधन प्रकल्पात जमैकातील वटवाघळे अमेरिकेत आणली जाणार आहेत. त्यांना विविध प्रकारचे खाद्य दिले जाईल तसेच काही प्रकारचे विषाणू त्यांच्या शरीरात सोडले जातील. त्यानंतर त्यांचा सखोल शारीरिक अभ्यास केला जाईल. या सगळ्यातून आपल्याला साथरोगांच्या प्रतिबंधासाठी काय करता येईल याचा अंदाज येईल.. या प्रकल्पात सात देशांमधील सत्तर वैज्ञानिक सहभागी होत आहेत. १. २.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 03/14/2023 - 04:35 नवीन
11 मार्च 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने covid-19 या आजाराची आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. त्याला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली. काल अखेरीस ढोबळमानाने परिस्थिती अशी आहे : एकूण संसर्ग झालेल्या व्यक्ती : 68 कोटी आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्ती : 65 कोटी कोविड संबंधित मृत्यू : 68 लाख
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 04/07/2023 - 05:29 नवीन
कोविडमुळे बाधितांच्या वास घेण्याच्या क्षमतेवर दीर्घकालीन परिणाम झाल्यास आढळले आहे. या संदर्भात पुण्यातील IISER या संस्थेतील डॉ. निक्सन अब्राहम यांच्या नेतृत्वाखालील चमू आणि बी. जे. मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त सहकार्याने एक महत्त्वाचा संशोधन प्रकल्प पार पडला. लक्षणविरहित असणाऱ्या बाधित 80 टक्के लोकांमध्ये वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम झालेला आढळला. या संशोधनादरम्यान वरील चमूने वासक्षमता मोजण्याचे olfactometer हे उपकरण देखील विकसित केले.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 05/06/2023 - 02:32 नवीन
कोविड- आरोग्य आणीबाणी आता संपली आहे. WHO ची घोषणा अर्थात अजून काही काळ लोक बाधित होत राहतील; योग्य ती काळजी आवश्यक.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 09/25/2023 - 16:40 नवीन
गेल्या 24 तासात बहुतेक इ-वृत्तमाध्यमातून खालील प्रकारचा मथळा झळकतो आहे :
“'डिजीज X' आहे तरी काय? जगावर घोंगावतोय महामारीचा धोका; WHO नं जारी केलाय अलर्ट”
हे वाचून विचलित व्हायचे किंवा दडपून जायचे काही कारण नाही. सन 2018 मध्येच जागतिक आरोग्य संघटनेने, ‘भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या विषाणूजन्य साथींसाठी’ “डिसीज एक्स” (माहित नसलेले) हे नामकरण करून ठेवलेले आहे. हे संबोधन कुठल्याही विशिष्ट एका आजारासाठी नसून संभाव्य आजारांच्या गटासाठी आहे. जसजसे नवे विषाणू सापडत जातील ते सर्व या एक्स पंथातील घटक राहतील. किंबहुना कोविड-19 घडविणारा विषाणू या पंथातील पहिला घटक होता.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 01/31/2024 - 05:48 नवीन
30 जानेवारी 2020 रोजी भारतातील खात्रीशीर निदान झालेला पहिला कोविड19 रुग्ण आढळला होता. गेल्या तीन वर्षात कोविडबाधितांची सेवा करताना अनेक डॉक्टर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कर्तव्य बजावताना (आणि रुग्णांनाही) मृत्यू आला होता. त्याप्रित्यर्थ भारतात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विविध शाखांतर्फे 30 जानेवारी हा कोविड हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. अभिवादन !
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 01/31/2024 - 06:08 नवीन
अभिवादन. सर्व डॉक्टर, सेवा कर्मचारी, सफाई कामगार, गरजेच्या सेवा देणारे इतर सर्व... सर्वांनाच अभिवादन !
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 01/31/2024 - 09:02 नवीन
सर्व डोक्टर्स व कर्मचार्यांना श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 03/07/2024 - 08:20 नवीन
जर्मनीतील एका 62 वर्षीय माणसाने कोविड लस एकूण 217 वेळा घेतल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यापैकी 130 वेळा घेतल्याचा कायदेशीर पुरावा आहे. वैज्ञानिकांनी या माणसावर काही चाचण्या करून त्याच्या प्रतिकारक्षमतेचा सखोल अभ्यास केला. त्यातून असे दिसले, की त्याच्या मूलभूत प्रतिकारशक्तीवर कोणताही परिणाम (चांगला अथवा वाईट) झालेला नाही. हे एक अजब प्रकरण आहे खरे !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा