Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध

ह
हेमंतकुमार
Fri, 04/02/2021 - 06:40
🗣 230 प्रतिसाद
ok या विषयाचे आधीचे संदर्भ : १. हात, जंतू, पाणी आणि साबण २. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज ३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य ४. कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण ........................ पूरक विषय : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन ....... 31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे. या लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी निरोपाद्वारे अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची जागा बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो. ही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे : १. लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध २. औषधोपचार आणि ३. सामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय. गेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूंमध्ये इंजेक्शन द्वारा घ्यायच्या आहेत : १. कोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात अन्य वाहकविषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे. २. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे. दोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोसनंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे. अमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत. अमेरिकेत फायझर व भारतात कोवाक्सिनच्या संदर्भात २ डोस घेऊन झाल्यानंतर तिसरा डोसच्या आवश्यकतेबाबतचे शास्त्रीय प्रयोग सुरु झालेत. कुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :

१. लस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते. २. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.

अर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. या संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील. पुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील. लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा: “लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट). यासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा २५ टक्‍क्‍यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही. लसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते. करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी ५ हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे. सद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या उत्पादकांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात. शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, याचा उहापोह चालू आहे. इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एखाद्या व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे: १. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत. २. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत. लसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी : १. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने Bamlanivimab and Etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली. सौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो. 2. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील. ३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते. ४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्‍यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये कोविड संबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी. महासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल. .... तर असा आहे हा गेल्या २ महिन्यातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे. …………………………………………………

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 113841 views

🗣 चर्चा (230)
ह
हेमंतकुमार Sat, 05/08/2021 - 15:49 नवीन
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आजच दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते. मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे. https://www.thehindu.com/news/national/dcgi-approves-anti-covid-drug-developed-by-drdo-for-emergency-use/article34513900.ece
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 05/10/2021 - 11:58 नवीन
रोचक आणि अभिनंदनीय, या बद्दल अधिक माहिती वाचण्यास आवडेल. आणि एक बाळबोध प्रश्न मार्केट मध्ये जे ग्लुकॉन डी च्या नावाने ग्लुकोज मिळते (बहुधा वेगळे असावे चुकभूल देणे घेणे) त्यात आणि यात नेमके काय साम्य आणि भेद आहेत ?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 05/10/2021 - 13:20 नवीन
मागा, चांगला प्रश्न. कोणीतरी विचारेल असे वाटलेच होते ! ठीक आहे. या औषधाचे पूर्ण नाव लिहू : २- deoxy-ग्लुकोज. आपल्या नेहमीच्या ग्लुकोजमध्ये ऑक्सिजनचे सहा अणू असतात. त्यातील एक कमी केला की झाला २-deoxy-ग्लुकोज तयार. हे पावडर स्वरूपातच आहे त्यामुळे पाण्यात विरघळून तोंडाने घ्यायचे आहे हा एक मोठा फायदा आता. हे पेशीं मध्ये गेल्यावर काय होते ते पाहू. प्रत्येक पेशीला आपल्या शरीरातील ग्लुकोजची उर्जानिर्मिती आणि पर्यायाने जगण्यासाठी गरज असते. वरील औषध जेव्हा आपण रुग्णास देऊ तेव्हा ते फक्त विषाणूबाधित पेशींमध्येच पोहोचेल. त्या पेशीमध्ये या औषधापासून ऊर्जानिर्मिती होऊ शकत नाही आणि नेहमीच्या ऊर्जानिर्मितीत ते खोडा घालते. पर्यायाने त्या पेशींचा नाश होईल व त्याच बरोबर त्यांच्यातील विषाणूचा देखील.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 05/10/2021 - 13:41 नवीन
धन्यवाद, अतिशय महत्वाची माहिती तुम्ही देत आहात. परंतु ह्या औषधाची उपलब्धता सध्या किती आहे, मेडिकल मध्ये ते उपलब्ध आहे का? की अजून काही दिवसांनी ते उपलब्ध होईल?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 05/10/2021 - 13:56 नवीन
वृत्तपत्रीय बातम्यांनुसार त्याचे विपणन ११/५ पासून होऊ शकेल.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 05/28/2021 - 18:27 नवीन
२- deoxy-ग्लुकोज हे सध्या मार्केट मध्ये मिळणार्‍या ग्लुकॉन डी पेक्षा जरासे वेगळे आहे नविन आहे किंमत थोडी जास्त राहील हे समजण्यासारखे आहे पण या वृत्तानुसार किंमत खासगी क्षेत्रासाठी जवळपास हजार रुपये ठेवली जाणार आणि गव्हर्नमेंटला जरासे कंसेशन. शहरी मध्यमवर्गीय लोकांना हजार रुपये किंमत अधिक वाटणारही नाही, पण शासकीय आरोग्य व्यवस्था नसलेला खूप मोठी लोकसंख्या ग्रामीण भागातून रहाते जिथे लस आणि ऑक्सीजन पुरवठा येते वर्षभर तरी पोहोचणार नाही त्यांना अल्पशी आशा २- deoxy-ग्लुकोज निर्माण होईल असे वाटले होते पण प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. एका कुटूंबात पाच जणांना कोविड झाला शासकीय डिस्पेंन्सरी उपलब्ध नाही पण खासगी डॉक्टर उपलब्ध असेल तर पाच हजार मोजावे लागतील? मार्केट मध्ये मिळणार्‍या ग्लुकॉन डी आणि २- deoxy-ग्लुकोज च्या उत्पादन प्रक्रीयेत असा नेमका किती फरक असणार आहे? येते वर्षभर तरी मागणी कमी रहाण्याची शक्यता नाही त्यामुळे स्केल ऑफ एकॉनॉमीक्स नाही असेही म्हणता येत नाही. उत्पादक कंपनीला संशोधनावरही खर्च करावा लागलेला नसणार.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 05/29/2021 - 04:15 नवीन
२- deoxy-ग्लुकोज च्या उत्पादन प्रक्रीयेत असा नेमका किती फरक असणार आहे?
>>> याचे अभ्यासपूर्ण उत्तर औषधनिर्माण शास्त्रातील तज्ञ व्यक्ती देऊ शकेल. मलाही जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Mon, 05/10/2021 - 03:12 नवीन
प्रश्नचिन्हाला या लेखातून नेमके आणि त्वरित उत्तर मिळाले. हे .औषध कसे काय काम करीत असेल हा तो प्रश्न होता. धन्यवाद
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 05/10/2021 - 12:10 नवीन
mucormycosis हि डोळ्यांना बाधणारा गंभीर बुरशीजन्य आजाराबद्दल माध्यमात चर्चा दिसते आहे. कोविड होऊन गेलेल्यांना खासकरून डायबेटीस असणार्‍यांना प्रतिकारशक्ती कमी असताना हा गंभीर आजार संभवत असावा असे बातम्यांवरून वाटते. सर्वसाधारण हवेतूनही श्वसनावाटे बाधा होऊ शकत असावी, पण विशेषतः दमट आणि धूळ असलेल्या भागात मास्कचा आणि डोळ्यांसाठी सुरक्षीततेचे उपाय करणे श्रेयस्कर असावे असे वाचलेल्या माहितीवरून वाटले पण डॉक्टर मंडळींकडून प्रिव्हेंशन च्या दृष्टीने अधिक माहिती घेणे आवडेल. मला आंजावर मिळालेले काही दुवे * https://indianexpress.com/article/explained/mucormycosis-in-covid-patients-fungal-infections-7308721/ * https://en.wikipedia.org/wiki/Mucormycosis * https://www.cdc.gov/fungal/diseases/mucormycosis/risk-prevention.html * https://www.cdc.gov/mold/faqs.htm (बुरशीप्रमाण कमी ठेवण्याचे उपाय)
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 05/10/2021 - 16:16 नवीन
इथे लिहीली आहे तेच. 30 Apr 2021 - 10:46 am | कुमार१
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 05/10/2021 - 13:22 नवीन
इथे लिहीली आहे तेच. 30 Apr 2021 - 10:46 am | कुमार१
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 05/10/2021 - 16:42 नवीन
धन्यवाद डॉ. कुमार, आणखी दोन प्रश्न १) खरे म्हणजे बुरशी जन्य आजाराने डोळे गमवावे लागणे हे वाचूनच कसेसे होते, त्यामुळे ततसंबंधी वृत्ते खरे म्हणजे डिटेल मध्ये वाचली नाहीत. पहिल्या कोविड लाटे पेक्षा बुरशी लागणचे प्रमाण या वेळी अधिक का आहे आणि चर्चेत असलेली बुरशी लागण स्वतः संसर्गजन्य नाही असे वाचण्यात आहे (चुभूदेघे) तर मग कोविड लागण झालेल्यांनी मागच्या लाटेत घेतली गेलेली काळजी या लाटेच्या वेळी घेतली जात नाही आहे अशी काही शक्यता आहे ? २) दुसरे तर दुसरी लाट आधी पेक्षा मोठी असूनही पुर्नलागण विषयक आणि सेरोसर्वे विषयक फारश्या बातम्या वाचनात आल्या नाहीत, पण पुर्नलागण विषयक आणि सेरोसर्वे विषयक काही नवीन संशोधन अलिकडे पुढे आले आहे का? (मागच्या वेळेपेक्षा माझे वाचनही कमी झाल्यामुळे लक्ष गेले नाही का माहित नाही त्यामुळे आधी चर्चा होऊन गेली असल्यास वरील प्रमाणे दुवा दिला तरी चालेल.) आपल्या सातत्यपूर्ण माहितीपुर्ण मार्गदर्शनासाठी अनेक आभार
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 05/10/2021 - 17:26 नवीन
मागा 1.
बुरशी लागणचे प्रमाण या वेळी अधिक का आहे
तूर्त माझ्यासमोर तुलनात्मक विदा नाही. पण काही शक्यता अशा वाटतात : दुसऱ्या लाटेमध्ये अधिक माणसे आजारी पडणे, अधिक रुग्णालयात दाखल करावी लागणे आणि ऑक्सिजनचे उपचार अधिक प्रमाणावर करावे लागणे या गोष्टी दिसून आल्यात. आता बुरशीजन्य आजार होण्याची तीन कारणे पुन्हा बघू : १. स्टिरॉइडचा अधिक डोसमध्ये व अधिक काळ वापर २. रुग्णाचे अतिदक्षता विभागातील अधिक काळ वास्तव्य ३. काही रुग्णांच्या ऑक्‍सिजन उपचारादरम्यान ह्युमिडीफायर्स वापरतात. त्यातील पाणी निर्जंतुक केलेले नसणे. वरील घटक या लाटेत कारणीभूत ठरले असावेत.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 05/12/2021 - 08:55 नवीन
हाच प्रश्न होता.कारण समजलं.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Mon, 05/10/2021 - 17:28 नवीन
२ दिवसांपुर्वी आमच्या सोसाटीत राहणार्या एका ज्येष्ठ सदस्याचे लसीचा दुसरा डोस घेतल्या नंतर गुंतागुंत होउन निधन झाले. त्या आधी त्यांची प्रक्रुती चांगली होती. अशा अजुन १/२ केसेस ऐकण्यात आल्या त्यामुळे आईला अजुन लस देण्याबाबत निर्णय होत नाही आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 05/10/2021 - 17:57 नवीन
गोंधळी, जर एखाद्या व्यक्तीस विशिष्ट रसायनांची तीव्र ऍलर्जी असेल तर अशा व्यक्तीने ही लस घेऊ नये असे अधिकृत माहितीपत्रक सांगते. याची प्रत्येकाने स्वतःबाबत खातरजमा करावी. लसीनंतर गंभीर दुष्परिणाम आणि मृत्यू यांचे प्रमाण अत्यल्प आहे. तरीसुद्धा मनात काही शंका असेल तर सर्वप्रथम तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा आणि मग निर्णय घ्या.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 05/11/2021 - 06:17 नवीन
२. भारताचे तिसरे राष्ट्रीय सिरोसर्वेक्षण 17 डिसेंबर ते 8 जानेवारी 2021 दरम्यान झाले. त्याचा विदा इथे उपलब्ध आहे https://www.bbc.com/news/world-asia-india-55945382
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 05/11/2021 - 09:20 नवीन
धन्यवाद, आणखी गुगलींग केल्यावर हे तीन वृत्त दुवे मिळाले १, २, ३, आपण थकलो तरी वीषाणू थकत नाहीए, सेरो सर्वेवरून अजून एका लाटेची शक्यता वाटतीए कदाचित तोपर्यंत ऑक्सीजन उपलब्धता आणि २ डी औषधाची उपलब्धता होईल पण मोठी जनसंख्या कोविडोत्तर दुष्परिणामांना झेलणार असेल असे दिसते. एका सेरोसर्वेचे निरीक्षण कोविड होऊन गेलेल्यातील २० टक्के लोकांच्या अँटीबॉडीज प्रमाण सहामहिन्यानंतर कमी होते म्हणजे लस घेतली नाहीतर कोविड जोखीम कॅटेगरीत ते पुन्हा जातील?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 05/11/2021 - 09:54 नवीन
होय, जोपर्यंत महासाथ चालू आहे तोपर्यंत जोखीम राहील. कालांतराने विषाणू मित्रवत होण्याची वाट पहायची.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 05/12/2021 - 08:53 नवीन
डॉ.हर्ड इम्यनिटी कशी मिळू शकेल,१४% लसीकरण झाले आहे.लसीकरणाशी संबंध कसा जोडला आहे?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 05/12/2021 - 09:09 नवीन
सामूहिक प्रतिकारशक्ती हा अगदी किचकट विषय आहे. मुळात तो एक गणिती अंदाज असतो. जेव्हा विषाणूचा संसर्ग दर एक लाख लोकांमागे फक्त एक व्यक्ती इतका कमी होतो, तेव्हा आपण हा आजार काबूत ठेवला आहे असे म्हणता येईल. सध्या इसराइल त्या अवस्थेत आहे( ०.८ प्रति एक लाख लोक). किती टक्के लसीकरणाने अशी शक्ती येईल हे कोविडबाबत वादग्रस्त झालेले आहे. उदाहरणार्थ अमेरिकेसंबंधी हा एक दुवा आहे : Reaching ‘Herd Immunity’ Is Unlikely in the U.S., Experts Now Believe https://www.nytimes.com/2021/05/03/health/covid-herd-immunity-vaccine.html
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 05/12/2021 - 10:10 नवीन
सध्या इसराइल त्या अवस्थेत आहे( ०.८ प्रति एक लाख लोक). तिथे ही अवस्था ,उपलब्धी अशीच राहो जेणेकरून कोवीड युद्धासाठी एक उत्तम उदाहरण होईल. https://www.bbc.com/news/health-56722186
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/12/2021 - 08:24 नवीन
च्यायला, या करोना महामारीच्या. करोना घडामोडींनी प्रत्येक दिवशी काही तरी नवीन येतं. भारतात गेल्या ऑक्टोंबरात सापडलेल्या करोनाचा बी. १.६१७ हा उत्परिवर्तीत विषाणू वेगाने पसरत असून त्यामुळे जगभरातच जोखीम झाली आहे. (अधिक वृत्त) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 05/12/2021 - 08:43 नवीन
बी १.६१७ बद्दल वैज्ञानिकांत मतभेद आहेत. दुसरी बाजू : १. या प्रकारात एकूण पंधरा जनुकीय बदल झालेले आहेत. त्यापैकी ठराविक दोघांचा ठळकपणे उल्लेख करून त्याला ‘डबल mutant’ असे चुकीचे नाव माध्यमांनी रूढ केले. २. आता वरील जे दोन बदल आहेत त्यातील एक जुनाच (कॅलिफोर्नियावाला) आहे. तर दुसऱ्या बदलाचे जीवशास्त्रीयदृष्ट्या विशेष महत्त्व नाही. ३. म्हणून बी १.६१७ मुळेच भारतातील दुसरी लाट जोरात पसरली का, हे ठामपणे म्हणता येत नाही. या प्रकाराला गरजेपेक्षा जास्त प्रसिद्धी दिली गेली आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 05/12/2021 - 13:26 नवीन
“B.1.617 हा करोनाचा उपप्रकार भारतीय नाही”, सर्व दावे निराधार असल्याचं केंद्र सरकारनं केलं स्पष्ट!
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Wed, 05/12/2021 - 18:48 नवीन
हा विषाणु उपप्रकार भारतिया आहे आणि जणु मोदि जबाबदार आहेत अशी जागतिक बदनमी झाली तर हवीच आहे. चीन ने कधिही विषाणु फैलावाची जबाबदारी घेतली नाही. आपले मोदी राजकिया विरोधक बाहेरच्या देशात मुलाखती देउन देउन देशाची बदनांमी करुन घेतील. खरतर माझ्यासारख्या सामन्य व्यक्तीला असा प्रश्न कायम पडतोय की २०२० ल साथ आटोक्यात होती म्हणजे भारतियान्ची प्रतिकार्शक्ती नक्किच चान्गली आहे. भारताच अपेक्शीत नुकसान होत नाही म्हणुन जनुकिया बदल करुन नवीन उपप्रकार तयार झाला असावा का?(नैसर्गिक, अनैसर्गिक?) शेवटी विज्ञान असल तरी काही गोष्टिन्चा उलगडा होणे ही वेळ लागणारी प्रक्रिया आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 05/12/2021 - 19:21 नवीन
दिव्यकिर्ती म्हणून व्लॉगरचा एक युट्यूब व्हिडीओ आला आहे. अफवां आणि चुकीची माहिती पसरवण्यापासून वाचण्याच महत्व या गृहस्थांनी छान विषद केल आहे. वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडणे आणि सुपरस्प्रेडर इव्हेंट यावरून सरकारवरही टिका आहे पण जबाबदारीने केलेली टिका आहे. सोबत समाजाच्या बेजबाबदारपणावरही बोट ठेवले आहे. या युट्यूबमध्ये ०.०१ ते १८ हा वयोगटाकडे दुर्लक्ष करण्यामुळे वीषाणू नियंत्रण कठीण रहाण्याचा मुद्याकडे लक्ष वेधले आहे आणि आणखीही काही मुद्द्यांकडे चांगले लक्ष वेधले आहे. युट्यूब मधील कायमस्वरूपी वीषाणू हाकलून लावण्या बद्दल सूर अंशतः अटळतावादी वाटला त्यांचा अटळतावाद तेवढा योग्य वाटला नाही. टोकाच्या अटळतावादामुळे जन सहाकार्य आणि वैश्विक सहकार्य कमी रहाण्याचा धोका संभवू शकतो.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 05/13/2021 - 05:15 नवीन
माहितीबद्दल आभार !
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस गुरुवार, 05/13/2021 - 08:39 नवीन
https://www.cnbc.com/2021/05/13/seychelles-most-vaccinated-nation-on-earth-but-covid-19-has-surged.html ही बातमी काळजी उत्पन्न करणारी आहे...
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 05/13/2021 - 19:22 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/covishield-vaccine-central-government-increases-gap-between-first-dose-and-second-dose-pmw-88-2470184/ कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर पूर्वी ४ ते ६ आठवडे होते. त्यानंतर ते वाढवून ६ ते ८ आठवडे आणि आता पुन्हा वाढवून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या दोन डोसमधील गॅपमागचं लाॅजिक काय आहे? जर १२ ते १६ आठवड्यांचा गॅप चालत असेल तर अगोदर हा गॅप कमी का होता?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 05/14/2021 - 04:02 नवीन
कोविशील्डच्या अधिकृत माहितीपत्रकानुसार सुरुवातीस दोन मात्रामधले अंतर चार ते सहा आठवडे असे होते. परंतु परदेशात झालेल्या अभ्यासानुसार, ते बारा आठवड्यांपर्यंत ठेवल्यास अधिक प्रतिकारशक्ती मिळते असा विदा त्यांच्याकडे होता. मात्र आता आपल्याकडे जे सोळा आठवड्यापर्यंत केले आहे त्यासंबंधीचे शास्त्रीय कारण माहीत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 05/14/2021 - 04:57 नवीन
मात्र आता आपल्याकडे जे सोळा आठवड्यापर्यंत केले आहे त्यासंबंधीचे शास्त्रीय कारण माहीत नाही.
त्यामागे लसींचा तुटवडा हे अशास्त्रीय कारण असावे :)
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Fri, 05/14/2021 - 05:49 नवीन
शक्यता तीच वाटतेय. किंवा लोकांची तशी समजूत होण्याचा धोका आहे. दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यात घेतला नाही तर दोन्ही डोस पुन्हा घ्यावे लागतील असे मधे ऐकिवात होते. आता ३-४ महिन्याचा गॅप चालेल म्हणतायत. जर हा गॅप नक्की चालत असेल तर ठीक नाहीतर दोन्ही डोस मिळालेली जनता परत मोकाट उंडरायला मोकळी आणि प्रत्यक्षात प्रतिकारक्षमता जास्त नसल्याने अजून एक दोन लाटा यायच्या.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 05/15/2021 - 04:44 नवीन
Ivermectin : मतभिन्नता भारतात गोवा आणि उत्तराखंड या दोन राज्यांच्या सरकारांनी तेथील लोकांना हे औषध प्रतिबंधात्मक म्हणून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोव्यात ते 18 वर्षावरील लोकांना तर उत्तराखंडमध्ये दोन वर्षावरील सर्वांना (गरोदर व स्तन्यदा सोडून) देण्याचे ठरले आहे. डब्ल्यूएचओ आणि खुद्द या औषधाची निर्माती कंपनी Merck यांनी हे औषध कोविड संदर्भात देण्यास विरोध दर्शविला आहे !
  • Log in or register to post comments
र
राहुल मराठे Sat, 05/15/2021 - 19:09 नवीन
https://www.wired.com/story/the-teeny-tiny-scientific-screwup-that-helped-covid-kill/
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 05/18/2021 - 14:20 नवीन
श्री. राहुल मराठे, लेख खूपच रोचक आणि माहितीपूर्ण आहे. मागच्या वर्षीच्या साथ काळात एका परिचयातील रिटायर्ड इंजिनीयर प्राध्यापक महोदय मास्क न बांधलेल्या अवस्थेत भेटले असता मी त्यांना मास्क बांधण्यास सुचवल्यावर त्यांनी मला पाच मायक्रॉनचाच फंडा देऊन ते वीषाणू गुरुत्वाकर्षाणाने जमिनीवर जातात असा फंडा दिला . मी हा लेख तेव्हा वाचलेला नव्हता पण सर्वसाधारण हवा पुरेशा वजनाच्या जसे की पाला पाचोळा वस्तुही बर्‍यापैकी दूर नेते आणि गुर्त्वाकर्षणाचा प्रभाव नंतर येतो हे प्राध्यापक महोदयांना सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझे म्हणणे मनावर घेतले नाही. एनीवे हाँगकाँगने अधिक यशस्वीपणे व्हायरस मॅनेजमेंटसाठी व्हेंटीलीएशन वर लक्ष पुरवले व्हेंटीलीएशनच्या मुद्याबद्दल फारशी जनजागृती नाही भारतातील कोट्यावधी शॉप्स आस्थापना असंख्य जागांमध्ये व्हेंटीलिएशनची काळजी घेतलेली नसते. लोकही या मुद्द्याबाबत अलर्ट नसतात. भारतातील लसीकरण पूर्ण होई होई पर्यंत तिसरी लाट येऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 05/16/2021 - 09:27 नवीन
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो. परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते. नुकतेच निधन पावलेले खासदार राजीव सातव हे अशा प्रकारच्या आजाराला बळी पडले. आदरांजली.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 05/18/2021 - 06:52 नवीन
ताजी बातमी करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Tue, 05/18/2021 - 09:59 नवीन
पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचे करोनामुळे निधन, लसीचे घेतले होते दोन्ही डोस https://www.loksatta.com/desh-videsh-news/padma-shri-dr-kk-agarwal-dies-due-to-corona-srk-94-2473802/ नवीन केसेस कमी होत आहेत पण म्रुतांचा आकडा वाढत आहे असे दिसतय.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस गुरुवार, 05/20/2021 - 00:47 नवीन
https://indianexpress.com/article/explained/drdos-new-oral-drug-2-dg-coronavirus-7318447/
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 05/20/2021 - 04:22 नवीन
आत्ताशी त्याचं वितरण सुरू झाल्याची बातमी वाचली आहे. चाचणी प्रयोगांदरम्यान त्याने रुग्णालयात दाखल व्यक्तींसाठी फायदा दाखवलेला आहे. आता प्रत्यक्ष वापर झाल्यानंतर काही दिवसांनी विदा उपलब्ध होईल.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 05/21/2021 - 06:55 नवीन
पांढऱ्या बुरशीचा आजार (Candidiasis) प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या रुग्णांमध्ये या प्रकारचा आजार होऊ शकतो. असे काही मोजके रुग्ण सध्या बिहार मध्ये आढळले आहेत( https://www.loksatta.com/desh-videsh-news/after-black-fungus-mucormycosi...). कोविड रुग्णांना याचा धोका होऊ शकतो. या आजारात घशामध्ये असे चित्र दिसते Image removed. याच्या उपचारासाठी clotrimazole, miconazole, or nystatin, fluconazole या प्रकारची औषधे वापरली जातात.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 05/21/2021 - 08:14 नवीन
For Corona treatment WHO सुधारीत गाईडलाईन नुसार https://www.ndtv.com/video/shows/trending-tonight/remdesivir-dropped-from-who-list-covid-treatment-a-medical-experiment-586998 फन्गल इन्फेक्शन भारतातच अधिक आहेत का? स्टेराइडचा अति आणि अयोग्य वापर याला महत्वाचे कारण दिसते.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 05/21/2021 - 08:54 नवीन
फन्गल इन्फेक्शन भारतातच अधिक आहेत का?
>> त्यासंबंधी इथे काही माहिती आहे. त्यानुसार मार्च अखेरीस जगातील एकूण बुरशी रुग्णांपैकी 70 टक्के भारतात होते. परंतु इथे मेख आहे. ही महासाथ सुरू होण्यापूर्वी या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण आधी बघू. दोन देशांची तुलना इथे दिलेली आहे. रुग्णसंख्या प्रति लाख लोक अशी आहे : भारत 14 ऑस्ट्रेलिया 0.06 या वर्षाखेरीस विस्तृत विदा आल्यावर अधिक भाष्य करता येईल.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 05/21/2021 - 10:56 नवीन
या वर्षाखेरीस विस्तृत विदा आल्यावर अधिक भाष्य करता येईल. माहितीसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 05/22/2021 - 08:20 नवीन
ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांचे शुक्रवारी करोना संसर्गाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. आदरांजली ! “वृक्ष म्हणजे प्राणवायूची बँक” असे त्यांचे वचन आहे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 05/22/2021 - 12:57 नवीन
सुंदरलाल बहुगुणा यांना श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 05/22/2021 - 14:23 नवीन
कोविड उपचारांमुळे म्युकरमायकोसिस वाढत नाहीय, तर व्हायरसमध्ये म्युटेशन झालय, नवीन स्ट्रेन आलाय. हा नवीन स्ट्रेन स्वादुपिंडाच्या बीटासेल्सवर परिणाम करतोय. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढतेय. त्यामुळे म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढतायत" असे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 05/22/2021 - 16:16 नवीन
हा नवीन स्ट्रेन स्वादुपिंडाच्या बीटासेल्सवर परिणाम करतोय. या बद्दल काही माहिती उपलब्ध आहे का? डॉ. तात्या राव लहाने हा माणूस विश्वासार्ह राहिलेला नाही. राजकारणी माणसांना लस देण्यासाठी हि व्यक्ती त्यांच्या घरी जाते (याचे अनेक फोटो वृत्तपत्रात आले होते) हे एकंदर वैद्यकीय व्यवसायाच्या प्रतिष्ठेला साजेसे नाही. आणि अशी लस घरी दिल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे सुद्धा ओढले होते. बाकी भारतात अनिर्बंधित मधुमेहाचे कोट्यवधी रुग्ण असताना या महामारीच्या अगोदर कुणाला म्युकरमायकोसिस का झाला नाही याचे डॉ लहाने उत्तर देतील का? बुरशी जन्य आजार हे आपली प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे होतात हे वैद्यकशास्त्राला वर्षानुवर्षे माहिती आहे. अवयव रोपण, अनेक कर्करोग विशेषतः रक्ताचा ( ल्युकेमिया) किंवा अस्थिमज्जा रोपण (bone marrow transplant) अशा रोग्यांमध्ये असे रोग होताना अशा रुग्णालयात काम केलेल्या माझ्या सारख्या अनेक डॉक्टरांनी वर्षानुवर्षे पाहिलेले आहे. बहुसंख्य करोना च्या रुग्णांना डेक्सामेथासोन हे स्टिरॉइड जीव वाचवण्यासाठी दिले जाते त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखर वाढते विशेषतः मधुमेह असलेल्या. याशिवाय टोसिलीझूमॅब किंवा बॅरिसीटीनिब हि औषधे सायटो काइन स्टॉर्म मध्ये असामान्य वाढलेल्या प्रतिकारशक्तीला थंड करण्यासाठी औषधे दिली जातात यामुळे बुरशीजन्य आजार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते. तेंव्हा या दोन्ही औषधांचा एकत्रित परिणाम म्हणून रक्तातील साखर वाढते वर प्रतिकारशक्ती कमी होते म्हणून बुरशीचा प्रादुर्भाव बराच वाढतो. तेंव्हा करोना मुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते हे सत्य असले तरी त्यामुळे म्युकरमायकोसिस होतो असे ठामपणे म्हणता येईल का याविषयी शंका वाटते.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 05/22/2021 - 16:20 नवीन
त्यामुळे म्युकरमायकोसिस होतो असे ठामपणे म्हणता येईल का याविषयी शंका वाटते.
+१११
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा