हंपी: भाग ६ - दिवस दुसरा- कृष्ण मंदिर, लक्ष्मीनृसिंह आणि बडवीलिंग मंदिर
हंपी: भाग १ - दिवस पहिला- चंद्रशेखर आणि सरस्वती मंदिरं
हंपी: भाग २ - दिवस पहिला- राजवाडा परिसर- भाग २
हंपी: भाग ३ - दिवस पहिला - हजारराम मंदिर आणि पानसुपारी बाजार
हंपी: भाग ४ - दिवस पहिला - दारोजी अस्वल अभयारण्य
हंपी: भाग ५ - दिवस दुसरा -विरुपाक्ष मंदिर आणि हेमकूट टेकडी
कृष्ण मंदिर अर्थात बाळकृष्ण मंदिर
कमलापूरवरुन जाताना हंपीच्या मुख्य रस्त्यावरच आहे हे कृष्ण मंदिर. रस्त्याच्या उजवीकडे राजवाड्यांचा विभाग (Royal Enclosure) आहे तर त्याच्या पुढे गेल्यास रस्त्याच्या डावीकडे पहिले मोठे मंदिर लागते ते कृष्ण मंदिर. विरुपाक्ष मंदिरापासून हे मंदिर अगदीच जवळ आहे.
कृष्ण मंदिर हे पंचायतन स्वरुपात असलेले एक भव्य मंदिर. हे मंदिर सम्राट कृष्णदेवरायाने इस १५१३ साली त्याच्या उत्कल स्वारीतल्या विजयाप्रीत्यर्थ बांधलेले आहे.
पोर्तुगीज प्रवासी फेर्नांव नूनीझच्या वृत्तांतात कृष्णदेवरायाच्या ओरिसा स्वारीचा घटनाक्रम पुढीलप्रमाणे येतो.
कृष्णदेवरायाने गादीवर येताच आपला साम्राज्यविस्तार सुरु केला. ओरीसावर स्वारी करुन त्याने उदयगिरीच्या किल्ल्याला ३४००० पायदळ आणि ८०० हत्तींसह वेढा घातला. किल्ल्यात १०००० सैन्याची शिबंदी होती आणि किल्ला अतिशय मजबूत होता. सुमारे दीड वर्ष वेढा घालून रायाने किल्ल्यात जाण्याच्या असंख्य वाटा तयार केल्या,मोठमोठे दगड फोडून मार्ग तयार केले, किल्ल्यात जाणारी एकमेव वाट जी अतिशय अरुंद आणि दुर्गम होती ती त्याने सुगम करुन घेतली आणि किल्ला जिंकला आणि ओरिसाच्या राजाच्या आत्याला कैद केले.. उदयगिरीचा किल्ला जिंकल्यावर रायाने कोडवीडवर स्वारी करुन त्याला वेढा घातला. ओरिसाचा राजा तेराशे हत्ती, वीस हजार घोडदळ आणि पन्नास हजार पायदळासह चालून आला. हे पाहून रायाने शहरात काही सैन्य ठेवून नदीपाशी आपला तळ उभारला. ओरिसाचा राजा नदीच्या दुसर्या तीरावर ससैन्य उभा होता. तो नदी ओलांडून येत नाही हे पाहताच रायाने नदी ओलांडून त्याच्यावर स्वारी केली आणि घमासान लढाईत उत्कलराजाचा पराभव केला. राया नंतर कोंडापल्ली ह्या ओरिसाच्या राजधानीच्या ठिकाणी गेला आणि तीन महिने वेढा घातल्यावर त्याने राजधानी जिंकली. आणि ओरिसाच्या परागंदा राजास मी तुझी येथे रणभूमीवर वाट पाहात आहे असे कित्येक निरोप पाठवले, पण तो कधीच आला नाही, कोंडापल्लीस रायाने अनेक मंदिरांना देणग्या दिल्या. तिथे एक भव्य मंदिर बांधून त्याने एक शिलालेख रोविला तो असा, 'कदाचित ही अक्षरे जेव्हा मिटून जातील तेव्हा ओरिसाचा राजा विजयनगरच्या राजाशी सामना करेल, ओरिसाच्या राजाने जर ही अक्षरे मिटवली तर त्याच्या राणीस विजयनगरच्या राजाच्या घोड्यास नाल ठोकणार्या लोहारांच्या हाती दिले जाईल'.
ह्यानंतर ओरिसाच्या राजाने तह करुन सम्राट कृष्णदेवरायास आपली मुलगी दिली, रायाने पण तीचा पत्नी म्हणून स्वीकार करुन उत्कल राजाला नदीपलीकडचा मुलुख परत करुन नदीअलीकडचा मुलुख स्वतःकडे ठेवला.
कृष्णमंदिरातली मुख्य मूर्ती हि बाळकृष्णाची होती जी आज तेथील मंदिरात नसून चेन्नईच्या राज्य संग्रहालयात आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातील आतल्या भागावर कृष्णदेवरायाच्या ओरिसावरील स्वारीचे प्रसंग कोरलेले आहेत.
कृष्ण मंदिर
गोपुरातील आतील भागांवर असलेले विजयनगरच्या सैन्याचे शिल्पांकन
पंचायतन स्वरुपातल्या या मंदिरात काही उपमंदिरे, उपमंडल, पाकशाळा आहेत. मुख्य मंदिराच्या तलविन्यासात एक गर्भगृह जिथे बाळकृष्णाची मूर्ती होती, एक अर्धमंडप, महामंडप आणि तीन बाजूंना खुला असणारा भव्य सभामंडप आहे. हंपीतील बर्याच मंदिरांची रचना काहीशी अशीच आहे. मुख्य मंदिराच्या पुढ्यातच एक शिलालेख असून त्यावर मंदिर निर्माण आणि उत्कल प्रदेशावरील विजयाबद्दल लिहिलेले आहे.
कृष्ण मंदिर प्रांगण आणि शिलालेख
शिलालेख
कृष्ण मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथल्या सभामंडपातील स्तंभावर असलेल्या प्रचंड व्यालमूर्ती. व्याल हे सिंहासारखे काल्पनिक पशू. हे दुष्ट शक्तींना प्रतिबंध करतात अशी समजूत.
स्तंभांवरील व्याल
स्तंभांवरील व्याल
कृष्ण मंदिरातील सभामंडपा हा अनेक स्तंभांवर तोललेला आहे. स्तंभांवर कृष्णाच्या जीवनातले असंख्य प्रसंग कोरलेले आहेत. हे मंदिर बाळकृष्णाचे असल्याने त्याचे गोकुळातील आणि मथुरेतील प्रसंगच येथे प्रामुख्याने आहेत.
कृष्णमंदिरातील सभामंडप
सभामंडप एका वेगळ्या कोनातून
बाळकृष्णास उखळाला बांधल्याचा प्रसंग
कालियामर्दन
सिंहासनावर बसलेल्या कंसाचा केश ओढून कृष्णाने केलेला वध
मंदिराच्या शिखरांवर गरुड, दशावतार अशी विविध शिल्पे आहेत.
मंदिराचे विस्तीर्ण प्रांगण
मंदिराचे दुसरे प्रवेशद्वार आणि उपमंडप
मुख्य मंदिर आणि उपमंदिरं
मुख्य मंदिर, उपमंडप आणि उपमंदिर
मंदिर बघून बाहेर आलो, रस्त्याच्या पलीकडील बाजूस आहे तो असंख्य मंडपांनी, दुकानांनी युक्त असलेला कृष्ण बाजार, एकेकाळी गजबजून गेलेला हा कृष्ण बाजार आज भग्नावस्थेत आहे.
कृष्ण बाजार
कृष्णबाजारातील पुष्करिणी आणि दुकांनातील स्तंभ
ह्यानंतर आम्ही निघालो ते येथून अगदी जवळच असलेल्या हंपीतील प्रसिद्ध लक्ष्मीनृसिंहाकडे
लक्ष्मीनृसिंह अर्थात उग्रनृसिंह मंदिर
हंपीतील ही सर्वात विशाल मूर्ती. हंपी म्हटल्यावर दोन गोष्टी लगेच डोळ्यांसमोर येतात, एक विठ्ठल मंदिरातील दगडी रथ आणि दुसरी म्हणजे उग्रनृसिंहाची ही भव्य मूर्ती. ही उग्रनृसिंहाची मूर्ती लक्ष्मीनृसिंहाची होती, आजमितीस लक्ष्मी पूर्णपणे भग्न झालेली असून तिचा फक्त एक हात आपल्याला दिसतो. मूळचा लक्ष्मीनृसिंह हळूहळू उग्रनृसिंह म्हणून प्रचलित झाला.
६.७ मीटर उंच असलेली ही मूर्ती इस १५२८ साली सम्राट कृष्णदेवरायाच्या आदेशाने एका भव्यशिलाखंडावर कोरण्यात आली आणि कृष्णभट्टाच्या हस्ते हिची प्रतिष्ठापना करण्यात आली.
लक्ष्मी-नृसिंह
शेषनागाच्या वेटोळ्यावर बसलेली ही मूर्ती पद्मासनात असून तिच्या दोन्ही गुडघ्यांवर योगपट्ट आहे. नृसिंहाच्या मूर्तीवर शेषनागाने आपल्या सात फण्यांच्या साहाय्याने छ्त्र धरिले आहे. नृसिंह चतुर्भुज असून त्याचे चारही हात भग्न आलेले आहेत. त्याच्या डावी मांडीवर बसलेली लक्ष्मी आज पूर्णपणे नष्ट झालेली असून आज केवळ तिच्या उजव्या हाताचा भाग नृसिंहाच्या खांद्याच्या बाजूस लपेटलेला दिसतो. दाक्षिणात्य पद्धतीचा मुगुट घालून बसलेल्या नृसिंहाचे डोळे खोबणीतून बाहेर आलेले असून त्याच्या कराल दाढा विचकलेल्या आहेत. शेषनागाच्या वेटोळ्याच्या बाजूस मकरतोरण आहे.
लक्ष्नीनृसिंह
उजव्या बाजूस लक्ष्मीचा हात दिसत आहे.
ही मूळ मूर्ती कशी असावी ह्याची काहिशी कल्पना आपल्याला येथीलच विरुपाक्ष मंदिरातील स्तंभावर असलेल्या लक्ष्मीनृसिंहाच्या मूर्तीवरुन येते.
ह्या मूर्तीच्या शेजारीच आहे ते बडवीलिंग मंदिर
बडवीलिंग मंदिर
हे मंदिर अगदीच छोटेखानी पण इथले शिवलिंग हंपीतील सर्वात भव्य. दगडांवर रचलेल्या विटांचे शिखर असलेले हे चौकोनी लहानसे मंदिर. अगदी साध्याश्याच असलेल्या ह्या मंदिरात एकाच पाषाणापासून तयार केलेले ३ मीटर उंचीचे भव्य शिवलिंग आहे. शिवलिंगावर शंकराचे तीन डोळे कोरलेले आहेत. जवळच असलेल्या लहानश्या कालव्यामुळे हे शिवलिंग कायमच पाण्याने वेढलेले असते. एका गरीब शेतकरी स्त्रीने हे शिवलिंग स्थापित केले अशी दंतकथा आहे. बडवा म्हणजे गरीब म्हणूनच याचे नाव बडवीलिंग पडले असे मानतात.
लक्ष्नीनृसिंह आणि बाजूलाच असलेले बडवीलिंग मंदिर
बडवीलिंग मंदिर
पाण्याने वेढलेले भव्य शिवलिंग
शिवलिंगावर कोरलेले शंकराचे तीन डोळे
हंपीतील हा भाग आहे विलक्षण सुंदर, एका बाजूला शाही निवास तर दुसर्या बाजूस केळीच्या हिरव्यागार बागा. इथल्या कालव्यामुळे हा भाग अतिशय हिरवागार आहे. ही मंदिरे बघेपर्यंत जवळपास दीड वाजत आले होते, उसाचा रस पिवून आम्ही आता परत निघालो ते कमलापूरला दाक्षिणात्य पद्धतीच्या मेसमध्ये जेवायला, त्यानंतर जायचे होते ते शाहीभागात कमलमहाल, हत्तीपागा बघायला त्याविषयी पुढच्या भागात.
क्रमशः
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments