Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

शेती : काही विचार

स
साहना
Sun, 01/03/2021 - 11:44
🗣 195 प्रतिसाद
शेती ह्या विषयावर बरेच लेखन केले आहे. मी स्वतः एक छोटीशी बागायत बाळगून आहे. आठ आण्याची कोंबडी आणि सव्वा रुपयाचा मसाला अश्या प्रकारचा धंदा असला तरी भविष्यांत त्या जागेवर काहीतरी मोठा इंडस्ट्रियल प्रकल्प निर्माण करू शकेन अशी आशा आहे. मी स्वतः थोडेफार शेतीत काम केले आहे आणि गायीचे दूध स्वतःच्या हाताने काढले आहे. बकऱ्या पोसल्या आहेत आणि माकडांवर गोळ्या सुद्धा झाडल्या आहेत. त्यामुळे हे लेखन वैचारिक कुंथन नसून स्वानुभवाने शिल्पित आहे. भारतीय शेतकरी हे प्रकरण अत्यंत मागासलेले आहे ह्यांत शंका नाही. भारतीयाची ५०% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे पण देशाच्या एकूण उत्पन्नात ह्यांचा वाटा फक्त १५% आहे. ह्याउलट अमेरिकेचे (आणि इतर सर्व प्रगत देशांचे) फक्त १.७% लोक शेतीत आहेत पण सुमारे ५-१०% राष्ट्रीय उत्त्पन्न त्यांच्याकडून येते. पण ह्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगांतील सर्वांत सुपीक जमिनीपैकी जमीन भारतांत असली तरी भारतीय शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता इतर देशांच्या तुलनेत सुमारे ३ पटींनी कमी आहे. म्हणजे जिथे भारतीय शेतकरी एक हेक्टर मधून फक्त ३ टन तांदूळ पिकवतो तिथे ऑस्ट्रेलियन शेतकरी सुमारे ९ टन पीक घेतो. हीच परिस्थती गहू, कापूस, ऊस इत्यादी गोष्टींची आहे. म्हशीचे दूध ह्या विषयांत मात्र भारत आघाडीवर आहे. अनेक लोकांना कदाचित वाटेल कि मी इथे शेतकरी लोकांना दोष देत आहे. ह्या लोकांना मी कमी लेखत आहे इत्यादी. ह्यांचा दोष अजिबात नाही. मी शेतीऐवजी इतर व्यवसायांत गेले आणि १०० पटीने जास्त पैसे कमावले. मी उद्या सर्व काही सोडून शेती करायला गेले तरी सुद्धा माझ्या शेतीची उत्पादन क्षमता वाढणारी नाही. भारतीय शेतीची अकार्यक्षमता हि एक मोठी समस्या आहे. आणि एका लेखांत सर्व करांची मीमांसा होऊ शकणार नाही तरी सुद्धा काही ठळक कारणे मी इथे मांडत आहे. वाचकांनी आणि विशेषतः शेतीचा अनुभव असलेल्यांची आपले मत द्यावे. **नैतिकतेचा ट्रॅप** खूप वर्षांपासून देशांत शेती हा व्यवसाय नसून उपकार आहे असेच भासवले जाते. शेतकऱ्याला एक सामान्य व्यावसायिक असा दर्जा न देता, त्याला एका मोठ्या हरभऱ्याच्या झाडावर चढवले जाते. माझ्यामते जेंव्हा तुम्ही असा "virtue signaling" पाहता तेंव्हा थोडा वेळ थांबून दुसरी बाजू पाहणे खूप गरजेचे आहे. जेंव्हा भारतीय वायुदल चुकून आपल्याच हेलिकॉप्टरला पाडते तेंव्हा समाज त्यांच्यावर टीकेची झोड उठवत नाही. त्या अपघातांत मेलेल्या सैनिकांना सुद्धा आम्ही वीरांचा दर्जा देतो. पण वायुदलाने स्वतः सुद्धा जर ह्या अपघाताला वीरगती समजले तर तो त्यांचा मूर्खपणा ठरेल. बंद दरवाज्यांच्या मागे ह्या अपघाताचे पूर्ण विश्लेषण करून हा अपघात वायुदलासाठी शरमेची बाब आहे हे वायुदलाचे अधिकारी समजून घेतात आणि भविष्यांत हि चूक होणार नाही ह्याची काळजी घेतात. शेतीचे तसेच आहे. भारतीय शेतकरी अकार्यक्षम आहे असे कुणीही त्यांना तोंडावर सांगत नाही उलट शेती करणे म्हणजे कसा मोठा उपकार आहे हेच बिचार्यांना सांगितले जाते आणि हे गरीब लोक सुद्धा मग त्यालाच सत्य समजायला लागतात. माझ्या काही सुशिक्षित मित्रांनी बागायत करायचे ठरवले. शेतीत भविष्य वगैरे आहे, IT वगैरे जास्त दिवस चालणार नाही इत्यादी गोष्टी त्यांनी वाचल्या होत्या. कसा IIT मधील कुणी तरी गावांत जाऊन शेती करतो इत्यादी फॉर्वर्डस ने ते प्रेरित झाले होते. शेवटी २०-३० लाखांचे नुकसान करून धंदा बंद करावा लागला. अनेक शेतकरी ह्या नैतिकतेच्या ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत. तुमच्या ३ एकर शेतीत तुम्ही काहीही पिकवले तरी आयुष्यांत तुम्ही काहीही विशेष साध्य करणार नाही हे त्यांना कुणीही सांगत नाही. त्यामुळे बिचारे त्याच्या पलीकडे पाहायचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत. सरकार काही तरी करेल असाच ह्यांचा होरा असतो पण ते लोक कधीही साधी बेरीज वजाबाकी करून पाहत नाहीत. मोदी सरकारनी घोषणा केली होती कि शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करणार. साधे गणित करून हे कसे बुवा शक्य आहे हे कोणीही पाहत नाही. उत्पन्न डबल करायचे आहे तर शेतकऱ्यांची संख्या अर्धी केली जाऊ शकते म्हणजे आज जे शेतकरी आहेत त्यातील बहुतेक लोकांना शेत सोडावी लागेल. नाहीतर त्याच जमिनीतील उत्पन्न दुप्पट करावे लागेल. हे मोदी सरकार कसे बरे करू शकतील ? नाही तर शेतीमालाचा भाव डबल करावा लागेल आणि तो डबल झाल्यास इतर सर्व गोष्टींची किंमत वाढून डबल उत्पन्न सुद्धा पुरणार नाही. **शेतीचा ट्रॅप** शेतकऱ्यांसाठी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे कि सरकाने कायदे करून त्यांना ह्या व्यवसायांत जबरदस्तीने डांबून ठेवले आहे. वरून आव आणला जातोय कि त्यांचे रक्षण केले जातेय. आम्हा सर्वांचाच अनुभव आहे कि व्यवसाय कुठलाही असो प्रत्येकाची क्षमता सामान असत नाही. काही डॉक्टर चांगले डॉक्टर असतात तर काही अतिशय सुमार. काही लोक गुगल साठी कोड लिहितात तर काही लोक TCS मध्ये. काही लोकांत नेतृत्व क्षमता असते तर काही लोकांत नसते. काही लोक प्रचंड महत्वाकांक्षी असतात १८ १८ तास काम करतात तर काही ४ तास काम करतात. लोकांच्या प्रतिभेंत आणि क्षमतेत फरक असल्याने आयुष्यांत त्यांचे यश सुद्धा वेगवेगळे असते. एकाच घरांत एकाच छताखाली एकाच दिवस जन्माला आलेल्या जुळ्या भावंडांच्या क्षमता सुद्धा फार वेगळ्या असतात. शेती हा सुद्धा सर्वसामान्य व्यवसाय आहे आणि त्याला सुद्धा हीच गोष्ट लागू पडते. काही लोक चांगले शेतकरी असतात तर काही नाही. (मी चांगली शेतकरी नाही आहे त्यामुळे बागायतीत जास्त लक्ष घालत नाही. इतर व्यक्ती घालतात, बागायतीचे सूत्रे मी हाती घेतली तर उत्त्पन्न अर्धे व्हायचे). एक कार्यक्षम शेतकरी चतुराईने एक एकर मधून जसे उत्पन्न घेऊ शकतो तसेच उत्पन्न प्रत्येक इतर शेतकरी घेऊ शकतो असे नाही. इतर सर्व व्यवसायांत लोकांना आपल्या क्षमते प्रमाणे बदल करण्याची मुभा असते. ज्या वकिलाला कोर्टांत उभे राहून युक्तिवाद करण्याची आवड नसते तो वकील मग साधा डेस्क जॉब पाहतो. काही लोक IT जमत नाहीत म्हणून सोडून बँकेत कारकून बनतात तर रेस्टोरंट चालत नाही म्हणून मालक ती जागा फार्मसीला भाड्याने देतो. ह्या बाबी छोट्या वाटल्या तरी छोट्या नाहीत. दर वर्षी मुंबई सारख्या शहरांत लक्षावधी धंदे बंद पडून नवीन सुरु होतात. पण काही धंदे जे एकाच जागी वर्षानु वर्षे चालू असतात ( चितळे बंधू असो वा वैशाली व्हेज) ते सर्व यशस्वी धंदे शेवटी कुणाच्या तरी अपयशावर बनलेले असतात. दररोज लक्षावधी लोक अपयशी होतात आणि काय चालत नाही हे समाज हळू हळू समजतो आणि त्या अपयशावर इतरांचे यश अवलंबून असते. दर एक तारखेला हक्काने पगार घेणार्यांनी लक्षांत घ्यावे कि कुणी तरी रिस्क घेऊन तो धंदा उभा केलाय. अपयश म्हणूनच फार महत्वाचे आहे आणि अपयशी धंदे बंद पडणे हे समाजासाठी चांगली गोष्ट आहे. जेंव्हा एक अपयशी धंदा बंद पडतो तेंव्हा त्यांत गुंतवलेले भांडवल तसेच माणूस इतर काही करायला लागतात त्यामुळे भांडवल आणि माणसे दोघांचाही चांगला वापर होतो. शेतीचे ह्याच्या अगदी उलट आहे. शेतीसाठी सर्वांत महत्वाची गोष्ट आहे म्हणजे जमीन. जमीन विकत घेणे आणि विकणे हि प्रक्रिया किती क्लिष्ट आणि भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे हे मला इथे लिहायची गरज नाही. अनेक ठिकाणी फक्त शेतकरी शेतजमीन विकत घेऊ शकतो असा नियम आहे. त्याशिवाज एखादी जमीन शेतजमीन ठरली तर त्याचा इतर काहीही वापर केला जाऊ शकत नाही. जमिनीचे हे वर्गीकरण कसे व्हावे हे सोविएत पद्धतीने राजधानीत बाबू लोक ठरवतात. एक बाजूने "आमचा शेतकरी जमिनीला काळी आई म्हणतो" असे म्हणून बोंब मारायची पण त्याच पोराला त्याच्या आईला कसे वागवावे स्वातंत्र्य असत नाही. शेतकऱ्यावर इतका विश्वास आहे तर मग जमिनीचे वर्गीकरण करण्याची जबाबदारी त्याच्यावर का नको ? ती बाबू लोकांवर का ? अमिताभ बच्चन सारख्या माणसाकडे प्रचंड भांडवल आहे, हा माणूस शेतजमीन घ्यायला निघाला तर आनंदच आहे. कारण थोडे फार नुकसान झाले तरी त्याला काही फरक पडत नाही. त्याशिवाय बच्चन परिवार काही शेतीवर येणार नाही आणि बहुतेक करून लोकांना मजुरीवर ठेवून १ तारखेला हक्काने पगार घेता येणार आहे. पगार आहे म्हटल्यावर त्या लोकांना लोन वगैरे सहज मिळू शकते. पण नाही. बिगर शेतकरी लोकांनी शेती करायचीच नाही. त्याशिवाज खाजगी कंपनीना शेतीसाठी किंवा इतर गोष्टीसाठी जमीन घेण्याचा अधिकार नाही. तर म्हणे सरकार जमीन कवडीमोलात अधिग्रहण करणार आणि मग त्याचे वर्गीकरण करून इतर कंपनीनं देणार. ज्या शेतजमिनीची देखरेख ज्या शेतकऱ्याच्या ५ पिढ्यानी केली त्याला जमीन थेट विकण्याचा अधिकार नाही. लबाड राजकारणी मग आधीच जमिनी कवडीमोलाने घेतात आणि मग प्रोजेक्त आला म्हणून सरकार अधिग्रहण करते आणि कंपनीला विकते. मग बोंब मारायची कि टाटा, अंबानीने गरीब शेतकऱ्यांना लुबाडून जमीन घेतली. एके काळी देशाचे काय जगाचे वैभव असलेल्या बंगाल प्रदेशांत म्हणे TATA नि शेतकऱ्यांना लुबाडून त्यांची जमीन घेतली. प्रत्यक्षांत TATA ना जमीन विकत घेण्याचा अधिकारच नव्हता. जमीन बंगाल सरकारने अधिग्रहण केली होती आणि TATA ला ६ विविध जमिनीचे ऑप्टशन्स दिले होते त्यातून बिचाऱ्या TATA नी सिंगूर निवडले. मग बोंबाबोंब केली कि टाटा जमीन घेत आहेत. ज्या शेतकऱ्यांना शेती जमत नाही त्यांना मग शेती सोडता येत नाही. कोण त्यांची जमीन विकत घेणार ? इतर शेतकरी ? शेती भाड्याने द्यायची तर तिथे सुद्धा घाणेरडे कायदे आहेत. गोव्यांत कुळकायदा नावाचा अत्यंत घाणेरडा प्रकार आहे. तर म्हणे कसेल त्याची जमीन. मग शेती भाड्याने कोण आणि कशाला देणार ? ह्याच प्रकारचे कायदे विविध बदलाने इतर राज्यांत आहेत. एखादा माणूस चांगला शेतकरी असू शकतो पण आपली शेती सोडून तो फार दूरची शेती घेऊन तसेच उत्पन्न घेऊ शकत नाही. शेती सलग आणि जवळ जवळ असली तरच आपण "economy ऑफ स्केल" चा फायदा घेऊन उत्पादन क्षमता वाढवू शकतो. म्हशीचे दूध ह्या विषयांत भारत सर्व जगांत आघाडीवर आहे. का ? तर जमिनीच्या खरेदी विक्रीवर जी बंधने आहेत ती जनावरांवर नाहीत. एक चतुर भैय्या काहीही भांडवल नसताना महाराष्ट्रांत येऊन मुबई सारख्या शहरांत मग प्रचंड यशस्वी होऊ शकतो. पण हाच भैय्या विदर्भांत जाऊन शेती करू शकत नाही. शेतकऱ्यांची अवस्था सुधारायला पाहिजे तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना जमीन विकण्याचा १००% अधिकार असला पाहिजे. त्याशिवाय खराब शेतकरी जाऊन त्याजागी चांगले शेतकरी एणार नाहीत. **मागासलेली शेती** अमेरिकेत मी हल्लीच घर घेतले. ३ मजल्यांचे हे घर १००% लाकडाने बनले आहे. पाया सोडल्यास संपूर्ण घरांत कुठेही काँक्रीट आणि स्टील नाही. बांधकाम चालू असताना मी अभियंत्याशी बोलत होते तेंव्हा लक्षांत आले हि लाकूड हे स्टील पेक्षा स्वस्त तसेच त्या हवामानात टिकावू आहे. पण हे शक्य होण्यासाठी टिम्बर आवश्यक आहे आणि हा लाकडाचा धंदा शेवटी अत्यंत प्रगत अश्या लॉगिंग इंडस्ट्रीतून येतो. हि शेती फार वेगळ्या प्रकारची आहे. डग्लस फिर चे हे झाड आज पेरायचे आणि ३० वर्षांनी तोडायचे म्हणजे आपले भांडवल ३० वर्षे अडकून पडते. कुठल्या छोट्या खाजगी शेतकऱ्यांत हि क्षमता आहे ? कुठली बँक अश्या शेतकऱ्याला लोन देणार ? हि शेती फक्त एकतर मोठी कंपनी करू शकते किंवा माफिया लोक. आज काश्मीर, उत्तराखंड इत्यादी भागांत टिम्बर माफियांचे राज्य आहे. देशाला लाकडाची गरज आहे पण कायद्यांनी उद्योजकांचे हात बांधले आहेत तेंव्हा इथे स्मग्लर्स लोकांचेच राज्य येणार. ह्या लोकांनी मग निर्दयपणे लक्षावधी झाडांची कत्तल तर केलीच आहे पण फॉरेस्ट खात्यांत भ्रष्टाचार वाढवून ठेवला आहे. **शेतीचे भविष्य आणि वर्तमान** एके काळी शेती चे प्रगतीकरण म्हणजे बैल जाऊन ट्रॅक्टर आणणे होते. ट्रॅक्टरचा शोध १८४९ मध्ये १८५७ च्या बंडाच्या आधी झाला होता पण आज सुद्धा अनेक भारतीय शेतकऱ्यांना हा परवडत नाही. अनेक शेतकरी २० हजारांचे लोन काढून ३५ हजारांचे पीक घेतात. हे लोक ट्रॅक्टर कुठून आणणार? पण संपूर्ण जगांत शेती हा भांडवल आधारित उद्योग झाला आहे. आता मोठया शेती कंपनीत सॉफ्टवेअर अभियंते, बायोलॉजिस्ट, इत्यादींचा भरणा असतो. हे लोक कोट्यवधी खर्चून अत्याधुनिक तंत्रज्ञान शोधून काढतात. चांगलंही बियाणी, कीटकनाशके इत्यादी भारतात विशेष निर्माण होत नसली तरी इतर देशांत हि गृहीत धरली जातात. पुढील ३० वर्षांत शेतीची क्रांती हि कीटकनाशके किंवा बियाणाच्या द्वारे येणार नाही तर ती अत्यंत वेगळ्या क्षेत्रांत येणार आहे. आज शेती हि जमिनीवर आधारित असते कारण शेतीसाठी ३ गोष्टी लागतात. बियाणे, सूर्यप्रकाश आणि पाणी. ह्या तिन्ही गोष्टी स्वस्त पद्धतीने फक्त मोठ्या सपाट प्रदेशांत मिळतात. सूर्यप्रकाशासाठी सपाट प्रदेश हवा असतो तर पाणी सपाट प्रदेशावर विना पम्प पसरू शकते. येत्या तीन वर्षांत ऊर्जा हि अत्यंत स्वस्त होणार आहे. फ्युजन रिऍक्टर किंवा फ्युएल सेल मुळे ऊर्जेची किमंत जवळ जवळ शून्य होणार आहे त्यामुळे पाणी पसरवणे किंवा सूर्यप्रकाशही ह्यांची गरज भासणार नाही. ३० मजली बिल्डिंग मध्ये कुत्रिम प्रकाश आणि अत्यंत प्रिसाईझ पद्धतीने दिलेले कृत्रिम पाणी आणि मातीतील पोषक पदार्थ ह्यांच्या द्वारे शेती होणार आहे. व्हर्टिकल फार्मिंग ची स्वप्ने माणूस खूप वर्षांपासून पाहत असला तरी आता ते दृष्टिक्षेपांत आले आहे. दुबई, रॉटरडॅम, शांघाय, वायोमिंग इथे सध्या जगातील काही सर्वांत मोठे व्हर्टिकल फार्म्स निर्माण झाले आहेत. ऊर्जा महाग असल्याने काही वर्षे तरी हे प्रकल्प नुकसानीत चालणार आहेत पण एकदा हे फायद्यांत चालू झाले कि अन्नाची किंमत आणखीन घसरणार आहे. विविध क्षेत्रांत जसे AI, स्वयंचलित गाड्या, क्रिप्टो इत्यादी ठिकाणी भारताला बस आधीच चुकली आहे पण येत्या काही वर्षांत अत्याधुनिक शेतीत सुद्धा हि बस आम्हाला चुकणार आहे. भविष्यांत आमची मुले कदाचित IIT मधून थेट दुबईतील शेतीत सॉफ्टवेअर लिहिण्यासाठी जातील आणि इथे आपण कर्जमाफी ३०. वर चर्चा करीत बसलेले असू. थोडक्यांत मुद्दा हा कि शेती हा व्यवसाय आता 'लेबर इंटेसिव्ह' म्हणजे अंगमेहनतीवर आधारलेला नसून भांडवलावर आधारित बनत आहे पण ह्या बदलला भारतीय शेतकरी तयार नाही किंवा भारत सरकारने भारतीय जनतेचे हात बांधून ठेवले आहेत. त्यामुळे भारतीय उद्योजक ज्यांना क्षमता असून सुद्धा ह्या क्षेत्रांत घुसता येणार नाही आहे. (इंग्रजांनी भारतीय विणकरांचे म्हणे हात कापले होते, भारत सरकार सुद्धा हेच करत आहे). **इतर मुद्दे** आणखीही इतर अनेक मुद्दे आहेत जे भरतीय शेतीसाठी दुर्दैवी ठरणार आहेत. - आधारभूत किमतीमुळे जे धान्य आम्हाला नको आहे ते जास्त पिकवले जाते आणि ज्याची गरज आहे ते आयात करावे लागते. - आयात निर्यातीवर बंधने असल्याने शेतकऱ्यांना वधारलेल्या दरांचा फायदा होत नाही आणि भारतीय ग्राहकाला विनाकारण महागडे अन्न घ्यावे लागते. - शेतीतील मोठी गुंतवणूक फक्त सरकार करते त्यामुळे प्रचंड भ्रष्टाचार माजलेला आहे आणि देशाला फायदा सुद्धा होत नाही. - शेती हा धंदा मागासलेला असल्याने त्यावर आधारित इतर मूल्यवर्धन धंधे जास्त प्रगत झाले नाहीत. - बदलत्या हवामानाचा प्रचंड फटका भारतीय शेतकऱ्यांना येत्या ३० वर्षांत बसणार आहे, त्याच्यासाठी जी दूरदृष्टी लागते ती त्यांच्या कडे नाही. तात्पर्य: - शेतकऱ्यांना ज्यांना शेतीची आवड नाही किंवा ज्यांना जमत नाही, ज्यांची जमीन कमी आहे त्यांना शेती सोडून आपली जमीन भांडवलासाठी विकून इतर व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. - शेतीत खाजगी भांडवल अत्यंत महत्वाचे आहे आणि येत्या ३० वर्षांत खूप महत्वाचे असणार आहे. ते कॉर्पोरेट क्षेत्रच आणू शकतो. माझ्या मते इथे विदेशी गुंतवणुकीला सुद्धा स्वातंत्र्य दिले पाहिजे. ह्यामुळे आमच्या सारखे लोक शेती न करता शेती कंपनीचे भाग घेऊन शेतीत गुंतवणूक करू शकू. - भारतीय लोकांत प्रचंड उद्योजक क्षमता आहे पण अश्या लोकांना विनाकारण खलनायक ठरवून दारिद्र्याला चांगले ठरवण्याची जी भारतीय लोकांची मानसिकता आहे ती बदलायला पाहिजे. १० वर्षे आधी मी जेंव्हा असे मत व्यक्त कार्याचे तेंव्हा लोक भडकून उठायचे. पण आता साम्यवादी लोकांना मिपावरील इतर वाचक जेंव्हा सडकून झोडतात तेंव्हा देशाची मानसिकता बदलत आहे ह्याची जाणीव होते. टीप : क्ष वाईट अ चांगला अशी बाळबोध पणाची समजूत अनेक लोकांची असते. मग अश्या मुर्खपणामुळे सर्व व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी वागतात हि साधी गोष्ट लोक समजू शकत नाही आणि त्या दृष्टीने सुटसुटीत सोपे कायदे बनवू शकत नाहीत. उदाहरणार्थ काही मूर्खांचा के युक्तिवाद असतो कि 'समजा सर्व शेतकऱ्यांनी संप करून अन्न पिकवणे बंद केले तर?' हा युक्तिवाद "आत्याला मिश्या असत्या .. त्या प्रकारचा आहे" . मानवी समाजांत प्रत्येक व्यक्तीला आपले वेगळे विचार असतात, वेगळ्या महत्वाकांक्षा असतात आणि आम्ही त्यांना एका ग्रुप मध्ये टाकले म्हणून त्या लोकांना काही एखादी "ग्रुप मानासिकता" उत्पन होत नाही. त्यामुळे सर्व शेतकरी संप करतील अशी अपेक्षाच मुलांत सर्व स्टेट बॅंक वाले एक दिवस कार्यक्षम पणे काम करतील अशी निरर्थक आहे. कारण "शेतकरी" असा homogenious असा ग्रुपच नाही. आहेत तर व्यक्ती आणि ह्या सर्वाना कायद्याने एक वेगळी व्यक्तीच म्हणून पहिले आणि वागवले पाहिजे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 78788 views

🗣 चर्चा (195)
स
सोत्रि Sun, 01/03/2021 - 12:03 नवीन
शिळ्या कढीला ऊत... - (हौशी शेतकरी) सोकाजी
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Sun, 01/03/2021 - 12:07 नवीन
लेख फारच आवडला. शेतकरी असो की सैनिक की डॉक्टर की इतर कुणी, त्याचा सामूहिक जयजयकार केला की आपली नैतिक जबाबदारी झटकता येते. भावनात्मक मुद्द्यांवर रचना झालेल्या समाजाला मूर्ख बनवणे फार सोपे असते. इतकेच नव्हे तर असा समाजही एकमेकाला मूर्ख बनवण्याची चढाओढ करू लागतो. यात ताकदवान आणि गब्बर लोकांचे फावते.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sun, 01/03/2021 - 12:24 नवीन
लेख आवडला. आपण सुसूत्रपणे मांडणी केली आहे. पण मुळातच समजून घ्यायची तयारी नसल्याने काही जण या मुद्द्यांवर निरर्थक वाद घालत बसतात, त्यांचा प्रतिवाद करायचा कंटाळा येतो! अजून एक मुद्दा म्हणजे वाढत्या लोकसंख्येनुसार होणारे जमिनीचे वाटप. एकदोन एकरातून होणाऱ्या अत्यंत तुटपुंज्या मिळकतीत पुढच्या पिढीचे ना शिक्षण करता येते, ना व्यवसाय. आणि त्यांनी शेती करू नये या विचाराने त्यांना शहरात फुटकळ नोकरी कशी मिळेल याचा प्रयत्न लहान शेतकरी करतात.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/03/2021 - 13:01 नवीन
शेती ह्या विषयावर बरेच लेखन केले आहे.
हो, बरेच लेखन प्रतिसाद इथे वाचले आहेत.
मी स्वतः एक छोटीशी बागायत बाळगून आहे.
हो, ही माहितीही काही प्रतिसादामधून वाचली आहे.
अमेरिकेत मी हल्लीच घर घेतले.
वाह ! क्या बात है, अभिनंदन. भारतातील शेती अमेरिकेतून पाहता की कसं ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sun, 01/03/2021 - 15:08 नवीन
(मी चांगली शेतकरी नाही आहे त्यामुळे बागायतीत जास्त लक्ष घालत नाही. इतर व्यक्ती घालतात, बागायतीचे सूत्रे मी हाती घेतली तर उत्त्पन्न अर्धे व्हायचे).
प्राडॉ... वगैरे.... कुणालातरी 'बाहेर राहून शहाणपणा शिकवताहेत' अशा समजुतीने झोडपतांना, हे वाचायचे राहून गेलेले दिसते?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/03/2021 - 15:23 नवीन
आपण कशाला वाईट वाटून घेत आहात, इतर व्यक्ती लक्ष घालतात असं असलं तरी त्यांनी शेती केली तर अर्धे उत्पन्न होतं. तरी त्यांचं त्यांच्या शेतीवर लक्ष असणे, कोणाला तरी त्यांनी करायला सांगणे यात वाईट काय आहे, आता त्यांनी शेतीत काय बदल केले, पारंपरिक पद्धती ऐवजी काही नवीन बदल, पद्धती जाणून घ्यायचं आहे. आपण पाहता का त्यांची शेती इकडे ? -दिलीप
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sun, 01/03/2021 - 15:32 नवीन
तुमचा प्रश्न हा होता.. "वाह ! क्या बात है, अभिनंदन. भारतातील शेती अमेरिकेतून पाहता की कसं ?" तर त्याचे उत्तर लेखातच होते. "आपण कशाला वाईट वाटून घेत आहात".... मिपा हा काही तुमचा वर्ग नसल्याने, कुठल्याही लेखावर अथवा प्रतिसादावर, कुणीही प्रत्युत्तर देऊ शकतो, ह्याची आठवण करून देणे जरूरी वाटते आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/03/2021 - 15:38 नवीन
कोणीही कुठेही लिहू शकतो, पण त्यांची व्यक्तिगत 'शेती पाहण्याबद्दल' अधिक उत्तर त्याच देऊ शकतात असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पिनाक Sun, 01/03/2021 - 20:15 नवीन
तसं असतं तर लेखाबद्दल (आणि बाकी गोष्टींबद्दल) बाकीच्यांनी लिहायचं बोलायचंच नाही असा समाजवादी कायदाच असता. नाही का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 01/07/2021 - 21:58 नवीन
ऐकावे ते नवलच.
  • Log in or register to post comments
स
साहना Sun, 01/03/2021 - 21:31 नवीन
सर्व माहिती दिली असती पण त्याचे प्रयोजन काय?
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 01/04/2021 - 01:14 नवीन
>आता त्यांनी शेतीत काय बदल केले, पारंपरिक पद्धती ऐवजी काही नवीन बदल, पद्धती जाणून घ्यायचं आहे. ह्यावर कदाचित एक वेगळा लेख लिहिला जाऊ शकतो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/04/2021 - 10:50 नवीन
>>>>ह्यावर कदाचित एक वेगळा लेख लिहिला जाऊ शकतो. जरूर लिहा....! शेतक-यांबद्दल, शेतीबद्दल इतक्या पोटतीडकेने आजकाल कोण लिहितं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 01/04/2021 - 12:21 नवीन
शेतक-यांबद्दल, शेतीबद्दल इतक्या पोटतीडकेने आजकाल कोण लिहितं.
उंटावरून शेळ्या हाकणारे =))
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 01/07/2021 - 22:02 नवीन
लोक मुहूर्त बघून योग्य वेळी शेती विषयी लिहतात. त्या मुळे असे लेख योग्य वेळीच येतात. ह्याची dr दिलीप ह्यांनी दखल घ्यावी.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 01/03/2021 - 16:59 नवीन
कशाला भारताची काळजी करत आहे लेखिका जिथे राहता त्या देशाशी एकरूप व्हा. येथील काळजी घेण्यास येथील लोक समर्थ आहेत. तुम्ही अमेरिकेचे भवितव्य कसे उज्वल होईल त्या साठी प्रयत्न करा. चीन कधी ही अमेरिकेला भारी पडू शकतो त्याची काळजी घ्या.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 01/04/2021 - 01:49 नवीन
लेखिकेने लिहिलेल्या मुद्द्यांवर एकवेळ असहमत होण्याचा अधिकार राजेश्१८८ तुम्हाला जरूर आहे परंतु मांडायला मुद्दा नसला कि मग "लेखक भारताबाहेरील आहे" हा तोच तोच मुद्दा काढायचा....
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sun, 01/03/2021 - 13:25 नवीन
रोख आणि ठोक.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 01/03/2021 - 15:07 नवीन
अमेरिकेची लोक संख्या 30 कोटी असेल आणि त्याचे क्षेत्र फळ भारताच्या 7 पट आहे. त्या मुळे तेथील जमिनीची प्रतेक व्यक्ती मालकी ही भारता पेक्षा खूप जास्त आहे. शेती परवडते की नाही हा विषय नंतर चर्चेला घेवू. जमिनीची मालकी ही भविष्यात खूप महत्वाची आहे. सायन्स सर्व निर्माण करेल पण जमीन निर्माण करू शकत नाही. जमीन ही दुर्मिळ म्हणून गणाली जाईल. त्या मुळे जे शेतकरी आहेत त्यांच्या कडे जमिनी आहेत त्यांनी शेती नाही केली तरी विकावी हा सल्ला अयोग्य आहे. शेती करा किंवा करू नका पण जमिनी वर ची मालकी बिलकुल सोडू नका . त्या साठी भविष्यात रक्तपात सुद्धा करायची तयारी ठेवा. पाण्याचा व्यवसाय करणार चीन मधील उद्योग पती अंबानी पेक्षा श्रीमंत आहे. जो सर्व अन्न धान्य पिकवेल तो व्यक्ती ब्रह्मांड मध्ये सर्वात श्रीमंत असेल (बाकी ग्रहावर माणूस राहतो असे समजा) उगाच नाही उद्योगपती शेती ताब्यात मिळावी म्हणून पाण्यात देव बुडवून बसले आहेत. खूप वर्ष पूर्वी एका इकॉनॉमिक्स वर आधारित magzine च्या कव्हर पेज वर मुकेश अंबानी चे नांगर खांद्यावर घेवून फोटो होता.. जमीन काळी आई आहे म्हणजे j आई चे रक्षण जसे जीव पणाला लावून केले जाते तसे अमूल्य asya तुमच्या जमिनी चे रक्षण पण जीव पणाला लावून च करा. लहान काश्मीर च्या जमिनी chya तुकड्यासाठी किती लोकांनी प्राण पणाला लावले. जमीन महत्वाची नसती तर दिले असते ना काश्मीर पाकिस्तान ला आणी अरुणाचल चीन ला.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 01/03/2021 - 16:06 नवीन
अमेरिकेची लोक संख्या 30 कोटी असेल आणि त्याचे क्षेत्र फळ भारताच्या 7 पट आहे. बेसिकमध्येच लोचा आहे. अभ्यास व वाचन वाढवा. उगाच नाही उद्योगपती शेती ताब्यात मिळावी म्हणून पाण्यात देव बुडवून बसले आहेत. बेसिकमध्येच लोचा आहे. अभ्यास व वाचन वाढवा. क्षणभर असं गृहीत धरले की उद्योगपतींंना शेतजमीन हवी आहे. समजा ती मिळाली तरी उद्योगपती ती जमीन उद्योगासाठीच वापरतील. त्या जमिनीवर शेती अजिबात करणार नाहीत. शेती करा किंवा करू नका पण जमिनी वर ची मालकी बिलकुल सोडू नका . त्या साठी भविष्यात रक्तपात सुद्धा करायची तयारी ठेवा. नका सोडू मालकी. परंतु वारंवार काहीही फुकट मागू नका आणि स्वतः अन्नदाता, जगाचा पोशिंदा, बळीराजा वगैरे आहे या भ्रमात राहू नका. जमीन महत्वाची नसती तर दिले असते ना काश्मीर पाकिस्तान ला आणी अरुणाचल चीन ला. बेसिकमध्येच लोचा आहे.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Sun, 01/03/2021 - 17:11 नवीन
बेसिकमध्येच लोचा आहे.
त्यांच्या सगळ्याच गोष्टींमध्ये लोचा आहे. मग ते मुद्देसूद प्रतिसाद देणे असो किंवा मराठी ले़खन असो.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 01/03/2021 - 15:18 नवीन
खूप मोठमोठ्या नोकऱ्या असणाऱ्या विविध क्षेत्रातील लोकांच्या नोकऱ्या जातात तेव्हा त्यांची अवस्था अत्यंत बिकट होते. माणसाच्या बेसिक गरज अन्न,वस्त्र,आणि निवारा हे शेती देवू शकते . त्या मुळे नोकरी असली तरी शेती पण असावी आणि ती करावी. तुमची नोकरी कधी गेली तरी पोटभर खाऊ शकता आपल्या स्वतःच्या जमिनी वर राहू शकता. व्यावसायिक पद्धती नी शेती नसेल करत तरी ती सोडू नका. शेतमाल विकत घेताना खूप महाग असतो भले विकताना त्याला किंमत नसेल. शहरी माणसाला दोन पाहुण्यांना चार दिवस जेवण देणे असंभव असते. पण शेतकरी 4 माणसे आरामात महिनाभर सांभाळू शकतो.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 01/03/2021 - 15:57 नवीन
ह्या वाक्यावर जोर जोरात हसले पाहिजे. सोयीचे भाताचे उदाहरण घेवून बुद्धिभेद करणे ह्याचे उत्तम उदाहरण. शेती मध्ये जी अनेक उत्पादन घेतली जातात त्या मध्ये किती तरी पीक उत्पादनात भारत ह्यांच्या लाडक्या अमेरिका पेक्षा पुढे आहे. आणि ते सुद्धा आधुनिक साधनांची कमतरता असताना सुद्धा
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 01/03/2021 - 16:07 नवीन
Russia France Germany Buckwheat China Russia France Canary seeds Canada Thailand Argentina Fonio Guinea Nigeria Mali Maize (corn) United States Brazil China Millet India Niger Sudan Oats Russia Canada Spain Quinoa Peru Bolivia Ecuador Rice, paddy China India Indonesia Rye Germany Poland Russia Sorghum United States Nigeria Sudan
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 01/03/2021 - 16:21 नवीन
Vegetable First Second Third Fourth Fifth Lettuce and chicory Philippines India China Spain Italy Lentil Canada India Turkey Dry Bean India Canada Myanmar China Nigeria Onion (dry) China India Egypt United States Iran Cabbage and other brassicas China India Russia South Korea Ukraine Green bean China Indonesia India Turkey Thailand Green pea China India United States France Egypt Chickpea India Australia Myanmar Ethiopia Turkey Pulses (total) India Poland Mozambique United Kingdom Pakistan Cauliflowers and Broccoli China India United States Spain Mexico Eggplant China India Egypt Turkey Iran Potato China India Russia Ukraine United States Spinach China United States Japan Turkey Indonesia Cassava (yuca) Nigeria Brazil Thailand Indonesia Ghana Soybean Brazil United States Argentina India China Carrots and turnips China Uzbekistan Russia United States Ukraine Cucumber China Russia Turkey Iran Ukraine Ginger India Nigeria China Indonesia Nepal Pumpkin, squash and gourd China India Russia Ukraine United States Rapeseed Canada China India France Germany Safflower Kazakhstan Russia Mexico भारतीय शेती उत्पादन मध्ये कसे जगात अव्वल आहेत अमेरिका पेक्षा त्याची वर काही उदाहरणे दिली आहेत. पण डोळे असून आंधळे असणारे भारतीय शेतकरी कसा कमचोर आहे . भारतीय शेतकरी उत्पादन घेवू शकत नाही ह्याचा अप्रचार फक्त बुद्धिभेद करण्यासाठी च करत आहे. लाडकी अमेरिका आधुनिक साधन असून सुद्धा भारताच्या मागे च आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sun, 01/03/2021 - 17:23 नवीन
ही क्रमवारी तुम्ही कुठून आणलीत, हे नि:संदिग्धपणे (म्हणजे स्पष्ट शब्दांत, किमान दुवे देऊन) सांगितलेत तर आम्ही अज्ञ मिपाकर आपले बहुत उपकृत होवू. आता हे दोन दुवे येथे व येथे पाहिलेत, तर असे दिसून येते भारतातील शेतीचे प्रति एकर पीक सरासरी ८४० किलोग्राम्स्/एकर येते. तेच अमेरिकेत, सोयाबीन्ससाठी १,३०६ कि.ग्रा./एकर ते मका, ४,३१८ कि.ग्रा/एकर असे आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 01/04/2021 - 01:00 नवीन
दुर्दैव आहे आणखी काही नाही ! तांदळाच्या उत्पादन क्षमतेत भारत १४९व्या नंबरवर आहे. भारताच्या खाली इराक, होंडुरास, इथोपिआ आहे तर भारताच्या वर पाकिस्तान, नेपाळ इत्यादी आहेत. https://www.indexmundi.com/agriculture/?commodity=milled-rice&graph=yield अर्थांत तुम्ही इथे रक्तपात आणि काय काय बाता करत आहात त्यामुळे तुमच्याशी वाद घालणे व्यर्थ आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 01/04/2021 - 07:44 नवीन
दर हेक्टरी भाताचे उत्पादन घेण्यात भारताचा 49 नंबर आहे. पण दर हेक्टरी उत्पादन जास्त घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खत,कीटकनाशक ,अगदी हार्मोन्स मध्ये सुद्धा पिकांच्या बदल केला जातो. जेवढे जास्त उत्पादन( ठराविक मर्यादपर्यंत च नैसर्गिक उत्पादन असते त्या नंतर कृत्रिम पना असतो.)तेवढं त्याचा दर्जा कमी होतो. अमेरिकेत जो भात पिकवला जातो त्याचा दर्जा काय आहे ह्याची पण तुम्ही माहिती दिली तर बरे होईल. जगातील टॉप 5 जाती आहेत जसे बासमती, काळा तांदूळ(चीन) ह्याचे उत्पादन तिथे होते का. ह्याची पण माहिती ध्या. तुमच्या च लिंक च्या माहिती नुसार भारत जगात सर्वात जास्त तांदूळ एक्सपोर्ट करतो. फक्त quantity बघू नका क्वालिटी पण बघावी लागते. ऑरगॅनिक पद्धतींनी घेतलेले उत्पादन हे प्रती हेक्टर खूप कमी असते. ह्याचा पण विचार करायचा असतो
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Mon, 01/04/2021 - 11:42 नवीन
"भारतीय शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता कमी आहे" हे शीर्षक देऊन तुम्ही तुमच्या सदर प्रतिसादांत म्हटलेत... "शेती मध्ये जी अनेक उत्पादन घेतली जातात त्या मध्ये किती तरी पीक उत्पादनात भारत ह्यांच्या लाडक्या अमेरिका पेक्षा पुढे आहे." ह्याचा सर्वसामान्या अर्थ, एकरी पीक घेण्याच्या संदर्भात आहे. एखाद्या पीकाच्या प्रतवारीकडे नाही. म्हणून मी तुम्हाला येथे त्या अनुषंगाने सध्या उपलब्ध असलेली माहिती दिली, ज्यायोगे तुमचे विधान खोडून जावे. त्याला तुमचे नेहमीप्रमाणेच काहीही उत्तर नाही. सर्वच देश सर्व पीके घेत नसतात. अमेरिकेची प्रमुख पीके मका (corn), सोयाबीन व नंतर गहूं. तुमच्या ह्या भाताच्या प्रतिच्या तुलनेप्रमाणे, कुण्या अमेरिकेनाने मका अथवा (आपण घेत असलोच तर) सोयाबीन ह्यांच्या, त्यांच्या व आपल्या प्रतिंची तुलना करणे, तुमच्या आता नव्या उगवलेल्या तुलनेइतकेच गैर आहे. एका मुद्द्याला धरून न बोलण्याचे तुमचे कसब, तुमच्या इतर सर्वच भुगाळ, इकडून तिकडे पळत असलेल्या प्रतिसादांप्रमाणेच आहे, ह्यांत नवल काय ?
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sun, 01/03/2021 - 16:26 नवीन
हा लेखपण सविस्तर आणि चांगला आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 01/03/2021 - 16:29 नवीन
शेतकऱ्यांना फुकटे म्हणता ना. तर शेतकऱ्यांना फुकट काय काय मिळत त्याची यादी ध्या. उद्योगपती शेती मिळाली तर शेती करणार नाहीत उद्योग करतील. ह्या तुमच्या वाक्याचे स्पष्टीकरण ध्या. ज्या उत्पादन ला हमखास गिऱ्हाईक आहे ते उत्पादन म्हणजे शेती उत्पादन. बाकी उत्पन्नात भारतीय उद्योगपती ना. चीन चारी मुंड्या चितपट करत आला आहे. ते शेतीच करणार किंवा त्या जमिनी मधील खनिजे,तेल ,पाणी ह्यांचा च व्यवसाय करणार. आणि त्या साठीच सर्व खटाटोप चालला आहे.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sun, 01/03/2021 - 16:51 नवीन
व्हर्टिकल फार्मिंग भविष्यात गेम चेंजर ठरेल. अल्पभूधारकांना पारंपरिक पद्धतीने शेती आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 01/03/2021 - 17:49 नवीन
भविष्यात अल्प भू धारक लोकांना शेती परवडणार नाही हे वाक्य बरोबर आहे. व्यवसाय चे रूप बदलत गेले काही व्यवसाय बंद पडले नवीन व्यवसाय सुरू झाले . असे परिवर्तन शेती मध्ये आले आहे. शेती ला जोड धंद्याची साथ असावीच लागते हे लोक जाणून आहेत. आणि तसे प्रयत्न पण शेतकरी करत असतात. भविष्यात सकस अन्न मिळणे दुर्मिळ होईल विविध रासायनिक खत ,रासायनिक कीटक नाशक,उत्पादन वाढवण्ासाठी बी बियाण्यास केलेल्या जेनेटिक बदला मुळे शरीरास हानिकारक अन्न धान्य च बाजारात असेल. जे अल्प भूधारक आहेत त्यांनी त्यांची जमीन फक्त स्वतः साठी उत्तम दर्जा चे अन्न धान्य,आणि भाज्या उत्पादनासाठी करावा. खूप खर्च महिन्याचा वाचू शकेल .
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sun, 01/03/2021 - 18:48 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 01/03/2021 - 19:48 नवीन
माणसाच्या जीवनात सर्वात जास्त रोजचा खर्च बाजार भावा प्रमाणे काढला तर जेवण आणि पाणी ह्या वरच होवू शकतो. एका माणसाला बाजारभाव प्रमाणे दोन वेळचे जेवण आणि नाष्टा ह्याचा खर्च कमीत कानी 700 रुपये रोज येणारच 3 माणसाचे कुटुंब असेल तर रोज चे 2100 रुपये महिन्याला 63 हजार रुपये. एका व्यक्ती ल रोज 80 ltr पाणी लागतेच लागते. कमीत कमी 2 रुपये ltr पाण्याचा दर पकडला तरी कुटुंब मधील 3 माणसं साठी 240 ltr कमीत कमी पाणी लागेल 480 रुपये झाले .14400 महिन्याला झाले फक्त पाणी आणि जेवण ह्या वर महिन्याला 77400 रुपये खर्च फक्त पाणी आणि जेवण ह्या वर च होईल. कोणत्या ही नोकरदार मध्ये एवढं खर्च करण्याची बिलकुल ताकत नाही. शेती लहान शेतकरी करतात आणि पाणी सरकारी नियंत्रणात आहे म्हणून ऐश चालू आहे. आणि म्हणूनच पोपट पंच्छी पण चालू आहे. एक हाती उद्योगपती शेती उत्पादन घेवू लागला तर मोठं मोठ्या नोकरदार ची हौस फिटेल आता 10 रुपये किलो कांदा बटाटा घेवून जे ज्ञान वाटप चालू आहे ते बंद होईल . उद्योग पती 10 रुपये किलो बटाटा कधीच विकणार नाही 100 रुपया च्या खली त्याला परवडणार पण नाही. जगात पाणी आणि शेती ही कोणत्याच देशात उद्योग पती ना सोपवलेली नाही त्यांना अक्कल आहे. फक्त भारतात मोदी आणि त्यांची पार्टी स्वतःच्या स्वार्थ साठी देशाला संकटात टाकण्याचे काम करत आहे. आणि अंध भक्त हो हो करत आहेत.
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Sun, 01/03/2021 - 20:19 नवीन
काहीही म्हणजे काहीही बोलताय तुम्ही, काही तर्क संगत बोलत जा जरा.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 01/04/2021 - 00:10 नवीन
दिवसाचा खाण्याचा खर्च 700 रुपये वाचून 22 लाखाचा ट्रक आठवला =)) लिहिणारे आणि असे लिखाण ठेऊ देणारे...सगळेच ####
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 01/04/2021 - 05:46 नवीन
तुमचे अर्थज्ञान शाबर मंत्र तंत्रातून येते का अशी शंका आहे. अहो माणूस "घेऊन" सुद्धा असे बरळत नाही. तुम्ही काही तरी स्ट्रॉंग पदार्थ हुंगतात असे वाटते. कदाचित स्वामी नित्यानंद इथे डुआयडी वापरून मराठीतून लिहितात असे वाटते. > दोन वेळचे जेवण आणि नाष्टा ह्याचा खर्च कमीत कानी 700 रुपये रोज येणारच ह्यांत तुम्ही आपल्या ह्या "स्पेशल पदार्थांचा" खर्च सुद्धा धरला आहे का ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 01/04/2021 - 08:22 नवीन
एका व्यक्ती ला दिवसाला 700 रुपये हे कमीत कमी लागतील. असा त्याचा अर्थ आहे. जास्त शंका असेल तर हॉटेल आणि खानावळी चे मेनू कार्ड पण पाठवतो.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 01/04/2021 - 12:23 नवीन
जास्त शंका असेल तर हॉटेल आणि खानावळी चे मेनू कार्ड पण पाठवतो.
पाठवा, मला बघायचे आहे :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 01/06/2021 - 10:13 नवीन
ते मेनुकार्ड कधी येतेय? कि खाणावळच डब्यात गेली? =))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 01/09/2021 - 15:00 नवीन
ते मेनुकार्ड कधी पाठवताय? पुढला मिपाकट्टा तिथेच करु :)
  • Log in or register to post comments
म
मामाजी Mon, 01/04/2021 - 12:35 नवीन
बाहेरून मागवलेल्या जेवणासाठी एका माणसाचा एक दिवसाचा खर्च 700 रूपये येतो हे आपले ठाम मत आहे बरोबर. आता अंदाजा प्रमाणे या शेतकरी आंदोलनात जवळपास 25000 गरीब शेतकरी गेले 40 दिवस दिल्ली सीमेवर आांदोलन करत आहेत. त्यांचा फक्त जेवायचा खर्च हा 25000 x 700 x 40 = 700000000 (सत्तर कोटी) . एवढा झालेला आहे. अर्थातच हा फक्त साध्या जेवणाचा खर्च आहे यात काजू, बदाम व पिझ्झा ईत्यादी पदार्थ समावीष्ट नाहीत. आता माझा आपल्याला एक साधा प्रश्न की या उस्फुर्त आंदोलनासाठी या गरीब व कर्जबाजारी शेतकर्यांकडे ऐवढे पैसे कुठुन आले?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/04/2021 - 15:06 नवीन
माझा आपल्याला एक साधा प्रश्न की या उस्फुर्त आंदोलनासाठी या गरीब व कर्जबाजारी शेतकर्यांकडे ऐवढे पैसे कुठुन आले?
मामाजी, अब आगे चलो. दिल्लीच्या बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात खाण्या-पिण्याची संपूर्ण जी सोय करण्यात आली त्यात अनेक संस्था शेतकऱ्यांसाठी लंगरची व्यवस्था करत आहेत. मोबाइल चार्जींग, औषध व्यवस्था, बाकी ते आंदोलनात चीन-पाकिस्तानचा हात (बातमी) काँग्रेस, डावे, दिल्लीवाले, आणि अशांची मदत होत आहेत या आरोपांपेक्षाही पुढे काही तरी नवीन आलं पाहिजे, हे सर्व आरोप करुन आंदोलनाची हवा काढण्याचा प्रयत्न झाला आहे. पण, हे आंदोलनकर्ते चिवट असल्यामुळे, वेल प्लॅन्ड असल्याने, संघटनांमधे असलेल्या एकीने त्यांच्या आंदोलनाने चांगला तग धरला आहे, हे मान्य केले पाहिजे. आपल्याकडे कोणत्याही विषयाकडे आणि आंदोलनाकडेही पक्षीय दृष्टीकोनाने पाहिल्या जातं, हे मागे एका प्रतिसादात लिहिले आहे, तसेच, हेच आंदोलन जर काँग्रेस आणि इतर पक्षांचे सरकार असतांना असे आंदोलन झाले असते तर इथे जी देश विदेशातून आणि येथून येणारी बरीच मतं बदललेली दिसली असती. जसे की दिल्लीला अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवालचं आंदोलन सुरु होतं तेव्हा आम्ही स्वातंत्र्यांचे आंदोलन पाहिले नाही पण हे आंदोलन देशात एक नवे वातावरण करणारे होते. अतिशय हवा त्या आंदोलनाने निर्माण केली. त्याचा फायदा कसा झाला कोणाला झाला तो आताचा विषय नाही. हे सर्व विचार परिस्थिती, हीत, आपली दृष्टी कशी आहे त्या अंगाने येत असते. शेतक-यांचे आंदोलन चीवटपणे सुरु आहे, सरकारने रस्ते खोदून पाहिले. थंडी-वा-यात पाण्याचे फ़वारे मारुन पाहिले, देशद्रोही म्हणून पाहिले, आंदोलनात शेतकरी नव्हे, फ़ुटीरवादी आहेत हे म्हणून पाहिले, लाठीमार करुन पाहिला, वाट्सॅप विद्यापीठात आंदोलनाबद्दल उलट-सुलट बातम्या प्रसारित करुन पाहिल्या, शेतकरी आंदोलन सोडून टीव्हीवर दिवस रात्र एकच बातमी दळण दळणा-यांनी इतर अनेक बातम्यावर टाइमपास केला. मराठी वाहिन्यांवर कापसाच्या बोंडअळीचं नायनाट कसा करावा या विषयावर माहितीपूर्ण चर्चा करीत राहीले तरीही सरकारला आंदोलनकर्त्यांशी सारख्या चर्चेच्या फ़े-या कराव्या लागत आहेत. आज सातव्या फेरीची चर्चा फिस्कटली असे ऐकतो आहे. तरीही संवाद दोन्ही बाजूने सुरु आहे. आंदोलनाची केवळ देशात चर्चा होत नाही तर त्याची प्रतिक्रिया बाहेरच्या देशातही उमटत असतात. जसे की कॅनडाच्या पंतप्रधानांनी आंदोलनकर्त्यांना पाठींबा दिला आणि शांततापूर्ण आंदोलन करणा-यांची सुरक्षितता जपली पाहिजे असे म्हटले होते, अर्थात सरकारने ''कोणत्याही लोकशाही देशाच्या अंतर्गत मुद्यांवर बोलणं योग्य नाही'' (बातमी) आपल्या मिपा भाषेत 'तो आमच्या देशाचा प्रश्न आहे, बाहेरच्यांनी लक्ष घालू नये. आम्ही आमचं पाहून घेऊ' असे म्हटले होते. शेतकरी आंदोलनात कोणाचा हात आहे, कोन मदत करतंय या पेक्षा आपल्यावर जेव्हा अन्याय होत आहे, असे वाटते तेव्हा व्यवस्थेविरुद्ध लढलं पाहिजे हा संदेश मला वाटतं हे आंदोलन देत आहे, आंदोलनात आत्तापर्यंत पन्नासपेक्षा अधिक शेतक-यांचा मृत्यु झाला आहे, प्रश्न चूक असेल, बरोबर असेल, आंदोलन करणा-यांची पद्धत चूक असेल, मागण्या योग्य असतील, अवाजवी असतील तरीही आंदोलनात जाणारा जीव एक माणूस असतो, तो कोणाच्या तरी कुटंबातला एक घटक असतो, तो भारतीय असतो. त्याच्या प्रती सहवेदना असायला हवी असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 01/04/2021 - 15:20 नवीन
सहवेदना असायला हवी सहवेदना आहे हो. कोणतंही मानवी आयुष्य संपल्याबद्दल माणसाला सहानुभूती असतेच. तुमच्या औरंगाबाद येथे मजूर परत जाताना थकून रेल्वेच्या रुळावर झोपले आणि गाडीखाली मरण पावले तेंव्हा पण सहवेदना होती परंतु रेल्वे "रुळावर" झोपणे हे मुळातच फार चुकीचे आहे हे गृहीत न धरता सरकारवर फक्त टीका झाली होती. गडावर सेल्फी घेताना खाली पडून जोडप्याचा मृत्यू याबद्दल कोणी आनंद व्यक्त करेल का? पण हि सेल्फी घेण्याची जागा नाही हे सामान्य माणसाला समजते पण तेथे पूर्वग्रह नसतो. मी काय म्हणतो ते समजले असेल अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 01/04/2021 - 15:40 नवीन
आंदोलन करताना मृत्यू आला म्हणून आंदोलन बेकायदेशीर ठरते का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 01/04/2021 - 15:59 नवीन
येथे कायद्याचा संबंध कुठे आला?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 01/04/2021 - 16:08 नवीन
ओके. मग हलगर्जीपणा म्हणायचे का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/05/2021 - 06:22 नवीन
बहुतांशी दुर्दैव. हलगर्जीपणा कुणाचा? लाठीमार किंवा गोळीबारात मृत्यू झाला तर तो अनैसर्गिक आहे. पण हृदयविकारामुळे झाला तर त्यात सरकारचा काय दोष?
  • Log in or register to post comments
म
मामाजी Tue, 01/05/2021 - 02:55 नवीन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर माझा परत साधा प्रश्न या उस्फूर्त आंदोलनकर्त्या गरीब शेतकर्यांची संख्या किती आहे?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा