आवाज आवाज...

आवाज आवाज...
दिवाळी म्हटलं की भल्या पहाटे नरकचतुर्दशीला उडवलेल्या 'लक्ष्मी बाँब'चा आवाज कानांत घुमतो. आसपासच्या परिसरात अगदी पहाटेपासून उडणारे फटाके दिवाळी चालू झाल्याची वर्दी देत असतात. गेल्या सहा वर्षांपासून मी मस्कत येथे वास्तव्यास आहे. इकडे एकतर दिवाळीची सुट्टी नाही, त्यामुळे जे काही सेलिब्रेशन करायचं ते शुक्रवार-शनिवारच्या वीकांताला. शिवाय इकडे फटाके उडवण्यावर बंदी असल्याने दिवाळीचा म्हणावा तसा 'माहोल' नसतो. एकंदरीत भारताच्या मानाने इकडे आवाज कमीच. अगदी नाइलाज झाल्यासच कारचा हॉर्न वाजवणं असा अलिखित नियम असल्याने हॉर्नचेदेखील आवाज नाहीत. रस्त्यावरील रहदारीचे तुरळक आवाज, जवळच्या मशिदीतली बांग आणि अधून-मधून येणाऱ्या कबुतरांचे गुटर-गू सोडल्यास इतर आवाज कानांवर फारसे पडत नाहीत. त्यामुळे कमी आवाजाची सवय झाल्यावर भारतात सुट्टीवर आलो असता रोजचे नेहमीचे आवाज जास्त प्रकर्षाने जाणवतात.
अगदी पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग येते. त्यानंतर दूधवाले, पेपरवाले, कचरेवाले ह्यांच्या वाहनांचे आवाज. लांबून "भाआआजेय" असा भाजीवाल्याचा खणखणीत आवाज ऐकून भाजी घेण्यासाठी लोक येतात. वरच्या मजल्यावर राहणारे बरेच ज्येष्ठ नागरिक बाल्कनीतून भाजीवाल्याकडे लांब दोरीला पिशवी बांधून खाली टाकतात. Online shopping with Cash on Deliveryची सुरुवात बहुधा इथूनच झाली असावी.
सीझननुसार आंबे, पेरू, सीताफळं वगैरे विकणाऱ्यांच्या हाळी देण्याच्या विविध तऱ्हा. "काळी काळी मैना, डोंगरची मैना"वाल्या बाईचा 'लई ग्वाड' आवाज अजूनही कानात घुमतो. सकाळी असे पैसे खर्च झाल्यावर दुपारी मग थोडे पैसे कमावण्याची संधी. 'ए रद्दी पेपोरऽऽऽऽऽ' आणि “पलाऽऽसटीक ..... बाऽऽऽऽटली ......भंगाऽऽऽऽऽऽरवालेएएएएएएएय” अशा आवाजांनी अवघा आसमंत दुमदुमून जातो.
भाजी-फळ विक्रेत्याखेरीज खाद्यपदार्थ विकणाऱ्याचेदेखील विविध आवाज. रबरी भोंगा पुक-पुक वाजवत इडलीवाला, खारी-टोस्ट विकणारा मुसलमान, उसाचा रस काढून देणाऱ्या लाकडी गाडीचा खडखडाट, घंटानाद करत येणारा कुल्फीवाला. पूर्वी अनेक कलाकारदेखील हजेरी लावायचे. सकाळी येणाऱ्या वासुदेवाचा पोषाख बघायला आणि गाणी ऐकायला आवडायचं. 'पिंगळा' नामक माणसाबद्दल कायम कुतूहल वाटायचं. लांबवरून येणारा त्याचा पहाडी आवाज, त्याचा देखणा नंदीबैल इत्यादीबद्दल एक गूढ आकर्षण होतं. पेटी वाजवत 'रमया वस्तावया' गाणारा आंधळा आणि त्याची (कायम) गरोदर असणारी बायको. माकडाचा खेळ करणारा मदारी आणि त्याच्या डमरूचा आवाज, डोंबाऱ्याच्या ढोलाचा आवाज, नागपंचमीला 'नागोबाला दूSSSSध' मागणारा आवाज.
चाकू-सुऱ्यांना धार करून देणारे धारवाले आणि भांड्यांना कल्हई लावणारे कल्हईवालेदेखील विशेष आवडीचे. त्या स्पेशल सायकलचे पायडल मारत 'धार करताना उडणाऱ्या ठिणग्या आणि टर्र्र्रर्र्रर्र्र आवाज' अतिशय आवडायचा. कल्हईवाला ४-५ भांडी जमली की मग रस्त्याच्या एका कोपऱ्यात मांडामांड करून विस्तव पेटवायला लागला, की मी समोरच बैठक मारायचो. एखादी ‘जादू झाल्याप्रमाणे जुनं भांडं क्षणार्धात लखलखीत दिसायला लागतं’. 'लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योती या' गाणं ऐकल्यावर मला खरं तर कल्हईचं चंदेरी भांडं आणि धार करताना उडणाऱ्या कोटी ठिणग्या आठवतात.
घरोघरी गॅस आल्यानंतर सकाळी स्टोव्हला पंप मारण्याचा आवाज बंद झाला. त्या आवाजाची उणीव स्कूटर्सना 'किक' मारण्याच्या आवाजाने काही अंशी भरून काढली. हिवाळ्यातदेखील सकाळी सकाळी घाम काढण्याचे श्रेय बजाज, व्हेस्पा, विजय वगैरे कंपन्यांना द्यायला हवे. आता 'इलेक्ट्रॉनिक स्टार्ट'मुळे स्कूटर्सच्या 'किका'टण्याची जागा अॅक्टिव्हाच्या 'खाकरण्याने' घेतलीये. अॅक्टिव्हा नुसतं बटन दाबून चालू होत असली, तरी सकाळी पहिल्यांदा किक मारून चालू करावी असं म्हणतात. होंडाने 'ग्राहकांची गैरसोय हाच आमचा संतोष' ह्या धोरणानुसार 'किक' बसवली असावी. त्या अरुंद जागेत पाय घालून अतिशय घट्ट किक मारण्याचा त्रास ज्याने अनुभवलाय, त्यालाच ह्यामागची तळमळ समजू शकते. १२-१५ वेळा किक मारूनही गाडी चालू झाली नाही तर असली किक डिझाइन करणाऱ्याच्या पार्श्वभागावर किक मारण्यासाठी (दुखरा) पाय सळसळत असतो. गाडी वाकडी केल्यास चालू होण्याचं 'बजाजचं कॉपीराइट' तरी निदान होंडावाल्यांनी विकत घ्यावं अशी कळकळीची मागणी आहे.
आता घरटी किमान एक कार असल्याने सकाळी सकाळी कार्सच्या रिव्हर्स हॉर्नचे देखील अनेक आवाज ऐकू येतात. साध्या 'पुक पुक'पासून अगदी ओम जय जगदीश आणि झिंगाटपर्यंतच्या धून घरबसल्या ऐकू येतात.
आता National Geographic, Animal Planet आणि तत्सम चॅनल्सवर घरबसल्या आफ्रिकेच्या जंगलातील शिकारी बघता येतात. पूर्वी आमची मांजरं उंदीर, कबुतरं वगैरे मारायची, तीच काय ती Live शिकार बघायला मिळायची. आता मांजरांना 'कॅट फूड' नामक 'चखना' आयता मिळतो. त्यामुळे तीदेखील शिकारीच्या भानगडीत पडत नसावीत. आमच्या लहानपणी क्वचित डुकरांचा आवाज आणि मागून कुत्र्यांचं जोरजोरात भुंकणं ऐकू यायचं. मग आम्हा पोरांच्या उत्साहाला पारावार राहायचा नाही. डुक्कर पकडणारे लोक कुत्र्यांना डुकरांमागे सोडून दोरीच्या फासात पकडताना बघायला अतिशय थ्रिल वाटायचं. मात्र पकडल्यानंतर तोंड बांधताना डुकरांचं विव्हळणं मात्र ऐकवायचं नाही.
रात्री गुरख्याच्या 'जागते रहो'च्या आरोळीबरोबर रस्त्यावर काठी आपटण्याचा आवाज. 'जागते रहो'मागचं प्रयोजनदेखील कळायचं नाही. परीक्षेच्या काळात अभ्यास म्हणून आणि श्रावणात मंगळागौरीनिमित्त वगैरे जागणं ठीक आहे. चोरांच्या भीतीने रोज जागरण केलं, तर दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये झोपा काढाव्या लागतील. मग पुढे घरात चोरायलादेखील काही शिल्लक राहणार नाही!
सणासुदीला प्रसंगानुरूप विविध आवाजांची भर पडायची. निवडणुका जवळ आल्यावर रिक्षामधून केलेला 'ताई माई अक्का'चा प्रचार. शिवजयंतीला घराजवळचं गणेश मंडळ लाउडस्पीकरवर पोवाडे लावायचं. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला देशभक्तीची गाणी. गणेशोत्सवात तर भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विविध आवाज सतत कानी पडायचे. मराठी-हिंदी गाण्यांबरोबर 'Are you ready' आणि 'मैसम्मा' अशी इतर भाषांतील गाणी ऐकायला मिळायची. मला खातरी आहे की 'मुंगळा' हे गाणं आम्हा गणेशभक्तांनी जितक्या वेळा ऐकलंय, तितकं स्वतः उषा मंगेशकरांनीदेखील ऐकलं नसेल! आसपासच्या सोसायट्यांमधून संध्याकाळी 'आरतीला चला रे'च्या आरोळ्या ऐकू येत असत. आता आरतीची वेळ झाली की सोसायटीच्या व्हॉट्स अॅप ग्रूपवर मेसेज करतात.
काळ बदलला, लोकांचं राहणीमान बदललं. जुन्या छोट्या सोसायट्या पाडून मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये लोक राहायला गेले. मुख्य गेटवर 'फेरीवाल्यास आत येण्यास सक्त मनाई'चे बोर्ड्स असतात. इकडे आत फक्त येतात पिझ्झा आणि अॅमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरेची डिलिव्हरी पोरं. पोस्टमनशी आपुलकीच्या गप्पा होत नाहीत, कारण तो बिचारा खाली लावलेल्या लेटर बॉक्समध्ये पत्रं टाकून खालच्या खालीच निघून जातो. सुदैवाने पक्ष्यांना आत यायला मज्जाव नसल्याने ते अजूनही किलबिल करतात. पण घरोघरी येणाऱ्या टीव्हीच्या आणि मोबाइल फोन्सच्या गोंगाटांत ती गोड किलबिल ऐकू येईनाशी झालीये. ह्या सृष्टीत इतके गोड आवाज निर्माण करणाऱ्या DJला म्हणावसं वाटतं की 'आवाज वाढव DJ तुला आईची शपथ हाय'.

- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments