बिथरलेले हिंदूत्व
स्वातंत्र्यपूर्व काळामधे त्या वेळच्या इंग्रज राज्यकर्त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमधे डावं-उजवं करण्याचा प्रयत्न केला.
अनेकदा हिंदूंना डावलून मुसलमानांना झुकतं माप दिलं गेलं. यामुळे हिंदूंमधे आपल्याला डावललं जातं आहे अशी एक सुप्त भावना होती.
यातूनच हिंदूत्वाच्या राजकारणाला सुरुवात झाली. सावरकरांनी भारतीय राजकारणामधे हिंदूत्वाचा ठळकपणे उच्चार केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा हेसुद्धा हिंदूत्वाचाच आधार घेत होते. संघाची राजकीय शाखा असलेल्या भारतीय जनसंघाने सुद्धा हिंदूत्वाचे राजकारण केले. स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी पूर्वीच्या राज्यकर्त्यांचाच कित्ता गिरवला.
त्यामुळे स्वतंत्र भारतामधेही हिंदूंमधे डावलले गेल्याची भावना तशीच राहिली. त्यामुळे हिंदूत्वाच्या राजकारणाला बळकटी मिळत राहिली.
पुढे शाहबानो प्रकरण घडले. एका मुसलमान स्त्रीला कायद्याने दिलेला न्याय, कायदा बदलून नाकारण्यात आला. हे काही मुल्ला मौलवींची मर्जी राखण्यासाठी झाले.
यामुळे हिंदूत्वावर आधारित राजकारण करणाऱ्यांना आयते कोलीतच मिळाले आणि मग त्यांनी सरकारच्या विरोधात रान पेटवले.
"बघा बघा हिंदूंनो तुमची दखलसुद्धा घेतली जात नाही आणि मुल्ला मौलवींची मात्र मर्जी कशी राखली जाते पहा" असे हिंदूत्ववादी हिंदू जनतेला सांगत राहिले.
हिंदूंवरती सतत कसा अन्याय होतो आहे असे सांगणारे हिंदूत्ववादी हिंदूंच्या विरोधात बघा कसे संघटित षडयंत्राचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगताना लव्ह जिहाद सारखे मुद्दे पुढे आणू लागले. हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या कथा रंगवून रंगवून सांगितल्या जायला लागल्या आणि यामधून हिंदूंना फक्त आम्हीच सोडवू शकतो असे म्हणून स्वतःचे महत्व वाढविण्याचा हिंदूत्ववादी प्रयत्न करू लागले.
ह्या देशांत हिंदू धर्म खतरे में असे म्हणायला हिंदूत्ववाद्यांना संधीची कमतरता कधीच भासली नाही. त्यांना भांडवल करता येईल असे मुद्दे सतत मिळत राहिले.
यातूनच ज्या राजीव गांधींनी शाहबानोचा निर्णय फिरवला, त्याच राजीव गांधींना हिंदूंना खूष करण्यासाठी अयोध्येच्या मंदिराचे दरवाजे उघडावे लागले.
हिंदूत्वाचे राजकारण सुरूच राहिले. आपल्यावर अन्याय होतो आहे हे म्हणणे विरोधात असताना तसे सोपे असते. छोट्या छोट्या गोष्टींचे भांडवल करून जनतेमधे असंतोष उभा करता येतो.
सरकारने हज यात्रेला सबसिडी दिली तर "त्यांना देता मग आम्हाला का नाही" किंबहुना "आम्हा हिंदूंना डावललं जातंय" ही आवडती बोंब ठोकता येते आणि त्यातून राजकारण साधता येते, स्वतःचे महत्व अबाधित राखता येते.
या सगळ्या प्रयत्नातून अखेर हिंदूत्ववादी म्हणवणार्या पक्षांना भारतामधे सत्ता मिळाली. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर बसले.
पण आजवर हिंदूंवर सतत अन्याय होतो आहे, हिंदूंना सतत डावललं जात आहे अशा प्रकारच्या तक्रारी करण्याची सवय पडलेल्या कार्यकर्त्यांना आता मात्र कुठलाच उद्योग राहिला नाही. कारण तक्रार तरी कुणाच्या विरोधात करायची ? सरकार त्यांचेच होते.
पण हिंदूंवर अन्याय होतो आहे अशी रडारड करण्याची सवय मात्र गेली नाही. ती वेगळ्या स्वरूपात बाहेर यायला लागली.
आपल्याकडे मूळातच जंगलतोड खूप झालेली आहे. राखायला पाहिजेत अशी जंगले सुद्धा आपण राखू शकलेलो नाही. त्या ठिकाणी माणसाचे अतिक्रमण झाले. त्यामुळे होळीच्या निमित्ताने तरी लाकडे जाळू नका आणि वृक्षतोड करू नका.
निसर्गाने आपल्याला दिलेले पाणी मर्यादित आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने आपल्या घरातले पाणी नासू नका त्यामुळे आपलीच गैरसोय होणार आहे.
असे कोणी सांगायला गेले की बिथरलेले हिंदूत्ववादी अंगावर यायला लागले. आम्हा हिंदूंनाच तुम्ही बंधने का घालता ? त्यांच्या बकरी ईदला ते इतके पाणी खर्च करतात मग आम्ही पाण्याची नासाडी का करू नये असे युक्तिवाद ऐकू यायला लागले.
दिल्लीतील प्रदूषण पाहून सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली त्यावेळी अनेक हिंदूत्ववाद्यांनी त्याचा निषेध केला. काही जणांनी तर आजवर आपण फटाके उडवत नव्हतो पण केवळ निर्णयाचा निषेध करण्यासाठी फटाके उडविणार आहोत असे जाहीर केले.
नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर हिंदूत्ववादी निस्तेज व्हायला लागले. पर्यावरणाच्या विनाशामधे हिंदूत्व शोधायला लागले.
सत्तेमधे बसलेले लोक आपापले काम करत होते पण सत्तेबाहेर राहणाऱ्या हिंदूत्ववादी गटांमधे मात्र तू जास्त भगवा की मी अशी अहमहमिका सुरु झाली. पूर्वी अहिंदूंचे कसे लाड होत आहेत म्हणून त्यांच्या विरोधात लढणारे हिंदूत्ववादी आपापसात लढून स्वतःचे उपद्रवमूल्य वाढवण्याचा प्रयत्न करू लागले. गो सेवकांच्या हिंसाचारामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना कानपिचक्याही दिल्या.
ज्या हिंदूत्वाने आयोध्येसारखे लढे उभारले, तेच हिंदूत्ववादी आता अगदी क्षुल्लक मुद्यांचे केविलवाणेपणाने राजकारण करताना दिसू लागले.
राजकारणातला आणखी एक सुप्त हेतू असतो. तो म्हणजे आपल्याला मते देणाऱ्यांना चुचकारणे आणि आपल्या विरोधात असणाऱ्यांना झोडपणे, धाक दाखवणे, बदनाम करणे. हिंदूत्ववाद्यांनी एक प्रकारे हिंदूंना चुचकारले आणि आपल्याला मते न देणाऱ्या अहिंदूंना इशारे दिले, धाक बसवला.
सुरुवातीला हिंदूत्ववादी अशी प्रतिमा असणाऱ्या नरेंद्र मोदींना केवळ हिंदूंचेच नव्हे तर मुस्लिमांचे सुद्धा समर्थन मिळू लागल्यानंतर मुस्लिमांना दुखावणे परवडणारे नव्हते. मुस्लिमांच्या विरोधात लव जिहाद वगैरे सारखे मुद्दे मांडणे सुद्धा आता अवघड झाले.
कारण आपल्याला मत न देणाऱ्याला सर्व प्रकारे कोंडीत पकडण्यासाठी निरनिराळे प्रचाराचे, अपप्रचाराचे मुद्दे वापरले जातात. ते मुद्दे तो आपला मतदार झाल्यानंतर पुन्हा बासनात गुंडाळून ठेवावे लागतात.
लव जिहादचे प्रकरण म्हणून सांगितलेली एक केस 2017 मधे न्यायालयाने फिरवली आणि त्या मुलीला पुन्हा आपल्या नवऱ्याबरोबर राहण्याची मुभा देण्यात आली. लव जिहादची हाकटी पिटणारे तोंडावर आपटले.
मुसलमान सुद्धा आपला मतदार झाल्यानंतर हिंदूत्ववादी राज्यकर्ते त्यांच्या अजानच्या वेळी आपली सभा थांबवून ठेवू लागले. अशा वेळी हिंदूत्ववाद्यांना आपलेच दात ओठ खाण्यावाचून दुसरा काही पर्याय राहीला नाही.
पुढचा काही काळ तरी हिंदूत्वाला भारतामधे मार्केट राहणार नाही, असे दिसते.
१९४७ साली देशाची घर्माधारीत पाळणी केली गेली !डँबीस साहेब, ते सर्व मला माहीत आहे आणि तुमची चीड सुद्धा मी समजू शकतो. पण मी पाणी नासणारच या हट्टाबद्दल तुमचे मत सांगा.<बरे, मी पाणी नासणारच !! अस जरी कोणी म्हंटल्यामुळे पुर्ण हिंदु धर्माला व पुर्ण हिंदु जनतेला दोष देणे थांबवा !या गोष्टी हे लोक हिंदुत्वाच्या नावाखालीच करत आहेत.हिंदुत्वाचे राजकारण -फाळणी होण्याचे मुख्य कारण म्हणजे मुसलमानांना त्यांचा वेगळा देश पाहिजे होता. जेव्हा तो दिला गेला तेव्हा स्वतःला मुस्लिम देश म्हणवणाऱ्या पाकिस्तानची निर्मिती झाली. पण तरीही हिंदू बहुसंख्य असलेल्या भारत देशाला हिंदू देश म्हणवून घ्यायची लाज अजूनही वाटते. तेव्हापासून जे मुस्लिमांचे कौतुक सुरु आहे ते अजूनही संपले नाहीये. जेव्हा बहुसंख्य असूनही हिंदूंना फक्त मुसलमानांच्या सोयीसाठी वाकायला लावले जाते तेव्हा आपल्याला डावललं जातंय ही भावना निर्माण होण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाची गरज नाही. उदाहरण म्हणजे मुंबईत रस्त्यांवर नमाज पढणे चालू झाल्यावर, हिंदूंनीही आरती चालू केली. पण याबद्दल दोन्ही गटांना समजावण्याची भूमिका न घेता फक्त हिंदूंवर टीका करण्यात आली. दुसरं उदा. म्हणजे मुस्लिम नेत्यांनी, लेखकांनी आणि अभिनेत्यांनी हिंदू देवदेवतांवर कसेही बीभित्स प्रदर्शन केलेले चालते, त्यावर हिंदूंनी आक्षेप घ्यायचा नसतो कारण ते मुस्लिमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते. पण एखाद्या हिंदूने फक्त पैगंबराविषयी वा कुराणाविषयी वा नुसत्या मशिदीविषयी काही बोलले तरी त्याच्यावर कारवाई होते. याचा ढळढळीत पुरावा म्हणजे कमलेश तिवारीची केस घ्या. अखलाखला मारण्यात आलं म्हणून एवढा गवगवा झाला पण गायींना वाचवण्यासाठी झटणाऱ्या प्रशांत पुजारीची भर बाजारात हत्या झाली तेव्हा अखलाखच्या १% सुद्धा गवगवा झाला नाही. अजूनही केरळमध्ये आणि प. बंगाल मध्ये हिंदू लोकांवर अत्याचार होत आहेत त्यावर सार्वजनिक मौन का आहे? २.लव्ह जिहाद- अगदी खरं खरं प्रेम जुळून लग्न केलं तर कोणालाच काही आक्षेप असायचं कारण नाही. पण मग या प्रेमात पत्नीने धर्म बदलावा अशी मागणी आणि जबरदस्ती का होते? रश्मी शाहबाजकरचं उदाहरण घ्या, धर्म बदलण्यासाठी जबरदस्ती होऊ लागली म्हणून मग तिला पोलीस कम्प्लेंट करावी लागली. प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या लोकांचे म्हणणे वाचा इथे आणि इथे. तरीही तुम्हाला वाटू शकतं की हे सर्व खोटं सांगत आहेत. त्या वाटण्याला कोणी काही करू शकत नाही त्यामुळे स्वतः सजग राहून आजूबाजूला बघा आणि अनुभव घ्या. परिसरातल्या वयात येणाऱ्या मुलींवर नजर ठेवून सगळी माहिती काढली जाते. ती मुलगी कुठे जाते, कधी जाते, बरोबर कोण असतं, तिच्या आवडीनिवडी काय आहेत ईई. दुसरीकडे जरा बऱ्या दिसणाऱ्या मुस्लिम मुलांना ग्रूम केलं जातं, या मुलींपैकी एखादी मुलगी त्याला टार्गेट करायला सांगितलं जातं. मुलाला चांगले कपडे, मोबाइलला पैसे दिले जातात तसेच मुलीवर खर्च करण्यासाठी सुद्धा पैसे दिले जातात. एकदा मुलगी जाळ्यात फसली की मग एक तर शरीरसंबंध प्रस्थापित करून ब्लॅकमेल करायचे किंवा लग्नाचे अमिष दाखवायचे. दोन्हीची परिणीती शेवटी धर्मांतराच्या जबरदस्तीमध्ये होते. 3.ह्या देशांत हिंदू धर्म खतरे में असे म्हणायला हिंदूत्ववाद्यांना संधीची कमतरता कधीच भासली नाही. त्यांना भांडवल करता येईल असे मुद्दे सतत मिळत राहिले.या वाक्यातच तुम्ही मान्य करताय की हिंदू धर्म धोक्यात आहे असं वाटायला लावणाऱ्या घटना घडत आहेत. 4.सरकारने हज यात्रेला सबसिडी दिली तर "त्यांना देता मग आम्हाला का नाही" किंबहुना "आम्हा हिंदूंना डावललं जातंय" ही आवडती बोंब ठोकता येते आणि त्यातून राजकारण साधता येते, स्वतःचे महत्व अबाधित राखता येते.यात नुसती बोंब ठोकली जात नाहीये तर सत्यता पण आहेच ना? कुठल्या हिंदू यात्रेसाठी सबसिडी दिली जाते ते सांगा. दुसरीकडे इस्लामिक जाणकार सांगतात की हज यात्रेसाठी कोणाची मदत घेऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे सबसिडी घेतल्यावर फक्त एअर इंडिया ची विमानसेवा वापरायला लागायची. उलट आता कुठलीही विमानसेवा वापरून बऱ्याच कमी पैश्यात जात येतं. सबसिडीतून वाचलेले पैसे मुस्लिम मुलींच्या शिक्षणासाठी वापरायचा निर्णय घ्यायची हिम्मत सुद्धा याच "हिंदुत्ववादी" सरकारने दाखवली. या आधीच्या सरकारांनी फक्त लांगुलचालन केलं. 5.आपल्याकडे मूळातच जंगलतोड खूप झालेली आहे. राखायला पाहिजेत अशी जंगले सुद्धा आपण राखू शकलेलो नाही. त्या ठिकाणी माणसाचे अतिक्रमण झाले. त्यामुळे होळीच्या निमित्ताने तरी लाकडे जाळू नका आणि वृक्षतोड करू नका. आणिरंगपंचमीच्या निमित्ताने आपल्या घरातले पाणी नासू नका त्यामुळे आपलीच गैरसोय होणार आहे.मी लहान असल्यापासून आमच्या आजूबाजूला सगळीकडे होळीसाठी अगदी कमी लाकडं ती सुद्धा अगदी कुचकामी असलेली वापरायचो. बाकी सुकलेल्या काटक्या, नारळाच्या झावळ्या यांनी सजावट व्हायची. लाकूड जपायला पाहिजे हे खरंच आहे पण होळी साठी कोणी झाडं तोडून लाकूड वापरत नाही कारण सुकं लाकूड पाहिजे असतं. रंगपंचमी मुख्यतः रंगांनी खेळली जाते, ते धुवायला मात्र अंघोळ करताना जास्त पाणी वापरलं जातं. आता प्रॉब्लेम कुठे आहे हे बघा.... पाणी वाचवलं पाहिजे हे खरंच आहे, पण मग जेवढा विरोध रंगपंचमीला पाण्याची नासाडी होते म्हणून होतो तेवढाच विरोध त्याच कारणासाठी बकरी ईदला होतो का? केला तर परिणाम माहित आहेतच.दिल्लीतील प्रदूषण पाहून सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली त्यावेळी अनेक हिंदूत्ववाद्यांनी त्याचा निषेध केला. काही जणांनी तर आजवर आपण फटाके उडवत नव्हतो पण केवळ निर्णयाचा निषेध करण्यासाठी फटाके उडविणार आहोत असे जाहीर केले.दिल्लीमध्ये प्रदूषण मुख्यतः वाहने आणि विविध कारखान्यांमुळे होते. त्यात भर पडते जेव्हा हरियाणा आणि आसपासच्या प्रदेशात शेतं जाळली जातात. फटाक्यांनी पण प्रदूषण होते पण वर्षातल्या २-३ दिवसांच्या फटाक्यांनी असा कितीसा फरक पडत असेल? हे वाचा. या निर्णयाला विरोध व्हायचं दुसरं मुख कारण म्हणजे अगदी दिवाळीच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला. जे फटाके तयार होऊन बाजारात आले आहे त्यांचं काय करायचं? ज्या कारागिरांनी ते तयार केले आहेत त्यांच्या पोटावर पाय आला तसेच ज्या व्यापाऱ्यांनी ते घेऊन ठेवले त्यांना पण आर्थिक नुकसान होणार. याचा विचार झाला का? ध्वनिप्रदूषणाबद्दल तुम्ही बोलला नाहीत पण २-३ दिवसांतल्या संध्याकाळच्या काही तासांच्या फटाक्यांपेक्षा, ३६५ दिवस रोज ५ वेळा लाऊड स्पीकर वर वाजणाऱ्या हाकेने जास्त ध्वनीप्रदूषण होत नसेल? माझा तर कुठल्याही प्रसंगी वाजणाऱ्या लाऊडस्पीकरला विरोध आहे, मग ते रोज ५ वेळा वाजणारी बंग असो व गणेशोत्सवात वाजणारी गाणी असोत. माझा थोडक्यात मांडायचा मुद्दा असा की एका घरातील दोन भावंडांमध्ये जर एखाद्याला सतत झुकते माप दिले जात असेल तर दुसऱ्या भावाला त्याची जाणीव होतेच. त्यासाठी कोणी पढवायची गरज भासत नाही. जर कालांतराने सुद्धा मिळणाऱ्या वागणुकीत फरक पडला नाही मग ही अन्यायाची भावना वाढीस लागून त्याचे रूपांतर बंडात होते.दुसऱ्याच्या घरातलं पाणी नासलं तर मी समजू शकतो.इथे आपल्याच घरातली लोकं नासली आहेत त्याचं काय? सध्या तर हिंदू चालीरीती पाळणे अगदीच डाउनमार्केट समजले जाते. साधा वटपौर्णिमेसारखा किंवा गुढी पाडव्यासारखा सण किंवा करवा चौथ वगैरे सण साजरे करणं म्हणजे अगदीच गावंढळपणा असतो. त्यापेक्षा थँक्स गिविंग, क्रिसमस किंवा ईद वगैरे कसे भारदस्त वाटतात. ईदच्या दिवशी पठाणी वेष घालून भाईजान लोकांना मिठ्या मारणे म्हणजे आपण किती पुढारलेले असतो पण पाडव्याच्या दिवशी झब्बा सलवार घालून आपल्या भाऊबंदांना शुभेछया द्यायच्या म्हणजे अगदीच काहीतरी वाटायला लागतं तेव्हा समजावं आपल्याला पुरोगामित्वाचा रोग जडलाय. देवळात जाणं म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालणं असतं. पण तरुण लोक सुद्धा जर कट्टर मुस्लिम चालीरीती पाळत असेल तर तो त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग असतो. घरात कोणी साधा सत्यनारायण केला तर गुरुजी त्यांना फसवत असतो. पण मौलाना पैसे घेऊन निकाह हलाला करत असेल तर मात्र ते धार्मिक असतं. स्वतःला आधुनिक पुरोगामी समजणाऱ्या लोकांना राखी पोर्णिमेसारखे किंवा भाऊबिजेसारखे सण साजरे करायला पण आजकाल लाज वाटते. स्वतःच्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या परंपरा आणि चालीरीती यांना मूर्खपणा मानणे या मानसिक प्रदूषणाचे काय करणार ते सांगा.