'मुर्ग तंगडी छाल-के-साथ'. अर्थात - चिकन आळशी!
विनम्र सूचना: कृपया वेळ कमी असल्यास नमनाचे घडाभर तेल गाळून थेट पाककृती वाचणे.
जर गरज हि शोधाची जननी असली तर आळस हि आजी आहे.
एकट्याचा स्वयंपाक करताना भाज्या सोलणे, त्या छान बारीक बारीक चिरणे असल्या गोष्टींचा मला भयंकर आळस.
कारण सोपे आहे - 'रांधा, वाढा नी उष्टी काढा' हे सगळे स्वतःच करायचे असल्याने (संजीव कपूर बनायची विच्छा असूनही) 'मिनिमम कष्ट, मॅक्सिमम
उदरभरण' ह्या तत्वावर चालणे क्रमप्राप्त असते.
तर अश्याच आळशीपणाच्या गरजेतून जन्माला आलेला हा एक नवा प्रकार.
ज्यांना खायला घातला त्यांनी 'चव छान आहे' अशी (कदाचित सौजन्यातुन आलेली; असेनात का) प्रतिक्रिया दिली.
येथील इतर सहाळश्यांना ह्या प्रयोगाचा फायदा होईल ह्या (उदात्त) हेतूने पाककृती देतो आहे.
तर झालं असं कि मध्यंतरी मोठ्याबाजारातून(सुपरमार्केट) कोंबडीचे अस्थिरहित 'ब्रेस्टपीस'(कृपया सुटसुटीत प्रतिशब्द सुचवा) आणून, त्याचे तुकडे करून रस्से/मसाले बनवायचा आळस आला.
मग ब्रेस्टपीसना स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणून आधीच सुटे सुटे असणारे, कापाकापीची गरज नसणारे अस्थियुक्त 'लेगपीस' (कृसुप्रसु) आणून खायला सुरवात केली. लेगपीस ची किंमत अर्धी, मांस अधिक लुसलुशीत आणि चवही चांगली होती. शिवाय कुर्चा (कार्टिलेज) आणि हाडे चावायला मजा येत होती ती वेगळीच. पण ह्यात गोची अशी कि इकडे जे लेगपीस मिळतात ते त्यावरच्या त्वचेसकट.
मग दर वेळी ती (लिबलिबीत आणि पटकन न निघणारी) त्वचा हाताने ओढून काढायचा अतिरिक्त आळस आल्याने 'थेट अख्खे लेगपीसच का वापरू नयेत?' हा विचार मनात डोकावला. भर म्हणून इकडे कोंबड्या सर्रास त्वचेसकट खाल्ल्या जाताना (रोटीसेरी आणि विन्ग्स (पंखे?)) पहिले होतेच.
मग काय? कोंबडीच्या त्वचेच्या मानवी शरीरावरील संभाव्य परिणामावर थोडा फार व्यासंग केला आणि मनाचा हिय्या करून अख्खे लेगपीस मुरवायला (ब्राइनिंगला) ठेवले. बाकी तयारी केली. म्हणजे आले, लसूण आणि नेहमीच्या मिरच्या मिळत नसल्यानं मोहक केशरी रंगाच्या हाबानेरो मिरच्या इत्यादी.
शिवाय अख्खे (उत्तर भारतीयांच्या भाषेत बिचारे 'खडे' (!)) मसाल्याचे पदार्थ आणि इतर (बैठे, सोये कि लेटे?) मसाले गोळा केले.

सामग्री:
५ ते ६ चिकन लेगपीस (म्हणजे अख्खी तंगडी नव्हे. गुढघ्यापासून खालचा भाग. जिज्ञासूंनी प्रकाशचित्र पहावे)
२ मोठे लाल कांदे (चिरायची हौस असतील तर ३ मेळवावे)
४ ते ५ मोठ्या लसणीच्या पाकळ्या
पावणेतीनच इंच आले (का ते विचारू नका)
५ ते ६ हिरव्या मिरच्या. नसल्यास मिरची घराण्यातील इतर नातलग, चवीनुसार
कपभर दही
अख्खे मसाले -
एक तमालपत्र
अर्धा चमचा अक्ख्या मिऱ्या
इंचभर दालचिनी
तीन-चार वेलच्या
एक जावित्री (जायफळाच्या बीजाचे वेष्टन)
एक चक्रफुल (उर्फ स्टार-अनिस, नावाप्रमाणेच ह्या पदार्थातिल स्टार मसाला आहे)
इतर मसाले -
अर्धा चमचा लाल मिरच्यांची पूड
अर्धा चमचा मिरपूड
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा धन्याची पूड
अर्धा चमचा जिऱ्याची पूड
अर्धाच चमचा विकतचा 'मीट मसाला' (किंवा तत्सम जो मिळेल तो)
मीठ चवीनुसार

कृती:
सर्वप्रथम आलं लसूण आणि मिरच्या वाटून घेतले.
भांड्यात (कुकर, कृसुपसु) अख्खे मसाले पळीभर तेलात पळभर परतले.

मग (आळस न करता जितके बारीक कापता आले तितकेच) चिरलेले लाल कांदे घालून त्यांना भाजायला सुरवात केली, साधारण पाच मिनिटे.

(वाफ धरल्याने प्रकाशचित्र धूसर आलेय)
दहा मिनिट परतल्यावर, कांदा आपला मूळ वाण सोडून कॅडबरी सारखा दिसायला लागल्यावर (तपकिरी रंगावरून होऊ शकणाऱ्या बाष्कळ विनोदाचा मोह आवरलाय) आलं,लसूण आणि हाबानेरो मिरचीचे वाटण सोडले आणि अजून ५ मिनिट शिजवले.
नंतर त्वचेसकटचे लेगपीस, इतर मसाले आणि दही मिसळले.

शेवटी अगदी थोडा 'मीट मसाला' घालून (अति सर्वत्र वर्जयेत। आधीच टाकलेल्या खड्या-बैठ्या मसाल्यांची आठवण ठेवून) कुकरला दोन (बहुतेक तीन) शिट्ट्या काढल्या. मीठ बेताने घातले, कारण मुरवताना लेगपीसेस मध्ये बरेच टाकले होते.

पाककृतीत अगदी गरजेच्या वगळता इतर कुठल्याही गोष्टी (भाज्या, टोमॅटो, बटाटे वगैरे) न घालण्याचे कारण 'लेखकाचा अंगभूत अमाप आळस' हे असल्याचे चाणाक्ष वाचकांच्या एव्हाना लक्षात आले असेलच!
तर ह्या ठिकाणी, अश्या प्रकारे, मिनिमम कष्टांनंतर तयार झालेला प्रकार म्हणजे 'चिकन आळशी'

चित्रात लेगपीसवरची त्वचा थोडी ओढून दाखवली आहे.

नेहमीपेक्षा चवीत फार फरक नाही पडला.
पण रस्सा थोडा चिकट झाला आणि बहुदा त्वचेची मूळ चव गोडुस असल्यानं बऱ्याच हाबानेरो घालूनही हवा तितुका तिखट नाही झाला.
असो.
तात्पर्य हे कि आळश्यास गंगा जरी फलदायी होत नसली तरी त्याची कोंबडी चवदार होऊ शकते.
ह्यातून प्रेरणा घेऊन अजुन कोणी असा प्रयोग करून पहिला तर त्याविषयी वाचायला आवडेल.
पाककृती कशी वाटली ह्यावरचे विचार आणि सुचलेल्या सुधारणा ह्यांचे स्वागत.
धन्यवाद.
आपले,
आषाढ_दर्द_गाणे
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments