उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर १२ : ओस्लो नगरी (३, मुक्तसफर)
Book traversal links for उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर १२ : ओस्लो नगरी (३, मुक्तसफर)
====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...
====================================================================
बस आम्हाला परत घेऊन आली तरी ओस्लोतल्या सगळ्या प्रेक्षणीय स्थळांची यादी संपली नव्हती. पण आता ओस्लो ओळखीचे शहर झाले होते. परतीच्या प्रवासात गाइडशी चर्चा करून एक मार्ग ठरवून घेतला आणि उरलेल्या अर्ध्या दिवसात स्वतःच जिवाचे ओस्लो करायचे ठरवून सिटी हॉलशेजारी बसमधून उतरलो.
सकाळी सिटी हॉलच्या व्हरांड्यातली भित्तिचित्रे बघून झाली होती. आता शोरूम इतकी छान आहे तर गोडाउन किती सुंदर असेल असे म्हणत मुख्य दरवाज्यातून आत शिरलो.
२००५ साली ओस्लोचा सिटी हॉलची ओस्लोमधली शतकातली सुंदर इमारत (Oslo's Structure of the Century) म्हणून निवड झाली आहे. दरवर्षी १० डिसेंबरला (आल्फ्रेड नोबेलच्या पुण्यतिथीच्या दिवशी) याच ठिकाणी नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्याच्या समारंभाचे आयोजन केले जाते.
आत गेल्या गेल्या आपण एका प्रशस्त (४०-४५ मी लांबीरुंदी आणि २०-२५ मी उंची) हॉलमध्ये शिरतो. याच्या चारी भिंतींवर मोठमोठी चित्रे रंगवली आहेत. एक एक चित्र बघायला फक्त मान वळवणे पुरेसे नाही, किमान १५-२० मीटर चालत जावे लागते ! या चित्रांतून ओस्लोच्या समाजजीवनाचे, इतिहासाचे, सामाजिक तत्त्वज्ञानाचे कधी सरळपणे तर कधी नवचित्रकलेच्या सांकेतिक तंत्राने चित्रण केलेले आहे.
.
.
.
या इमारतीच्या प्रत्येक खोलीत इतक्या कलाकृती आहेत की ही एक शासकीय इमारत आहे की संग्रहालय आहे असा प्रश्न पडतो...
.
.
मुख्य म्हणजे काहीही आडकाठी न करता या सर्व इमारतीतून प्रवाशांना फिरण्याची मुभा आहे... सभा चालू नसेल तर अगदी सभागृहातही जाता येते...
सभेसाठी आलेल्या सभासदांसाठी बसायची व्यवस्था...
तेथून बाहेर पडून पाच-दहा मिनिटात चालत जाऊन नॉर्वेच्या लोकसभेजवळ पोहोचलो. आणि ध्यानात आले, "अरे काल रात्री तर हिचा छान दिसणारी इमारत म्हणून फोटो काढला होता. आज त्या इमारतीपुढे काही कलाकारांचा व्हलेंटाईन डे निमित्त संगीताचा कार्यक्रम चालला होता...
संध्याकाळची वेळ होती. घराकडे जाण्यासाठी लोकांची लगबग चालू होती. रस्त्यावरून माणसे, बस आणि, ट्रॅम आणि तुरळक खाजगी गाड्या यांची गर्दी ट्रॅफिक जॅम न करता धावत होती...
तेथून जवळच असलेले ओस्लो ऑपेरा हाउस बघायला गेलो. २००७ साली पूर्ण झालेल्या या इमारतीला २००८ साली World Architecture Festival मध्ये व २००९ मध्ये European Union Prize for Contemporary Architecture ही बक्षिसे मिळाली आहेत. या इमारतीकडे जाताना नॉर्वेसारख्या सामाजिक जाणिवेबद्दल प्रसिद्ध असलेल्या देशातही फुटपाथवर झोपलेला माणूस दिसला आणि आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही...
हे ऑपेरा हाउसचे झालेले पहिले दर्शन...
ही इमारत अगदी समुद्रालगत आहे...
या इमारतीच्या छतावरही जाता येते पण भरपूर बर्फवृष्टीमुळे रस्ता निसरडा झाला होता आणि वर जायला मज्जाव होता...
इमारतीच्या आतली रचना मात्र पाहण्यासारखी होती...
.
तेथून पुढे कूच केले आणि ह्या वॉकींज प्लाझाच्या गर्दीत मीही सामील झालो...
चालताना ही पाटी बघितली आणि थबकलोच !
भटकायची धुंदी कमी झाली आणि भुकेची प्रकर्षाने जाणीव झाली. अर्थातच पोटाने पायांचा ताबा घेतला. रेस्तरॉचे वातावरण एकदम हिंदुस्तानी (बॉलीवूड नाही) संगीतासह भारतीय होते...
मेन्यू बघितला आणि दिल खूश हुवा ! तडक हे जेवण मागवले...
दणकून ताव मारला हे काय सांगायला पाहिजे काय ? जेवणानंतर बडीशेप तोंडात टाकून नॅशनल आर्ट गॅलरी बघायला बाहेर पडलो. अंधार्या दर्शनी भागामुळे इमारतीला दोन फेर्या मारल्यानंतर एका कनवाळू नॉर्वेजियनच्या मदतीने दार शोधून काढले. बंद होते. पण गाइडने सांगितले होते की संग्रहालय उशीरापर्यंत उघडे असते. मग काय जोर लावून ढकलले आणि अहो आश्चर्यम दरवाजा 'तिळा तिळा दार उघड' असे न म्हणताही उघडला. जरासा दबकतच आत शिरलो आणि जराशी हालचाल दिसली. दोन पावले अजून आत गेलो तर डावीकडे स्वागतकक्ष दिसला. मग मात्र जोरात जाऊन तिकीट मागितले. तिकिटाचे पैसे द्यायला खिशात हात घातला तर स्वागतिका म्हणाली, आज मोफत आहे आणि शून्य नॉर्वेजियन क्रोनरचे तिकीट माझ्या हाती दिले. जरा आश्चर्य वाटले पण संग्रहालय बंद होण्याआधी इथले चित्रांचे मोठे संकलन शक्य तेवढे सगळे बघायचे होते त्यामुळे संग्रहालयाचा नकाशा घेऊन कामाला लागलो. सगळ्यात पहिला मोर्चा रूम २४ कडे... याच खोलीत नॉर्वेचा जगप्रसिद्ध चित्रकार एडवर्ड मंच (Edvard Munch) याची चित्रे आहेत ही माहिती बसमधल्या गाइडकडून अगोदरच काढली होती. मला तसे नवचित्रकलेतले फारसे काही कळत नाही... पण ओस्लोला येऊन मंचचे the Scream न बघता गेलो असतो तर मनाला नक्कीच रुखरुख लागली असती. तर हीच ती जगप्रसिद्ध "किंचाळी"...
आता मला या चित्राचे रसग्रहण करायला सांगू नका :) . मात्र या चित्राने मंचला कलाक्षेत्रात अपरिमित कीर्ती मिळवून दिली आहे हे मात्र खरे आहे. मंच आणि इतर नावाजलेल्या चित्रकारांची अजूनही बरीच चित्रे आहेत. शांतपणे बघायची तर अख्खा दिवस कमी पडेल. एक दोन खोल्यांत अंधार होता. परत जाताना कळले की वातानुकूल यंत्रणेतल्या बिघाडामुळे पाणी गळून काही खोल्यांतला वीजपुरवठा बंद झाला होता आणि म्हणूनच ९० टक्के संग्रहालय छान चालू असूनही संपूर्ण दुरुस्ती होईपर्यंत प्रवेश विनामूल्य होता.
बाहेर पडून मोर्चा राजवाड्याकडे वळवला. आता ओस्लोच्या वाटा पायाखालच्या वाटत होत्या. नकाशा न वापरता बरोबर पोचलो...
कुंपण नसलेली आणि एका बाजूला अगदी लागून रस्ता असलेली हि इमारत राजवाडा आहे हे सकाळी बसमधून जाताना गाइडने सांगितले होते म्हणूनच समजले. ना उंच भिंती, ना रक्षकांचा ताफा, ना इतर फुकाचा बडेजाव !
तेथून पुढे ओस्लो बंदराच्या दिशेने वळलो. वाटेत नोबेल पीस सेंटर लागले...
या इमारतीत नोबेल शांतता पुरस्कारासंबंद्धी आणि नोबेल शांतता पुरस्कारीत मंडळींबद्दल आणि एकंदर जागतिक शांततेसंबद्धी वर्षभर प्रदर्शने चालू असतात. आतासुद्धा महात्मा गांधींवर एक प्रदर्शन चालू होते...
..................
येथूनच पुढे सुरू झालेल्या ओस्लो बंदराच्या बाजूच्या दुकानांत आणि रेस्तराँमध्ये रात्रीचा झगमगाट सुरू झाला होता...
.
.
संध्याकाळच्या जेवणासाठी हा भाग फार प्रसिद्ध आहे असे गाइड म्हणाली होती. पण जयपूर इंडियन रेस्तरॉमुळे ती गरज आता राहिली नव्हती. थोडा वेळ तेथे भटकून परत फिरलो. वाटेत हा सायकलच्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी रस्त्याशेजारी असलेला सार्वजनिक पंप दिसला. नॉर्वे शासन प्रदूषणाच्याबद्दल केवळ गप्पा न मारता कार्यही करत आहे याचा हा पुरावा...
हॉटेलमध्ये रूमवर पोहोचलो तर व्यवस्थापनाने ही व्हॅलेंटाइन डे भेट खोलीत ठेवून आमच्यावरील प्रेम व्यक्त केलेले होते.
(क्रमशः )
====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...
====================================================================
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments