Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
भटकंती

गंगामाई

य
यशोधरा
Sun, 03/24/2013 - 10:05
💬 59

२०११ मध्ये व्हॅलीचा ट्रेक केला. व्हॅली, हेमकुंड, हिमाचलात काढलेले दहा दिवस कधी आयुष्यात विसरेन असे वाटत नाही. काही काही योग आयुष्यात असावे लागतात, आणि जेह्वा अचानक असे ते पदरात पडतात, तेह्वा ती अनुभूती शब्दांत मांडणे खरे तर अशक्य. हिमालयाचे कडे, पहाड सामोरे येण्याआधीही इथे हरिद्वारला सामोरी आली ती गंगामाई. आतापरेंत गंगामाईबद्दल बरेच काही ऐकले, वाचले होते, पण जेह्वा तिला पाहिले, तेह्वा ऐकणे, वाचणे किती फोल होते, ते अगदी जाणवले. गंगामाईने खरेच वेड लावले, आणि आता ते कधी कमी होईल असे वाटत नाही. होऊही नये, ही प्रार्थना. हे सारे मी अतिशय भारावून जाऊन लिहिले आहे, हे मलाही जाणवते. मुळात माझे मन सश्रद्ध आहे, असे काही भव्य, दिव्य पाहिले की मला भारावून जायला होते. वेडेपणा आहे, पण असूद्यात.

'गंगामाई' हा अनुभव घेतल्यावर मनात उमटलेले हे काहीबाही..

****

गाडी हरिद्वारला पोहोचेपरेंत संध्याकाळ झाली होती. हवेत उष्मा होता. हरिद्वारचं स्टेशन मला आवडलं. बाहेरुन स्टेशनलाही एखाद्या मंदिरासारखा आकार दिलेला, मध्यभागी लायटिंग केलेला चमकणारा ॐ. सामान सुमान घेऊन स्टेशनच्या बाहेर पडलो. भरपूर गर्दी. माणसे पुढल्या गाड्यांची वाट बघत बसली होती, पहुडली होती. बायका साड्या वाळवत होत्या. लोकांचे खाणे वगैरे सुरु होते. माहौल निवांत होता. सगळे गंगामैय्याच्या चरणी आपली पापं, चिंता वगैरे वाहून निवांत असणार. माईच्या कुशीत चिंता कसली? तीही सगळं काही स्वीकारुन वाहतेच आहे युगानुयुगे... तिचा तोच धर्म आहे.

ठेसनाबाहेरच सामोसे, जिलब्या बनवण्याचे ठेले होते. अजूनही काय काय मिठाया होत्या. काहीच घेतलं नाही पण, एकतर हृषिकेशला पोहोचायचं होतं वेळेत. पुन्हा हरिद्वारला होतो, काहीच नाही तर निदान इतका मोह तरी आवरतो का बघावं, म्हणलं! जमलं तेवढ्यापुरतं तरी. लई झालं, इतकं जमलं तरी खूप आहे. ठेसनाबाहेर बस घेऊन डायवरबाबा तयार होते. सामान टाकलं आणि हृषिकेशच्या दिशेने निघालो..

****

स्टेशनातून वळण घेऊन डायवर सायबांनी बस बाहेर काढली.

रस्त्यावरुन एका जुन्या रथातून बसून कोणी साधूबाबा, कोण्यातरी बिनमहत्वाच्या पिठाचे स्वामी मिरवणूकीने चालले होते. बिनमहत्त्वाचे आणि मुख्य म्हणजे गाठीशी पैसा नसलेले असावे. गर्दी नव्हती त्यावरुन अंदाज. समोर आणि मागे मिळून चार शिष्य. सगळ्यांनी भगवी, लाल धोतरे नेसलेली. गंधाचे, भस्माचे पट्टे. शेंड्या. समोर एक सनईवाला, एक ताशेवाला. इतकेच लोक. हसूही आले आणि अचंबामिश्रित कौतुकही. बरोबर गर्दी नव्हती, मग कसं काय मी असं बसू रथात? लोक हसतील का? वगैरे स्वामीजींना काही वाटले नव्हते बहुतेक. शिष्यही चामरे ढाळत होते, त्याच भक्तीभावाने. निदान कर्तव्यभावनेने.

प्रत्येकजण आपले कर्तव्य, धर्म पाळत होते का? हीच का निष्ठा असते? अशीच? हे उगाच लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेणार्‍यांपैकी होते की खरेच भगवंतापाशी, वा जिथे कुठे स्वतःच्या श्रद्धा वाहिलेल्या होत्या, तिथे मनापासून विश्वास टाकून आपले कर्तव्य पार पाडणारे सत्शील जीव होते? कोणास ठाऊक. जो जे वांछिल, तो ते लाहो, हेच एक अंतिम सत्य असेल असे वाटू लागले. माऊलीने सगळे, सगळे खूप, खूप आधी सांगून ठेवले आहे..

मला मात्र ह्यापैकी काहीच जमले नसते, जमणारही नाही बहुधा. कितीतरी वेळा, कितीतरी कारणांनी लाज वाटली असती, ऑकवर्ड झाले असते. अशी निष्ठा अंगी बाणवू शकेन तो सुदिन. अशी निष्ठा अंगी बाणवणे कधीतरी जमावे, ही इच्छा. आता इथून गंगामाई आणि तिचे हरिद्वार, पुढे हृषिकेश, कधीतरी भेटणार आहे तो हिमालय, एकूणातच एकामागून एक धडे द्यायला सुरुवात करणार आहेत, ही खूणगाठ मनाशी बांधायला सुरुवात केली. घेता, किती घेशील दो करांनी... सनईचे सूर फार फार मोहवून गेले. शांत, गंभीर असे सूर. कधीतरी मरहूम उस्ताद बिस्मिल्लां खाँ, त्यांची सनई आणि त्यांची अलाहाबादची गंगामैय्या ह्यांच्यावरची एक डॉक्युमेंटरी पाहिली होती, त्याची फार फार आठवण झाली. उगाच भरुन यायला लागले. आत्ताशी अजून दर्शन होणार आहे, तर ही गत? एवढ्यातच असे होऊन कसे चालेल?

अजून एक वळण आले आणि सोबत पाण्यावरुनच वाहत येतो, असा गार वारा.

नेहमीच्या गार वार्‍यात आणि पाण्यावरुन वाहत येणार्‍या गार वार्‍यात एक फरक असतो नेहमी, म्हणजे असं आपलं माझं मत. नेहमीचा गार वारा जरासा कोरडासा. म्हणजे तुमचा जीव सुखावेल, पण एका अलिप्तपणे. तुमच्याभोवती रेंगाळणार नाही, तुमच्यात स्वतःला गुंतवून घेणार नाही. तुमच्या अंगावरुन म्हणता म्हणता पुढे निघून जाईल. एखाद्या बैराग्यासारखा. अडकणार नाही, आठवणी ठेवणार नाही.

त्याउलट पाण्यावरुन वाहत येणारा वारा. त्याची जातकुळीच वेगळी आहे लोकहो. हा केवळ सुखावणारा वारा नसतो, हा शांतवणारा वारा. तुमच्याभोवती मायेने रेंगाळणारा, एखाद्या खर्‍याखुर्‍या दोस्ताप्रमाणे हलके हलके तुमच्या मनात शिरणारा. तुमच्याही नकळत तुमच्या मनातली खळबळ म्हणा, चिंता म्हणा, तत्समच जे काही असते, ते सारे, सारे दूर करणारा. जिवाला विसावा देणारा वारा. कोरडेपणाचा मागमूस नसलेला. असा वारा अनुभवल्याबरोब्बर पाणी कुठे आहे, हे नजरेने शोधायला सुरुवात केली.

एक फार मोठाही नाही पण अगदीच नगण्यही नाही, असा कालवा सामोरा आला. मनात आले, ही गंगा? अशी कालव्यातून काढली आहे की काय शहरातून? भंजाळलोच! अविश्वास, अविश्वास! ही कशी असेल? नक्कीच नाही. ती तर जगन्नाथ पंडितांची गंगामाई आहे. त्यांनी भोगलेल्या सार्‍या तापत्रयातून त्यांना सोडवणारी. आपल्या अमर्याद मायेची फुंकर त्यांच्या श्रांत, क्लांत मनावर हळूवारपणे घालणारी.. भोळ्या सांबाने पार्वतीचा प्रसंगी कोप सहन करत मस्तकी धारण केलेली गंगा. कोण्या भगिरथाच्या पूर्वजांना उद्धरणारी गंगा. आजही जनमानसाच्या श्रद्धेचे स्थान असलेली गंगामैय्या. दिल्या शब्दाला जागून युगानुयुगे अव्याहत वाहते आहे.

अजून दर्शन दिले नाही माईने...

मला वाटते, कोणीतरी अत्यंत अविश्वासाच्या आणि धक्का बसल्याच्या सुरात म्हणाले पण! ही गंगा??? ही?? अशी??? की माझ्याच डोक्यात माझ्याच मनातले शब्द ऐकू आले होते? कोणास ठाऊक. पण ही गंगा नाहीये, असेही कळाले. हुश्श.. गंगेला बघायला डोळे अणि मन आसुसल्यासारखे झाले होते. कधी दिसेल माई? आत्ता? आत्ता? अजून थोडे पुढे गेल्यावर? डोळे भरुन बघता येईल का? किती वाचले आहे आणि किती ऐकले होते आजवर तिच्याबद्दल! खूप अपेक्षा, दडपण, आशा वगैरे अशांसारख्या आणि नेमक्या कसल्या ते अजूनही न उमगलेल्या भावना मनात बाळगून मी गंगेची वाट पहात होते आणि एक पूल लागला भला मोठा. गंगेवरचा पूल. मिट्ट काळोखाचा रंग मैय्याने पांघरुन घेतला होता. काहीच दिसत नव्हते, फक्त आवाज येत होता, संथसा. चुबळुक, चुबळूक.. किंवा पलक्, पलक् असा. की लपक्, लपक्? पलक् की लपक् हेच ठरवता येईना. राम की मरा - तसा गोंधळ. शेवटी लक्षात आले की पलक् असो की लपक्, फरक नै पेंदा. पलक लपकतेही सबके मनमें घर बसा लेती हैं माई. उसके बाद भूलना नामुमकीन. आयुष्यभरासाठीची ओढ. तीच मैया, तीच सखी, तिचाच आधार.

अर्धवट अंधारामध्ये नदीला घाट बांधला आहे, हे जाणवले, साधारणसे दिसले. दगडी सुबकसा, विस्तीर्ण घाट. मनात आले, तिथेच पथारी पसरावी. माईच्या सोबतीने तिथेच शांतपणे झोपून जावे. कोणाची भीती? माई काळजी घेईल. नक्कीच.

मनातल्या मनात माईला हाका मारल्या. तिने ऐकल्या का?

****

तितक्यात बसच्या दुसर्‍या बाजूच्या खिडक्यांबाहेर लक्ष गेले. ओह्हो! दिसली, माई दिसली.. आणि कशी? अवाक् व्हायला झाले! छाती दडपली एकदम. आपल्या सर्व सौंदर्यसामर्थ्यसौष्ठव आणि ऐश्वर्यानिशी माई वाहत होती. तिच्या लाटा सातत्यपूर्ण नाद करत इतक्या वेगाने पुढे पुढे सरकत होत्या! जणू काळाच्या वेगाला मागे टाकतील. छे! शब्दांत ते दृश्य पकडणे मला केवळ अशक्य आहे! कसे दिसत होते ते? जणू काही आताच कात टाकलेल्या नागिणी सुसाटत धावत होत्या! मनात आले, माईने खरेच तर सांगितले होते भगिरथाला. तिचा वेग सहन होणे अशक्य. हा तर अंगावर येऊ पाहणारा वेग होता.

जराशा दुरूनच पाहत होतो, तरीसुद्धा तसे बर्‍यापैकी ओझरते पाहतानाही तो वेग असह्य झाला होता, विलक्षण ओढ लावत होता, भुरळ पाडत होता... तर प्रत्यक्ष तिच्या सन्मुख असणार्‍यांची काय स्थिती होत असेल? जीव इतक्या काकुळतीने अस्वस्थ होऊ लागला होता, एक प्रकारची उलघाल आणि एक विलक्षण उर्मी दाटू लागली होती आणि वाटले, बस्स! बेभानपणे ह्या लाटांवर स्वतःला तनामनाने झोकून द्यावे, माई नेईल कुठे ते. सखी आहे, सांभाळूनच नेईल, आणि एकदा झोकून दिल्यावर पुढची पर्वा कोणाला? कशाला? खरंच. विल़क्षण मोहाचा क्षण. नुसते वाटले. कुडी झोकायला धीरही खरोखरच झाला असता की नाही, कल्पना नाही. उर्मी दाटणे वेगळे आणि कृती करणे त्याहून वेगळे. निरनिराळ्या जबाबदार्‍यांनी पाय मागे ओढले. जबाबदार्‍या नसत्या तर झोकून दिली असती का कुडी? जमले असते? काय, कोणास ठाऊक.. छंद म्हणून विचार पुरला आहे मात्र सद्ध्या. असो.

किती किती ओढ लावते गंगामाई! पंडित जगन्नाथांनी कोणत्या भावविभोर अवस्थेत तिचे वर्णन, स्तुती आणि शब्दाने पूजा बांधली असेल, ह्याची पुसट, पुसट जाणीव झाली, न झाली. किती प्रकर्षाने स्वतःला तिच्या लाटांवर झोकून, फेकून द्यावेसे वाटले आणि पुढे तिचे निरनिराळे प्रवाह पाहताना, अनुभवताना वाटतच राहिले. जमेल तितके ते दृश्य पहायला प्रयत्न केला. बस थांबणार नव्हती, फार फार दु:ख होत होते बस न थांबत असल्याचे.

ऐलतटापासून काही अंतरावर असलेल्या पुलावर आमची बस धावत होती आणि आत बसलेले आम्ही काही जीव, गंगेला होता होई तेवढे डोळ्यांत, मनात साठवत होतो. पैलतट भाविकांनी थोडाफार गजबजलेला होता, काठांवरच्या देवळांतून दिवे लागले होते. माईची आरती सुरु होती. मोठमोठी निरांजने, आरत्या तेवत होत्या, झांजा, मृदंग, ढोल वाजवणारेही डोळ्यांनी टिपले, मोठा नाद करणार्‍या घंटा घेऊन लोक उभे होते. मोठ्या मोठ्या ज्योतींचा उजेड पाण्यावरुन परावर्तीत होत होता. आरतीचा आवाज आणि वाद्यांचे नाद एकमेकांत मिसळले होते. माई आरतीचे सोपस्कार करुन घेत मार्गक्रमण करतच होती. एका कोणत्या तरी क्षणी मनावर अगदी गारुड झाले. घशात हुंदका दाटू झाला आणि डोळे चुरचुरायला लागले. हिला सोडून पुढे जायचे? पुन्हा दर्शन? सगळे मोह, माया, बंधनं पाश सोडून लोकांना हिचा आश्रय का करावासा वाटतो, कशी प्रेरणा मिळते, का इच्छा होते, ह्याचा थोडा थोडा उलगडा झालासे वाटले..

पण आता वाटते, खरेच का झाला उलगडा?

****

हे जे काही सौंदर्य समोर उन्मुक्तपणे वाहते, ते मृदुमुलायम नक्कीच नसते. आपल्याच मस्तीत वाहते माई. आपल्याच धुंदीत. आखीव रेखीव वगैरे असे काही नाही माईपाशी. बस्स, एक आवेग आहे, मत्त उन्मत्तपणा आहे आणि ते केवळ तिलाच शोभून दिसते. किती बोलावे तिच्याबद्दल? न बोलवे काही. सिर्फ एहसास हैं ये, रुहसे महसूस करो. गंगामाई ही केवळ अनुभवण्यासाठी आहे. शब्द, विचार सारे काही थिटे पडते तिच्यापुढे. तिला म्हणावेसे वाटले, नव्हे, प्रवासात पुन्हा, पुन्हा मनातल्या मनात तिच्याशी बोलताना म्हटले, त्वं साक्षादात्मासि नित्यम्| ऋतं वच्मि| सत्यम् वच्मि|.. काहीही मनात येत होते, सातत्याने घडत राहिलेल्या अफाट गंगादर्शनाने मी पदोपदी भारावले आणि मन सतत भरुन, उचंबळून येत राहिले, हे मात्र नक्की.

आता पुन्हा कधी दिसेल? कळाले की आता अख्खा रस्ता दिसणार आहेत गंगेचे प्रवाह, गोविंदघाटीपरेंत अगदी. खरंच? खरंच का? किती आश्वस्त वाटले तेह्वा. माई बरोबरीने येणार होती, साथ सोबत करणार होती. उगीच का ती सखी आहे? तिच्याशी मनातल्या गोष्टी बोलत प्रवास होणार तर. कोणत्या जन्मीचे पुण्य फळाला आले होते! काय सांगू हिला? विदध्या: समुचितम्! अजून काय मागायचे गं? कधीतरी तुझ्या काठाकाठाने फिरायची इच्छा आहे. पार गंगोत्रीपरेंत जायचे आहे बघ. तुझ्या संगतीने तुझ्या काठावर फुललेले, वसलेले जीवन पहायचे आहे, शिकायचे आहे. एकदा तरी तुझ्या किनार्‍यावर तुझ्या लाटांचा नाद ऐकत आणि आकाशातले चांदणे बघत निवांत पहुडायचे आहे. तुझ्या संदर्भातल्या कथा कहाण्या आठवायच्या आहेत आणि बस्स, शांत, शांत व्हायचे आहे. कधी बोलावशील पुन्हा?

****

माई तात्पुरती दृष्टीआड झाली. तिचा नाद मात्र मनामध्ये अव्याहत ठाण मांडून राहिला. अजूनही आहे. म्हटले ना मी, भूलना नामुमकीन.

जसे जसे पुढेपुढे जात होतो, नजारे उलगडत होते. कोणत्या नजार्‍याला म्हणावे की नजारा हो तो ऐसा हो? डावे उजवे ठरवणे फार कठीण झाले होते, आणि तेवढ्यात एक फार, फार सुरेख जागा आली. निव्वळ अप्रतिम म्हणावी, अशी.

एक मोठा पूल गंगेच्या पात्रावर बांधला होता, हिमालयाच्या रांगांमधून गंगा मनमुराद वाहत होती. आमची वाट एका काठाने जात होती आणि वाटेची दुसरी बाजू हिमालयाच्या पहाडांनी तोलून धरली होती. रस्त्यावर आमच्याशिवाय कोणी, कोणी नव्हते. सकाळच्या उन्हांत गंगेचे पात्र किती लोभस दिसावे, त्याला काही सीमा? अवर्णनीय, अप्रतिम वगैरे शब्दही पोकळ वाटावेत. काही घटना, अनुभव नुसते जगायचे आणि जपायचे. गंगेच्या पाण्यावरची त्या सकाळच्या वेळी आभा तर मी जन्मात विसरणार नाही. काहीतरी फार पवित्र आणि जिवाला वेड लावणारे असे समोर वाहत होते. किती जवळून. पुन्हा एकदा वाटले, झोकावे का स्वतःला? मन कधीच झोकून दिले. जवळच असलेल्या खडकावर, उंचच उंच निळ्या, हिरव्या पहाडांच्या साक्षीने आणि वाहणार्‍या पाण्याच्या सोबतीने जगाच्या अंतापरेंत तिथेच बसून रहावेसे वाटले. काही काही क्षण, काळाचा काही भाग आपल्याला किती निर्मळ भावना देऊन जातात. दुर्मिळ असतात. त्यापैकी हा नक्कीच एक. अजून ते सारे तसेच्या तसे डोळ्यांपुढे येते. वेड लागते. कधीतरी तिथूनही पुढे निघावे लागले..

****

अतिशय अनिच्छेने गाडीत बसून मार्गाला लागलो. एके ठिकाणी खायला म्हणून थांबलो. तिथेही गंगा अशीच वाहत होती. भरभरुन. पहाडांच्या सोबतीने. पडाड तरी कसे. उंचनिंच. एकाच वेळी मनात भरणारे आणि धडकीही भरवणारे. गंगेचा प्रवाहही तसाच आहे. जरी मनात धडकी भरली तरीही कसले अनाकलनीय आकर्षण वाटत राहते? पुन्हा पुन्हा ओढ वाटते? सारेच गूढ. तिथूनही पुढे निघालो.

****

सकाळी सहाला हृषिकेशहून निघालो, ते कौडीयालला खायला थांबलो. इथे प्रामुख्याने गंगेच्या प्रवाहामध्ये राफ्टींग चालते. जिथे थांबलो, ते एक छोटेसे हॉटेल होते. ह्या हॉटेलचा समोरचा रस्ता ओलांडला की छोटी छोटी कॉटेजेस होती, खाली जायला छोटासा रस्ता, पायर्‍या होत्या. मघा रस्त्यावर गाडी थांबली होती तेह्वाच पलिकडे गंगा वाहताना दिसली होती. लांब वाटली होती, तेह्वा लांबून का होईना, पुन्हा एकदा पाहूयात म्हणून, पायर्‍या उतरलो, आणि पाहतो तो काय, ही इथ्थेच अशी हातभर अंतरावरुन गंगा प्रवास करत होती! नशीबावर विश्वास बसेना.

तेच जीवघेण्या सौंदर्याने नटलेले पहाड. तेच शुभ्र पाणी. तोच वेगवान प्रवाह आणि हे सारे नि:शब्दपणे अनुभवत तेच ते आम्ही. आम्ही सारेच समोर जे काही दिसत होते, त्याने मंत्रमुग्ध झालो होतो. कॉटेजेसमध्ये जे कोण भाग्यवान मुक्काम ठोकत असतील, त्यांचा हेवा, हेवा वाटला....

****

संपूर्ण प्रवासात बाजूने गंगेचा प्रवाह दिसत राहिलेला. सोबतीला उंच निंच, हिरवे, निळे, करडे, आकाशापरेंत पोहोचणारे, अंगाखांद्यांवर ढग बाळगून असलेले पहाड. ह्याच सदाबहार दृश्यांनी सतत मोहिनी घातली, वेड्यासारखे वेड लावले आणि थकवलेही. गंगा आणि हिमालय, हाच हिमाचलाचा आत्मा. आमच्या नशिबाने साथ दिल्याने त्याचे दर्शन घेण्याचे भाग्य पदरी आलेले आम्ही.

****

बसने रस्ता कापताना प्रथम देवप्रयागपाशी पोहोचलो. भागिरथी आणि अलकनंदेच्या संगमाचे ठिकाण. तिथे थांबलो. कमालीचे उन होते. कातडी करपवणारे उन. सहन होत नव्हते इतके तीव्र, पण त्या प्रयागापुढे सारे काही विसरायला झाले.... वर ढणाढणा उन आणि खाली भागिरथी आणि अलकनंदा आपापल्या मार्गाने पुढे येऊन एकत्र होऊन, गंगा म्हणून मार्गक्रमण करत होत्या. दोन्ही तीरांवर दाटीवाटीने पिवळ्या, निळ्या रंगांची घरे. काय अफलातून सुरेख दिसत होते सारे. पहाडांवर घरे बांधून लोक राहतात. तिथे जाऊन २-३ दिवस का होईना, रहावे, अशी फार फार इच्छा झाली. दिवसभर नदीचा नाद कानांवर पडला की कसे वाटत असेल, हे जाणून घ्यायचे होते. तिथल्या रहिवाशांचा हेवाच हेवा वाटला. रोज त्या नद्या वाहताना अनुभवायच्या, त्यांचा नाद ऐकायचा..

इथे पाऊस कसा पडत असेल? त्यावेळी ह्या नद्या कशा भासत असतील? कशा वाहत असतील? रोरांवत असतील? फुफाटत असतील? रौद्र निसर्गाचे ते एक रुपडे पहायचे फार मनात आहे. आणि चांदण्या रात्री कशा दिसत असतील? नुसती कल्पना करुन माझ्या अंगावर काटा येतो! भारावून जायला होते. रात्रीच्या चंद्रप्रकाशात ते दुधाळ पाणी किती मोह घालत असेल पाहणार्‍याला... तेही पहायचे आहे मला. पहाटवेळी? संध्याकाळी? अमावास्येला?

****

किती, किती पहायचे राहून जाते आणि चाकोरीबद्ध आयुष्य मात्र गळ्यात पडते, ह्याची प्रकर्षाने नव्याने जाणीव होत राहिली. कधी योग आहे, पाहू. एव्हाना मी आतापरेंत दिसलेल्या हिमाचल, हिमालय आणि गंगेच्या प्रेमात इतकी बुडाले आहे, की काय सांगावे! इश्कने फक्त गालिबच निकम्मा होतो की काय?

समाप्त.


  • Log in or register to post comments
  • 14607 views


वाचनखूण लावा
| 14607 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Sun, 03/24/2013 - 10:42 नवीन
गंगेच्या प्रवाहासारखंच खळाळतं, अगदी सहजसुंदर असं लिखाण.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sun, 03/24/2013 - 10:48 नवीन
सुंदर लेख आणि फोटो!!!
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Mon, 03/25/2013 - 04:39 नवीन
+१
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sun, 03/24/2013 - 11:20 नवीन
ह्म्म... वाचता वाचताच गंगमाईवरुन येणारा ओला ओला गार गार वारा जाणवला परत एकदा... :) किती, किती पहायचे राहून जाते आणि चाकोरीबद्ध आयुष्य मात्र गळ्यात पडते, ह्याची प्रकर्षाने नव्याने जाणीव होत राहिली. > सहमत.
  • Log in or register to post comments
म
मन१ Sun, 03/24/2013 - 11:24 नवीन
आवडली..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 03/24/2013 - 11:27 नवीन
गंगामय्याचा प्रवास तिच्या तिच्या मार्गाने संथपणे चालू असतो, तिचा प्रवास चालू असतांना ती नुसती निसर्गासोबत खळाळत वाहात असते असे नव्हे तर ती अनेकांशी संवाद साधते, अनेकांना भावविभोर करते, तिची ओढ आणि सोबत झालेला समृद्ध असा प्रवास आणि गंगामय्याचं दर्शन भाऊकतेने पण त्यातही गुंतून न जाता सुंदर रीतीने व्यक्त केलं आहे. आवडलं लेखन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 03/24/2013 - 11:51 नवीन
चित्रं तर अप्रतिम आहेतच. कधी एकदा तिथे जायला मिळेल असं वाटायला लावणारी. पण लिहिलं आहेस ते साक्षात गंगामैयाचा परिसस्पर्श तुझ्या लेखणीला झाल्याचं जाणवून देणारं.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 03/24/2013 - 12:03 नवीन
सुरेख लिहिले आहेस यशो.. (खूप दिवसांनी लिहिती झालीस..) स्वाती
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Sun, 03/24/2013 - 12:22 नवीन
खूप छान लिहिलं आहे तुम्ही. भावनांचं वर्णन एकाच वेळी चित्रमय आणि अलिप्त असं दोन्ही साधलं आहे. सहजपणे. गंगामय्याच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या तुमचा अनुभव वाचताना. अशी अखंड राहतेच तिची सोबत :-)
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 03/24/2013 - 12:43 नवीन
लेख अगदी ओघवता झाला आहे. मीही याच मार्गाने प्रवास केला आहे, पण असं भव्य-दिव्य लिहिता नाही येणार बुवा मला कधी! पण हे हो काय? शेवटी आशेने क्रमशः असेल असं वाटलं होतं. तुमच्या बाकीच्या व्हॅलीचा प्रवास करा ना असाच शब्दबद्ध!
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Sun, 03/24/2013 - 12:56 नवीन
किती सुंदर लिहिलं आहेस! शब्दांमधली आणि प्रकाशचित्रांतलीही गंगा.. उत्तमच! नदी हा संस्कृतीचा आधार म्हणतात ते कसं.. हे नर्मदा, गंगा यांच्या काठाने फिरलं की शब्दाविनाच कळून जातं. अनेक प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत जातात. हे या लिहिण्यातूनही जाणवतंय. हा लेख सवडीने, पुनःपुन्हा वाचावा असा छान झाला आहे.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 03/24/2013 - 13:01 नवीन
सुरेख लेखन आणि योग्य जोड देणारे फोटो. बोलायला काही शिल्ल्क नाही राहिलं.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 03/24/2013 - 13:23 नवीन
जय हो गंगामैय्या की!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 03/24/2013 - 14:24 नवीन
सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार. @आतिवास -खरं आहे, माईची सोबत अखंड राहते. :) @तिमा - इतकंच. >>नदी हा संस्कृतीचा आधार म्हणतात >> अगदी इनि. :)फार सुरेख ओळी लिहिल्या आहेस स्वाक्षरीत तुझ्या.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 03/24/2013 - 14:31 नवीन
सुरेख! लेखन आणि प्रकाशचित्रेदेखील.
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 03/24/2013 - 15:26 नवीन
सुरेख वर्णन...
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 03/24/2013 - 15:41 नवीन
शब्दप्रवाह अगदि गंगामैया !
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Sun, 03/24/2013 - 16:13 नवीन
सर्वांनी लिहीले आहे त्याच्याशी सहमत. सुरेख लेखन. तिमाजी अप्पांशीही सहमत : आणखी वाचायला आवडले असते. मी फार पूर्वी अलाहाबादचा संगम बघितला आहे... परत मैया कधी बोलावते कुणास ठाऊक? मला अश्या ठिकाणी एकटीने प्रवास करायला आवडतो ( अतिशय), परंतु ते व्यावहारिक दृष्ट्या शक्य होणार नाही कधीही ( स्त्री असल्यामुळे) म्हणून नेहमीच एक खंत वाटत राहते. आपले तरी ठीक आहे ( एकवेळ समजण्या सारखे), पण ज्या परकियांना गंगामाईबद्दल जास्तं काही माहिती असण्याची शक्यता नसते, त्यांची देखील अशीच भावविभोर अवस्था होते असे ऐकून/ वाचून आहे.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 03/24/2013 - 17:19 नवीन
>>>समाप्त. का? का?? का??? ..... (कधीकधी शब्द हेच अडथळे वाटतात!)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 03/24/2013 - 17:43 नवीन
अत्यंत सुरेख लेखन यशोतै. किती ओघवते, किती नैसर्गिक. अगदी अप्रतिम. अगदी पलक लपकाये बिना वाचले. :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 03/24/2013 - 17:50 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Sun, 03/24/2013 - 18:26 नवीन
सुरेख लेख उतरलाय तुझ्या लेखणीतुन यशो मावशी :)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 03/25/2013 - 02:19 नवीन
काय बोलू? एखादं झकास अत्तर कानामागे लावल्यानंतर त्याच्या दरवळात हरवून जावं तशी गत झालीये माझी. का गो नाही लिहित तू नेहमी नेहमी?
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Mon, 03/25/2013 - 06:21 नवीन
क्या बात! अवांतर.. यशोला विचारलंय तेच तुम्हालाही विचारावं काय?
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 03/25/2013 - 04:19 नवीन
बघावं तेंव्हा अशी घाण आहे, तशी घाण आहे. अस फसवतात तस वागतात, एव्ह्ढच ऐकुन असलेल्या गंगामाईच्या दर्शनाला मग कशाला मरायला लोक जातात ते यशोधरा तुमच्या लिखाणाने उलगडलं. साधारण तुमच्या सारखाच भावुक पिंड आहे माझा. आता खरच जाईन मी या दर्शनाला. सुंदर फोटोज. अन भावूक लिखाण.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 03/25/2013 - 04:27 नवीन
छान लिहिलंय, काही ठिकाणी शब्दबंबाळता जाणवली एवढंच. बाकी तिथंही 'निसर्गाच्या कुशीत' वाले बिल्डर आहेत हे पाहुन बरं वाटलं, मला वाटलं आपणच फक्त आपल्या नद्या बुडवुन टाकतोय, या बुडवाबुडवीतुन ती गंगामाई देखील वाचली नाही तर. (संदर्भ - शेवटुन दुसरा फोटो, नदीच्या उजव्या काठावरची सिमेंटाची जंगलं.)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 03/25/2013 - 04:59 नवीन
सिमेंटची जंगलं काही मी म्हणणार नाही. वर्षानुवर्षं तिथे नदीकाठी राहणरे लोक आहेत ते. पावसाळ्यात हीच गंगामाई उफाळते, भुसभुशीत जमीन आणि त्याचबरोबर काठालगतच्या घरांनाही सामावून घेते आणि तरीहे पुन्हा पुन्हा तिच्या काठी लोक त्यांची घरटी उभी करतात.तिला मैय्या समजतात. तिथे गेल्याशिवाय, तिथल्या लोकांशी बोलल्याशिवाय तिथल्या लोकांची तिच्याबद्दलची भावना नाही समजणार :) असो.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 03/25/2013 - 08:54 नवीन
वर्षानुवर्षे राहणा-या लोकांबद्दल नाही बोललो मी,त्या फोटोतल्या उजव्याबाजुच्या अपार्टेमेंटस ज्या त्या बाजुच्या टेबल टॉपवर आहेत त्या. त्या नव्याच दिसतात जुन्या नाही. बाकी, श्री. धनाजीराव यांचेही घर मुठेकाठी एवढ्याच अंतरावर आहे असं ऐकुन आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 03/25/2013 - 09:03 नवीन
त्यासमोरच्या काठावरचं देऊळ दिसतंय? तो देवप्रयाग संगामपाशीचा फोटो आहे, लांबून घेतला आहे. तिथे उतरणार्‍या भाविकांसाठी बांधलेली निवास स्थानं होती ती बहुतेक. उलट देवळापाशी गजबज करण्यापेक्षा हे खूप बरं असा एक विचार.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 03/25/2013 - 11:21 नवीन
अच्छा असं आहे काय, मग ठिक आहे. मला वाटलं आम्ही करतो तसं 'निसर्गाच्या कुशितलं टुमदार घर' पोस्टरवरुन प्रत्यक्षात येईपर्यंत घराच्या सगळया बाजुला अशीच टुमदार घरं झालेली असतात.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 03/25/2013 - 11:25 नवीन
फक्त तुम्हालाच निसर्गाच्या कुशीत रहायला का मिळावं असा विचार बाकीचे करत असावेत, त्यामुळे मुळात तुम्हीच निसर्गाच्या कुशीत रहायचा हट्ट सोडलात तर उत्तम, नाही का? :)
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 03/25/2013 - 07:28 नवीन
मस्तच. सुरेख.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 03/25/2013 - 07:49 नवीन
एकदम छान आणि सुरेख लेख, मस्त वाटलं वाचून. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
म
मनराव Mon, 03/25/2013 - 07:57 नवीन
सुंदर लेख आणि लेखन शैली... लेख वाचताना क्रमश: असेल असं वाटलं होतं. फारच आवरतं घेतलत.....
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Mon, 03/25/2013 - 08:18 नवीन
जय गंगामाता.सहज व सुंदर लेखन.आवडले.
  • Log in or register to post comments
N
nishant Mon, 03/25/2013 - 09:35 नवीन
लिखाण प्रचंड आवडले :)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 03/25/2013 - 11:14 नवीन
लेखन आणि त्याचा जोडीला फोटो दोन्ही सुरेख.
  • Log in or register to post comments
न
नानबा Mon, 03/25/2013 - 11:32 नवीन
गंगामाईच्या खळाळत्या प्रवाहाप्रमाणेच असलेलं तुमचं खळाळतं लेखन एकदम आवडेश... :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 03/25/2013 - 13:40 नवीन
यशो तै तुझे मनोगत आवडले. पंडित जगन्नाथांनी कोणत्या भावविभोर अवस्थेत तिचे वर्णन, स्तुती आणि शब्दाने पूजा बांधली असेल, ह्याची पुसट, पुसट जाणीव झाली, न झाली. लेखन वाचताना "जय गंगे भागिरथी" या ओळी आपसुकच ओठावर आल्या.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 03/26/2013 - 14:36 नवीन
सुंदर लेख आणि लेखन शैली,लिखाण प्रचंड आवडले.उत्तराखंड मध्ये १ महिना जाऊन राहायचे आहे आणि हृषिकेश पासून गंगोत्री पर्यंत (जमले तर) स्वतःच्या वाहनातून सर्वत्र गंगामाई च्या कुशीत खेड्यातील घरात राहून तो भाग आणि तेथील लोक मुळातून पहायचे आहेत.आपल्या लेखाने इच्छा परत जागृत झाल्या
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 03/26/2013 - 14:56 नवीन
आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवो ह्या मनापासून शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Tue, 03/26/2013 - 14:49 नवीन
लेखन आणि प्रकाशचित्र दोन्ही अप्रतिम
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 03/26/2013 - 17:43 नवीन
माणसा माणासा, कधि होशिल माणुस ? -- या लेखातल्या भावना उमगल्या तर काम झालच कि. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
श
श्रिया Fri, 03/29/2013 - 09:58 नवीन
सुंदर, भावपूर्ण लेखन! फोटोसुद्धा खासच!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 03/29/2013 - 16:52 नवीन
सदासर्वदा शुद्ध पवित्र जलाने भरभरून वाहणाऱ्या गंगामैयाला प्रणाम !
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 03/29/2013 - 17:20 नवीन
मी फार भावुक नाहीये, पण गंगेसोबतच्या काही आठवणी आहेत. मुख्य म्हणजे तीत केलेल्या राफ्टींग आणि मस्तीच्या.. बाकी हृषिकेश, हरीद्वारलाच थांबलात हेच बरे, त्याखाली जास्त जाऊ नका..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 03/29/2013 - 17:58 नवीन
:) मी तर गंगामाईच्या परिक्रमेचा मार्ग साधारण कसा जातो ह्याची माहिती जमवली आहे. शक्य होईल तशी वेगवेगळ्या ठिकाणची माई पहायची इच्छा आहे. जायचा जरुर प्रयत्न करणार.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sat, 09/26/2015 - 19:36 नवीन
सुरेख ! सगळे फोटो सुंदर .
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Sat, 09/26/2015 - 19:58 नवीन
भारावून टाकणारे लिखाण यशो ताई आपल्या देशाचे हे अध्यामिक सौदर्य भारतीयांनी एकदा तरी पहिलेच पाहिजे असे तुझे लिखाण वाचून वाटले , आयुष्यात एकदा तरी गंगेच्या दर्शनास ह्या स्थळी जावे लागणार , कुठल्याही मंदिरांच्या रांगेत गाभार्यात जे आत्मिक समाधान लाभणार नाही ते ह्या प्रदेशात निसर्गाच्या कुशीत लाभेल असे वाटते , निसर्गातील पंचभूते आपली खरी दैवते हे तुझा लेख वाचून पटले
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 09/26/2015 - 20:07 नवीन
अद्भुत! हा एकच शब्द सुचतोय या लिखणाला. तुम्ही केलेलं चित्रदर्शी वर्णन, गंगामाई च्या दर्शनाची तुम्हाला लागलेली ओढ आणि दर्शन झाल्यानंतरच्या तुमच्या भावना तुमच्या लेखनातून इतक्या इंटेन्स्ली आमच्यापर्यंत पोहोचताहेत की वाचतांना अंगावर शहारा आणि गळ्यात आवन्ढा अशी माझी या क्षणी स्थिती झालीय.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 27 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 34 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा