नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र
नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र
================
-- राजीव उपाध्ये
डॉ० बर्नाड बेल या फ्रेंच विद्वान-मित्राने मला मानववंशशास्त्राची गोडी लावली (माझ्या लग्नात त्याने माझ्या बाजूने साक्षीदार म्हणून सही केली होती).
मानववंशशास्त्राच्या परिचयाने जगभरच्या मानवीसंस्कृतींकडे बघायचा निकोप दृष्टीकोन प्राप्त झाला तर "सर्व काही भारतीय ते सर्वश्रेष्ठ" हा (सनातनी) दुरभिमान गळून पडला.
खरं तर याची बीजं मुंबईला शिकत असताना पेरली गेली होती. आमच्याकडे चित्रपट बघण्यासाठी फिल्मक्लब आणि फिल्म सोसायटी असे दोन क्लब होते. फिल्म सोसायटी ही बॉलीवुड आणि हॉलिवुडचे लोकप्रिय चित्रपट दाखवायची तर फिल्मक्लब चे चित्रपट ’कलात्मक’ (वास्तवाचे यथार्थदर्शन करणारे) असत. बहुतेक चित्रपट युरोपात तयार झालेले असल्यामुळे त्यात मंचकदृष्ये, मैथुन, नग्नता याची रेलचेल असे. पण ते अतिरंजित नसत. फिल्मक्लब मध्ये १८+ वयाच्या व्यक्तीनाच प्रवेश मिळत असे.
मी (अर्थातच) फिल्मक्लबचा सभासद होतो.
एकदा आमच्या फिल्मक्लबमध्ये एक जर्मन चित्रपट आला होता. ते एक नृत्यनाट्य होते. या चित्रपटात ३०-४० कलाकार प्रथमपासून शेवटपर्यंत पूर्ण नग्न होते. पण त्यात कुठे ही विकृत उत्तेजकपणा नव्हता. या चित्रपटाने माझ्या सोवळ्या (आणि कोवळ्या) मानसिकतेला धक्का बसून फ्यूज उडाला.
माझ्या संस्कृतीने निषिद्ध ठरवलेलं आचरण/वर्तन दुसर्या एका, विशेषत: पुढारलेल्या, संस्कृतीत नॉर्मल असू शकतं ही जाणीव मोठी मानसिक उलथापालथ घडविणा्री होती. कारण भारतीय संस्कृती नग्नतेच्या बाबतीत अतिशय दुटप्पी आहे. धार्मिकतेच्या वेष्टनातील नग्नता भारतीय स्वीकारतात, तिच्यापुढे लोटांगण घालतात. तर खजुराहो सारख्या ऐतिहासिक वारशातील नग्नता अभिमानाने चघळतात. पण उर्फी जावेदला मात्र ते स्वीकारू शकत नाहीत.
जगभरच्या नग्नतेचा निरीक्षणात्मक अभ्यास चालू केल्यावर काही ठळक गोष्टी लक्षात आल्या. जगात किमान डझनभर नग्नतेशी संबंधीत ’उत्सव’ आहेत. भारतात फक्त कुंभमेळ्यात अशी उत्सवी-नग्नता दिसते. पण ती नागासाधुंपर्यंतच मर्यादित आहे. नागासाधू "विकारांवर विजय मिळविण्यासाठी" अघोरी उपायांचा अवलंब का करतात, असा एक मला पडलेला प्रश्न आहे. याचं कारण असं की जगात अनेक समुद्र किनार्यावर विशेषत: न्यूडबीचेसवर समुद्रस्नानाचा आनंद घेणारे लोक बघितले की एक प्रश्न पडतो - नग्नतेने लैंगिक भावना/विकार उद्दीपित होत असतील तर न्यूडबीचवर सर्वात जास्त बलात्कार व्हायला हवेत. पण तसं होताना दिसत नाही. अगदी फ्रान्स मधल्या कॅप द’आग्द सारख्या मुक्त नग्नसंस्कृती जपणार्या शहरात पण राजरोस बलात्कार झाल्याचे ऐकायला मिळालेले नाही. पण जिथे स्त्रिला आजन्म बुरख्यात, नखशिखांत शालिनतेच्या ओझ्याखाली दबून ठेवलं जातं तिथे बलात्कार जास्त होतात. तात्पर्य असे की विकारांवर विजय मिळविण्यासाठी अघोरी मार्ग अवलंबायची गरज नसते. कदाचित एखादी गोष्ट मुबलकपणे उपलब्ध झाली की त्याती्ल नावीन्य संपते आणि आपोआप विकारांवर विजय मिळतो. सतत रक्तपात/मृत्यू बघणार्यांना मरणाची भीति उरत नाही, तसेच. त्यामुळे नग्नतेने लैंगिक गुन्ह्यांना उत्तेजन मिळते हे मला मान्य नाही.
तात्पर्य आपण भारतीय लोक नग्नतेबद्दलच्या दुटप्पी भूमिकेमुळे पूर्णपणे गंडलेलो आहोत. मला तर आजकाल नग्नतेमध्ये ’सवस्त्र’ आणि विवस्त्र असे दोन भेद करावेत असे वाटते. होय "सवस्त्र" नग्नता असू शकते. यात लाजेकाजेस्तव किंवा श्लील-अश्लीलतेच्या कल्पनांमुळे कपडे टाकून तर देता येत नाहीत. पण अंगसौष्ठ्वाचे प्रदर्शन करायची उर्मी/खुमखुमी जबरदस्त असते. कातडे पूर्ण झाकले तरी तंग कपड्यांनी सौष्ठव "नागडे" पडल्याने ही "सवस्त्र नग्नता" ठरते. विवस्त्र नग्नता स्वयंस्पष्ट आहे. त्यामुळे मला वाटते की सवस्त्र नग्नता, विवस्त्र नग्नतेपेक्षा जास्त उद्दीपक ठरू शकते.
समकालीन नग्नतेबद्दल आणखी बरेच लिहीण्यासारखे आहे. संधी मिळाली की लिहीनच...