आठवणींची पन्नाशी : सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय
यंदा म्हणजेच 2025मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही ठळक घटनांना पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने अनेक माध्यमांतून त्यांच्या आठवणी जागवल्या गेल्या. अशा त्या सन १९७५च्या काही निवडक घटनांच्या रोचक तर काहींच्या दुःखद आठवणींचे इथे संकलन करतो. अनेक घटनांची जंत्री करण्याऐवजी काही निवडक घटनांवर प्रकाशझोत टाकलेला आहे. यातील काही घटनांच्या संदर्भात मजेदार किश्शांचाही लेखात समावेश केला आहे. त्यात वाचकांनाही प्रतिसादातून भर घालता येईल. तसेच पुढील चार महिन्यात ज्यांची पन्नाशी पूर्ण होईल अशा प्रसंगांचीही नंतर भर घालता येईल.
कला-संस्कृती मंच
1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या महत्त्वाच्या, जनमनावर ठसा उमटवणाऱ्या आणि कालौघात आख्यायिका बनलेल्या तीन चित्रपटांची दखल घेऊ - मराठी, हिंदी व इंग्लिश या भाषांतील प्रत्येकी एक चित्रपट.
‘सामना’
राजकीय भ्रष्टाचार आणि सामाजिक शोषणाचे धाडसी चित्रीकरण करणारा हा मराठी चित्रपट.
रामदास फुटाणे निर्मित या चित्रपटाच्या पन्नाशी निमित्ताने ‘सामना 50’ हा विशेष कार्यक्रम पुण्यात साजरा झाला. तेव्हा झालेल्या फुटाणे यांच्या मुलाखतीतून बऱ्याच रोचक गोष्टी समजल्या. हा चित्रपट तयार करताना सर्वप्रथम त्यांनी लेखक म्हणून विजय तेंडुलकरांची निवड केली. तेंडुलकरांचे स्वतंत्रपणे केलेले हे पहिले पटकथालेखन. ते करताना त्यांनी श्रीराम लागू आणि निळू फुले यांना समोर ठेवले. दिग्दर्शक जब्बार पटेल तेव्हा चित्रपटात नवखे होते. परंतु फुटाणे यांना पटेल यांच्या कौशल्याबद्दल खात्री होती. सामनातील काही संवाद अजरामर झालेले आहेत.
हा चित्रपट प्रथम बर्लिन चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. पुढे भारतात त्याला तीन राष्ट्रीय आणि अन्य अनेक पुरस्कार मिळाले. या लेखनासाठी तेंडुलकरांनीअनेक साखर कारखान्यांना भेटी दिल्या होत्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शालिनीताई पाटील यांनी त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
सामनासंबंधी माझी एक व्यक्तिगत आठवण. 1975 च्या दरम्यान मी काही कारणास्तव चित्रपट बघणे सोडून दिले होते. सामना चांगला चालल्यानंतर हळूहळू थेटरातून गेला आणि साधारण दीड वर्षाने आमच्या कॉलेजच्या स्नेहसंमेलनात दाखवला जाणार होता. तेव्हा माझ्या एका मित्राने मला खोलीवर येऊन सांगितले की तुझे चित्रपट न बघण्याचे ‘व्रत’ सामना पुरते तरी तू मोड आणि निदान आपल्या कॉलेजात तरी तो बघच !” त्याचे मी ऐकले आणि सामना बघण्याचा आनंद घेतला. चित्रपटातले दोन कलावंत डॉ. लागू आणि जब्बार पटेल हे आमच्याच कॉलेजचे माजी विद्यार्थी असल्याने आमच्याकडे तर या चित्रपटाचे विशेष अप्रूप होते.

. .
शोले
तेव्हाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15/8/1975 रोजी हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि चांगलाच आपटला होता !
कालांतराने मात्र त्याने अनेक विक्रमांचा इतिहास घडवला . . .
ही जादू झाली तेव्हाचा किस्सा तर भन्नाट आहे.
सुरवातीस तो थेटरात फारसा चालत नव्हता. त्यामुळे दिग्दर्शक रमेश सिप्पी निराश झाले होते. त्या काळी केलेली (अंदाजे) तीन कोटी रुपयांची गुंतवणूक म्हणजे काही चेष्टा नव्हती. पण काही महिन्यांनी एका थेटर मालकाने त्यांना प्रत्यक्ष खेळाचे वेळी बोलावले. त्यावर ते मालकांना म्हणाले, " अहो, मला तुम्ही काय रिकामं थेटर दाखवायला बोलावता आहात काय ?"
मालक हसून म्हणाले, या तर खरं !
मग सिप्पी तेथे पोचले.
चित्रपटाचा खेळ चालू झालेला होता. मालकांनी त्यांना आधी गप्पांमध्ये रंगवून ठेवले. चित्रपटाचे मध्यांतर झाले. आता मालक म्हणाले, चला माझ्याबरोबर.
मग त्यांना खाद्य खाद्य-पेय विक्री विभागात घेऊन गेले. बघतात तर काय, तिथे नुसते खाद्यपदार्थ तयार होते परंतु ते विकत घ्यायला चिटपाखरू सुद्धा नव्हते !
सिप्पींना तरीही कळेना, "हे मला काय दाखवताहेत ?"
मग मालकांनी खुलासा केला. "अहो, या खेळाची सर्व तिकिटे विकली गेलेली आहेत. आता मध्यांतर झालेले आहे. तरीसुद्धा एकही प्रेक्षक आतून बाहेर येऊन खाण्यापिण्यासाठी उत्सुक नाही. सर्वजण चित्रपटात खूपच रंगून गेलेले आहेत. त्यांना लवकरात लवकर त्याचा उत्तरार्ध अजिबात काहीही न चुकता पाहण्याची जाम उत्सुकता आहे. हेच तुमचे यश समजा !!"
हे ऐकल्यावर सिप्पी धन्य झाले !
नंतर काही वर्षांनी शोलेबद्दल बोलताना अभिनेते ए के हनगल म्हणाले होते की या चित्रपटाचे खेळ कधी संपतच नाहीत. त्याचा शेवटचा खेळ कधी होईल हे आपण सांगू शकणार नाही !
आज पन्नास वर्षानंतरही त्यांचे उद्गार खरे मानावे लागतील कारण लवकरच शोले नव्या रंगरंगोटीसह चित्रपटगृहात येणार आहे . . .
‘Jaws’
यंदाच्या 20 जून रोजी Steven Spielberg यांच्या जॉज या चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण झाली. एका शार्क माशाने पाच माणसांवर हल्ला केल्याच्या सत्यघटनेवर आधारित कादंबरी Peter Benchley यांनी लिहिलेली होती. तिच्यावर आधारित हा चित्रपट आहे.
त्याचे दिग्दर्शक म्हणून स्टीव्हन स्पिलबर्ग या अवघ्या 26 वर्षांच्या तरुणाची निवड झाली. स्पिलबर्ग यांच्यावर हिचकॉकचा चांगल्यापैकी प्रभाव होता आणि त्याचे प्रतिबिंब जॉजमध्ये पडलेले दिसते. चित्रपटात वैशिष्ट्यपूर्ण संगीताचा वापर केलेला आहे. पाश्चात्त्य संगीतातील E आणि F या दोन साध्या नोट्सचा वापर करून संपूर्ण चित्रपटभर मानसिक ताण आणि आत्यंतिक भीतीचे वातावरण उभे केलेले आहे.
हा चित्रपट भारतात उशिराने आला आणि तेव्हाच्या ‘70 mm’ चित्रपटगृहात मी पाहिला होता. चित्रपटाच्या 81व्या मिनिटाला जेव्हा पडद्यावर शार्क समुद्रातून डोके वर काढतो तेव्हा संपूर्ण प्रेक्षागृह जोरात दचकलेले अजूनही आठवते. परदेशात एका 17 वर्षीय तरुणीला हा चित्रपट पाहिल्यानंतर cinematic neurosis हा मनोविकार जडला. तिला त्याचे झटके येत तेव्हा ती "Sharks! Sharks!" असे किंचाळायची आणि तिला फिट्स देखील यायच्या. या अभूतपूर्व केसचा ‘न्यू इंग्लंड जनरल ऑफ मेडिसिन’ या विज्ञानपत्रिकेत समावेश झाला होता. हा चित्रपट तिकीटबारीवर प्रचंड यशस्वी झाल्यामुळे स्पिलबर्ग यांचे नाव सर्वतोमुखी झाले.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारण
१. भारतात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू केली होती , जी सुमारे २१ महिने चालली. आणीबाणी लागू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी अनेक छापील वृत्तपत्रांमधून अग्रलेखाची जागा मजकूर नसलेल्या कोऱ्या चौकटीने सोडून देण्यात आली होती. या काळात अनेक राजकीय विरोधकांना अटक करण्यात आली आणि नागरिकांची मूलभूत स्वातंत्र्ये रद्द करण्यात आली होती. हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील क्लेशदायक काळ होता. हा विषय बहुचर्चित असल्याने त्यावर अधिक लिहीत नाही.
२. त्याच वर्षी आपल्या स्वातंत्र्यदिनीच आपल्या शेजारी देशात घडलेली घटना तर भयानकच. ती म्हणजे, बांगलादेशचे संस्थापक अध्यक्ष शेख मुजिबूर रहमान यांची काही कुटुंबियांसह झालेली हत्या. त्या दिवशी ते त्यांच्या खाजगी निवासस्थानातच राहत होते. लष्करातील काही अधिकारी बंड करून त्यांच्या घरात घुसले आणि जिन्यातच त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
तेव्हा त्याच्या सविस्तर बातम्या वाचलेल्या आठवतात. जेव्हा खुन्याने त्यांच्यावर बंदूक रोखली तेव्हा ते त्याला म्हणाले होते की, "अरे मी तुम्हाला हा देश मिळवून दिला आणि तू हे काय करतो आहेस?"
त्यावर त्याने फक्त बंदुकीच्या फैरी झाडल्या होत्या.
रेहमान यांच्या दोन कन्या त्या वेळी जर्मनीत असल्यामुळे बचावल्या.
३. आंतरराष्ट्रीय घडामोडींत व्हिएतनाम युद्धसमाप्तीची पन्नाशी महत्वपूर्ण.
उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाम यांच्यात झालेल्या आणि वीस वर्षे चाललेल्या या जगप्रसिद्ध युद्धाची समाप्ती 30 एप्रिल 1975ला झाली. माझ्या शालेय जीवनात त्यासंबंधीच्या बातम्या सातत्याने वाचायला व ऐकायला मिळत.

वरील युद्धात उत्तर व्हिएतनामला रशिया व चीनचा पाठिंबा होता तर दक्षिण व्हिएतनामला अमेरिका आणि तिच्या समविचारी साथीदारांचा.हे युद्ध कोणी “जिंकले” याबद्दल संदिग्धता असून दुमत आढळते. युद्धात अमेरिकेची मानहानी झाली. व्हिएतनाम मोठे नुकसान सोसूनही सावरला.
या दीर्घकालीन युद्धासंदर्भात सत्यजित रे यांच्या १९७०मधल्या प्रतिद्वंदी या चित्रपटातील एक प्रसंग अतिशय बोलका व प्रभावी आहे.
त्या चित्रपटात धृतीमान चटर्जीनी नायकाची भूमिका केली आहे. तो नायक नोकरीच्या एका मुलाखतीसाठी जातो तिथे त्याला विचारतात, “मागच्या दशकातली सर्वात महत्त्वाची आणि वाखाणण्यासारखी घटना कोणती?”
त्यावर नायक म्हणतो व्हिएतनाम युद्ध.
पुढील प्रश्नोत्तरे अशी होतात :
“मानव चंद्रावर उतरला यापेक्षा ती घटना महत्त्वाची वाटते?”
“होय” तो म्हणतो. अवकाश तंत्रज्ञान-प्रगती बघता चंद्रावर जाणे हे अपेक्षित होते. या उलट वरील युद्धामध्ये व्हिएतनामी लोकांचे अतुलनीय धैर्य दिसून आले. तंत्रज्ञानातील प्रगतीपेक्षा मला प्रचंड अशा मानवी धाडसाचे अधिक कौतुक वाटते”.
भीषण दुर्घटना
बिहारमधील चासनाला येथील खाणीत झालेला भीषण अपघात हा भारतातील खाणींच्या इतिहासातील हा एक भयंकर अपघात होता. त्यात 375 कामगारांचा मृत्यू झाला. तेव्हा ही घटना वृत्तपत्रातून बऱ्यापैकी वाचल्याचे आठवते. ती खाण IISCO या स्टील उद्योगाची होती.
त्या घटनेवरील खटला 37 वर्ष न्यायालयात चालला आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा खाणीच्या संचालकांना दोषी ठरवण्यात आले होते परंतु त्यापैकी दोघांचा त्यापूर्वीच मृत्यू झालेला होता.
पुढे या दुर्घटनेचा विषय काही कलाकृतींनी हाताळलेला आहे. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांचा काला पत्थर हा चित्रपट आणि अनिल बर्वे यांचे ‘11 कोटी गॅलन पाणी’ हे मराठी पुस्तक ही याची काही उदाहरणे. हे पुस्तक मी वाचलेले असून त्यातील काही प्रसंग हृदयद्रावक आहेत.
शैक्षणिक बदल
1974 पर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता अकरावीच्या अखेरीस होत असे. 1975पासून ही शैक्षणिक पद्धत बदलून इयत्ता दहावीची परीक्षा ही शालांत करण्यात आली. इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्षांना कनिष्ठ महाविद्यालय असे नाव दिले गेले. त्यामुळे सामान्य पदवीधर होण्याचा आकृतीबंध दहा + दोन + तीन असा झाला, जो आजपर्यन्त चालू आहे.
. .
असा हा पन्नाशीच्या निवडक आठवणींचा देश-विदेशातील फेरफटका !
*************************************************************************************