काल पाकिट रिकामे केले..
काल पाकिट रिकामे केले..
पाकिटाला टोटल चौदा कप्पे होते. कित्येक रिकामे. तर कित्येकात ढुंकूनही न पाहिल्याने काही ऐवज पडला होता.
कार्ड पैसे ओळखपत्रे अश्या महत्वाच्या वस्तू पहिले बाजूला काढून घेतल्यावर एकेक कप्पा चेक करायला घेतला..
गेल्या पाचसहा महिन्यांची मेडीकल बिले सापडली.
एक जुनी बूटाची पावती आढळली.. जिचे बूट कधीच वारले होते.
एक रिटर्न तिकीट जी दुसरया दिवशी वापरता येते म्हणून जपून ठेवली होती. आज वर्ष झाले होते त्या प्रवासाला..
आतल्या कप्प्यातून एक एटीएममधून पैसे काढल्याची पावती निघाली.. ती कोणत्या अंधश्रद्धेने जपून ठेवलेली याची कल्पना नाही.
एक चुरगळलेला पासपोर्ट साईज फोटो सापडला.. छान दाढी केलेला.. माझाच आहे हे पटकन ओळखूच आले नाही.
एक बायकोने दिलेली कसलीशी सामानाची यादी निघाली.. कधी ते सामान आणल्याचे आठवत मात्र नव्हते.
एक काढ्याची रेसिपी.. कधी तो काढाही प्यायल्याचे आठवत नव्हते..
एका कप्प्याला घट्ट चिकटून बसलेली कागदाची चपटी पुडी सापडली. आत माझे रक्षण करत निपचित पडलेला अंगारा होता.
काही कागदी चिटोरयांची अवस्था ईतकी दयनीय होती, की न वाचताच फाडावेसे वाटले..
वाचल्यावरही काही विशेष निघाले नाही.
काही विजिटींग कार्डस देखील अशीच होती. समोरच्याचे मन राखायला स्विकारली होती. बघ हं, जपून ठेवतोय असे त्याला दाखवायला पाकिटात ठेवली होती. जी ना कधी वापरली होती, ना कधी वापरणार होतो. त्यांनाही केराची टोपली दाखवली.
सरतेशेवटी सर्वात आतल्या कप्प्यात एक कागदाचा चिटोरा सापडला..
कधीकाळी दिवाळीच्या मुहुर्तावर ईदवर सुचलेल्या आणि कागदावर उतरवलेल्या दोन ओळी सापडल्या..
पत्थर माती के है टुकडे सारे..
जो ईद ना होती,
तो कोई चाँद ना कहेलाता!
बायकांच्या पर्ससारखे पुरुषांच्या बटव्यात खजिना लपलेला नसतो... तरी शोधाशोध करता काही आठवणी ओघळतातच!
- तुमचा अभिषेक
----------
ता.क. - नव्या पाकिटाला पंधरा कप्पे आहेत!