Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

चार आर्यसत्ये - एक चिंतन

प
प्रसाद गोडबोले
Sat, 02/15/2025 - 07:57
💬 91 प्रतिसाद
प्रस्तावना : १. हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही. त्यामुळे तुम्हाला लेख पटला काय की न पटला काय मला काहीही फरक पडत नाही. २. हा लेख लिहिताना जमेल तितकी तथ्ये आणि संदर्भ वापरण्याचा प्रयत्न केला आहे तथापि काही तथ्येच चुकीच्या शब्दात उधृत केलेली असतील तर आपण जरुर माझ्या निदर्शनास आणुन द्यावीत ही नम्र विनंती ! ३. हा लेख बहुतांशपणे माझ्या वैयक्तिक जीवनातील अनुभवातुन आलेल्या चिंतनांवर आधारीत आहे. तुम्हाला आलेले अनुभव , तुमचे चिंतन , तुमचा अभ्यास , तुमचे आकलन भिन्न असु शकते ! माझे मत हे अंतिम विचार आहे , अंतिम सत्य आहे असा माझा दावा नाही , कधीच नव्हता. ४. निसर्ग परिवर्तनशील आहे, धर्म परिवर्तनशील आहे आणि मीही परिवर्तनशील आहे. त्यामुळे ही मते भविष्यात बदलुही शकतात. स्थलकालातीत अशा सुसंगतता , सातत्यता वगैरे मुल्यांचा मी आदर करीत असलो तरी मला त्यांचे बंधन नाही! ________________________________________ काही काही लोकांचा ना उगीचच गैरसमज आहे की हिंदु धर्म बौध्द आणि जैन धर्म एकमेकांचा दुस्वास करतो . मुळात हिंदू असा धर्मच नव्हता. धर्माचे परंपरेचे नाव होते सनातन धर्म. जो की वेदोक्त श्रुती स्मृती पुराणोक्त वर्णाश्रम धर्माधारित मोक्षाप्रत जाण्याचा मार्ग आहे. पण हे तिन्ही धर्म जवळपास किमान २५०० वर्षे जुने आहे. त्यांची तत्वे , आदर्श ही तितकेच प्राचीन आणि जुने आहेत. त्यांचे आचरण करणे जवळपास अशक्यप्राय च आहे आजच्या काळात . शुध्द बौध्द धर्माच्या तत्वांनी जगणारी अगदी मोजकी माणसे मी पाहिली आहेत तीही लडाख मध्ये फक्त. तसेच जैन धर्माचे वस्त्रांचा त्याग केलेले कोणत्याही छानछौकी आयुष्यापासुन दुर राहणारे अत्यंत मोजके जैन मुनीच मला दिसले आहेत , तेही पवई, मुंबई ह्या इथे ! आणि सनातन वैदिक धर्मातील अग्निहोत्रादि यज्ञ कर्मे करणारे , श्रुती स्मृतींच्या अनुसार आयुष्य जगणारे लोकं जे मला भेटले आहेत तेही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच ! बाकी बहुतांश समाज ह्या तिन्ही धर्मातील अर्धी मुर्धी तत्वे आपापल्या सोयी नुसार स्विकारुन जमेल तितके आपल्या धर्माच्या नितीमत्तांचे पालन करताना दिसतो . माझे कित्येक असे ब्राह्मण मित्र आहेत जे उघडपणे अमेरिकेत जाऊन स्टेक खाल्याचे कबुल करतात अन वरुन अमेरिकेतील गायी गायीच नाहीत असा प्रतिवादही करतात. काही जैन मित्र आहेत जे मटण रस्स्यातुन पीस बाजुला काढुन फक्त रस्सा ओरपतात ! आणि काही बौध्द मित्र आहेत की जे तंबाखु मद्य आदी निशिध्द व्यसने करतात ! जो तो आपापल्या क्षमतेनुसार , आपापल्या सोयी नुसार जमते तेवढे धर्माचे आरचरण करतो ! हे उत्तम आहे ! मुद्दा इतकाच की बहुतांश लोकातील कोणीही , शुध्द सनातनी , शुध्द बौध्द , शुध्द जैन नाही, लोकं आपापल्या परीने ह्या तीन्ही धर्मातील तत्वे स्विकारुन सम्यक पणे जगतात. ह्या समुच्चयवादी , सम्यक जीवनशैलीचे नाव हिंदु असे आहे ! आणि हे अगदी आधुनिक आहे अशातला भाग नाही . महावीरांना किंवा तथागतांना कोणीही येशु ख्रिस्तासारखे सुळावर चढवलेले नाही , हाच ह्या विधानाचा निर्विवाद पुरावा आहे ! उलट सनातन धर्माने बुध्दाला विष्णुचा ९वा अवतार मानुन त्याला आदरच दिलेला दिसुन येतो. तस्मात् बौध्द धर्म तत्वज्ञान हे हिंदुधर्माला मारक असे नसुन आधारभुतच आहे. विशेषतः वेदांताच्या , अद्वैताच्या आकलनात फार म्हणजे फार मदत होते बौध्द मताची. कारण बौध्द मत बस एक पायरी अलिकडे अद्वैताच्या अनुभुतीच्या ! ___________________________ हां तर बॅक टू मेन टॉपिक : बुध्दाने चार आर्य सत्य सांगितली - १. जगात दुःख आहे. २. त्या दुःखाला कारण आहे. ३. हे कारण म्हणजे तृष्णा (इच्छा आणि हव्यासा) होय. ४ . इच्छा व हव्यासा नियंत्रित करणे हाच दुःखाच्या निरसनाचा उपाय / मार्ग आहे. आणि ह्यासाठी पुढे अष्टांगिक मार्ग सांगितला : सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्म सम्यक उपजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी ____________________________________ हां तर झालं असं की - नोकरी काम धंद्याच्या निमित्ताने मला जवळपास दररोज पुणे दर्शन करावे लागते. त्यामुळे जवळपास १-२ तास अशा विषयांवर चिंतन करायला मोकळा वेळ मिळतो . हां तर अशाच एका चौकात ट्रॅफिक सिग्नलला थांबलो असताना एक दृष्य दिसले - एल लहान मुलगी - अगदी २-३ वर्षाची असेल . भुरकट केस . मळकट कपडे , अनवाणी पायाने सिग्नल पाशी उभी. सोबत तिची आई - तीही तशीच उन्हाने रापलेला काळा वर्ण , शरीराचा कृशपणा गरीबी , दारिद्र भक्कपणे दाखवुन देणारा ! तिच्याही पायात चप्पल वगैरे नाही. ट्रॅफिकसिग्नलवर थांबलेल्या काहीतरी थातुरमातुर खेळणी वगैरे विकत असणारी तिची अजुन काही मुले , तिही तशीच . पण ती लहान मुलगी , अगदी दोन तीन वर्षाची - ज्या दुपारच्या बाराच्या उन्हात आपण आपल्या पोरांना घराबाहेर ही पडु देत नाही त्या अश्या रणरण फुफाट्यात डांबरी रस्त्यावर उभी आहे. पायात काही नाही , डोक्यावर काही नाही . अन्न अन्न करुन आई पाशी रडली असेल त्यामुळे चेहर्‍यावर सुकलेल्या अश्रुंचे डाग . बिचारी आई तिही हताश . आगतिक . तिथेच पलिकडे दुसर्‍या सिग्नलच्या दुसर्‍या बाजुला तसाच ४-५ वर्षाचा एक मुलगा . तसाच उन्हाने रापलेला काळा वर्ण , फाटके कपडे , हातात गाडी पुसायचे फडके . त्याच्या डोक्याला अन डोळ्यांना काही तरी लागले होते . त्याचा २५-२७ वर्षाचा बाप काहीतरी त्याच्या डोळ्यात घालत होता , बहुतेक स्वच्छ पाण्याने धुवत असावा . बाकी काय करु शकणार आहे ? मोठ्ठा सिग्नल असल्याने सगळं शांतपणे न्याहाळत होतो अन मनात विचार आला - जगात दु:ख आहे , त्या दु:खाला कारणही आहे , पण ते कारण म्हणजे तृष्णा ? ह्या लहान लेकरांना कसली आलीय तृष्णा ? त्या दोन वर्षाच्या पोरीला काय हवं आहे ? साधं पोटभर जेवण ? सावली ? ह्याला तृष्णा म्हणायच ? त्या ४-५ वर्षाच्या मुलाला डोळ्याला काही लागले असेल तर डॉक्टर कडे जावे वाटले , बरे व्हावे वाटले तर त्याला तृष्णा म्हणायच ? नाही नाही . काही तरी चुकतंय ! दु:खाचं कारण तृष्णा नाही . आणि कोण कुठली ही ही माणसे ? माझा जीव का कळवळतोय ह्यांच्यासाठी ? मला का दु:ख होतंय ? मला कसली आलीय तृष्णा ? माणसाला माणसासारखं जगायला मिळावं ही अपेक्षा म्हणजे तृष्णा ? आणि मग - का माझ्या मनात नाथांसारखा करुणभाव उत्पन्न होत नाही ? का नाही मी जवळ जाऊन त्या लेकराला कडेवर घेत ? त्याचे अश्रु पुसत ? का नाही त्याला दोन घास भरवत ? नाथांची गोष्ट निराळी होती - नाथांच्या गावाकडाचा वाडा कोणी जाळला नव्हता , नाथांची जमीन कोणी हडपली नव्हती की नाथांची इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली नव्हती . बघ बघ अजुनही तुझा जीव त्या जुनाट दु:खाने तळमळतो आहे . का ? पण मग साध्या न्यायाची अपेक्षा करणं ह्याला तृष्णा म्हणायच का ? असो . सिग्नल सुटतो . आपण पुढे निघुन जातो. पण मनात विचारांची चक्रे मात्रे काही केल्या थांबत नाहीत ! _____________________________________ तर तात्पर्य काय की - दु:खाचे कारण तृष्णा हे नाही . त्या लेकरांना अशाच आई बापाच्या पोटी जन्म का मिळावा ? आपल्याला आपल्याच कुटुंबात जन्म का मिळावा ? आणि अंबानीला अंबानीच्या घराण्यात जन्म का मिळावा ? अर्थात तृष्णेच्या उदयाच्या आधीच काहीतरी आहे जे तुमची सुखं आणि दु:खेही आधीच निर्धारित करत आहे. आणि मग झक मारत आपल्याला पुर्वजन्म , सुकृत , प्रारब्ध , संचित कर्माची संकल्पना मान्य करावी लागते. पण मग पुर्व जन्म सुकृत संचित कोणाला ? कारण आत्मतत्वाला मृत्यु नाही कारण मुळातच जन्मच नाही -
न जायते म्रियते वा कदाचि-न्नायं भूत्वा भविता वा न भूयः । अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो-न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २-२० ॥
मग लोकं हे असं सञ्चित घेऊन का जन्माला येतात अन का ही दु:खे (आणि फॉर दॅट मॅटर सुखेही) भोगतात ? तर हे सगळं हे लिंगदेहाला आहे. लिंग देह अर्थात हा पंचभुतीक इंद्रियांचा समुच्चय असलेला देह म्हणजे मी , अशी जी धारणा आहे आणि ह्याचा उपयोग करुन मी निरनिराळे भोग भोगेन अशी जी वासना आहे , हे ह्या पुनर्जन्मादि गोष्टींचे कारण आहे ! मी देह आहे हे अज्ञान हेच मुळ आहे ह्या सार्‍या दु:खाचे ! दुखाचे , वाईट वाटुन घेण्याचे काही कारणाच नाही ! आणी हे भगवंताने पहिल्याच वाक्यात सुस्पस्ष्टपणे सांगितलं आहे आधीच !
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ २-११ ॥
तस्मात् दु:खाचे कारण तृष्णा हे नसुन हा लिंगदेह म्हणजे मी असे जे देहबुध्दीचे अज्ञान आहे हे दु:खाचे खरे कारण आहे ! अरे पण मग आत्ता आहेत ह्या दु:खांचे काय करायचं ! ही दु:खे तुला ह्या उपरोल्लिखित विचाराची जाणीव व्हावी म्हणुन दिलेली भेट आहे ! आणि हे तुच मागुन घेतलेलं आहेस - कुंती कृष्णाला काय म्हणाली आठवतंय ना ?
विपद: सन्तु ता: शश्वत्तत्र तत्र जग्गुरो । भवतो दर्शनं यत्स्यादपुनर्भवदर्शनम् ॥ २५ ॥
ठीक आहे . पण मग ह्या दु:खाच्या निवृत्तीचा उपाय काय ? सोप्पं आहे की - मी देह नाही . स नित्योपलब्धि: स्वरूपोऽहमात्मा। हे एकदा कळलं की तुझ्या लक्षात येईल की आत्म्याला दःख असं काहीच नाही . हे जे काही आहे ते हे सगळं अन्नमय कोष मनोमय कोषाच्या पातळीवर आहे . आनंदमय कोषाच्या पातळीवर केवळ आनंदच आहे ! पण हे कळतंय पण वळतंय कुठं ? मार्ग काय ? साधना काय ? तेही भंगवंताने सांगुन ठेवले आहे आधीच - ज्ञानयोग ( सांख्य योग) , राजयोग , भक्तीयोग त्यात ज्ञानयोगात कपिलमुनींचे सांख्य दर्शन जसेच्या तसे - ही समस्त प्रकृती पंचमहाभुते आणि त्रिगुणांच्या समुच्चयातुन बनली आहे, त्यात तुमचा देह आला , तुमचे मन आले आणि दःखाचे आकलन करणारी बुध्दी ही आली . हे कळण्यासाठी पंचीकरण नावाचा एक स्वतंत्र विषय आहे ! ह्या विषयावर श्रीधरस्वामींनी लिहिले आहे, समर्थांनी लिहिले आहे , ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिले आहे आणि खुद्द श्रीमदाद्य शंकाराचार्यांनीही लिहिले आहे ! इतके पुरेसे आहे ह्याचे महत्व कथन करायला ! राजयोग एवढं तत्वज्ञान नाही कळत तर साक्षात भग्वद्स्वरुप असलेल्या पतंजलींनीं अष्टांग योगाचा प्रशस्त राजमार्ग दाखवलेला आहेच ! यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी ! पण हा मार्ग एकदम टेक्निकल झाला , हे सगळं गुरुगम्य आहे . प्रत्यक्ष गुरु शेजारी नसतील तर साधा अंतर्कुंभक करणे देखील जीवावर बेतु शकते ! मग त्याहुन सोप्पा म्हणजे भक्ती मार्ग - समर्थ म्हणाले - नवविधाभक्तिराजमार्ग - ते काही उगीच नाही ! श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्। अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥ मस्त आनंदाने एकेक पायरी चढत वर जायचे , काही गडाबड नाही , काही कष्ट नाही, काही रिस्क नाही, की काही त्रास नाही , बस आनंद ! पण सगळ्यात सोपा कोणता मार्ग असेल तर तो म्हणजे खुद्द भगवान म्हणाले तो - कर्मयोग !
सन्न्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ । तयोस्तु कर्मसन्न्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥
कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोग हा साधण्यास सुगम असल्यामुळे श्रेष्ठ आहे. इतकं निर्विवादपणे स्पष्ट सांगुन ठेवलं आहे . आपल्याला बस इतकंच करायचे आहे की -
नैव किञ्चित्कत्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् । पश्यञ्श्रुण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन् ॥ ५-८ ॥ प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि । इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥ ५-९ ॥
बस इतकेच लक्षात ठेव की -
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि । योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥
आता एकदा हे कळलं ना , मग तु सुटलेला आहेस ! आता काहीही बंधन नाही. तु ऑलरेडी सुटलेलाच आहेस ! काहीही दु:ख नाहीच !! , "बंधन आहे , दु:ख आहे , त्यातुन बाहेर पडण्यासाठी साधना उपसना असलं काही कारायचे आहे" असे जे काही तुला वाटत आहे , तो तुझ्या मनाचा देहात्म बुध्दीचा भास आहे . हे म्हणजे लोखंडावर लागलेल्या गंजासारखे आहे . आणि लोखंड जसे तापत्या भट्टीत लाल भडक करुन नंतर ठोकुन ठोकुन शुध्द करतात तसे काहीसे ह्या प्रपंचाचा उद्देश आहे . आणि शुध्द लोखंडाला परीसपर्ष झाला की लागलीच सोने होते तसे ! पण इथे तर मुळात परीसस्पर्ष आधीच झालेला आहे, आता फक्त इम्प्युरिटीज जाळुन नष्ट करायच्या आहेत. रादर ह्या इम्प्युरिटीज , अशुध्दता ही नाहीतच , आहे तो केवळ त्यांचा भास आहे , तो जाळुन नष्ट करायचा आहे बस्स ! सो - Burn , baby Burn .
श्रेयो हि ज्ञानं अभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते । ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्तिः अनन्तरम् ॥
हे वर लिहिलेलें जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अभ्यास कर , पण ह्या अभ्यासापेक्षाही कळणे अर्थात ज्ञान हे श्रेष्ठ आहे , आणि मग हे कळलं आहे त्याचे ध्यान हे त्या कळण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे . आणि मग नुसतेच ज्ञान का ? सर्व कर्मात रत रहात , ध्यानाने कर्मफलांचा त्याग करणे हे त्याहीहुन जास्त बेस्ट ! एकदा हे जमलं की मग शांतीच शांती आहे सतत ! तिथं दु:ख असं काही नाहीच ! एकदा ब्रह्मीभुत झाला त्याला कसलं आलंय दु:ख बिख्ख ! _______________________________ तस्मात् आता आपल्यासाठी चार आर्य सत्ये अशी आहेत १. दु:ख असं काही नाहीयेच , जो आहे तो दु:खाचा भास आहे , तो तुम्हाला कृपास्वरुप लाभलेला आहे. २. हे दु:ख आहे असे जे भासते आहे त्या भासाला कारण आहे . ३. ते कारण म्हणजे देहात्मभाव . आणि त्या दु:खाला , त्या भासाला उद्देशही आहे - तो म्हणजे तुम्हाला देहात्मबुध्दीच्या पलीकडे पहायला शिकवणे. ४. ह्या भासाचे निराकरण करण्याचे अनेक मार्ग आहेत , ज्ञानयोग , राजयोग , भक्तीयोग , कर्मयोग ! तुम्हाला जो मार्ग सुलभ वाटतो तो स्विकारायला तुम्ही स्वतंत्र आहात , शिवाय केवळ एकच मार्ग स्विकारला पाहिजे असाही कोणाचा दुराग्रह , अभिनिवेष नाही, तुम्हाला जे काही सुलभ वाटते , ते स्विकारा ! तूम्ही मुळातच ह्या दु:ख्याच्या भासातुन सुटलेलेच आहात ! _______________________________ हुश्श. फायनली ! I see you ! rm ______________________________ || ॐ शांति: शांति: शांति: ||

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 13581 views

💬 प्रतिसाद (91)
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 02/20/2025 - 19:00 नवीन
हां तेच! मीही राम म्हणत आहेच ! कुठं सगळं लिहित बसू . माझं मला कळलं आहे की दुःखाचे कारण तृष्णा नाहीये, दुःखाचे कारण अज्ञान , अज्ञानाचा भास हे आहे. त्यामुळे त्याचा निर्मुलनाचा उपाय म्हणजे अज्ञान खंडन हा आहे ! ( योगायोगाने आता तेच ऐकत होतो, अध्याय सातवा अज्ञान खंडन. :) ) अवतार ह्या शब्दाची व्युत्पत्ती आधीच देऊन झाली आहे , कुठं परत परत तेच ते लिहित बसू. परशुरामाचं सगळं रामाला पटलं नाही रामाचं सगळं कृष्णाला पटलं नाही कृष्णाचं सगळं बुद्धाला पटलं नाही बुद्धाचं सगळं मला पटलं नाही आणि माझं सगळं तुम्हाला पटलं नाही, ( पटावं असा माझा अट्टाहासही नाही.) पण त्यामुळे आपल्या "अवतारपणाला" छेद जात नाही ! आता हेही तुम्हाला पटो की न पटो. कोणालाही काय फरक पडतो! जळ तरंगीं दोहीं । जळावांचूनि नाहीं । म्हणौनि आन कांहीं । नाहीं ना नोहे ॥ पाणी म्हणा की पाण्यावरचे तरंग म्हणा, त्याने पाणीपणाला छेद जात नाही. राम
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Fri, 02/21/2025 - 01:33 नवीन
त्यामुळे त्याचा निर्मुलनाचा उपाय म्हणजे अज्ञान खंडन हा आहे !
बिन्गो!
आता हेही तुम्हाला पटो की न पटो. कोणालाही काय फरक पडतो!
मला तुम्हाला काही पटवून द्यायचे नाही किंवा काही पटवून घ्याचे नाही. तुमच्या #२ डिस्क्लेमरमधे असलेल्या, "हा लेख लिहिताना जमेल तितकी तथ्ये आणि संदर्भ वापरण्याचा प्रयत्न केला आहे तथापि काही तथ्येच चुकीच्या शब्दात उधृत केलेली असतील तर आपण जरुर माझ्या निदर्शनास आणुन द्यावीत ही नम्र विनंती", ह्या विनंतीनुसार मी काही चुकीची तत्थ्य निदर्शनास आणुन देण्यासाठी प्रतिसाद देतोय. मला जाणवलेले मुद्दे: १. "हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही." ही सुरुवात असल्याने लेख त्यानुसारच वाचला होता. सगळा लेख स्वःताशी हितगुज करत चिंतनपरच होता. पण शेवटच्या परिच्छेदात एकदम "तस्मात् आता आपल्यासाठी चार आर्य सत्ये अशी आहेत" आणि "तूम्ही मुळातच ह्या दु:ख्याच्या भासातुन सुटलेलेच आहात !" असा एकदम निकाल देऊन, वैयक्तिक चिंतनाच्या पलीकडे जाउन पहिल्याच डिस्क्लेमरला व्यत्यास दिला गेला. २. तुमचा लेख जरी स्वान्तःसुखाय असला तरीही तो पब्लिक फोरमवर प्रकाशित केलेला आहे. आणि, तो त्याच्या मेन टॉपिक, चार आर्यसत्य, यांच्यावर लिहीला असल्याने, त्या चार आर्यसत्यांच्या प्रामाणिक अभ्यासाने जर शेवटचा परिच्छेद आला असता तर वैयक्तिक मत म्हणून पुढे जाता आले असते. पण मेन टॉपिकच चुकीच्या चार आर्यसत्यांचा आधार घेत लिहीला आहे. त्यामुळे, संपूर्ण लेख, तुमच्याच एका प्रतिसादात तुम्ही म्हटल्याप्रमाणे ''पूर्वग्रह दूषित शब्दांचा कचरा" ठरतो. पण त्याचे निर्मूलन अज्ञान खंडन आहे, हे तुमच्या ह्या प्रतिसादात आले आहे, सो बिन्गो!! ३. दु:ख, तृष्णा ह्याविषयी नेमकं काय विवेचन आहे ह्यासाठी संदर्भग्रंथ: विभंगसुत्त, साम्युत्त निकाय (SN 12.2). त्यात सग़ळी साख़ळी अज्ञातून सुरू होते आणि ती साखळी कशी तोडायची ह्याचा मार्ग दिलेला आहे आणि त्याचं सार म्हणजे चार आर्यसत्य (धम्मचक्कप्पवत्तन सुत्त (Dhammacakkappavattana Sutta) – सुत्त पिटक, साम्युत्त निकाय (SN 56.11). - (अज्ञानाचा पडदा दूर करण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 02/21/2025 - 02:52 नवीन
पूर्वग्रह दूषित शब्दांचा कचरा >>> हा संदर्भ पाहून "मारुतीचे शेपूट गणपतीला चिकटवणे" हा वाकप्रचार आठवला ! तो कोणाच्या लेखावरचा प्रतिसाद आहे, त्या लेखातील विषय काय ! सगळाच आनंद आहे ! =)))) पण असो. मुळात दुःख आहे हेच अज्ञान आहे, कारण दुःखाची अनुभूती करणारा देहाशी तादात्म्य भाव . हे झाले माझे आकलन. आता बुध्दाने दुःख तृष्णा ची सग़ळी साख़ळी अज्ञातून सुरू होते आणि ती साखळी कशी तोडायची ह्याचा मार्ग दिलेला आहे. मग अर्थाअर्थी मला जे साधायचं होतं आणि बुध्दाने जे ध्येय साधलं ते एकच झालं की !!! भले मग त्याचे आकलन अन् माझे आकलन समान नसेल ! त्याने काय फरक पडतो ! तुम्ही कोणताही मार्ग स्वीकारा, एकदा का तो स्वीकारला की तूम्ही मुळातच ह्या दु:ख्याच्या भासातुन सुटलेलेच आहात ! तुम्हाला अजून शंका असेल तर मात्र तुम्ही अडकलेले आहात. आणि काही माझा नवीन धर्म सुरू करून धर्म चक्र परिवर्तन वगैरे करणार नाहीये ! त्यामुळे माझे मत मला कोणाला पटवून द्यायची गरज भासत नाही. अर्थात तरीही मी जास्तीत जास्त प्रयत्न करत राहतोच टेक्निकली अक्युरेट राहायचा. पण ते माझ्यावर बंधन नाही, it's just a choice. तात्पर्य इतकेच की दुःखाचे मूळ कारण अज्ञान आहे, त्याचे खंडन झाले की बस. मग तुम्ही ते कोणत्याही मार्गाने करा. तुम्हाला असे म्हणायचे असेल की अष्टांगिक मार्ग हाच एकमेव मार्ग आहे किंवा, माझी स्वतंत्र विचार शृंखला चुकीचा मार्ग असल्याने अज्ञान खंडन करू शकत नाही वगैरे वगैरे ... तर ठीक आहे . :))))
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 02/21/2025 - 02:55 नवीन
हे लिहायचं राहूनच गेले... (अज्ञानाचा पडदा वगैरे काही भानगड च नाही, कारण मुळात अज्ञानच नाही हे लक्षात आलेला अन् त्या अनुभूतीत राहण्याचा प्रयत्न करीत असलेला) प्रसाद गोडबोले
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Fri, 02/21/2025 - 06:47 नवीन
परशुरामाचं सगळं रामाला पटलं नाही रामाचं सगळं कृष्णाला पटलं नाही कृष्णाचं सगळं बुद्धाला पटलं नाही बुद्धाचं सगळं मला पटलं नाही
ते बाकीचं सोडा हं, पण बोलता बोलता गोडबोले पंतांनी , स्वतःला रामाच्या मांदीआळींत आपसूकच ठेवलाय पहा ... परशुराम > राम > कृष्ण > बुद्ध > गोडबोले >> हे राम Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 02/21/2025 - 07:05 नवीन
आपसूकच
आपसूकच आहे हो ते. =)))) कधी पासून तेच तर सांगतोय मी . आणि मीच काय , तुम्हीही त्याच मांदियाळीत आहात ! तत्त्वमसि. तुकोबा त्यांच्या अभंगात म्हणाले तसे काहीसे आहे हे - महावाक्य ध्वनी बोंब झाली. आता तुम्हाला आम्ही बोललेले ऐकू येत नाहीये , किंवा तुम्ही ऐकून न ऐकल्यासारखे करताय, किंवा ऐकून घ्यायच्या आधीच नळ स्टॉप वगैरे काहीतरी बाष्कळ लिहायला घेताय, तर त्याला मी काय करू ! अजून किती वेळा सांगायचं =)))) बापरखुमादेविवरु विठ्ठलें माझें मीपण हारपलें ॥ हे मी वर एका प्रतिसाद आधीच म्हणालो आहे , तुम्ही त्यावर उत्तरप्रतिसाद ही दिला आहे , तेव्हा नाहीत का वाचले हे ? की तेव्हा वाचून अर्थ लागला नव्हता ? काही हरकत नाही, आता अर्थ लागला आहे ना , मग झालं तर !! तत्त्वमसि राम
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 02/21/2025 - 07:16 नवीन
ज्ञानदेवे रचिला पाया ! तुका झालासे कळस !! Image removed. संतकृपा झाली । इमारत फळा आली ।। ज्ञानदेवे घातला पाया । उभारिले देवालया ।। नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।। जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।। तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।। बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।। हे वेदांताचे, अद्वैत दर्शनाचे मंदिर दुसऱ्या तिसऱ्या कोणा देवाचे नाहीये, त्यातील देव दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहे ! तत्त्वमसि. :)
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Mon, 02/24/2025 - 11:26 नवीन
मूळ मुद्दा बाजूला सरकवू नका! तो असा आहे: <<का माझ्या मनात नाथांसारखा करुणभाव उत्पन्न होत नाही ? का नाही मी जवळ जाऊन त्या लेकराला कडेवर घेत ? त्याचे अश्रु पुसत ? का नाही त्याला दोन घास भरवत ? नाथांची गोष्ट निराळी होती - नाथांच्या गावाकडाचा वाडा कोणी जाळला नव्हता , नाथांची जमीन कोणी हडपली नव्हती की नाथांची इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली नव्हती . बघ बघ अजुनही तुझा जीव त्या जुनाट दु:खाने तळमळतो आहे . का ?>> आणि त्यावर तुंम्ही काही करणार नाही, कारण... तुमचा जीव 'त्या' जुनाट दु:खाने तळमळतो आहे तुमचं सगळं तर नीट चाललेलं आहे. पण एवढी गहन अगदी हिमालयात जाऊन साधना करुन, वेदांत, गीता, तुकारामाचे अभंग मुखोद्ग्त असून... रस्त्यावरच्या अ़क्षरशः काहीही न मिळालेल्या निरागस मुलांना, माणसाला पाहून, तुमचा जीव 'त्या' जुनाट दु:खाने तळमळतो आहे, अशी स्पष्ट कबुलीच दिली आहे तुंम्ही. माझे अनेक उच्चवर्णीय मित्र काहीही साधना न करता, सहजपणे, पिढ्यानपिढ्या शोषित समाजाला आज राज्यघटनेमुळे जी शिकण्याची संधी मिळाली, तिचा स्विकार करतात. त्यांना नाही असं जुनाट दु:ख होत. अशा प्रकारे, शब्दांचा कीस काढून, ज्ञान(?) मिळवूनही तुंम्हाला हे पचवता येत नाही, त्यामुळे त्या ज्ञानाचा उपयोग काय, हा खरा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Mon, 02/24/2025 - 11:51 नवीन
वेदांत गीता वगैरे अध्यात्म चिंतन अपराधभावातून सुटका करण्यासाठी खूप मदत करते. गांजलेल्यांसाठी पटकन काहीतरी करण्यापेक्षा त्यावर चिंतन, मनन, वाचन, चर्चा इ. केली की काहीतरी केल्याचे समाधान मिळते. किमान मी किती संवेदनाशील आहे, असे म्हणून घेता येते. काही नास्तिक लोक अध्यात्माला 'गिल्ट मॅनेजमेंट टूल' असे म्हणतात. एकदा पूर्वजन्म, प्रारब्ध इ. मान्य केले, की ते आता त्या अवस्थेला का आहेत, याचे समाधानकारक उत्तर मिळते व आपल्याला काही करण्याचे कारण रहात नाही. त्यामुळे मध्यमवर्गीयांत अध्यात्माचा छंद वाढीस लागला आहे. बुध्द चिंतन, मनन याला महत्व न देता करूणेला महत्व देतो.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 02/24/2025 - 12:22 नवीन
हे बघा, मला अजून एक साक्षात्कार झाला आहे की मी काहीही लिहिलं तरी ते काही लोकांना पटणारे नाहीये च. अगदी 1+1 = 2 लिहिलं तरीही पटणार नाहीये . बुध्द करुणेला महत्त्व देतो तर ह्या देशातील करोडो बुध्दाचा मार्ग अवलंबन करणाऱ्या लोकांवर माझा विश्वास आहे की ते त्या निरागस निष्पाप लेकरांना उचलून कडेवर नक्की घेतील ! मी आमच्या न्यायाची प्रतीक्षा पहात राहीन , आमचे आपलं गिल्ट मॅनेजमेंट टूल इम्प्रोव करत राहीन ! बाकी गावाला वाडा परत बांधला की नक्की सुरू करेन ह्या अशा अनाथ मुलांसाठी काहीतरी ! बाकी बास आता , कंटाळा आला ह्या इथे लिहायचा. सध्या मॅडम ने जे भाषण दिले त्यावर मनोरंजन करत आहे , तस्मात् तिथं बोलू =))))
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Mon, 02/24/2025 - 12:51 नवीन
तुंम्ही विचारलेल्या प्रश्नाला उतर दिलं, तर पटेल की. न पेक्षा उत्तर देता येत नाही, असं स्पष्ट सांगणं जास्त चांगलं.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Mon, 02/24/2025 - 12:53 नवीन
त्या ज्ञानाचा उपयोग काय?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 02/24/2025 - 14:05 नवीन
ज्ञानाचा उपयोग हाच आहे की दुःख असं काही नाहीये , आहे हा दुःखाचा भास आहे, त्या भासाचे कारण आपली द्वैताविषयीची ठाम धारणा ही आहे. हे लक्षात येणे !! एकदा जे आहे ते सगळं "परफेक्ट" आहे. हे लक्षात आलं एकदा ज्याला आम्ही कर्म विपाक म्हणतो , तुम्ही गिल्ट मॅनेजमेंट टूल म्हणता, ते एकदा जमलं की ह्या विश्वातील प्रत्येक गोष्टीचे परफेक्ट असणे, जे जसे आहे ते तसे असणे हे परफेक्ट आहे हे लक्षात येतं. आणि मग झोपेतून जागे झाल्यावर निद्रा आपोआप नाश पावते तसे काहीसे दुःख आपोआप नाश पावते. अजून काय उपयोग हवा ! मला जे आमचे जुनाट दुःख टोचत होते त्याचा कार्यभाग साधला गेला आहे ! आता दुःख असं काही नाही. :) आता तुम्ही म्हणाल की मग कसल्या न्यायाची वाट पाहताय ? तर त्याचेही उत्तर असे आहे की हे "न्यायासाठी झुरणे" हा ही आमच्या पूर्व कर्माचा भाग आहे , तो बस भोगून संपवत आहे. आता दुःख असे काही नाही ! आता बस राम आहे ! इथे मला तुकोबांचा एक अभंग आठवतो पण तो खूप मोठ्ठा असल्याने इथे लिहित नाही फक्त शेवटची ओळ लिहितो आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१८॥ भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥१९॥ तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगें ॥२०॥ पांडुरंग बुद्धी देतोय तसं बस लिहित राहतोय मी ! राम कृष्ण हरी आता इतकं पुरे. पुढील चर्चा नवीन लेखावर !
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 02/25/2025 - 13:51 नवीन
लेख १५ फेब्रुवारीला २०२५ टाकला आहे. त्यात तुमच्या जुनाट दु:खाचा उल्लेख आहे. माफ करा, पण माझा तुंम्हाला वेदांत व अध्यात्माचे ज्ञान खूप आधीच झाले होते, असा समज होता. कारण ३० सप्टेबर २०२४ च्या 'सूर्य पाहिलेला माणूस' या लेखात आपण खालील वाक्ये लिहीली होती: आज्जींने माझ्या हातात न्याहारीसाठी केलेल्या गोडाच्या शिऱ्याची वाटी दिली आणि आजोबांकडे बघून म्हणाली: " हे पहा आला तुमचा सूर्य पाहिलेला माणूस !" आणि हसत हसत आज्जी स्वयंपाक घरात निघुन गेली. नानांनी माझ्याकडे वळुन पाहिलं नाही मात्र त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचं हसु मात्र उमटलं. तुमचा ६ जून २०२४ च्या 'परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ५ संपुर्ण.' लेखात स्वामीजींनी आपल्याबाबत खालीलप्रमाणे भाष्य केले होते: स्वामीजी म्हणाले - You explained it the best. आणि नंतर गालातल्या गालात हसत म्हणाले - It took me 20 years to understand this and you got it in just 7 days' shivir ! दोन्ही तुमच्या स्वतः बद्दलचे उल्लेख वाचून कोणाचाही समज होईल की तुंम्हाला ते तथाकथित ज्ञान खूप आधीच झालेले आहे. म्हणूनच माझाही तसाच समज झाला होता. पण १५ फेब्रुवारी २०२५ ला मात्र तुमचे वर्षानुवर्षांचे जुनाट दु:ख अजून छळत असल्याचा उल्लेख आला. तसेच आपण बुध्दाने सांगितलेले दु:खाचे कारण चूक असल्याचे व तुमचे ज्ञान मात्र बरोबर असल्याचे प्रतिपादन केले आहे. अर्थात लेख लिहीपर्यंत तुमची दु:खे तशीच होती, पण लेख लिहिल्यानंतर ते आज अशा दहा दिवसात ती दूर झाली, हे आपण स्पष्ट केले ते खूप चांगले झाले. बाकी ती रस्त्यावरची मुले, त्यांचे दीनवाणे आईबाप यांच्या दु:खाबाबत... असो.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 02/19/2025 - 19:46 नवीन
हा धागा नि प्रतिक्रिया माझ्या समजापलीकडील आहेत त्या पेक्षा मी मशीन डिसाइन अजून दोन वेळा वाचून घेईन. फक्त प्रश्न असाय की ह्या धाग्याच्या शेवटी जो फोटोय तो गोडबोले साहेबांचा आहे का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/20/2025 - 00:06 नवीन
फक्त प्रश्न असाय की ह्या धाग्याच्या शेवटी जो फोटोय तो गोडबोले साहेबांचा आहे का? ----- लोचट माणसाचा मनोरंजक प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 02/20/2025 - 11:49 नवीन
फक्त प्रश्न असाय की ह्या धाग्याच्या शेवटी जो फोटोय तो गोडबोले साहेबांचा आहे का?
आहा! तो फोटो रमण महर्षी ह्यांचा आहे ! मी बस तसे व्हायचा प्रयत्न करत आहे , किंबहुना , होतो !
होतो !
याचसाठी केला होता अट्टाहास । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥ आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥ कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥ तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥ मन:पूर्वक धन्यवाद ! I don't have words to thank you enough ! माझे डोळे अक्षरश: पाणावले तुमचा प्रतिसाद पाहून. __/\__
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 02/20/2025 - 15:00 नवीन
अच्छा! मन:पूर्वक धन्यवाद ! I don't have words to thank you enough ! मी बस तसे व्हायचा प्रयत्न करत आहे , किंबहुना , होतो ! तुमची अध्यात्मिक प्रगती अशीच राहिली तर तुम्हीही त्यांच्या सारखे व्हाल! _/\_
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/21/2025 - 01:28 नवीन
"तुम्हीही त्यांच्या सारखे व्हाल..." म्हणजे कसे? दिसायला की त्यांच्या सारखे ज्ञानी.... गाळलेल्या जागा नीट भरावी... इतपत तरी ज्ञान हवे....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/21/2025 - 07:40 नवीन
लेखकाची सर्व मतं न कळण्यासारखीच आहेत. स्वतःच विचारांचा गुंता करुन ठेवलाय अर्थात सगळं गिचमीड. आणि नाहीच कळलं तर, तुम्ही ज्ञानेश्वरांच्या किंवा तुकारामांच्या किंवा अर्जूनाच्या पायरीवर आलं पाहिजे. म्हणजे तेथून तुम्हाला लेखांतील ज्ञानकण आणि कृष्णाला काय म्हणायचं आहे ते समजू लागतं. स्वांतसुखायच्या नावाने दुसरं गेट ऑलरेडी बंद करुन टाकलंय. मला जे कळलंय ते अत्युच्च पायरीवरचं आहे. आणि त्या पायरीला पकडायचं तर, खाली मान घालून चालू पडा. =)) ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु ।। अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप ।। दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा ।। तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती ।। -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 02/21/2025 - 09:55 नवीन
मन:पूर्वक धन्यवाद सर ! माझे लेखन तुम्हाला कळो न कळो, माझी काही हरकत नाही, तुम्ही फक्त असेच लक्ष असू द्या आमच्यावर ! आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांचा ॥१॥ सर्वभावें नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥ लोटांगण तुझ्या घालीन अंगणीं । पाहीन भरोनि डोळे मुख ॥२॥ निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊं नेदी मनीं शंका कांहीं ॥३॥ अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका म्हणे ॥४॥ राम
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Fri, 02/21/2025 - 10:01 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 02/21/2025 - 10:16 नवीन
आज काय सुट्टी आहे काय आंद्रे ? =)))) माझं काम कालच संपलं असल्याने मलाही वेळ आहे आज. थांबा, आमच्या दुसऱ्या लेखनाच्या धाग्यावर या , तिकडे तुला जास्त "रोचक" विषय देतो गप्पा मारायला. =))))
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/21/2025 - 10:48 नवीन
लेखन कळायचा विषयच नाही. लेखन मांडणी सगळीच गंडलेली आहे. ( कायमच तशी असते ) प्रतिसादांमुळे जी जाणीव होते. आनंद असो की दु;ख असे काहीच जर नसते तर तातडीने दाद द्यायला आलाच नसता. हे जे जाणवते त्याला भास नाही म्हणत ती प्रत्यक्ष जाणीव असते. =)) ( वाह सर वाह.) आई गं....! =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 02/21/2025 - 11:34 नवीन
लेखन मांडणी सगळीच गंडलेली आहे. ( कायमच तशी असते )
ह्यातच आलं सगळं सर ! एकदा का तुम्ही हे मान्य केले आहे आता मग मी लिहिलेले तुम्हाला कळणे न कळणे हा विषयच रहात नाही ना ! =)))) मी ते गट १ गट २ म्हणालो होतो, ते पटलेलं दिसतंय तुम्हाला. कारण मी काहीही लिहिलं तरी तुमच्या लेखी ते गंडलेली मांडणी असेच असणार आहे . =)))) पण ह्या निमित्ताने तुम्ही तुकोबांची गाथा वाचता, रामाचं नाव घेता ह्यातच मला समाधान आहे, मी आधीही म्हणालो आहेच की हे ! बाकी कोणाला नाही पण तुम्हाला तातडीने साद द्यायला मी कायम हजर आहे कारण, तुमच्या प्रतिसादात राम पाहणे हीच माझी परीक्षा आहे. राम
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/21/2025 - 11:42 नवीन
काळजी घ्या. जपा. बडबडणे वाढले आहे. त्यासाठी सांगावे लागते. आपलं ते स्वांतसुखायवालं डिस्क्लेमर पुन्हा पुन्हा वाचा. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 02/21/2025 - 11:49 नवीन
बघा सर, मी आत्ताच म्हणालो होतो की नै, तुमच्या प्रतिसादांचा मला सगळ्यात जास्त फायदा होतो !! तुमचा हा प्रतिसाद मला काय भारी वाटलं काय सांगू. हीच अवस्था तुकोबांची झाली होती ... माझी मज झाली अनावर वाचा । विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रम्हरस ठसावला ॥१॥ माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु.॥ लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥२॥ तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊर्मी एकमय ॥३॥ ह्या प्रतिसादातून, आपल्याशी संवादातून मला सुखच मिळत आहे सर !!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/21/2025 - 11:55 नवीन
आपल्याशी संवादातून मला सुखच मिळत आहे सर !! =)) सुख असं काही नसतं. तो सुखाचा भास आहे. तो तुम्हाला कृपास्वरुप लाभलेला आहे. =)) मरतंय आज हसून हसून.... =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 02/21/2025 - 14:28 नवीन
सुख असं काही नसतं. तो सुखाचा भास आहे.
हे चुकलं बघा सर. होईल जाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥१॥ येरांनीं सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥ध्रु.॥ धाला आणिकांची नेणे तहान भूक । सुखें पाहें सुख आपुलिया ॥२॥ तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दाचे गौरव कामा नये ॥३॥ दुःख हा भास आहे , सुख हा आभास नव्हे, दुःखाचा अभाव हेच सुख आहे . सुखें पाहें सुख आपुलिया असे काहीसे आहे हे ! पण ही अनुभवाची बाब आहे , बघा अनुभवला आले तर !!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/21/2025 - 14:39 नवीन
>>>> हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही. उगाच अभंग टाकून काहीही पटवून द्यायचा प्रयत्न करु नये. आणि गंडलेली मतं लादू नये. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 02/21/2025 - 14:44 नवीन
अहो , तुम्ही प्रतिसाद वाचत तरी आहात का नाही . मी म्हणालो की हा अनुभवाचा मामला आहे. हे पटवून देण्यासारखे नाहीच. अनुभवगम्य गोष्टी शब्दांनी कशा पटवून देता येतील ? किमान एकदा वाचा तरी प्रतिसाद उत्तर द्यायच्या आधी ! तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दाचे गौरव कामा नये !!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/21/2025 - 15:04 नवीन
=)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 02/21/2025 - 15:06 नवीन
राम
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Fri, 02/21/2025 - 09:57 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 02/21/2025 - 16:49 नवीन
मला अजूनही कुठेतरी गफला वाटतो ब्वा. म्हणजे सगळे ब्रह्म आहे, आयुष्य माया आहे, सगळे भ्रम आहे असे सगळे पटले तरी सगळी दिनचर्या मोर ऑर लेस पूर्वीसारखी कशी राहणार? अजूनही कुटुंबं वत्सल वैगेरे कसे राहणार? (कारण तुमचे कुटुंबं पण एक भ्रमच की. सगळे ब्रम्ह आहे. मग कुटुंबं काय आणि रस्त्यावरचा दगड काय एकच. हे मला पटत नाही मी फक्त लॉजिकल एक्सट्रापोलेशन करतोय.) मग वरवरचे बोलण्यातले, अविरभावातले फरक वगळता बाकीचे आहे तसे कसे चालेल ब्वा? एक फँटसी झाकायला आणखी चार फँटॅस्या उभ्या करायला लागतात. उदा - जर सगळे ब्रम्ह आहे तर भ्रम किंवा माया कशामुळे? संचित कर्म कशामुळे? जितके प्रश्न पडतील तितकी डिटेल्ड फँटॅस्टिक उत्तरे मिळत जातात. प्रत्येक उत्तर आदल्या प्रश्नापेक्षा कमी आणि कमी तपासण्याजोगे असते. सरते शेवटी उत्तर असते की आपल्याला अनुभव आला तरच विश्वास ठेवा. बरं अनुभव कसे मिळतात? तर तुमच्या भौतिक शरीरानेच. म्हणजे तुमचे शरीर म्हणजे तुम्ही नाही हे समजण्यासाठी शरीराकडून अनुभव मिळवावा लागतो. इथे "लीला" हा प्रकार पण ऍड्रेस करतो. राम तथागत बुद्धाबद्दल प्रतिकूल बोलतो. हे दोघेही अवतार असतील तर हे कसे? उत्तर आले लीला. म्हणजे परमेश्वर स्वतःशी खेळ खेळतोय. परमेशवर म्हणजे ब्रह्मच म्हणजे तुम्हीच हा. हे म्हणजे बॉयलर उत्तर झाले. ह्यापुढे विचार करायची गरज संपली, सगळे ड्रामा, लीला मध्ये राईट ऑफ मारता येते. ह्याची इतरधर्मीय तुलनात्मक उदाहरणे पण आहेत. ख्रिषचन म्हणतात येशू सर्व विश्वाच्या पापांसाठी सुळावर चढला. बरं, पण ते ट्रिनीटी हया संकल्पनेवर पण विश्वास ठेवतात. God is a single entity made of three person किंवा असेच काहीतरी. हे देखील लिमिटेड "अद्वैत" टाईप आहे- म्हणजे निखालस अर्थहीन आणि तर्कहीन. ते असो. पण ते ट्रिनीटी मानतात म्हणजे असे मानतात की याहवे (म्हणजे येशूचे वडील, आकाशातला बाप्पा), देवाची आत्मा आणि येशू (फादर सन अँड दी होली स्पिरिट) हे एकच देवाचे तीन अंग आहेत. पण हे तिघे भिन्न पण आहेत. बरं. मग पाप पुण्य कोणी बनवले? तर देवाने. पाप करण्यास सक्षम माणसे कुणी बनवली? देवाने. पाप माफ कोण करणार? देव. माफिसाठी टॉर्चर आणि बळी कुणाचा? देवाचाच! ही सगळी भानगड कशासाठी? ख्रिषचन म्हणतात की देवालाच माहित. त्यांना कोणीतरी "लीला"ची टीप द्यायला हवी. हा गफला सर्व अब्राहमिक धर्मात आहे. पापक्षम माणसे, पापांची व्याख्या, आणि पापांचा निवाडा सगळे एकच देव करतो, का? कशासाठी? पाप शक्यच नाही असे जग का नाही बनवले? तळटीप - माझे आवडते लेखक जे आर आर टोलकीन ह्यांनी त्यांच्यापरीने वरील प्रश्नाचे उत्तर दिले आहे. लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या विश्वाचा निर्माता परमेश्वर आहे एरू इलूवितार. तो त्याच्या विचारांनी इतर देवता- व्हॅलार बनवतो. आणि व्हॅलार आणि तो मिळून एक सुरेख गीत गाऊ लागतात. पण, त्यात इलूवितारनेच बनवलेला एक व्हॅलार - मॉरगॉथ, स्वतःची वेगळी धून गाऊ लागतो, जी इलूवितारच्या संगीताशी विसंगत असते. इतर काही व्हॅलार त्याला सामील होतात. दोन गीतांमधल्या संघर्षात इलूवितारचे गीत जवळपास विरून जाते. पण इलूवितार एक असा सूर पकडतो की संबंध अवकाश त्याने भरून जाते. मग इलूवितारणे मॉरगॉथला बनवलेच का? तर दोन गीतांमधल्या संघर्षामुळे इलूवितारचे गीत आणखी सुरेख झाले. हे लिखाण सुरेख आहे. टोलकीन साहेबांना दाद द्यावी तितकी कमी. पण हे स्वीकारण्यासारखे स्पष्टीकरण आहे का? केवळ शब्दांच्या करामतीने प्रभावीत होऊन काय खरे काय खोटे ठरवणे कितपत बरोबर?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 02/21/2025 - 16:58 नवीन
हे काही टोलकीन साहेबाचे स्वतःचे विचार नाहीयेत. सैतान हा केवळ देवाच्या हुकूमशाहीला कंटाळून बंड करणारा देवदूत आहे ही जुनी संकल्पना आहे. मिल्टनचे सुप्रसिद्ध काव्य पॅराडाईज लॉस्ट मध्ये सुद्धा तीच कल्पना मध्यवर्ती आहे. त्या काव्यातला सैतान एक अत्यंत चर्चले गेलेले पात्र आहे. ते पात्र नायक म्हणून वाचले जाणे सुद्धा सहज शक्य आहे. सिनेमा-टीव्ही मधला दुष्ट शैतान इथे नाहीये - तर परमेश्वर जे ठरवतो तेच चांगले, आणि त्यामुळे त्याविरुद्ध बंड करणारा वाईट - असा हा सैतान आहे.
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Fri, 02/21/2025 - 17:13 नवीन
सगळे ब्रह्म आहे, आयुष्य माया आहे, सगळे भ्रम आहे. पण १९४८ ला जाळलेला वाडा खरा आहे... जग माया आहे, आणि आपण लालसा वासना जगाने सोडून दिली पाहिजे... पण तथाकथित हडपले गेलेली जमिनीची हाव आम्ही मात्र सोडणार नाही.... आधी पिढ्यानपिढ्या ओरबाडून घेतलेले आणि पूर्वापार बापजद्यांच्या वशिल्यानेच मिळणारी हक्काची जागा, हे "संचित कर्म" वैगरे सब झूठ पण कोलकल्पित इंजिनियरिंग किंवा मेडिकल करायची संधी कोणी हिसकावुन घेतली जाणे, हे मात्र खर्र खर्र, बरका...
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Sat, 02/22/2025 - 05:29 नवीन
आणि इतका प्रचंड आध्यात्मिक अभ्यास असताना देखील कोणाचे विचार पटले नाहीं की त्याला लगेच गट क्रमांक 2 मध्ये टाकायचे
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 02/24/2025 - 17:52 नवीन
आणखी एक अनेकदा अध्यात्मिक विचाराची लोकं आपल्या पंचेंद्रियांना, शरीराला अनरिलायबल म्हणतात. पण शरीर नसलेल्या माणसाने अध्यात्मिक अनुभव घेऊन रिपोर्ट केल्याचे कुठे दिसत नाही. उलट, असे अनुभव मिळवण्यासाठी शरीरला एका विशिष्ठ स्थिती मध्ये न्यावे लागते, मग ते ध्यान करून असो वा विशिष्ठ केमिकल किंवा ड्रग घेऊन असो . आणि अश्या स्थिती मध्ये चित्रविचित्र अनुभव आले तर ते मात्र खरे मानावेत.
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Tue, 02/25/2025 - 07:04 नवीन
पण शरीर नसलेल्या माणसाने अध्यात्मिक अनुभव घेऊन रिपोर्ट केल्याचे कुठे दिसत नाही.
उघडा डोळे ... बघा नीट ... एका नॉन बायोलॉजिकल व्यक्तीने तो अध्यात्माचा महामेरू कधीच सर केलाय ... ओळखा पाहू कोण ! Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 02/25/2025 - 14:52 नवीन
हायला अशा अध्यात्माच्या धाग्यावर सुद्धा (त्यातले मला ओ कि ठो कळत नाही) लोक आपले राजकीय पूर्वग्रह आणि ठसठस बाहेर काढतात हे पाहून थोडंसं आश्चर्य आणि गम्मत वाटली. लोकांच्या मोदीद्वेषाची गळवं कुठे कुठे फुटतील ते सांगता येत नाही हेच खरं बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा