शेअर बाजार २०२४: नियोजन, चर्चा, अंदाज
इशारा: सदर धागा लेखक अर्थतज्ज्ञ, गुंतवणूक तज्ज्ञ, बाजार सल्लागार इ. नाही. हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचून कुणी गुंतवणूक केल्यास व त्यातून आर्थिक किंवा इतर नुकसान झाल्यास हे संस्थळ, सदर लेखक, प्रतिसादक इ. जबाबदार असणार नाहीत.
---
बाजारात सध्या तेजीचा बैल चौखूर उधळतोय. महिन्याभरातच सुमारे ९ टक्क्यांनी वाढून मागच्या आठवड्याच्या शेवटी निफ्टी २१,४५६.६५ वर बंद झालाय. अर्थातच, रिलायन्स, एचडीएफसी बँक, आइसीआइसीआइ बँक, इन्फी, टीसीएस सहित सगळ्याच प्रमुख कंपन्यांनी या आठवड्यात पाच टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली आहे. अदानींचे स्टॉक्स हिंडेनबर्गच्या ग्रहणातून बाहेर पडू लागलेत.
या पार्श्वभूमीवर या आठवड्यात (१८ डिसेंबर २०२३) या महिन्यात, पुढच्या तिमाहीत आणि मुख्यतः २०२४ या वर्षात बाजाराचे चित्र कसे असेल, व्यापाराचे, गुंतवणुकीचे दिशा आणि धोरण काय असावे याची चर्चा मिपावर व्हावी या हेतूने हा धागा काढत आहे.*
स्फूट नोंदी:
इरेडा आइपीओची वर्गणी भरली होती. एकच लॉट मिळाला. ३२ च्या भावाने मिळालेल्या ४६० स्टॉक्सपैकी ८५ च्या भावाने १७३ स्टॉक्स विकून टाकले आणि भांडवल मोकळे केले. सध्या २८७ स्टॉक्स आहेत. १२३ पर्यंत गेलेला भाव सध्या ११० च्या खाली आलाय.
ऍक्सेंट मायक्रोसेल आइपीओची वर्गणी भरली होती. एकही लॉट मिळाला नाही.
नेट अवेन्यू आइपीओची वर्गणी भरायची होती, तिसऱ्या दिवशी पेमेंट करणे झाले नाही. १८ चा भाव ३४ वर गेलाय.
प्रेस्टनिक इंजिनीअरिंग, डॉम्स इंडस्ट्रीज आइपीओची वर्गणी भरली आहे.
सुतोवाच करण्यासाठी काही प्रश्न:
सुझलॉन वर्षभरात थोडा थोडा करून सरासरी १४ वर घेतला होता, मध्यंतरी ३० वर थोडा विकला होता, आज अजून ३८ वर घ्यावा असा विचार सुरु आहे. दसरा-दिवाळीपर्यंत पन्नाशी पार करेल का?
येसबँक या वर्षाच्या सुरुवातीला १६ वर घेतला होता, अजून ठेवला आहे. २०२५ च्या सुरुवातीपर्यंत पन्नाशी पार करेल का?
मार्चमध्ये चाळीशीच्या खाली असलेला बँकनिफ्टी काळ अट्ठेचाळीशीवर गेला, येत्या मार्च-जूनपर्यंत पन्नाशी पार करेल का?
रेल्वेला सेवा / उत्पादने पुरविणाऱ्या कंपन्यांत सहा महिन्यांसाठी गुंतवणूक करावी का?
भारत सरकार अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राला उत्तेजन देत आहे. त्यांतील कंपन्यांत वर्ष-सहा महिन्यांसाठी गुंतवणूक करावी का?
अमेरिकेच्या बाजाराचे चित्र पुढच्या तिमाहीत कसे असेल?
२०२४ लोकसभा निवडणुकांपर्यंत अडाणीचे स्टॉक्स वधारतील का?
* 'बाजारात काहीही निश्चित नसते' वगैरे ढिसक्लेमर्स धरून / बाजूला ठेऊन मिपा तज्ज्ञांनी योगदान द्यावे ही विनंती. चर्चेतून झालाच तर मिपाकरांचा फायदा होईल आणि अजून वर्ष-सहा महिन्यांनी आपापले अंदाज किती बरोबर-चूक ठरले याची पडताळणी करून पाहता येईल. मिपावर राजकीय धुळवंड सुरु नाहीय, आर्थिक लठ्ठालठ्ठी सुरु करायला काय हरकत आहे? आखाडा सुरु झाल्यावर चार-दोन गुद्दे देता-घेता येतील ;-)
चूभूदेघे.
---
सध्या तरी बाजारात "काठोकाठ भरू द्या प्याला फेस भराभर उसळू द्या" अशी स्थिती आहे; एवढ्यातच "मानस का बधिरावे हे? बघतसे खिन्न जगता" असे होऊ नये ही श्री वेंकटेश्वर स्वामी चरणी प्रार्थना.
अदानींना , विरोध करतील आणि तिथे गुंतवणुक पण करतील...अदानीला सपोर्ट करतील. पण तिथए गुंतवणूक करनार नाहीत असेही काही नग असतात. (टीप- मी अदानीत एक कवडीही गुंतवली नव्हती नी गुंतवनार नाही. सरकारी यंत्रणांचा गैरफायदा घेऊन श्रीमंत होणारे जास्त काळ श्रीमंत राहत नाहीत.)