एक संध्याकाळ हिमालयाच्या कुशीत ... देकार्त, फोरीए अन् माऊलींसोबत !
मंदिराशेजारी घर असण्याचे काही फायदे असतात काही तोटे . तोटे म्हणजे बोलायलाच नको. कधीमधी अधुनमधुन काही ना काही ढ्यँड ढ्यँड ढ्यँड चालु असतेच . शिवाय तक्रार करायची सोय नाही. पण कदाचित हाच फायदा आहे . ही ही भोळ्याभाबड्या लोकांची प्रदर्शनप्रचुर भक्ती कम डोंबार्याचा खेळ पाहुनही शांत रहाता येणं ही एक साधनाच आहे म्हणा ! पण कधी कधी काहीतरी चांगलं कानावर पडतं अन बरं वाटतं.
असेच नेहमीसारखीच दुपार. काहीबाही कोडींग करत बसलेलो. स्पीकरर्वर काही तरी चालु होतेच . पण आवाज कमी होता अन मंजुळही होता त्यामुळे त्याच्याकडे "लक्षपुर्वक दुर्लक्ष" करता येत होते. कोड रन झाला अन दोन क्षण निवांत मिळाले अन लक्षात आलं - हा तर जगजीत सिंगचा आवाज-
https://youtu.be/S6UiK9YD0mE?t=461
मध्येच एक श्लोक कानावर पडला ७:४० : कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतःक्लेषनाशाय गोविंदाय नमो नम: || अहाहा , क्या बात है !
अन डोक्यात स्पार्क पडला - How this experience would be ? - To have complete beyond doubt, unquestionable, unwavering faith? To have complete unconditional surrender and listen to this ? How it would be to have at least one thing on the table of faith! द्वैतभक्तीचा ह्या अनुभवाच्या नुसत्या विचाराने शहारुन गेलो , तर मग एक अद्वैत वेदान्ती व्यक्तीचा अभुव कसला असेल !
________________________________________________________________________________________________________

साधारण दुपारी ४- ५ ची वेळ असावी. हिमालयाच्या कुशीत कुठल्याश्या हॉटेलच्या टेरेसवर बसलो होतो. अर्थातच हवेत आल्हाददायक गारवा होता आणि मावळतीच्या सुर्याच्या किरणांचा उबदार स्पर्षही सुखावुन जात होता. कोणत्याही बाजुला पहा , हिमाच्छादित शिखरं , नाहीतर उंचच्याउंच डोंगर , त्यांच्या मधुन खळाळुन वाहणारी नदी, किंव्वा घनदाट जंगल... कोठेही बघुन फोटो काढा चांगला येणारच ! शेवटी वैतागलो फोटो घेऊन घेऊन. अन नुसता बसलो सारं काही डोळ्याच्या कॅमेराने उपभोगत!
काहीकाही अशा जागा असतात जिथं ध्यान करण्यासाठी डोळे मिटुन घ्यायची गरज पडत नाही. ध्यान लावावं लागत नाही ते आपोआपच लागतं . इथेतर अजुन दहा दिशांना दहा डोळे असते तरी कमी पडले असते हे सारे सामावुन घ्यायला असा नजारा समोर होता ... किती किती उपभोगशील ? देणार्याचे हात हजारो दुबळी आपुली झोळी ! नेहमीप्रमाणे डोक्यात शांत विचारांची गाडी चालु झाली होती -
हे उपभोग घेणं म्हणजे नक्की असतं तरी काय ?आणि जे काही असतं ते खरंच असतं की उगाचच आपल्याच मनाची कल्पना, निरर्थक स्वात्मरंजन असतं ? How do we know something for sure?
रेने देकार्त आठवला - टेबल ऑफ फेथ - कल्पना कर की टेबल आहे . आता ज्या ज्या गोष्टींवर तुझा विश्वास आहे त्या त्या सार्या काढुन ह्या टेबलवर ठेव . मग त्यात तुमचे अनुभव असतील, विचार असतील , वासना असतील , इच्छा आकांक्षा असतील , भौतिक सुखं असतील , देव असतील , भुतंही असतील कदाचित , तुझ्या नीतीमत्तेच्या व्याख्या असतील, वैज्ञानिक गोष्टी सिध्दांत असतील, नाती गोती असतील , जे जे काही विश्वास आहे म्हणुन तू ठाम आहेस ते ते सारें असेल. आता फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स म्हणुन ह्याला आपण टेबल ऑफ फेथ म्हणुया! आता एक काम कर, ह्या सर्वच्यासर्व गोष्टी झटकुन टाक, फेकुन दे . एकन एक . अगदी साफ रिकामे कर हे टेबल.
आणि आता टेबल वर फक्त त्याच गोष्टी ठेवायच्या ज्या तू खणखणीत पुराव्याने शाबित करु शकशील. जिथे काडीमात्र शंका घ्यायला जागा नसेल असे सिध्द करु शकशील तेवढेच फक्त ह्या टेबलवर ठेवायचे आहे . nothing more nothing less.
दोन क्षण भक्क शांतता.
वार्याच्या थंडगार झुळुकेने आपण परत विचारांच्या तंद्रीत येतो. बघ ना वारा असतो जाणवतो पण दिसत नाही . सुर्य अस्ताला चाललाय हे दिसतं पण टेक्निकली सुर्य आहे तिथेच आहे, पृथ्वी फिरतेय स्वतः भोवती. ते आपल्याला जाणवत नाही. हिमालयात भटकताना सन बर्न होतोय पण आपल्या त्वचेला तुर्तास तरी जाणवत नाहीये. थोडक्यात काय तर आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत येणारे ज्ञान परिपुर्ण नाहीये, आपले सेन्सेस आपल्याला गंडवत आहेत कधीकधी . मग जर ते कधी कधी गंडवत आहेत तर कायमच गंडवत नसतील कशावरुन? आपण हे सारं गाढ झोपेत स्वप्नात पहात नसु कशावरुन? स्वप्नात जे दिसत असस्तं ते अगदी शतप्रतिशत खरेच वाटत असते की . तरुणपणी तर आपण ह्याचा शृंगारिक अनुभवही घेतला आहे बर्याचदा ;) आपल्याला चांगलेच माहीत आहे की स्वप्नं किती खरी वाटतात ते!
पण मग हे स्वप्न आहे की जागृती हे ठरवणार कसे ? सत्य काय ? कारण ज्ञानेद्रियांमार्फत आलेलें सगळेच ज्ञान डाऊटफुल आहे, शंका घ्यायला स्कोप आहे.
डॅम्न . परत एकदा भक्क शांतता !
बट वेट , आहे एक आहे - मॅथेमॅटिक्स! गणितातील सिध्दांत हे आपल्या इंद्रियगम्य ज्ञानावर अवलंबुन नाहीत. तू स्वप्नात अस की जागे अस , जिवंत अस की मेलेले अस , तुला सिध्द करता येवो की न येवो , किंव्वा संपुर्ण मानवजाती तिच्या संपुर्ण ज्ञानासह नष्ट झाली असली तरीही गणितातील सारे सिध्दांत वैधच रहाणार आहेत . तुमच्या असण्यानसण्याने ऑयलरला काहीही फरक पडत नाही.
e^pi*i + 1 = 0
हे सत्यच रहाणार आहे . अन डिस्प्युटेबल ट्रुथ ! म्हणजे आपल्याला गणित ह्या टेबल ऑफ फेथ वर ठेवता येईल !
बट वेट , ग्यॉडेल काय म्हणाला - गणित किंव्वा कोणत्याही अॅक्झिओमॅटिक सिस्टीम मध्ये सर्वच सत्य विधाने सिध्द करता येतील असे नाही. अर्थात सत्य आहे पण सिध्द करता येणे शक्त नाही अशी विधाने असतीलच ! म्हणजे सत्य काय असत्य काय ह्याचा आपण निवाडाच करु शकत नाही! किंव्वा रादर , गणितातही अशा अनेक गोष्टी असतील की ज्या सत्य आहेत पण आपण कधीच सिध्द करु शकणार नाही !
अर्थात टेबल ऑफ फेथ रिकामेच आहे . त्यावर काहीच ठेवता नाही .
परत एकदा भक्क शांतता .
बट वेट अगेन !
cogito ergo sum ! voila ! मी विचार करतोय , म्हणजे मी आहे . मी म्हणजे विचार करु शकणारे असे काहीतरी आहे हे नक्की ... माझे अस्तित्व , माझं असणं ह्या टेबल वर ठेवता येईल नक्की !
पण आता हे - मी म्हणजे काय ? नक्की काय ?

सुर्य मावळतीच्या दिशेने कलायला लागला होता . सोनेरी किरणांनी आता पाण्ढरीशुभ्र हिमशिखरे एकदम उजळुन निघालेली होती . संध्याकाळचा वारा आता बोचायला लागला होता पण तरीही मजा येत होती ! आपल्याला कुठेही जायची गडबड नाही, सगळं पाहिजे ते नुसत्या एका ऑर्डरवर येत आहे. चहा पाहिजे घे चहा , घे कॉफी, भजी पाहिजेत, हे घे , भेळ पाहिजे , हे घे. खा तु , वढ ! #पैसे जाऊ दे पण खेळ झाला पाहिजे .
आपल्याला काहीही करायचे नाहीये , ऑफिसचे कॉल्स नाहीयेत , घरी जाताना ट्रॅफिकची किचकिच नाहीये , घरी जाऊन अजुन नवीन कामे नाहीयेत . बस्स आपण आहोत इथे. बस्स आपण आणि आपला हिमालय ! एकदम आजोळी आल्यासारखं वाटलं . आजोबांच्या मांडीवर बसुन रामरक्षा शिकावी अन तंद्री लागावी, आपली ऐकता ऐकता आणि आजोबांची गाता गाता ... असे काहीसे ....
तू कधी फोरीए सीरीज चा नीट विचार केला आहेस का ? What it is exactly trying to say ? कोणतेही पिरिऑडिक फंक्शन घ्या , कोणतेही , तुम्ही ते साईन आणि कॉस च्या वेगवेगळ्या फ्रीक्वेन्सीजच्या काँबीनेशन मध्ये मांडू शकता . कोणतेही फंक्शन . कॉस आणि साईन पुरेसे आहेत ते व्यक्त करायला !
https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/2/2b/Fourier_series_and_…

पण कॉस म्हणजे काय आहे तर साईन फंक्शनच आहे फक्त दुसर्या अँगलने पाहिले की कॉस नाहीतर साईन . तत्विक दृष्ट्या दोन्ही एकामेकात इतकी सरमिसळ आहे की फंडामेंटल कोणतं आणि डिराईव्ह्ड कोणतं सांगताच येणार नाही !
ह्या हिमालयाच्या दरी शिखरांचे तसेच काहीसे आहे नाही का ! इथं स्पष्टपणे शिखर पण दिसत आहेत अन त्यांच्या मधील दर्या दिसत आहेत , हिमालयातुन अजुन थोडं खाली आलो, शिखरं गेली अन टेकड्या आल्या तरी , तरी शिखरं आहेतच , अन दर्याही आहेत , फक्त फ्रिक्वेन्सी अर्थात त्यांची उंची खोली वेगळी आहे , पण ते दोघेच आहेत, अगदी सपाट मैदानी प्रदेशात आलो तरी अतीसुक्ष्म लेव्हलला दरी अन शिखरेच आहेत. तिसरं असं काही नाही. असुच शकत नाही . पण दोघं असं तरी का म्हणायचं ? शिखरं आहेत म्हणुन त्यांच्यामध्ये दरी दिसत आहे किंव्वा दरी आहे म्हणुन शिखरं शिखरं आहेत हे कळत आहे. दोघांचं अस्तित्व अगदी कालिदास म्हणाला तसं - वागर्थाविव संपृक्तौ असं आहे - अर्थात वाणी आणि तिचा अर्थ कसा असतो कि अर्थापासुन वाणी शब्द भिन्न करता येत नाहीत आहे शब्दांमधुन अर्थ काढुन टाकता येत नाही ! त्यांचं अस्तित्व एकामेकात इतकं गुफलेलें आहे की वेगळं करुन दाखवणेच शक्य नाही .
बट वेट .... कालिदास तर हे शिव शक्ती विषयी बोलला होता ना !
जे शिव आहे तीच शक्ती आहे अन जी शक्ती आहे तोच शिव आहे . अगदी अघळपघळ बोलायचं म्हणलं तर Act आणि Act of god असं वेगळं करुन दाखवताच येणार नाही !
स्त्रीपुरुष नामभेदें । शिवपण येकलें नांदे । जग सकळ आधाधें । पणें जिहीं ॥ १-१७ ॥
जियेचेनि आंगलगें । आनंद आपणा आरोगूं लागे । सर्व भोक्तृत्वही नेघे । जियेविण कांहीं ॥ १-३९ ॥
शिव शक्ती ... प्रकृती आणि पुरुष अशा स्त्रीपुरुष नामभेदाने जे दिसत आहे आपल्याला कळत आहे ते खरेतर एकमेव अद्वितीय असे शिवतत्वच आहे , दोघांच्या अर्धेअर्धेपणाने सगळे जग नामरुपास येत आहे. आता शक्ती आहे असे म्हणले म्हणुन आपण आपल्या शिवरुप असण्याच्या आनंदाचा उपभोग घेऊ शकतोय कारण सर्वकाही भोक्तृत्व हे शक्तीमुळेच आहे , जर शक्तीच नसेल तर सर्वकाही शिवस्वरुपच आहे मग कोण कोणाचा अन काय भोग घेणार ! तिथे ही त्रिपुटी नाहीच.
मगाशी आपण जे म्हणालो कि cogito ergo sum ह्यातला विचार करणारा , हा विचार अन विचार करणे ही क्रिया हे भिन्न नाहीच ! त्यांचे भिन्नत्व हे आपले अज्ञान झाले . जसे की -
तैसें अनुभाव्य अनुभाविक । इहीं दोही अनुभूतिक ।
तें गेलिया कैचें एक । एकासिचि ॥ ५-६१॥
ज्याचा अनुभव घ्यायचा ते अनुभाव्य अन जो कोणी अनुभव घेणार तो अनुभाविक हे दोन्हीही अनुभवाचाच भाग आहेत , मग जर अनुभवच नसेल तर काय उरले !
"विचार करतोय म्हणजे मी नक्कीच आहे" असा विचार करणारा करणारा अन हा विचार हे दोन्हीही अज्ञान आहेत , मग जर विचार करणेच सरले तर मग कोण उरले !
बौध्द मग म्हणतील की सर्वं शुन्यं शुन्यं अर्थात शुन्य उरले. पण मुळात शुन्य उरले हे म्हणाणारा, हे अनुभवणारा कोणीतरी उरलाच आहे की , त्याचाही निशे:ष लय झाला तर मग काय उरले !
ऐसें ज्ञान अज्ञानीं आलें । अज्ञान ज्ञानें गेलें । ये दोहीं वांझौलें । दोन्ही जाली ॥ ८-१७ ॥
म्हणजे कसं की "विचार करतोय म्हणजे मी नक्कीच आहे" हे ज्ञान झाले असे वाटणे हेदेखील अज्ञानच अर्थात ज्ञानाचा अभावच आहे. आणि मी म्हणजे हाडामांसाचा सजीव सेल्फ कॉन्सश ऑटोमॅटोन आहे हे जे वरकरणी अज्ञान होते ते तर आधीच आपण टेबल ऑफ फेथ वरुन झटकुन टाकले आहे , त्यामुळे ज्ञानाने आधीच अज्ञानाचा नाश केलेला आहे ! म्हणुनच अज्ञानाचा नाश झाला , अज्ञान नाही हे ठामपणे ठरले तिथेच ज्ञानाचाही नाश झाला ना !
सुर्याला अंधार म्हणजे काय माहीत असुच शकत नाही , मग ज्याला अंधार म्हणजे काय माहीत नाही त्याला प्रकाश म्हणजे काय हे तरी कसे माहीत असेल ? , ज्याने कधी प्रकाशाचा अभाव पाहिलाच नाहीये , त्याच्यासाठी प्रकाश हीच नित्यस्थीती आहे त्यामुळे त्याला प्रकाश म्हणजे काय हे देखील माहीत नाही !
सूर्याचिया हाता । अंधकारू नये सर्वथा । मा प्रकाशाची कथा । आईकता का ? ॥ ७-२५८ ॥
म्हणुन मग, अनुभाव्य नाही आणि अनुभाविकही नाही, अज्ञान नाही अन ज्ञानही नाही , रात्र नाही अन दिवसही नाही , "विचार करतो म्हणजे मी आहे" ही जाणीव नाही आणि नेणीवही नाही , अंधार नाही अन प्रकाशही नाही ... शक्ती नाही अन शिवही नाही.... बस्स फक्त मीच मी आहे ... अन हा अनुभवही नाही .
एवं ज्ञानाज्ञानें दोन्ही । पोटीं सूनि अहनी ।उदैला चिद्गगनीं चिदादित्यु हा ॥ ८-१९ ॥
https://ssubbanna.files.wordpress.com/2012/09/ardhanari33.jpg

अहो अर्धनारीनटेश्वरें । गिळित गिळित परस्परें ।ग्रहण झालें एकसरें । सर्वग्रासें ॥ ९-६३ ॥
सुषुप्तौ निरस्तातिशून्यात्मकत्वात् तदेकोऽवशिष्टः शिवः केवलोहम्॥ आता बस्स मीच मी आहे! :)
अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।तुझें तुज ध्यान कळों आले ॥१॥
तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव ।फिटला संदेह अन्यतत्त्वी ॥२॥
मुरडूनियां मन उपजलासी चित्तें ।कोठें तुज रितें न दिसे रया ॥३॥
दीपकीं दीपक मावळल्या ज्योती । घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥
वृत्तीचि निवृत्ति अपणांसकट ।अवघेंची वैकुंठ चतुर्भूज ॥५॥
निवृत्ति परमानुभव नेमा ।शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥
क्षितीजाच्या पार कधीच सुर्यास्त झाला होता अन सारं कसं अंधारुन आलं होतं ... पण आता आपल्याला काय फरक पडतो ... आता आपल्यासाठी तर उदैला चिद्गगनीं चिदादित्यु हा असं झालं आहे सारं !
पांडुरंग पांडुरंग ;)

________________________________________________________________________________
जगजीतचा कर्ममधुर आवाज थांबला अन अचानक ढंढंढंढं असा काहीसा गोंगाट झाला . त्याने तंद्रीतुन बाहेर आलो . मन मात्र अजुनही हिमालयातच तरंगत होतं .
एवढं सगळं सव्यापसव्य करायची गरज होती का? देव जाणे . कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतःक्लेषनाशाय गोविंदाय नमो नम: एवढं ठाम संदेहरहित श्रध्देने म्हणलं असतें तरी पोहचलोच असतो की इथवर !
पण ठीक आहे. हरकत नाही . कदाचित हा आपला मार्ग होता , एकदा गंतव्याप्रत पोहचल्यावर रस्ता किती अवघड होता अन किती सोप्पा होता ह्याने काय फरक पडतो . पोहचलो हेच खुप आहे! नाहीं कां ! आता कसं सगळं सिध्द झालं , कुठे काही शंका घ्यायला जागाच नाही . हरितात्या म्हणातात तसं पुराव्याने शाबित. आता अजुन काही व्हॅलिडेशन ची गरज नाही .
जाले साधनाचे फळ। संसार जाला सफळ॥
निगुर्ण ब्रह्म ते निश्चळ। अंतरी बिंबले॥
हिशेब जाला मायेचा। जाला निवाडा तत्त्वांचा॥
साध्य होता साधनाचा।ठाव नाही॥
साध्य असे म्हणुन जे जे काही होते ते साधले , आता काय उरलं ? आता कसंही असो काय फरक पडतो .... आता योगरत रहा समाधीत किंव्वा भोगरत रहा भोगात ... काय फरक पडतो आपल्याला? आता माहीत आहे जे माहीत असायला हवं ! आता बस्स मीच मी आहे! दीपकीं दीपक मावळल्या ज्योती ! अहाहा . माऊलीं माऊलीं
____________________/\______________________
अन कोणता कार्यक्रम चालु होता देव जाणे पण त्यांची एकदम हॅप्पी सर्प्राईझ दिलं अन आरती सुरु झाली !
सुखसहिता दु:खरहिता निर्मळ एकांता ।कलिमलदहना गहना स्वामी समर्था ॥
न कळे ब्रह्मांदिकां अंत अनंता ।तो तूं आम्हां सुलभ जय कृपावंता ॥ १ ॥
जय देव जय देव जय करुणाकारा ।आरती ओंवाळूं सद्गुरुमाहेरा ॥ धृ. ॥
मायेविण माहेर विश्रांति ठाव । शब्दी अर्थी लाभ बोलणें वाव ।
सद्गुरुच्या प्रसादे सुलभ ऊपाव । रामीं रामदास फळाला सद्भाव ॥ जय. ॥ २ ॥
____________________/\______________________
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतःक्लेषनाशाय गोविंदाय नमो नम:॥