Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

एसटीचा संप : विलीनीकरण एकच मार्ग ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/21/2021 - 05:49
🗣 253 प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात आपली सर्वांची लालपरी, एसटी याची सेवा देणा-या कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करावे या एकमेव मुद्द्यावर आंदोलन सुरू असून गेली काही दिवसांपासून ऐन दिवाळीत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सुरू झालेले काम बंद आंदोलन आजही सुरू आहे.

maha-st
बोधचिन्ह

आघाडी सरकार असो की मागील सरकार असो दोन्हीही सरकारांनी विलीनीकरण शक्य नाही अशा भूमिका घेतलेल्या होत्या. आणि मा.न्यायालयानेही याबाबतीत समिती नेमून निर्णय घ्यावा असे म्हटलेले आहे. एसटी तुलनेने स्वस्त आणि सुरक्षित आहे, म्हणून एसटी सर्वांसाठीच वेगळा विषय आहे, म्हणून हा काथ्याकूट.

एक नजर टाकूया एसटीच्या इतिहास भूगोलोकडे- देशातील सर्वसामान्य जनतेला दळणवळणासाठी किफायतशीर दरात' ना नफा ना तोटा' या तत्त्वावर राष्ट्रीयकरणाच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेसाठी केंद्रसरकारने मार्ग परिवहन अधिनियम-१९५० तयार केला आणि त्या अन्वये राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्थापन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC ही संस्था एष्टीचा कारभार चालवते. ही एक स्वतंत्र संस्था असून त्यास सरकार काही प्रमाणात अनुदान देतं आणि बाकी पैसा एसटी उभी करते. सरकारचे परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष असतात. एसटीची तिकिटं, गाड्या भाड्यावर देणे यातून एसटीला उत्पन्न मिळतं. एसटी कर्मचारी हा सरकारी कर्मचारी आहे, परंतु तो निमसरकारी आहे. एसटी कर्मचा-यांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे, नसता एकदा की तिची चाके रुतून बसली की पुन्हा मग त्यातून बाहेर पडणे अशक्य आहे असे वाटते. एसटीचा प्रवास आणि सुविधा आपल्या सर्वांचाच हळवा विषय आहे, आपण सर्वच एसटीने प्रवास करून मोठे झालेलो आहोत आणि काही तर, एसटीची वाट पाहणारे कायम प्रवासी आहेत. आपल्या सर्वांचाच तो जिव्हाळ्याचा विषय आहे.

ST-bus
आपली एसटी

एसटीचे शासनात विलीनीकरण झाले तर कर्मचा-यांचे प्रश्न सुटणार आहेत का ? वेतन वाढणार आहेत का ? सध्याचे त्या कर्मचा-यांचे वेतन फारच तुटपुंजे आहे असे व्यक्तीगत मत आहे. दहा वर्षाच्या सेवेनंतर चालक वाहक यांचे वेतन सतरा हजाराच्या जवळपास जाते. मला वाटते प्रदीर्घ सेवेनंतरही मिळणारे वेतन आजच्या काळात कमी आहे.

एसटी गेली अनेक वर्ष कायम तोट्यात असल्याच्या बातम्या वाचनात येत असतात. लॉकडाऊन काळात तर एसटी जवळजवळ बंद अवस्थेत होती त्यामुळे तोट्यात असलेल्या एसटीच्या नुकसानीत अजूनच भर पडली. एसटीचे आर्थिक स्त्रोत वाढविण्यावरही भर दिला पाहिजे असे वाटते, एसटीच्या खूप जागा आहेत त्यात गाळे काढून ते भाड्याने देणे, निगा राखणे, व्यवसायीकरण वगैरे करून त्यावर भर दिला तर एसटीचा आर्थिक स्त्रोत वाढेल असे वाटते. प्रवाशांना वेगवेगळ्या दिल्या जाणा-या सवलती कमी केल्या पाहिजेत. तरच एसटीची अवस्था सुधारेल असे वाटते. आर्थिक चणचणीवरचा उपाय म्हणून नुकतेच तिकीट दरामधेही सतरा टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. अपुरे आणि वेळेवर न होणारे पगार.आगारांमधील वाईट परिस्थिती, एसटीच्या अनेक कर्मचा-यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचनात येतात.

ऑक्टोबर अखेरीस कर्मचा-यांनी राज्यभर बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे, राज्य सरकारने महागाई भत्ता बारा टक्क्यावरून अठ्ठावीस टक्के केला आहे, असे असले तरी एसटी कर्मचारी यावर नाखुष असून एसटी महामंडळाचं शासनात विलणीकरण करण्यात यावे हीच त्यांची मुख्य मागणी आहे. कोणत्याही संघटनेच्या नेतृत्वाशिवाय हे आंदोलन सुरू आहे.

एसटी शासनाच्या ताब्यात गेल्यावर सर्व प्रश्न सुटतील असे या एसटी कर्मचाऱ्यानं वाटते. एसटी विलीनीकरण कसे होऊ शकते ? एसटी महामंडळाची निर्मिती ही Road Transport corpaoration Act 1950 नुसार झालेली आहे. हा केंद्र सरकारचा कायदा आहे त्यामुळे या कायद्याखालचं महामंडळ बरखास्त करून ते राज्य शासनात विलीन करण्याची प्रक्रिया असेल. राज्य परिवहन महामंडळ कायदा १९५० अन्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अस्तित्वात आलेले आहे, त्यावेळी राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे भाग भांडवल यात गुंतविण्यात आलेले होते. कायद्यातील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्वायत्त राज्यसरकारची कंपनी किंवा राज्यसरकारचा विभाग म्हणून राहू शकतो. विलणीकरणासाठी केंद्रसरकारची परवानगी घेणे आणि त्यांचे भागभांडवल परत करणे आवश्यक असेल त्यानंतर महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाने ठराव करुन आपला स्वायत्त दर्जा संपुष्टात आणून राज्याचा विभाग म्हणून राज्य सरकारने मान्यता द्यावी असा ठराव मंजूर करून राज्य सरकारला विनंती करणे गरजेचे आहे, अशावेळी महामंडळाची आताची रचना संपुष्टात येईल.

विलीनीकरणानंतर, एसटी कर्मचा-यांचे सर्व वेतन भत्ते सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे शासनावर आर्थिक भार पडेल. ( पडला तर पडू द्या) एसटीचे ९२ हजार कर्मचारी आहेत, त्यांची एकदा मागणी मंजूर झाली की इतर महामंडळाच्या कर्मचाऱ्याचीही मागणी पुढे येईल. देशात एकूण ५० पेक्षा अधिक परिवहन महामंडळे आहेत, केवळ आंध्रप्रदेश परिवहन महामंडळाचे राज्यशासनात विलणीकरण झालेले आहे, बाकी मंडळे अशी तशी आधारावर चालू आहेत.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे, एसटी कर्मचा-यांचे वेतन सुधारले पाहिजे. नव्या बसेस खरेदी केल्या पाहिजेत. भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. प्रवाशांच्या मार्गावर नियमित वेळेवर बसेस आल्या गेल्या पाहिजेत. कर्मचाऱ्यांची अरेरावी कमी होऊन नम्रपणा आला पाहिजे वगैरे मतं मांडण्यासाठी हा धागा.

काथ्याकूट विस्कळीत असला तरी, मुख्य विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या विचारांचे स्वागत आहे. वीस बावीस वर्ष नियमित एसटीने प्रवास करीत राहीलो आहे. प्रवाशी संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या आंदोलनात प्रवाशांच्या बाजूने उभा राहीलो आहे. बाकी, काथ्याकूट माहिती संदर्भ आणि छायाचित्रे जालावरील चालूघडामोडी इतर संकलन यातून केलेले आहे, ते बरोबरच असू शकते असा दावा नाही. (चुभूदेघे)


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 71781 views

🗣 चर्चा (253)
स
सुबोध खरे Tue, 11/23/2021 - 06:55 नवीन
एसटीचा संप : विलणीकरण एकच मार्ग ? विलणीकरण ह शब्द मराठी भाषेत आहे? याची शंका वाटते. merger याचा अर्थ विलीन करणे आणि या प्रक्रियेला मराठीत विलिनीकरण हा प्रतिशब्द आहे. विलणीकरण हा शब्द प्रत्येक वाक्या गणिक आणि शीर्षकामध्ये न निवडलेल्या तांदुळाच्या भाताच्या प्रत्येक घासातील खड्यासारखा टोचतो आहे. तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 11/23/2021 - 07:03 नवीन
शब्दाकडे दुर्लक्ष करा हो डॉक्टर. .. प्राडॉ सरकी भावनाओं को समझो. ;-)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 11/23/2021 - 07:09 नवीन
गवि माझ्याकडे जेवायला या भात खाताना १० वेळेस( मोजून) घासात खडे आले तर आपले श्रीमुख कसे दिसेल हे पाहण्याची आतुरता लागून राहिली आहे . हलके घ्या
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Tue, 11/23/2021 - 07:16 नवीन
विलीनीकरण अर्थ : एका गोष्टीचे दुसर्‍या गोष्टीत सामावून जाण्याची क्रिया. उदाहरणे : मृत्यूनंतर आत्म्याचे परमात्म्यात विलयन होते असे म्हटले जाते. अवांतर: दोन भिन्न मतावलंबी आत्म्यांचे एकाच परमात्म्यात विलीनीकरण/ विलणीकरण होते की कसे?
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 11/23/2021 - 07:19 नवीन
नको नको.. डीबीसर.. विलणीकरणाचे विलीनीकरण करा लवकर. माझे धड चालू शकणारे दात वयोमानानुसार तसेही कमी उरलेत. डॉ खरेंच्या भातातले खडे परवडणारे नाहीत. ;-) बाकी डॉ खरे यांसी : अहो दुर्लक्ष करा अशासाठी म्हटले की प्रा डॉ सर आपले थोडेच ऐकतात?
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 11/23/2021 - 07:22 नवीन
छे छे असं कसं? घेऊनच जा हो खरे काका गविंना घरी, आणि चांगलं पातेलंभर खडेवाला भात खाऊ घाला अन् मग त्यांचा फोटो पण टाका इथे. अम्हालापण बघायचाय.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 11/23/2021 - 07:26 नवीन
कोपिनेश्वरा, वाचव रे.. हे असले मित्र असल्यावर वेगळ्या शत्रूंची काय गरज?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 11/23/2021 - 07:34 नवीन
कोपिनेश्वर हा शब्द भातातल्या खड्यासारखा बोचतोय. कौपिनेश्वर म्हणा हो. कौपिन म्हणजे अंगावरील लहानसे वस्त्र. ते पांघरतो म्हणून शिवाला कौपिनेश्वर म्हणतात.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 11/23/2021 - 07:37 नवीन
आता तो शब्द एकदा लिहीला म्हणजे लिहीला वल्लीशेठ. बाकी आपल्या मताचा आदर आहेच. - प्रा डॉ ग.वि. चिरुटे.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 11/23/2021 - 07:39 नवीन
सरांचा धागा हॅक करणाऱ्या तुम्हा दोघांचा निषेध करावा तेवढा कमीच.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 11/23/2021 - 07:43 नवीन
तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे धागा कुठला हायजॅक करून नेणार?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 11/23/2021 - 07:42 नवीन
आता तो शब्द एकदा लिहीला म्हणजे लिहीला वल्लीशेठ. @सुबोध खरे सर, यांना खरेच जेवायला बोलवा हो.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 11/23/2021 - 09:06 नवीन
प्रा डाँनी कट्टा पार्टी दिल्यास "विलणीकरण" ही शुद्धलेखन चुक माफ ! ....... आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटून एसटीचा संप संपल्यावर एसटी स्टॅण्डवर जाहीर सत्कार !
  • Log in or register to post comments
स
सुरसंगम Tue, 11/23/2021 - 08:58 नवीन
असं कसं हो गविशेठ दुसऱ्या कुठल्या व्यक्तीकडून चूक झाली तर समजू शकतो पण ते मराठी आणि त्यातून डॉ. प्रो. म्हणजे लेखनं चूक व्हायला नको. एकदा झालेली टँकलेखनची चूक समजू शकतो पण तो शब्द वारंवार तसाच लिहिला गेलाय ते कसं चालेल?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 11/23/2021 - 07:00 नवीन
"विलणीकरण" हा शब्द महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अधिकृत मराठी शब्दकोशात नाही. Merger विलीनीकरण (न.) cf.Absorption कोश: शासन व्यवहार कोश
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Tue, 11/23/2021 - 07:41 नवीन
व्हिलनीकरण बसतं का बघा.. संपवाले आणि सोबतचे राजकारणी यांना व्हिलन ठरवायचे, म्हणजेच व्हिलनीकरण. अपभ्रंश विलणीकरण! मराठीत नवे शब्द यायलाच हवेत.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 11/23/2021 - 09:54 नवीन
शब्दांचा पाडू कीस महिनाभर. पण परिस्थिती फार गंभीर आहे. शाळा सुरू करायची हाक तर सरकार देऊन बसलं आहे. आता खेडेगावातून तालुक्याला शाळेत जाण्याची पंचाईत. वडापवाले पंचवीस जणांना कोंबून नेत आहेत. आता ते माडणी करतील की वडापची अधिकृत प्रवासी संख्या वीस करा. म्हणजे तीस नेता येतील. इकडे सर्व.बसेसचे टायर ट्रेड अगोदरच जाऊन गुळगुळीत होईपर्यंत चालवलेले आहेत. ,ब्याटऱ्या चार्ज न होण्याइतक्या उतरतील त्या बदलाव्या लागतील. आणखी कायकाय होईल ते वाहनमाहितगार सांगतीलच. म्हणजे वितळणीकरणाच्या पलिकडे बसेस जातील.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 11/23/2021 - 10:49 नवीन
>>> शब्दांचा पाडू कीस महिनाभर. होय...! =)) कंजूसकाका विलनीकरण होईपर्यंत आणि कर्मचा-यांचे प्रश्न सुटेपर्यंत आपण हा धागा धगधगत ठेवू. बाकी, शाळा,महाविद्यालये सुरु झाले आहेत आणि विद्यार्थ्यांंचे हाल सुरु आहेत. बाकी वितळणीकरणाच्या मूद्याशी सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 11/24/2021 - 15:46 नवीन
खूप महसूल निर्माण व्हहायला हवा. तरी कर्जाच्या ओझ्यापलिकडे काही नाही. थोडक्यात वैयक्तिक खिसे भरत आहेत. तिजोरी रिकामी आहे. लठ्ठ प्याकेजे जाहिर झाली आहेत. पुतळे उभे करायचे आहेत, ते पाहायला येणाऱ्या पर्यटकांची सोय लावायची आहे. पक्ष्यांना/पक्षांना थंड ठेवायचे आहे. डहाणूपासून बांद्यापर्यंत दोन मार्ग व्हायचे आहेत, अगोदरचा पहिला जुना नवीन करायचा आहे. तारकर्ली पर्यटनास, वॉटरस्पोर्टस करण्यास परदेशी देशी प्रवासी चिपीला हवेतून उतरणार आहेत त्यांची सोय लावायची आहे. नागपूरहून पालघरला समुद्रस्नानासाठी लोंढे येणार आहेत. वारकरी पूर्वी इट्टल इट्टल करत अडिचशे किमी चालत येत ते आता मर्सिडीज मधून येणार. तो रस्ता करायचं मात्र केंद्राने अंगावर घेरलंय . नाहीतर ती एक जबाबदारी होती. निवृत्तांचे वेतन दहाव्या आयोगाप्रमाणे वेळेवर द्यायचंय. लशी द्यायच्या आहेत. शाळा घरापर्यंत पोहोचवणे परवडणारे नव्हते, आता मुलांना शाळेपर्यंत पोहोचवणे त्याहून महाग झालंय. सुकुमाली नुम्ब थुमा एसटी तुम सबसे प्यारी हो एसटी
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/25/2021 - 06:18 नवीन
उपोषण करणारे नेते आणि संपकरी कर्मचारी यांची सरकारबरोबर चर्चा झाली, साधारणपणे ४१ % वेतन वाढीचा प्रस्ताव सरकारच्या वतीने ठेवण्यात आला. त्याचबरोबर वेतन प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला करु असे सांगितले पण कर्मचारी सध्या तरी विलीनीकरण करावे याच मुद्यावर ठाम आहेत त्यामुळे अजुन तरी एसटी कर्मचा-यांचा संप मीटेल असे चिन्ह दिसत नाही. कर्मचा-यांच्या बाजूने असलेले विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते एवढ्यात तरी संपातून मार्ग काढू देतील असे वाटत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 11/25/2021 - 06:23 नवीन
वाईट नाही. असेही भाडे वाढणारच आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 11/25/2021 - 06:47 नवीन
असं कसं असं कसं ? कल्याणकारी रिक्षा सरकार आहे. अजून तीन वर्षे आहेत सोय लावलीच असती कि. आर्यन खान, वानखेडे, मलिक, वाझे, परमबीर सिंह, अनिल देशमुख यांचे धगधगते प्रश्न सुटले कि येणारच होते एस टी च्या प्रश्नाकडे. काय एवढी घाई आहे? एस टी चे कर्मचारीच महाराष्ट्रद्रोही आहेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 11/25/2021 - 07:44 नवीन
पुरग्रस्तांना आणि गरीब शेतकरी वर्गाला पण सामील करा .... आता खाजगी वाहतूकीचे दर पण वाढले असतील, असे वाटते ...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 11/25/2021 - 07:53 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra/st-workers-protest-at-azad-maidan-called-off-sadabhau-khot-announcement-pmw-88-2692912/ कॉंग्रेसच्या काळांत झालेल्या गिरणी कामगारांच्या संपाच्या वेळी देखील, योग्य वेळी माघार घेण्यात शहाणपणा होता. गिरण्यांच्या जमिनी मौक्याच्या ठिकाणी होत्या आणि बस स्थानके पण मौक्याच्या ठिकाणी आहेत.... आणि दोन्ही आंदोलनाच्या वेळी, नेमकी कॉंग्रेस सत्तेवर आहे, हा दुर्मिळ योगायोग आहे... अगदी कपिलाशष्ठी योगा सारखाच...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/25/2021 - 08:27 नवीन
एसटी आंदोलकांचे नेतृत्व करणारे सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानातील आंदोलन मागे घेतले असून बाकी एसटी कर्मचारी जी भूमिका घेतील ते मान्य असेल असे म्हणून सध्या तरी ते आन्दोलनातून बाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे कर्मचारी मात्र विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम दिसत आहेत. आज आणि उद्या किती कर्मचारी नवीन वेतनवाढीचा मुद्दा स्वीकारुन कामावर रुजू होतात आणि एसटी रस्त्यावर धावायला लागते का ते चित्र स्पष्ट व्हायला अजुन दोन दिवस तरी वाट पाहावी लागेल. एकीकड़े वेतनवाढ देवून संपक-यात गट निर्माण व्हावे आणि आंदोलनाची तीव्रता कमी व्हावी असा एक प्लॅन सरकारकडून दिसत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 11/25/2021 - 09:37 नवीन
आता भेटीगाठी वाढवा आणि बघा काय होते ते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 11/25/2021 - 09:35 नवीन
आणखी नुकसान होईल . खासगी कारभार म्हणजे आतापेक्षा मोठ्ठा लोण्याचा गोळा मिळणार पण प्रवासी रस्त्यावरच येणार . मग आगारांंच्या जागांचे लिलाव होतील मॉल, स्टुडिओ यासाठी.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 11/25/2021 - 12:28 नवीन
सध्याच्या घडीला, कर्मचारी वर्गाने, जे काही पदरांत पडले आहे, ते स्वीकारायचे... आंदोलन परत करता येईल, पण नौकरी परत मिळणार नाही...
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 11/25/2021 - 10:26 नवीन
जे काही होत आहे ते दुर्दैवी आहे, सगळे एकत्र येऊन एखादी संस्था डबघाईस आणून ती बंद पाडणार हे स्प्ष्ट दिसत आहे. आपली लाडकी लालपरी अशी बुडताना पाहून मनःस्वी दु:ख होतेय !
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 11/25/2021 - 11:10 नवीन
वेतन वाढ झाली तरी सम्प सुरु ठेवण्यामागे काय हेतू आहे? विलीनीकरण झाले तर आजून वाढ होणार का
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 11/25/2021 - 12:35 नवीन
विलीनीकरणाचा निर्णय आणि विलीनीकरण प्रत्यक्षात येणे, ह्यात कालापव्यय खूप होतो उदा, आर्सेनिक मित्तल.... शिवाय, माननीय शरद पवार यांच्या मते, आता आंदोलन करण्यात अर्थ नाही... अशा वेळी, माननीय शरद पवार यांचे ऐकण्यातच शहाणपणा आहे... दस्तूरखूद्द, अण्णा हजारे देखील, योग्य वेळी माघार घेण्यात, शहाणपणा दाखवतात...
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 11/25/2021 - 12:48 नवीन
माननीय शरद पवार यांचे ऐकण्यातच शहाणपणा आहे...
बरोबर नाहितर एसटी कर्मचार्‍यांना कात्रज चा घाट दाखविला जाण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 11/25/2021 - 13:55 नवीन
मौक्याच्या जागांचे श्रीखंड, काही व्यक्तींना ... गिरणी कामगारांच्या सारखे, भावना प्रधान होण्यात अर्थ नाही ... नौकरी सांभाळा .... पगार सलामत तो, आंदोलने हजार
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 11/25/2021 - 12:45 नवीन
वेतनवाढ फसवी असल्याचे त्यांच्यातील कर्मचारी नेत्यांचे म्हणणे आहे. (या बातम्या आंजा वर दिसत नाहीत, काढून टाकायला लावल्या की काय ?) "विलीनीकरण झालेच पाहिजे" ही आधी पासूनच ची मागणी आहे. गेल्या काही वर्षांच्या वेतनाच्या समस्येवर विलीनीकरण हाच उपाय आहे असे त्यांचे मत आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 11/25/2021 - 23:38 नवीन
"विलीनीकरण झालेच पाहिजे" म्हजे काय ? कोणी सांगेल काय? आणि मग फायदा तोटा हिशेब कसा ठेवणार ?
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर गुरुवार, 11/25/2021 - 13:09 नवीन
याबाबतीत दुर्दैवाने ST कर्मचाऱ्यांचे म्हणणे समर्थनीय नाही. एक ST महिन्याला किती रेव्हेन्यू कमवत असेल? अगदी सम्पूर्ण सीट्स भरल्या तरी त्यातून ड्रायव्हर, कंडकटर, सपोर्ट स्टाफ, डेपो स्टाफ, मेंटेनन्स स्टाफ याना लागणारा सरकारी नोकरी इतका पैसा तिच्यातून निघत असेल काय? अर्थातच नाही. जेव्हा सरकारी नोकऱ्या कमी करण्याचा विचार चालू आहे, तेव्हा असे ऑपरेशनल स्टाफ सरकार ने आपल्या पे रोल वर घेणे योग्य ठरणार नाही. सरकार चा स्टाफ मुख्यतः स्ट्रॅटेजीक रोल्स आणि मॅनेजमेंट रोल्स वर घेतला जातो. त्यातून ST मध्ये प्रचंड प्रमाणात ओव्हरहेड स्टाफ असल्याची पण बातमी आहे. अर्थात याचे मॅनेजमेंट पूर्णपणे चुकलेले असून ती सरकारचीच चूक आहे कारण परिवहन मंत्री हे याचे अध्यक्ष (की चेअरमन काहीतरी) असतात. नको त्या ऑपरेशनल गोष्टी मध्ये executive pillar ला सामील करून घेतलं की असं काही तरी होतं. सरकारने आता एस टी संपूर्ण पणे प्रोफेशनल सरकारी नोकराच्या ताब्यात देऊन त्याचा सर्वांगीण कायापालट करण्याची गरज आहे. जमल्यास ST ने स्वतः चे स्टॉक ऑप्शन आणून कर्मचाऱ्यांना वाटप करायला हरकत नाही. पुढे ती फायद्यात आल्यावर ST कर्मचार्यांनाच फायदा होईल.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 11/25/2021 - 13:23 नवीन
रावसाहेब चिंगभूतकर साहेब, बाकीच्या काही राज्यात तिथली एस टी महामंडळे राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात. ते उत्पन्न vs खर्च हे गणित कसे जुळवत असतील ?
ST ने स्वतः चे स्टॉक ऑप्शन आणून कर्मचाऱ्यांना वाटप करायला हरकत नाही. पुढे ती फायद्यात आल्यावर ST कर्मचार्यांनाच फायदा होईल.
फार दूरचा उपाय वाटतो. असा प्रकार इतर कुठल्या राज्याने केला असेल तर वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 11/25/2021 - 13:33 नवीन
पण स्टॉक ऑप्शन साठी खाजगीकरण आणि लिस्टिंग करावे लागेल की.
एक ST महिन्याला किती रेव्हेन्यू कमवत असेल? अगदी सम्पूर्ण सीट्स भरल्या तरी त्यातून ड्रायव्हर, कंडकटर, सपोर्ट स्टाफ, डेपो स्टाफ, मेंटेनन्स स्टाफ याना लागणारा सरकारी नोकरी इतका पैसा तिच्यातून निघत असेल काय?
ST तोट्यात आहे का फायद्यात आहे- ओव्हराल तोट्यात आहे हे स्पष्ट आहे. पण ST OPERATIONS चा १. सरकारी सुविधेचा भाग- म्हणजेच दुर्गम भागातील आणि खेडोपाड्यांमधले दळणवळणाचे एकमेव साधन. ३. कमर्शियल लाईन्स- ज्या जोरात चालतात. असे दोन भाग करून दोघांचे वित्तीय परफॉर्मन्स वेगवेगळे पहायला मिळाले तर ST नक्की किती पाण्यात आहे याचे चांगले दर्शन घडेल. अशी माहिती सापडली तर द्यावी.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 11/25/2021 - 14:06 नवीन
हा घोळ फार आधीपासूनच आहे मी, 1998 ते 2006 पर्यंत, लोटे परशुराम येथे नौकरी करत होतो तेंव्हा, चिपळूण ते खेड, ह्या बसेसची वारंवारता कमी होती आणि खाजगी गाड्यां शिवाय प्रवाशांना पर्याय न्हवता पण गेल्या 3-4 वर्षांत, ST ने ही वारंवारता वाढवली आता ह्या टप्प्यात उत्पन्न भरपूर आहे हीच गोष्ट, खेड आणि दापोली, ह्या टप्प्या बाबत अनुभवली.... 40-50 किमी अंतर आणि वारंवारता भरपूर असेल तर, उत्पन्न वाढते... एखादा वडाप वाला, महिन्याला 20-30 हजार, सहज कमावतो ... ही गोष्ट मला एका वडापवाल्यानेच दिली चिपळूण ते रत्नागिरी, ह्या मार्गावर खाजगी गाड्याच भरपूर चालतात जी गोष्ट, चिपळूण ते खेड आणि चिपळूण ते दापोली, ह्या मार्गावर घडली... तीच गोष्ट, चिपळूण रत्नागिरी ह्या मार्गावर का नाही? हा एक संशोधनाचा विषय आहे ...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/25/2021 - 18:56 नवीन
एसटीबद्दल एक हळवा कोपरा आजही मनात आहे. आताशा एसटीचा फारसा प्रवास होत नाही पण लहानपणीच्या कितीतरी आठवणी एसटीभोवती गुंफल्या आहेत. एसटीचं रुपडं तरी किती सुंदर. अगदी लांबून उठून दिसणारा तिचा खास लाल रंग आणि त्यावरचा पिवळा पट्टा. खिडक्यांचा रंग. सीटांचा हिरवा रंग. अगदी नऊवारी नेसणार्‍या प्रेमळ आजीची आठवण यावी. ज्या कोणी ही रंगसंगती शोधली त्याला सलाम. लहानपणी एसटीचं सगळं जगच अदभूत वाटायचं. प्रचंड गर्दीत उभा राहून लोखंडी खांबावर टक टक आवाज करत तिकीटं विकणारा तो कंडक्टर. त्याची ती अल्युमिनियमची तिकीटपेटी. त्यावरचे वेगवेगळे तिकीटाचे पांढरे गठ्ठे. त्याचं ते तिकीट पंच करायचं ते यंत्र ! गळ्यात अडकवलेली पैसे ठेवायची कातडी बॅग. आपण गाव सांगितल्यावर पटापट दोन चार गठ्ठ्यातून तिकीटं फाडून ती योग्य ठिकाणी पंच करून ती आपल्या हातात जेव्हा तो द्यायचा तेव्हा जाम आदर वाटायचा त्याचा. सगळा हिशेब कसा करत असेल हा. बरं तिकीटावर नुसते पाढे लिहिल्यासारखे दोन रांगेत आकडे छापलेले असायचे. नेमकं कुठे पंच करायचं हे कसं कळत असेल याचं अजूनही कुतूहल आहे. कंडक्टरचा सगळ्यात जास्त हेवा वाटायचा जेव्हा तो घंटी वाजवायचा ! एसटी सुरु करायची आणि थांबवायची पावर त्याच्याकडे आहे हे पाहून त्याचा आदर अधिकच दुणावायचा. दोन घंट्या दिल्या की एसटी सुरु आणि एक घंटी दिली की एसटी थांबणार म्हणजे थांबणारच ! कधीतरी आपल्यापण ती दोरी ओढून घंटी वाजवायला मिळावी ही एसटीने प्रवास केलेल्या प्रत्येक मुलाचं स्वप्न असायचं. कंडक्टर तिकीटं काढून झाली की आपल्या जागेवर जाऊन हिशेब जुळवत बसणार. कधी कधी हिशेब जुळला नाही तर पुन्हा शिरगणती करायला लागायची. एवढं काम झालं तरी कधी कधी एसटी च्या टपावर सामान चढवायला पण त्याला मदत करावी लागायची. पूर्वी एसटीला एकच दरवाजा असायचा तो मागच्या बाजूला. त्या एसट्यांना ड्रायव्हरच्या मागे एक लांब पाच माणसं बसेल अशी मोठी सीट असायची. ड्रायव्हरकडे पाठ करुन बसावं लागे. लहानपणी बराच प्रवास त्या आडव्या बाकावर गुढग्यावर बसून वरच्या जाळीत बोटं अडकवून आणि तासनतास ड्रायव्हरकडे आणि समोरच्या रस्त्यावरची वाहतूक पहात केला आहे. आता विमानाच्या कॉकपीटचं जेवढं कुतूहल वाटतं तेवढच कुतूहल मला एसटी च्या कॉकपीटचं वाटायचं. ड्रायव्हरचं सीट, त्याच्यासमोरचं ते भलं मोठं व्हिल ! त्याच्या समोरचा तो अगम्य डॅशबोर्ड. उजव्या हाताला वरच्या बाजूला अजुन काही बटणं असायची. आणि साईड इंडीकेटर म्हणून चक्क एक बाण लटकवलेला असायचा. आतून एक दोरी ओढली की तो बाण काटकोनात वर जायचा ! ड्रायव्हरच्या डाव्या हाताला असणारा दोन फुटाचा आणि विचित्र कोनातला तो गिअर ! त्याच्याही डाव्या बाजुला असणारी लाकडाची पेटी ! त्या पेटीवर बसून प्रवास करायला मिळणे म्हणजे पर्वणी वाटायची. " गाडी चालू असताना वाहनचालकाशी बोलु नये" अशी ताकीद समोर लावलेली असायची. पण हा वाहनचालक कधीच कुणाशी गप्पा मारत बसलेला मी पाहिलेला नाही. अगदी कंडक्टर बरोबर सुध्दा. एसटी स्टँड ही एक वेगळीच परिसंस्था ! तिथली ती गर्दी. वेगवेगळे फलाट, तिथल्या त्या स्पिकर वर होणार्‍या घोषणा, स्टँडवर असलेली रसवंती गृहे आणि त्याचा तो घुंगरु लावलेला आवाज. एसटीच्या बाहेरुन विविध पदार्थ आणि वर्तमान पत्रे विकणारी मंडळी, बुकस्टॉल्स, तिथली उपहार गृहे सगळंच खास ! आयुष्यातलं पहिलं पॉपीन्स मी या एसटी स्टँडवर खाल्लं. किंबहुना एसटी आणि पॉपीन्सच्या गोळ्या हे समीकरण माझ्या घट्ट डोक्यात बसले आहे. पुर्वी गाड्या फलाटाला रिव्हर्स करुन लागत. स्टँडवर बसलेल्या माणसाला कुठली गाडी लागली हे पहायला पुढे जावे लागायचे. गावातल्या महत्वाच्या दुकानांच्या जाहिराती एसटी स्टँडवर पहायला मिळायच्या. एशियाड यायच्या आधी रातराणी नावाचा एक प्रकार होता. रात्रीचा प्रवास करणारी रातराणी ! त्याचे नावच फार भारी वाटायचे. उन्हातान्हात, पावसापाण्यात, काटाकुट्यात गावाकडच्या मातीच्या रस्त्यात धूळ उडवत माणसांसाठी धावणारी एसटी, नुसता एक प्रवासी असला किंवा एकही नसला तरी आपल्या नियोजित वेळेला निघणारी हक्काची एसटी, तालुक्याला शाळेत शिकणार्‍या मुलांना आपल्या आईने केलेली भाजी भाकरी मायेने वेळेवर पोचवणारी एसटी, अडनिड्या रस्त्यावर , रात्री अपरात्री वाटसरुंना आधार वाटणारी एसटी ही केवळ वाहतुकीचे साधन नाही तर आजही अनेकांच्या जगण्याचा मार्ग आहे आणि आधारही आहे. ती जगायला हवी इतकंच. ( फॉरवर्ड लेखन, कोणाचे ते माहिती नाही.अनामिक लेखकाकड़ून लेखन साभार - वाट्सएप)
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 11/25/2021 - 23:29 नवीन
पूर्वी पुणे ते कोल्हापूर जाताना सातारा स्थानकावर गाड्या थाम्बायच्या आता आत गावात जावे लागत नाही सातारा स्थाहनक हे त्यावेळी तरी फारच भव्य वाटायचे कारण खूप फ्लॅट होते.. रेल्वे जंक्शन कसे खास असते तसे एसटी चे ते जंक्शन .. आणि सकाळी किंवा पहाटेचं वेळेस पौनीहून निघालेल्या गाड्या साधारण ९-१० चाय सुमारास नाश्त्याला साताऱ्यास थांबायच्या. महाराष्ट्रातील सर्वात व्यस्त एस टी कँटीन साताऱ्याचे असावे असे वाटायचे.. नेहमी झटपट काहीतरी उप्पीट , पोहे, वडे खाणे व्हायचे पण तयावेळेस त्या १०-१५ मिनटात आत फॅमिली रूम मध्ये बसलेली कुटुंब बस ना चुकविता संपूर्ण थाळी कशी काय बुवा पटकन खाऊन घेतात याचे आश्यर्य वाटायचे याशिवाय कवठे महांकाळ , जमखंडी अशी नावे असलेलया एसटीत बसलो पण त्या गावापर्यंत कधी पोचलो नाही याशिवाय , स्टुडंट कन्सेशान चे पंत्र बरोबर घेऊन पश्चिम महाराष्ट्रात ट्रेकिंग साठी लालपरी ने अडनिड्या मुक्कामाचं इष्टया पकडल्या आहेत एकदा तर एक रात्र टपावर झोपायला हि मिळालं होत ( साथीला थंडी, थोडी ओल्ड मंक आणि भडंग )
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 11/26/2021 - 03:08 नवीन
मागे बातमी वाचली होती की सातारा स्टँडचे एसटी क्यान्टीन अमुक इतक्या दशकांपासून एकदाही बंद झालेले नव्हते. (24x 7 चालूच). तसे असूही शकेल. सातारा एसटी स्टँडमधे नेहमी चांगला आलेपाक उपलब्ध असे. कुठेही जाता येता नेहमी मध्यरात्री लागणारा हा एसटी स्टँड त्या कारणाने लक्षात आहे.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Fri, 11/26/2021 - 06:44 नवीन
मला इथे ST थांबली की भूक लागायची.आवडता कायम उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे कट वडा आणि मग त्यावर चहा. तेवढ्यात एसटी सुटायची वेळ होतच असे. बाकी तो ST स्टँड भला मोठा आहे असं माझंही मत होतं.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 11/26/2021 - 07:13 नवीन
एस टी बद्दलच्या हळव्या आठवणी आणि रुक्ष वस्तुस्थिती यात फरक आहे. एम टी एन एल च्या फोन बद्दल असेच म्हणता येईल
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 11/26/2021 - 08:00 नवीन
+1 आणि ज्या क्षणी अन्य पर्याय उपलब्ध झाले (एखाद्या ग्रामीण मार्गावर पुढे खाजगी बसेस सुरु होणे, किंवा आपण ते परवडण्याच्या रेंजमधे पोचणे.. ) त्या क्षणी एसटी सोडून ते ते पर्याय घेतले गेले हेही मान्य. एसटी ही मजबुरीच्या काळातले वाहन असेच समीकरण अनेक जणांच्या बाबतीत राहिले आहे. (आर्थिक प्रगती केलेल्या किंवा गावाकडून मोठ्या शहरात आलेल्या) तेव्हा एसटीच्या बालपणीच्या आठवणींना निव्वळ नोस्ताल्जियाचे कढ याउपर अर्थ नाही हे मान्यच. आणि तरीही आजही अनेकांना तिचा आधार आहे हेही सत्य.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Fri, 11/26/2021 - 08:11 नवीन
तरीही आजही अनेकांना तिचा आधार आहे हेही सत्य. हा मुद्दा पण आहेच, एसटी बस वर एक अख्खी इकॉनॉमी अवलंबून आहे, कित्येक भविष्य सुद्धा, गावातून सकाळच्या बस पकडून शहरात ताजा शेतीमाल, दुग्धपदार्थ घेऊन येणारे मार्जिनल शेतकरी, लेबर अड्ड्यावर येणारे मजूर, इस्पितळे रुग्णालयात येणारे रुग्ण लोक, गावातून बसेस पकडून तालुक्याला शाळेत जाणारी चप्प तेल लावून भांग पाडलेली पोरं, तितक्याच तेलकट वेण्या लाल रिबिनीनं बांधून शाळेत जाणाऱ्या चटपटीत पोरी, सगळ्यांचे असंख्य ऋणानुबंध आहेत हे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 11/26/2021 - 08:52 नवीन
अन्य ठिकाणी दिलेल्या प्रतिसादच इथे परत देतो आहे. एस टी हि फायद्याच्याच चालली पाहिजे हा आग्रह मुळात चूक आहे. जसे मागासवर्गीयांना फी मध्ये सवलत दिली जाते, आर्थिक दुर्बल घटकांना रेशन वर फुकट धान्य दिले जाते किंवा शेतकऱ्यांना/ गरिबांना काहि रक्कम थेट खात्यात जमा केली जाते तद्वत खेड्यापाड्यातील लोकांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणे हा ही सरकारच्या कल्याणकारी कार्यक्रमाचा एक भाग असला पाहिजे. त्यामुळे एस टी हि नफ्यातच राहीली पाहिजे हा आग्रह सोडला पाहिजे यासाठी येणारा तोटा काही प्रमाणात सरकारने सहन केला पाहिजे. याचबरोबर उत्तम प्रशासक नेमून त्यात प्रशासकीय/ राजकीय व्यत्यय आणि लागेबांधे न आणता एस टी चा कारभार परत रुळावर आणला पाहिजे. यासाठी वरिष्ठ नागरिक स्वातंत्र्य सैनिक पासून सोम्या गोम्याला दिल्या जाणाऱ्या सवलती सुद्धा कठोरपणे रद्द केल्या पाहिजेत. केवळ शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा चालू असलेल्या काळातच सवलती देऊन बाकी सर्व सवंग लोकप्रियतेच्या गोष्टींना फाटा मारला पाहिजे. याच बरोबर एस ती महामंडळाला दिली जाणारी सबसिडी महिनोन्महिने ठाकणार नाही याची खात्री सुद्धा केली गेली पाहिजे. परंतु केवळ एस टीच्या लोकांना सरकारी नोकरीत सामावून घेतले पाहिजे हा आग्रह चूक आहे. कारण याला मान्यता दिली तर अनेक महानगर पालिका पासून इतर सर्व महामंडळे यांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सरकारी नोकरीत सामावून घेतले पाहिजे यासाठी आंदोलने सुरु होतील. आणि मग उत्पन्न चार आणे आणि खर्च रुपया सारखी स्थिती होऊन राज्य दिवाळखोरीत जायला वेळ लागणार नाही. यासाठी भरघोस पगार वाढ दिल्यानंतर संप चालू ठेवला तर तो कठोरपणे मोडून काढला पाहिजे. असा प्रतिसाद पचणारा नसला तरी वास्तव आहे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 11/27/2021 - 04:59 नवीन
एस टी हि फायद्याच्याच चालली पाहिजे हा आग्रह मुळात चूक आहे.
सहमत.
केवळ एस टीच्या लोकांना सरकारी नोकरीत सामावून घेतले पाहिजे हा आग्रह चूक आहे. कारण याला मान्यता दिली तर अनेक महानगर पालिका पासून इतर सर्व महामंडळे यांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सरकारी नोकरीत सामावून घेतले पाहिजे यासाठी आंदोलने सुरु होतील.
सहमत.
भरघोस पगार वाढ दिल्यानंतर संप चालू ठेवला तर तो कठोरपणे मोडून काढला पाहिजे.
सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 11/29/2021 - 01:22 नवीन
एस टी हि फायद्याच्याच चालली पाहिजे हा आग्रह मुळात चूक आहे. सहमत परंतु दुर्दवाने या तत्वाचा दुरुपयोग करून एसटी काय किंवा किणतेही सरकारी मालकीची सेवा/ उद्योग "तोट्यात गेली तर काय बिघडल" असे टोकाला जाण्याची प्रवृत्ती वाढली म्हणून लोक पण चिडून खाजगी करण करा.. म्हणतात .. सरसकट खाजगी करनं हि हि टोकाची भूमिका झाली जगात सर्वांतर सरकारी + खाजगी असे समीकरण राबवले जाते आहे त्याची नोंद घेताय का कोणी? उपनगरीय बस सेवा खाजगी कडे कंत्राटाने त्राटाने दिलेली आहे, कडक नियम आहेत, तोट्यातील जे मार्ग आहेत ते चालू ठेवण्याचे बंधन आहे ,, सेव तीच फक्त सरकार चा पैसे अडकून राहत नाही, बस थांबे सरकारी पण बसेस खाजगी कंत्रादाराची
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 11/27/2021 - 04:55 नवीन
एसटी कर्मचा-यांच्या संप भाजपा नेत्यांनी माघार घेतली तरी कर्मचारी अजूनही आझाद मैदानावर बसून आहेत. संख्या रोडावलेली असली तरी त्यांची हिम्मत अजूनही कायम आहे, आणि विलीनीकरणाशिवाय माघार घ्यायचीच नाही असे सर्वच कर्मचारी यांची ठाम भूमिका आहे. दुसरीकडे संप मागे घेतला तरच पगारवाढ करु अशी भूमिका परिवहनमंत्री यांनी घेतली आहे.पगारवाढीच्या निर्णयानंतर काही कर्मचा-यांनी दोनेक दिवसांची रुजू होण्यासाठी दोनेक दिवसांची मूदत मागितली आहे, त्यानंतर मात्र कोणतीही सवलत मिळणार नाही आणि कर्मचा-याविरुद्ध त्यांची कार्यवाही सुरु राहील असे म्हटले आहे. आत्तापर्यंत बारा हजार कर्मचारी कामावर परतल्याचे अधिकृत एसटी विभागाकडून सांगितले गेले असून काही ठिकाणी एसटीचा प्रवास सुरु झालेला दिसतो. कर्मचा-यांच्या बाजूने कोणीही कर्मचारी एसटी कामावर रुजू झालेलं नाही. एसटी कर्मचा-यांचम आंदोलन मोडून काढण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात असल्याचे त्यांचे म्हणने आहे. परिवहन मंत्री यांनी एसटीच्या अधिकृत संघटनेशी कालही बोलणी केली. आता वेतनवाढ केलेली आहे, संप मागे घ्यावा आणि कामावर रुजू व्हावे, एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहे, आणि एसटीसाठी हे काही भले नाही अशी मत मांडले आहे. एकूणच आता प्रकरण न्यायालयात आहे, आणि तोपर्यंत तरी शासन विलीनीकरणाचा निर्णय घेणार नाही. समितीचा अहवालानंतर ही कार्यवाही होणार आहे, आज तरी कर्मचारी आपल्या हट्टावर कायम आहे, पुढे काय होणार हे काळच ठरवेल असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 10 hours ago
  • सुंदर !!
    1 day 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा