रोज किती पाणी प्यावे?
पाणी हा आपल्या जीवनाचा आवश्यक घटक. आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो. पृथ्वीवर सर्वत्र एकसारखे हवामान नाही. त्यानुसार माणसाची पाणी पिण्याची गरज वेगवेगळी राहते. अलीकडे काही वृत्तमाध्यमांतून रोज किती पाणी प्यावे यासंदर्भात काही विधाने वाचण्यात आली. वास्तविक निरोगी व्यक्तीने रोज किती पाणी प्यावे याची ठोस शास्त्रीय शिफारस नाही. तरीसुद्धा काही लोक, अमुक इतक्या प्रमाणाच्या वर पाणी पिऊ नका, त्याने मूत्रपिंडावर ताण येईल किंवा अजून अमुक-तमुक होईल, अशा स्वरूपाची विधाने माध्यमांमधून करीत असतात. त्यामध्ये शास्त्रीय तथ्य किती याचा आढावा या लेखात घेत आहे.
प्रारंभी पाणी पिणे या संदर्भात आपल्या शरीरातील कोणत्या यंत्रणा कार्यरत असतात, तसेच मूत्रपिंडाचे त्या संदर्भातील कार्य या गोष्टी समजून घेऊ. इथे लिहीलेले सर्व मुद्दे हे प्रौढ निरोगी व्यक्तीचा संदर्भ घेऊनच लिहिलेले आहेत. निरोगी याचा अर्थ ज्याच्या मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित (नॉर्मल) चालू आहे असा माणूस.
(मूत्रपिंडाच्या विविध आजारांमध्ये किती पाणी प्यावे हा स्वतंत्र विषय असून तो पूर्णपणे संबंधित तज्ञांच्या देखरेखीखाली हाताळला जातो. हा भाग पूर्णपणे या लेखाच्या कक्षेबाहेर आहे याची नोंद घ्यावी).
सुरुवातीस तहान लागण्याच्या संदर्भातील शरीरधर्म पाहू. आपल्या रक्ताचा जो द्रव भाग असतो त्यामध्ये मुख्यतः पाणीच असते. या पाण्यात काही पदार्थ विरघळवलेल्या अवस्थेत असतात. त्यामुळे रक्ताला एक विशिष्ट घनता (osmolality) असते. शरीरातून जसे पाणी उत्सर्जित होते तसा या घनतेत फरक पडतो. त्यानुसार मेंदूला विशिष्ट संदेश जातात. आता मेंदूमध्ये दोन घटना घडतात :
१. तिथल्या एका ग्रंथीतून ADH या नावाचे हार्मोन स्त्रवते.
२. तहान नियंत्रण केंद्राला चालना मिळते. त्यामुळे आपण समाधान होईल इतके पाणी पितो.
वरील दोन्ही घटना घडल्यानंतर आपल्या रक्ताची घनता पूर्ववत होते. त्यामुळे ते हार्मोन स्त्रवणे थांबते आणि तहानेची भावनाही बंद होते.
रक्ताची घनता स्थिर राखण्यामध्ये त्यातील सोडियमचे प्रमाणही स्थिर ठेवावे लागते. ते काम मूत्रपिंडांच्यावर असलेल्या ऍडरिनल ग्रंथींमधून स्त्रवणाऱ्या Aldosterone या हार्मोनमुळे केले जाते.
आपण शरीरातून लघवी, घाम आणि श्वसन याद्वारे पाणी उत्सर्जित करतो. ते उत्सर्जन किती होते यानुसार आपली तहान नियंत्रित केली जाते.
आपल्या मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित राहण्यासाठी आणि एकंदरीत तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज (24 तासात) किती पाणी प्यावे हा बहुचर्चित विषय आहे. त्यावर वैद्यकीय आणि आरोग्यशास्त्र संबंधीच्या विविध तज्ञांची अनेक मते आहेत. त्यावर वारंवार काथ्याकुट होत असतो. आतापर्यंत झालेले विविध अभ्यास आणि पुरावे पाहता एक स्पष्ट होते ते म्हणजे - अमुक इतके पाणी रोज पिल्याने तब्येत उत्तम राहते असे सप्रमाण सिद्ध झालेले नाही. त्यामुळे निरोगी व्यक्तीने अमुक इतकेच पाणी प्यावे किंवा अमुक इतक्या प्रमाणाबाहेर पिऊच नये अशी काही वैज्ञानिक शिफारस नाही.
जगाच्या पाठीवर विविध हवामान प्रदेशांमध्ये आपण वस्ती करतो. त्यानुसार पाण्याची दैनंदिन गरज बदलती राहते. ही गरज नियंत्रित करण्यामध्ये खालील घटकांचे योगदान असते :
१. हवामान
२. शरीरश्रमांचा प्रकार व पातळी
३. श्रम बंद जागेत की रस्त्यावर मोकळ्या हवेत
४. दीर्घकाळ मैदानी खेळ खेळणे आणि
५. मूत्रपिंडांचे कार्य.
पाणी किती प्यावे याचे स्वनियंत्रण आपण एका सोप्या निरीक्षणाद्वारे करू शकतो ते म्हणजे आपल्या लघवीचा रंग. निरोगी अवस्थेत तो फिकट पिवळसर असतो. आपल्या दिवसभरातील प्रत्येक लघवीचा रंग तसाच स्थिर राहात असेल तर ते शरीरातील पाणी नियंत्रण उत्तम असल्याची खूण असते.
आता संदर्भासाठी भारतीय हवामान घेऊ. साधारणपणे आपण चोवीस तासात एक ते दोन लिटर या दरम्यान (सरासरी दीड लि.) लघवी करतो. मग ते पाणी भरून काढण्यासाठी साधारण दोन ते अडीच लिटर पाणी पिले जावे असे एक सामान्य तत्व आहे ( पाणी या शब्दात पाण्यासह इतर खाद्यपेय पदार्थही येतात). उन्हाळ्यात अर्थातच हे प्रमाण गरजेनुसार तीन ते साडेतीन लिटर इतके वाढू शकते तर थंडीत ते कमी होते.
आता पाहू एक वादग्रस्त प्रश्न.
सामान्य माणसांनी सामान्य हवामानात 24 तासात तीन लिटर पेक्षा जास्त पाणी पिऊ नये, तसे केल्यास मूत्रपिंडांवर ताण येतो आणि वेळप्रसंगी मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो, अशा प्रकारची माहिती काही लोक पसरवत असतात. या मुद्द्यात व्यावहारिक तथ्य नाही. कसे नाही ते समजावतो.
समजा आपण गरजेपेक्षा बरेच जास्त पाणी पिऊ लागलो तर काय होईल ? याचे साधे उत्तर आहे की आपण नेहमीपेक्षा जास्त वेळेला लघवीस जात राहू. पाणी उत्सर्जन करणे हे आपल्या मूत्रपिंडांचे कामच आहे. आपण खूप जास्त पाणी प्यालो तर त्यांना अधिक उत्सर्जन करण्याची राखीव क्षमता दिलेली आहे. अधिक जलपान तर अधिक उत्सर्जन, असा हा साधा तर्क आहे.
समजा एखादा माणूस ठरवून दिवसात १० लिटर पाणी प्यायला (केवळ कल्पना करू) तरीही मूत्रपिंडे ते ज्यादा पाणी लघवीवाटे व्यवस्थित उत्सर्जित करतील. हे जे उदाहरण दिले ते निव्वळ ताणलेली कल्पना आहे. जेव्हा शरीरातील पाण्याची स्थिती उत्तम असते तेव्हा मुळात आपल्याला अतिरिक्त तहान लागतच नाही. तरीही जर पाणी ढोसायचेच म्हटले, तर एक क्षण असा येईल की आपल्याला पाणी पाहूनच प्रचंड मळमळ होईल आणि ताबडतोब उलटी सुद्धा होईल. अशाप्रकारे आपल्या तोंड या प्रवेशद्वाराशीच हे नैसर्गिक पाणी नियंत्रण काम करते. त्यातून एखादा माणूस भरमसाट पाणी किती पिऊ शकेल त्याला नैसर्गिक मर्यादा आपसूकच येते.
'जास्ती पाणी पिऊ नका' च्या सल्लागारांचा दुसरा मुद्दा असतो तो रक्तातील सोडीयमच्या संदर्भात. निरोगी अवस्थेत रक्तात सोडियमचे प्रमाण 135 ते 145 युनिट्स या टप्प्यात असते. हे प्रमाण म्हणजे किती पाण्यात किती सोडियम विरघळला आहे याची तुलना असते. समजा पाण्याचे प्रमाण अचानक खूप वाढले, तर मग त्या स्थितीत सोडियमचे तुलनात्मक प्रमाण बरेच कमी होते. त्यातून मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. ही झाली थिअरी. मुळात आपण वर पाहिल्याप्रमाणे, जसे एखादा माणूस जास्त पाणी पिऊ लागतो तसे मूत्रपिंडे अधिक लघवी लघवी उत्सर्जित करीत राहतातच. तसेच संबंधित दोन हार्मोन्सही योग्य ते नियंत्रण करतात. त्यामुळे खूप मोठ्या पाण्यात तेवढाच सोडीयम ही स्थिती वास्तवात उद्भवत नाही. तसे होऊ शकेल ही एक अतिरंजित कल्पना राहते. गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने दुष्परिणाम होत नाहीत हे यावरून स्पष्ट होईल.
आता याविरुद्धची बाजूही बघू. 'भरपूर पाणी प्या आणि मूत्रपिंडांना तंदुरुस्त ठेवा' या विधानालाही शास्त्रीय पाया नाही. मूत्रपिंडांची तंदुरुस्ती ही पाण्याव्यतिरिक्त शरीरातील इतर अनेक घटकांवरही अवलंबून आहे. म्हणून निव्वळ भरपूर पाणी पिल्याने मूत्रपिंडाचा आजार होत नाही हेही एक मिथक आहे. जसे की, रोज एक सफरचंद खाल्ल्याने रोगमुक्तता मिळते असे थोडेच आहे ? तद्वत निव्वळ पाण्याच्या मुबलकतेने उत्तम आरोग्य राहील यालाही अर्थ नाही.
पाण्याची गरज कोणते घटक ठरवतात ते आपण लेखात पाहिले. जोपर्यंत मूत्रपिंडे तंदुरुस्त आहेत, मेंदूतील तहान नियंत्रण व्यवस्थित काम करतंय आणि संबंधित हॉर्मोन्सही व्यवस्थित स्त्रवत आहेत, तोपर्यंत गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने दुष्परिणाम व्हायचे काही कारण नाही. प्रत्येकाची तहानेची भावना आणि लघवीच्या रंगाचे निरीक्षण यानुसार पाणी पिण्याचे स्वयंनियंत्रण होत असते. त्यासाठी पाण्याच्या ठराविक प्रमाणाची मुद्दामून शिफारस नको. अभ्यासांती आणि सहकारी डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर हे माझे मत बनले आहे. समाजात आरोग्य शास्त्रासंबंधित सर्व तज्ञांचे यावर एकमत नाही असे दिसते. मी माझे मत विचारांती येथे लिहिले आहे. विषय चर्चेस खुला आहे.
पुन्हा एकदा महत्त्वाचे :
ही चर्चा करताना आपण फक्त तहान नियंत्रण व मूत्रपिंडे निरोगी असलेल्या प्रौढ व्यक्तीचाच विचार करीत आहोत.
……………
मूत्रविकारांवरील चर्चेसाठी हा जुना धागा उपलब्ध आहे:
https://www.misalpav.com/node/41739
.
🗣 चर्चा
(132)
स
सुबोध खरे
Sat, 10/09/2021 - 05:50
नवीन
मोगा खान
एम बी बी एस ला प्रतिबंधक तथा सामाजिक वैद्यकशास्त्र(preventive and social medicine) असा विषय असतो.
त्यात बोअर वेल आणि पाण्यात विरघळलेले घन पदार्थ याबद्दल बराच उहापोह आहे.
जुनी पुस्तके चाळुन पहा.
- Log in or register to post comments
H
hrkorde
Sat, 10/09/2021 - 10:26
नवीन
मला फर्स्ट इअरला बायोकेमिस्ट्रीत ४५ , सेकण्ड इअरला फोरेन्सिकमध्ये ४५ आणि थर्ड इअरला पी एस एम मध्ये ४५ मार्क आहेत. प्रत्येक वर्षी कंडोलवर पास आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 10/11/2021 - 14:56
नवीन
प्रत्येक वर्षी कंडोलवर पास आहे.
एम बी बी एस पास कसे झालात यापेक्षा त्यानंतर आपण काहीही वाचायचेच नाही असे ठरवले तर कोणीही काहीही मदत करू शकत नाही.
कायदा आणि वैद्यकशास्त्र यात आपल्याला आयुष्यभर सतत वाचन करत राहणे आवश्यक आहे
अन्यथा आपण फार लवकर कालबाह्य होण्याचा धोका असतो.
मुळात कोणत्याही विषयात आपल्याला ५० गुण मिळाले याचाच अर्थ आपल्याला त्या विषयाचे सखोल ज्ञान झाले असा होत नाहि.
यास्तव परीक्षा झाल्यावर आपल्याला परीक्षेत काय आले नाही याचा विचार केला पाहिजे.
शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात सोडून द्या
परंतु ज्या विषयात आपण करियर करता त्या विषयांचे मूलभूत ज्ञान आपल्याला जितके जास्त असेल तितके पुढे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी त्याचा फार उपयोग होतो.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Mon, 10/11/2021 - 18:03
नवीन
आम्हा आयटी वाल्यांना पण हो डॉक्टर साहेब ! मला तर वाटते आमच्या क्षेत्रात सगळ्यात जास्त update राहावं लागतं असेल कदाचित् !
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 10/12/2021 - 07:14
नवीन
मला आय टी क्षेत्राबद्दल काहीही माहिती नाही त्यामुळे त्याबद्दल मी काही टिप्पणी करू शकत नाही याबद्दल क्षमस्व.
परंतु वरील वस्तुस्थिती खरं तर कोणत्याही क्षेत्रासाठी लागू पडते असे माझे नम्र मत आहे.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sat, 10/09/2021 - 05:50
नवीन
संक्षिप्त व तात्पुरते उत्तर :
बोरिंगचे पाणी हे जड पाणी असते तर आपल्याला नगरपालिकेकडून जे पिण्याचे पाणी मिळते ते 'हलके' (सॉफ्ट) पाणी असते. जड पाण्यामध्ये अनेक खनिजे बऱ्यापैकी प्रमाणात असतात. त्यापैकी कॅल्शियम व मॅग्नेशियम ही महत्त्वाची आहेत. तसेच हे पाणी तुलनेने अधिक आम्लधर्मी असते.
पिण्यासाठी कोणते पाणी उत्तम हा लाखमोलाचा आणि तितकाच गोंधळात टाकणारा प्रश्न आहे ! यावर गेली पन्नास वर्षे संशोधन होऊनही सरसकटीकरण करता येतील असे निष्कर्ष नाहीत.
या विषयाची व्याप्तीच इतकी मोठी आहे की त्यावर एका परिच्छेदात लिहिणे अवघड आहे. सवडीने स्वतंत्र काही लिहावे असे म्हणतो.
जड पाण्यात असणाऱ्या महत्त्वाच्या खनिजांमुळे हे पाणी काही जनतेसाठी उपकारकच ठरेल असा एक मतप्रवाह आहे. विशेषता जिथे गरिबीमुळे सकस आहार मिळत नाही अशा भागांमध्ये जनतेला या पाण्यातूनच ती खनिजे आपसूक मिळतील असे काहींचे मत आहे.
जड पाण्यामुळे मूत्रपिंडातील खडे, कर्करोग इत्यादी गोष्टी होण्याची शक्यता वाढते का, यावर अद्याप समाधानकारक उत्तर नाही.
तसेच जड पाणी पिल्यामुळे हृदयविकारांपासून संरक्षण मिळते का हाही वादग्रस्त प्रश्न आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 10/09/2021 - 06:29
नवीन
जागतिक आरोग्य संघटनेचे वार्तापत्र आहे ज्यात बऱ्यापैकी विस्तृत माहिती आहे
https://www.who.int/water_sanitation_health/dwq/chemicals/hardness.pdf
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
Sat, 10/09/2021 - 21:05
नवीन
मला वाटते हे स्थानिक भैगोलिक परिस्थितीवरही अवलंबून असावे.
कोकणात विहिरीचे पाणी बहुतांश चांगले व पिण्यायोग्य असते असे ऐकून आहे.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 10/09/2021 - 21:49
नवीन
Ground water .
म्हणजेच बोअर चे पाणी.
ते जड पाणी च असते,पिण्यास योग्य नसते हा विचार चुकीचा आहे.
पाण्यात कोणते क्षार आहेत ,त्या मधील शरीराला आवशकया कोणते आहेत ,शरीरास अयोग्य कोणते आहेत .हे महत्वाचे असते.
स्थान नुसार हे सर्व क्षारांचे प्रमाण बदलत असते.
पाणी किती खोली वरून येत आहे ते पण महत्वाचे असते.
अगदी काही वर्ष पूर्वी प्रतेक घरात आड (लहान विहीर तीन चार फूट व्यासाची) प्रतेक घरात असे .
आणि तेच पाणी लोक पित असतं.
ते बिलकुल जड पाणी नव्हते.ना शरीरास अयोग्य होते.
Ground water अहितकारक आणि surface water खूप चांगले असा भेदभाव सरळ कधीच करता येत नाही.
Who काही ही सांगत असू ध्या रिॲलिटी काय आहे प्रतेक स्थानाची हेच महत्वाचे असते.
असे क्षार जे मानवी शरीर पचवू शकत नाही असे क्षार पाण्यात असतील तर ते पाणी माणसाला पिण्यास अयोग्य असे एका वाक्यात स्पष्ट करता येईल.
Who चे ऐकून सरसकट तेच सत्य आहे असे समजणे बुद्धिहीन पणाचे लक्षण आहे.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sun, 10/10/2021 - 02:31
नवीन
+१
उदा. खालील मजकूर माझ्या फ्लुओराइडच्या धाग्यावरून इथे पुन्हा डकवत आहे :
...
फ्लुओराइडच्या दीर्घकालीन अतिरिक्त सेवनाचे प्रमुख कारण म्हणजे पिण्याच्या नैसर्गिक साठ्यांत असलेले त्याचे भरपूर प्रमाण. हा प्रश्न भारत व चीनमधील अनेक भागांत दिसतो.
भारतातील सुमारे अडीच कोटी लोक याने बाधित आहेत. अलीकडे असे दिसले आहे की मोठ्या धरणांच्या मागील भागातील जलसाठे (backwaters) फ्लूओराइडने अतिसंपन्न असतात. तसेच जगभरात ग्रामीण भागांतील काही विहीरींच्या पाण्यातही हे प्रमाण जास्त असल्याचे दिसते.
अशा पाण्यांवर योग्य ती प्रक्रिया करून अतिरिक्त फ्लुओराइड काढून टाकायचे असते. अशी यंत्रणा सर्वत्र उपलब्ध नसल्याने तेथील लोक फ़्लुओरोसिसला बळी पडतात.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 10/09/2021 - 06:35
नवीन
TDS AND PH FACT SHEET
https://www.safewater.org/fact-sheets-1/2017/1/23/tds-and-ph
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sat, 10/09/2021 - 08:09
नवीन
पूरक माहिती, उत्तम प्रश्न, व्यक्तिगत अनुभव आणि अर्थपूर्ण चर्चेबद्दल सर्व सहभागी मंडळींचे आभार !
या चर्चेमधून आपणा सर्वांची या विषयाबद्दलची उत्सुकता आणि जागरूकता दिसून आली हे महत्त्वाचे आहे.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sat, 10/09/2021 - 08:09
नवीन
पूरक माहिती, उत्तम प्रश्न, व्यक्तिगत अनुभव आणि अर्थपूर्ण चर्चेबद्दल सर्व सहभागी मंडळींचे आभार !
या चर्चेमधून आपणा सर्वांची या विषयाबद्दलची उत्सुकता आणि जागरूकता दिसून आली हे महत्त्वाचे आहे.
- Log in or register to post comments
स
सॅगी
Sat, 10/09/2021 - 17:01
नवीन
दोन्ही डॉक्टरसाहेबांचे आभार.. कायप्पा मेसेजेसवर तसाही विश्वास नव्हताच, आणि तो तसा ठेऊही नये हे पुन्हा एकदा कळाले.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 10/09/2021 - 17:11
नवीन
आणि तहान लागेल तेव्हा पाणी प्यावे हे उत्तम असे मला वाटतं.
कोणी तरी सांगितले म्हणून ठरवून ठराविक वेळेला ltr च पाणी पिले पाहिजे हा हट्ट हास नसावा.
असे माझे वैयतिक मत झाले आहे.
- Log in or register to post comments
अ
अपूर्व कात्रे
Sat, 10/09/2021 - 20:24
नवीन
नेहमीप्रमाणे तुमचा हाही लेख आवडला. लेख आणि त्याखालील चर्चा वाचून पाणी पिण्याबाबतच्या मनातील बऱ्याच शंकांचे निरसन झाले.
असेच लिहीत जा. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sun, 10/10/2021 - 05:10
नवीन
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
काही वाचक इथे प्रथमच आलेले आहेत. त्यांचे नेहमीच स्वागत असेल. या धाग्याचा विषय किती पाणी प्यावे, तहान, लघवीचे प्रमाण इत्यादी मुद्द्यांची निगडित आहे.
चर्चेच्या ओघात दोन उपविषय ऐरणीवर आले आहेत.
१. पिण्याच्या पाण्याचा दर्जा आणि आरोग्य : याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यावर सावकाशीने वाचून कालांतराने स्वतंत्र लिहिण्याचा मानस आहे. तरी सर्वांनी यासंदर्भातील मुद्दे तेव्हाच्या स्वतंत्र चर्चेसाठी राखून ठेवावेत. तूर्त इथे या मुद्द्यावर शेपटाकडे प्रतिसाद वाढवण्यात मजा नाही.
२. खाण्यापिण्याचे पदार्थ आणि दातांचे आरोग्य हा दुसरा विषय. याची चर्चा दंतवैद्याच्या मार्गदर्शनाखाली झाल्यात ते सर्वोत्तम. निव्वळ जालवाचनापेक्षा अनुभवाचे बोल इथे महत्त्वाचे ठरतील. तसे कोणी इथे असल्यास त्यांना माझी विनंती.
- Log in or register to post comments
अ
अथांग आकाश
Sun, 10/10/2021 - 07:14
नवीन
छान लेख व चर्चा!
तात्पर्य: तहान भागेल एवढे पाणि प्यावे! इतरांचे अनुकरण करु नये!!
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sun, 10/10/2021 - 08:40
नवीन
चित्र आवडलेच...
चित्रातल्या माणसाप्रमाणे अजिबात अनुकरण करणार नाही !
तो सारखाच पीत बसला आहे :)
- Log in or register to post comments
म
मित्रहो
Mon, 10/11/2021 - 13:31
नवीन
हा धागा आज वाचण्यात आला. धाग्यातून आणि प्रतिसादातून छान माहिती मिळाली.
सायकलींग करताना सतत थोडे थोडे पाणी पित रहा असे सांगतात नाहीतर क्रॅम्प्स येतील. काय संबंध आहे माहित नाही. प्रयत्न करुनही हिवाळ्यात शक्य होत नाही आणि उन्हाळ्यात आपोआप होते. त्रास कधी झाला नाही.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Mon, 10/11/2021 - 15:04
नवीन
धन्यवाद
दीर्घकाळ पळणे असो किंवा सायकल मारणे असो घामाचे प्रमाण जास्त राहतेच. थोड्या थोड्या वेळाने पाणी पिणे हा योग्य सल्ला आहे.
याचा अंतिम हेतू रक्तातील सोडिअम व पाणी यांचे तुलनात्मक प्रमाण कायम स्थिर ठेवणे हा आहे.
- Log in or register to post comments
म
मित्रहो
Tue, 10/12/2021 - 12:14
नवीन
माहिती बद्दल धन्यवाद
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
गुरुवार, 10/21/2021 - 07:14
नवीन
हे पहा माध्यमांची कशी फेकाफेकी चालू असते:
"पाणी कमी प्यायल्याने मायग्रेन, अपचन आणि लठ्ठपणा इत्यादी समस्या तुम्हाला होऊ शकतात"
https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/lifestyle/health-care-tips-benefits-of-drinking-water-in-the-morning-1008533/amp?amp_gsa=1&_js_v=a6&usqp=mq331AQIKAGwASCAAgM%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16347895523185&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&share=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Flifestyle%2Fhealth-care-tips-benefits-of-drinking-water-in-the-morning-1008533
- Log in or register to post comments
न
ननि
गुरुवार, 10/21/2021 - 09:22
नवीन
नेहमीप्रमाणे छान आणि माहितीपूर्ण लेख. बऱ्याच शनका लेखातून आणि प्रतिसादाना दिलेल्या उत्तरातून फिटल्या. धन्यवाद डॉ.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Wed, 03/30/2022 - 12:16
नवीन
महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली आहे.....
सर्वांनी भरपूर पाणी प्यावे.
हा उन्हाळा सर्वांना सुखकर जावो ही सदिच्छा !
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sun, 04/24/2022 - 10:11
नवीन
सौर ऊर्जेच्या मदतीने हवेपासून पाणी तयार करण्यासंबंधी इथ एक लेख आहेn:
https://interestingengineering.com/drinking-water-from-air-and-sunlight
आपल्यातील कोणी या विषयातील अभ्यासू असल्यास जरूर त्यावर स्वतंत्र लिहा असे आवाहन करतो.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Sun, 04/24/2022 - 12:50
नवीन
अतिशय उत्तम लेख आणि शंका निरसन ज्याला वैज्ञानिक विदा नाही अशी माहिती आपल्या व्यवसाय व ज्ञानशाखेशी संलग्न असली तरी पुरेसा विदा उपलब्ध नाही हे म्हणायला हे निष्काम स्थितप्रज्ञता लागते आपण ती दाखवताय, you are the best conveyer of the Hippocratic oath sir.
आता माझा एक प्रश्न, शुक्रवारी मुंबईत ऊन अन आर्द्रता ह्यांनी वात आणला होता, अशा परिस्थितीत पुण्याहून येऊन टाऊन साईडला आमची फार पायपीट झाली, दहा दहा रुपयांच्या किमान ५ बाटल्या म्हणजे अडीच लिटर पाणी प्यायलो पण घाम भयानक आला होता. अश्यातच दिवसभरात दोन वेळा पाऊल चुकणे, पाय मुरगळुन घेणे झाले दोन वेळा दोन पायांचे, स्टेशनवर हार्बर लाईन पकडायला धावताना प्लॅटफॉर्मवर पण पडलो मजबूत, सोबतचा सहकारी म्हणतो की स्वेटींग जास्त झाल्यामुळे मिनरल लॉस अन सोडियम ईमबॅलन्स झाल्याने तोल जातो, ह्यात काही तथ्य आहे का ? मी दिवसभरात काहीही "जेवलो" नव्हतो सकाळी पुण्याहून निघताना घरून एक भाकरी खाऊन निघालो होतो हा अजून एक तपशील आहे, सहसा मला घाम धारा लागण्याइतका मजबूत येतो (स्वेटींग लाईक या पिग म्हणतात तसे) अगदी पुण्यात सुद्धा गर्मीच्या मोसमात पण असे पाऊल चुकणे, मुरगळणे, पडणे होत नाही, वातावरणाचा काय फरक पडू शकतो का ? मुख्य म्हणजे सोडियम कमी झाल्याने असे बॅलन्स जाणे होते का ? माझे झाले असेल का ?अन त्यावर उपाय काय करू शकतो ?
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sun, 04/24/2022 - 14:42
नवीन
तुमचा प्रतिसाद नेहमीप्रमाणे उत्साहवर्धक आहे. त्यातून नेहमीच अधिक वाचन करण्याची प्रेरणा मिळते. त्याबद्दल धन्यवाद !
…
आता तुमच्या समस्येबद्दल.
त्यादिवशी तुम्हाला घाम प्रचंड आलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही नुसते पाणी भरपूर प्यालात. इथे एक मुद्दा महत्त्वाचा आहे.
उष्ण हवामानात सामान्य माणसाच्या ज्या काही हालचाली होतात (भरभर चालणे इत्यादी) त्यातून काही स्नायूंच्या आसपासच्या भागात इलेक्ट्रोलाईट (सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम) यांचा असमतोल होतो. त्यातून त्या भागात पेटके येऊ शकतात. अशावेळी नुसत्या पाण्याऐवजी कुठलेतरी खारे सरबत घ्यावे हे उत्तम. मात्र या स्थितीत रक्तातील सोडियमची पातळी कमी होत नाही.
ती अवस्था मॅरेथॉन वगैरे धावपटूंचे बाबतीत अतिउष्ण हवामानात होऊ शकेल.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Sun, 04/24/2022 - 14:50
नवीन
पेटके म्हणजे शुद्ध मराठीत cramps ना ? च्यायला एकदम क्रिकेटपटू झाल्यागत वाटले,
बाकी ह्यापुढे तुमचा सल्ला शिरसावंद्य मानून नुसत्या पाण्याच्या ऐवजी लिंबू सरबत, लिंबू सोडा इत्यादी पिण्यात येईल.
वन्स अगेन, थँक्स डॉक्टर साहेब. कधी मुंबईत सेटल झालो तर तुम्हीच आमचे फॅमिली डॉक्टर असणार हे खास नमूद करतो इथे.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sun, 04/24/2022 - 14:59
नवीन
पेटके म्हणजे शुद्ध मराठीत cramps ना
>> होय.
*
मलाही आवडेल हो,
पण त्यासाठी तुम्हाला पुण्यात स्थायिक व्हावे लागेल.!
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Mon, 11/28/2022 - 10:09
नवीन
शास्त्रीय संदर्भ नसलेली जोरदार थापेबाजी:
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ब्रश न करता पाणी प्यावे की पिऊ नये ?
https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/lifestyle/benefits-of-drinking-water-in-the-morning-marathi-news-1124382/amp?amp_gsa=1&_js_v=a9&usqp=mq331AQIKAGwASCAAgM%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16695318614630&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&share=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Flifestyle%2Fbenefits-of-drinking-water-in-the-morning-marathi-news-1124382
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 11/28/2022 - 18:35
नवीन
बरीच माहिती मिळाली....
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3