Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

रोज किती पाणी प्यावे?

ह
हेमंतकुमार
Wed, 10/06/2021 - 02:27
🗣 132 प्रतिसाद
पाणी हा आपल्या जीवनाचा आवश्यक घटक. आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो. पृथ्वीवर सर्वत्र एकसारखे हवामान नाही. त्यानुसार माणसाची पाणी पिण्याची गरज वेगवेगळी राहते. अलीकडे काही वृत्तमाध्यमांतून रोज किती पाणी प्यावे यासंदर्भात काही विधाने वाचण्यात आली. वास्तविक निरोगी व्यक्तीने रोज किती पाणी प्यावे याची ठोस शास्त्रीय शिफारस नाही. तरीसुद्धा काही लोक, अमुक इतक्या प्रमाणाच्या वर पाणी पिऊ नका, त्याने मूत्रपिंडावर ताण येईल किंवा अजून अमुक-तमुक होईल, अशा स्वरूपाची विधाने माध्यमांमधून करीत असतात. त्यामध्ये शास्त्रीय तथ्य किती याचा आढावा या लेखात घेत आहे. प्रारंभी पाणी पिणे या संदर्भात आपल्या शरीरातील कोणत्या यंत्रणा कार्यरत असतात, तसेच मूत्रपिंडाचे त्या संदर्भातील कार्य या गोष्टी समजून घेऊ. इथे लिहीलेले सर्व मुद्दे हे प्रौढ निरोगी व्यक्तीचा संदर्भ घेऊनच लिहिलेले आहेत. निरोगी याचा अर्थ ज्याच्या मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित (नॉर्मल) चालू आहे असा माणूस. (मूत्रपिंडाच्या विविध आजारांमध्ये किती पाणी प्यावे हा स्वतंत्र विषय असून तो पूर्णपणे संबंधित तज्ञांच्या देखरेखीखाली हाताळला जातो. हा भाग पूर्णपणे या लेखाच्या कक्षेबाहेर आहे याची नोंद घ्यावी). सुरुवातीस तहान लागण्याच्या संदर्भातील शरीरधर्म पाहू. आपल्या रक्ताचा जो द्रव भाग असतो त्यामध्ये मुख्यतः पाणीच असते. या पाण्यात काही पदार्थ विरघळवलेल्या अवस्थेत असतात. त्यामुळे रक्ताला एक विशिष्ट घनता (osmolality) असते. शरीरातून जसे पाणी उत्सर्जित होते तसा या घनतेत फरक पडतो. त्यानुसार मेंदूला विशिष्ट संदेश जातात. आता मेंदूमध्ये दोन घटना घडतात : १. तिथल्या एका ग्रंथीतून ADH या नावाचे हार्मोन स्त्रवते. २. तहान नियंत्रण केंद्राला चालना मिळते. त्यामुळे आपण समाधान होईल इतके पाणी पितो. वरील दोन्ही घटना घडल्यानंतर आपल्या रक्ताची घनता पूर्ववत होते. त्यामुळे ते हार्मोन स्त्रवणे थांबते आणि तहानेची भावनाही बंद होते. रक्ताची घनता स्थिर राखण्यामध्ये त्यातील सोडियमचे प्रमाणही स्थिर ठेवावे लागते. ते काम मूत्रपिंडांच्यावर असलेल्या ऍडरिनल ग्रंथींमधून स्त्रवणाऱ्या Aldosterone या हार्मोनमुळे केले जाते. आपण शरीरातून लघवी, घाम आणि श्वसन याद्वारे पाणी उत्सर्जित करतो. ते उत्सर्जन किती होते यानुसार आपली तहान नियंत्रित केली जाते. आपल्या मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित राहण्यासाठी आणि एकंदरीत तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज (24 तासात) किती पाणी प्यावे हा बहुचर्चित विषय आहे. त्यावर वैद्यकीय आणि आरोग्यशास्त्र संबंधीच्या विविध तज्ञांची अनेक मते आहेत. त्यावर वारंवार काथ्याकुट होत असतो. आतापर्यंत झालेले विविध अभ्यास आणि पुरावे पाहता एक स्पष्ट होते ते म्हणजे - अमुक इतके पाणी रोज पिल्याने तब्येत उत्तम राहते असे सप्रमाण सिद्ध झालेले नाही. त्यामुळे निरोगी व्यक्तीने अमुक इतकेच पाणी प्यावे किंवा अमुक इतक्या प्रमाणाबाहेर पिऊच नये अशी काही वैज्ञानिक शिफारस नाही. जगाच्या पाठीवर विविध हवामान प्रदेशांमध्ये आपण वस्ती करतो. त्यानुसार पाण्याची दैनंदिन गरज बदलती राहते. ही गरज नियंत्रित करण्यामध्ये खालील घटकांचे योगदान असते : १. हवामान २. शरीरश्रमांचा प्रकार व पातळी ३. श्रम बंद जागेत की रस्त्यावर मोकळ्या हवेत ४. दीर्घकाळ मैदानी खेळ खेळणे आणि ५. मूत्रपिंडांचे कार्य. पाणी किती प्यावे याचे स्वनियंत्रण आपण एका सोप्या निरीक्षणाद्वारे करू शकतो ते म्हणजे आपल्या लघवीचा रंग. निरोगी अवस्थेत तो फिकट पिवळसर असतो. आपल्या दिवसभरातील प्रत्येक लघवीचा रंग तसाच स्थिर राहात असेल तर ते शरीरातील पाणी नियंत्रण उत्तम असल्याची खूण असते. आता संदर्भासाठी भारतीय हवामान घेऊ. साधारणपणे आपण चोवीस तासात एक ते दोन लिटर या दरम्यान (सरासरी दीड लि.) लघवी करतो. मग ते पाणी भरून काढण्यासाठी साधारण दोन ते अडीच लिटर पाणी पिले जावे असे एक सामान्य तत्व आहे ( पाणी या शब्दात पाण्यासह इतर खाद्यपेय पदार्थही येतात). उन्हाळ्यात अर्थातच हे प्रमाण गरजेनुसार तीन ते साडेतीन लिटर इतके वाढू शकते तर थंडीत ते कमी होते. आता पाहू एक वादग्रस्त प्रश्न. सामान्य माणसांनी सामान्य हवामानात 24 तासात तीन लिटर पेक्षा जास्त पाणी पिऊ नये, तसे केल्यास मूत्रपिंडांवर ताण येतो आणि वेळप्रसंगी मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो, अशा प्रकारची माहिती काही लोक पसरवत असतात. या मुद्द्यात व्यावहारिक तथ्य नाही. कसे नाही ते समजावतो. समजा आपण गरजेपेक्षा बरेच जास्त पाणी पिऊ लागलो तर काय होईल ? याचे साधे उत्तर आहे की आपण नेहमीपेक्षा जास्त वेळेला लघवीस जात राहू. पाणी उत्सर्जन करणे हे आपल्या मूत्रपिंडांचे कामच आहे. आपण खूप जास्त पाणी प्यालो तर त्यांना अधिक उत्सर्जन करण्याची राखीव क्षमता दिलेली आहे. अधिक जलपान तर अधिक उत्सर्जन, असा हा साधा तर्क आहे. समजा एखादा माणूस ठरवून दिवसात १० लिटर पाणी प्यायला (केवळ कल्पना करू) तरीही मूत्रपिंडे ते ज्यादा पाणी लघवीवाटे व्यवस्थित उत्सर्जित करतील. हे जे उदाहरण दिले ते निव्वळ ताणलेली कल्पना आहे. जेव्हा शरीरातील पाण्याची स्थिती उत्तम असते तेव्हा मुळात आपल्याला अतिरिक्त तहान लागतच नाही. तरीही जर पाणी ढोसायचेच म्हटले, तर एक क्षण असा येईल की आपल्याला पाणी पाहूनच प्रचंड मळमळ होईल आणि ताबडतोब उलटी सुद्धा होईल. अशाप्रकारे आपल्या तोंड या प्रवेशद्वाराशीच हे नैसर्गिक पाणी नियंत्रण काम करते. त्यातून एखादा माणूस भरमसाट पाणी किती पिऊ शकेल त्याला नैसर्गिक मर्यादा आपसूकच येते. 'जास्ती पाणी पिऊ नका' च्या सल्लागारांचा दुसरा मुद्दा असतो तो रक्तातील सोडीयमच्या संदर्भात. निरोगी अवस्थेत रक्तात सोडियमचे प्रमाण 135 ते 145 युनिट्स या टप्प्यात असते. हे प्रमाण म्हणजे किती पाण्यात किती सोडियम विरघळला आहे याची तुलना असते. समजा पाण्याचे प्रमाण अचानक खूप वाढले, तर मग त्या स्थितीत सोडियमचे तुलनात्मक प्रमाण बरेच कमी होते. त्यातून मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. ही झाली थिअरी. मुळात आपण वर पाहिल्याप्रमाणे, जसे एखादा माणूस जास्त पाणी पिऊ लागतो तसे मूत्रपिंडे अधिक लघवी लघवी उत्सर्जित करीत राहतातच. तसेच संबंधित दोन हार्मोन्सही योग्य ते नियंत्रण करतात. त्यामुळे खूप मोठ्या पाण्यात तेवढाच सोडीयम ही स्थिती वास्तवात उद्भवत नाही. तसे होऊ शकेल ही एक अतिरंजित कल्पना राहते. गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने दुष्परिणाम होत नाहीत हे यावरून स्पष्ट होईल. आता याविरुद्धची बाजूही बघू. 'भरपूर पाणी प्या आणि मूत्रपिंडांना तंदुरुस्त ठेवा' या विधानालाही शास्त्रीय पाया नाही. मूत्रपिंडांची तंदुरुस्ती ही पाण्याव्यतिरिक्त शरीरातील इतर अनेक घटकांवरही अवलंबून आहे. म्हणून निव्वळ भरपूर पाणी पिल्याने मूत्रपिंडाचा आजार होत नाही हेही एक मिथक आहे. जसे की, रोज एक सफरचंद खाल्ल्याने रोगमुक्तता मिळते असे थोडेच आहे ? तद्वत निव्वळ पाण्याच्या मुबलकतेने उत्तम आरोग्य राहील यालाही अर्थ नाही. पाण्याची गरज कोणते घटक ठरवतात ते आपण लेखात पाहिले. जोपर्यंत मूत्रपिंडे तंदुरुस्त आहेत, मेंदूतील तहान नियंत्रण व्यवस्थित काम करतंय आणि संबंधित हॉर्मोन्सही व्यवस्थित स्त्रवत आहेत, तोपर्यंत गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने दुष्परिणाम व्हायचे काही कारण नाही. प्रत्येकाची तहानेची भावना आणि लघवीच्या रंगाचे निरीक्षण यानुसार पाणी पिण्याचे स्वयंनियंत्रण होत असते. त्यासाठी पाण्याच्या ठराविक प्रमाणाची मुद्दामून शिफारस नको. अभ्यासांती आणि सहकारी डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर हे माझे मत बनले आहे. समाजात आरोग्य शास्त्रासंबंधित सर्व तज्ञांचे यावर एकमत नाही असे दिसते. मी माझे मत विचारांती येथे लिहिले आहे. विषय चर्चेस खुला आहे. पुन्हा एकदा महत्त्वाचे : ही चर्चा करताना आपण फक्त तहान नियंत्रण व मूत्रपिंडे निरोगी असलेल्या प्रौढ व्यक्तीचाच विचार करीत आहोत. …………… मूत्रविकारांवरील चर्चेसाठी हा जुना धागा उपलब्ध आहे: https://www.misalpav.com/node/41739 .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 56158 views

🗣 चर्चा (132)
H
hrkorde Wed, 10/06/2021 - 04:45 नवीन
दिवसभरात ५०० मिलिच्या चार बाटल्या ( पाणी बिस्लेरीचे नव्हे, घरातच किण्वा ऑफिसातले टॅप वॉटर) व्यवस्थीत मोजुन संपतात
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 10/06/2021 - 05:43 नवीन
रोज किती पाणी प्यावे? >>> तहान लागली की तहान शमेल इतके पाणी प्यावे , भूक लागली की पोट भरेल इतके जेवण करावे , झोप झाली की रीफ्रेश वाटेल इतकी झोप घ्यावी , इंद्रियाचे आवेग आले की "आहाहा, आता बास" इतके तृप्त वाटेल एवढे सेक्स करावे , बँकेच्या कर्जाचे टेन्शन येणार नाही इतका पगार देणारी नोकरी / स्वतःचा व्यवसाय करावी आजारी पडल्यास बरें वाटेल इतकीच औषधे घ्यावीत आजारी पडूच नये ह्यासाठी जितका व्यायाम करावा लागतो तितकाच नित्यनेमाने करावा. चार लोकांत बावळट दिसणार नाही अन स्वतःलाच अभिमान वाटेल इतकेच शिक्षण घ्यावे आयुष्य खुप सोप्पं आहे - फक्त हा बॅलन्स , हा योग साधता आला पाहिजे , बस्स प्रमाणामध्ये सर्व काही असावे :)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 10/06/2021 - 08:39 नवीन
तुम्ही दुवा दिलेली कविता चांगली आहे. फक्त अतिलांब वाटली; कडवी प्रमाणातच असती तर अधिक छान झाले असते !
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 10/08/2021 - 10:00 नवीन
आणि एक रोज किती पाणी प्यावे ? असले विचार करत बसू नये :D
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 10/06/2021 - 05:46 नवीन
त्यामूळे एकाच मापात सगळ्यांना तोलता येणार नाही हे खरे आहे. प्रत्येकाने आपापले डॉक्टर व्हायचे आणि आपल्याला कोणत्या पदार्थाची किती गरज आहे हे ठरवायचे. पाण्याचेही तसेच आहे. हा मुद्दा पटला आपले लेख नेहमीच माहितीपूर्ण असतात आणि विचार करायला भाग पाडतात. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 10/06/2021 - 05:48 नवीन
आजारी पडल्यास बरें वाटेल इतकीच औषधे घ्यावीत चुकीचा सल्ला. डॉक्टरांनी दिलेला औषधाचा संपूर्ण कोर्स पूरा करावा. अर्धवट कोर्स धोकादायक.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 10/06/2021 - 05:57 नवीन
नेहमी प्रमाणेच क्लिष्ट माहिती सोप्या शब्दात तुम्ही दिली आहे.उत्तम माहिती.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 10/06/2021 - 06:16 नवीन
उत्साही प्रतिसादकांचे आभार आणि सर्वांच्या मतांशी सहमती !
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Wed, 10/06/2021 - 06:33 नवीन
कायप्पा वर जेवणाआधी अमुक वेळेपूर्वी इतके अन जेवणानंतर ठरावीक वेळानंतर इतके पाणी पिलेच पाहिजे असं वाचायला मिळतं. हे सगळं या सोडून मन भरेल इतकं पाणी मी पितोच.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 10/06/2021 - 06:49 नवीन
ज्यांची पचनसंस्थेची कुठलीही तक्रार नाही, त्यांनी जेवणापूर्वी, जेवताना किंवा जेवल्यावर लगेच पाणी प्यावे किंवा पिऊ नये यासंबंधी काहीही शिफारस नाही . मात्र, ज्यांना जठराम्लतेचा आणि अन्न उलट्या दिशेने वर येण्याचा त्रास आहे त्यांनी जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे टाळलेले बरे असते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 10/06/2021 - 06:52 नवीन
डॉक्टर कुमार you are spot on
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 10/06/2021 - 07:21 नवीन
उन्हात भटकले की dehydration होते. मग भरपूर पाणी प्यायल्यावरच समाधान होते. एकदा साडे सात लिटर्स प्यायलो होतो.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 10/06/2021 - 07:32 नवीन
डॉ. सुबोध धन्यवाद. कंजूस बरोबर. अशा प्रसंगी शरीरच आतून भरपूर पाण्याची मागणी करत असते.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 10/06/2021 - 07:31 नवीन
नेहमीप्रमाणेच नेमका आणि माहितीपूर्ण लेख...
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 10/06/2021 - 07:43 नवीन
पाणी. आणि दारू याचे नेमके प्रमाण नाही हेचं खरे..
  • Log in or register to post comments
H
hrkorde Wed, 10/06/2021 - 07:44 नवीन
दारू सोडा
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 10/06/2021 - 08:56 नवीन
पण तरीही व्हिस्कीमधे पाणी घ्यावेच लागते.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 10/06/2021 - 08:58 नवीन
खरंय. सोड्यावर करून करून किती खर्च करणार ? उगाच गॅसने पोट भरून जाते ते वेगळेच.
  • Log in or register to post comments
H
hrkorde Wed, 10/06/2021 - 09:21 नवीन
फक्त बीअर पितो वर्षातून 1 किंवा 2 दा फक्त
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 10/06/2021 - 09:22 नवीन
...
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 10/06/2021 - 10:09 नवीन
बाकी… पाण्याच्या या धाग्यावरील रंगीत पाण्याची उपचर्चा रंगली आहे खरी :)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 10/08/2021 - 14:12 नवीन
उत्तम मुद्दा. वेगळा चर्चाधागा निघण्याची गरज.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Wed, 10/06/2021 - 07:52 नवीन
छान लेख डॉक्टर. ह्या विषयावर कायप्पा विद्वानांनी वात आणलाय :-) खूप पाणी प्या ते जास्त पाणी मुळीच पिऊ नका अशी फुल रेंज आहे. स्वतःचे पाणी पिण्याचे प्रमाण पूर्ण वर्षभर साधारण सारखेच असते माझे. मला हिवाळ्यातही एवढी तहान का लागते असे प्रश्न विचारले जातात :-)
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Wed, 10/06/2021 - 08:00 नवीन
उत्तम माहितीपूर्ण लेख ... तहान व भुकेच्या बाबतीत शरीर आपल्याला नेहमीच संदेश देत असते ... तो ऎकणेच श्रेयस्कर
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 10/06/2021 - 08:09 नवीन
व्यक्तिगत अनुभव आणि पूरक माहिती दिल्याबद्दल वरील सर्व प्रतिसादकांचे आभार ! सारांश : आपल्या शरीराचे 'ऐका '; समाजमाध्यमांवरील अनधिकृत सल्लागारांचे अजिबात नको !!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 10/06/2021 - 08:33 नवीन
मला गाउटसाठी तहान फारशी नसली तरी नेहमीच पाणी थोडे थोडे पीत राहा असा सल्ला डॉ नी दिला आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 10/06/2021 - 08:38 नवीन
सकाळी सकाळी लिंबू पाणी प्यायचे.हा प्रकार पण समाज मध्यामवरील माहिती मुळेच समाजात पसरला आहे.
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Wed, 10/06/2021 - 12:10 नवीन
सकाळी सकाळी लिंबू पाणी प्यायचे.हा प्रकार पण समाज मध्यामवरील माहिती मुळेच समाजात पसरला आहे.
.. खर आहे.. लिम्बूपाणी चान्गल पण कोणतीही गोष्ट अती नको..समाज माध्यमान्वरच सगळच खर नसते..
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 10/06/2021 - 13:15 नवीन
पाणी पिण्याबद्दल इतरही काही मुद्दे चर्चिले जातात जसे की १) उभे राहून पाणी पिवू नये, बसूनच प्यावे. उभ्याने पाणी पिल्यास पुढे गुडघेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. अर्थात बसून शांतपणे पाणी पिणे चांगलेच आणि त्यात काही तोटाही नाही पण उभ्याने पाणी पिण्याचा गुडघेदुखीशी संबंध कितपत खरा आहे ? २) अगदी थोडे थोडे पाणि पिवू नये एका वेळी बरेच (किमान २००-४०० मिली वगैरे) पाणी प्यावे. यात कितपत तथ्य आहे. अर्थात एखाद्या तासाच्या मिटींगकरिता मिटींगरुममध्ये येताना बाटली सोबत आणून दर पाच दहा मिनटांनी बाटली तोंडाला लावणारी काही मंडळी बघून मला वीट येतो. ३) काही लोक तोंडात पाणी चूळ भरताना घुळवावे तसे घुळवून मग पितात कारण त्यांच्या मते त्याचा आरोग्याला काही फायदा असतो (समोर बसलेल्याला हा फार इरिटेटींग प्रकार वाटू शकतो) माझे एक निरीक्षण आहे - जेवणानंतर पान खाल्ल्याने तहान वाढते. त्यामुळे कधी जास्त जेवण झाल्याने फारसे पाणी पिण्याची इच्छा होत नाही अशी समस्या असेल तर हा प्रयोग करुन बघायला हरकत नाही
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 10/06/2021 - 15:27 नवीन
तर्कवादी चांगले प्रश्न. दोन टप्प्यात उत्तरे देतो. १. पाणी उभ्याने न पिता बसून प्यावे >> खाणे पिणे बसून केले असता चित्तवृत्ती स्थिर असते हा महत्वाचा मुद्दा. उभ्याने अथवा चालत्या वाहनात 'वरून ' पाणी पिल्यास ठसक्याची शक्यता वाढते. मात्र याचा गुडघेदुखीची संबंध असल्याचे आधुनिक वैद्यकीय संशोधन संदर्भ माझ्या वाचनात नाहीत. २. घोटाघोटाने पाणी पिणे काय किंवा दोन भांडी भरून एकदम पिणे काय, हा सवयीचा किंवा आवडीचा भाग आहे. याचा आरोग्याशी संबंध नाही.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 10/06/2021 - 15:36 नवीन
३. तोंडात पाणी घुळवून पिणे >>> आपल्या तोंडात उपयुक्त व घातक अशा दोन्ही सूक्ष्मजंतूंचा सहवास (सिम्बायोसिस) असतो. अशाप्रकारे पाणी पिल्याने तोंडातील उपयुक्त सूक्ष्मजीव शरीरातच राहतात. त्यांचे राहणे हे मौखिक आरोग्यासाठी काही प्रमाणात फायदेशीर आहे. अर्थात हा विषय गहन असून त्यावर दंतवैद्याने भाष्य केल्यास बरे. ४. विड्याचे पानात जे विशिष्ट अल्कलॉइड असते त्यामुळे तोंडाला कोरड पडते. याबाबतीत माझा दुहेरी अनुभव सांगतो: * सणाच्या दिवशी आपण घरी जे कामचलाऊ पान बनवतो त्याने कोरड जास्त पडते. * मात्र चांगल्या टपरीवरील शिस्तीत बनवलेले मसाला पान खाल्ल्यास तुलनेने कोरड कमी राहते. याचे कारण कदाचित, ते लोक कात, चुना व इतर जे काही घटक मुबलकपणे वापरतात त्यामध्ये असावे. मात्र याचा माझा पुरेसा अभ्यास नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 10/06/2021 - 15:30 नवीन
उभ्याने पाणी पिण्याचा आणि गुढघेदुखीचा काहीही संबंध नाही. आपण प्यायलेले पाणी जठरात उतरते आणि तेथून आतड्यात जेथे ते संपूर्णपणे रक्तात शोषले जाते तेंव्हा हे पाणी गुढघ्यापर्यंत पोचणे शक्य नाही. कुणी तारि गुढघ्यात मेंदू असलेल्याने हा गैरसमज पसरवलेला असावा. एकदम आणि हळूहळू पाही पिण्याने काय फरक पडेल? जंगलात प्राणी दिवसात एकच वेळेस पाणी पितात आणि बहुतेक प्राणी उभ्या नेच पाणी पितात त्यांचं काही नुकसान झाल्याचा किंवा गुढघेदुखी झाल्याचा कोणताही पुरावा नाही. काही लोक तोंडात पाणी चूळ भरताना घुळवावे तसे घुळवून मग पितात. त्याने दातात अडकलेले कण साफ होतात एवढं सोडलं तर फार काही फायदा नाही. मुळात काहीही खाल्लं कि तोंड भरपूर पाण्याने धुवावे म्हणजे दातातील अन्नकण अडकून राहणार नाहीत. जेवणानंतर पान खाल्ल्याने तहान वाढते. पानात चुना आणि काथ/ कात हे पदार्थ astringent सारखे आहेत. त्यामुळे आपले तोंड आणि घसा कोरडा पडतो आणि आपल्याला तहान लागल्याची संप्रेरणा( sensation) होते. मग आपण पान खाण्याच्या अगोदर चार ग्लास पाणी प्यायला असलात तरी. अशीच भावना आपल्याला बेसनाचा लाडू खाल्ल्याने होते कारण बेसन तोंडातील लाळ आणि तेलकट पदार्थ शोषून घेते आणि तोंड कोरडे पडते.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 10/06/2021 - 13:29 नवीन
चांगला लेख आणि उपयुक्त माहिती मिळाली.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 10/06/2021 - 13:53 नवीन
माझे एक निरीक्षण आहे - जेवणानंतर पान खाल्ल्याने तहान वाढते. त्यामुळे कधी जास्त जेवण झाल्याने फारसे पाणी पिण्याची इच्छा होत नाही अशी समस्या असेल तर हा प्रयोग करुन बघायला हरकत नाही
याला आम्ही ऑक्सिजन युक्त पाणी असे गमतीने म्हणतो... तुम्ही बराच वेळ पाणी न पिता पान अथवा विशेषतः विमल गुटखा खाल्ला व नंतर पाणी पिले की त्या पाण्याची चव अन् तृप्ती एकदम भंनाट लागते अगदी सर्व गात्रे तृप्त होऊन जातात.. त्यावेळी पाणी अक्षरशः अधाशासारखे घटाघटा व शोषून पिले जाते जणू काही एखाद्या वंपायरने रक्त प्राशन करावे असे...
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 10/06/2021 - 15:15 नवीन
जणू काही एखाद्या वंपायरने रक्त प्राशन करावे असे.
अरे बापरे...आता पुढच्या वेळी पान खावून पाणी पिताना वॅम्पायर असल्याचा भास होईल
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Wed, 10/06/2021 - 19:20 नवीन
आवळा खल्यावर प्यालेले पाणी पण गोड लागते व तृप्ती देणारे असते.
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Wed, 10/06/2021 - 13:54 नवीन
खूप सुंदर माहिती! दोन प्रश्न 1. आधुनिक व्यायाम पद्धति -बॉडी बिल्डिंग मध्ये पाणी कमी पिण्याचा सल्ला दिला जातो हे खरे आहे का? असेल तर का? 2. सकाळी तोंड न धुता पाणी पिण्याची सुद्धा पध्दत आहे, त्याचा काही फायदा आहे का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 10/06/2021 - 15:43 नवीन
आधुनिक व्यायाम पद्धति -बॉडी बिल्डिंग मध्ये पाणी कमी पिण्याचा सल्ला दिला जातो असा सल्ला दिला जात असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे. उलट व्यायामानंतर शरीराला घामावाटे बाहेर पडलेल्या पाण्याची भरपाई करणे आवश्यक आहे तेंव्हा भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. सकाळी तोंड न धुता पाणी पिण्याची सुद्धा पध्दत आहे सकाळी तोंड न धुता पाणी पिण्याने रात्रभरात आपल्या तोंडात वाढलेले जिवाणू आणि दातात अडकलेले आणि रात्रभरात सडलेले अन्नकण पोटात जातील तेंव्हा तोंड न धुता पाणीच काय पण चहा पिणे हे आरोग्याला अजिबात हितकारी नाही. रात्री झोपल्यावर आपल्या तोंडात लाळनिर्मिती बरीच कमी होते.कारण झोपेत आपले शरीराचे सगळे स्नायू शिथिल पडतात त्यामुळे लाळ घशात जाऊन ठसका लागण्याचे प्रमाण नगण्य असते. काही जणांना थोडी जास्त लाळ निर्माण झाल्याने तोंडातून लाळ बाहेर पडून उशी ओली होऊ शकते.पण तरीही हे प्रमाण दिवस निर्माण होणाऱ्या लाळेपेक्षा खूप कमी असते. लाळेत जंतुघ्न पदार्थ असल्याने आणि सतत तयार होणाऱ्या लाळेबरोबर आपले तोंड स्वच्छ राहते त्यामुळे तोंडात सहसा जिवाणू आणि बुरशीची अनिर्बंध वाढ होऊ शकत नाही. झोपेत सात तास एकंदर तोंडात लाळ कमी झाल्याने तोंडात जिवाणूंची वाढ जास्त होते ते जिवाणू पोटात ढकलणे कितपत योग्य आहे. तोंड न धुता "बेड टी घेणे" हि इंग्रजी पद्धत अत्यंत चुकीची आहे.
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Tue, 10/12/2021 - 08:13 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 10/06/2021 - 16:04 नवीन
व्यायामशाळेतील स्नायूवर्धक व्यायाम आणि पाणी कमी पिणे यांचा संबंध नाही. परंतु, मॅरेथॉन सारख्या शर्यतपटुंनी किती आणि कशा पद्धतीने पाणी प्यायचे याचे शास्त्रशुद्ध अभ्यास आहेत. काही क्रीडावैद्यकीय संदर्भ चाळले असता ते वाचायला मिळतात. अशा शर्यतपटुंनी शर्यतीपूर्वी, शर्यतीदरम्यान आणि शर्यतीनंतर कसे पाणी प्यायचे याच्या सूचना तज्ञांकडून दिल्या जातात. या खेळाडूंनी एकदम गटागटा पाणी पिऊन चालत नाही. त्याऐवजी शर्यतीदरम्यान दर वीस मिनिटांनी कपभर पाणी पिणे यासारख्या सूचना त्यांना दिल्या जातात. अर्थात हा प्रांत क्रीडावैद्यक तज्ञांचा आहे.
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Tue, 10/12/2021 - 08:14 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 10/06/2021 - 14:05 नवीन
व्यक्तिगत अनुभव आणि पूरक माहिती दिल्याबद्दल वरील सर्व प्रतिसादकांचे आभार ! वरील काही प्रतिसादांमध्ये ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत त्यांचे सवडीने व यथाशक्ति निरसन करतो.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 10/06/2021 - 18:19 नवीन
चांगला लेख आणि रोचक चर्चा! खाण्या-पिण्याच्या काही चांगल्या(?) सवयींमुळे आधी डिहायड्रेशनचा त्रास बरेचवेळा व्हायचा पण नंतर तद्न्य मंडळींनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण आणि सोबतच्या फराळी पदार्थांमध्ये योग्य ते बदल केल्यावर तो त्रास बंद झाला 😀
  • Log in or register to post comments
स
सुचिता१ Wed, 10/06/2021 - 18:34 नवीन
आपले लेख नेहमीच माहितीपूर्ण असतात सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी पिणे ही पण अंधश्रद्धा च आहे का यावर माहिती द्यावी
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 10/07/2021 - 01:05 नवीन
लिंबामध्ये क जीवनसत्व आहे. त्याचा शरीराला कधीही पिले तर फायदा होईल. परंतु लिंबू हे आम्लधर्मी सुद्धा आहे. सकाळी उठल्याबरोबर त्याचे पाणी पिणे याचा मला तरी काही विशेष फायदा दिसत नाही. उलट, ज्यांना जठरातील आम्लतेचा त्रास आहे त्यांनी ते रिकाम्या पोटी पिऊ नये असे माझे मत आहे. सकाळी उठल्यानंतर साधे पाणी पिणे पुरेसे आहे.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय गुरुवार, 10/07/2021 - 03:53 नवीन
दररोज सकाळी लिंबूपाणी पिल्यास लिंबातील आम्लामुळे टूथ एनॅमलची हानी होते असे ऐकलंय, हे खरे आहे का?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 10/07/2021 - 04:56 नवीन
चामुंडराय तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे. मी स्वतः या गटातच मोडतो आणि त्यासंदर्भात माझ्या दंत वैद्याने मला सल्ला दिलेला आहे की शुद्ध स्वरूपातील लिंबू थेट दातांना लागू देऊ नका. आता यातले काही बारकावे बघू. तारुण्यात दात बळकट असतात आणि जठराच्या आम्लतेचा काही त्रास नसेल तर मग लिंबू पाणी पिल्याने दातांवर तसा परिणाम होणार नाही. अर्थात ते पिल्यानंतर साध्या पाण्याने चूळ भरणे केव्हाही उत्तम. ज्येष्ठ वयामध्ये एकंदरीत दातांची झीज चालू होते. त्याच्या जोडीला आम्लतेचा त्रास असेल तर जठरातील आम्ल काही प्रमाणात वर येऊन दातांच्या एनामलची झीज वाढवते. अशा व्यक्तीने जर लिंबू वारंवार थेट दातांना लागू दिले तर मग त्या झिजेमध्ये भर पडत राहते. मी अशी काळजी घेतो : जेवणात मी रसयुक्त भाजी किंवा आमटीमध्ये लिंबू पिळतो. अशा तऱ्हेने ते माझ्या पोटात जाते.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर गुरुवार, 10/07/2021 - 03:00 नवीन
झाले. छान नीटनेटका सोप्या भाषेतला लेख. अवघड विषयावर आपण इतक्या सोप्या भाषेत लिहिले आहे त्याबद्दल सलाम. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ल
लई भारी गुरुवार, 10/07/2021 - 05:33 नवीन
नेहमीप्रमाणेच चांगला लेख आणि प्रतिसादात चर्चिलेले मुद्दे एकदम उपयुक्त!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 10/07/2021 - 06:01 नवीन
माझा एक मित्र तहान लागली नसली तरी विनाकारण पाणी पीत असे. कार्यालयीन अंदाजे ९ तासात जवळपास ४ लिटर व घरचे धरुन ७-८ लिटर रोजचे. एके दिवशी काहीतरी त्रास झाला व ३ दिवस अॅडमिट करावे लागले. अति पाणी पिल्याने शरीरातिल सोडियम कमी झाले होते असे डाॅक्टर म्हणाले. मग इथे मूत्रपिंडानी अतिरिक्त पाणी बाहेर का टाकले नसावे?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा