इंधन - स्वस्त / महाग
तर ही गोष्ट त्या वेळची ज्या वेळी वेळी स्कूटर साठी दहा पंधरा वर्षे थांबावं लागायचं, गॅससाठी दहा पंधरा वर्षे थांबावं लागायचं फोन साठी पंधरा-वीस वर्षे थांबावं लागायचं, तरीपण आपण कसे महान याचा रशियन स्टाइल प्रपोगंडा चालायचा त्यावेळी वीज वाचवा पाणी वाचवा आणि इंधन वाचवा अशा आमच्यावर संस्कार केले जात होते.
तसं त्यात काही चूक नाही आणि अजूनही आपल्याला हेच सांगितले जाते. इंधन वाचवा हे सांगण्याचे मुख्य कारण म्हणजे इंधन भारतात तयार होत नाही, भारत ते आयात करतो, आयात करण्यासाठी भारताला परकीय चलन द्यावे लागते आणि भारतामध्ये परकीय चलन त्या काळात नव्हते. त्यामुळे इंधन वाचणं म्हणजे देशभक्ती एक प्रकारे सांगितले जात होते.
सध्या इंधनाचे भाव शंभर रुपयाच्या वरती गेल्यामुळे परत एकदा तो हॉट टॉपिक झालेला आहे. मिसळपाव वरती पण गेल्या दोन चार महिन्यात या विषयावर बरेच धागे येऊन गेले. यातील मुख्य रोख हा सरकार प्रचंड कर लावून इंधनाच्या किमती कशा वाढीव ठेवते याच्यावरती होता, जे काही प्रमाणात खरंही आहे. पण ते अर्थशास्त्राच्या दृष्टीने बघावे म्हणून हा धागा.
कृपया कोणत्याही प्रकारे राजकीय चर्चा न करता फक्त अर्थ आणि मानस शास्त्राच्या दृष्टीने आपण या कडे बघायचा प्रयत्न करूया. कारण सरकार कोणतंही असलं तरी फार काही वेगळं होणार नाही.
तर
प्रचंड करांचे फायदे
- सरकारला शाश्वत आणि भरपूर उत्पन्न मिळतं
- अधिकच्या किमती लोकांना कमी इंधन वापरण्यास प्रोत्साहीत करतात (अतिश्रीमंत सोडले तर मध्यम वर्गावर नक्कीच थोडा परिणाम होतो. जिथे गरज असेल तिथेच वाहने वापरली जातात)
- परकीय चलन वाजते आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम कमी होतो.
- प्रवासासाठी स्वस्त पर्याय शोधण्यासाठी चांगले कारण मिळते जसे सध्या इथेनॉल किंवा इलेक्ट्रिक वाहनांसाठी संशोधन आणि प्रयत्न चालू आहेत.
- एखाद्या प्रगत अर्थव्यवस्थेत वाहतूक खर्च जीडीपीच्या आठ टक्के हा उत्तम मानला जातो. भारतात तो सुमारे १४ % आहे. महाग इंधनामुळे वाहतुकीचा खर्च प्रचंड वाढतो त्यामुळे भारतीय उत्पादने ही आंतरराष्ट्रीय व्यापारात महाग ठरतात.
- स्पर्धात्मकता कमी झाल्याने काही क्षेत्रांतून आपण कायमचे बाहेर फेकले जातो आणि मग इतरांकडून त्याच गोष्टी घेताना आपल्याला वाढीव किंमती वरती घ्याव्या लागतात
- वाहतूक खर्च कमी झाल्याने किमती कमी होईल होतील त्यामुळे आपली उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारात योग्य पद्धतीने स्पर्धा करू शकतील. इंधन स्वस्त झाल्याने त्याचा वापरही वाढेल परंतु आपण अधिक निर्यात केल्याने मिळणाऱ्या परकीय चलनामुळे परकीय चलन गंगाजळीवरील दबाव बहुदा फार वाढणार नाही.
- महागाई वाढली नाही तर सरकारची लोकप्रियता वाढेल आणि सरकारी तिजोरीवर पगार किंवा इतर पद्धतीने येणारा बोजा ही कमी राहील.
- निर्यात वाढेल तशी अर्थव्यवस्था वाढीची गतीही वाढेल आणि त्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत मिळेल. परत याचा फायदा सरकारची लोकप्रियता वाढण्यास होईल.
- सरकारी उत्पन्न कमी होईल
- कमी किमतीमुळे इंधन वापर अति प्रचंड प्रमाणात वाढला तर त्याचा आंतरराष्ट्रीय इंधनाच्या किमती वरती पण परिणाम होईल ज्यामुळे जागतिक मंदी सारख्या संकटांना सामोरे जावे लागू शकते
- इंधनाचे नवीन पर्याय शोधण्यास प्रोत्साहन मिळणार नाही
- मध्यपूर्वेतील देशावरील अवलंबित्व वाढेल
धाग्याचा काश्मीर होऊ नये म्हणून विषयासंबंधी प्रतिसाद दिल्याबद्दल आपले आणि राघव यांचे आभार. धन्यवादधाग्याचा काश्मीर ही संकल्पना काय आहे हे मला नेमके माहित नाही .. पण असो. राजकीय चर्चा कितीही केली तरी ती संपणार नाहीच म्हणून चर्चेला वस्तुनिष्ठ व अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून पुढे नेण्याकरिता माझा प्रयत्न आहे. अर्थशास्त्र हा मुळात काहीसा गुंतागुंतीचा तरीही अत्यंत रंजक विषय आहे. बरोबर... भाजी इतका प्रवास करणार नाहीच. तर वॉशिंगमशिनची किंमत ६०*६ = ३६० रुपयांनी वाढली (४०७ च्या १२ रु प्रति किलो प्रति १०० किमी मधले ६ रु ही वाढ धरली) तरी वॉशिंग मशिनही दीर्घकाळ (मध्यमवर्गीय मानसिकते नुसार किमान १० वर्षे तरी) वापरली जात असल्याने अशा वस्तूच्या किमतीतली ३६० रु च्या वाढीची झळ तितकीशी नसावी. गव्हासारखे धान्य जे सहसा म.प्र/ पंजाबातून देशभर जात असावे त्याची वाहतूक दीर्घ पल्ल्याची होत असावी (मी जाणकार नाही.. जाणकारांनी दुरुस्ती सुचवावी). पण संपूर्ण प्रवास रस्त्यानेच करेल असेही नाही. यात रेल्वेचा प्रवास असेल. मोठ्या रस्त्यांवरचा प्रवास २५१६ सारख्या ट्रकमधून होईल तर शहरांतला प्रवास ४०७ वा इतर छोट्या वाहनांतून . प्रत्येक प्रवासातला इंधन खर्च वेगळा असेल. पण हा झाला इंधन दरवाढीचा प्रत्यक्ष परिणाम जो गव्हाच्या किमतीवर परिणाम करेल. पण अनेक अप्रत्यक्ष परिणाम असतील जे गव्हाच्या किमतीवर परिणाम करु शकतील. अप्रत्यक्ष परिणाम - उदा . गव्हाचे बियाणे, खत यांचीही वाहतूक होते. इंधन दरवाढीमुळे त्यांच्या किमती वाढू शकतात - शेतात ट्रॅक्टर चालतो. त्याचा खर्च वाढेल याहूनही वेगळ्या पातळीचे परिणाम बघायला मिळू शकतील .. यांस अर्थशास्त्रीय भाषेत काय म्हणतात माहित नाही आणि मी याबद्दल वाचले नाही पण हे माझ्या मनात आलेले विचार आहे (कधीतरी आयुष्यात निवांतपणा मिळाल्यावर अर्थशास्त्र अधिक खोलवर शिकायचे आहे.. पण सध्या जमेल तसा विचार करत रहातो.. असो). ते परिणाम असे की इंधन दरवाढीमुळे गव्हाची (व तत्सम धान्य व जीवनावश्यक वस्तुंची) किंमत काही प्रमाणात वाढली की "महागाई वाढली/ वाढते आहे" हा विचार /समज प्रबळ ठरु लागेल. विविध रोजगारातील (शेत मजूर , खत व्यावसायिकाकडचे कर्मचारी, ट्रकचालक , ट्रक दुरुस्त करणारे सर्विस सेंटरमधले कर्मचारी, शहरातले गोडाऊनमधील कर्मचारी, धान्य व्यापार्यांकडील कर्मचारी , हमाल, किराणा दुकानातील नोकर, दुकानदार ई ) अनेक लोकांना आपले उत्पन्न वाढावे असे वाटू लागेल. कामगारांच्या रेट्यामुळे काहीप्रमाणात त्यांचे पगार वाढवले जातील , ते पगार वाढले की त्यां रोजगाराकडून पुरवण्यात येणार्या सेवा वा उत्पादनाचे भाव वाढू शकतील आणि त्यांचा परिणाम पुन्हा गव्हाच्या किमतीत वाढ होण्यात होवू शकते. एका अर्थाने मी म्हणेन की महागाई वाढते मग महागाई वाढ्ण्याची भिती निर्माण होते व या भितीमुळे आणि महागाईच्या दोन पावले पुढे राहण्याच्या ओढीमुळे अधिकच महागाई वाढते. पण ज्यांना वाढत्या महागाई बरोबर आपले उत्पन्न लगेच वाढवता येत नाही अशा वर्गातील लोकांना महागाईची झळ अधिक पोहोचते. उदा तुमच्या घरात काम करणारी बाई. तुम्ही घरकामाकरिता तिला समजा १००० रुपये महिना देत असाल तर वाढलेल्या महागाईमुळे तिला ११०० रुपये महिना हवे असू शकतील पण यावेळी "महागाई किती वाढली आहे .. आता कुठे तुला पगार वाढ देवू ?" असा बिनतोड युक्तिवाद करत मध्यमवर्गीय मालकीण ही पगारवाढ लांबणीवर टाकेल. झालेच तर वाढत्या महागाईमुळे साठेबाजी, ग्राहकांकडून अतिरिक्त खरेदी असे प्रकार होवू शकतील ज्यामुळे आणखी महागाई वाढू शकते. माझ्यामते कोणत्याही उत्पादनाची किंमत वाढायला किंवा एकंदरीत महागाई असण्याला (कॉस्ट ऑफ लिविंग हळूहळू वाढत जाणे) हरकत नाही. पण ह्या किमती इतक्या झपाट्यानेही वाढू नये की लोकांच्या मनात महागाईची भिती , भविष्याबद्दलची अनिश्चततेची भावना खूप मोठी व्हावी. असो.. प्रतिसाद बराच मोठा आणि विस्कळीत झाला आहे. माझा अगदी शास्त्रोक्त अभ्यास नाही पण मला सुचतील ते मुद्दे मी लिहीले आहेत. तरी इतरांनी भर घालावी / व गरजेप्रमाणे दुरुस्ती सुचवावी. धन्यवाद.