Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

लष्कराच्या भाकऱ्या......

ह
हेमंतकुमार
Tue, 06/30/2020 - 08:55
🗣 179 प्रतिसाद
समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात. हा लघुलेख साहित्यक्षेत्रातील आणि वृत्तमाध्यमांतील अशा काही अनुभवांचा आहे. साहित्याच्या प्रांतात लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक आणि लेखक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो. ........... मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते. मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो. यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला. वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले: १. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत? २. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का? ३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा ! ....... असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे. ................................... आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव. एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये बुडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात. खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. ते वाचून जरा अस्वस्थ झालो आणि मग त्यांना ईमेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले. आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव. सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘करोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/ ) हाच आहे. मग या वृत्तपत्रास ईमेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे. गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ. बस ... आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो .फोनबिन जाऊदे मरूदे, हे धोरण. लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण..... जोपर्यंत आपला हात दुखत नाही तोपर्यंतच ! ..........................................................................................

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 123052 views

🗣 चर्चा (179)
ह
हेमंतकुमार गुरुवार, 07/02/2020 - 14:45 नवीन
म क, तुमचे विश्लेषण आवडले. पण
“ त्यामुळे इंग्लिश शब्दकोषाला प्रमाण बनवून मराठीतला उच्चार चूक वा बरोबर ठरवणे तितकेसे योग्य होणार नाही “
हा मुद्दा नाही पटला. याच धर्तीवर असे म्हणतो. जर एखाद्या मराठी शब्दाचा उच्चार पाश्चिमात्य किंवा पौर्वात्य माणसाने मराठी शिकताना करायचे ठरविल्यास त्यासाठी मराठी शब्दकोश प्रमाण मानावा की नाही? असो. या मुद्द्यावर मी थांबतो. … माध्यमांतील मोठ्या चुकांवर लक्ष केंद्रित करूयात. अन्यथा छोटा मुद्दाच फार रेटला जातो. तुमच्या मताबद्दल आदर आहेच. :))
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 07/02/2020 - 15:15 नवीन
जर एखाद्या मराठी शब्दाचा उच्चार पाश्चिमात्य किंवा पौर्वात्य माणसाने मराठी शिकताना करायचे ठरविल्यास त्यासाठी मराठी शब्दकोश प्रमाण मानावा की नाही?
यातलं मराठी शिकताना हे महत्वाचं. मराठी शिकणे बोलणे हे वेगळं आणि मराठीतील शब्द इंग्लिश संभाषणात वापरणे हे वेगळं. इंग्लिश माणूस मराठी शिकत/बोलत असेल तर त्याने "बाळासाहेब" असंच म्हणायला हवं. पण इंग्लिशमध्ये तो "बालासाहेब" असं म्हणेल. (हेच मी जपान आणि जापान या उदाहरणाने दाखवलं होतं) कोरोना वा करोना शब्द मराठी शब्दकोषात कसा लिहिला गेलाय हे महत्वाचं. बघा पटतंय का ?
असो. या मुद्द्यावर मी थांबतो.
अहो असं का ? आपण रेटत नाही आहोत, विश्लेषण होतंय, उहापोह होतोय.. मला वाटतं मुद्दा छोटा असला तरी आपली चर्चा सकारात्मक पद्धतीने होतेय. आपण गुद्द्यावर आलो नाही ना :)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 07/02/2020 - 15:42 नवीन
म क १.अगदी नक्कीच. त्याबद्दल प्रश्नच नाही. फक्त लेखाचा मुख्य उद्देश ‘घोड्चुकांबाबत माध्यमांची बेफिकिरी’ हा आहे. करोना हे तळातील उदा. सामान्य आहे. २. दुसरा मुद्दा. तुम्ही जसे छान विश्लेषण केलेत,तसेच जरा का संबंधित वृत्तपत्राच्या अधिकाऱ्याने मला पत्रोत्तर देऊन ‘ते आमचे भाषिक स्वातंत्र्य आहे”, एवढे जरी म्हटले असते तर मी हा मुद्दा इथे लिहीलाही नसता. ३. सामान्य वाचकाची संपादकांकडून दखल न घेणे, या मुद्द्यावर अधिक चर्चा व्हावी , हा लेखाचा उद्देश आहे. ....... २०-२१ मे च्या सुमारास याच ‘दर्जेदार’ इ-दैनिकाने डॉ हर्षवर्धनना केंद्रीय गृहमंत्री करून टाकले होते ! ( मी वाखुसा चा आळस केलाय, आता ते मिळत नाही). अशा चुकांवर अधिक चर्चा व्हावी.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/02/2020 - 18:19 नवीन
मराठी कथालेखक मुद्दा पटला.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 07/02/2020 - 20:10 नवीन
धन्यवाद सर
  • Log in or register to post comments
प
पी महेश००७ गुरुवार, 03/24/2022 - 12:12 नवीन
इंग्रजी शब्दांच्या उच्चाराचा घोळ अनेकदा येतो. आता Kieren हा शब्द ‘किरेन’ असा उच्चारायचा की ‘कायरेन’ असा उच्चारायचा? विंडीजचा क्रिकेटपटू पोलार्डचंच उदाहरण घ्या.. kieron हा शब्द काही ठिकाणी ‘कायरन’ असा आहे. मग तो किरन असाही होऊ शकतो आणि किरोन असाही... उच्चाराचंच काय घेऊन बसलात... उकार, वेलांट्यांबाबतही बरेच घोळ आहेत. डबल ओ (oo) असेल तर पहिली उकार द्यायची की दुसरी.. डबल ई (ee) असेल तर दुसरी वेलांटी द्यायची.. मग ‘ie’ एकामागोमाग आले तर कोणती वेलांटी द्यायची?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 07/02/2020 - 12:27 नवीन
लोकसत्ता, म टा , अक्षरनामा (सर्व इ-अंक) पहिल्या दिवसापासून ‘करोना’ असेच छापत आहेत.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 07/02/2020 - 12:55 नवीन
इंग्लिश मध्ये स्पेलिंगनुसार उच्चार बरेचदा नसतात याबद्दल बर्नार्ड Shaw यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी यासंदर्भात केलेला एक विनोद जगप्रसिद्ध आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी लिहितो : ghoti याचा उच्चार त्यांनी ‘फिश’ असा केला ! कारण........ • gh = फ ( as in enough ) • o = इ ( …. Women) • ti = श ( .... nation ).
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/03/2020 - 06:50 नवीन
चांगल्या चर्चेबद्दल आपणा सर्वांचे आभार. वृत्तपत्र छापतानाची एक घोडचूक आणि त्यामुळे संबंधिताची गेलेली नोकरी, यासंबंधी एक रोचक किस्सा पुढच्या प्रतिसादात लिहितो. ह मो मराठे यांनी तो त्यांच्या स्वतःबद्दलच त्यांच्या पुस्तकात लिहिलेला आहे. आता माझ्याजवळ ते पुस्तक नसल्याने त्या घटनेतील राजकीय व्यक्तीचे नाव मात्र लिहीत नाही.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/03/2020 - 06:53 नवीन
सुमारे तीस ते पस्तीस वर्षांपूर्वीचा काळ. तेव्हा हमो सकाळी एक नोकरी, संध्याकाळी अभ्यासक्रम आणि आर्थिक गरज म्हणून रात्रपाळीची एक अर्धवेळ नोकरी एका दैनिकात करत होते. रात्रीची नोकरी अकरा वाजता सुरू होई. एके दिवशी ते खूप त्रासलेले आणि दमलेले होते. तरीही रात्रपाळीस गेले होते. त्यादिवशी एक महत्वाची बातमी कार्यालयात येऊन धडकली होती. ती एका राष्ट्रीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्याबद्दल होती. त्यांना पेप्टिक अल्सरचा बराच मोठा त्रास झाला होता. त्यामुळे रुग्णालयात ठेवले होते. हमोना बातमीचा मथळा लिहायचा होता : “ अमुक-तमुक यांना अल्सरचा आजार”. तेव्हा हमो बरेच पेंगुळलेले होते आणि ते तपशीलात असे लिहून गेले : “***** यांना कॅन्सरचा आजार” ! मुद्रितशोधन न करता हमो घरी निघून गेले. आता लक्षात घ्या. त्याकाळी कर्करोगाचे उपचार आजच्या इतके प्रभावी नव्हते. त्यामुळे एकदा कर्करोग झाला की ‘आता आज ना उद्या सगळे संपले’, हीच जनभावना होती. झाले, सकाळी ही बातमी छापून अंक वितरित झाले. दुसऱ्या दिवशीच त्या संपादकाचे धाबे दणाणले. संबंधित पक्षाकडून असंख्य फोन त्यांना येत राहिले त्यांनी कपाळावर हात मारला आणि हमोना बोलावणे धाडले. हमो तिथे गेल्यावर त्यांनी छापलेला अंक त्यांच्या समोर धरला आणि सांगितले की आता याचे प्रायश्‍चित्त तुम्हीच घ्यावे. क्षणाचाही विलंब न लावता हमोनी त्या नोकरीचा राजीनामा दिला होता.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 07/03/2020 - 07:42 नवीन
बापरे. हमोंची नोकरी गेली व त्या राजकारण्याचे आयुष्य वाढले की काय? ;)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 07/03/2020 - 08:22 नवीन
पण एकाच्या चुकीच्या मृत्यू लेखाने नोबेलसारखे अवार्ड ही सुरू झाले.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 07/03/2020 - 17:49 नवीन
हमो माझे आवडते लेखक ! अगदी रत्नाकर मतकरी व अरूण साधू यान्च्या प्रमाणेच !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/03/2020 - 07:49 नवीन
आयुष्य तर वाढलेच..... आणि कालांतराने ते देशाचे सर्वोच्च नेता झाले !! ;)
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Fri, 07/03/2020 - 08:03 नवीन
ह.मो. मराठेंची ’काळेशार पाणी’ ही कादंबरी आधी ‘साधना’त प्रकाशित झाली होती. नंतर ती पुस्तकरूपात प्रकाशित झाली. ’काळेशार पाणी’मधले काही प्रसंग वासना चाळवणारे, अश्लील आहेत, असा आरोप व्हायला लागला. प्रसिद्ध साहित्यिक ना. सी. फडके यांनी या कादंबरीला ओंगळ, अलिच्छ आणि अश्लील ठरवून आगपाखड करायला सुरुवात केली. हा सगळा वाद सुरु असताना वाचकांतही 2 गट पडले. तरुणांचा गट हमोंच्या बाजूने आणि म्हाताऱ्यांचा विरुद्ध बाजूने. पुढे हे प्रकरण कोर्टात गेलं. साधनाचे विश्वस्त एस. एम. जोशी यांनी 1973 च्या सुमारास कादंबरीच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटला लढवू, असे जाहीर केले. पुढे महाराष्ट्रात ’पुलोद’ सरकार आले आणि त्यांनी ’काळेशार पाणी’वरचा खटला मागे घेतला.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 07/04/2020 - 05:57 नवीन
विषयाच्या अनुषंगाने ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्रातील एका सदराबद्दल लिहीतो. काही वर्षांपूर्वी मी ते त्यांच्या छापील अंकात पाहिले होते. रोजचा अंक वाचल्यानंतर जर वाचकांना त्यातील चुका - म्हणजे स्पेलिंग, तपशील, व्याकरण किंवा वाक्यरचना- याबद्दल काही सुधारणा सुचवाव्या वाटत असतील, तर त्यासाठी मुभा होती. त्यांच्या रोजच्या अंकात असे एक सदर होते. त्यात सुरुवातीस असे वाक्य होते “ जास्तीत जास्त निर्दोष अंक देण्याचा आम्ही प्रयत्न करतोच. पण शेवटी चुका कोणाच्याही हातून होऊ शकतात. वाचकांनी अशा सर्व चुका रोजच्या रोज आम्हाला कळवत जाव्यात.” त्या सदरात चूक आणि सुधारणा असे दोन्ही छापले जाई. गेल्या तीन वर्षात मी द हिंदू पाहिलेला नाही त्यामुळे सध्याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sat, 07/04/2020 - 06:36 नवीन
ह्याच धर्तीवर मुंबई मिरर मधे एक सदर दर गुरुवारच्या अंकात प्रसिध्द होते , सदराचे नाव "Have a bone to pick with us?"
  • Log in or register to post comments
१
१.५ शहाणा Sat, 07/04/2020 - 06:53 नवीन
आपले हे म्हणणे १०० % पटले
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 07/04/2020 - 07:38 नवीन
सर्वांना धन्यवाद. चर्चा रंगली आहे तर आता वैद्यकीय पाठ्यपुस्तकांतील चुकांवर काही लिहितो. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी अभ्यासक्रमात बरीच पुस्तके ही ब्रिटिश असायची. त्यामध्ये स्पेलिंगची चूक तर जवळजवळ कधीच नाही आणि तपशिलाची चूक अभावानेच असायची. गेल्या वीस वर्षात या क्षेत्रावर अमेरिकी पगडा बसला. आता जास्त पुस्तके अमेरिकेतून येऊ लागली. स्पर्धा आणि हट्ट यांपोटी काही पुस्तकांच्या आवृत्त्या अतिवेगाने निघू लागल्या. यामुळेच हळूहळू मुद्रितशोधन ढासळले. आता स्पेलिंगच्या आणि तपशिलाच्या चुका देखील अधूनमधून दिसू लागल्या. अशाच माझ्या एका पुस्तकात एक घोडचूक सलग तीन आवृत्यापर्यंत चालू होती. त्यामुळे मी अस्वस्थ होऊन तिचा कसा पाठपुरावा केला याचा किस्सा पुढील प्रतिसादात लिहितो……..
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 07/04/2020 - 07:56 नवीन
पुस्तकातील विषय होता: पायाच्या अंगठ्याचा एक आजार. त्याचे वर्णन सुरू झाले. पुढे दोन परिच्छेद झाल्यावर एकदम मजकुरात ‘ हाताच्या अंगठ्याचा सांधा’ अशी ओळ आली. लगेच पुढे पायाचे वर्णन चालू. आता ही चूक पाठ्यपुस्तकात अक्षम्य आहे. म्हटलं, मुद्रणदोष आहे, सोडून द्या. दोन वर्षांनी पुढची आवृत्ती आली आणि ते पान उघडून बघितले. चूक जशीच्या तशीच. मग प्रकाशकाच्या संस्थळावर गेलो आणि तिथल्या संपर्कातून ईमेल पाठवली. महिनाभर वाट पाहिली. काही उत्तर नाही. पुन्हा स्मरणपत्र. प्रतिसाद नाहीच. या पुस्तकातील धडे वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेले होते. संबंधित धडा अमेरिकी लोकांनी. अन्य काही धडे आपल्या चेन्नईच्या एका लेखिकेने लिहीले होते. मग त्या बाईंच्या संस्थेच्या संस्थळावर गेलो. इथे त्यांचा वैयक्तिक ईमेल मिळाला. त्यांना विचारले की तुम्ही ती चूक दुरुस्त करण्यासंबंधी काही मदत कराल काय? त्यांचे उत्तर आले, “होय, मी जरी त्या धड्याची लेखिका नसले तरीदेखील मी तुमचा निरोप प्रकाशकांपर्यंत पोचवते”. …….. आता या पुस्तकाच्या पुढील आवृत्तीची मी वाट पाहत आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Sat, 07/04/2020 - 18:45 नवीन
लष्कराच्या भाकऱ्यांबद्दल तुमचे अभिनंदन डॉक्टर ! पण ते किती मनस्तापाचे काम आहे याची कल्पना आहे. लेखक- कवी, वार्ताकार, भाषेचे शिक्षक, पत्रकार ई. भाषाजीवींनी तरी निर्दोष लिहावे, तसा किमान प्रयत्न दिसावा ही माझी अपेक्षा असते. But this is wishing too much :-) द हिंदू ची आठवण विशेष आवडली. Proof reader नकोसा असल्यास / परवडत नसल्यास हे तरी किमान सर्वच छापील माध्यमांना करता येईल.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sun, 07/05/2020 - 07:10 नवीन
हि पहा परवाच्या ई-लोकसत्तातली बातमी... दोन वेळा बरोबर मवाळ शब्द आणि दोनवेळा 'मळाव' शब्द दोन ठिकाणी टंकला आहे. Image removed. बाकी वेगळ्या विषयावरचा तुमचा हा लेख आवडला!
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Wed, 07/08/2020 - 07:12 नवीन
सध्या प्रूफरीडर परवडत नसल्याने बऱ्याच वृत्तपत्रांनी ती जबाबदारी उपसंपादकांवर दिली आहे, पण यांना उपसंपादक न म्हणता उपदव्याप संपादक म्हणावं अशी परिस्थिती आहे, २०१६ साली एक वृत्तपत्रात इंटर्नशिप करत असतांनाचा किस्सा, सगळी वृत्तपत्र सहसा त्यांच्याकडे आणून दिलेली मृत्यूवार्ता आणि फोटो एका छोट्या जागेत छापतात. एके दिवशी उपसंपादकाच्या डुलकीमुळे त्या कॉलम मध्ये मृत्यूची बातमी देतांना चुकून सध्या सत्तेत असलेल्या एका मोठ्या नेत्याचे नाव आणि फोटो दुःखद निधन म्हणून छापून आले होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती बातमी वाचून त्या नेत्याच्या समर्थकांनी वृत्तपत्राच्या कार्यालयात फोन करून मुख्य संपादकांना जेरीस आणलं होतं. दुसऱ्या दिवशी दिलगिरी छापून कसबसं ते प्रकरण मिटवण्यात आलं. ऑनलाईन एडिशनमध्ये होणाऱ्या चुकांबद्दल मागे एबीपी माझा चे खांडेकर आणि लोकसत्ताचे कुबेर यांना कित्येक वेळा ट्विटर वर टॅग करून चुका दाखवून दिल्या होत्या, पण त्यांना शष्प फरक पडत नाहीत, इतके ते कोडगे झाले आहेत. तेव्हा तो प्रकार सोडून दिलाय सध्या
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 07/08/2020 - 07:26 नवीन
महासंग्राम, तुम्हीही भाकऱ्या भाजतय त्याबद्दल कौतुक !
चुका दाखवून दिल्या होत्या, पण त्यांना शष्प फरक पडत नाहीत, इतके ते कोडगे झाले आहेत.
अरेरे... काय करणार ?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 07/08/2020 - 07:37 नवीन
"भाजताय", असे वाचावे.
  • Log in or register to post comments
प
पी महेश००७ गुरुवार, 03/24/2022 - 12:18 नवीन
मी अशाच प्रकारची एक चूक एका प्रथितयश दैनिकात वाचली होती. त्या वेळी अण्णा हजारेंची आंदोलनं विशेष चर्चेत होती. त्यामुळे दैनिकांमध्ये समाजसेवक अण्णा हजारे हे नाव सतत वाचायला मिळायचे. एका दैनिकात समाजसेवक हे नाव मसाजसेवक असे छापून आले होते. मसाजसेवक अण्णा हजारे हे वाचताना गंमत वाटली.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 03/24/2022 - 12:52 नवीन
मसाजसेवक अण्णा हजारे हे वाचताना गंमत वाटली.
>>> अ गा गा गा 😀
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 07/05/2020 - 07:50 नवीन
अनिंद्य व टर्मिनेटर, धन्यवाद. सहमती. …………………………… ज्यांना निर्दोष लेखन हा महत्त्वाचा विषय वाटतो, त्यांच्यासाठी एक पुस्तक सुचवेन. पुस्तकाचे नाव आहे Write better, Speak better. रीडर्स डायजेस्टचे हे प्रकाशन आहे. बरेच जुने पुस्तक आहे. जरी ते इंग्लिश असले तरी त्यातील बहुमूल्य सूचना आपल्याला कुठल्याही भाषेसाठी उपयुक्त आहेत. त्यातील एका प्रकरणातील एक वाक्य माझ्या मनावर कायमचे कोरले गेले. लेखकाने असे म्हटले आहे, “तुम्ही एक कोरा कागद घ्या आणि त्याच्यावर पानभर मजकूर स्वतःच्या मनाने लिहा. नंतर शब्दकोश बघून तो मजकूर तपासायला घ्या. जर का त्या संपूर्ण मजकूरात तुम्ही एकही स्पेलिंगची चूक केलेली नसेल, तर तुम्ही स्वतःच स्वतःचे अभिनंदन करण्यास पात्र आहात !” ( स्पेलचेक वगैरे सेवा नसलेल्या काळातील हे वाक्य आहे. सध्या मजकूर वा तपशीलातच होणाऱ्या चुकांना संगणक तरी काय करणार? लेखकच जबाबदार असतो).
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/10/2020 - 08:35 नवीन
भाकर्‍या भाजताय ते योग्यच आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oh China | Oh Corona | :- The Truthist
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 07/12/2020 - 12:59 नवीन
या चर्चेत भाग घेतलेले आपण सर्व जण निर्दोष लेखनाबाबत जागरूक आहोत. यासाठी आपण व्यक्तिगत पातळीवर प्रयत्नही करतोय. या संदर्भात समूह पातळीवर काही उपक्रम माझ्या पाहण्यात आले होते. त्याच्या काही आठवणी लिहीतो. तुम्हीही लिहा. शालेय शिक्षकांच्या मार्गदर्शक आठवणी देखील लिहीता येतील. ..... ‘अंतर्नाद’ मासिकात कित्येक सलग अंकांमध्ये महाराष्ट्र शासनाची शुद्धलेखनाची मूलभूत नियमावली छापलेली असायची. संपादक सर्व लेखकांना आवाहन करीत, की या मासिकाकडे लेखन पाठवताना त्या नियमावलीनुसार लिहीत चला. लेखन करताना जेव्हा आकडे लिहायचे असतात तेव्हा ते अंकात / अक्षरात कधी लिहायचे याचेही बारकावे त्यात असत. माझ्यासह अनेक लेखकांना त्याचा चांगला उपयोग झाला.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 07/13/2020 - 14:44 नवीन
दुकानांच्या पाट्यांवरील लेखनात बऱ्यापैकी चुका आढळतात. त्या सुधारण्यासाठी बऱ्याच वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाच्या वृत्तविद्या विभागाने एक सुरेख उपक्रम राबवला होता. तो म्हणजे रंगाऱ्यांसाठी कार्यशाळा. बहुतेक दुकानदार हे त्यांच्या दुकानाच्या पाटीवरील लेखन शुद्धतेबाबत जागरूक नसतात. एका गावातील पाट्या रंगवण्याची कामे करणारे रंगारी साधारण ठरलेले असतात. हा मुद्दा ध्यानात घेऊन सदर कार्यशाळा आयोजली होती. अशा प्रकारे रंगारी प्रशिक्षित झाले, तर पाट्यांवर लेखनही निर्दोष होईल अशी यामागे धारणा होती.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 07/28/2020 - 12:42 नवीन
रोचक बातमी ! स्पेलिंग चुकलं अन् चार वर्षाची तुरुंगवारी निश्चित झाली... https://www.loksatta.com/trending-news/man-gets-caught-because-of-spelli...
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 07/28/2020 - 12:44 नवीन
https://www.loksatta.com/trending-news/man-gets-caught-because-of-spelling-error-on-fake-death-certificate-scsg-91-2229946/
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 08/17/2020 - 12:52 नवीन
आता ३.३१ दुपारी ही बातमी : निशिकांत कामत यांच्या निधनाच्या अफवा; रुग्णालयाची माहिती https://www.loksatta.com/manoranjan-news/critically-acclaimed-director-n... ................................. पण त्याआधीच मटा मृत्यू जाहीर करून बसले होते. (तसेच काही टीव्ही वाहिन्या, इ.) हे पाहा एक जागरूक वाचक : (https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-...) लेटेस्ट कमेंट लाज वाटली पाहिजे तुम्हाला मटा.. खोटी बातमी दिली होती.. ती चूक मान्य करून दिलगिरी तरी व्यक्त करा ujjwal pawaskar उज्व्वल याना धन्यवाद !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 08/17/2020 - 12:55 नवीन
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 08/17/2020 - 12:55 नवीन
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 08/17/2020 - 13:07 नवीन
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/21/2020 - 09:26 नवीन
"बातम्यांपासून लांब राहण्याची डझनभर कारणे"... एक रोचक लेख : https://www.aksharnama.com/client/article_detail/4518
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 09/11/2020 - 07:49 नवीन
आजची अक्षम्य चूक : त्यावर मी अशी इ मेल केली आहे : प्रति संपादक सकाळ , पुणे महोदय आपल्या ११/९/२० च्या अंकात पान ७ वर मोठी चूक झालेली आहे. ( (https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel.aspx#currPage=7) ) ती अशी : बातमी : ‘अतिघाई महागात जाई “ चौकटीतले वाक्य : Rapid antigen चाचणीत रुग्णाच्या रक्ताच्या नमुन्याचीच चाचणी होते वरील वाक्यात “रक्ताच्या नमुन्याचीच” हे अत्यंत चुकीचे आहे. या चाचणीत नाकातील swab चा नमुना घेतात. लोभ असावा
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 09/30/2020 - 06:18 नवीन
मराठीतील ‘ळ’ आता हिंदीतही वापरायचा : केंद्र सरकारचा आदेश. https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel.aspx#currPage=3 प्रकाश निर्मळ यांच्या प्रयत्नांना यश.
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 10/01/2020 - 08:55 नवीन
ळ संस्कृत उद्भव आहे इतकेच नोंदवतो. ऋग्वेदाची सुरुवात - अग्निमिळे पुरोहितं...
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 10/01/2020 - 09:09 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 10/16/2020 - 07:39 नवीन
एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यातील स्वाभाविक घटनेचा विनाकारण बागुलबुवा करून अतिरंजित बातम्या दिल्या जातात. त्यांचा सुरेख समाचार घेणारे हे विश्लेषण.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/16/2020 - 15:54 नवीन
गिरीश कुबेर हे लोकसत्तेला गाळात नेऊन टाकणार हे मात्र खरं
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 10/21/2020 - 02:22 नवीन
मला वाटले आधीच टाकला! &#128540
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 10/20/2020 - 12:08 नवीन
सध्या समाजात वावरताना आपण जे ‘शारीरिक अंतर’ पाळत आहोत त्यासाठी एकच मराठी शब्दाचा शोध वृत्तमाध्यमांतून कसा उत्क्रांत होत गेलाय ते पाहणे रोचक आहे. सामाजिक अंतर >>> शारीरिक अंतर >> अंतरसोवळे (हा अपेक्षेप्रमाणेच वादग्रस्त !) ..... परवा ‘सकाळ’मध्ये ‘अंतरभान’ वाचला आणि तृप्त झालो. सुंदर ! याहून वेगळा वाचला असल्यास लिहा.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 12/30/2020 - 11:33 नवीन
कसे फसवे शीर्षक देतात बघा: जानेवारीत 14 दिवस राहणार बँका बंद; व्यवहार करण्याआधी जाणून घ्या कधी आहेत सुट्या https://www-esakal-com.cdn.ampproject.org/v/s/www.esakal.com/arthavishwa/bank-holidays-january-2021-jaunary-14-days-banks-will-be-closed-391180?amp_js_v=a6&amp_gsa=1&amp&usqp=mq331AQFKAGwASA%3D#csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&amp_tf=From%20%251%24s&ampshare=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Farthavishwa%2Fbank-holidays-january-2021-jaunary-14-days-banks-will-be-closed-391180 या १४ (२शनि व सर्व रवि वार धरून) मध्ये संपूर्ण देशाला फक्त ७ लागू आहेत! बाकी स्थानिक शहरानुसार वेगवेगळ्या.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 01/16/2021 - 04:09 नवीन
काही चांगल्याची दखल घेतो. कोविडचर्चे दरम्यान अनेकदा 'co-morbid' हा शब्दप्रयोग यायचा. त्यासाठी सुटसुटीत मराठी शब्दाच्या शोधात होतो. परवा लोकसत्तात 'अनियंत्रित सहव्याधी' वाचला आणि आवडला.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sat, 01/16/2021 - 05:05 नवीन
नुसता सहव्याधी योग्य वाटतो.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 01/16/2021 - 05:23 नवीन
बरोबर. जेव्हा सहव्याधी नियंत्रित असते तेव्हा कोविडने गंभीर होण्याचा धोका कमी असतो. जेव्हा ती अनियंत्रित होते तेव्हा धोका खूप वाढतो .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 23 hours ago
  • सुंदर !!
    1 day 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा