Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

लष्कराच्या भाकऱ्या......

ह
हेमंतकुमार
Tue, 06/30/2020 - 08:55
🗣 179 प्रतिसाद
समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात. हा लघुलेख साहित्यक्षेत्रातील आणि वृत्तमाध्यमांतील अशा काही अनुभवांचा आहे. साहित्याच्या प्रांतात लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक आणि लेखक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो. ........... मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते. मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो. यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला. वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले: १. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत? २. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का? ३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा ! ....... असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे. ................................... आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव. एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये बुडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात. खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. ते वाचून जरा अस्वस्थ झालो आणि मग त्यांना ईमेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले. आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव. सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘करोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/ ) हाच आहे. मग या वृत्तपत्रास ईमेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे. गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ. बस ... आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो .फोनबिन जाऊदे मरूदे, हे धोरण. लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण..... जोपर्यंत आपला हात दुखत नाही तोपर्यंतच ! ..........................................................................................

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 123052 views

🗣 चर्चा (179)
अ
अभ्या.. Tue, 06/30/2020 - 10:03 नवीन
मी एका प्रिंटिंग प्रेस मध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून नोकरी करत असतानाची गोष्ट. ती प्रेस लौकिकार्थाने प्रकाशक किंवा मुद्रक नव्हते पण कमर्शिअल प्रिंटिंगचा प्रचंड अनुभव असलेने तेथे बर्‍याच प्रकाशकांची पुस्तके मुद्रणासाठी येत. असेच एका प्रथितयश डॉक्टराचे पुस्तक छपाईसाठी आलेले. डॉक्टरसाहेब वैद्यकीय क्षेत्रात यथातथा प्रॅक्टीस करायचे पण सामाजिक कार्याची आवड बर्‍यापैकी होती. असेच त्यांनी पुस्तक लिहिलेले. एका इतिहासप्रसिध्द डॉक्टराचे चरित्र. प्रकाशक ते स्वतःच बनलेले. यथावकाश त्याचे टाईपसेटिंग पूर्ण झाले. प्रुफरिडिंग चालू असताना त्यानी कव्हरपेज डिझायनिंगचा विषय काढला. प्रेस मालकापाशी बोलताना मालकांनी सांगितले की आमचा डिझायनर करुन देईल कव्हरपेज. मग ते माझ्याकडे आले व बोलणी झाली. टाईपसेटिंग होतानाच वाचनाच्या आवडीने माझे ते पुस्तक वाचन झालेले होते. त्यानुसार एक थीम ठरवून काम सुरु केले. पेजिनेशन आणि लेऑटचेही काम माझेकडेच होते. चारपाच दिवसात एक जुन्या पुस्तकातील चित्राचे झेरोक्स चित्र घेऊन ते आले व म्हनाले हे चित्र कव्हरवर हवे. हे माझ्या मुलीने हुडकले आहे. ते चित्र रिप्रिंट करण्याइतके चांगले नव्हते आणि पूर्ण कव्हरवर तेच एक वापरावे असेही नव्हते. मग मी तसे चित्र स्वतः काढून पीसीवर एडिट करुन इतर काही इलिमेंट अ‍ॅड करुन कव्हर पेज पूर्ण केले. टायटलची कॅलिग्राफि आणि कलरस्कीम सहीत. कारण दिलेले चित्र कॄष्ण्धवल होते. पूर्ण कव्हर पाहिल्यावर त्यांना अत्यंत समाधान वाटले व त्यांनी माझे कौतुक ही केले. ऋणनिर्देशाचे पान माझा डीटीपी करणारा सहकारी करत होता. त्यात त्यांनी मुखपृष्ठ डिझाईन म्हनून आधी जे माझे नाव होते ते बदलून स्व्तःच्या मुलीचे नाव टाकायला सांगितले. त्यांची मालकाशी चर्चा होत असताना त्यांचा मुद्दा असा होता की मूळ चित्र मुलीने दिले. मालक म्हनत होते की डिझ्झीन आमच्या डिझायनरने केले तेम्व्हा त्याचे नाव टाका. लेखकमहोदयाचा मुद्दा होता की आम्ही त्यासाठी पैसे दिले आहेत आणि तो पगारी नोकर असलेने ते काम नोकरीचा भाग होता व स्वतंत्र नामनिर्देशानाची गरज नाही. काम जवळपास पूर्ण होत आल्याने वाद वाढवण्यात अर्थ नव्हता. फक्त त्यांनी मुखपृष्ठ संकल्पना असे लिहिन स्वतःच्या मुलीचे नाव टाकले बाकी पृष्ठरचना आणि सुलेखनाचे माझे नावही उडवून टाकले. वाईट जेंव्हा वाटले एका संस्थेने दिलेले उत्कॄष्ठ मुखपृस्।ठाचे पारितोषिक त्याम्च्या मुलीने झोकात स्वीकारले. आणि कार्यक्रमातल्या भाषणात ते स्व्तः कसे साकारले याचे रसाळ वर्णन केले.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Tue, 06/30/2020 - 12:10 नवीन
@अभ्या एक गोष्ट वाचलेली .. एकदा एक राजा जंगलात शिकारीसाठी सकाळपासून भूक तहान विसरून फिरत असतो, मध्यानीच्या कडकडीत उन्हात, थकून व साजेशी शिकार श्वापद न मिळाल्याने निराश होऊन, एका झाडाखाली विसावतो. थकव्यामुळे लवकरच त्याचा डोळा लागतो. त्याच झाडावर एक हंस बसलेला असतो, त्याने सकाळपासून चाललेली राजाची वणवण पाहिली असते. थोड्यावेळाने सूर्याचा कोन बदलतो, आता राजाच्या चेहेऱ्यावर उन्हाची तिरीप येते. हंसाला राजाची दया येते, तो आपले पंख फैलावतो की जेणेकरून उन्हाची तिरिप पंखाने अडवून, राजाच्या चेहऱ्यावर शीतल छाया राहील. तेव्हड्यात तेथून एक कावळा उडत उडत जाताना, आपली विष्टा टाकतो, ती नेमकी राजाच्या कपाळावर पडते. राजा वैतागून झोपमोड होऊन उठतो, कपाळावर पडलेली विष्टा व शिकार न झाल्याची निराशा त्याच्या क्रोधात भर टाकतात. तो वर पाहतो, वरती त्याला हंस पंख फैलावलेला दिसतो, तो तडक धनुष्य उचलतो, व एक बाण हंसावर चालवतो. हंस मृत्यू पावतो ...
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 06/30/2020 - 16:18 नवीन
माझी 'येक रूपाया' मधली गोष्ट अशी रिलेट झालती व्हय! माझ्याबरोबर तर अजूनही घडतच आहेत अशा गोष्टी. आता सवय झालीय. सं - दी - प
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 07/01/2020 - 04:23 नवीन
एव्ढंच म्हणू शकतो :( त्यातून शिकणं महत्वाचं. मी आताच्या कंपनीत काम करताना एखादी अ‍ॅक्टिव्हीटी पूर्ण झाल्यावर जी अभिनंदनाची मेलामेली होते, त्यात मी आवर्जून ॠणनिर्देश करतो. अगदी एखादा नवा मेंबर असेल ज्याने थोडासा हातभार लावलाय त्यापासून ते एखादा मोठा माणूस ज्याने सपोर्ट अन वॅलिडेशन मध्ये खूप योगदान दिलंय त्यापर्यंत. त्याचा फायदा हा होतो की ते लोक नंतर एका मेसेजवर शनिवारी-रविवारी, रात्री उशिरा, अडलेली कामे करून देतात. नंतर एखाद्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये जास्त डेडिकेशनने कामे करतात. जास्त सपोर्ट करतात. दुसरं माझं काम सपोर्ट टाईप मध्ये जास्त असल्याने बर्‍याचदा अदखलपात्र असतं. पण शेवटी त्या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये 'याचा' किती अन काय सहभाग आहे हे टॉप मॅनेजमेंट पर्यंत सगळ्यांना माहिती असतं. (ती व्यवस्था मीच केलेली असते ;) ) त्यामुळे अप्रेजल मध्ये काही अडचण येत नाही. :) अन कॉर्पोरेटमध्ये तेच अप्रेजल महत्वाचं असतं!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/01/2020 - 07:03 नवीन
असे अनुभव मला रोजच येत असतात. मी सोनोग्राफीवर केलेल्या निदानाचे श्रेय घेणारे डॉक्टर आणि रुग्ण रोजच पाहत असतो. उदा. एका अस्थिव्यंग तज्ज्ञाने रुग्णाच्या पायाला सूज आली आहे म्हणून माझ्याकडे पायाच्या डॉपलर साठी पाठवले होते. रुग्ण माझ्या दवाखान्यात आला तेंव्हा त्याचा चढलेला श्वास आणि पायाची सूज पाहूनच मला लक्षात आले कि याला पायाचा आजार नसून हृदयाचे काम नीट चालत नाही. डॉपलरच्या अहवालात शेवटी हृदयाची तपासणी करून घ्या असे मी लिहिले होते. यानंतर या महाशयांनी त्या रुग्णाला हृदयविकार तज्ञाकडे स्वतः निदान केले आहे असे गर्वाने सांगून पाठवले. तो हृदयविकार तज्ञ माझा मित्र आहे त्याने डॉपलरच्या अहवाल वाचून काय स्थिती आहे ते समजून मला तसे कळवले. मी फक्त हसलो. आतड्याच्या पहिल्या भागाचा (duodenum) क्षयरोग हा अतिशय तुरळक प्रमाणात असतो. अशा निदान झालेल्या सहा रुग्णांचे एक्स रे देऊन त्याबद्दल आमचा अनुभव (our experience in duodenal tuberculosis) हा शोध निबंध एका प्रख्यात आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये आमच्याच एका पोटाच्या रोगाच्या तज्ज्ञाने प्रसिद्ध केला. त्यात किमान श्रेयनिर्देश किंवा एक्स रे डॉ सुबोध खरे यांच्याकडून घेतले आहेत असे सुद्धा नमूद केले नव्हते. हि बाब माझ्याच एका वर्गमित्राने माझ्या लक्षात आणून दिली. ( एका एक्स रेच्या खाली क्रॉप करताना माझे नाव तसेच राहून गेले होते). मी फक्त हसलो.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Tue, 06/30/2020 - 10:27 नवीन
चूक दुरुस्तीसाठी तुम्ही इतके प्रयत्न करता, फारच दुर्मिळ बाब. आम्ही वाचून सोडून देतो. तुमच्या लेखावरून "ते गाढ व शांतपणे झोपले होते" आणि "ते गाढव शांतपणे झोपले होते" विनोद आठवला :))
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 06/30/2020 - 12:54 नवीन
प्रयत्न केलेकी आपण नुसतेच बघत राहिलो ही रूखरूख राहात नाही.
खरंय. म्हणून तर त्यांचे वेगळेपण या संकेतस्थळावर नेहमी जाणवते. _/\_
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 06/30/2020 - 12:57 नवीन
चूक दुरुस्तीसाठी तुम्ही इतके प्रयत्न करता, फारच दुर्मिळ बाब.
खरंय. म्हणून तर त्यांचे वेगळेपण या संकेतस्थळावर नेहमी जाणवते. _/\_ प्रतिसाद असा द्यायचा होता. :)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 07/01/2020 - 04:14 नवीन
इथे (माध्यम व्यवसाय - जाहिराती, बातम्या, वॄत्तपत्रे, वॄत्तवाहिन्या, मालिका) हे वाक्य चपखल बसावे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 06/30/2020 - 10:39 नवीन
अभ्या, तुम्ही नक्कीच येता यात. पुस्तकाच्या यशात मुखपृष्ठकाराचा वाटा जरूर असतो. तुमच्या दुख्खात सहभागी आहे ! शा वि कु, छान विनोद.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 06/30/2020 - 12:51 नवीन
बस ... आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो.
हेच बरोबर आहे. “ठेविले अनंते तैसेची रहावे” याचा हाच तर खरा अर्थ आहे. आपली स्वस्थता महत्वाची.
फोनबिन जाऊदे मरूदे, हे धोरण
हे सगळे अपेक्षा ठेवल्याने होते व आपल्यालाच म्हणजे सज्जन माणसालाच नेहमी त्रास होतो. ते टाळायचेच.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 06/30/2020 - 13:11 नवीन
शाम, पहिला प्रतिसाद, तत्पर सुधारित प्रतिसाद आणि अभिप्राय या सर्वांबद्दल धन्यवाद ! तुमचे मार्गदर्शन उपयुक्त आहे. नेहमी लक्षात ठेवावे असे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 06/30/2020 - 15:52 नवीन
एच आर डी च्या प्रशिक्षणाला गेलो असताना त्यात " स्टीलिन्ग द क्रेडिट" हा मानवी स्वभाव असतो ,सर्वामध्ये थोडयाफार प्रमाणात हे " लक्षण" असतेच ! असे अगदी वैद्यकातील नोबेल मधेही घडलेले आहे ! बहुदा डी एन ए च्या शोधात !
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 06/30/2020 - 16:37 नवीन
मलाही अशा लष्कराच्या भाकर्‍या भाजायची हौस कधीतरी उफाळून येते. एकदा एकाने जीवाशी गाठ असल्याची जाणीव करून दिली होती. :) सं - दी - प
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 06/30/2020 - 16:50 नवीन
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत? २. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?
आपल्याकडे चांगली ग्राहक सेवा ही अभावानेच आढळते. विक्री होईपर्यंत "ग्राहक देवो भव" आणि विक्री झाली की "ग्राहक फाट्यावर जावो" असा खाक्या असतो आस्थापनांचा :)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 06/30/2020 - 17:12 नवीन
*
स्टीलिन्ग द क्रेडिट" हा मानवी स्वभाव * विक्री झाली की "ग्राहक फाट्यावर जावो
.>>> दोन्हीही मुद्दे छान ! *
मलाही अशा लष्कराच्या भाकर्‍या भाजायची हौस कधीतरी उफाळून येते.
>>>>> सटीसामाशी २-४ भाजायच्या , हाकानाका !
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Tue, 06/30/2020 - 20:00 नवीन
नेहमीप्रमाणे वाचनीय झालाय. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 07/01/2020 - 04:57 नवीन
तुमच्या सारखं कोणीतरी असशा भाक-या भाजतात त्यामुळेच बदल घडतात. त्यामुळे तुम्हाला धन्यवाद. Stealing the credits/ plagiarism.. ताजा अनुभव. दोन वर्षांपूर्वी fb वर ग्रेसच्या कवितेचे सुंदर रसग्रहण वाचले. (ओरिजिनल). नंतर पुन्हा ते शोधायला गुगललं तर एका ब्लॉगवर सापडले. त्या ब्लॉगवालीने स्वतः च्या नावावर छापले होते. मी विचारलं तुम्ही लिहिलंय? तर हो, म्हटले वर "ग्रेसची साहित्याची तिची आवड"वगैरे लंबा चौडाreply पण आला. मग मी मूळ लेखकाला कळवले. त्याने तिला विचारताच अख्खा ब्लॉग डिलीट केला, फेबुवर आम्हाला ब्लॉक करून टाकले. काही दिवसांपूर्वी तिच्या नावाचा एक कायदेविषयक लेख , whatsappवर आला. नाव तेच. लेख इतका मुद्देसूद , शंका आली म्हणून Google translate केले तर एका कायदेविषयक साईटवर अख्खा लेख (एखादा पेरा वगळून) सापडला. तिच्या fb वर पण without credits तोच लेख. पन्नास एक शेअर्स अन् लोकांना केलेल्या कौताकाचा स्विकार. एका परिचिताला हे सांगितल्यावर त्याने तिला मेसेजवर विचारल्यावर, " हो मी त्यावरून घरी तलाय. पण तो लिहिणा-या team वर मी होते . पण तुम्ही सांगताय तर खाली स्त्रोत म्हणून लिंक देते " हे उत्तर. ही स्त्री IP law मध्ये specialization करतेय , शिवाय एका मराठी प्रसिद्ध वृत्तपत्रात लिहिते. आता बोला!
  • Log in or register to post comments
श
शेखरमोघे Wed, 07/01/2020 - 18:00 नवीन
हल्ली बर्‍याच नावाजलेल्या, जागतिक दर्जाच्या शिक्षणसन्स्था विद्यार्थ्यानी लिहिलेले प्रबन्ध/सन्शोधन/अहवाल काय दर्जाचे आहेत हे ठरवताना Standard Operating Procedure म्हणून Software वापरून plagiarism नसल्याची खात्री करून घेतात.
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Wed, 09/30/2020 - 11:47 नवीन
तिचा नामोल्लेख तरी करा इथे. तिचं श्रेय तिला मिळायला नको का? :-)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/01/2020 - 06:49 नवीन
श्रीमती इंदिरा गांधी यांनी विक्रांत जहाजावर एका तरुण नौसैनिकाला सांगितलेली एक कहाणी ( त्यांच्याच तोंडून ऐकलेली). या जगात दोन तर्हेची माणसं असतात १) काम करणारी २) श्रेय घेणारी यापैकी तू पहिल्या गटात प्रवेश कर कारण तेथे अजिबात स्पर्धा नसते.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 07/01/2020 - 09:16 नवीन
डॉक्टर साहेब, थोडक्यात मोठा संदेश दिला म्हणायचं इंदिराजींनी त्या नौसैनिकाला अन गप्पांच्या ओघात त्यानं तुम्हाला तुम्हा सर्वांना माझा सलाम.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 07/01/2020 - 06:58 नवीन
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार ! लेखाचा मूळ मुद्दा -दाखवून दिलेली चूक मान्य करणे आणि त्यावर कारवाई करणे- हा होता. चर्चेदरम्यान ‘श्रेय घेणे’,’ साहित्यचोरी’ इत्यादी पूरक मुद्देही पटलावर आलेत. त्याबद्दल धन्यवाद आणि सहमती.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Wed, 07/01/2020 - 10:59 नवीन
बर्रोब्बर .... आणि म्हणूनच डिजिटल इंडिया चे जनक हे २०१४ नंतरचे नसून... त्याची पूर्वतयारी भारतीय १९६० च्या दशकापासूनच करत होते.. डिजिटल इंडियाचा दैदिप्यमान इतिहास २०१४ च्या कितीतरी दशके आधी सुरु झाला होता. (भारताच्या विकासाचा प्रवास २०१४ पासून सुरु झाला अशी समजूत करून देणारे व घेणाऱ्या भक्तवृंदाला समर्पित )
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/01/2020 - 15:46 नवीन
हो ना मग हा प्रतिसाद का लिहिला? Sam Pitroda says not Narendra Modi but Rajiv Gandhi started digital India
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Wed, 07/01/2020 - 15:53 नवीन
2014 पुर्वीच्यांचे क्रेडीड, 2014 नंतरच्यानी फक्त स्वतःच्या (मी आणि मी) नावावर खपवू नये म्हणून...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/01/2020 - 15:56 नवीन
आलं का आपलं तुणतुणं पहा खाली लिहिलंच आहे सत्य दाखवलं तरी लोक आपला दृष्टिकोन बदलत नाहीत.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 07/01/2020 - 16:32 नवीन
असं कसं? गारगायींमुळेच तर टीसीएस, विप्रो, टाटायन वगैरेची माहिती इथे मांडली गेली की. :)
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Wed, 07/01/2020 - 16:47 नवीन
तुम्हारी बरगल ...सच, हमारा सच ... कहानी हैं ? तुम्हारा खून ... खून, तो क्या, हमारा खून पानी हैं ? तुम्हारी वकिली ...सरकारी, तो, हमारी फ़रयाद ... गद्दारी हैं ?
  • Log in or register to post comments
म
मनो Wed, 07/01/2020 - 08:03 नवीन
पुण्यातल्या, इंग्रजीतून इतिहास लेखन करणाऱ्या, आणि इंटरनेटवर नेहेमी सक्रीय असण्याऱ्या लेखकाबद्दलचा एक अनुभव. त्यांच्या पुस्तकातील एका छायाचित्रात चूक झाली होती. ई-मेल द्वारे कळवली, त्यांनी ती मान्यही केली, आणि पुढल्या आवृत्तीत दुरुस्त करू म्हणून आश्वासनही दिले. मग काय झाले अचानक ते कळेना. त्यांचे पुन्हा उत्तर आले की मीच बरोबर, कारण अमक्यातमक्या संग्रहालयाने हीच चूक केली आहे. बहुतेक दोन चुका एकत्र केल्या की त्या एकमेकांना रद्द करतात, अथवा सगळे करतात तीच चूक आपणही करायला हवी, अशी काहीतरी त्यांची समजूत असावी,
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 07/01/2020 - 09:23 नवीन
भाकरी भाजायचा लहानपणी पासूनच शौक नाही, पण सगळ्यांचे अनुभव वाचून कायम काहीतरी शिकायला मिळतं आहे हे नक्कीच. कुमारजींना धागा काढल्याबद्दल अनेक आभार.
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 07/01/2020 - 11:14 नवीन
प्रथम तुमच्या प्रयत्नांमागील भावनेबद्दल आणि पाठपुरावा करण्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक. थोडं वैयक्तिक अनुभवातून आलेली फिलॉसॉफी मांडावीशी वाटली, म्हणून खाली लिहिलंय. :-) आपण मनापसून सांगतो, पण बरेचदा समोरची व्यक्ती ते स्वीकारत नाही किंवा स्वीकारलंच तरी आपल्या कल्पनेप्रमाणे स्वीकारत नाही. मग त्यामागचं बरं-वाईट कारण काहीही असो. याचा आपल्याला खूप त्रास होतो आणि हे अगदी साहजिक आहे. मला जेव्हा असे अनुभव आले/अजूनही येतात, तेव्हा त्यातून उमटणार्‍या माझ्या प्रतिक्रीया साधारण अशा होत्या - - प्रथम प्रथम, मला ते फार लागायचं आणि चिडचिड व्हायची. [समोरच्याला काहीच फरक पडत नाही!] - नंतर समोरच्या व्यक्तीची अक्कल काढायला सुरुवात केली. [सकाफना!] - माझं बोलणं योग्य ठरवण्यासाठी समोरच्या व्यक्तीची मतं खोडायला लागलो. [सकाफना!] - निराशा वाटायला लागली आणि मतप्रदर्शन करणं/स्वतःहून मदत करणं बंद केलं. [सकाफना!] - इतरांची चुकीची मतं बघून त्रास व्हायचा, पण दुर्लक्ष करणं सुरू केलं [सकाफना!] - माझंच काही चुकतंय का सांगण्यात हे बघायला सुरुवात केली. [सकाफना!] - लक्षात आलं की मी माझं मत न मांडून समोरच्याला ते झिडकारायची/स्विकारायची संधीच नाकारतोय. [सकाफना!] मग मी मला स्वतःला वाटलं तर, एकदा तरी, माझं मत मांडणं परत सुरू केलं. समोरच्याला ते पटलं तर ठीक, नाही पटलं तरी ठीक. [समोरच्याला काही फरक पडो वा न पडो, मला तरी खूप फरक पडतो!] ===== बाकी ऋणनिर्देशाबद्दल प्रामाणिकपणे बोलायचं तर आधी मला स्वतःकडे बोट दाखवावं लागेल - लहानपणी पाचवी-सहावीत असतांना एकदा, शिक्षकांनी सांगीतलं की वर्गात दुसरे दिवशी प्रत्येकानं एकतरी अ‍ॅक्टिव्हिटी करून दाखवावी, काही नाही तर एखादं गाणं/श्लोक्/जोक/गोष्ट तरी सांगण्याचा प्रयत्न करावा.. मी त्यात दुसर्‍या दिवशी एक कविता म्हणून दाखवली. सगळ्यांनी कौतुक केलं, विचारलं की कुणाची म्हणून. मला ते माहित नव्हतं. लहानपणी कधीतरी पाठ झालेली. पण मी ती माझी म्हणून खपवली. कुणालाच काही संशय आला नाही. दुसर्‍या दिवसापासून माझं मन मला त्रास देऊ लागलं, पण चूक दुरुस्त करण्यासाठीचं धैर्य माझ्यात तेव्हा नव्हतं. आज तसं धैर्य असूनसुद्धा ते मला दुरुस्त करता येत नाही. :-) नाशिकचे मिलिंद जोशी आहेत. त्यांची चेपूवर "झुंज" म्हणून एक छोटेखानी कादंबरी वाचली. जवळपास २२-२३ पोस्ट्स मधे ती त्यांनी प्रसिद्ध केली होती. छान कादंबरी होती. पण एका वर्षानं मला ती कायप्पावर कुणा भलत्याच नावानं आली. ते मग मी तसं फॉरवर्ड करणार्‍याला कळवलं. चेपूवर जाऊन जोशींशी संपर्क साधला आणि त्यांना ती कादंबरी किंडलवर का होईना प्रसिद्ध करण्याची विनंती केली. पुढे काय झालं माहित नाही. हापिसात हकीकत अपरोक्षपणे कळाली - एक टीम लीड एका टीम मेंबरला असं म्हणाला, "देख भाई, तूने जरूर ये काम किया है और बहुत अच्छा किया है| पर अभी तू नया है और तुझे काफी मौके बाद मे मिल जाएंगे| इस बार मेल मै भेजुंगा|". ते श्रेय घेण्यासाठी, त्याच टीम मेंबरच्या कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, शेवटचा मेल त्यानं स्वतः टाकला, श्रेय घेतले आणि स्वतःच्या अप्रायझलची सोय करून घेतली. आम्ही काही जणांनी मिळून नंतर त्या टीम लीडला अकाऊंट मधून हुसकावून लावलं, पण तो गुणी टीम मेंबर हकनाक दुखावल्या जाऊन कंपनी सोडून गेला. ===== हे असे अनुभव सार्वत्रिक आहेत. त्यांची दाहकता त्या-त्या व्यक्तींच्या स्वभावातील ग्रे शेड्स च्या प्रमाणावर ठरते. पण हे जे जग चाललंय ते कुणीतरी चांगलं वागताहेत म्हणूनच ना? :-) ===== मला आजवर आलेल्या अनुभवांतून माझं एवढं शिकणं झालंय: - आपला जो स्थायीभाव / मूळ स्वभाव असतो ना, त्याच्याकडे तटस्थपणे आणि धैर्यानं [होय, ही खूप मोठी गोष्ट आहे] बघावं. आपलं वागणं योग्य वाटलं तर चांगलंच, ते जोपासावं. नाही वाटलं तर त्यातून शिकावं, ते प्रामाणिकपणे आपल्यात सुधारावं आणि पुढं जावं.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/01/2020 - 15:54 नवीन
हे असे अनुभव सार्वत्रिक आहेत. जालावर वावरायला लागलेला एक दशकाहून जास्त काळ लोटला यात एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध केली तरी लोक आपला दृष्टिकोन बदलत नाहीत. तुम्ही सत्य दाखवून लोकांचे तोंड गप्प करता परंतु त्यांची विचारसरणी बदलता येत नाही. त्यामुळे आपण आपले काम करत जायचे, जीवाला लावून न घेता. ज्याला बदलायचे आहे तो बदलतो बहुसंख्य बदलत नाहीत. आपण सुखासमाधानात राहावे
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 07/01/2020 - 16:29 नवीन
@राघव,
समोरच्याला ते पटलं तर ठीक, नाही पटलं तरी ठीक.
हेच तर मकाफना (मला काहीच फरक पडत नाही) :) सगळ्या सकाफनाचं मकाफना झालं पाहिजे. कारण सफाकना आपल्या हातात नसतं, तर मकाफना आपल्या हातात असतं.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/02/2020 - 18:11 नवीन
आवडली प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 07/01/2020 - 11:23 नवीन
वरील तिन्ही प्रतिसादकांचे आभार ! तुमची खालील वाक्ये खूप आवडली. विचारप्रवर्तक. १. बहुतेक दोन चुका एकत्र केल्या की त्या एकमेकांना रद्द करतात, अथवा सगळे करतात तीच चूक आपणही करायला हवी २. सगळ्यांचे अनुभव वाचून कायम काहीतरी शिकायला मिळतं आहे ३. आपला जो स्थायीभाव / मूळ स्वभाव असतो ना, त्याच्याकडे तटस्थपणे आणि धैर्यानं [होय, ही खूप मोठी गोष्ट आहे] बघावं.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 07/01/2020 - 11:38 नवीन
वास्तव आहे. ------------- मुळीक यांची दोन पुस्तकं आहेत. ओपेक आणि वाटर कलर पेंटिंग मराठीत. चित्र आहेत आणि रंगवण्यासाठी काय करावं.लागतं याचं तंत्र दिलेलं आहे. म्हणजे असं की तंत्र वापरून तुम्ही रंगकाम साध्य करा. इथे एक चित्र आलं. मी लिहिलं " जरा धोंडे, झाडं यांचे आकार आणि जागा तरी बदला हो, मुळीकांच्या पुस्तकांत अमुक पानावर हे चित्र आहे." गाशा गुंडाळला. माबोवर मात्र धोधो पाऊस पडत होता छानछानचा. त्यातच धन्य.
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Wed, 07/01/2020 - 16:06 नवीन
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Wed, 07/01/2020 - 16:06 नवीन
कॉलेजात असताना नियतकालिकाच्या एका विभागाचा संपादक म्हणून काम केलेलं. मिसळपाववर सुद्धा वाचक मात्र होतो, ढापलेलं शोधायची आयडिया इथंच समजलेली मला. मग काय, कविता, लेख काही येऊदेत पहिल्यांदा गुगल करून बघायचो, ढापलंय का स्वत:च आहे. माघारी देताना मुळ लेखकाचं नाव/पेज अथवा साईट चं नाव टाकून द्यायचो
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 07/01/2020 - 17:30 नवीन
अवांतर : कूनागा,
Sam Pitroda says not Narendra Modi but Rajiv Gandhi started digital India
टेलिकॉम क्रांतीत सॅम पित्रोदांचे नक्की योगदान काय हे कोणी सांगू शकेल का, असा प्रश्न गिरीश खऱ्यांनी विचारला आहे. टेलिकॉमच्या तथाकथित क्रांतीवर इथे लेखाखाली गिरीश खरे यांचे दोन प्रतिसाद आहेत : https://www.aksharnama.com/client/article_detail/4272 आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 07/01/2020 - 17:36 नवीन
एक विनंती: हा लघुलेख साहित्यक्षेत्रातील आणि वृत्तमाध्यमांतील अशा काही अनुभवांचा आहे त्यातील चुकांबद्दलचे तुमचे अनुभव यावेत. हे सर्वांनी ध्यानात घेऊन त्यातील आपले अनुभव लिहावेत. अवांतर टाळावे ही वि.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 07/01/2020 - 20:54 नवीन
कुमारेक, अवान्तराबद्दल क्षमस्व. अवांतर प्रतिसाद उडवायची विनंती सरपंचांना केली आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Wed, 07/01/2020 - 18:20 नवीन
कुमार१ सर, हे थोडंसं अवांतर होते आहे त्या बद्दल क्षमस्व परंतु - "लष्कर" च का? आणि "भाकऱ्या" च का? माहिती नाही म्हणून विचारले.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 07/02/2020 - 04:33 नवीन
लष्कर-लष्करच्या-भाकरी-भाजणें<\a>
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 07/02/2020 - 03:08 नवीन
हा प्रश्न मलाही लेख लिहिण्याआधी पडला होता. मी जालावर ४ संदर्भ पाहून "लष्कराच्या" याची खात्री केली. बहुसंख्य म्हणी ग्रामीण उगमाच्या असल्याने भाकरी चे अनेकवचन भाकऱ्या होत असावे .
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 07/02/2020 - 04:36 नवीन
चामुंडराय, तुम्ही बहुतेक ही म्हण कशी आली असावी, असे तर विचारले नाही ना? तसे असल्यास हे स्पष्टीकरण: पूर्वी ज्या गावी लष्कराचा तळ असे त्या गावच्या लोकांना शिपायांची, भाकऱ्या भाजणे यासारखी कामे करावयास लावीत. >>>> म्हणजेच आपला ज्याच्याशी अर्थाअर्थी संबंध नाही अशी कामे करणे संदर्भ: https://www.transliteral.org/dictionary/%e0%a4%b2%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e2%80%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%a3%e0%a5%87%e0%a4%82/word
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 07/02/2020 - 09:34 नवीन
घरचे खाउन लष्करच्या भाकर्‍या भाजणे
अशी ती म्हण आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 07/02/2020 - 12:13 नवीन
पण स्पेलिंगनुसार (Corona) कोरोनाच योग्य वाटते.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 07/02/2020 - 12:24 नवीन
लेखातील माझे वाक्य बघा : मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( kuh-roh-nuh) हाच आहे. (https://www.dictionary.com/browse/corona?s=t)
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 07/02/2020 - 13:31 नवीन
हो. पण शब्दकोषही अनेक असतात. आणि इंग्लिशच्या बाबतीत तीच गंमत आहे की एकच एक उच्चार आदर्श मानला तरी इतर सगळे चूक असं काही नसतं. उदा: vitamin ला सहसा अनेक लोक व्हिटॅमिन म्हणतात पण काही कॉन्व्हेंटमधून शिकलेले व्हायटॅमिन म्हणतात. आता काय बरोबर आणि काय चूक ? अजून एक उदाहरण : मी संगीतातल्या Bass ला (Bass treble) नेहमीच बास म्हणत आलो, पण जिथे म्युजिक सिस्टीम्स विकल्या जातात त्या शोरुम मधले विक्रेते"बेस" म्हणतात म्हणजे कदाचित त्यांना तसेच ट्रेनिंग दिले गेले असावे.मला वाटू लागले की मीच चूकतोय की काय पण मध्यंतरी एका कॉन्व्हेंटमधून शिकलेल्या मित्राकडूनही "बास" असेच ऐकले .. मग बरे वाटले ..काही उच्चार काळानुरुपही बदलतात की काय कुणास ठावूक. असो. तसेच तुम्ही जे ‘करोना’ ( kuh-roh-nuh) म्हणताय तो इंग्लिश शब्दकोषातला उच्चार झाला (त्यात पण त्या ३ h चे काय करायचे ?) मराठी शब्दकोषातला नव्हे. जरी एखादा शब्द इंग्लिश असला तरी त्या शब्दाचा इंग्लिश भाषेतला उच्चार आणि मराठी भाषेतला उच्चार वेगळा असू शकतो. उदा. मराठीत जपान असा उच्चार आहे पण इंग्लिशमध्ये जापान. त्यामुळे इंग्लिश शब्दकोषाला प्रमाण बनवून मराठीतला उच्चार चूक वा बरोबर ठरवणे तितकेसे योग्य होणार नाही असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा