धोंडो केशव
body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}
.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}
.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}
#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}
.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}
मिपा दिवाळी अंक २०१९
अनुक्रमणिका
धोंडो केशव

“शिट यार, आजोबा, मी नुसते म्हणाले जरी असते की, मला आणखी फक्त दोन मिनिटे द्या चित्र पूर्ण करायला, तर मला नक्की वेळा मिळाला असता आणि माझा पहिला नंबर आला असता आजच्या स्पर्धेत. सगळे चित्र रंगवून झाले होते, फक्त थोडेसे फिनिश करायचे होते. ज्याला पहिला नंबर मिळाला, त्याचे चित्र अजिबातच भारी नव्हते.” कर्वे रोडवरच्या कर्वे पुतळ्याजवळ मी आणि नुकतीच कॉलेजला जाऊ लागलेली माझी नात बसची वाट बघत उभे होतो, तेव्हा ती मला सांगत होती.
“बोलता न आल्यामुळे माझे नेहमीच नुकसान होते. पण मी नाही बोलू शकत, या न बोलण्याच्या सवयीमुळे शाळेतही बाकीच्या चोंबड्या मुली भाव खाऊन जायच्या आणि मी मात्र उगाच मागे राहायचे. मी कधी सुधारणार आहे कोण जाणे?” माझ्या नातीला राग व्यक्त करण्याचे माझ्याशिवाय जास्त हक्काचे ठिकाण कोणतेच नव्हते.
“अगं, असे काही नसते. तुला माहीत आहे का? तुझ्याचसारख्या एका मुखदुर्बळ माणसाला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. तो असा माणूस होता, ज्याला स्वत:च्या मुखदुर्बळपणामुळे मॅट्रिकच्या परीक्षेला बसता आले नव्हते व त्यामुळे त्याचे एक वर्ष वाया गेले होते. हा माणूस एकदा गणितात नापास झाला होता आणि तरीसुद्धा तो गणिताचा प्रोफेसर होता.”
“आजोबा, गणिताच्या प्रोफेसरला भारतरत्न? हाऊ बोरिंग. गणिताच्या तासाला मला गणित येण्याऐवजी फक्त झोप येते. मला तरी माझे गणिताचे कोणतेच शिक्षक कधीच आवडले नाहीत. त्यांना कोणी भारतरत्न दिले तर मी पहिले जाऊन ते काढून घेईन.”
“या माणसाचे थोडे वेगळे होते. याचे एका ध्येय होते आणि आयुष्यभर तो आपल्या लक्ष्यापासून तसूभरही विचलित झाला नाही. तुमचे जरा ध्येय निश्चित असेल आणि ते गाठण्यासाठी कितीही कष्ट उपसण्याची तुमची तयारी असेल, तर ते ध्येय गाठण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही.”
“आजोबा, हा तर शाहरुख खानाचा डायलॉग झाला - अगर पूरी शिद्दत से किसी चीज़ को चाहो तो सारी कायनात आपको उससे मिलाने में जुट जाती है" दोन्ही हात जरासे लांब करत गुडघ्यात थोडेसे वाकत तिने तो जगप्रसिद्ध डायलॉग मला ऐकवला.
“अगदी तसेच या मनुष्याच्या आयुष्यात घडले होते. पण हा काही तुमच्या सिनेमाचा हिरो नव्हता शंभर शंभर लोकांशी एका वेळी लढणारा! तो होता एका सामान्य माणूस, ज्याच्याकडे प्रवाहाविरुद्ध पोहतानासुद्धा शक्य तेवढे प्रवाहाशी जमवून घेऊन आणि प्रवाहात जर काही डोह व भोवरे असतील तर ते शक्यतो टाळून आपली समाजसुधारणेची नौका नेटाने पैलतीराला नेण्याचे कसब होते. त्यांची जबरदस्त इच्छाशक्ती, दुर्दम्य आकांक्षा, कमालीची सहनशीलता, कोणत्याही गोष्टीने विचलित न होता निरंतर कार्यरत राहण्याची चिकाटी आणि कमालीची स्थिर बुद्धी यांचा त्यांना नेहमीचा उपयोग झाला. आक्रमक नसूनही सक्रिय व सफल समाजसुधारक म्हणून त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते.
आज तू जीन्स आणि टीशर्ट घालून, इथे रस्त्यावर उभे राहून, माझ्या खांद्यावर हात ठेवून मला 'शिट यार आजोबा' असे मोकळेपणे म्हणू शकतेस, याचे बरेचसे श्रेय त्यांनाही जाते, बरे का!”
माझ्या नातीची उत्सुकता चाळवली गेली आणि मग मला आत्ताच त्या माणसाची गोष्ट ऐकायची आहे असा तिने हट्ट धरला. मग तिथेच बस स्टॉपवर बसून मी तिला गोष्ट सांगायला लागलो.
या माणसाचा जन्म अठराव्या शतकात झाला. तो काळ असा होता, जेव्हा विधवांचे जीवन अतिशय खडतर होते. विधवा होणे हा जणू काही भयंकर मोठा गुन्हा आहे, अशी वागणूक त्या बिचार्या बाईला मिळायची. जी विधवा पतीबरोबर सती जायची नाही, तिच्यापुढे एकच पर्याय असायचा - लाचारीचे हालअपेष्टांचे व भयंकर हलाखीचे जीवन जगणे. विधवांचे जीवन म्हणजे दुसरा नरकाच जणू. हे असे जीवन जगण्यापेक्षा पतीबरोबर सती का गेलो नाही? असा प्रत्येक विधवा स्त्रीला पश्चात्ताप व्हावा असे भीषण आयुष्य पतिनिधानानंतर त्यांच्या वाट्याला येत असे. भरजरी वस्त्रे नेसून सौभाग्यलंकाराने नटलेली स्त्री पतिनिधानानंतर अपशकुनी होता असे. आपले डोके भादरून, लाल किंवा पांढर्या रंगाचे आल्वण नेसून अर्धपोटी राहत तिला तिचे बाकीचे आयुष्य व्यतीत करावे लागत असे. रस्त्यावरच्या कुत्र्यापेक्षाही तिची किंमत कमी होऊन जात असे.
विधवांची होणारी ही परवड लहानपणापासून बघत आलेल्या अण्णांच्या - धोंडो केशव कर्वे यांच्या - मनात त्यांच्या उत्थानासाठी काही तरी करावे अशी तीव्र इच्छा होती. विष्णुशास्त्री पंडित यांचे पुनर्विवाहासंबंधी लेख त्यांनी बालपणीच मुरुड येथे वाचले होते. मुरुडनंतर काही वर्षे अण्णा मुंबईत राहिले. येथे त्यांना अनेक चांगले मित्र मिळाले, ज्यामुळे त्यांच्या आयुष्याला एका दिशा मिळाली. त्यानंतर ते नोकरीनिमित्त पुण्यात आले. जिथे त्यांना गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले इत्यादी दिग्गजांचे कार्य जवळून पाहता आले.
मोठ्या सामाजिक परिवर्तनाचा तो काळ होता. कै. सीतारामपंत देवधर यांनी रचलेले एका पद केसरीत प्रसिद्ध झाले होते. अण्णांचे ते पद मुखोद्गत होते. पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदनाचे कार्य पाहून ते प्रभावित झाले होते. अनाथ बालिकाश्रम व विधवा विवाहोत्तेजक मंडळ सुरू करायचे, असे त्यांच्या मनात होते. एकीकडे फर्ग्युसन कॉलेजची नोकरी व सुट्टीच्या काळात संस्थेचा प्रचार करण्यासाठी दौरे असा अण्णांचा कार्यक्रम सुरू होता. दरम्यान अण्णांची प्रथम पत्नी निवर्तली आणि पुनर्विवाह केला तर तो विधवेशीच, असा अण्णांनी निश्चय केला.
आपल्या निरनिराळ्या भाषणात अण्णा एका मुद्दा तळमळीने मांडत - “गृहस्थाश्रमी जीवन स्त्रीसाठी तसेच पुरुषांसाठी सर्वोत्तम व इष्ट असते. म्हणून दुर्दैवाने विधवा झालेल्या आणि गृहिणीचे जीवन पुन्हा लाभावे अशी स्वाभाविक इच्छा बाळगणार्या कोणत्याही मुलीवर व स्त्रीवर कायमचे वैधव्य लादले जाऊ नये.”
कर्वे उत्तम वक्ते नव्हते, पण त्यांच्या भाषणात तळमळ इतकी होती की या विचाराने लोक भारावून जात. पण भाषणातून नुसता उपदेश देणे सोपे आहे, हेदेखील अण्णांना माहीत होते. विधवेशी पुनर्विवाह करण्याचा विचार त्यांनी मित्रांमध्ये बोलून दाखवला होता.
अण्णांचे मित्र नरहरपंत जोशी यांची बहीण गोदुबाई ही अकाली विधवा झाली होती. रमाबाईंच्या शारदा सदनाची ती पहिली विद्यार्थिनी. त्यांच्या मनातही पुनर्विवाह करण्याची इच्छा होती. ११ मार्च १८९३ रोजी अण्णांनी गोदुबाईंशी विवाह केला. येथपासून त्या आंनदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.
एका विधवेशी विवाह करण्याचे धाडस दाखवून कर्वे यांनी समाजाला मोठा धक्का दिला होता. त्याबद्दल त्यांना बरेच काही सहन करावे लागले. सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागले. त्यांची आई आणि थोरले बंधू यांचा जरी या विवाहाला पाठिंबा असला, तरी समाजाच्या रोषामुळे अण्णा त्यांच्या प्रेमाला पारखे झाले. पण अण्णांनी या रोषाचादेखीला शांतपणे स्वीकार केला.
यानंतर अण्णा झपाट्याने कामाला लागले व पुढच्या पाच वर्षांत त्यांनी सुमारे पाच विवाह जुळवून आणले. पण नुसत्या विधवा विवाहाने प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यांना शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे राहायला शिकवले पाहिजे, हे जाणून अण्णांनी अनाथ बालिकाश्रामाची स्थापना केली. या कार्यासाठी त्यांनी स्वत:च्या बचतीतून १००० रुपये दिले. सुरुवातीला मुलींच्या वसतिगृहात विधवांची सोय केली. पण आश्रमाची वेगळी जागा असावी असे अण्णांना वाटत असे. त्यांचे स्नेही श्री. गोखले यांनी त्यांची हिंगणे येथील ६ एकर जमीन या कार्यासाठी अण्णांना दिली आणि या जागेत ५०० रुपये खर्च करून एक पर्णकुटी बांधली. त्या वेळी तिथे एकूण आठ विधवा राहत होत्या. त्यांची व्यवस्था बघण्याची जबाबदारी अण्णांच्या प्रथम पत्नीची बहीण नर्मदाबाईंनी घेतली. हा अनाथ बालिकाश्रम म्हणजेच 'हिंगणे स्त्री शिक्षण संस्था' म्हणजेच आजची 'महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था.'
फर्ग्युसन कॉलेजमध्ये दिवसभर काम करून रात्री आणि पहाटे आश्रमातल्या मुलींना शिकवणे असा खडतर दिनक्रम त्या वेळी अण्णांनी अनेक वर्षे आनंदाने केला. पुणे ते हिंगणे हे अंतर ६ किलोमीटरचे, पण आजच्यासारखे रस्ते तेव्हा नव्हते. वाटेतले नदी-नाले आणि पावसाळ्यात तर चिखल तुडवीत जावे लागे. ज्या वस्तू हिंगण्यात उपलब्ध नसत, त्यांचे पाठीवर ओझे घेऊन अण्णा अनेक वर्षे या वाटेवरून चालले.
१९०५ सालापासून संस्थेला बरे दिवस येऊ लागले. दूरदूरहून लोक येत व संस्था पाहून समाधान व्यक्त करत. यात सामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या पदावरील अधिकार्यांचा व धनिक लोकांचाही समावेश असे. पण अण्णांच्या घरचे मात्र कोणी हा आश्रम पाहायला आले नव्हते. अण्णा विशेषत: त्यांचे वडील बंधू व आई यांची वाट पाहात होते.
एकदा पंढरपूर यात्रेच्या वेळी अण्णांनी भावाला पत्र लिहिले की 'पुण्यात येत आहात तर आश्रम पाहून जा. माझ्या घरी मुक्काम करा असा आग्रह नाही.' अतिशय मनापासून लिहिलेले ते पत्र वाचून भावाचे मन गलबलले आणि त्यांनी पुणे मुक्कामी आईसह अण्णांची भेट घेतली, आश्रम पाहिला व समाधान व्यक्त केले. अण्णा भरून पावले.
मुरुडकरांनी त्यांच्यावर सुरुवातीला बहिष्कार घातला, पण हळूहळू त्यांचा स्वीकार केला. त्यांच्या कार्याला एका निश्चित आकार येत गेला आणि समाजमान्यताही मिळू लागली. पण याकरिता त्यांना अनेक वर्षे स्थितप्रज्ञापणे एकट्याने वाटचाल करावी लागली.
आश्रमाचा व्याप वाढता होता. अण्णांची ओढाताण होत होती, म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नोकरी सोडायची असा विचार त्यांच्या मनात होता. पण तशात एक घटना घडली. रत्नागिरीच्या एका गृहस्थाने आपल्या १४, १२ व १० वर्षांच्या तीन मुलींना बालिकाश्रामात प्रवेश हवा म्हणून अर्ज केला. त्यांची मोठी मुलगी विधवा होती, पण तिच्यासह बाकीच्यांनाही शिकवण्याची त्यांची इच्छा होती. यातूनच मग अण्णांच्या मनात महिला विद्यालयाची कल्पना आली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने लाकडी पुलाजवळ असलेल्या वाड्यात महिला विद्यालय सुरू करण्यासाठी त्यांना सहकार्य केले आणि महाराष्ट्रातील नव्हे, तर देशातीला महिलांच्या प्रगत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. १९०७ साली सहा विद्यार्थीनींसह हे महिला विद्यालय सुरू झाले व परत एकदा अण्णा त्याकरिता फंड जमवण्याच्या कामात व्यग्र झाले.
१९११ साली हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रामाच्या शेजारीच निवासाची सोय असलेली महिला विद्यालयाची नवी इमारत बांधण्यात आली. आश्रामातीला विद्यार्थिनींनी शिकून केवळ आपला चरितार्थ न चालवता आपल्या देशभगिनींसाठीही उपयोगी पडले पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती. आपल्या सामाजिक कार्याला आध्यात्मिक अधिष्ठान मिळाले पाहिजे असे त्यांना नेहमी वाटे. त्यासाठी निष्काम कर्म मठाची स्थापना करण्यात आली.
जपानमधील महिला विद्यापीठाचे एक परिपत्रक अण्णांच्या वाचनात आले आणि भारतातही असे विद्यापीठ असावे अशी त्यांच्या मनात योजना सुरू झाली. स्वतंत्र महिला विद्यापीठाची गरज नाही असे अनेक विचारवंतांचे तसेच अण्णांच्या अनेक सहकार्यांचे मत होते. पण अण्णांचे या बाबतीत विचार वेगळे होते. अनेक जणांना भेटून सभा घेऊन, विचारविनिमय करून ३ जून १९१६ रोजी भारतातील पहिले महिला विद्यापीठ आकारास आले आणि भारतात महिलांच्या उच्चशिक्षणाचे क्रांतिपर्व सुरू झाले.
सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी या विद्यापीठाला वार्षिक ५२,००० रुपये निरंतर देण्याचे मान्य केले. 'श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ' असे या विद्यापीठाचे नामकरण करण्यात आले. या मदतीच्या जोरावर अनेक नव्या शाळा व हायस्कुले, तसेच वसतिगृहे स्थापन करण्यात आली. देशभर आता विद्यापीठाचे नाव झाले होते. विद्यापीठाच्या कुलसचिवांनी आपल्या एका अहवालात मोठ्या आत्मविश्वासाने लिहिले होते - 'महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ असणे इष्ट की नाही हा प्रश्न विचारण्याची गरजच आता उरली नाही. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी आता कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.'
आपल्या आत्मावृत्तात अण्णा लिहितात, 'मी केलेले प्रयत्न अगदीच वाया गेले नाहीत. उच्च आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांकडून मिळालेल्या देणगीच्या जोरावर जगात स्थापन झालेले हे अशा प्रकारचे एकमेव विद्यापीठ आहे, याचा मला अभिमान वाटतो.'
कर्वे यांची चारही मुले रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर यांनीही पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले. त्यांचे जेष्ठ पुत्र रघुनाथ कर्वे यांची ओळख तर 'भारताले संततिनियमनाचे आद्य प्रवर्तक' अशीआहे. समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन व लैंगिक शिक्षण यांविषयी त्यांचे कार्य अतिशय मोलाचे आहे. कुटुंबनियोजन, संततिनियमन हे शब्दही ज्या काळी निषिद्ध मानले जायचे, त्या काळात रघुनाथरावांनी या विषयाचा प्रचार करून जनजागृती घडवून आणायचे कार्य केले.
पुणे महानगरपालिकेने अण्णांच्या कार्याची दाखल घेतली. ज्या रस्त्याने अण्णांनी झोळी घेऊन चार चार आणे वर्गणी गोळा करण्यासाठी डेक्कन ते हिंगणे अशी अगणित वेळा पायपीट केली, त्या रस्त्याला अण्णांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त 'महर्षी कर्वे पथ' असे नाव देण्यात आले. तसेच हिंगण्याचे नामकरण 'कर्वे नगर' असे करण्यात आले. अण्णांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा कर्वे रस्ता म्हणजे महिला शिक्षणाची मूळ पायवाट आहे.
अण्णांच्या आयुष्यात लहानपणापासूनच कसोटीचे अनेक क्षण आले. त्यांचा काळात मॅट्रिकची परीक्षा फक्त शहराच्याच ठिकाणी होत असे व त्यासाठी वयाची १६ वर्षे पूर्ण असावी ही अट असे. अण्णांनी या परीक्षेची ज्या वर्षी तयारी केली, त्या वर्षी कोकणात मुसळधार पाऊस कोसळत होता. मुंबईला जाण्याचे सगळे रस्ते बंद झाले होते. म्हणून अण्णा आणि त्यांचे काही मित्र सातार्याला पायी निघाले. वाटेत अनेक अडचणींचा सामना करत तीन दिवसांच्या प्रवासानंतर अण्णा परीक्षेच्या ठिकाणी पोहोचले. पण परीक्षाधिकाऱ्याने त्यांच्या लहानखुऱ्या अंगकाठीकडे बघून ते १६ वर्षांचे असूच शकत नाहीत असे अनुमान काढले व त्यांना परीक्षेला बसू दिले नाही. वास्तविक अण्णांकडे त्या वेळी वयाचा दाखलाही होता. पण "तो पाहून मला परीक्षेला बसू द्या" असे काही त्यांच्या तोंडून निघाले नाही. पुढील वर्षी त्यांनी परत प्रयत्न केला व परीक्षा पास झाले.
असे कसोटीचे क्षण त्यांच्या आयुष्यात वारंवार येत राहिले. पुढे अनाथ बालिकाश्रामाच्या स्थापनेला झालेला विरोध, बाया कर्वे यांच्याशी विवाह केला म्हणून घातला गेलेला सामाजिक बहिष्कार, हिंगणे ते डेक्कन ते पेरूगेट अशी रोजची पायपीट. पण अण्णा मोठ्या धीराने या सगळ्याला सामोरे गेले.
पण सर्वात कठीण प्रसंग म्हणता येईल तो म्हणजे सर विठ्ठलदास ठाकरसी यांच्या निधनानंतर त्यांच्या ट्रस्टींशी झालेल्या गैरसमजुती, ज्यामुळे विद्यापीठाला मिळणारी सालाना ५२ हजाराची देणगी रोखली गेली. पण याही प्रसंगाला अण्णा तेवढ्याच शांतपणे सामोरे गेले आणि सामोपचाराने, व थोडेसे पडते घेऊन त्यांनी तो वाद मिटवला.
१९३७ सालापासून त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार खेड्यापाड्यात करायला सुरुवात केली. अनेक शाळांना वेळेवेळी अनुदाने देऊन शाळांचे एका जाळे निर्माण करायच्या कामाला ते आता लागले होते. स्वातंत्र्यानंतर सरकारने अनुदाने सुरू करेपर्यंत त्याच्या संस्थेतर्फे ही अनुदाने दिली गेली.
सामाजिक समता निर्माण करण्यासाठी त्यांनी समता संघाची स्थापना केली, ज्याचे कार्य दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू होते.
त्यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त फलटणच्या राजे निंबाळकर यांनी त्यांच्या भव्य सत्कार केला व त्यांना दरमहा ६०० रुपये वेतन देण्याचे ठरवले. स्वतंत्र्यानंतर संस्थान बरखास्त झाले, तरी हे वेतन मात्र सुरूच राहिले.
भारत सरकारनेही त्यांच्या कार्याची दखल घेतली. १९५५ साली त्यांना पद्मविभूषण हा किताब प्रदान करण्यात आला, तर त्यांच्या शतक महोत्सवाच्या वर्षीच - म्हणजे १९५८ साली त्यांना 'भारतरत्न' या सर्वोच्च किताबाने गौरवण्यात आले. त्यांना १०४ वर्षांचे भरघोस आयुष्य लाभले, ज्याच्या प्रत्येक क्षण त्यांनी आपल्या जीवन कार्यासाठी वाहिला.
आपल्या आत्मचरित्राच्या अखेरच्या भागात अण्णा लिहितात, 'पुनर्जन्माच्या कल्पनेत जर सत्य असेल व अंतकाळीच्या वासनेवर जर तो पुनर्जन्म अवलंबून असेल, तर जगपालकाने माझे या कार्यावरील प्रेम अधिकाधिक वाढवावे व जन्मोजन्मी मला या कार्यासाठी तन मन धन अर्पण करण्याची बुद्धी द्यावी, अशी मी त्याजवळ याचना करतो.'
“आजोबा, तुम्ही मघाशी गोष्ट सांगताना केसरीत आलेल्या एका कवितेचा उल्लेख केला होता. तुम्हाला ती कविता माहीत आहे का?” माझ्या नातीने मला विचारले.
“हो, माहीत आहे ना! दिनांक १२ जून १९८३ रोजी केसरीच्या अंकात सीतारामपंत देवधर यांची ही कविता प्रसिद्ध झाली होती.. ऐक....
विचार सोडून अविचाराते निशिदिनी जन हो का वरिता?
मानवधर्मा अनुचित ऐसे गतानुगतिकचि का होता?
डोळे जाउनी दंतहि पडुनी केशा आली पंडुरता,
साठी उलटुनि काठी झाली, स्थायिक जरी उठताबसता?
तरुण समजुनी तरिही त्यासी द्वितीय विवाहा मत देता,
पंचमवर्षा विधवा बाला असुनी तियेते नाडविता!
ओढविले हे पूर्वजन्मीचे पाप म्हणुनि तिस समजाविता
पुरुषांना परि धर्मतत्त्व हे लागू कधीही नच करिता!
स्वेच्छेने संन्यासी होती कैक तया मधि तुम्ही पहातां
सोडुनि भजना हरिच्या निशिदीनिं विषयसमुद्रामधिं रमतां
प्रभाव ऐसा मदनाचा पूर्ण तुम्ही जाणत असता
षोडशवर्षा तरुणी सांगा दिन कशी कंठील पती नसता?
सुशील पतिरत असुनी भार्या वारविसासिनिरत होता,
नवल कशाचे तरि मग विधवा गर्भवती दॄष्टीस पडता?
विषयवासना तारुण्यामधिं नैसर्गिक केवल असता,
नष्ट कराया ब्रह्म उपाधी व्यर्थ करुनिया का शिणता?
माता श्रमली प्रतिदीनिं ज्यांते न्हाउनि माखुनि वाढवितां,
जीवप्राण जे असती युवतीते हर्ष बहु ज्या शोभवितां,
कांत अवडिने वेणि फुलांची झाला ज्यांवरी निशिं रचिता
त्या केशांते कां हो चरचर नापितहस्ते कापवितां
करणी करुनी क्रूर अशीही धर्मात्मे हे पद घेता
निष्ठुर निर्दय दुष्ट घातकी कसब केवळ मज गमतां!
हालअपेष्टा दुसऱ्या अगणित बाला भोगिति पती मरतां
सवयहृदय जन कनवा न गाली अश्रू त्यांते आठविता?
फार काय वदू वाटे छलना विधवांची ही मनि आणितां
हृदयद्रावक सहगमनाचा मार्गही बरवा या परता!
शोभत नाही तुम्हा खचित हे दोषांचे का धनी होता?
दु:खसमुद्री ढकलीतसां कां अपराधाचा लव नसता?
पुरे गांजणूक, कीव येउ द्या अनाथ भगीनिंची आतां !
पुनर्विवाहा संमति द्या हो सांडुनि मनींची निर्दयता
श्रेयनिर्देश: प्रकाशचित्रे आंतरजालावरून साभार.

.png)



