दृष्टीच्या विधा - एका बहुआयामी कलाप्रदर्शनाचे स्पर्शग्रहण
body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}
.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}
.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}
#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}
.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}
मिपा दिवाळी अंक २०१९
अनुक्रमणिका
दृष्टीच्या विधा - एका बहुआयामी कलाप्रदर्शनाचे स्पर्शग्रहण

रसिकाने कानाने आस्वाद घ्यावे असे संगीत असते, जिभेकरिता पक्वान्ने, नाकाकरिता अत्तरे, नेत्रसुखाकरिता चित्रे असतात -- सगळ्या ज्ञानेंद्रियांचे चोचले पुरवणारे कलांचे प्रकार असतात, पण बिचाऱ्या स्पर्शाला कलाविश्वात एरवी काही भाव मिळत नाही. कधीकधी म्यूझियममधल्या एखाद्या चित्राचा पोत आणखी आर्तपणे अनुभवायला मला त्याच्या जवळात जवळ जायचा मोह होतो, पण "चित्रापासून लांब व्हा!" रखवालदारांची ताकीद ऐकून ओशाळून परत चार पावले मागे सरकावे लागते. वस्तुसंग्रहालयात बहुतेक शिल्पे तर काचेच्या पेटीत बंदिस्त असतात. या 'अस्पृश्य' धोरणाचे मी एकदा पाहिलेले हसावे-की-रडावेसे उदाहरण सांगतो : वॉशिंग्टनमधील हर्शहॉर्न म्यूझियममध्ये २०१० साली ईव क्लाइन (Yves Klein १९२८ - १९६२) याच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरले होते, त्यात त्याचे 'Wooden box, various objects inside' हे शिल्प ठेवलेले होते.

(ईव क्लाईनच्या कलाकृती, मूळ संकेतस्थळाचा दुवा)
चित्रात दिसत असलेल्या लाकडी खोक्यातल्या भोकांमधून हात आत घालून आतील वस्तू हाताळून अनुभवाव्यात, हा शिल्पकाराचा मूळ हेतू माहितीपत्रकावर लिहिला होता, पण शिल्पाच्या भोवती दोरीचे कुंपण करून सूचना होती की शिल्पाची नासधूस होऊ नये म्हणून स्पर्श करू नका!
एकुणात कलाकृती ही डोळ्यांनी दुरून साजरी करण्यासाठी असते, स्पर्श वर्ज्य असतो, अशी धारणा आपल्यावर बिंबवली जाते, आणि ही एक संवेदना अतृप्त राहते. दृश्य-एके-दृश्य आस्वादाच्या एकाधिकारशाहीमुळे म्या डोळसाची तरसलेली बोटे शिवशिवतात, तर अंध लोकांची किती कुचंबणा होत असेल, त्याची कल्पनाच करवत नाही. म्हणूनच एका अंध मैत्रिणीने मला माहिती दिली की आपल्या शहरातच दृश्य-स्पृश्य कलाकृतींचे एक प्रदर्शन भरणार आहे, तेव्हा तिथे जाण्याबद्दल माझा उत्साह आणि कुतूहल उचंबळून आले. माझ्या मैत्रिणीला आमच्याच बॉल्टिमोर शहरात असलेल्या यू.एस.च्या राष्ट्रीय अंध संघाच्या (National Federation of the Blindच्या) मुख्यालयातून नियमित बातमी मिळते, त्यांनी या प्रदर्शनाला साहाय्य करायचे ठरवले होते. काही अंध आणि काही सनेत्र कलाकार मिळून प्रदर्शनातल्या कलाकृती सादर करणार होते.
मी आवर्जून या 'दृष्टीच्या विधा' (Ways of Seeing) प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या दिवशी गेलो. समारंभासाठी उपस्थित कलाकार आणि अंध संघाचे एक अधिकारी मार्क ए. रिकोबोनो यांचा मिळून एक परिसंवाद झाला, तो ऐकून मला त्यांची भूमिका अधिक समजली. अंध संघाचे एक उद्दिष्ट आहे की समाजात अंध लोकांना अधिकाधिक सहभाग घेता यावा. मात्र आज बहुतेक कलासंग्रहालयांत 'अंध लोकांकरिता सुरक्षित' असा विभागही नसतो, अंध लोकांनी आस्वादायच्या कलांचे प्रदर्शन तर मग दूरची गोष्ट. 'अंध लोकांकरिता सुरक्षित' असा मुद्दाही पुढे करायला अंध संघाच्या मुत्सद्द्यांना धोक्याचे वाटते, कारण संवाद मैत्रिपूर्ण होण्याऐवजी कलासंस्थांमधले लोक या भीतीने मागे होतात, की अंध संघ 'असुरक्षित ठिकाण' म्हणून आपल्यावर खटला चालवायला बघतो आहे की काय? खरे तर अंध संघाला शत्रू नव्हे, तर सहयोगी होऊन कलासंग्रहालयांशी हातमिळवणी करायची आहे, की एखादे दालन तरी अंध लोकांच्या आस्वादाकरिता योजना करून उपलब्ध असावे. परंतु सध्या तरी त्यांना फारसे यश मिळत नाही. म्हणूनच अंध-सनेत्र कलाकारांच्या सहयोगाने मुद्दाम स्पर्शायला केलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनाला त्यांनी लगेच पाठिंबा दिला, जेणेकरून या विषयावर बातचीत तरी सुरू व्हावी.
तिथल्या कलाकारांनी सांगितले, "आम्ही खोटेखोटे सांगत नाही, खरोखर प्रत्येक वस्तूला हात लावा! फक्त दूरून पाहून आमचे प्रयोजन विफल करू नका!" त्यांनी दिलेल्या आज्ञेची अंमलबजावणी करत-करत मी हात लावलेल्या काही कलाकृतींची उदाहरणे देतो.
हे पुढील चित्र आहे जॉर्ज वुर्त्झेल या अंध कलाकाराने केलेल्या टेबलावर ठेवायच्या दिव्याचे. यात लाकडाचा ठोकळा उकलून आतल्या गाठींची ओबडधोबड गोळेगोळाई मुलायम पॉलिश केलेली होती. माझ्या फोटोच्या आधाराने कल्पना करा, की बोटांनी गोंजारताना लाकूड कसे जाणवत असेल. दिव्यात गोळा बसवलेला होता, साखळी ओढून नेहमीसारखा लावता-विझवता येत होता. ही कलाकृती रोजच्या उपयोगाची म्हणून वापरता यावी हा कलाकाराचा हेतू होता.
Wurtzel Lamp
(जॉर्ज वुर्त्झेलच्या कलाकृती, मूळ संकेतस्थळाचा दुवा)
या दिव्याला हात लावताना मला पुन्हा जाणवले की आजवर माझ्या स्पर्शास्वादाकरिता अभावितपणे साहित्य पुरवणारे कारागीर म्हणजे उपयुक्ततावादी सुतार आणि इमारतींचे पाथरवट हे लोक होत. जड शिसवाच्या लाकडाने बनवलेली कमानदार टेबलखुर्ची हात लावून लोण्यासारखी मुलायम लागते. एखाद्या दोनशे वर्षे जुन्या सरकारी इमारतीचा जिना उतरताना मी नेहमी नक्षीदार संगमरवरी कठड्यावरून हात घसरत आणतो. बांधकामाचे कारागीरच नव्हे, तर त्या जिन्यावरून गेलेल्या हजारो-लाखो लोकांची बोटे त्या दगडातून अलगद शिवतात.
रोजच्या वस्तूंमधून मिळणाऱ्या स्पर्शसुखापासून चित्रविचित्र बहुआयामी अनुभव देणाऱ्या जुगाड-शिल्पापर्यंत प्रवास करणार्या अशा सिंडी छंग यांच्या कलाकृती होत्या (कलाकाराच्या संकेतस्थळाचा दुवा). सकृद्दर्शनी दिसणारा सांगाडा एका कपडे टांगलेल्या कपाटाचा होता.

या टांगलेल्या नेहमीच्या कपड्यांना हात लावून आपल्याला जाणवावे, की रोज सकाळी अंधारात आपण चाचपडून आपल्याला आवडणाऱ्या वेगवेगळ्या पोताचे कपडे गोळा करतो, किंवा दिवा लावून आपल्या आवडीने जमवलेले वेगवेगळे रंग बघतो, हा दररोजचा सौंदर्यानुभव असतो. जरा अधिक लक्ष देऊन शोध घेता आपल्याला जाणवतात छंग यांनी आजूबाजूला घडवलेल्या विरळा, मग असामान्य वस्तू - गंगावन, ते अडकवलेल्या कडीवर चेहऱ्याचे शिल्प, मग लाल निखारे असलेल्या दिव्यांचे तंदूरासारखे काहीतरी...
छंग यांचे आणखी एक शिल्प स्पृश्य-दृश्य-श्राव्य असे त्रिविध होते.

एका टेबलावर लाकडाच्या नाल्यांचा विविधरंगी भूलभुलैया बनवला होता, हे दृश्य शिल्प. त्यात स्टीलचे गोळे खेळवता येत होते, हे स्पृश्य असे चलत-शिल्प. टेबलावरची एखादी कांडी हलता त्याला जोडलेला टेबलाखालील घंटांचा नाद होत होता. टेबलावरचे ट्यूनिंग फोर्क मुद्दामून वाजवून टेबल विविध नादांनी आंदोलित करता येत होते, हे श्राव्य.

या दोन्ही कलाकारांनी उद्घाटनाच्या परिसंवादात भाग घेतला. शिल्पाचा दृश्य भाग काय असणार आहे, स्पृश्य भाग काय असणार याबाबत त्यांच्या चर्चा, वादविवाद, समेट, यांच्याबाबत दोघींनी खुमासदार वर्णन केले.
परिसंवादानंतरच्या प्रश्नोत्तरात मी चर्चामंडळाला एक पसरट शंका विचारली. "स्पर्शज्ञान हे दृष्टीपेक्षा खरे असते, कारण आस्वादकाचा कलाकृतीशी प्रत्यक्ष संपर्क होतो. पण हाच संपर्क कलाकृतीला बदलतो. कितीही काळजी घेतली, तरी आपण धसमुसळे असतो. ज्ञानार्जनाच्या सर्व विधांपैकी स्पर्श हा सर्वाधिक विनाशकारक आहे. आस्वादक म्हणून आमच्याकडून तुम्हा कलाकारांची काय अपेक्षा आहे? आणि आपल्या कलाकृती स्पर्शास्पर्शानी झिजत आहेत, नष्ट होत आहेत त्याचे तुम्हाला दु:ख होते का?"
वुड्स् मिश्कीलपणे म्हणाल्या की "अंध लोक आयुष्यभर स्पर्शाचा जोर कमीअधिक करून काहीही तोडफोड न करता आजूबाजूच्या जगाला जाणतात. तुम्हा सनेत्र आस्वादकांनीही तसेच स्पर्शायला शिकावे." नंतर जेन्किन्स यांनी गंभीर मुद्द्याचा खुलासा केला. जगातल्या यच्चयावत वस्तू नाशिवंत आहेत, तशीच आपली कलाकृती नाशिवंत आहे. आस्वादकांच्या स्पर्शाने झिजणे, आणि बदलत बदलत नाहीसे होणे हीच कलाकृतीची सद्गती होय.
---
Ways of Seeing प्रदर्शन बॉल्टिमोर, मेरीलँड, यू. एस., येथील Gallery CA येथे जून ७ ते जुलै २०, २०१९ दरम्यान घडले. http://www.sarahbmccann.com/ways-of-seeing.php

.png)