Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत निरंजन घाटे यांचे विचार

प
प्रकाश घाटपांडे
Wed, 07/17/2019 - 06:03
🗣 119 प्रतिसाद
एक जुना किस्सा आठवतो. अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राला निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले १) निरंजन घाटे हा ही माणूसच आहे २) त्यांची त्या मागील भूमिका विचारुन न घेताच टीका करणे वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही व ते मला योग्य वाटत नाही. ३) एवढ्या एका कारणामुळे त्यांनी मराठी विज्ञान साहित्यात दिलेले योगदान लगेच विसरलात काय? ४) कुटुंबातील कुणाच्या तरी वतीने ते प्रतिनिधी या नात्याने पण आले असतील तर? परिणामी मी निरंजन घाट्यांची वकिली करतो म्हणून मलाच वाळीत टाकायला सुरुवात केली. त्यानंतर बर्‍याच वर्षांनी मी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर एकदा निरंजन घाट्यांकडे भेटायला गेलो.गप्पांमधे त्यांना हा किस्सा सांगितला. मला त्यांचे मत जाणून घ्यायचे होते.त्यांचे लहानपण त्या भागात गेले होते. अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत. हाच तो सर्वसामान्य माणूस असल्याचा भाग होता. नंतर एकदा पुस्तक पेठेत ते भेटले होते. त्यावेळी ही गप्पात अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय निघाला त्यावेळी ते म्हणाले कि.समाज बदलायला पुरेसा वेळ दिला पाहिजे. मी त्यावर लिहिल आहे. वाचत सुटलो त्याची गोष्ट या पुस्तकात ते म्हणतात," गार्डनर चे पुस्तक आणि जॉन ग्रँट च ‘ बोगस सायन्स ऑर व्हाय पिपल रियली बिलीव्ह दीज थिंग्ज ‘ हे पुस्तक वाचताना मला नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव यांच्या पुस्तकांची आठवण झाली. मी या दोघांचीही बरीच पुस्तके वाचली आहेत. श्याम मानव यांची आणि माझी 1978 च्या सुमारास नागपूर मध्ये ओळख झाली. त्यांच्या कार्याचे महत्व मी जाणतो. नरेंद्र दाभोळकरांची आणि माझी ही ओळख होती. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे व्रत प्राणपणाने घेतलं होतं आणि त्यातच त्यांचा बळी गेला. पहिल्या अंधश्रद्धा निर्मूलन संमेलनात त्यांची माझी भेट झाली तीच शेवटची. त्यानंतर महिन्याभरातच त्यांचा मृत्यू झाला. संमेलनातल्या माझ्या भाषणातील मुद्दे आणि त्यांचे विचार जुळणारे नव्हते, तरी त्यांच्या कार्याबद्दल मला आदर होता. त्यांनी माझे विचार ऐकून घेतले. त्यावेळी त्यांनी निरोप देताना ‘आपले विचार एकाच प्रकारचे आहेत,पण आपले मार्ग भिन्न आहेत’ असे म्हटले होते. कुठलीही चळवळ पुढे रेटायची तर नेता आक्रमक असावा लागतो, तरच चळवळ पुढे जाते. मात्र बऱ्याचदा या आक्रमकपणाला, क्रियेला तितकीच आक्रमक प्रतिक्रिया अशा स्वरूपाचं उत्तर मिळतं. दोन्हीही पक्ष अधिक कडवे होत जातात. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने पुढे देवाला विरोध करायचे सोडले आणि बुवाबाजीला विरोध सुरू केला. मग अनेक बुवा उघड केले . पण बुवांकडे जशी अमाप संपत्ती जमली होती तशी चळवळीकडे नव्हती हे एक, आणि या चळवळीच्या नेत्यांच्या पुस्तकांची भाषा अगदी कोरडी होती. त्यात एक प्रकारची भावना शून्यता असे. तुलनेने मला मार्टिन गार्डनर , जॉन ग्रँट यांची पुस्तके आदर्श वाटतात.ती वाचकाला आपलं करतात. अंधश्रद्धेबाबत माझ म्हणण थोडं वेगळं आहे.ती गेली कित्येक शतकं समाजात रूढ आहे.ती एका दिवसात जाणार नाही. अशाश्वत जीवन, दारिद्र्य आणि सततची चिंता यामुळे अंधश्रद्धा वाढीस लागते.’ गप्पी मासे पाळा आणि मलेरिया पळवा’अशी घोषणा देता येते. अंधश्रद्धा पळवणारे गप्पी मासे मिळत नाहीत. त्यापेक्षा हळूहळू अंधश्रद्धेच्या पाईकांना फितूर करता आले तर आपोआपच अंधश्रद्धेला म्हणजे मूलतः बुवाबाजीला भगदाड पडतील असे मला वाटते. अंधश्रद्धेचा आणि विज्ञानाचा तसा जवळचा संबंध नाही. अंधश्रद्धा हा मानसशास्त्राचा भाग आहे. ती दूर करायची तर त्यासाठी भक्तांची मनोधारणा बदलणं महत्त्वाचं ठरतं. माझे हे विचार मी स्पष्टपणे मांडत आलोय आणि हळूहळू अंधश्रद्धेवर सतत सौम्य हल्ले चढवत आलोय. मी भू शास्त्राचा विद्यार्थी असल्याने वाहतं पाणी खडकांवर कसा कसा परिणाम करते याची मला कल्पना आहे. विज्ञान लेखन हेच काम करतं .श्रद्धा मानवी जीवनाला घातक असती तर ती उत्क्रांतीत कधीच नष्ट झाली असती.पण ती टिकली. मात्र, ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत’ या न्यायाने श्रद्धेचा अतिरेक होण्यापासून समाजाला वाचवण हे महत्त्वाचं ठरतं . मार्टिन गार्डनर आणि जॉन ग्रँट यांनी हे काम लेखणीद्वारे कसं करावं याचा आदर्शच घालून दिला आहे ."

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 56876 views

🗣 चर्चा (119)
आ
आनन्दा गुरुवार, 07/18/2019 - 15:30 नवीन
गांधींच्या अनुभवानंतर माझ्या मते विचार संपवण्यासाठी माणूस मारण्याचा मूर्खपणा कोणी करेल असे वाटत नाही. जर तसा तो सनातन ने केला असेल तर ते समजून घेणे माझ्या क्षमतेच्या बाहेर आहे. पण माझे अनेक मित्रा सनातन चे साधक आहेत, आणि ते मुंगी सुद्धा मारत नाहीत. त्यांचा लढा सूक्ष्म पातळीवर आहे, त्यांना व्यक्ती मारण्यात रस नाही. व्यक्तिमागील प्रेरणा आणि ऊर्जा मारण्यात रस आहे. माणूस मेला तर त्याला सहानुभूती मिळते हे ते पूर्णपणे जाणून आहेत. त्यामुळे मी या बाबतीत सनातनला पूर्णपणे निर्दोषत्व देतो, किमान माझ्यापुरते तरी.
  • Log in or register to post comments
स
संगणकनंद Sun, 07/21/2019 - 05:44 नवीन
व्यक्तिशः मला सनातन चे विचार जरी पटत नसले तरी त्यांची साधनाशुचिता वादातीत आहे माझ्यालेखी.
जमलं तर निसर्गदत्त महाराजांचे "I am that" हे पुस्तक किंवा रमण महर्षी यांच्या आश्रमाने प्रकाशित केले त्यांचे संवाद वाचा. कदाचित, साधना काय असते हे तुम्हाला नव्याने कळेल.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/18/2019 - 07:05 नवीन
काही लोक वयपरत्वे म्हणजे जस्ं जस्ं वय वाढत चालतं तसं तसं श्रद्धाळु होत जातात, स्पष्टच सांगायचंच तर जगरहाटीतल्या अनुभवांनी पिचल्यावर लोक देवधर्माकडे वळतात असे वाटते. अर्थात त्या बाजूला वळतात म्हणजे त्यांनी काही गुन्हा केला असे वाटत नाही. हा ज्याच्या त्याच्या आनंदाचा भाग आहे. पण,आयुष्याच्या मध्यावर देवाशी भांडण असणारे, त्यांच्याशी टक्कर घेणारे हळूहळू हरिभजन, स्मरण, नामस्मरण, याकडे वळतात असे वाटते. -दिलीप बिरुटे (मध्यातून उत्तरार्धाकडे दृष्टिक्षेप टाकणारा) :)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/18/2019 - 07:21 नवीन
हे बदल मेंदुतील जैवरासायनिक प्रक्रियेमुळे होत असतात. मेंदुतला माणूस पुस्तकात या विषयी अधिक माहिती आहे. मे.पु रेग्यांचे विवेकवाद विज्ञान आणि श्रद्धा हे ही पुस्तक जरुर वाचा
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/18/2019 - 07:22 नवीन
मेंदुतला माणुस
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/18/2019 - 08:13 नवीन
"देव अस्तित्वात नाही आणि देवाने हे विश्व निर्माण केलेलं नाही," असं म्हणना-या स्टीफन हॉकिंगच्या मेंदूत असे बदल का झाले नसतील असे मला राहुन राहुन वाटते. आपण सुचवलेलं पुस्तक सवडीने वाचेन. मला स्वत:ला मात्र हे सगळे 'मनाचे खेळ' वाटतात. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/18/2019 - 08:40 नवीन
मला स्वत:ला मात्र हे सगळे 'मनाचे खेळ' वाटतात. >> हीच मेंदुतील जैवरासायनिक प्रक्रिया आहे अस मी वर म्हटलय. गॊड डिल्युजन हे डॊकिन्सच पुस्तक मुग्धा कर्णीक यांनी मराठीत अनुवादित केल आहे. ते ही जरुर वाचा. अस्तिक नास्तिक असे बाउंडरी लाईन वाले कंपार्टमेंट नसतात. ते स्केलवर घेतल आहे त्यांनी. काळी पांढरी विभागणी ही खूपच बाळबोध असते.पण आकलनाच्या प्राथमिक टप्प्यावर त्याचा उपयोग होतो.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/18/2019 - 07:21 नवीन
शनिला तेल वाहणे आणि अंधश्रद्धा याचा काय संबंध? ----------------- अनिसला किंवा दुसऱ्या कुणाला नकोशी वाटणारी अंधश्रद्धा कोणती? ---------------------------- निरंथन घाटे ज्या अंधश्रद्धेवर टीका करत होते ते कोणते मुद्दे? -----------------------
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 07/18/2019 - 08:14 नवीन
हे जग देवाने निर्माण केले आहे आणि त्याचे नियंत्रण सुधा तोच करतो अशी माणसाला वाटत कारण अजुन सुद्धा जगातील खूप गोष्टी कशा घडतात ह्याचे कोडे मानव सोडवू शकला नाही . जगाचा कोणीतरी निर्माता आहे हे समजणे श्रद्धा आहे की अंध श्रद्धा . विज्ञान सुद्धा जग कसे निर्माण झाले हे शोधत आहे ते आणि जे प्रमेय मांडले आहेत त्यात सुद्धा तर्काचाच भाग आहे . जीव कसा निर्माण झाला हे विज्ञान सांगते . पण प्रतकाशात प्रयोग शाळेत जिवनिर्मितच्या काळातील वातावरण निर्माण करून मुंगी एवढं सुद्धा जीव निर्माण केलेल्या च उदाहरण नाही . विज्ञान आणि आस्तिक असणे हे परस्पर विरोधी वर्तन नाही दोन्ही समांतर विचार आहेत . पण विज्ञान वादी असण्याच सिद्ध करण्यासाठी नास्तिक असणे हे बिलकुल गरजेचं नाही . धर्मात म्हणजे हिंदू धर्मात पर धर्मावर मी बोलू इच्छित नाही तो अधिकार सुद्धा नाही . कर्म करा असेच सांगितले आहे कर्म करू नका देव तुम्हाला देईल असे हिंदू धर्म सांगत नाही . चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळेल वाईट कर्म केले तर शिक्षा . आणि हा विचार समाज विघातक नक्कीच नाही आणि ह्या विचाराचा पगडा असल्या मुळे बरीच लोकं वाईट काम करायला धजवत नसतं . विरोध हवा पण धर्माला आणि देवाला नको (जो पर्यंत सर्व प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत देव ही कल्पना नष्ट होवू शकत नाही ),तर कर्मकांडाला विरोध हवा . विज्ञान म्हणजे काही वेगळं नसतं अनुभव मधून शिकणे हा सर्व सजीवांची उपजत वृत्ती असते . माणूस असाच अनुभवातून शिकून ,प्रयोग करून आताच्या आधुनिक स्थितीत पोचला आहे त्याच्या ह्या प्रगतीत धर्म आणि देव कधीच अडसर ठरली नाहीत . पण आत्ताच का काही लोकांना त्याची अडसर वाटू लागली आहे .ह्यात फक्त समाजसुधारणा हा हेतू आहे हे काही पटत नाही . संस्कृती हे प्रकरण अजुन वेगळं आहे . पाणी नास्तिक किंवा हिंदू धर्म विरोधी लोक श्रद्धा,आणि संस्कृती ची मिसळ बनवून तिसराच पदार्थ निर्माण करतात जो त्यांना टेस्टी लागतो . पण ती चव आस्तिक लोकांना कडवट लागते
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 07/18/2019 - 08:36 नवीन
माणसाच्या मेंदूत जी अधभुत ताकत आहे ती निसर्गाने दिली आहे . ह्यात विज्ञान चा काहीच हातभार नाही . बाकी प्राण्यांचा मेंदू विकसित झाला नाही फक्त माणसाचा झाला ह्यात आपले काहीच योगदान नाही ती देणगी आहे .
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 07/18/2019 - 08:54 नवीन
कर्मकांडाला विरोध हवा कर्मकांडाला टोकाचा विरोध असू नये. जोवर कर्मकांड तुमच्या दैनंदिन जीवनात अडथळा आणत नाही तोवर त्याला विरोध नसावा. कर्मकांड हे सुद्धा मानवी मनाला आधार देते. जपाची माळ हातात घेऊन जर एखाद्या भयभीत माणसाला मानसिक आधार मिळत असेल किंवा भूमीपूजा ग्रहशांती केल्याने एखाद्या मनाला दिलासा मिळत असेल तर त्याला टोकाचा विरोध असू नये. जागेचे भूमिपूजन किंवा ग्रहशांती इ कोणतेही कर्मकांड न करता गृह प्रवेश करणारे लोक मिपावर १ % सुद्धा नसतील याची मला १०० % खात्री आहे. आणि यातील बरेच लोक बायकोला/ आईला हवं म्हणून ते( कर्मकांड) करतो असे समर्थनही करताना आढळतील. ( त्यात त्यांनाही ५ % किंवा १० % का होईना समाधान वाटत असतंच). महा नास्तिक लोक सुद्धा व्हिस्की गोल कटग्लासात, वाईन हि उंच अशा वारुणी चषकात आणि रम गोल ग्लासातुन पितात. , त्याच बरोबर व्हिस्की बरोबर सोडा घेतला पाहिजे आणि खायला व्होडका बरोबर निळे चीज स्कॉच बरोबर गौडा किंवा चेदार चीजच खाल्ले पाहिजे. साखरपुड्याला वाग्दत्त वधूला हिऱ्याची अंगठीच दिली पाहिजे. वाढदिवसाला केक कापलाच पाहिजे. हे सर्व कर्मकांडच आहे. शेवटी काय तर अतिसर्वत्र वर्जयेत
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/18/2019 - 09:14 नवीन
सहमत आहे. पुरोगाम्यांची कर्मकांड थोडी वेग्ळी असतात. दीपप्रज्वलन करुन उद्धाटन व हम होंगे काम याब ने सांगता. काही ठिकाणी कालबाह्य कर्मकांडाला कालसुसंगत पर्याय देउन आपलेसे केले असते.मनुष्य हा शेवटी होमो सेपीयन च ना! होमो डेअस कडे वाटचाल चालू आहे संथगतीने
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 07/18/2019 - 09:26 नवीन
तुमच्या कडून ह्या प्रतिसाद मध्ये शब्द खेळ केलेला जाणवतो . कर्मकांड हे कर्मकांड च असते ते काळानुसार बदलत असलं तरी त्याचा अर्थ बदलत नाही . .
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/18/2019 - 09:33 नवीन
कर्मकांड म्हणजे ते वाईटच वा अंधश्रद्धच असे नाहीये. कर्मकांड हे कर्मकांडच त्याला कृष्णछटा ही शोषण व त्रासदायक बाबी असलेल्या कर्मकांडामुळे मिळाली.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 07/18/2019 - 10:21 नवीन
कर्मकांड मला अपेक्षित नरबळी देणे कोंबड्या किंवा बकरे कापणे धर्मा च्या नावावर . करणी निवारण म्हणून विधी करणे. आणि अशा पद्धतीची कर्मकांड नष्टच झाली पाहिजेत. सती ची प्रथा त्या काळी योग्य असेल (जेव्हा यवन हिंदू स्त्रियांची इज्जत लुटायचे )पण आता काळ बदलला आहे ती नष्ट झालीच आहे. आणि हा बदल हिंदू धर्म विज्ञान वादी आणि लवचिक असल्या मुळे झाला आहे . अशा प्रकारच्या रुढीला मी कर्मकांड संबोधलं आहे .. गणेश पूजन वास्तू पूजन सरस्वती पूजन वट पौर्णिमा झाडाचे पूजन.. सर्प पूजन ह्याला माझा विरोध नाही कारण ह्या सर्वात गहन अर्थ आहे
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 07/18/2019 - 20:10 नवीन
कर्मकांड का करायचं? हेतू काय? कर्मकांडात आणि जवळपास सगळ्याच बाबतीत हा हेतूच महत्वाचा असतो. अपाय होत नसेल पण उपयोगही होत नसेल, तर ते कर्मकांड करण्यात वेळ घालवायचाच का बरे? पूजा करणं हे कर्मकांड झालं? की पूजा अशीच झाली पाहिजे हे कर्मकांड झालं? त्याचं उत्तर पूजा का करायची यात आहे. हेतू जर भगवंताचं स्मरण करणे, कृतज्ञ असणे, प्रेम असणे या सारख्या काही कारणांसाठी असेल, तर मनापासून केवळ हात जोडून नमस्कारही पुरेसा आणि ते देखील कर्मकांडच की. आता यात जर दृढ श्रद्धा असेल की मी भगवंताला त्याच्याविषयीचं प्रेम मनापासून मागितलं तर ते नक्की मिळेल, तर ती श्रद्धा योग्य किंवा अयोग्य हे ठरवण्याची आपल्यासारख्यांना गरजच काय? श्रद्धेची कसोटी कसोटीच्याच क्षणी होते. त्यावेळेस ती दृढ राहण्यासाठी आचराची फार मोठी पूंजी लागते. असो. अवांतरः सती जाणं आणि सती देणं ह्या दोन अत्यंत भिन्न गोष्टी आहेत. एकात त्या व्यक्तीशिवाय जिवंत राहण्यात देखील काही अर्थ नाही अशी टोकाची सर्वसंगपरित्यागाची भावना आहे आणि दुसर्‍यात सदोष मनुष्यवध आहे. यवनांपासून वाचण्यासाठी जोहार करणे आणि सती जाणे ह्या देखील भिन्न गोष्टी आहेत. तेवढ्याच उत्कट आहेत आणि अत्यंत हेलावणार्‍या आहेत. यातल्या कोणाचंही समर्थन कोणीच करणार नाही. फक्त त्या कृतींमधील फरक मांडावासा वाटला.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 07/19/2019 - 15:02 नवीन
खरे बुवांनी ( हे बुवा एकदम सपष्ट ) सुखी व निर्धोक आयुष्याचा मार्गच सांगितला आहे ! श्रद्धा ही कंट्रोल प्लस की आहे ( मॅक्रोस ? ) पण तिच्यात स्वअनुभवांचे घटक वापरले तर तो अधिक निरदोष मॅक्रॉस सिद्ध होतो .इथे श्रद्धा व अंधश्रद्धा यात फरक पडतो .घाईघाईने निश्कर्श काढणे यात अंधश्रद्धा पूढे असते कारण असा निष्कर्ष काढणे सोपे असते व माणसाला सोपेपणा भावतो .
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 07/18/2019 - 09:16 नवीन
अतिप्राचीन काळी बनलेली थडगी (pyramid) Kashi बनली असतील . मानवी शरीर ( मृत्यू नंतर)खूप दिवस चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी काय करावे लागत हे तेव्हा अतिप्राचीन काळी कसे माहीत होते . ह्या वर प्रकाश टाकण्याची तसदी नास्तिक लोक घेत नाहीत . प्राचीन मंदिरांची शिल्पकला ही अत्यंत सुंदर आहे जेव्हा काहीच आधुनिक यंत्रणा अस्तित्वात नव्हती तेव्हा अशा वास्तू निर्माण कशा झाल्या होत्या. हा प्रश्न नास्तिक लोकांना कधीच पडत नाही .
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/18/2019 - 09:16 नवीन
निशापरी,
दाभोलकरांनी केलेल्या स्कॅमबद्दल तुम्ही लिंक दिलेली साईट सोडून अख्ख्या गुगल आणि युट्युबवर एक अक्षरही सापडलं नाही .
तुम्ही धर्मादाय आयुक्तांच्या नोंदी प्रत्यक्ष पाहून खात्री करू शकता. इथे एक पन्नास एमबी व चाळीस पानांची पीडीएफ धारिका आहे : https://www.scribd.com/document/172674025/Narendra-Dabholkar-s-financial-frauds-and-Naxal-links हिच्यातल्या नोंदी या प्रत्यक्ष शासकीय खात्यांशी केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष प्रती आहेत. वाचून समजून घ्या व खात्री करवून घ्या. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क गुरुवार, 07/18/2019 - 19:04 नवीन
धिस इज इंटरेस्टिंग रिड. नक्कीच वाचेन. - डॉ गुलाटी .
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क गुरुवार, 07/18/2019 - 19:14 नवीन
पण सदरील pdf हि तक्रारीची pdf आहे यावर न्यायालय व अनिसचे काय म्हणने/निकाल/स्पष्टीकरण आहे ते कुठे आहे ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 07/18/2019 - 09:41 नवीन
एकच धर्मावर आक्रमक टीका करणाऱ्या व्यक्ती चा हेतू हा सुपारी घेतलेल्या गुंड लोकांसारख असतो . ज्याला मारायचे आहे त्या व्यक्ती शी काही संबंध नसतो .
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 07/18/2019 - 11:00 नवीन
आमचे घाटपांडे काका वस्ताद आहेत. इतक्या वर्षांत इतक्या लेखांनंतही ते नेमके कुठल्या बाजूने आहेत याची मला तरी दाद लागत नाही. ;-) बाकी निरंजन घाटे यांचे सर्व म्हणणे एरवी पटले असते जर ते वाहायला सोबत तेल घेऊन गेले नसते. जागेविषयी नॉस्टॅल्जिया किंवा अटॅचमेंट यामध्ये आणि अतार्किक वागण्यामध्ये फरक या गोष्टींमुळे वाटतो. तेही जर घाटे स्वतः आपण विज्ञानवादी असल्याचा दावा सार्वजनिकरित्या करत असते तर. ते तसे करत होते का याबद्दल माहिती नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/18/2019 - 11:23 नवीन
आमचे घाटपांडे काका वस्ताद आहेत. इतक्या वर्षांत इतक्या लेखांनंतही ते नेमके कुठल्या बाजूने आहेत याची मला तरी दाद लागत नाही. ;-)
+१०००००००० मला काल अनेक स्वप्नापैकी एक लघु स्वप्न पडलं. कोणीतरी शनिपाराला तेल घेऊन चाललंय असं दिसलं. स्वप्नात चेहरा खुप झूम करुन पाहिला, पण चेहरा स्पष्ट लक्षात आला नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/18/2019 - 11:30 नवीन
मीच होतो तो. लहानपणी भैरोबाला दर रविवारी तेलवात घालत असे. :)
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 07/18/2019 - 11:38 नवीन
बघा डीबीसर..
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/18/2019 - 11:28 नवीन
त्यांच्या अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत. हे त्यांच्याशी बोलण्यावरुन मला झालेले आकलन मी मांडले आहे. तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. तेल व हार घेउन उभे होते का नुसते उभे होते हे गौण आहे. जनरली भाविक लोक तिथे तेल व हार घेउन उभे असतात. ते शनिपारावर दर्शनाच्या लाइनीत दिसले ना? मग फाउल. विज्ञानकथा लेखक म्हणुन आपल्या मनात काही प्रतिमा असते त्याला या दृष्याने छेद दिला हा तो मुद्दा. एखादा राजकीय पक्ष, संघटना, कल्ट, बिरादरी वगैरे यात तुम्ही जरा काही वेगळे बोललात की तुम्ही नेमके कोणाच्या बाजूचे? असा प्रश्न तुम्हाला त्या समूहातून प्रत्यक्श अप्रत्यक्षपणे विचारला जातो. अशा या आपण आणि ते या कृष्ण धवल द्वैतात विचार करणार्‍या लोकांना मधाला ग्रे एरिया दिसत नाही. किंवा असही म्हणता येईल कि त्यांना रंगीत दिसत नाही फक्त कृष्ण धवल दिसते. समूह विचार वर्तनाच्या उन्मादात त्यांचा मेंदु स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. गल्लत गफलत गहजब या राजीव सान्यांच्या पुस्तकात अशा अनेक सामाजिक दृष्टीकोनांचा विचार केलेला आहे.तस म्हणल तर प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते.अंधश्रद्धा या शब्दाला काळी किनार आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. कधी कधी तो समजूत, धारणा,भावना अशा अर्थानेही वापरला जातो जेव्हा तुमचे प्रतिसाद गोंधळात टाकतात असे जेव्हा कुणी म्हणत तेव्हा मला फार बर वाटत. याचा अर्थ समोरच्याची विचारप्रक्रिया चालू झाली आहे असे मी समजतो.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 07/18/2019 - 11:36 नवीन
तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. तेल व हार घेउन उभे होते का नुसते उभे होते हे गौण आहे
मुद्दा महत्वाचा आहे गौण नाही. प्रतीकांनीच सगळा फरक पडतो. पुन्हा एकदा: यात घाटे हे स्वतःला तर्कनिष्ठ आणि विज्ञानवादी म्हणवत असल्यास आणि त्याविषयी ते सार्वजनिकरित्या आग्रही असल्यास आणि असल्यासच यात काही मिसमॅच आहे असं म्हणता येईल. ते केवळ उपजीविका आणि छंद म्हणून विज्ञानआधारित कथा लिहीत असते तर हे सर्व पूर्ण गैरलागू. अगदी शुद्ध भाविक भक्त असण्याला कोणाचीही हरकत अथवा फाऊल नसावा. सार्वजनिक भूमिका आणि वर्तणूक यात सुसंगती शोधत असलात तर मात्र मुद्दा पटत नाही.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 07/18/2019 - 14:04 नवीन
तर्कनिष्ठ आणि विज्ञानवादी म्हणजे देव वगैरे न मानणारा असे आपल्याला सरळसोट म्हणायचे नाही, हे गृहित धरतो. एखाद्या गोष्टीचा कार्यकारणभाव न समजता ती अनुकरणे वा कोणी सांगतो म्हणून करणे, यात वैज्ञानिक दृष्टीकोन नाही. पण हे फक्त देवभोळ्या कल्पनांसाठीच लागू पडत नाही. सगळ्याच बाबतीत पडते. श्रद्धा असण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. पण ती श्रद्धा ठेवण्यामागे कारण / हेतू काय ते महत्त्वाचे. हेतू बरोबर नसेल तर ती डळमळीत होण्याचीच शक्यता जास्त असते. तसेच एखाद्या व्यक्तीचे स्वतःचे एखादे मत बदलले तर तेही का बदलले? ते समजून न घेता उगाच टिका करणेही वैज्ञानिक दृष्टीकोनाला धरून नाही. होऊ शकते की दुसरे मत त्या व्यक्तीला पटायला लागले असेल. किंवा अगदी कुणाचे मन राखावे म्हणूनही ती व्यक्ती एखादी गोष्ट स्वतःच्या मनाविरुद्ध असलेली गोष्ट करू शकते. शक्यता अनेक आहेत. आततायीपणाने सरळ टिका करावी असे काही मला पटत नाही. राघव.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 07/18/2019 - 15:24 नवीन
मला पुस्तकातून जेव्हढे घाटे उलगडले तेव्हढे ते अज्ञेयवादी होते. त्यांनी एकाच वेळेस बऱ्याच लोकांचे संशोधन अभ्यासले होते, आणि त्यातून त्यांनी कोणताही ठाम निष्कर्ष काढायचे टाळले होते असा माझा तरी अंदाज आहे. ते एकाच वेळेस देवाचे अस्तित्व भावनिक गरजांसाठी आहे असेही म्हणतात आणि त्याच वेळेस त्याच प्रामाणिकपणे पुनर्जन्माच्या घटनांचे पुरावे देखील मांडतात. थोडासा irrational वाटावा असा माणूस, पण स्वतःशी प्रामाणिक असावेत. अन्यथा सार्वजनिक रीत्या इतक्या विरोधाभासी भूमिका घेणे सोपे नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/18/2019 - 17:05 नवीन
वाचत सुटलो त्याची गोष्ट हे त्यांचे पुस्तक जरुर वाचा अलिकडेचे आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 07/22/2019 - 06:38 नवीन
तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. तेल व हार घेउन उभे होते का नुसते उभे होते हे गौण आहे
मुद्दा महत्वाचा आहे शंभर टक्के सहमत.
प्रतीकांनीच सगळा फरक पडतो.
खरंय...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/25/2019 - 04:51 नवीन
मुद्दा महत्वाचा आहे>>>>>म्हणजे नुसतेच लाईनीत उभे असतील तर कमी अंधश्रद्ध, हार घेउन उभे असतील तर त्यापेक्षा अधिक अंधश्रद्ध, हार व तेल दोन्ही घेउन उभे असतील त्याही पेक्षा अधिक अंधश्रद्ध,आणि साष्टांग नमस्कार घालत असतील तर ठार अंधश्रद्ध अशी प्रतवारी करता येईल. :)
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 07/25/2019 - 08:39 नवीन
प्लिज कन्फ्युजन क्रिएट करू नकोया का विनाकारण? तुमच्या मूळ लेखातली वाक्यरचना पहा:
अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राला निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले.
नुसते एखाद्या धार्मिक ठिकाणी "जाणे" हे बालपणीच्या आठवणी, अटॅचमेंट वगैरे यांमुळे असू शकतं. तिथे तेल वाहतात ते घेऊन जाणं हे खास विधीसाठी जाणं ठरतं. त्यालाही हरकत एरवी नसावीच. पण कोणी जर तार्किक विज्ञाननिष्ठ विचारसरणीचा प्रसार सर्वत्र करत असेल तर ती विसंगती ठरते. मूळ वाक्यात फक्त "शनिपाराला तेल घेऊन जाणे" एवढंच म्हटलं आहे. त्यानुसार प्रतिक्रिया येणार. ते रांगेत उभे होते, वगैरे हे नंतर स्पेसिफाय केलं गेलं. तसं असेल तर मग मूळ वाक्यच तसं का नाही लिहिलं? अगदी रांगेत उभे असले (म्हणजे आपल्या आठवणीतलं ठिकाण दृष्टीस पडण्यासाठी रांग लावणं भाग असेल तर) तरीही थेट कर्मकांडाचं पालन म्हणता येणार नाही. पण तेल वाहणे हाही नॉस्टॅल्जियाचा भाग असू शकतो असं म्हटलं तर मग विसंगतीबद्दलची चर्चाच खुंटते. मग काय काहीही विधी करावेत आणि त्यात माझ्या बालपणीच्या रम्य दिवसांची आठवण म्हणून करतो असं म्हणावं. परंपरा नाहीतरी अशाच कॅरी फॉरवर्ड होत असतात. असो. आता उगीच शाब्दिक कसरत होतेय.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/25/2019 - 09:51 नवीन
मी फक्त प्रतवारीचा मुद्दा माण्डला.प्रत्येक श्रद्धा ही अन्धच अस्ते.बाकि आप्ल्या मताचे स्वागतच आहे.असो
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/18/2019 - 12:14 नवीन
कुणी घराबाहेर पडताना डावा पायच पुढे पहिला टाकत असेल तर इतरांना आक्षेप का असावा?
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 07/18/2019 - 12:20 नवीन
ती व्यक्ती सार्वजनिक भूमिकेत "ठराविक पायच प्रथम बाहेर टाकणे ही सवय तर्कदुष्ट आहे, ती अंधश्रद्धा आहे आणि तसे वागणे टाळावे, त्यात विवेक नाही" अशा आशयाचे म्हणणे मांडत नसल्यास कोणतीही विसंगती नाही. हरकत तर कोणत्याही परिस्थितीत नसावी. पुन्हा एकदा : घाटे यांची "शनिपारावर तेल वाहायला किंवा अन्यत्र देवपूजेस विरोध दर्शवणारी किंवा त्याला योग्य न मानणारी अशी काही सार्वजनिक प्रबोधनात्मक जाहीर भूमिका होती का हे मला ठाऊक नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/18/2019 - 13:33 नवीन
काही श्रद्धेमुळे इतरांना त्रास नुकसान होऊ लागले की म्हणावेसे वाटते थांबव. किंवा बरेच जण तीच गोष्ट करू लागले की डोंगराएवढे रूप धारण करते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/18/2019 - 13:39 नवीन
काही जण तर असे वाहिलेले तेल आणि उडीद ,मीठ ( भक्ती भावाने) नेऊन त्याचे वडे करून खातात पिडानाशनासाठी.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/18/2019 - 17:02 नवीन
श्रद्धाळु लोकांना एकमेकांचे हात धरून रिंगण करून नाचायला आवडतं. नसलेल्यांना रिंगणात अडकवतात, सुटू देत नाहीत. ( लहानपणीचा खेळ आठवा.) आतला खेळाडु मग काय करतो? रिंगणातल्यांना गोष्टी सांगून गुंगवतो आणि पटकन निसटतो. हेच ते घाटे टेक्निक. निरंतर श्रद्धाळुंपासून सुटकेचा मार्ग. तामलीत तेल घेऊन पार गाठणे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/18/2019 - 18:52 नवीन
राघव,
हेतू बरोबर नसेल तर ती डळमळीत होण्याचीच शक्यता जास्त असते.
लाखमोलाचं विधान! एकदम पटलं. श्रद्धेमागचा हेतू बरोबर नसेल तर ती श्रद्धाच नव्हे. श्रद्धा नेहमी दृढ म्हणजे न डळमळणारी असते. ऐकलेलं वा अनुभवलेलं ते श्रत्. ते धारण करायची मनाची क्षमता असते ती श्रद्धा झाली. श्रद्धा ही मनाची कपॅसिटी आहे. ती दृढंच हवी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 07/18/2019 - 19:41 नवीन
ते धारण करायची मनाची क्षमता असते ती श्रद्धा झाली. खरंय. मन जेव्हा एखादी गोष्ट संपूर्णपणे मानतं/ अ‍ॅक्सेप्ट करतं तेव्हाच ती श्रद्धा टिकते. पण यात एक गोम आहे. जर मोकळं मन नसेल तर हेकेखोरपणाकडे ही वृत्ती जाते. मग समोरचा कितीही का बरोबर वा संयुक्तिक का सांगेना.. मी एखाद्या गोष्टीवर श्रद्धा का ठेवतो हे मला ठामपणे माहित पाहिजे. पण त्या कारणाहून योग्य असं कारण असल्यास ते मान्य करण्याची तयारीही हवी, अगदी विरुद्ध मतासाठी असल्यास देखील. एखाद्या गोष्टीवर माझी श्रद्धा आहे असं आपल्या विचारांशी प्रामाणिक राहून म्हणणं आणि आचरणं, हे फार नाजुक अन् कठीण कर्म आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 07/19/2019 - 09:33 नवीन
न डळमणाऱ्या श्रध्देला “निष्ठा” म्हणतात. “श्रध्दा” नव्हे. निदान अध्यात्मात तरी अशीच व्याख्या करतात.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 07/18/2019 - 19:32 नवीन
4-year-old boy in Australia claims to be reincarnation of Princess Diana “Billy (aged two at this time) pointed and said, ‘Look! It’s me when I was a princess’,” when he spotted Diana on a card, says his father
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 07/19/2019 - 07:29 नवीन
त्यांचे लहानपण त्या भागात गेले होते. अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. तेल व हार घेउन उभे होते का नुसते उभे होते हे गौण आहे. अनेक सुख दु:खाच्या स्मृती (नॉस्टॅल्जिया) त्याच्याशी निगडित होत्या तर ते शनिपाराशी (नुसते० गेले त्यात गैर नाही. पण ते तेल घेऊन गेले या बद्दल लोकांचा आक्षेप असेल तर तो समजण्यासारखा आहे. तुझे आहे तुजपाशी मध्ये काकाजी म्हणतात तसे -- कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु जर तुम्ही सार्वजनिक न्यासावरुन लोकांना एखादी गोष्ट चूक आहे/ अंधश्रद्धा आहे सांगत असला तर ती तुम्ही स्वतः करणे हे समाजाला मान्य होणार नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 07/19/2019 - 07:43 नवीन
लाईनीत उभे होते ना? मग झाल. तेल हार असो नसो. असा तो मुख्य मुद्दा आहे. वाचत सुटलो त्याची गोष्ट हे पुस्तक मूळातुनच विकत घेउन वाचण्यासारखे आहे.त्यात त्यांच्या अजून काही भुमिका समजत जातात. तसेच विचारातील बदल ही चर्चिले आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 07/22/2019 - 04:36 नवीन
परंतु जर तुम्ही सार्वजनिक न्यासावरुन लोकांना एखादी गोष्ट चूक आहे/ अंधश्रद्धा आहे सांगत असला तर ती तुम्ही स्वतः करणे हे समाजाला मान्य होणार नाही.
समाजाला मान्य होणार नाही हे अगदी बरोबर आहे. कारण समाजाचा अपेक्षाभंग होत असतो. विज्ञान या विषयावर लेखन करणार्‍या लोकांची वाचकांमधे एक प्रतिमा असते. ती अर्थातच त्यांच्या साहित्यातून निर्माण झालेली असते. एखाद्या लेखकाविषयी आपण जे मत बनवतो ते त्याच्या लेखनातून. विज्ञानविषयक सातत्याने दीर्घकाळ लेखन करणारा माणूस हा अश्रद्ध, संशयवादी, बुद्धीप्रामाण्यवादी, विवेकी,नास्तिक, विचारवंत असा असला पाहिजे ही आपण आपल्या मनात प्रतिमा तयार करतो. मग त्या प्रतिमेला छेद देणारे एखादे दृष्य दिसते त्यावेळी आपला भ्रमनिरास होतो. क्रिकेट, सिनेमा, राजकारण यातील लोकप्रिय व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या मनातील त्यांच्या प्रतिमेशी सुसंगत वागत असतात तो पर्यंत आपण त्यांना डोक्यावर घेउन नाचतो. जेव्हा आपल्या अपेक्षेपेक्षा विसंगत वर्तन त्यांच्याकडून व्हायला लागते त्यावेळी आपण त्यांना पायदळी तुडवायला सुरवात करतो.त्याही व्यक्ती प्रथम प्राणि आहेत नंतर माणूस (होमो सेपीयन) आहेत व नंतर यशस्वी प्रथितयश लोकप्रिय वगैरे व्यक्तिमत्व आहेत हे आपण विसरुन जातो. निरंजन घाटे जेव्हा मित्राला शनिपाराच्या लाईनीत दिसले त्यावेळी त्याच्या मनातील निरंजन घाट्यांच्या प्रतिमेचे भंजन झाले. हा जसा एक भाग आहे तसा माणसांच्या दीर्घ आयुष्यात सुरवातीच्या टप्प्यात असलेली मते नंतरच्या टप्प्यात असतीलच असे नाही. मतांच्या छटा बदलत जातात. तोही प्रगल्भ होत असतो. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना! सुरवातीच्या काळात गॉड इज ट्र्थ असे म्हणणारे गांधीजी उत्तरार्धात ट्रुथ इज गॉड असे म्हणू लागले. आपले अलिकडेल मत ग्राह्य मानावे असेही त्यांनी लिहून ठेवले आहे. हे अर्थात प्रत्येकासाठी खरे आहे. थोरामोठ्यांची सिलेक्टिव्ह कोटेशन ही आपापल्या सोयीने घेणारे अनेक असतात. एकाच व्यक्तीची आपल्या सोयीची कोटेशन विरुद्ध विचारश्रेणीचे लोक घेत असतात. ती खरीही असतात. पण ही वक्त्व्ये कोणत्या परिस्थितीत कोणत्या कालखंडातील कोणत्या प्रसंगातील आहेत हे ते विसरतात किंवा माहित नसते. त्यामुळे अनेक महापुरुष देखील असे वेठीस धरले जातात. समाजकारणात, राजकारणात या गोष्टी चालूच असतात. कधी बुद्धीभेदासाठी तर कधी प्रबोधनासाठी याचा चातुर्यांने वापर केला जातो. प्रबोधन काही वेळा आंजारुन गोंजारुन करावे लागते तर काही वेळा काही लोक प्रहार करुन.प्रबोधन करतात. ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकाच्या परिक्षणात जयंत नारळीकर म्हणतात," 'फलज्योतिष ही एक अंधश्रद्धा आहे' हे समजावून सांगायला लागणे आणि तेही निरक्षरांना नव्हे तर डिग्री विभूषितांना, उच्चपद्स्थांना, समाजधुरिणांनादेखील, इथेच खरी शोकांतिका आहे. अशा वेळी तुम्ही अंधश्रद्ध आहात, फसव्या विचारसरणी मागे धावून आपले हसे करुन घेत आहात.' वगैरे आक्रमक प्रचार योग्य ठरत नाही. लहानपणी सूर्य आणि वार्‍याच्य़ा चढाओढीची गोष्ट वाचली होती, त्याचा प्रत्यय येथे येतो. वारा आणि सूर्य दोघांपैकी कोण एका पादचार्‍याचा कोट त्याच्या अंगावरुन काढून दाखवेल, अशी स्पर्धा होती. वारा वेगाने वाहू लागला, तसे पादचा-याने कोट आवळून धरला. अखेर वाराच थकला. मग सूर्य पुढे आला. त्याने संथपणे प्रकाशणे चालू ठेवले आणि काही वेळाने पादचार्‍याने फार उकडायला लागले, म्हणून कोट काढला.आक्रमक प्रचाराने अंधश्रद्धेचा कोट आणखी आवळुन धरला जातो. पण त्या व्यक्तिला सौम्य शब्दात पटवून दिले आणि त्याने स्वत:हून तो कोट काढून फेकून दिला तर ते जास्त प्रभावी ठरणार नाही का? घाटपांडे यांचा मार्ग वार्‍याचा नसुन सूर्याचा आहे."
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Mon, 07/22/2019 - 05:25 नवीन
सबब घाटपांडे यांचा मार्ग वार्‍याचा नसुन सूर्याचा आहे हे विधान दिशाभूल करणारे आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 07/22/2019 - 05:42 नवीन
आपल्या मताचे्ही स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 07/19/2019 - 10:42 नवीन
पुण्यात काही लपून राहात नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा