Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

फुकटात विनासायास वेटलॉस

श
शाम भागवत
Tue, 07/03/2018 - 09:09
🗣 313 प्रतिसाद
वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय. ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे ....... थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय. कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो! घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार. तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये. तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल. त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली. मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका. सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही. आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा! तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते. त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे. बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती. डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत. पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात. २०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे. खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता. डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा. https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/ डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा. https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4 मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे. एक महत्त्वाची सूचना : ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये. -------------------------------------------------------------- (श्री. शाम भागवत यांचा खालील एक प्रतिसाद लेखात समाविष्ट केला आहे.) एकदाच ऐकून भाषणातले सगळे मुद्दे लक्षात राहणे शक्य नसते. परत दोन तास देणे कंटाळवाणे होऊ शकते किंवा नंतर बघू अस म्हणत लांबणीवर पडते. यासाठी एक लिंक देत आहे. तो VDO आहे. डॉ. दिक्षीतांनीच सारांश रुपात सगळे सांगितले आहे. नुसते ऐकूनही उजळणी करता येऊ शकेल. तसेच डॉक्टरांनी बरेच तक्ते बनवलेले असून त्यातले दोन महत्वाचे दाखवले जातात. त्यांचे screenshot घेऊन ठेवल्यास सर्व संदर्भ अगदी हाताशी राहू शकतील. कोणालाही थोडक्यात सांगायचे असल्यास खूप उपयोगाला येतात. तुम्हाला आलेल्या अडचणीमुळे मला हे सुचले म्हणून तुम्हालाच धन्यवाद व शुभेच्छा. https://youtu.be/99iQOs-u_HU

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 162643 views

🗣 चर्चा (313)
ए
एस Tue, 07/03/2018 - 09:41 नवीन
वाचनखूण साठवली आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 07/03/2018 - 10:52 नवीन
याबद्दल नुकतेच व्हॉट्स अ‍ॅपवर वाचले. मी पण या विषयातला तज्ञ नाही आणि व्हॉट्स अ‍ॅपवर येणारे आहार वा आरोग्यविषयक सल्ले मी फारसे मनावर घेत नाही. मात्र यातला विचार मला पटला. निदान स्थुल व्यक्तींकरिता तरी हा विचार योग्य असेल असे वाटते. वाढत्या वयातले तरुण , कष्टाची कामे करणारे लोक यांच्याकरिता हे कितपत योग्य होईल याबद्दल मात्र मी साशंक आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 07/03/2018 - 11:27 नवीन
तुमचे निरिक्षण बरोबर आहे. वाढत्या वयातल्या मुलांसाठी हा सल्ला नाहीये. दिक्षीतांच्या व्याख्यानात त्यांनी तसे स्पष्ट पणे सांगितले आहे. इतकेच नव्हे तर हा सल्ला कोणासाठी आहे कोणासाठी नाही हे सगळं जास्त विस्ताराने समजावून सांगितले आहे. खरे तर दिक्षीतांचे व्याख्यान ऐकल्यावर फारसे प्रश्न पडतच नाहीत. बर्‍याच शंका विरून जातात. पण त्यासाठी त्यांचे ते भाषण ऐकणे हा एकमेव पर्याय आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 07/03/2018 - 12:19 नवीन
भाषण अजून मी ऐकलेले नाही. पण मला आलेल्या अग्रेषित संदेशात महत्वाचे मुद्दे , आहार पद्धत लिहिले होते (जसे दोन वेळा जेवणे ई) आणि माझ्या जीवनशैलीला (बैठे काम, वाढलेले वजन) ही आहारशैली योग्य ठरु शकेल असे वाटतेय. दीक्षितांचे भाषण पण मराठीत आहे का ?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 07/03/2018 - 12:31 नवीन
हो
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 07/03/2018 - 12:01 नवीन
खूप छान काम केलेत हा धागा काढून.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 07/03/2018 - 12:28 नवीन
मी सध्या follow करतोय.. 8च दिवस झालेत. ऍसिडिटी गेली, अपचन गेले, वजन कमी होऊ लागले उत्साह वाढतोय. यापूर्वी मी 4 वेळा डाएट प्रोग्रॅम अर्ध्यात सोडून दिला आहे. यावेळेस पहिल्यांदा 8 दिवस सलग काहीतरी पाळतोय. सविस्तर रिझल्ट 1 महिन्याने देतो. एनर्जी लेवल खूप वाढली आहे हे मात्र खरे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 07/03/2018 - 12:30 नवीन
महत्वाची गोष्ट, मी खूप छिद्रानवेशी आहे. या संपूर्ण भाषणात डॉ दिक्षितांनी कोणतेही अवास्तव दवे केलेले नाहीत, 1 महिन्यात 15 किलो वगैरे. फक्त तुम्ही फिट व्हा इतकेच.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 07/03/2018 - 12:37 नवीन
झकास. एनर्जी लेवल वाढणे हेच तर पहिले लक्षण आहे. आपन योग्य मार्गावर असल्याचा पहिला मैलाचा दगड आहे हा. जर तुम्ही टेबल टेनिस सारखा पटापटा हालचाली करणारा एखादा खेळ खेळत असाल तर तुम्हाला तुमच्या खेळात एकदम प्रगती झाल्याचे वाटू लागेल. सकारात्मक प्रतिसाद आल्यामुळे खूप छान वाटल. तुम्हाला या अभियानात मनापासून शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 07/03/2018 - 14:59 नवीन
आनंदराव हा प्रयोग एक महिना नव्हे तर सलग सहा महिने करा तरच शाश्वत परिणाम (sustainable results ) मिळतील. आपल्या चरबी बरोबर बरेच पाणी पण साठवलेले असते आणि आहार (आणि व्यायाम) सुरु करता तेंव्हा पहिल्या एक महिन्यात हे सर्व पाणी कमी होते. त्यामुळे सुरुवातीचे ५ ते १० टक्के वजन फार पटकन कमी होते परंतु हे चरबी कमी झाल्याचे नव्हे तर पाणी कमी झाल्याचे लक्षण असते. अर्थात जेंव्हा तुम्ही मिताहार सोडून देता तेंव्हा ती चरबी पाणी परत जमवून घेते आणि पुढच्या एक दोन महिन्यात आपले वजन मूळपदावर येते. तळवलकर, VLCC किंवा अंजली मुखर्जी यांच्या यशस्वी धंद्याचे हेच तर खरे रहस्य आहे. (हे मी माझ्या वजनाचा काटा मालिकेत कुठे तरी लिहिलेले आहे.)
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 07/03/2018 - 15:50 नवीन
मला वाटते ही आयुष्यभराची जीवनशैली आहे. १०० किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे निरामय आरोग्यासहीत जगायची गुरूकिल्ली म्हटलत तरी चालेल. म्हणजे डॉ. जिचकार तरी असे म्हणतात बॉ. मला वाटते दोन्ही व्हिडिओ पाहून मग काय करायचे ते ठरवलेले चांगले.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 07/03/2018 - 15:52 नवीन
मिताहार ही संकल्पना या जीवनशैलीत येत नाही. दिवसातून फक्त दोनदाच खा. कितीही खा.
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 07/03/2018 - 18:54 नवीन
सुद्धा वर्ज्य करायचा का? फक्त दोन वेळा जेवण करणे आणि चालणं असेल तर करून बघायला हरकत नाही
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 07/03/2018 - 19:18 नवीन
तरी पण दोन्ही भाषण नीट ऐका. संपूर्ण आयुष्य चांगले जाण्यासाठी फक्त ४ तासाचीच तर गुंतवणूक करायचीय. दोन्ही भाषणे मराठीत आहेत. आणखी आपल्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे होते?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 07/03/2018 - 19:19 नवीन
त्या भाषणात चहा बद्दल ही सांगितल आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 07/04/2018 - 10:29 नवीन
हे करायचे अहे तर आयुष्यभर, एक कोणतेही डाएट जीवनशैली म्हणून हे स्वीकरले तरच रिझल्ट मिळतील हे आता चांगले समजले आहे. फक्त अन्य कोणत्याही डाएट्पेक्षा हे बरेच सोपे पडतेय. बघू, सहा महिन्यात १० किलो जरी कमी झालं तरी मला चालेल.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 07/03/2018 - 13:33 नवीन
अहाहा भागवत साहेब , जब्बरदस्त धागा .. बोले तो सोने पे सुहागा ... येत्या आषाढीपासून एकदम म्या पन जोर्रात सुटणार बघा .. फक्त दोन टाइम खाणार आणि दहा टाइम पिणार .. लेव्हल वाढली कि कळवतो .. पण सुरु मात्र नक्की करणार .. आणि हो धन्यवाद,, आम्हा ढेरपोट्या मंडळींबद्दल काहीतरी शोधून काढले आणि इथवर पोहोचवले म्हणून .. तसं बघायला गेलं तर आपण बी एकदम सलमान होतो बघा एकेकाळी , पण आता ते सिक्स packs जाऊन तिथे सहा बनपाव आलेले आहेत आणि वजन पार नव्वदीपार ,, असं म्हणा ना कि शतकी खेळीकडे वाटचाल सुरु आहे .. सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 07/03/2018 - 14:51 नवीन
मनापासून शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 07/03/2018 - 14:07 नवीन
आपल्या समाजात अंगमेहनतीने काम करणे उपहासाने बघितले जाते. प्रत्येकजण आराम करायला बघतो. तेच प्रतिष्ठेचे लक्शण आहे. पुन्हा मला काय झाले मग किती तपासण्या केल्या किती महागडीसेवा उपचार घेतले इत्यादी सांगण्यात धन्यता. जाऊ दे. चर्चेत अडथळा नको.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 07/03/2018 - 14:47 नवीन
:) __/\__
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 07/03/2018 - 16:31 नवीन
माझ्या आईने ही भाषणं बघितली आहेत आणि ती नुकतीच त्या बद्दल सांगत होती. पण मी स्वतः ते पाहिलेलं नाही त्यामुके वरकरणी मला दोनदाच खा हा सल्ला पटत नाहीये. ऋजुता दिवेकर अगदी उलट सांगतेय की दर 2 तासाला खा. म्हणजे रक्तात साखरेचा पूर आल्यासारखं होत नाही. जे मला पटलं होतं. पण अर्थात संपूर्ण भाषण न ऐकताच मत बनवणार नाही. नक्कीच ऐकेन आणि कळवेन. मला फारसा शास्त्रीय विचार न करता असं वाटतं की जे काही आपण पिढ्यान पिढ्या करत आणि खात आलेलो आहोत ते करावं. माझ्या जन्मापासून माझी आई,आजी साधारण जसे खात पित होते, तसंच मी फॉलो करावं. म्हणजे सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी थोडंस खाणं आणि रात्री लवकर जेवण. हे सगळं घरीच बनवलेलं असायचं. आणि क्वचित बाहेरच. हे करून , आवश्यक तेवढी हालचाल होत असेल तर अगदी जबरदस्त फिटनेस नाही, पण आरोग्य उत्तम रहायला हवं. ह्यात व्यायाम सुद्धा केला तर फिटनेस वाढेलच. पण मला ते करतानाही हाय प्रोटीन, लो carb असा विचार करता येत नाही. भाजी, पोळी, वरण भात कोशिंबीर वगैरे मला ओके वाटतं. त्याहून वेगळा काही फॉर्म्युला असू शकतो हे माझ्या मनाला पटत नाही. कारण जे मी आयुष्यभर करू शकत नाही ते डाएट म्हणून करण्यात मला हशील वाटत नाही. मला दोनच वेळा पोटभर खाण्याची सवयच नाहीये, मी एका वेळेला खूप खाऊ शकत नाही. पण हेच माझा नवरा चारदा खायला नको म्हणतो. एक बसणी काय ते जेवण. त्याच्या घरी तशीच पद्धत आहे म्हणून. तेच फॉलो करणं त्याला हितकारक आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 07/03/2018 - 16:54 नवीन
ऋजुता दिवेकर यांचे ऐकल्यामुळे तुमचे वजन उंचीप्रमाणे असेल. ४५ मिनीटे भरभर चालू शकत असाल. स्थूलता हा तुमचा प्रश्न नसेल. डॉक्टरांची पायरी चढायला लागत नसेल तर आहे तेच चालू ठेवा. शेवटी फिटनेस महत्वाचा. तुमच्या पिढ्यान पिढ्या जे करत आणि खात आलेले आहेत. त्यामुळे ते कायम निरामय जिवन जगले असतील तर तुम्ही तीच पध्दत चालू ठेवणे योग्य होईल असे वाटते. तुम्ही साखरेचा चहा किंवा दूध घेत नाही असे दिसतेय. म्हणजे एकूण चारच वेळाच खाण्यासाठी तोंड उघडत असाल तर ती एक चांगली गोष्ट आहे. तरीही असे वाटते की दोन्ही भाषणे ऐकल्याने तुमचे नुकसान नक्कीच होणार नाही. __/\__
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Tue, 07/03/2018 - 19:18 नवीन
भागवत साहेब, इथंच मिपावर सायकल वीरांचे पराक्रम वाचून आलेल्या स्फूर्ती मुळे गेले 6 / 7 महिने मी रोज किमान 1 तास सायकल चालवतो .आता तुमच्या दीक्षित सरां वरील लेखा मध्ये 45 मिनिटं भरभर चालण्याचा उल्लेख आहे , तर नक्की फायदेशीर काय असू शकतं ?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 07/03/2018 - 19:22 नवीन
चालण्याला सायकल हा पर्याय असू शकतो. तसे स्पष्टपणे सांगितलेले आहे. तुमच्या सर्व शंका फिटतील. पण त्यासाठी दोन्ही भाषणे ऐकण्यासाठी किमान ४ तासांची गुंतवणूक केली पाहिजे.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 07/04/2018 - 04:22 नवीन
ऋजुता दिवेकर ही ग्लायकोमीक इंडेक्सवर आधारित पद्धतीत मिताहार घ्यायला सांगते. त्यात २ तासाला थोडे थोडे खा असं सांगतात. पण त्यांचा ग्लायकोमिक इंडेक्स कमी असावा. आता ग्लायकोमीक इंडेक्स कमी असेल तर मुळातच त्या पदार्थांमधुन साखर कमी शोषली जाते, तात्पर्याने, शरीरात साठलेली चरबी वापरायला सुरुवात व्हायला लागते. पण ऋजुता दिवेकरचा मिताहारासोबतच व्यायामावर (स्ट्रेंग्थ ट्रेनिंग) वर प्रचंड भर आहे. ज्यात स्नायु अधीक बळकट होऊन त्यांना अधीक उर्जा लागते अन त्यामुळे इंशुलीन रेझिस्टंस कमी होतो. अन हळु हळु साखरेतील पातळी नियंत्रित व्हायला लागते. त्या मानाने डॉ. दिक्षीतांच्या पद्धतीत इंशुलीनचा विचार प्राधान्याने केलेला आहे. त्यांमते, आपण खाल्ले की सरळ काही युनिट्स इतके इंशुलीन तयार होते. त्यामुळे जर अधीक खाल्ले गेले असेल, तर इंशुलीन लागलीच रक्तातील साखर चरबीत रुपांतर करा अस सांगत (अर्थात हा इंशुलीनचा दुसरा उद्देश्य आहे, त्याचा प्रार्थमीक उद्देश म्हणजे पेशींचे दरवाजे साखरेसाठी उघडणे, त्यामुळं बिचार्‍याला दुष्ट ठरवु नये लगेच :) ) . त्यामुळे चरबी वाढत जाते. स्नायु वाढत नाहीत. अन खाण्याच प्रमाण कमी न झाल्याने, सतत साखर अन इंशुलीनचा मारा होत राहतो. शेवटी पेशी इंशुलीनच्या तयार होणार्‍या मात्रेला जुमानत नाहीत अन अधिकाधिक इंशुलीन तयार कराव लागत. अन्यथा पेशींना साखर मिळणार नाही अन त्यांची उपासमार होइल. हे चक्र शरिराला मधुमेहाकडे नेते. (अर्थात रक्तात एक ठराविक पातळीत इंशुलीन असतेच, जे पेशींना सतत कार्यरत ठेवत असते अन खाणे झाले की पॅनक्रियास / स्वादुपींड परत इंशुलीन जास्तीचे करत असते ) डॉक्टर दिक्षीत सांगतात, की क्ष युनिट्स तयार झालेल इंशुलीन ५५ मिनिटे तयार होत नाही. तेव्हा आपण जर ५५ मिनिटांमध्ये जेवलो, तर जास्तीचं इंशुलीन एकदाच तयार होईल. थोड्यावेळाने इंशुलीनची मात्रा कमीझाली की स्वादुपींड त्याच्या भावाला म्ह्णजे ग्ल्युकॅगॉन (की जॉन Glucagon) ला कामाला लावते. ह्यांच काम म्हणजे, शरिरात साठलेल्या चरबीचा उप्योग करुन उर्जा उपलब्ध करुन देणे. पण हे महाशय सतत कार्यरत नसतात, तर फक्त इंशुलीनची मात्रा कमी झालीकीच ते जागतात. अन फॅट्सचा फडशा पाडतात. त्याचा परीणाम, वजन (चरबी) कमी होण्यात होतो. अन शेवटी, मी डॉक्टर किंवा न्युट्रिशनीस्ट नाही, फक्त हौशी अभ्यासक आहे, सो मला जेवढ आकलन झाले, तेव्ह्ढ मी सांगायचा प्रयत्न केला. दोन्ही प्रकारांत फॅट लॉस झालेला आहेच. अन म्हणुनच प्रश्न असा उरतोच की दिवेकरांच्या पद्धतीत सतत इंशुलीन तयार होत असेल का? झालं तर ते शरीरास कितपत हानीकारक आहे? शिवाय जर कमी जीआय असलेल खाल्ल तरीही दीक्षीत म्हणतात तस तेवढंच इंशुलीन तयार होत , हे देखील मनास पटत नाही, कारण आपलं शरीर इतकं डंब नसाव अशी अपेक्षा आहे :) आदी गोष्टींच्या उत्तरात मी स्वतः देखील आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 07/04/2018 - 10:41 नवीन
मला वाटते इन्शुलिन तयार करणे थोडेसे अन्नुभवावर आधारित असते. म्हणजे जर तुमचे जेवण जर रक्तातील साखरेची पातळी १७० पर्यंत नेत असेल तर प्रत्येक वेळी शरीर तितके इन्शुलिन तयार करते. तुमचे मूळ खाणेच जर तितकी शुगर निर्माण करत नसेल तर मग प्रश्न मिटला. (ही थिअरी दिवेकर बाईची आहे) पण आपण पडलो खाण्याचे लोभी, त्यामुळे जिलब्या म्हटले ८-१० खाल्ल्याशिवाय आपले भागत नाही, म्हणजे शुगर केव्हल आपण २०० वर नेउन मग २ तसानी चहा जरी प्याला तरी शरीराला वाटते की आल्या ५०० कॅलरी, मग शरीर तितके इन्सुलिन रक्तात सोडते. दिक्षितांच्या पद्धतीमध्ये देखील शरीराला ट्रेन करणेच अहे, पण वेगळ्या प्रकारे.. मी १००० कॅलरी खाइन, पण दिवसातुन २दाच. मग शरीर तित्के इन्शुलिन २दा तयार करेल, साखर पचवेल, विषय,सम्पला. दोन्ही पद्धती योग्यच आहेत, पण दिवेकरांच्या पद्धतीत जिभेवर खूप ताबा आणि तित्काच व्यायाम लागतो, इथे तसे काही नाही.. काहीही खा, पण २ वेळाच खा ते तुलनेने करायला खूप सोपे आहे (अन्य डाएट्च्या तुलनेत) असे माझे देखील मत झाले आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 07/04/2018 - 13:04 नवीन
याबाबत डॉ. जिचकारांनी प्रथम जो क्रांतिकारक विचार मांडला तो असा की, आपण जेव्हा काही खातो ते पचविण्यासाठी खालेल्या पदार्थाच्या प्रमाणात शरीरात पाचक द्रव तयार होतात. मात्र इन्शूलीन त्याला अपवाद आहे. पदार्थाचे प्रमाणात स्वादुपिंड इन्शुलीन तयार करत नाही. तर जेव्हा जेव्हा आपण खातो तेव्हा तेव्हा एका ठरावीक प्रमाणातच नेहमी इन्शूलीन तयार केले जाते. जितक्या वेळा खातो तितक्या वेळा इन्शूलीन तयार केले जाते. जेव्हा आपण जास्त वेळा खातो (जास्त खाल्ले का कमी खाल्ले हे महत्वाचे नाही.) तेव्हा अर्थातच जास्त इन्शूलीन तयार केले जाते. दोन वेळेला जेवणामुळे जेवढे इन्शूलीन तयार होते ते प्रमाण योग्य आहे. मात्र वारंवार खाल्याने जे अतिरिक्त इन्शूलीन तयार होते ते सर्व रोगांचे कारण आहे. या अतिरिक्त इन्शूलीनची सवय शरीरातील पेशींना नसते. त्यामुळे त्या इन्शूलिनला विरोध करायला लागतात. त्यावर उपाय म्हणून स्वादुपींड काही खाल्यावर किती इन्शूलीन तयार करायचे याचे ठरलेले प्रमाण वाढवते. त्यामुळे अतिरिक्त इन्शूलीनचे प्रमाण वाढतच जाते. हे दुष्टचक्र सुरू झाले की त्यातून माणसाचा स्थूलत्व, मधुमेह, कोलेस्टेरॉल, रक्तदाब, अंजोग्राफी, अंजोप्लास्टी,बायपास असा प्रवास सुरू होतो. वारंवार खाल्याने अतिरिक्त इन्शूलीन कसे तयार होते हा विचार मांडून मधुमेह रक्तदाब वगैरे साठी अतिरिक्त इन्शूलीन कारणीभूत आहे हे प्रभावीपणे जिचकारांनी सांगितले एक वेगळाच दृष्टिकोन १९९७ साली दिला हेच जिचकारांचे मोलाचे योगदान आहे. डॉ. दिक्षीतांनी ह्या विचारावर स्वतःवर अनेक प्रयोग करून तसेच अस्तित्वात असलेल्या अनेक आहारयोजना स्वतः वापरून त्यातला फोलपणाचा अनुभव घेऊन डॉ. जितकारांचा हाच विचार जास्ती स्पष्ट करून सांगितला आहे. पुढे नेला आहे. ते सांगतात की, स्वादुपिडाची इन्शूलीन तयार करण्याचे चक्र पच्चावन्न मिनिटांचे आहे. म्हणजे एकदा इन्शूलीन शरीरात सोडले की त्यानंतर पुढची पंच्चावन्न मिनिटे स्वादुपिंड शरीरात नव्याने इन्शूलीन सोडत नाही. तसेच प्रत्येक माणसामधे एकावेळी किती इन्शूलीन तयार करायचे हे ठरलेले असते. हे प्रमाण प्रत्येक माणसामधे वेगळे वेगळे जरूर असेल पण त्या माणसाचा विचार केल्यास हे प्रमाण कधीही बदलत नाही. थोडक्यात या पच्चावन्न मिनिटात तुम्ही एकदा खा किंवा दहा वेळा खा. कमी खा किंवा जास्त खा. त्याचा काहीही संबंध इन्शूलीन च्या प्रमाणावर होत नाही. असे समजू की काही खाल्यावर स्वादुपींड प्रत्येक वेळेस पाच युनीट इन्शूलीन तयार करते. (हा पाच आकडा उदाहरणासाठी घेतला आहे. तोही विषय समजावा म्हणून) जर एखाद्याने पंच्चावन्न मिनिटात दोन बिस्किटे खाल्ली किंवा दहा बिस्किटे खाल्ली तरी पाच युनीटच इन्शूलीन तयार होइल. इतकेच नव्हे तर दर पाच मिनिटाला एक बिस्कीट या वेगाने दहा बिस्किटे खाल्ली तरीही पाचच युनिट इन्शूलीन स्वादुपींड सोडेल. मात्र त्याने दर तासाला दोन बिस्किटे याप्रकारे दहा बिस्किटे खाल्ली. तर मात्र स्वादुपिंड पाचपट म्हणजे पंचवीस युनीट इन्शूलीन तयार करील. कारण स्वादुपिडाची इन्शूलीन तयार करण्याचे चक्र पच्चावन्न मिनिटांचे आहे. म्हणजेच स्वादुपींड ५ युनीटचे इन्शुलीनचे माप पाच वेळेस टाकेल. जे दोन वेळच्या जेवणाच्या १० युनिटपेक्षा अतिरिक्त असेल. आणि हे अतिरिक्त इन्शूलीन डॉ. जिचकारांनी सांगितल्याप्रमाणे शरीरात रोग तयार करते. (दोन वेळच्या जेवणाचे १० युनीट हे उदाहरण म्हणून घेतले आहे.) माझ्या आकलनाप्रमाणे व कुवतीप्रमाणे भर घालायचा प्रयत्न केला आहे. जर मीपावर कुणी या क्षेत्रातला जाणकार असेल आणी त्याने ही भाषणे ऐकली असतील तर त्यानी माझ्या या प्रतिसादातील त्रुटी लवकरात लवकर दाखवून द्याव्यात ही विनंती. कारण मी यातला तज्ञ नसल्याने भिक नको कुत्रा आवर म्हणायची वेळ मिपाकरांवर यायची. __/\__
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 07/05/2018 - 09:09 नवीन
मधुमेह रक्तदाब वगैरे साठी अतिरिक्त इन्शूलीन कारणीभूत आहे
हे कसे ते समजले नाही. आता पर्यंत इन्शूलीन च्या अभावामुळे/कमतरतेमुळे मधुमेह होतो अशी समजुत होती. काही मधुमेहींना रोज इन्शूलीन टोचुन घ्यावे लागते ते का ?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 07/05/2018 - 18:13 नवीन
वेळ मिळाला की लिहितो.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 07/06/2018 - 09:43 नवीन
मधुमेह दोन प्रकारचा असतो. पहिल्या प्रकारात शरीरातील इन्शूलीन तयार करण्यामधेच कमतरता असते. त्यामुळे हा लहानपणातच उद्भवतो. इथे मात्र इन्शूलिनच्या अभावामुळे बाहेरून इन्शूलीन द्यावे लागते. या बाबतीत आपली समजूत बरोबर आहे. मात्र. . . दुसर्‍या प्रकारातला मधुमेह आपण स्वतःहून ओढवून घेतलेला असतो. डॉ. दिक्षीतांच्या सिध्दांन्तानुसार ( जो जिचकारांच्या विचारावर आधारलेला आहे) अतिरिक्त इन्शूलीनमुळे हा रोग होतो. हे अतिरिक्त इन्शूलीन भरपूर खाल्यामुळे तयार होत नाही तर पंच्चावन्न मिनिटांपेक्षा जास्त अंतर ठेऊन वारंवार खाण्यामुळे अतिरिक्त इन्शूलीन तयार होते. या जास्तीच्या इन्शूलीनमुळे शरीरातील पेशींच्या कामात अडथळे यायला लागतात. त्यांना त्यांचे काम सुरळीत करता येत नाही. यावर उपाय म्हणून त्या पेशी इन्शूलीनला विरोध करायला लागतात. त्यामुळे इन्शूलीनच्या कामात अडथळे यायला लागतात. म्हणजेच शरीरातील दोन यंत्रंणांमधेच युध्द सुरू होते. एकदाका हे युध्द सुरू झाले की, प्रत्येक बाजू आपापले बळ वाढवायला झटायला लागतात. स्वादुपींद पेशींचा विरोध मोडून काढण्यासाठी आणखी इन्शूलीन रक्तात सोडते. त्यावर मात करण्यासाठी पेशी आपला विरोध आणखी वाढवतात. म्हणजेच नेहमीच्या कामाऐवजी या लढण्यातच शक्ति बर्‍यापैकी खर्च व्हायला लागते. हा सगळाच प्रकार अनागोंदीकडे जायला लागतो. शेवटी कधीतरी स्वादुपिंड हरते. पेशी जिंकतात. मग मात्र पेशींचा हा विरोध मोडून काढण्यासाठी किंवा स्वादुपींडाच्या इन्शूलीन तयार करण्याच्या कामात मदत म्हणून बाहेरून इन्शूलीन दिले जाते. मी माझ्या कुवतीनुसार व आकलनानुसार प्रतिसाद दिला आहे. शक्यतो माझ्यासारख्या सामान्य माणसाकडून उत्तरे मिळविण्याऐवजी वरची दोन व्याख्याने ऐकून तज्ञ व्यक्तिंकडून विषय समजावून घ्यावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 07/06/2018 - 10:22 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 07/07/2018 - 18:43 नवीन
मी वरती शरीर हा शब्द वापरला आहे. पण त्यात मेंदू येत नाही. हे स्पष्ट करायचे राहिले. मेंदूमधे अनागोंदी माजली तर सगळच संपल. मेंदूच्या पेशींना ग्लुकोज थेट रक्तातून मिळवता येते. त्यासाठी त्यांना इन्शूलीनची आवश्यकता नसते. हेही ज्ञान मला दिक्षीतांच्या व्याख्यानातूनच झाले आहे. हे असे होत बघा. म्हणून म्हणतो तज्ञ माणसांकडूनच ऐका. आत्ता एकदम चूक लक्षात आली आणि म्हणून लागलीच दुरूस्त केली. उद्या कोणीतरी वेड्यासारख बरळायला लागला तर ते सुध्दा अतिरिक्त इन्शूलीनमुळे अस कोणाला तरी वाटायच. :))
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 07/11/2018 - 11:08 नवीन
दोन्ही व्याख्याने पुर्ण ऐकली. बरेच नवीन ज्ञान मिळाले. ही माहीती आमच्या पर्यंत पोहचवल्या बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 07/11/2018 - 12:40 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 07/04/2018 - 07:03 नवीन
भाजी, पोळी, वरण भात कोशिंबीर
माझे आणि अनेक लोकांचे आजी आजोबा अनेक वर्ष पोळी नाही, भाकरी खात असं वाटतं.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 07/04/2018 - 11:43 नवीन
अगदी बरोबर. माझे आई बाबा भाकरी खातात (डब्यात पोळी नेतात). मी सुदधा उपलब्ध असेल तर भाकरी खाते. पण मला स्वतःला चांगली भाकरी अजून येत नाही. अगदी आजी आजोबांच्या काळात वावरणं अवघड आहे. मला विविध कुझिन्स खाऊन पहायला फार फार आवडतं. ते मी कोणत्याही परिस्थितीत बंद करणार नाहीये!
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 08/05/2018 - 04:19 नवीन
मलाही केक वगैरे आवडतात. घरात वाढदिवसाचा केक आणला असेल तर तो मी ते जेवण झाल्यावर ५५ मिनिटांच्या मर्यादेत खातो. बर्‍याच वेळेस साखर घालून चहा प्यावासा वाटतो. मग मी कधीतरी मी साखर घातलेला चहा जेवण झाल्यावर घेतो.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 08/05/2018 - 04:14 नवीन
या बाबतीत मला माझा अनुभव सांगायचा होता. पण तरीही अजून एक महिना थांबण्याचे ठरवले होते. मला लहानपणापासून भाकरी आवडत नाही. आई बर्‍याच वेळेस रात्री भाकरी करायची. पण मी नेहमी टाळायचो. आई मला भाकरी आवडत नाही म्हणून सकाळची शिल्लक राहिलेली पोळी वाढत असे. मात्र आमच्या सौ आईची पध्दत पुढे चालू ठेवताना सक्तीने चतकोर तरी भाकरी खायला लावायच्या. मी पण आलीय भोगासी म्हणून खात असे. हे सर्व डॉ. दिक्षीतांचा व्हिडीओ पहाण्या अगोदरच्या गोष्टी आहेत पण एक दिवस सकाळचे जेवण झाल्यावर मी दुपारी वेळ होता म्हणून मी डॉ. दिक्षीतांचा व्हीडीओ युट्युबवर पाहिला आणि त्याचक्षणी हे आपल्याला जमू शकेल असे लक्षात आल्याने मी त्या क्षणापासून तो सुरू केला. त्याच दिवशी रात्री भाकरी खाताना माझी नापसंती गायब झाल्यासारखे वाटू लागले. मलापण जरा आश्चर्यच वाटले. पण हे सगळे मानसिक असेल असेच वाटत होते. जेवताना पहिला भात संपल्यावर आता बायको विचारायला लागली की काय वाढू? मी पण काहीही वाढ (म्हणजे पोळी चालेल किंवा भाकरीही चालेल या अर्थाने) म्हणायला लागलो. मी रोज स्वतःवर लक्ष ठेवत होतो की, "काहीही वाढ" असे म्हणताना मनाच्या कोपर्‍यात कुढेतरी बायकोने पोळी वाढावी अस वाटतय का? आज बरेच दिवसानंतर मी असे म्हणू शकतोय की, मला भाकरी आवडायला लागलीय असे म्हणवत नाही पण भाकरीबद्दलची नावड नक्की गेली आहे. आता बायकोने भाकरी वाढली काय किंवा पोळी, त्यामुळे माझ्या जेवणावर परिणाम होत नाही. पूर्वी मी थोडी भूक असूनही आणखी भाकरी खायला लागू नये म्हणून जेवण आवरते घेत असे. आता मात्र हे सर्व माझ्या मनाचे खेळ आहेत असे वाटत नाही. :) जिभेसाठी खाण्याकडून भुकेसाठी खाण्याकडे जाण्याचा हा प्रवास आहे असे मी या अगोदर कुढेतरी म्हटले होते. तसे म्हणण्यामागे माझा हाच अनुभव कारणीभूत आहे. तसेच आणखी एका अनुभवाने याला पुष्टी दिली आहे. त्याबाबत मी अजून थोडे थांबल्यानंतर लिहिणार आहेच.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 08/05/2018 - 04:26 नवीन
एकाच जेवणात भात, पोळी, आमटी भाजी, कोशिंबीर असे सर्व प्रकार करणं शहरी आयुष्यात तरी अनेक घरांतून मागे पडलं आहे असं वाटतं, आणि ते साहजिक आहे. शिवाय काहींना भाकरी आणि काहींसाठी पोळीसुद्धा असे दोन्ही उपप्रकार दर जेवणात तयार असणं किंवा भात संपता संपता ऐनवेळी दोन्ही ऑप्शन्स बनवण्याची पूर्वतयारी असणं ही आणखीनच दुर्मिळ गोष्ट आहे. तेचि पुरुष भाग्याचे. ;-)
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 08/05/2018 - 06:29 नवीन
:) मी भाग्यवान आहे असे माझ्या बर्‍याच नातेवाईकांना वाटते. माझी बायको नोकरी करत नसल्याने तिला सगळ जमू शकते. कोकणस्थ असल्याने भात वरण तूप यानेच जेवणाला सुरवात होते. शेवटही भातानेच होतो. दोन भातांच्या मधे सकाळी फक्त पोळ्या असतात. त्या नेहमीच जास्त केल्या जातात. कारण एकच. ऑफिसमधे न्यायला पोळ्याच ठीक वाटतात. तर रात्री मात्र सकाळच्या उरलेल्या पोळ्यांचा अंदाज घेऊन ( येथे भाकरी ऐनवेळी पटकन तयार करता येते हा मुद्दा महत्वाचा) भाकरी केली जाते. एकवेळ भाजी नसली तरी चालेल (असे सहसा होत नाही) पण आमटी ही पाहिजेच. मुलाला कोशिंबीर आवडत असल्याने तीही होतच असते. गरमागरम ताजे खाणे हे बायकोला आवडते. त्यामुळे मी भाग्यवान ठरलो आहे हे निश्चित. स्त्रियांनी पूर्णवेळ नोकरी करू नये असे माझे मत आहे. संसार व नोकरी ह्या दोन्हींचा व्याप सांभाळताना त्यांचे खूप हाल होतात असे मला वाटते. पण त्याचबरोबर स्त्रियांनी घरातच बसणे मला योग्य वाटत नाही. कारण तसे केले तर त्यांचा जगाशी संबंध तुटतो. यासाठी दिवसाकाठी ३-४ तास तरी नोकरी किंवा समाजकार्याच्या निमित्ताने त्यांनी घराबाहेर राहिले पाहिजे असा माझा आग्रह असतो. त्यामधे पैसे मिळवणे हा हेतू नसला तर फारच उत्तम. तिलाही ते पटलेले असल्यामुळे ती सामाजीक कार्यासाठी (क्लब वगैरे नव्हे) ३-४ तास तरी घराबाहेर रहाते. जगरहाटी कळत रहाते. व्यवहार कळत रहातो. तसेच यात फार दमणूक न झाल्याने ती संसाराकडे पण लक्ष देऊ शकते. मी तिच्या खात्यात ४-५ महिने पुरतील इतके पैसे शिल्लक ठेवत असल्याने व ते पैसे कसे खर्च केले हे विचारत नसल्याने स्वकमाईच्या पैशाइतके स्वातंत्र्य तिला मिळत रहाते. पण तीही काही वेगळा मोठा खर्च करायचा असल्यास तसे अगोदर आपणहून सांगते. थोडक्यात सांगायचे झाल्यास डॉ. दिक्षीतांची आहार पध्दत अंमलात आणण्याच्या दृष्टीने घरातील वातावरण अनुकूल आहे. असो. अवांतर व्हायला लागले. थांबतो. नाहीतर अवांतर मधील मुद्यांवर चर्चा सुरू व्हायची व मूळ विषय बाजूला पडायचा.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sun, 08/05/2018 - 07:03 नवीन
ताजे खाणे मिळायला बायकांनीच घरी बसावं असं काहीही नाहीये. पुरुषांनी सुदधा स्वयंपाक शिकावा. किंवा स्वयंपाकाला कुक ठेवावा. मुळात आपण दोन वेळच्या जेवणासाठी दुसऱ्या वर अवलंबून असूच नये. आणि तासाभराच्या कामासाठी कुणी आपल्यावर अवलंबून आहे म्हणून कुणाला कायमचं घरी बसावं लागू नये (काय करायचं ते त्या माणसाला ठरवता यावं, दुसऱ्या कुणी त्याच्यासाठी ते ठरवूच नये) ह्या मताची मी आहे. सर्वांना स्वयंपाक यावा आणि सर्वांनी तो नियमितपणे करावा. निरोगी आयुष्यसाठी हे सुद्धा महत्वाचे आहे. कारण आपले आरोग्य की आपली जबाबदारी आहे, घरातल्या बाईंची नाही. अवांतर मलाही करायचं नाहीये. पण 2018 साली सुशिक्षित लोकांच्या फोरमवर अशी वाक्य वाचवत नाहीत.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 08/05/2018 - 08:28 नवीन
बायकोलाच स्वयंपाक करायला आवडतो. कुवत असूनही तिला कुक ठेवणे पटणार नाही. प्रेमाने बनविलेल्या साध्या जेवणाची चवच वेगळी. ती चव व त्याचे महत्व मला शब्दात नाही मांडता येणार. कारण मी अशिक्षीत आहे. :)) असो. तर सांगायचा मुद्दा असा की, मी शक्यतो हाॅटेल, पार्ट्या, लग्नाच्या जेवणावळी टाळतो. अर्धवेळ विनावेतन नोकरीचा मुद्दा मी मांडला. तिला तो पटला कारण ती पण अशिक्षीतच आहे. ती एका शाळेची ट्रस्टी आहे. त्या शाळेच्या १५० मुले असलेली बालवाडी विभागाची ती मुख्य संचालिका आहे. तिला हे सगळ मिळाल पण त्यात तिचा पूर्ण दिवस जात नाही. तिला नवर्याने सांगितलेले पटले व तीने ते ऐकून ती यशस्वी झाली हे कुणाला झेपणार नाही ह्याबाबत मी सहमत आहे. थोडक्यात २०१८ नंतरची बरीच वर्षे म्हणजे मरेपर्यंत मी अशिक्षीतच असणार आहे. आणि बायको मागासलेली असल्याने माझ विचारांवर आधारीत असलेले म्हणणे पटून ती पुढेही ऐकत रहाणार आहे. _/\_
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sun, 08/05/2018 - 10:28 नवीन
प्रश्न तुमच्या बायकोचा एकटीचा नाहीये. इन जनरल उत्तम जेवण मिळावे (किंवा संसार सुरळीत चालावा) म्हणून बायकांनी नोकरी करू नये ह्या मताचा आहे. (संदर्भ :- स्त्रियांनी पूर्णवेळ नोकरी करू नये असे माझे मत आहे. संसार व नोकरी ह्या दोन्हींचा व्याप सांभाळताना त्यांचे खूप हाल होतात असे मला वाटते.) तुमच्या बायकोला एक बाकी काही तरी करायची चांगली संधी मिळाली म्हणून हे मत सर्वांसाठीच योग्य आहे असं नाही ना? आणि शिवाय संसार ही स्त्री नेच यशस्वी करायची गोष्ट आहे असाही अर्थ त्यातून निघतो. ( तुम्ही इन जनरल स्त्रियांनी काय करावे आणि काय करू नये ह्यावर बोलत आहात म्हणून उत्तर द्यावे लागले. तुमच्या घरात तुम्ही नवरा बायको काहीही ठरवा, त्याच्याशी कुणाला प्रॉब्लेम नाही.) तुम्ही अशिक्षित असलात तरी इतका मुद्दा समजण्याइतके सुज्ञ तरी नक्कीच असाल. (होप्फुली...) खरं तर केवळ मुद्दा रेटायला स्वतःला आणि बालवाडी चालवणाऱ्या आपल्या बायकोला अशिक्षित म्हणून घेणारे वाटला नव्हतात, पण असो.. संसार, जेवण आणि अजून सहजीवनात जे जे काही अपेक्षित आहे ते सगळं स्त्री आणि पुरुष दोघांचीही जबाबदारी आहे. ह्यात आर्थिक बाजूही आल्या आणि घर संसारही आला. इतकंच माझं म्हणणं आहे. बाकी आपली मतं बदलण्याचा हेतू अजिबात नाही. पण शेकडो लोकं जिथे वाचत असतात अशा संस्थळावर आवश्यक तिथे विरोध नोंदवणे मला व्यक्तिशः आवश्यक वाटतं. ते केलं. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 08/05/2018 - 11:44 नवीन
:) खर म्हणजे माझा प्रतिसाद इथेच संपला आहे. ---------------------------------------------- मागा मोड ऑन
एकाच जेवणात भात, पोळी, आमटी भाजी, कोशिंबीर असे सर्व प्रकार करणं शहरी आयुष्यात तरी अनेक घरांतून मागे पडलं आहे असं वाटतं, आणि ते साहजिक आहे. शिवाय काहींना भाकरी आणि काहींसाठी पोळीसुद्धा असे दोन्ही उपप्रकार दर जेवणात तयार असणं किंवा भात संपता संपता ऐनवेळी दोन्ही ऑप्शन्स बनवण्याची पूर्वतयारी असणं ही आणखीनच दुर्मिळ गोष्ट आहे. तेचि पुरुष भाग्याचे. ;-)
गवींनी हे लिहिले होते व नंतर डोळा मिचकावला होता. त्यावर मी भाग्यवान असल्याच :) आणि मला डॉ. दिक्षीतांनी सुचवलेली जिवनशैली अंमलात आणण्यासाठी आवश्यक अनुकूलता कशी आहे ते सांगितले होते. बाकी माझा कोणताही उद्देश नव्हता आणि नाही. अर्धवेळ नोकरी करणार्‍या स्त्रियांची मुले व पूर्णवेळ नोकरी करणार्‍या स्त्रियांची मुले यात तुलना केली असता, अर्धवेळ नोकरी करणार्‍या स्त्रियांची मुले जास्त यशस्वी असतात अशा प्रकारचा शोध निबंध १९९० च्या सुमारास प्रसिध्द झाला होता. त्यावर आधारीत आम्ही दोघांनी घेतलेला तो निर्णय होता. असो. (कृपया १९९० चा दुवा मागू नये. त्यापेक्षा मी काहीतरी फेकतो आहे असा आरोप माझ्यावर करून हा विषय संपवावा व हा धागा उजवी कडे जाण्यापासून वाचवावा ही विनंती. मी कसा खरा आहे याबाबत मी एक ही वाक्य लिहिणार नाही. कारण हा घागा काढण्यामागे कोणाला काही शिकवावे हा माझा उद्देशच नाहीये.) तरीपण आपली पोस्ट वाचून खूप बर वाटल. धन्यवाद.
तुमच्या घरात तुम्ही नवरा बायको काहीही ठरवा, त्याच्याशी कुणाला प्रॉब्लेम नाही.
मला माझ्या घरात स्वातंत्र्य आहे व माझ्या ह्या घरातील स्वातंत्र्यामुळे तुम्हाला त्रास होत नाहीये हे ऐकून बरे वाटले त्याबद्दल धन्यवाद.
तुम्ही अशिक्षित असलात तरी इतका मुद्दा समजण्याइतके सुज्ञ तरी नक्कीच असाल.
सुज्ञ असण्याची शक्यता व्यक्त केल्याबद्दल. धन्यवाद.
पण शेकडो लोकं जिथे वाचत असतात अशा संस्थळावर आवश्यक तिथे विरोध नोंदवणे मला व्यक्तिशः आवश्यक वाटतं. ते केलं. धन्यवाद!
पण शेकडो लोकं जिथे वाचत असतात अशा संस्थळावर माझ्यात काहीतरी चांगले असण्याची शक्यता कोणीतरी व्यक्त केल्यास त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे मला व्यक्तिशः आवश्यक वाटत. ते मी करत आहे. धन्यवाद. मला वाटते आपण दोघांनीही आपल्याला जे योग्य वाटते ते केलेले असल्याने हा धागा आता मूळ विषयावर यायला काही हरकत नसावी. _/\_ मागांचे धागे वाचून त्यांच्यासारखे भले मोठे प्रतिसाद मला देता येतील किंवा नाही हे तपासून पहावयाची बर्‍याच दिवसापासून इच्छा होती. ती तुमच्यामुळे पूर्ण झाल्याबद्द्ल धन्यवाद. अरेच्या एक राहीलेच. मनमोकळ्या प्रतीसादाबद्द्ल धन्यवाद. मागा मोड ऑफ. :)
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sun, 08/05/2018 - 19:32 नवीन
भागवत साहेब, ज्या निष्ठेने तुम्ही डॉ. दिक्षितांचा डायट प्लॅन पाळत आहात आणि ज्या कळकळीने तुम्ही हा विषय मिपावर मांडत आहात ते खरेच कौतुकास्पद आहे. तुम्ही बऱ्याच मिपाकरांना या धाग्यामुळे विचारप्रवृत्त केले असणार यांत शंकाच नाही. केवळ दोन वेळेस खायचे असल्याने दोन्ही वेळेला चौरस आहार घेणे गरजेचे आहे असे वाटते. तुम्ही जर दुपारच्या जेवणासाठी डबा नेत असाल तर चौरस आहाराचे कसे जमवता? डब्यात शक्यतो पोळी-भाजी नेली जाते म्हणून हा प्रश्न. तसेच पोळी ऐवजी भाकरी खाणे गरजेचे आहे का? मध्यंतरी गहू खाऊ नये आणि मराठी माणसाने ज्वारी खाणे आवश्यक आहे असे कायप्पा फॉर्वर्डस वाचण्यात आले होते. हे त्या संदर्भात आहे का? बाकी या डायट प्लॅन साठी तुम्हाला घरातून संपूर्ण पाठिंबा आहे हि गोष्ट खरंच भाग्याची आहे. तुमच्या बाबतीत "तेचि पुरुष दैवाचे, थोर भाग्य तयांचे" हे अगदी खरे आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे तुम्ही १ महिन्यापेक्षा जास्त वेळापासून हि आहार शैली अंगिकारली आहे. त्याचे आतापर्यंतचे परिणाम कसे आहेत?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 08/05/2018 - 20:39 नवीन
मी निवृत्त जिवन जगत आहे. त्यामुळे जेवायच्या दोन्ही वेळेस मी घरीच असतो. खर तर मला या आहार शैलीची गरज नाही. पण माझ्यावर बर्‍याच जणांचा विश्वास असल्याने मला कोणाला काही सांगायचे असल्यास खूप काळजी घ्यावी लागते. मला माझ्या नातेवाईकांना व मित्रमंडळींना ह्या जिवनशैलीचा स्विकार करण्याबद्द्ल सांगायचे होते. पण आधी केले मग सांगितले हा मार्ग बरोबर असल्याने मी ही जिवनशैलीचा अनुभव घेऊन पहात आहे. माझ्यामुळे माझी बायको, मुलगा, भाचा भाची एक पुतणी यांनी हा प्रकार सुरू केला आहे. एक मित्र याबाबत विचार करत आहे. एका मित्राच्या मुलाला त्याच्या नकळत फायदा झालेला आहे. भाकरीच्या नावडीबद्दल मी वर लिहीले आहेच. तसेच आणखीही लिहावयाचे होते पण अवांतरातच आज बराच वेळ गेला. :) पण उद्या मात्र अजून दोन अनुभव लिहीन. या डाएट प्लॅन बद्दल एक गोष्ट नक्की की घरच्या गृहिणीला याचा वेगळा त्रास होत नाही. इतर आहार पध्दतीत मात्र नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करायचे असल्याने घरच्या लक्ष्मीला फार त्रास होऊ शकतो. तसेच वेगळा जास्तीचा खर्च करायला लागत नाही. आपले नेहमीचे रोजचे जेवण जेवायचे आहे. डॉ. दिक्षीतांनी चौरस आहाराचे मार्गदर्शन व्हीडीओ मधे केलेले आहेच. मी आणखी वेगळे काय सांगणार. मी शाकाहारी असल्याने माझ्या जेवणात पिष्टमय पदार्थांची खूप रेलचेल असते. यासाठी मी थोडे दाणे व हरबर्‍याची डाळ ८ तास भिजत टाकतो व जेवताना खातो. प्रोटीन्ससाठी एवढाच बदल मी रोजच्या जेवणामधे सध्यातरी केला आहे.
  • Log in or register to post comments
ए
एमी Sun, 08/05/2018 - 22:51 नवीन
+१०००
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 08/05/2018 - 11:56 नवीन
गवि साहेब, डोळे मारू नका हो. मला सुध्दा बिथरल्यासारख झालं. अवांतर होतय हे कळूनही वळल नाही बघा. आणि धागा लै जोरात उजवीकडे पळायला लागला. :)
  • Log in or register to post comments
P
palambar Tue, 07/03/2018 - 19:05 नवीन
मि दोन दिवसापुर्विच माझे रिपोर्ट त्या ग्रुप वर पाठ्वलेत, पण माझि जिटिटि साखर १३२, २४३,२४१ अशि आल्याने माझे डाक्टर म्हण्तात तुम्हि डायबेटीशआनचा सल्ला विचारा. मला वाट्त साखर नारमल आल्यावर दिक्शितांचा प्रोग्राम पाळावा.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 07/03/2018 - 19:27 नवीन
मधुमेह सल्लागाराना विचारून तर बघा. पण काही झाले तरी ते सांगतील त्याप्रमाणेच वागा. साखर नॉर्मल झाली तरीही मधुमेह सल्लागारांना सांगूनच जे करायचे ते करा.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 17 hours ago
  • सुंदर !!
    2 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा