Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

फुकटात विनासायास वेटलॉस

श
शाम भागवत
Tue, 07/03/2018 - 09:09
🗣 313 प्रतिसाद
वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय. ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे ....... थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय. कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो! घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार. तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये. तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल. त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली. मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका. सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही. आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा! तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते. त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे. बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती. डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत. पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात. २०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे. खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता. डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा. https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/ डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा. https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4 मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे. एक महत्त्वाची सूचना : ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये. -------------------------------------------------------------- (श्री. शाम भागवत यांचा खालील एक प्रतिसाद लेखात समाविष्ट केला आहे.) एकदाच ऐकून भाषणातले सगळे मुद्दे लक्षात राहणे शक्य नसते. परत दोन तास देणे कंटाळवाणे होऊ शकते किंवा नंतर बघू अस म्हणत लांबणीवर पडते. यासाठी एक लिंक देत आहे. तो VDO आहे. डॉ. दिक्षीतांनीच सारांश रुपात सगळे सांगितले आहे. नुसते ऐकूनही उजळणी करता येऊ शकेल. तसेच डॉक्टरांनी बरेच तक्ते बनवलेले असून त्यातले दोन महत्वाचे दाखवले जातात. त्यांचे screenshot घेऊन ठेवल्यास सर्व संदर्भ अगदी हाताशी राहू शकतील. कोणालाही थोडक्यात सांगायचे असल्यास खूप उपयोगाला येतात. तुम्हाला आलेल्या अडचणीमुळे मला हे सुचले म्हणून तुम्हालाच धन्यवाद व शुभेच्छा. https://youtu.be/99iQOs-u_HU

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 162643 views

🗣 चर्चा (313)
आ
आनन्दा Fri, 08/10/2018 - 14:42 नवीन
विना दूध असे दीक्षितांनी सांगितलेले नाहीये. एका कपाला पाव कप दूध असे प्रमान चलेल त्यांच्या मते. मी तरी तसा चहा दिवसातून ३ वेळा पितो, आणि दोन्ही वेळच्या जेवणानंतर मस्तपैकी साखर घालून कॉफी. तसेही जेवण २०-२५ मिनिटात संपते, त्यामुळे छानपैकी बायकोबरोबर गप्पा मारत १५ मिनिटे कॉफीपानाचा कार्यक्रम होतो.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 08/15/2018 - 00:23 नवीन
छानपैकी बायकोबरोबर
भाग्यवान हो तुम्ही!! :)
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 08/10/2018 - 15:02 नवीन
मी माझ्या बागेत एक प्लास्टिक ची पिशवी आणि एक रिकामा डबा ठेवतो
पाच हजार रु दंड :)
  • Log in or register to post comments
I
II श्रीमंत पेशवे II Tue, 08/14/2018 - 06:58 नवीन
पण ५० मायक्रोन च्या वरील जाडीची ठेवतो
  • Log in or register to post comments
I
II श्रीमंत पेशवे II Mon, 08/20/2018 - 14:25 नवीन
मला २० जुलै असे लिहायचे होते चूकीन शुक्रवारी २० सप्टेंबर१८ असे लिहले गेले
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 08/20/2018 - 14:34 नवीन
नाही सांगत हो कुणी त्या पथकाला तुमचे नांव. उगी कशाला घाबरताय? ;) आणि भेटलेच तर सांगा बिनधास्त बायोडिग्रेडेबल प्लास्टिकची पिशवी आहे म्हणून. त्यांना तरी कुठे फरक कळतोय अजुन साध्या आणि बायोडिग्रेडेबल प्लास्टिकमधला. ;) नसल्यास ५१ मायक्रॉनची आहे म्हनून सांगा. ते मोजायचे टूल नसते त्यांच्याकडे. जरी कमी भरले तरी वापरुन झिजली म्हणायची. ;)
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 08/20/2018 - 15:48 नवीन
मला २० जुलै असे लिहायचे होते चूकीन शुक्रवारी २० सप्टेंबर१८ असे लिहले गेले
आम्ही सगळ्यांनी ते समजून घेतले होते. :)
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 08/10/2018 - 13:27 नवीन
खुप माहितीपुर्ण लेखन आणी तज्ञ मिपाकरांच्या उपयुक्त प्रतिक्रिया .
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 08/10/2018 - 14:42 नवीन
काल आणि परवा मी केलेल्या नोंदीवरून एक गोष्ट लक्षात येते आहे की आपण आवश्यकतेपेक्षा जास्त खात आहोत. आधी त्यावर लगाम घातला पाहिजे. सध्यातरी एकदम एका झटक्यात दोनदाच जेवणाची सवय लावणे मला जमेलसे वाटत नाहिये.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sat, 08/11/2018 - 05:34 नवीन
काका सहज जमेल.. फक्त ८ दिवस८गरज पडेल तेव्हा झोपायची तयारी ठेवा. (तुम्हाला डायबेटिस नाहीये हे गृहीत धर्तोय) मला ४ तास काही खल्ले नाही की गरगरायला लागायचं. ४-५ दिवस त्रास झाला. पण हे गरगरल्याशिवाय चरबी वितळायचा मॅकेनिझम सुरु होत नाही.. वर्षानुवर्षे शरीराला चरबी वितळवायची सवयच नसते. ती लागताना थोडासा त्रास होणारच.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 08/11/2018 - 16:27 नवीन
सुदैवाने माझी रक्तशर्करा, रक्तदाब आणि कोलेस्टरादि अन्य घटक सामान्य आहेत. "नॉर्मलपण देगा देवा" म्हणण्याची वेळ आलेली नाही वा येऊ दिलेली नाही.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sun, 08/12/2018 - 15:54 नवीन
>>> फक्त ८ दिवस८गरज पडेल तेव्हा झोपायची तयारी ठेवा. >>> झोप कशामुळे येते म्हणे?
  • Log in or register to post comments
I
II श्रीमंत पेशवे II Tue, 08/14/2018 - 06:56 नवीन
अगदी बरोबर ...... फक्त असीडीक फील होत असेल तर थोडा वेगळा विचार करावा लागेल सुरुवातीला दोन दिवस जरा जाणवत पोटात काहीतरी गडबड चालू आहे .......डब डब ल्या सारख वाटतं ....पण कोमट पाणी / नॉर्मल पाणी पिऊन ते थांबतं .... आनन्दा म्हणतायत त्या प्रमाणे भूक लागली आहे पण पोटात काही येत नाही असं म्हटल्यावर ...चरबी....तीच काम करायला सुरुवात करते
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 08/11/2018 - 07:02 नवीन
आपण जास्त खात असल्याची तुम्ही जाहीर कबुली देताय म्हणजे तुम्ही निम्मी लढाई जिंकली अस म्हणायला हरकत नाही. :)) उपदेशांचे डोस पाजून मुलांवर संस्कार करता येतीलच असे नाहीत. पण प्रत्यक्ष आचरणाद्वारे वडिलांचे मुलांवर होणारे संस्कार जास्त दृढ असतात व असे संस्कार इतके नकळत होतात की, मुलाला तसे काही झाल्याचे जाणवतही नाही. पण या संस्कारांचा आपल्या अंतर्मनात खूप मोठा ठसा उमटलेला असतो. या संस्कारांचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणून जिभेवर ताबा मिळवण्याची तुमची धडपड सुरू आहे असे मला वाटते. इतकेच नव्हे तर, "शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य" या धाग्याचा जन्म यातूनच झाला आहे अशीच माझी समजूत आहे. तुमचे वय लक्षात घेता जस जमेल तसे सुरवात करा. जर अ‍ॅसिडिटीचा त्रास व्हायला लागला तर मात्र डॉ. दिक्षीतांच्या ऐवजी डॉ. जिचकारांच्या व्हिडिओमधे सांगितलेले लो कार्बोहैड्रेट पदार्थांचा म्हणजे काकडी, टरबूज वगैरेचा पर्याय वापरून त्यावर मात करता येऊ शकेल असा माझा तर्क आहे. अर्थात हा तर्क असल्याने या वाक्यावर डॉ. सुबोध खरे काय म्हणतात हे पाहायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/11/2018 - 08:27 नवीन
आहार मध्ये (satiety) म्हणजे समाधान हा एक मोठा घटक आहे. बर्याच लोकाना ताक भात/ दही भात/ आमटी भात खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटतच नाही. यात एक मानसिकतेचा भाग आहे आणि दुसरे पोट "भरल्याचा" भाग आहे. तसेच काही लोक त्यांच्या गरजेपेक्षा जास्त खात राहतात याचे कारण त्यांच्या जठराचा आकार अति खाउन खाऊन त्यांनी वाढवून ठेवलेला असतो त्यामुळे बरीच मात्र खाल्ल्या शिवाय त्यांना पोट भरल्यासारखे वाटतच नाही. हि स्थिती एका फटक्यात दूर होत नाही. यासाठी बरेच दिवस प्रयत्न करून आपला आहार "कमी" करावा लागतो. तोपर्यंत पोट भरल्याची संवेदना येण्यासाठी नुसते फुगून येणारे पदार्थ उदा. कुरमुरे खावेत. दोन मुठी कुरमुरे खाऊन दोन ग्लास थंडीनं पाणी पिऊन पाहा. छान पोट भरल्याची संवेदना येते. काकडी किंवा कलिंगड हे "असेच" पदार्थ आहेत कि त्यात ९५ % पाणी आहे. शिवाय हे पदार्थ आपल्याला एका वेळेस भरपूर खाता येतात म्हणजेच एका बैठकीत आपण २००-२५० ग्राम सहज खाऊ शकतो. आणि ज्यात( १०० ग्राम) मध्ये आपल्याला फार तर १५ -२० कॅलरी मिळतात.( तुलनेसाठी एक १०० ग्रॅमच्या मोठ्या सामोशात आपल्याला ६०० कॅलरी मिळतात) म्हणजेच दोन जेवणे सोडून मधल्या काळात असे पदार्थ (समोसा नव्हे) खाल्ले तर पोट रिकामे असल्याची संवेदना होणार नाही. शिवाय हे पदार्थ थोडेसे अल्कलाईन असल्याने ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांना याचा नक्की फायदा होऊ शकतो. बरेच लोक आम्लपित्त आणि भूक यात गल्लत करतात आणि त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खात राहतात. काही पदार्थ जे सहज मधल्या वेळेस खाता येतील काकडी /कलिंगड १०० ग्राम -१५ ते २० कॅलरी खरबूज/ चिबूड १०० ग्राम --३४ कॅलरी पेरू १०० ग्राम-६८ कॅलरी आंबा १०० ग्राम ७५ कॅलरी सफरचंद १०० ग्राम ५० कॅलरी बाकी दोन जेवणांच्या मध्ये काहीही खायचे किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 08/11/2018 - 09:20 नवीन
_/\`_
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 08/11/2018 - 14:06 नवीन
आहार मध्ये (satiety) म्हणजे समाधान हा एक मोठा घटक आहे.
या समाधानातील मानसिकतेच्या मुद्याबद्दल लिहितो आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी मी माझ्यावर केलेल्या एका प्रयोगाचा हा अनुभव आहे. अर्थात ह्या पध्दतीबद्दल मी कुठे वाचले किंवा ऐकले ते आता आठवत नाहीये. प्रत्येक घास ३२ वेळा चावावा हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. कर्बोदकांचे पचन होण्यामधे तोंडातील लाळेचा वाटा खूप मोठा असतो. यास्तव शाकाहारी लोकांनी तर आवर्जून प्रत्येक घास ३२ वेळा चावायची सवय लावून घेतली पाहिजे. पण अशा पध्दतीने जेवणारे फारसे नसण्याचीच शक्यता असते. विशेषकरून भात तर फारच कमीवेळा चावला जातो. आपण जेव्हा जेवताना पहिला घास तोंडात टाकतो तेव्हा आपला हात तात्काळ दुसरा घास तयार करण्याच्या प्रक्रियेला लागतो. हा नवीन घास हातात तयार झाल्यावर, आपल्याकडून आपल्या नकळत आपल्या तोंडातील घास संपण्याची वाट पाहिली जाते. याचा परिणाम म्हणून तोंडातला घास संपूर्ण चावला जाण्याअगोदरच गिळला जातो. यावर उपाय म्हणून तोंडातला घास संपूर्णपणे गिळल्या गेल्याशिवाय आपल्या हाताला पुढच्या घासाची तयारी करू न देणे येवढेच करायचे असते. माझ्या अनुभवावरून असे केले तर; १. आपले लक्ष जेवणामधे पूर्णपणे आकर्षीत होते व हे आपल्याला जाणवते सुध्दा. इतकेच नव्हे तर या अगोदर आपल्या चावण्याकडे आपण इतके लक्ष कधीच दिले नव्हते हेही जाणवते. २. जेवायला लागणारा वेळ काही मिनिटांनी वाढतो. ३. नेहमीपेक्षा आपण खूप कमी खातो तरीही पोट भरल्याची संवेदना स्पष्ट जाणवते व आपण जेवण थांबवतो. ४. प्रत्येक घास ३२ वेळा किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळा चावला जातो. आणि हे आपोआप होते. ५. पिष्टमय पदार्थ चावत राहिल्यास त्याचे लाळेत पचन होऊन त्यातून शर्करा निर्माण झाल्याने शेवटी शेवटी तो घास गोड झाल्याचे पण जाणवू शकते. विशेषतः भाकरीच्या बाबतीत हे विशेषत्वाने जाणवते. ६. या प्रकाराची सवय नसल्याने काही काळाने आपल्या हातावर लक्ष ठेवत रहाणे कंटाळवाणे कदाचित त्रासदायकही वाटू शकते. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे तो वैयक्तिक आहे. मात्र या मागे काही शास्त्र असल्यास हाच अनुभव इतरांना येणे शक्य आहे असे वाटते. विशेषकरून जेवताना आवश्यकतेपेक्षा जास्त जेवणार्‍यांसाठी हा प्रयोग उपयुक्त ठरण्याची शक्यता वाटल्याने हे लिहीत आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/11/2018 - 18:20 नवीन
प्रत्येक घास ३२ वेळा चावून खा. आपल्या आयुर्वेदातील आहारशास्त्रात असे सांगितले आहे त्याला फार खोल अर्थ आहे. दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्षच होत आले आहे. मूळ आपण खातो कशासाठी? उदरभरण हा एक भाग झाला परंतु ते कदाचित २० % असेल बाकी फार मोठा भाग ८०% चवीसाठी असेच म्हणावे लागेल. कर्करोग विभागात काम करताना मला एक जाणवलेली भयानक गोष्ट अशी आहे कि अन्न नलिकेचा कर्करोग असलेले रुग्ण ज्यांना खाणे अशक्य होते अशाना पोटाला( जठरापर्यंत) भोक पडून अन्न दिले जाते. या रुग्णांना चव हा एक महत्त्वाचा आनंद मिळत नाही. कारण पोटाच्या भोकातून तुम्ही काजू बर्फी आत टाका किंवा लाकडाचा भुसा काहीच फरक पडणार नाही. माझ्या मित्राच्या आईला असलेला जठराचा कर्करोग अन्ननलिकेपर्यंत पसरला होता. त्यामुळे तिला पाणी पण पिता येईनासे झाले होते. तेंव्हा तिला असेच पोटाला भोक पाडायचे ठरवले जात असताना तिने मला विचारले म्हणजे आता मला कधीच काही खाता येणार नाही का? माझ्या पोटात खड्डा पडला आणि अंतःकरणात कालवाकालव झाली. ही गोष्ट मी माझ्या अन्नमार्गाचा तज्ज्ञ असणाऱ्या मित्राला सांगितली आणि त्याला गळच घातली कि काहीही करून तिला अन्न नलिकेत स्टेण्ट बसवून दे. त्याप्रमाणे त्याने हर प्रयत्नाने तो स्टेण्ट बसवून दिला. पुढे तीन महिने ती जगली तोपर्यंत ती लहान लहान घास का होईना पण तोंडाने चांगले अन्न समाधानाने खाऊ शकत होती. विषयांतर सोडून मूळ विषयाकडे परत-- आपण बहुसंख्य लोक (ज्यांना जालावर हे वाचता येत आहे असे) खाण्यासाठी जगतो आहोत. जगण्यासाठी खाण्याचे दिवस मागे पडले आहेत. मग हे सुग्रास खाण्याचा आपण जास्तीत जास्त आनंद कसा घेता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्याला चव समजते म्हणजे काय तर जिभेवर पदार्थ ठेवला कि त्यातील स्वादाचे रेणू जिभेवरील संवेदकांमध्ये चेतना जागृत करतात आणि हे अन्न तोंडातून घशात उतरले कि आपल्याला चव समजणे बंद होते. मग जितका जास्त वेळ हा पदार्थ आपण जीभेवर ठेवू तितका वेळ आपल्याला चव मिळत राहील. काही वेळाने हे संवेदक बधिर होतात आणि आपल्याला तितकी चव लागत नाही.म्हणून सुरुवातीला उत्तम लागणारा पदार्थ काही काळानंतर तितका चांगला लागत नाही. आपण थोडे थांबून परत चव घेतली तर तीच चव आपल्याला परत मिळू शकते.एकमार्गी गोड किंवा तिखट किंवा आंबट पदार्थ खात गेलात तर त्याची चव लागेनाशी होते. याच साठी आयुर्वेदात "षडरसयुक्त" जेवण खावे असा सल्ला दिला आहे. जेवणात चटण्या कोशिंबिरी तुरट आणि कडू पदार्थ खावे हा सल्ला याचसाठी दिला जातो. एक घास बत्तीस वेळा चावून खा. आपल्या आहाराच्या तीन चतुर्थांशच खा. थोडे थोडे पण अनेक वेळेस खा हे सर्व सल्ले आपल्या पूर्वजांनी अनुभवातून मिळवलेले अनमोल ज्ञान होते. पण आपण काय करतो गुलाबजाम अख्खा गटकतो. त्याने चव ८-१० सेकंदच मिळते. म्हणून मग तीच चव मिळवण्यासाठी आपल्याला अजून एक गुलाब जाम खावा लागतो आणि असे ५-६ गुलाबजाम खाल्ल्याशिवाय आपले समाधानच होत नाही.यामुळे आपण पोट भरतच राहतो. यात आपले जठर ताणले जात राहते. नंतर नंतर जठर भरल्याची संवेदनाच नाहीशी होते आणि माणसे कितीही खाल्ले तरी पोट भरतच नाही/ समाधानच होत नाही या स्थितीत येतात. हि स्थिती बहुसंख्य लठ्ठ माणसांची असते. बहुसंख्य लठ्ठ माणसे खातात तेंव्हा त्यांचा एक घास हा साधारण माणसाच्या दुप्पट असतो परंतु जसे डबल डेकर आणि सिंगल डेकर बस रस्त्यावर एकच क्षेत्रफळ व्यापतात तसे याना दुप्पट अन्न खाऊन तेवढीच चव मिळते. पुढच्या वेळेस मिसळ खात असताना लहान घास नीट चावून खाऊन पहा. शिवाय केवळ एकाच तिखट चवी मुळे आपली जीभ तिखटाला बधिर झाल्याचे जाणवेल तेंव्हा मध्ये मध्ये ताक पिऊन पहा. मिसळीचा स्वाद दुप्पट होतो असे जाणवेल. मी भयंकर तिखट मिसळ खाऊ शकतो म्हणणारी बहुसंख्य माणसे मोठे मोठे घास गिळत असल्याचे मला आढळले आहे. लोकांना मी किती तिखट खाऊ शकतो याची शेखी मिरवत सांगण्यापेक्षा मिसळीचा स्वाद घेणे मी पसंत करतो. विषयांतर सोडून मूळ विषयाकडे परत-- मग पाच सहा गुलाबजाम गटकण्या ऐवजी जर आपण एकाच गुलाबजामचे चार भाग करून एका वेळेस एकच तुकडा तोंडात टाकला आणि तो व्यवस्थित तोंडात घोळवून चावून खाल्ला ( शब्दशः बत्तीस ची गरज नाही) तर आपल्याला त्याच चवीचा आस्वाद जास्त वेळ घेता येतो. सावकाश जेवा याचा अर्थही तोच असतो. आपण चवीसाठी खातो याचा दुसरा भाग-- आपण कधीच नुसता भात किंवा नुसती भाकरी/ पोळी खात नाही कारण त्याला फारशी चव नसते पण तो उदर भरणाचा भाग आहे. आपण नुसती मेथी मटर मलई किंवा चिकन टिक्का मसाला खाऊ शकतो. कारण चव आणि स्वाद याच पदार्थात आहे पोळी किंवा भातात नाही. मग जेंव्हा तुम्ही लग्नाला पार्टीला जाता तेंव्हा प्लेट भरून भात किंवा पोळी कशासाठी खाता? बुफे मध्ये ९५% लोक आपली प्लेट भाज्या किंवा सामिष पदार्थांबरोंबर जिरा राईस तंदुरी रोटी सारख्या पदार्थानी भरून घेतात. हे केवळ पोट भरण्यासाठी असते. गेली २८ वर्षे माझे वजन स्थिर असण्याचे हेच कारण आहे.( यात काहीही रहस्य नाही म्हणून मी वजन स्थिर असण्याचे रहस्य हा शब्द वापरत नाही) माझे मित्र नातेवाईक माझी प्लेट पाहून म्हणतात कि अरे तू चिकन घेतोस, पनीर घेतोस, गुलाबजाम, खीर, बासुंदी पण घेतोस तरी तुझं वजन वाढत नाही आणि आम्ही पण तेच खातो पण आमचे वजन वाढते. माझे म्हणणे हेच असते कि माझ्या प्लेट मध्ये रोटी पण नाही आणि जिरा राईस पण नाही. मला पोट भरल्याची थोडीशी संवेदना अली कि मी एक ग्लास भरुन पाणी पितो म्हणजे पोट व्यवस्थित भरले जाते आणि अति खाणे आपोआप थांबते. मी केवळ चवीसाठी खातो पोट ( फुटेस्तोवर)भरण्यासाठी नाही. समाधान (satiety) याचा अर्थ हाच आहे.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sun, 08/12/2018 - 16:04 नवीन
>>> एक घास बत्तीस वेळा चावून खा. आपल्या आहाराच्या तीन चतुर्थांशच खा. थोडे थोडे पण अनेक वेळेस खा हे सर्व सल्ले आपल्या पूर्वजांनी अनुभवातून मिळवलेले अनमोल ज्ञान होते. >>> थोडे थोडे पण अनेक वेळेस खा हा सल्ला आपल्या पूर्वजांनी दिल्या बद्दल शंका वाटते. माझ्या मते हा सल्ला आधुनिक आहार शास्त्र देते. माझ्या माहिती प्रमाणे आयुर्वेद दिवसातून फक्त दोन वेळीच जेवण्याचा सल्ला देते. या वर अधिक स्पष्टीकरण मिळेल का?
  • Log in or register to post comments
I
II श्रीमंत पेशवे II Tue, 08/14/2018 - 07:07 नवीन
पटले मनापासून पटले ......
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 08/12/2018 - 19:01 नवीन
आपण जेव्हा जेवताना पहिला घास तोंडात टाकतो तेव्हा आपला हात तात्काळ दुसरा घास तयार करण्याच्या प्रक्रियेला लागतो. हा नवीन घास हातात तयार झाल्यावर, आपल्याकडून आपल्या नकळत आपल्या तोंडातील घास संपण्याची वाट पाहिली जाते. याचा परिणाम म्हणून तोंडातला घास संपूर्ण चावला जाण्याअगोदरच गिळला जातो. यावर उपाय म्हणून तोंडातला घास संपूर्णपणे गिळल्या गेल्याशिवाय आपल्या हाताला पुढच्या घासाची तयारी करू न देणे येवढेच करायचे असते.
यासाठी मी एक मजेशीर प्रयोग करून बघितला. काल पोहे खाताना बशी टेबलावर ठेऊन एक घास घेतल्यावर चमचा त्यातच ठेऊन खुर्ची लांब सरकवून मी बसलो. तोंडातला घास नीट चावून लाळेत मिसळून गिळल्यावर मगच हात लांब करून चमचा उचलून पुढला घास घेतला. अर्थात हे संपूर्ण जेवण करताना कठीण पडेल, तरी अधून मधून करून बघायला हरकत नाही. एकदा त्यातील फायदे जाणवले, की मग नेहमीसाठी सवय लागू शकते. डॉ. खरे यांनी सांगितल्याप्रमाणे मीही लग्नात वगैरे जेवताना मला आवडणारे गोड आणि दुसरा एकादा तिखट जिन्नस किंवा चटणी वगैरे खातो. पोळी भात घेतच नाही. अर्थात हल्ली असा प्रसंग वर्षातून एकादाच येतो.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 08/11/2018 - 16:40 नवीन
@ डॉ. सुबोध खरे: सविस्तर माहितीबद्दल आभार. मला अधून मधून गोड खाल्याने समाधन लाभते त्यामुळे मी बहुतेकदा खजूर, गूळदाणे, अंजीर, केळे असे काहीतरी थोडेसे खात असतो. यात सर्वात जास्त आवडीची वस्तु म्हणजे खजूर. Image removed.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sat, 08/11/2018 - 16:13 नवीन
काल मी दिक्षितांचा व्हिडिओ पुर्ण पाहून संपवला. त्यानंतर त्यांच्या एका स्वयंसेविकेशी संपर्क साधला आणि त्यांना मला व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप मध्ये सामाविष्ट करण्याची विनंती केली. पण हे स्वयंसेवक HbA1c आणि fasting insuline याचे रिपोर्ट त्यांना पाठवल्याशिवाय कुणाला ग्रुपमध्ये घेत नाही. रिपोर्टचे फक्त आकडेच नाहीत तर त्यांना त्या रिपोर्टचा फोटो पाठवावा लागतो. त्याखेरिज ते डाएट प्लॅनबद्दल अधिक काही माहिती देत नाहीत वा इतर काहीच माहिती देत नाही. यावरुन असे जाणवते की डॉ दिक्षितांना त्यांचे संशोधन एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि महत्वाच्या व्यासपीठावर मान्यताप्राप्त करुन घ्यावयाचे आहे त्यासाठी लागणारा प्रचंड विदा , पुरावे गोळा करण्याकरिता त्यांचे स्वयंसेवक अशा रिपोर्टची सक्ती करतात. अर्थात यात गैर काहीच नाही. आणि कदाचित ज्यांना मधूमेह आहे, किंवा त्याची काही लक्षणे दिसत असतील वा मधूमेह दृष्टीपथात असेल अशांना आधी रिपोर्ट घेवून मग हा डएट प्लॅन अंवलबणे योग्यच असावे. इतर लोकांकरिताही (म्हणजे ज्यांना मधूमेह अजिबात नाही) जर अल्पसा खर्च करुन त्यातून एका भारतीय संशोधकास मदत होत असेल तर अशी मदत करण्यास काही हरकत नसावी. फक्त "तुम्ही आम्हाला (विदा जमवण्यात) मदत करणार असाल तरच आम्ही तुम्हाला मदत करु" असा पवित्रा त्यांनी अगदी खुल्लमखुल्ला घ्यायला हरकत नव्हती असे वाटते. देवाण-घेवाण ही जगाची रीतच आहे.असो. अर्थात ज्याला फक्त वजनच कमी करायचे आहे (माझ्यासारखा) आणि मधूमेह सध्या अजिबातच दृष्टिपथात नाही त्याने हे डाएट अंवलबण्याकरिता या ग्रुपमध्ये सामविष्ट व्हायलाच हवे असे काही नाही पण ग्रुपमध्ये सामावेष झाल्यावर छोट्यामोठ्या शंकांचे निराकरण सहज होवू शकेल. पण त्याकरिता थोडासा खर्च करावा लागेल. जिचकरांच्या भाषणात मात्र असा कोणताच अंतस्थ हेतू जाणवला नाही. आणि एक भाषण म्हणूनही जिचकरांचे भाषण खूप साधेपणाचे आणि मनाला भिडणारे वाटले हे नमूद करावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 08/13/2018 - 08:14 नवीन
रीपोर्टचा फोटो पाठविल्याशिवाय ते तुम्हाला ग्रुपमधे अ‍ॅड करत नाहीत याचे कारण फक्त विदा जमवणे हे नसावे. जर तुम्हाला डायबेटीस असेल आणि तो त्यांना माहीत नसेल आणि तुम्ही ग्रुपवर सांगितलेले सल्ले किंवा आहार प्लान आमलात आणलात. आणि तुम्हाला काही त्रास झाला तरी या चळवळीची बदनामी होउ शकते. त्यांचा व्हाट्साप्प ग्रुप हा टाइमपास ग्रुप नक्कीच नसणार आणि त्यावर निट अभ्यास करुनच सल्ले मिळत असणार. माझ्या मते ते समोरील व्यक्तीस त्यांच्या सल्ल्यामुळे काही अपाय होउ नये म्हणूनच रिपोर्ट मागत असावेत. विदासाठी नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 08/13/2018 - 09:55 नवीन
अगदी असच लिहायच होत. बरे झाले तुम्ही लिहिले. कोणी जर पुढे जाऊन डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप लावून नुकसान भरपाईही मागू शकेल. कोणतेही डॉक्टर एवढी काळजी नक्कीच घेणार. विशेष करून ज्या माणसाबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही त्याबाबत तर हल्लीच्या दिवसात काळजी घ्यायलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 08/13/2018 - 15:59 नवीन
त्यांचा व्हाट्साप्प ग्रुप हा टाइमपास ग्रुप नक्कीच नसणार आणि त्यावर निट अभ्यास करुनच सल्ले मिळत असणार.
याबद्दल शंका नाहीच
माझ्या मते ते समोरील व्यक्तीस त्यांच्या सल्ल्यामुळे काही अपाय होउ नये म्हणूनच रिपोर्ट मागत असावेत. विदासाठी नाही.
ते काही काळाने कळेलच. अर्थात विदा आणि पुरावे जमवण्याकरिता जरी ते रिपोर्टस मागत असतील तरी त्यात गैर असं काहीच नाही असंच मला वाटतं. शिवाय वजन कमी करण्याकरिता इतर ठिकाणी बराच खर्च करायला माणसाची तयारी असते तर हा खर्च त्या मानाने कमीच असेल.
  • Log in or register to post comments
व
वेदांत Sun, 08/12/2018 - 08:24 नवीन
https://youtu.be/Pm6neCIJbUE
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 08/12/2018 - 18:55 नवीन
वरील व्हिडिओ संदर्भात थोडेसे ६ ऑगस्ट २०१८ रोजी डॉ. दिक्षीतांनी पुण्यात दिलेल्या भाषणाचा हा व्हीडीओ आहे. वेळ ५५ः१९ मिनिटे जागतीक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, २०२० पर्यंत भारतात जास्तीत जास्त मधुमेही रूग्ण असणार आहेत. निरनिराळे डाएट प्लॅन का फसतात? किंवा त्यामध्ये सातत्य का ठेवता येत नाही? १. काही प्लॅनमध्ये काहीतरी करून उपाशी ठेवतात. पण हे आयुष्यभर करणे जमणे शक्यच नसते. २. काहीमध्ये असे काही भन्नाट पदार्थ सुचवलेले असतात. नंतर नंतर हे पदार्थ खाणे जिकीरीचे वाटायला लागते. ३. काहींमध्ये सतत किंवा रोज मार्गदर्शन घ्यायला लावतात. त्यामुळे पुढे पुढे स्वातंत्र्यच गमावल्यासारखे वाटते. ४.काही इतके खर्चिक असतात की पैसे संपल्यावर तो डाएट प्लॅनपण संपुष्टात येतो. ५. प्रत्येक माणसाची एक प्रवृत्ती असते. काहीं प्लॅनमधे त्या प्रवृत्तीविरोधातले खायला लागते. पण असे कायम करत राहणे जमत नाही. पण जर डाएट प्लॅन यशस्वी व्हायला पाहिजे असेल तर तो प्लॅन कसा असायला पाहिजे? किंवा डॉ. दिक्षीतांचा डाएट प्लॅन मध्ये सात्यत टिकवणे का शक्य होते? १. पैसे लागणार नाहीत. २. तज्ञाकडे जायला लागणार नाही. ३. मशीन विकत आणायला लागणार नाही. ४. कुठलाही पूरक आहार विकत आणायला लागणार नाही. ५. आयुष्यभर आनंदाने करता आले पाहिजे. जास्त माहितीसाठी पहा ३०ः०८ ते ३२ः २४ जिवनशैली बदला. डॉ. दिक्षीतांनी ७ राज्यातल्या २७ शहरातील १००० मधुमेहींचा अभ्यास केल्यावर, मधुमेहावरील सध्याच्या उपचार पद्धतीमध्ये काय बदल केला पाहिजे? जास्त माहितीसाठी पहा ४४:३४ ते ४६ः२३ मधुमेहाबद्दल डॉक्टर लोकांना चुकीचे शिकवल गेलयं. डॉक्टर लोकांना शिकवले गेलेय की मधुमेह हा बरा होणारा आजार नाही तर तो कायम वाढत जाणारा आहार आहे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे एवढेच आपल्या हातात आहे. जास्त माहितीसाठी पहा ४६:२४ ते ४६ः५२
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 08/13/2018 - 08:03 नवीन
वेदांत, तुम्हाला धन्यवाद द्यायचे राहिलेच. :)
  • Log in or register to post comments
व
विखि Tue, 08/14/2018 - 08:07 नवीन
सर्व प्रथ्म श्री भागवत तसेच श्री खरे यांचेआभार,, आपण महत्वाची माहिती पुरवलीय. वर दिलेले डॉ. जिचकार -डॉ. दिक्षीत यांचे व्याख्यान एक्दम शिद्दत मध्ये ऐकले/पाहिले आहे. हा लेख माझ्यासाठी यासाठी महत्वाचा आहे कारण नकळतपणे वर दिलेला प्लॅन मी खुप आधी पासुन पाळत होतो. 'नकळतपणे' यासाठी म्हन्तोय कारण माझी कामची वेळ पाहता माझ्याकडुन आपसुप ते पाळले जायचे, अपवाद शनिवार- रवीवार व आधी मधी होणारा चहा पाण्याचा कार्यक्रम , शनिवार- रवीवार तर खादाडी ला उधाण यायचं , भसम्याचं शिरायचा अंगात :) सोमवार ते शुक्रवार जे कमवायचो ते विकेण्ड ला गमवायचो :) कित्येक वेळा मनात प्रश्न यायचा की हे २ वेळ खाणे चांगले आहे की नाही? अर्थात याचा मला कधी त्रास नाही झाला. पण आजुबाजुला टप्प्याटप्प्यात खाणारे पाहिले की जरा प्रश्न पडायचा. यावर खुप वेळा कानावर पण यायचं '' किती कमी खातो/ जेवतो'' त्यावर माझं ठरलेलं उत्तर '' उगं कशाला खाउ'' २ वेळ खाणे चांगले आहे की नाही, यावर वरील व्याख्यानामुळं आता पडदा पडलाय. राहता राहीला विषय वजनाचा तर. डॉ. दिक्षीत यांनी अतिरिक्त वजन कसे शोधुन काढायचे त्या फॉर्मुल्या प्रमाणे ३ किलो जास्ती भरतयं. व्यायामाची आवड असल्याने आणी एकंदरीत वरील विषय बर्यापैकी अंगवळणी असल्यामुळं वजन कमी होइल यात शंका नाही. फक्त शनिवार- रवीवार वरच्या खादाडी वर काम करावे लागेल :) डॉ. जिचकार -डॉ. दिक्षीत यांनी म्हट्ल्या प्रमाणे ही एक जिवनशैली आहे , जे पटतयं. आणी त्यावर आता काम सुरु केलय. बाकी अजुन काही प्रश्न आहेत पण माझ्यामते त्याची उत्तरं आपण आपले शोधलेली कधीपण चांगले, शेती तशी मशागत च्या तत्त्वावर.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 08/14/2018 - 08:52 नवीन
'नकळतपणे' यासाठी म्हणतोय कारण माझी कामची वेळ पाहता माझ्याकडुन आपसुप ते पाळले जायचे
या तुमच्या वाक्यावरून हे आठवले. माझ्या एका जवळच्या मित्राचा मुलगा आहे. घरात सगळेच खवय्ये. गोड पदार्थ म्हणजे घराचा जीव की प्राण. मधून मधून तोंडात टाकायला घरात बरेच पदार्थ तयार असायचे. त्यातून मुलाची आई सुग्रण. या मुलाने एम.एस्सी. व एक कोर्स केला व २४ व्या वर्षी नोकरीला लागला. तेव्हा त्याचे वजन ९० च्या पुढे गेलेले होते. व्यायामाचा अभाव व झोप खूप प्रिय. उंची ५'४" म्हणजे ६० किलो हे योग्य वजन. मुलगा सुस्वभावी. गोरापान व देखणा. त्यामुळे सगळ्यांना त्याच्या वाढत्या वजनाची काळजी वाटायची. नोकरी सुरू झाली व त्याचे वजन कमी व्हायला लागले. सात महिन्यात १८ किलो वजन कमी झाले. डाएट करतो आहेस का? व्यायाम करतो आहेस का? अस आम्ही परिचीत विचारायचो. पण तो तसे काही करत नव्हता. वजन अजूनही १०-१२ किलो जास्तच असल्याने आम्हालाही काळजी वाटत नव्हती तर जे होतय ते चांगलेच होतय असेच वाटत राहिले होते. मी जेव्हा माझ्या परिचितांना डॉ. दिक्षीतांच्या व्हिडिओबद्दल सांगायला सुरवात केली तेव्हा या मुलानेही तो आवर्जून पाहिला व लागलीच फोन करून तो मला भेटायला आला व म्हणाला, "काका, डॉ. दिक्षीत जे म्हणताहेत ते खरे असले पाहिजे. मला वारंवार खायची सवय होती. भूकच लागायची हो. पण नोकरी सुरू झाली आणि मी आता फक्त ३ वेळाच खातोय. सकाळी नाश्ता दुपारी जेवण व रात्री घरी यायला इतका उशीर होतो की लागलीच जेवायलाच बसायला लागते. मी जर व्यायाम केला असता तर वजन आणखीनच कमी झाले असते. पण व्यायाम करायला वेळच नव्हता हो." तुम्ही वापरलेल्या "नकळत" ह्या शब्दामुळे ही आठवण झाली. मला वाटत या १८ किलोच्या वजन घटीबद्दल मी कुठेतरी ओझरते लिहिलेय व त्याबद्दल मला सविस्तर लिहावयाचेही होते. पण ते राहून गेले होते. तुम्हाला दोन वेळा खाण्याच्या जिवनशैलीमुळे निरामय व दीर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
G
Ganesh.patole7… Wed, 08/15/2018 - 12:18 नवीन
वेटलॉस च्या नादात हिमोग्लोबिन कमी होऊन ऍनिमिया होतो.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 08/15/2018 - 20:22 नवीन
जर एखाद्याचे वजन त्याच्या उंचीप्रमाणे ६० किलो हे योग्य असेल व वेटलॉसच्या नादात तो आपले वजन ६० पेक्षाही कमी करायला लागला तर ते चक्क कुपोषणच म्हणायला लागेल. आणि कुपोषणात तर ऍनिमिया पेक्षाही जास्त गंभीर परिस्थिती ओढवू शकेल. पण ६० या योग्य वजनापेक्षा जास्त असलेले वजन जर तो कमी करायला लागला तर हिमोग्लोबिन कमी होऊन ऍनिमिया कसा होतो ते कळले नाही. जरा जास्त स्पष्ट केले तर बरे होईल.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 08/15/2018 - 19:16 नवीन
वेटलॉस च्या नादात हिमोग्लोबिन कमी होऊन ऍनिमिया होतो.
याबद्दल अधिक स्पष्टिकरण देता येईल का? समजा एकाद्याचे वजन ९० किलो आहे, आणि त्याने योग्य आहाराने , व्यायामने ते ८० किलो केले, तर त्यामुळे हिमोग्लोबिन किती आणि नेमक्या कोणत्या प्रक्रियेमुळे कमी होइल ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/16/2018 - 06:29 नवीन

योग्य आहाराने

हा शब्द फार महत्त्वाचा आहे. कारण वजन जेंव्हा आपण कमी करता तेव्हा आहारातील फक्त कॅलरीच कमी करणे आवश्यक आहे प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे कमी झाली तर त्याचा शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. आहारात लोहाचे, बी आणि क जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी झाले तर ऍनिमिया होऊ शकतो. डॉ कुमार यांच्या "जीवनसत्त्ववरील" लेखात याची उत्तम चर्चा केलेली आहे. याच कारणासाठी आपण वजन कमी करताना आहार तज्ज्ञांकडून सल्ला घेणे आवश्यक आहे. हा सल्ला प्रत्येक व्यक्तीची प्रकृती राहणीमान आणि आहाराची पद्धत पाहून देणे आवश्यक आहे. या सल्ल्यात प्रथिने खनिजे आणि जीवनसत्त्वे कमी न होता केवळ कर्बोदके आणि चरबीचे प्रमाण कमी कसे करता येईल याचा विचार असतो. ( मी जालावर सल्ला देत नाही याचे हे महत्त्वाचे कारण आहे)
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 08/17/2018 - 08:14 नवीन
या संदर्भाने डॉ जिचकरांच्या भाषणातला एक मुद्दा पुन्हा आठवतो. त्यांनी मल्टि विटॅमिनच्या गोळ्या, अन्टी ऑक्सिडन्टच्या गोळ्या घेण्याचे सुचवले आहे (नक्की केव्हा , किती घ्यायच्यात त्याबद्दल काय सांगितले ते आता नेमके आठवत नाहीये) मला मल्टि विटॅमिनच्या कॅप्सुल घेण्याची सवय बर्‍याच वर्षापासून आहे. माझ्या शरीराला या कॅप्सुलची गरज निर्माण झाली की मला तसे जाणवू लागते मग मी पाच-सात दिवस किंवा अधिक दिवस अशी कॅप्सुल घेतो. बहूधा मला थकवा जाणवू लागतो ..इतर काहीच कारण नसताना किंचीत कणकण जाणवते. माझे हिमोग्लोबीन अतिशय चांगले आहे मी नियमित रक्तदानही करतो , त्यामुळे मला फक्त काही विटॅमिन्सची कमतरता जाणवत असावी असे मला वाटते. Matilda Forte ही माझी आवडती मल्टि विटॅमिन आहे. ती बर्‍यापैकी महाग आहे पण चांगले परिणाम मिळतात म्हणून मी तीच घेतो.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 08/16/2018 - 07:08 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Tue, 08/21/2018 - 21:14 नवीन
मिपा वरील बरीच मंडळी हि आहार पद्धती पाळत आहेत असे दिसते आहे. दिवसातून केवळ दोन वेळेसच जेवत असल्याने दंत आणि मौखिक आरोग्य (ओरल हायजिन) यात काही फरक जाणवत आहे का? कृपया अनुभव सांगा.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 08/22/2018 - 10:47 नवीन
काहीच फरक जाणवत नाहीय. मी सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा जेवतोय. दुपारी ताक पितोय. (शनिवार आणि रविवार जड जातय हे करणं कारण घरी असतो) दातावर आणि अन्य मौखिक आरोग्यावर काय फरक अपेक्षीत आहे?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 08/22/2018 - 14:40 नवीन
दिवसात किती वेळा जेवता त्याचा मौखिक आरोग्याशी काहीच संबंध नाही जर प्रत्येक खाण्यानंतर (विशेषतः चॉकलेट सारखे चिकट पदार्थ असतील तर) भरपूर पाण्याने खळखळून चूळ भरून तोंड साफ ठेवत असाल तर कितीहि वेळा खा काहीही फरक पडणार नाही.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 08/22/2018 - 17:01 नवीन
+१
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Wed, 08/22/2018 - 20:14 नवीन
.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 08/22/2018 - 12:20 नवीन
डॉ. दिक्षीतांच्या आहारपध्दतीचे अनुसरण केल्यावर ७ महिन्यांनी झालेले फायदे मायबोलीवर "मोहन की मीरा" यांनी त्यांचा अनुभव लिहिलाय. त्या अनुभवांचा सारांश, त्यांच्याच शब्दात
  • आज मी 82 ला पोचले आहे 96 वरून. साधारण 7 महिन्यात.
  • अजूनही काही फायदे झाले
  • 1. इंच लॉस खूप आहे
  • 2. गुडघा दुखायचा बंद झाला
  • 3. थायरॉईड जानेवारी त 5 होते ( 0.50) ची गोळी घेऊन, ते आता 3 आहे, गोळी न घेता.
  • 4. मासीक पाळी अती वेळेवर येते , जी गेल्या 35 वर्षात कधीच आली नव्हती. ( इतर डाएट मध्ये असतानाही हे कधी झाले नव्हते) जे माझ्या दृष्टीने जादू समान आहे.
  • पाळीच्या वेळचा त्रास शून्य झाला
  • आता h1bc 3 आहे, 2017 मध्ये 4.6 होते. Fasting शुगर 82 आहे आणि pp 95. म्हणजे आता मी शुगरच्या सगळ्या धोक्यातून बाहेर आले.
अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 08/22/2018 - 14:43 नवीन

सातत्य

हीच गोष्ट फार महत्त्वाची आहे. बहुसंख्य लोक कोणताही आहार हा "काही दिवसांसाठीच" करतात यामुळे सुरुवातीला मिळणारे यश वाळू सारखे हातातून निसटून जाते. डॉ दीक्षितांची पद्धत हि जीवन पद्धती बनवली तरच यश मिळेल . चार सहा महिन्यांसाठी करून पाहू म्हणणाऱ्या लोकांपैकी बहुतांशी लोकांना वजन वाढण्याचा ये रे माझ्या मागल्या हा अनुभव यामुळेच येतो.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 08/22/2018 - 14:49 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
P
prajakta.y गुरुवार, 08/30/2018 - 07:58 नवीन
Ya padhatine diet kelyas kay kay tote (nuksan) hou shakata? Special cases jase ki Diabetic patient, Pregnant mahila, vishistha aajar aslele lok yatun vagalavet. Normal mansane he diet kelyas weightloss hoto pan kahi varshanni kahi dushparinam pan disu shaktat ka? Marathi typing cha prayatn kela pan nit jamale nahiye, tyabaddal Kshmaswa..
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/30/2018 - 15:29 नवीन
जगात असंख्य लोक असे आहेत कि ज्यांना दोन वेळचे जेवायला मिळत नाही. तेंव्हा जर आपण दोन वेळेस(च) संतुलित आणि चौरस आहार घेत असाल तर त्याचा भविष्यात दुष्परिणाम होण्याची शक्यता जवळजवळ शून्य टक्के आहे. उलट मिताहार आणि वजन प्रमाणात ठेवल्यास अति खाण्यामुळे आणि लठ्ठ पणामुळे होणारे आजार नक्की कमी होतील.
  • Log in or register to post comments
P
prajakta.y Fri, 08/31/2018 - 07:41 नवीन
ध न्य वा द !
  • Log in or register to post comments
ओ
ओम शतानन्द Fri, 08/31/2018 - 05:38 नवीन
मी १३ ऑगस्ट पासून ही पद्धत स्विकारली आहे. १८ दिवस झाले. सकाळी व संध्याकाळी फक्त बिनसाखरेचा चहा , दिवसभरात २ ते ३ कप चहा होतो. जेवणात काहीही बदल केलेला नाही . रोजच जेवणात काहीतरी गोड खातो. त्यानी ४५ मिनिटे चालायचे असे सांगितले आहे पण मला व्यायाम म्हणून चालायला आवडत असल्यामुळे रोज ८ ते १० किमी चालतो - सव्वा ते दीड तास लागतो. पूर्वी सकाळी उठल्यावर चहा बरोबर बिस्किटे, नंतर नाश्ता, मग परत चहा , नाश्त्यानंतरही काहीतरी खाणे ( शेंगदाणे वगैरे) मग जेवण , दुपारी चहा , संध्याकाळी काही खाणे , रात्री जेवण ,दोन्ही वेळेस जेवणात काहीतरी गोड पदार्थ , कधीतरी आईस क्रीम असे दिवसातून अनेक वेळा खाणे होत असल्यामुळे ही पद्धत जमेल की नाही असे वाटत होते . पण ही पद्धत स्वीकारायला काहीही अडचण आली नाही. पहिले दोन दिवस नाश्ता म्हणून काकडी , खरबूज, गाजर , टोमाटो इ खाल्ले , पण नंतर ते ही खायची गरज वाटली नाही त्यामुळे आता फक्त चहावर काम भागते. मला आलेले अनुभव एनर्जी लेवल वाढली आहे , पोट हलके असल्याची आनंददायक भावना, वजन सुमारे २ किलो कमी झाले आहे शिफ्ट duty मुळे झोपायच्या वेळा अनियमित त्यामुळे कधी कधी असिडीटी व्हायची , बरेच दिवस झालेली नाही ही पद्धत ३ महिने करून बघणार आहे . result बघून व शरीरावरील परिणाम दुष्परिणाम बघून पुढचे ठरवणार
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/31/2018 - 06:04 नवीन
ही पद्धत ३ महिने करून बघणार आहे हाच बहुसंख्य लोकांचा दृष्टिकोन असतो. कोणत्याही गोष्टीचा पूर्ण फायदा मिळण्यासाठी सातत्य असणे आवश्यक आहे. आपण आपल्या मुलाला तीन महिने क्लासला पाठवून पाहू असे म्हणता का? आणि जर मुलाला १५ दिवसात फायदा झाला असे आढळले किंवा मुलाला क्लास आवडला तर तीन महिन्यांनी सोडून देता का? आपल्याला कायमचा फायदा हवा असेल तर हीच जीवन पद्धती करा असेच माझे सांगणे आहे. कृपया हा प्रतिसाद वैयक्तिक घेऊ नये. हा सर्वच लोकांना सर्व काळासाठी आहे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 19 hours ago
  • सुंदर !!
    2 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा