Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

घडवणूक शब्दांची!

उ
उपयोजक
गुरुवार, 06/07/2018 - 17:56
🗣 148 प्रतिसाद
मराठीत भाषेत अन्य भाषांमधून होणारी आवक आपल्याला नवी नाही.महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमधे बोलल्या जाणार्‍या भाषांपासून ते फारसी,इंग्लिश,पोर्तुगीज,अरबी अशा बर्‍याच भाषांमधून ही आवक झालेली आहे. काही शब्द तर मूळचे मराठी नाहीत हे सहजपणे लक्षातही येणार नाही इतके ते मराठी भाषेत बेमालूमपणे मिसळले आहेत,स्वीकारले गेले आहेत. ही आवक अजूनही सुरुच आहे. पण ही आवक किती होऊ द्यायची यालाही काही मर्यादा असाव्यात,त्यामागे निश्चित असे धोरण असावे असे वाटू लागले आहे. खालील वाक्ये पहा. "हार्डडिस्क केबलनं लॅपटॉपला अॅटेच केली की विदीन टेन सेकंद लॅपटॉप आपोआप बंदच होतो." "पावसाडा सुरु होऊनही मुंबईच्या रस्त्यांमदले गढ्ढे महापालिकेने न भरल्याने पुन्हा एकदा महापालिकेची पोल खुललेली आहे. - अखिलेश मिश्रा ------- न्यूजसाठी" "पिल्लू तिकडे नको जाऊ.तिकडे अँटस असतील,त्या तुला बाईट करतील." "अगं मी बोलली होती त्याला, मला जाताना पिकअप कर म्हणून!" अशीच मराठी वाटू शकणारी काही वाक्ये तुमच्याही कानावर बर्‍याचदा पडत असतील. या वाक्यांमधे काही मोजके शब्द मराठी आहेत,क्रियापदे मराठी आहेत.पण सोबतच इंग्लिश आणि हिंदी शब्दांचाही नको इतका भरणा आहे. अशा भाषेला आपण मराठी का समजावं? मोजकेच मराठी शब्द आणि क्रियापद मराठी आहे म्हणून? अशी भाषा ही खरंतर इंग्लिश किंवा हिंदीची बोलीभाषा म्हणून जास्त शोभेल असं नाही का वाटत? मराठीच्या अशा धेडगुजरी रुपाबद्दल खंत व्यक्त करुन हळहळण्यापेक्षा आपणच काही केलं तर? प्रयत्न करुन पहायला हरकत काय आहे? याच इच्छेतून सुरु झालेला हा उपक्रम "घडवणूक शब्दांची!" १) परकीय आणि स्वकीय भाषेतून आलेले क्लिष्ट, लांबलचक, उच्चारायला अवघड असे शब्द २) परकीय भाषेतून आलेल्या वैज्ञानिक,तांत्रिक पारिभाषिक संज्ञा ३) समान,नेमका अर्थ दर्शवणारा शब्द आधीपासूनच मराठीत उपलब्ध असूनही तोच अर्थ दर्शवणारा मराठीतर शब्द वरील तीन प्रकारच्या शब्दांसाठी अचूक मराठी शब्द सुचवणे किंवा त्यांचे मराठीकरण करणे आणि हे करताना नवीन निर्माण केला जाणारा शब्द लांबीला कमी, उच्चारायला सोपा, अर्थवाही असेल याचाही विचार करणे म्हणजे "शब्दांची घडवणूक!" आपणही या उपक्रमात सामील होऊ शकता. हे निर्माण झालेले नवीन शब्द मुक्त वापरासाठी सर्वांकरिता उपलब्ध असतील.असे शब्द सुचविणार्‍यांबद्दल कृतज्ञता नक्कीच असेल,श्रेय देण्याजोगे असेल. या उपक्रमात आपण कशाप्रकारे सहभागी होऊ शकता? ‍१) हा धागा बनवलाच आहे.इथेच आपण असे शब्द बनवून प्रकाशित करु शकता.इतरांनी बनवलेल्या शब्दांवर चर्चा,काथ्याकूट करु शकता. २) "घडवणूक शब्दांची!" याच नावाने एक व्हॉटसअॅप समुहसुध्दा बनवला आहे.तिथे बरेचसे सदस्य हे मिपाकरच आहेत.तिथे सामील होऊ शकता.सामील होण्यासाठी आपण आपलं नाव आणि व्हॉटसअॅप नं व्यनिद्वारे मला पाठवू शकता. ३) सर्वात महत्वाचा मुद्दा: - हे शब्द केवळ बनवून उपयोग नाही तर ते सर्वत्र पसरले पाहिजेत,त्यांचा प्रसार झाला पाहिजे,मराठीजनांनी ते बोलण्यातून,लेखनातून वापरले पाहिजेत.हे शब्द रुळणे हे या उपक्रमाचं खरं यश म्हणता येईल. आंतरजाल,संभाषण,लेखन,समाजमाध्यमे अशा मार्गांनी हे शब्द पसरवण्यास,रुळवण्यास मदत करु शकता. दर सोमवारी व्हॉटसअॅप समुहावरील अंतिमत: निश्चित झालेले शब्द इथे दिले जातील,किंवा निश्चित न झाल्यास आलेली समस्या अधिक चर्चेसाठी इथे दिली जाईल. जेणेकरुन अधिक मार्गदर्शन मिळेल. असाही प्रश्न पडू शकतो की याआधी असे शब्दनिर्मितीचे प्रयत्न झालेले आहेत.वि.दा.सावरकरांनी भाषाशुद्धीच्या माध्यमातून हे प्रयत्न पूर्वी केले आहेत.तुम्ही असं वेगळं काय करताय? याचं उत्तर असं की आम्ही संपूर्णतः नवीन असं काहीच करत नाही आहोत.फक्त याआधीच्या प्रयत्नांमधल्या त्रुटी दूर करण्याचा आपापल्या क्षमतेनुसार प्रयत्न करणे आणि नवीन,सोप्या शब्दांचा प्रसार,प्रचार करुन हे शब्द रुळवण्यास यथाशक्ती प्रयत्न करत आहोत. असा प्रयत्न करुन सावरकरांची बरोबरी करण्याचे धाडस करावे हा उद्देश यामागे नसून सावरकर ही यामागची प्रेरणा असून नवशब्दांची गंगा वाहती ठेवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. अशा नवीन शब्दांचा प्रसार,प्रचार करताना ते रुळवताना काही वेळा थट्टा,मस्करीही होईल.ती याआधीच्या प्रयत्नांवेळीही झालेली आहे.सदर आक्षेपक मस्करी करण्याऐवजी सकारात्मकपणे या उपक्रमात सामील झाल्यास अधिक आनंद होईल. सर्व सकारात्मक सुचनांचे,सल्ल्यांचे स्वागतच आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 79459 views

🗣 चर्चा (148)
अ
अनिंद्य Mon, 06/11/2018 - 08:29 नवीन
उपक्रमास शुभेच्छा, त्यानिमित्ताने रोचक चर्चा घडत आहे. 'दुसर्‍या भाषेतून आपल्या भाषेत शब्द येणे फारसे वाईट नाही' हा डॉ. म्हात्रेंचा प्रतिसादही पटतो आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 06/11/2018 - 08:32 नवीन
आधीपासून असलेले तर काही नवीन शब्द.कोणते योग्य,अयोग्य,सोपे,अवघड याबद्दल अभिप्राय मिळावेत. १) LED = दिवडी (प्रकाश देणारे छोटे दिवे) २) Mobile = चलभाष ३) Acceleration = त्वरण ४) Generator = जनित्र ५) Transformer = रोहित्र ६) Air conditioner = वाकु( वातानुकूलक चे लघुरुप) ७) CFL = स्वल्पदीप ८) Adhesive = आसंजी ९) Direct Current दिष्ट धारा १०) Absolute निरपेक्ष ११) Acoustic ध्वनिक १२) Adaptor अनुकूलक १४) Air break वातारोधी १५) Coil कुंडल १६) Alarm संकटघंटी १७) Amplifier प्रवर्धी १८) Anode धनाग्र १९) Cathode ऋणाग्र २०) Welding सांधण २१) Array विन्यास २२) Audio श्रुति २३) Illumination दीपन २४) Diode = एकदि (एकाच दिशेत वीजप्रवाह वाहू देतो म्हणून) २५) Pentode = पंचोड २६) Conductor = सुवाहक २७) Insulator = दुर्वाहक २८) Semiconductor = अर्धवाहक २९) Remote = दुनि (दूरनियंत्रक) ३०) Periodic table = अणूक्रमणिका ३१) Talk time = बोलकाळ ३२) Firewall = जालभिंत ३३) Router = मार्गक ३४) Flash = तडीत ३५) Hardware = यंत्रणा ३६) Software = मंत्रणा ३७) File = धारिका ३८) Pixel = चित्रपेशी ३९) LCD = दसद(द्रव स्फटीक दर्शक) ४०) Charger = भारक ४१) चॅनेल = वाहिनी ४२) कॉम्प्लेक्स = क्लिष्ट ४३) कंटीन्यूअस = सतत की अविरत? ४४) कन्व्हिनियंट = सुलभ ४५) कन्व्हर्टर = रुपांत्रक ४६) डाटा = विदा ४७) डिजिटायझर = अंकक ४८) इलेक्ट्रॉन = विजक ४९) एक्स्टेंशन = विस्तार ५०) फॅसिलिटी = सुविधा ५१) इंडिकेटर = दर्शक ५२) इन्फॉर्मेशन = माहिती ५३) इन्स्ट्रुमेंट = उपकरण ५४) इंटरकनेक्ट = अनुबंध ५५) मल्टिप्लेक्सर = चयनक ५६) पोर्टेबल = जंगम ५७) रेंज = पल्ला ५८) रिअल टाईम = यथाकाल ५९) सेन्सर = संवेदक ६०) सिग्नल = संकेत ६१) स्केच = रेखाटन ६२) स्टोअरेज = साठवण ६३) स्विच = खटका ६४) सिस्टिम = प्रणाली ६५) टेप = फीत ६६) टेम्परेचर इंडिकेटर = तापदर्शक ६७) ट्रॅन्समिशन = पारेषण ६८) युजर = वापरदार
  • Log in or register to post comments
स
समीर वैद्य गुरुवार, 06/14/2018 - 08:18 नवीन
ला वापरकर्ता असा पर्याय जास्त चपखल वाटतो. बाकी पर्याय उत्तम.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 06/11/2018 - 08:37 नवीन
मिपाकर नरेंद्र गोळे यांच्या आभासी उपकरणन भाग २ धाग्यामधून
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 06/11/2018 - 11:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Mon, 06/11/2018 - 22:40 नवीन
लेखाचा आणि लेखकाच्या मतांचा आदर आहेच, पण भाषा हा विषय आला कि माझ्या मनात खाली दिलेले (विस्कळीत) विचार येतात. ज्ञानेश्वरांनी लिहिलेली-बोललेली मराठी शिवाजी महाराजांपर्यंत वेगळी झाली असेल, टिळकांपर्यंत अजून वेगळी झाली असेल, पु लंपर्यंत अजून वेगळी झालीये, अजून पुढे कोण लेखक येतील ती अजून वेगळी होईल. आधी आपल्या कितीतरी शब्दावरती फारसी चा प्रभाव होता, आता हिंदी इंग्लिश चा असेल. भाषा हि फक्त विचारांच्या देवाण-घेवाणीचं साधन आहे, विचार कळाल्याशी मतलब, भाषा कुठली का असेना. ज्ञानेश्वरांनी त्या काळातील शुद्धतेत कमी अशा प्राकृत भाषेत ग्रंथ लिहिला (व्याकरणाचे नियम पळाले का, आणि असतील तर कुठले? संस्कृत चे? ते माहित नाही ). थोडक्यात कदाचित त्या काली अशुद्ध गणल्या गेलेल्या भाषेत ग्रंथ लिहिला, आणि आपण ती भाषा शुद्ध करण्याचे प्रयत्न करतो हा मला कधी कधी विरोधाभास वाटतो. असं वाटतं कि ज्यांना भाषा शुद्ध हवीये त्यांनी संस्कृत मधून बोला. आणि ज्यांना बोली भाषा (जशी आहे तशी ), त्यांनी मराठीतून बोला.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 06/12/2018 - 12:45 नवीन
एकदम चपखल ! असेच काहीसे वाटत होते. आपल्या आवडी निवडीची कोणी एक भाषाआवृत्ती प्रमाण मानून विचार करू लागलो की मात्र खूप प्रश्न आणि अस्मिता छळत राहतात. तेराव्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरी त्या काळच्या प्रमाण मराठीत असावी. आज ती वाचताना अनेक शब्दांमुळे सर्वसामान्यांची सोडा... भल्याभल्यांची तारांबळ होते. तसे पुढे येत येत दर शतकाच्या मराठीचा अभ्यास केला तर, मागची भाषा पुढल्याला जराशी तरी क्लिष्ट वाटेलच. इतकेच काय सतराव्या शतकातली शिवलालीन मराठीच नव्हे तर त्यानंतरचीही काव्य-अभंग-ओव्या इत्यादींनी समृद्ध असलेली मराठी, आपल्यापकी किती जण घडाघड वाचू आणि समजू शकतील ? त्याचबरोबर, एकच भाषा, एकाच कालखंडात वापरल्या जाण्यार्‍या सगळ्या भूभागांवरही, पूर्णपणे समान कधीच नसते... म्हणूनच दर वीस किलोमीटरला भाषा बदलते असे म्हणतात. एकाच भाषेती शब्द आणि ती बोलण्याची लकबही दर ठिकाणी खूप वेगवेगळी असते. सत्तरीच्या काळात पुण्याच्या ससून सार्वजनिक रुग्णालयात खूप दूरून, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातून, बरेच रुग्ण येत असत (आता जागोजागी मोठी रुग्णालये झाल्याने ते प्रमाण खूप कमी झाले असावे). एक-दोन वर्षे बाह्यरुग्ण विभागाचा अनुभव झाल्यावर रुग्णाने तक्रार सांगायची सुरुवात केली की लगेच, "बाबा/मावशी, सातार/सांगली/कोल्लापूर... वरून आलासा म्हनावं का काय ?" असं त्यांच्याच लकबीत अभावितपणे म्हटलं जायचं... आणि ९० टक्के किंवा जास्त वेळा ते बरोबर असायचे. गंमत म्हणजे, स्थानिक व्यापार-उद्योगधंदे-समाज यांच्यातील परिस्थितीप्रमाणे उचललेल्या परक्या शब्दांची निवड, स्थानिक भाषेमुळे त्या शब्दांत केलेले बदल आणि ते बोलण्याची लकब वेगवेगळी असते. यात तर भाषेचे सौंदर्य, श्रीमंती आणि मजा आहे, असे मला वाटते ! याशिवाय, एखादा शब्द किंवा तो वापरण्याची अथवा बोलण्याची पद्धत यांना बर-वाईट कोण ठरवणार ? बर्‍याचदा, भाषेमधील काही समान गोष्टींना स्थानिक समजूतींप्रमाणे बरे-वाईट, योग्य-अयोग्य समजले जाते. मराठीत हेल काढून बोलण्यास सर्वसाधारणपणे गावंढळ समजले जाते. या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर, "दक्षिण नॉर्वेमधील (आणि विशेषतः ओस्लो या त्यांच्या राजधानीतील) लोक हेल काढून नॉर्वेजियन भाषा बोलतात, ती कानाला कशी संगितासारखी (म्युझिकल) वाटते" हे उत्तर नॉर्वेतल्या लोकांच्या तोंडी ऐकले तेव्हा मी खुर्चीवरून पडता पडता वाचलो ! भाषा मानवी संपर्काचे असाधारण आणि अपरिहार्य साधन आहे. भाषेला "बनवण्याचे" काम (किंवा मक्ता) कोणत्याही एका किंवा अनेक समाजगटांकडे (किंबहुना समाजधुरीणांकडे) कधीच नव्हता... असू शकत नाही. शिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत, वरिष्ठ-कनिष्ठ, किंवा आणखी कोणत्याही गटाला याबाबतीत सर्वाधिकार नसतात. हे सगळे वैयक्तिकरित्या त्यांना शक्य तेवढ्या सोईने बोलता येईल, समजेल, समजावून देता येईल अशीच भाषा वापरत आले आहेत आणि वापरत राहतील... अगदी जगाच्या अंतापर्यंत. हीच केवळ एकुलती एक भाषा बनण्याची प्रक्रिया आहे. तसेच, मानवी जीवन ही प्रवाही गोष्ट आहे. तीच गोष्ट प्रचलित परिस्थितीबद्दल (प्रिव्हेलिंग सर्कम्स्टॅन्सेस). या दोन्ही गोष्टी सतत बदलत असतात आणि त्यांचा एकमेकाशी सतत संवाद (इंटरअ‍ॅक्शन्स) होत असतो. हा संवाद शक्य आणि शक्य तेवढा सुरळीत करण्यामध्ये भाषेचा सिंहाचा वाटा असतो... अर्थातच माणूस आपली भाषा या संवादाला अनुरूप बदलत असतो, अगदी दिवसागणिक बदलत असतो... काळ-स्थळ-समोरचा माणूस पाहून बदलत असतो. काही कालानंतर त्यातले जास्तित जास्त सोईस्कर व सुखकर बदल अंगवळणी पडतात... म्हणजे काय ? भाषाबदलच ना ?! हे फरक हळुवार आणि सहजपणे होत असतात. ज्या समाजगटात ते फरक होत असतात त्यातल्या बहुसंख्यांची भाषाही तशीच बदलत असल्याने ते फरक झाले असे जाणवतही नाही. मात्र, आपले स्थान सोडून शंभर दोनशे किमी दूर जाऊन "आपलीच भाषा" बोलणार्‍यांशी संवाद साधू लागलो किंवा आपल्या शहर-गावाच्या पार्श्वभूमीवरील एखादे जुने पुस्तक/चलत्चित्रपट इत्यादी पाहू लागलो की भाषेतील फरक जाणवतो. यात सगळ्यात फक्त एक गरजेची सवलत अशी की, एका भाषेच्या सर्व भाषीकांना एकमेकाशी सामाजिक-शास्त्रिय-प्रशासकिय* संवाद सहजपणे करण्याच्या सोयीसाठी एक प्रमाणभाषा आवृत्ती असणे निकडीचे असते. मात्र, ती आवृत्ती सर्वसामान्य जनतेला सहज वापरता येईल अशी असेल तरच तिला काही अर्थ असेल... क्लिष्ट आवृत्ती चेष्टेची धनी होऊन, जेथे अत्यावश्यक आहे तेथे नाईलाजाने वापरली जाऊन, इतरत्र दुर्लक्षित राहण्याचीच जास्त शक्यता आहे. ================ * : यामध्ये "कला" हा शब्द हेतुपुर्रसर टाळला आहे. कारण, समाजाभिमुख कलेत (विशेषतः लेखन, चित्रपट, इ) फक्त प्रमाणभाषा वापरणे म्हणजे वास्तवाशी फारकत घेणे होईल. कलेसाठी प्रमाणभाषा असू शकत नाही !
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 06/12/2018 - 05:29 नवीन
आमच्या आजोबांची पिढी लै हुशार. इंग्रजीला बेमालूमपणे मराठीत घोळवणारी. खाली धोतर आणि वर कोट घालणारी. जसा पेहराव तशीच भाषादेखिल. सार्वजनिक वाहतूक-व्यवस्था आली आणि त्याबरोबरीने Ticket हा शब्ददेखिल आला. पण त्याला मराठी पेहराव देत त्यांनी "तिकिट" बनवले आणि वापरलेदेखिल. पण त्यांची पिढी गेली आणि नंतरच्या पिढ्यांना इंग्रजी शब्दांचे मराठीकरण करणे म्हणजे गांवढळपणा असे वाटू लागले. ती पिढी इंग्रजी शब्द जसाच्या तसा वापरू लागली. एवढेच नव्हे तर, जी मंडळी त्याचे देशीकरण करीत, त्यांना हंसू लागली. आमची पिढीदेखिल आता तेच करते. पण कधीतरी मराठीची उबळ येते आणि मग आम्ही संस्कृतला वेठीला धरून एखादा अवजड-बोजड शब्द घडवायला बसतो. आता हेच पहा - आमच्या आजोबांनी Ticket चे "तिकिट" केले नसते तर काय झाले असते? आम्ही Ticket असाच उच्चार करीत राहिलो असतो. जे तिकिट/टिकट म्हणतात त्यांना हंसत राहिलो असतो. आणि वर त्याला "प्रवासपत्र" असे नाव सुचवीत राहिलो असतो!! थोडक्यात काय तर आमच्या आजोबांच्या "तिकिटा"मुळे मराठीची "प्रवासपत्रा"तून सुटका झाली! केवळ तिकिटच नव्हे तर, Cupboard (कपाट), Tumbler (टमरेल), Tinpot (टिनपाट), Gasoline (घासलेट) असे अनेक शब्द त्याकाळी मराठीत आणले गेले आणि मराठी अधिकाधिक संपन्न होत गेली. अजूनही वेळ गेलेली नाही. देशीकरण झालेले अनेक शब्द अल्प-शिक्षित मंडळी वापरीत आहेत. त्यांना प्रमाण मराठीत जागा देता येईल आणि बोजड शब्दांपासून मराठीचे रक्षण करता येईल!
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 06/12/2018 - 06:34 नवीन
प्रतिसाद आवडला.आमचा हा क्रम ठरला आहे. १) उच्चारायला सोपा+सुगम असा शब्द बनवता येतो का हे प्रयत्न करुन तर पाहूयात. नाहीच जमलं तर २) इंग्लिश शब्दाचे मराठीकरण करु. आपल्याला शक्य असेल तर WhatsApp समुहात सामील व्हा. :)
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 06/18/2018 - 12:52 नवीन
आपल्या प्रतिसादाशी 100 टक्के सहमत आहे. असेच शब्द निर्माण व्हायला हवेत.
  • Log in or register to post comments
र
राही Tue, 06/12/2018 - 07:00 नवीन
जे सध्या बोलले जातेय आणि अशुद्ध मानले जातेय त्यातलेच कित्येक शब्द रूढ होतात आणि प्रमाण किंवा शुद्ध मानले जातात. सध्याच्या संस्कृतनिष्ठ मराठीला दख्खन पठाराच्या दगडधोंड्यांचा आणि मातीचा वास नाही. यादवकाळापर्यंत तो होता. ती मराठी आजही अस्सल वाटते. त्यात संस्कृत शब्दांचे सुंदर तद्भवीकरण आहे. इतकेच नव्हे तर अनेक कानडी शब्द मराठीचा साज लेऊन वावरतात आणि मराठीला समृद्ध करतात. आज शेजारच्या दक्षिण भारतीय भाषांशी मराठीचा संबंध तुटल्यात जमा आहे आणि विस्तीर्ण दख्खन पठारातल्या वेगवेगळ्या प्रदेशांत जी समरसता होती ती लोप पावली आहे. देशी शब्दांचे आदानप्रदानही थांबले आहे. कदाचित ळोकाग्रहास्तव झालेल्या भाषावार प्रांतरचनेचा हा एक साइड इफेक्ट असावा. सध्या हिंदी लादली जातेय हे खरे आहे. कोणत्याही सरकारी दस्तऐवज किंवा अर्जविनंतीसाठीच्या फॉर्मात पहिले वाक्य किचकट हिंदीत आणि नंतर त्याचे भाषांतर त्याहूनही किचकट मराठीत असते. कारण घण आणि ऐरण घेऊन हे शब्द ' घडवलेले' असतात. अर्थात ही घडवणूकहीच सदहेतूनेच चालली आहे. सावरकरनिर्मित शब्दांप्रमाणेच यातले काही थोडे काळाच्या ओघात टिकतील, बाकी सारे वाहून जातील. क्रमशः
  • Log in or register to post comments
र
राही Tue, 06/12/2018 - 08:42 नवीन
सुनील यांचा प्रतिसाद आवडला हे सांगण्यासाठी आणि त्यातले विचार पुढे नेण्यासाठी हा प्रतिसाद होता.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 06/12/2018 - 13:47 नवीन
चांगला उपक्रम आहे पण प्रत्येकच विशेषतः तांत्रिक शब्दाला मराठी शब्द शोधायला हवा अशी गरज वाटत नाही. वर दिलेले अंकक , भारक, तडीत असे शब्द काहीसे अनावश्यक व रुळण्यास कठीण वाटतात. मुळात ते अगदी प्रयत्नपुर्वक लक्षात ठेवावे लागतील. निदान जे शब्द आधीपासूनच (पक्षी ऑलरेडी) मराठीत आहेत त्यांच्याकरिता इंग्लिश वा हिंदी शब्द वापरणे टाळले (म्हणजे अव्हॉइड) केले तरी खूप होईल. काही लोक म्हणतात की त्यांना इंग्लिशमध्ये स्वतःला एक्स्प्रेस करणं कन्व्हिनियंट वाटतं त्यांना मला म्हणावसं वाटतं की तुम्ही एकदा मराठीतून व्यक्त व्हा आणि अनुभवा किती सहज आणि सोयीचं आहे ते.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 06/13/2018 - 09:24 नवीन
या धाग्यावर आतापर्यंत आलेल्या प्रतिसादांमधून काही गैरसमज झालेत असं लक्षात आलंय.ते दूर व्हावेत यासाठी थोडसं..... १) परभाषेतून आलेले झाडून सगळे शब्द बदलून त्या जागी मराठी शब्द पेरायचे नाहीयेत.ते शक्यही नाही. २) ......येऊ देत आले तर परभाषेतून शब्द.काय होतंय त्याला?भाषा ही अशाच प्रकारे समृध्द होत असते,भाषा ही प्रवाही असते वगैरे वगैरे..... तर अशा प्रकारे नको इतकी सहिष्णुता दाखवून मराठी भाषेत येतील तितके परके शब्द स्वीकारणे,परभाषेचं व्याकरण मराठीच्या व्याकरणावर आक्रमित होऊ देणं यामुळे मराठी कशी समृध्द होते हे काही समजलं नाही.यासंदर्भात याच धाग्यातल्या या छायाचित्रात सावरकरांनी काही दशकांपूर्वी सांगितलेलं पुरेसं ठरावं. https://www.misalpav.com/comment/1000312#comment-1000312 ३) मराठी कथालेखक यांचा हा प्रतिसाद ....वर दिलेले अंकक,भारक,तडीत असे शब्द काहीसे अनावश्यक व रुळण्यास कठीण वाटतात. मुळात ते अगदी प्रयत्नपुर्वक लक्षात ठेवावे लागतील..... हे शब्द आपण सतत वापरत नाही म्हणून ते रुळण्यास कठीण वाटतात.हे वर दिलेले शब्द कठीण वाटत असतील तर शासनाने बनवलेले तंत्रविषयक पारिभाषिक कोश पहावेत.त्यामानाने हे खुप जास्त सोपे वाटतील.सतत वापरत गेलं की हे शब्दही आपलेसे वाटू लागतील.यासाठी थोडा विश्वास,संयम हवा.वापरासाठी नवीन असल्याने ते सुरुवातीला प्रयत्नपूर्वक लक्षात ठेवावे लागतील हे साहजिकच आहे.मिपावर लांबलचक शब्दांची अनेक लघुरुपे बनवून इथे सतत वापरल्यानेच आता सहज आठवतात ना? ४)भाषा हे केवळ विचारांचे आदानप्रदान सहज व्हावे म्हणून असेल तर मुकबधिरांसाठीची हातांनी दर्शवायची चिन्हांची भाषा(sign language)हीच जागतिक भाषा म्हणून करायला हवी.ती बोलीभाषांपेक्षा जास्त फायदेशीर ठरेल.अनेक भाषा शिकायला नकोत,परक्या शब्दांचं आक्रमण नको.बरेचसे प्रश्न निकालात निघतील. ५) मराठी भाषाविकासाबद्दलची अनिच्छा,निरुत्साह,पैसे मिळवून देण्याबाबत इंग्लिशची मराठीशी तुलना, इंग्लिशबद्दलचा अहंगंड या सगळ्यातून मराठीवर अन्याय होऊ नये असे वाटते.
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Wed, 06/13/2018 - 12:33 नवीन
भाषा हे केवळ विचारांचे आदानप्रदान सहज व्हावे म्हणून असेल तर मुकबधिरांसाठीची हातांनी दर्शवायची चिन्हांची भाषा(sign language)हीच जागतिक भाषा म्हणून करायला हवी.
Sign language एकच एक असं काही नाही, त्याही वेगवेगळ्या असतात. ही यादी बघा. https://en.m.wikipedia.org/wiki/List_of_sign_languages_by_number_of_native_signers बाकी चालू दे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/14/2018 - 12:54 नवीन
४)भाषा हे केवळ विचारांचे आदानप्रदान सहज व्हावे म्हणून असेल तर मुकबधिरांसाठीची हातांनी दर्शवायची चिन्हांची भाषा(sign language)हीच जागतिक भाषा म्हणून करायला हवी.ती बोलीभाषांपेक्षा जास्त फायदेशीर ठरेल.अनेक भाषा शिकायला नकोत,परक्या शब्दांचं आक्रमण नको.बरेचसे प्रश्न निकालात निघतील. असहमत. sign language तुलनेने क्लिष्ट आणि सर्व विषयांवर बारकाव्यांनी संवाद साधण्यास अत्यंत तोकडी आहे. जर ती सोपी आणि शिवाय परिपूर्ण संवाद साधण्यास योग्य असती तर ती केव्हाच लोकप्रिय झाली असती ! किंबहुना, संवाद साधण्याची प्रक्रिया मूलभूत आवाज आणि खाणाखूणा यानीच झाली. वाढणारा संवाद साधण्यासाथी ती साधने तोकडी पडत असल्याने आणि त्याबरोबरच मानवी ध्वनियंत्राचा विकास झाल्याने, विशिष्ट आवाजांना शब्दरूप देत देत भाषा निर्माण झाल्या... खरे तर ते आवाज म्हणजे ठराविक अर्थ दर्शविणार्‍या ध्वनीखुणाच आहेत, नाही का ?! त्यापुढे, विकसित मानवी मेंदूने, विकसित ध्वनियंत्र वापरून त्याचे सोने केले ! जे शब्द, व्याकरण आणि भाषा आपल्याला चांगले "फायदा-व्यय* गुणोत्तर (बेनेफिट-कॉस्ट रेशो)" मिळवून देतात असे वाटते तेच सहज प्रचारात येतात लोकप्रिय होतात... या बाबतीत लहान-मोठे, शिक्षित-अशिक्षित, इत्यादी सर्व मानवी गटांची वागणूक समान असते. तश्या फायद्याची पर्वा न करणारा केवळ एखादा एकांडा शिलेदार अपवाद असू शकतो... आणि बर्‍याचदा इतरांच्या तो चेष्टेचा विषय झालेला असतो. =========== * या बाबतीत फायदा-व्यय गुणोत्तरामधला फायदा हा केवळ आर्थिकच अस्तो असे नाही... समवयीन आणि/अथवा समविचारी आणि/अथवा सहकर्मी (यांना एकत्रितपणे 'पियर्स' असे म्हणता येईल), आणि ज्यांच्याशी आपला कोणत्याही इतर कारणाने संवाद होत असतो ते लोक; इत्यादींशी सहज संवाद साधण्यासाठी होणारी वेळ व श्रमांची बचतही या गुणोत्तरात सामील असते. याशिवाय, पियर्समध्ये खास (भावनिक जवळीकीचे, वरचढपणाचे, इ) स्थान निर्माण करणारा एखादा शब्द, शब्दप्रयोग अथवा भाषा लकब सहजपणे (किंबहुना) अभिमानाने अंगवळणी पडतात... यातला फायदा म्हणजे सामाजिक महत्वामध्ये होणारी वाढ. या फायद्यामुळेच, विशिष्ट वय-विचार-काम या पायावर तयार होणार्‍या गटांची एक खास परिभाषा (लिंगो) बनते... आणि त्या गटात सामील झालेल्या प्रत्येकाला तिचा योग्य वापर माहित असणे आवश्यक बनते.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 06/13/2018 - 11:03 नवीन
*मुंबई खरंच महाराष्ट्राची राहिली आहे का?* *मराठी भाषे सोबतच आज मराठी माणूसही संपत आला आहे.* काल माझ्या मुलाच्या आयसीएसई बोर्डाच्या शाळेत सर्व इयत्तांसाठी orientation दिवस म्हणजेच शाळेची तोंड ओळख होती. इतके वर्ष नोकरी निमित्ताने मी कधीच हजर राहू शकले नाही पण काल आवर्जून उपस्थिती दर्शविली कारण होते की आता मुलगा मोठ्या इयत्तांमध्ये इयत्ता तिसरी मध्ये जाऊ लागला आहे तर आता आपल्याला जवळून शाळेविषयी सर्व कळायला हवे. यामध्ये मुख्याध्यापिका बाईंनी शालेय वर्षात शिकविल्या जाणाऱ्या भाषणविषयी माहिती देताना असे सांगितले की इंग्रजी ही प्रथम भाषा म्हणून शिकवली जाणार, हिंदी ही द्वितीय भाषा म्हणून या दोन्ही भाषांचे वर्ग रोज भरवले जाणार आणि मराठी ही तृतीय भाषा म्हणून शिकवली जाणार असल्याने मराठीचा वर्ग फक्त आठवड्यातून एकदाच भरवला जाईल. मराठी मन एकदम आतून ढवळून निघालं. सर्वात शेवटी प्रश्नोत्तरे असणार होते म्हणून मी उशीर होत असतानाही थांबले आणि मुख्याध्यापिका बाईंना प्रश्न केला की इंग्रजी माध्यम शाळा आहे म्हणून इंग्रजी ही प्रथम भाषा म्हणून मान्य आहे, पण आपण महाराष्ट्रात असताना जर मराठी ही राज्यभाषा आहे तर शासनाच्या नियमाप्रमाणे आपण मराठी ही द्वितीय भाषा म्हणून शिकवायला हवी आणि इतर कुठल्याही भाषेला तुम्ही तृतीय भाषेचा दर्जा द्यावा. तेवढ्यात बाईंकडून माईक चा ताबा घेत शाळेचे अमराठी भाषिक ट्रस्टी मला समजावू लागले की मुंबई आता खूप व्याप्त झाली आहे आणि इथे सर्व मिश्र भाषिक राहतात म्हणून हिंदी द्वितीय स्थानी शिकवली जाते. त्यावर मी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमांबाबत व २००९ साली प्रकाशित झालेल्या परिपत्रक विषयी आठवण करून दिली असता ते म्हणाले की आम्ही सर काही नियमाप्रमाणे करत आहोत आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे सर्व होत राहणार, आणि जर तरी तुमचा विरोध असेल तर तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे. मनातील सर्व राग गिळून मी त्यांचे धन्यवाद मानले आणि हे ही ठणकावले की मला माझे सर्व मार्ग, प्राधान्यक्रम आणि गरजा या सर्व चांगल्याच माहीत आहेत आणि मी त्या कटाक्षाने पाळते आणि पुढेही पाळत राहील. हे प्रतिउत्तर ऐकल्यानंतर त्यांनाही खूप राग आला आणि त्यांनी तिथेच सर्व कार्यक्रम संपवला. बाहेर येऊन मी पुन्हा त्यांची भेट घेतली आणि त्यांना गोड शब्दात पुन्हा एकदा सांगितलं की आपली शाळा अजून नवीन आहे आणि कायद्यात राहिलो तर आपल्याला योग्य प्रकारे शासनाचे प्रमाणपत्र मिळेल त्यावर फक्त मला ते परिपत्रक पाठवा मी बघतो इतके बोलुन त्यांनी माझा निरोप घेतला. यावर मी अमाच्या शाळेच्या इयत्ता ३री च्या व्हॉट्स ऍप ग्रुप वर भावना व्यक्त केल्या की ट्रस्टी ने तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे असे शब्द वापरायला नको हवे होते त्यांचा पालकांशी बोलण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे. यावर काही अमराठी भाषिक सहजगत्या विरोध करत व्यक्त होत राहिले. आधी ते गोड शब्दात विरोध करत होते व नंतर जेव्हा मी त्यांना सांगितलं की मराठी भाषेला द्वितीय भाषेचे स्थान मिळवून देणं माझा मला लोकशाहीमध्ये संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि मी त्याचेच पालन करत शाळेची व सरकारशी जमेल तसे संवाद साधून प्रयत्न करत राहणार. यावर मला सर्व विविध प्रांतातून आलेले अमराठी भाषिक एकत्र येऊन खूप काही बोलू लागले. कुणी म्हणालं तुम्हाला जर इतकचं तुमच्या पाल्याला मराठी भाषा शिकवायची असेल तर तुम्ही त्याला जास्तीच्या शिकवणीला टाका मराठी शिकवण्यासाठी. मी ही त्यांना तसाच बोलले की तुम्हाला मराठी इतकीच कठीण वाटते आणि शाळांनी ती अभ्यासक्रमात सामावून घेतली तर आमच्या पाल्यांचे कसे होईल अशी भीती असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना त्या वेळी जास्तीची शिकवणी लावून मराठी शिकवा आणि त्यांना पारंगत करा. त्यावर ते सर्व आणखी तोषाने मला बोलू लागले. मग मी ही म्हणाले की तुम्ही महाराष्ट्राचे पाहुणे आहात तर तुम्ही आमच्यावर अशी का जबरदस्ती करता? ज्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे त्या आमच्याकडून का अपेक्षा करता? तर त्यांना पाहुणे म्हणाले म्हणून अती जास्त राग आला. एकीने तर कहरच केला. त्या बाई म्हणे की मुंबईत पंजाबी सिंधी आणि गुजराती लोक जास्त राहतात तर मग आम्ही पण शासनाकडे हट्ट धरायचा का की आमची मातृभाषा द्वितीय भाषा म्हणून शिकवली जावी? तेव्हा त्यांना मला कान उघाडणी करावी लागली की बाई तुमच्या मताचा आदर आहे पण एक लक्षात ठेवा मुंबई महाराष्ट्रात येते आणि महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे जी महाराष्ट्राची राज्यभाषा असेल तिलाच वरचे स्थान प्राप्त व्हावे ही माफक अपेक्षा असणं काही गुन्हा नाही तर अमाचा मूलभूत हक्क आहे. त्यात भरीत भर एक बाई म्हणे हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे आणि आपण तिचा आदर करायला हवा. अहो पण कोण अनादर करत आहे हिंदीचा? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठलाही कागदोपत्री पुरावा नाही की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे म्हणून. हा फक्त काही लोकांचा भ्रम आहे. पण ऐकेल तो खरा. मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला की आमची गरज नाही तर तुम्ही तुमची वैयक्तिक गरज पाहून मुंबईमध्ये स्थलांतरित झाले आहेत त्यामुळे तुम्ही नवीन ठिकाणी आलेल्या संस्कृतीला व तेथील लोकांना मान देवून आणि त्यांचा आदर ठेवून वागले पाहिजे जसा आम्ही तुम्हाला देतो. तुम्ही जर स्वतः ला आमच्यासोबत सामावून घेण्याचा प्रयत्न करतच नाहीत तर तुम्ही आमच्यापैकी एक कसे? तुम्ही तर आमच्यासाठी काही काळासाठी आलेले पाहुणे आहात ना? पण हे इतक्यावरच थांबले नाही. ग्रुप अडमीन यांना मान देवून मी माझे भाष्य कधीच थांबवले होते पण तरीही त्यावर प्रतिक्रिया येतच होत्या. सारखी विचारणा होत होती की आमच्याच देशात आम्ही पाहुणे कसे वगैरे वगैरे. मी त्यांना उदाहरणादाखल हे ही सांगितलं की जर उद्या तुम्ही दुबई, युरोप अथवा आफ्रिकेत गेलात की तुम्ही तिथेही हिंदीची जबरदस्ती कराल की अनुक्रमे उर्दू, फ्रेंच आणि स्पॅनिश भाषा शिकून तुमचं दैनंदिन जीवन जगाल? पण कुणीही ऐकायला तयार नाही. सरतेशेवटी मी सर्वात शेवटचा संवाद टाकला की मराठी माणसाचं दुर्दैव इतकं मोठं आहे की या ग्रुप मध्ये जवळपास ३०-४०% मराठी भाषिक असूनही कालपासून कुणीच काहीच बोलत नव्हत आणि १-२ जन चक्क विरोधात बोलत होते. यातूनच कळत की आपल्यावर ही वेळ का आली आहे आणि ती म्हण पण अगदी खरी आहे की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो आणि हे एक कटु सत्य आहे. इतकं बोलुन मी अडमिन बाईंना वचन दिलं की यापुढे कसल्याही प्रतिक्रिया आल्या तरी मी त्यावर तुमचा मान राखून काही भाष्य करणार नाही. त्यावर एका मराठी भाषिक महोदयांनी फक्त इतकचं लिहिलं की मला वाटतं हा ग्रुप अशा सर्व चर्चांसाठी नाही आणि तो फक्त शाळेविषयी आणि मुलांच्या शाळेतील असणाऱ्या गराजांविषयी चारचांपुरताच मर्यादित रहावा. अरे दादा पण मी पण तर शाळेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या चुकीच्या गोष्टींबद्दल बोलत होते हे त्याच्या लक्षातच येईना त्याला कोण काय करील? फक्त एक गुजराती मैत्रीण जी पूर्णपणे महाराष्ट्रातील भाग आहे आणि छान मराठी बोलते तिने माझी बाजू सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत घेतली तिचं कौतुक तर आहेच पण मराठी भाषिकांची इतक्या संवेदनशील विषयांना हाताळण्याची पद्धत पाहून खंत ही वाटली. यानंतरही माझ्यावर टीका होत गेल्या आणि एक एक करून आत्तापर्यंत जवळ जवळ ८ अमराठी भाषिक व्यक्तींनी तो ग्रुप सोडला. माझ्यासाठी खरंच एक मोठं आश्चर्य आहे की बाहेरून कैक प्रांतातून आलेले लोक जर आज मराठी विरोधात एकत्र येऊ शकतात तर आपण महाराष्ट्रातील लोक का आणि कुणाला घाबरतो आहोत? हे लोक चक्क असं विधान करतात की असंही आता मुंबईत पंजाबी, गुजराती आणि सिंधी जास्त आहेत तर त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्या अरे मग ही मराठी माणसं नक्की कुठे जात आहेत? ते आहेत इथेच आहेत पण आज सर्व जण मूग गिळून गप्प बसले आहेत असं म्हणायला हरकत नाही. मी इतरांना नाही तर मला स्वतः ला ही तितकंच दोषी मानते आहे. आता फक्त एकच विनंती आहे की वेळ गेलेली नाही जागे व्हा, संघटित व्हा आणि महाराष्ट्रातील सर्व माध्यमांमध्ये सर्व शाळांमध्ये राज्य शासनाने जाहीर केलेल्या परिपत्रकात लिहिल्याप्रमाणे योग्य ते स्थान देऊया. *तेजस्वी कलढोणे-घाटे*
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 06/13/2018 - 11:13 नवीन
तुमच्या चिकाटीचे कौतुक आणि अभिनंदन.
या ग्रुप मध्ये जवळपास ३०-४०% मराठी भाषिक असूनही कालपासून कुणीच काहीच बोलत नव्हत
हेच आपल्या समस्येचे मुळ आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 06/13/2018 - 14:07 नवीन
कारण काय या समस्येमागचं?इंग्लिश भाषा जेवढा पैसा मिळवून देते तेवढा पैसा मराठी देत नाही हे असेल का?
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 06/14/2018 - 09:22 नवीन
इंग्लिश भाषेच उत्पनांच्या दृष्टीने असलेले महत्व हे मराठी भाषा आणि इतर भारतीय भाषा च्या तुलनेत सारखेच आहे. तुमच्या अनुभावात मात्र, आपण आपल्या भाषेकडे कसे पहातो ही समस्या उठुन दिसते. जे विविध प्रांतातून आलेले अमराठी भाषिक तुमच्याशी वाद घालत होते , त्यांना तुम्ही जर एक प्रश्न विचारला असता की जर असा निर्णय त्यांच्या राज्यातल्या एखाद्या शाळेने घेतला असता (त्यांची राज्य भाषा डवलुन हिंदी ला अग्रक्रम देणे) तर त्यांना ते मान्य झाले असते का ? जे उत्तर तुम्हाला मिळाले असते ते उत्तर जर तुम्ही तुमच्या ग्रुप मधल्या मराठी भाषीकांच्या उत्तराशी पडताळुन पाहीले की लगेच फरक लक्षात येईल.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 06/14/2018 - 11:22 नवीन
....इंग्लिश भाषेच उत्पनांच्या दृष्टीने असलेले महत्व हे मराठी भाषा आणि इतर भारतीय भाषा च्या तुलनेत सारखेच आहे..... ते कसं काय?इंग्लिश आंतरराष्ट्रीय भाषा आहे. शिवाय वरील अनुभव माझा नाही.अग्रेषित म्हणजे फॉरवर्ड असं लिहिलंय की!
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 06/14/2018 - 11:58 नवीन
मला असे म्हणायचे आहे की "इंग्लिश भाषा जेवढा पैसा मिळवून देते तेवढा पैसा मराठी देत नाही हे असेल का?" इथे "मराठी" च्या ऐवजी इतर कोणतीही भारतीय भाषा टाकली तरी चालेल. प्रतिसादाचा काही भाग हा फॉरवर्ड मधल्या अनुभवा संबधी आहे. रोख तुमच्या कडे नाही.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 06/14/2018 - 12:34 नवीन
शिवाय वरील अनुभव माझा नाही.अग्रेषित म्हणजे फॉरवर्ड असं लिहिलंय की!
शिंपल मराठीत लिवायच ना "फॉरवर्ड मेसेज" म्हणून आम्ही उगा दोन दीस डोक लावत बसलो "अग्रेषित" वर. आम्हाला वाटल हा कोन नवा प्रेषित आला की काय? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/14/2018 - 13:03 नवीन
खी खी खी... https://www.misalpav.com/comment/1000667#comment-1000667 या प्रतिसादातल्या, ठळक केलेल्या मजकूराचे उत्तम उदाहरण, इथे इतक्या लवकर मिळेल असे वाटले नव्हते ! =))
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 06/14/2018 - 13:14 नवीन
ओ म्हात्रे सर आमच्या धनुष्यातुन तुम्ही तुमचे बाण मारु नका. एका विषिष्ठ, उदात्त, विशुध्द, प्रामाणिक सोज्वळ आणि निर्मळ मनाने दिलेला तो प्रतिसाद होता. कोणालाही कोणत्याही प्रकारे दुखावण्याचा आमचा हेतु नव्हता. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/14/2018 - 13:16 नवीन
दिसले ते सांगितले... फक्त, (काहीसे आश्चर्य वाटून केलेले) स्टेटमेंट ऑफ फॅक्ट आहे हो ते ! :) तुमच्या विषिष्ठ, उदात्त, विशुध्द, प्रामाणिक सोज्वळ आणि निर्मळ मनाबद्दल आमच्या मनात काडीचीही शंका-आशंका नाही.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 06/14/2018 - 14:35 नवीन
आमच्या मनात काडीचीही शंका-आशंका नाही
डाऊट नाय म्हणा की राव. की तुमीपण अस्मितावादी हायसा? अस्मिता म्हणजे लै वंगाळ नशा बगा. आरडीएक्स जनू. ९९% तुडवातुडवीचं कारण. बोले तो रूट कॉज.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 06/13/2018 - 12:22 नवीन
सरकारी नियमांचे उल्लंघन होत असल्यास व तुम्ही केला आहे तसा प्रयत्न करूनही शाळेचे प्रशासन सुधारत नसेल तर, महाराष्ट्र शासनाच्या योग्य त्या सरकारी खात्यात त्याबद्दल तक्रार करणे योग्य होईल.
  • Log in or register to post comments
स
सप्तरंगी गुरुवार, 06/14/2018 - 15:10 नवीन
वर ते सर्व आणखी तोषाने मला बोलू लागले.
मराठीसाठी त्या इतक्या पोटतिडकीने लिहित आहेत, पण तोष आणि त्वेष यातील फरक त्यांच्या लक्षात आलेला दिसत नाही, मराठी त्यांचीपण तृतीय भाषाच होती का :))
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 06/15/2018 - 16:02 नवीन
एक एक करून आत्तापर्यंत जवळ जवळ ८ अमराठी भाषिक व्यक्तींनी तो ग्रुप सोडला.
भारीच की ... बाकी वाद-विवाद करण्यापेक्षा बाईंनी कायदेशीर प्रक्रियेलाच हात घालायला हवा असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Fri, 06/15/2018 - 17:07 नवीन
३.५० ते ४.३८ पर्यंत इरावती हर्षेंचं मराठी ऐका. https://youtu.be/z0Gc91HZohY
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 06/15/2018 - 18:09 नवीन
परफेक्ट आहे की हो, तुम्हाला काय डाऊट आला बरं ?!
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 06/16/2018 - 05:32 नवीन
चार अोळी मराठीत बोलताना इतके इंग्रजी शब्द वापरलेत हे पाहून धन्य झालो.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sat, 06/16/2018 - 08:43 नवीन
अगदी अगदी एक ठीकाणी ती असे म्हणते "there is उत्सुकता आहे मला" खरेच धन्य आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 06/16/2018 - 09:02 नवीन
(हर्षे मॅडमच्या मराठीबद्दल केलेला) उपरोध हुकला ! ;) :)
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Mon, 06/18/2018 - 02:58 नवीन
मराठी बोलताना इंग्रजीच्या कुबड्या घेऊन बोलणे खरेतर लाजिरवाणे वाटले पाहिजे पण तो एक कौतुकाचा, आदराचा विषय बनतो. बोलताना अतिरेकी इंग्रजी शब्दांचा वापर म्हणजे सदर व्यक्ती उच्चभ्रू, उच्चशिक्षित, समाजाच्या अभिजन वर्गातली आहे ह्यावर शिक्कामोर्तब असे अत्यंत विकृत समीकरण बनलेले आहे. खरे तर अशा व्यक्तीचे मराठीही चांगले नाही आणि इंग्रजीही अशी मला तरी शंका येते. आचार्य अत्रे हे अनेक वर्षे शिक्षणाकरता इंग्लंडला होते. ते परत आल्यावर त्यांना मराठीत एक भाषण करायचे होते. त्याची त्यांनी चांगली तयारी होती. पण त्यातील मुख्य भर हा आपल्या बोलण्यात इंग्रजी शब्द असता कामा नये ह्यावर होता. आपण इंग्लंडमधे राहिलो असल्यामुळे ह्या बाबीकडे त्यांचा कटाक्ष होता. (अंगावर इंग्रजी सूटबूट धारण करण्यात त्यांना फार चुकीचे वाटत नव्हते. पण आपल्या मराठी भाषेला अशा प्रकारे सूटबूट चढवणे हे साफ नामंजूर होते.) अर्थात तो जुना काळ होता. आज असे झाले तर उलट प्रकार होईल. जास्तीत जास्त परदेशी इंग्रजी शब्द, इंग्लंड वा अमेरिकी पद्धतीने उच्चारण्याची अहमहिका सुरू होईल ह्यात शंकाच नाही. मला वाटते की भाषेत काय बदल व्हावेत ह्याबद्दल एक निरोगी संघर्ष कायम चालू असला पाहिजे. नव्या शब्दांची आयात वा जुन्या शब्दांचे पुनरुज्जीवन वा मराठीतच नवे शब्द जन्माला घालणे ह्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. समाज काय स्वीकारतो ह्यावर भाषा कशी बदलते ते अवलंबून आहे. ज्यांना मराठीचा अभिमान आहे (गर्व नाही!) त्यांनी आपापल्या परीने नवे चांगले मराठी शब्द नव्या शब्दांच्या आयातीला पर्याय म्हणून सुचवले पाहिजेत. नाहीतर मराठी भाषा नष्ट होईल.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 06/18/2018 - 04:38 नवीन
१. गोरीला ग्लास - माकडकाच २. हार्डडिस्क - हार्दीक(थेट अपभ्रंश :)) ३. OTG केबल - अोतार(OT+तार) ४. डेटा केबल - वितार (विदा+तार) ५. सेट टॉप बॉक्स - साधपेटी ६. रिचार्ज - पुभार(पुनर्भार) ७. सिमकार्ड - मामापत्र(मालकाची माहिती भरलेले पत्रक) ८. डेटा केबल = विदावती ९. गोरीला ग्लास = माकडकाच १०. ३.५ mm जॅक = रवटेकू ११. सिम स्लॉट = सरखळी १२. Cathode ray tube = (ऋकिन/रुकिन) ~ ऋण किरण नलिका १३. सोल्डरींग = लयघट्ट
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 06/18/2018 - 16:29 नवीन
४. डेटा केबल - वितार (विदा+तार) ८. डेटा केबल = विदावती
यामुळेच गडबड होते.. एकाच गोष्टीसाठी तुम्ही दोन शब्द दिले.. झालंच तर तुम्हीच दिलेले शब्द का प्रमाण मानायचे असंही इतर जण म्हणू शकतात. मग इंग्लिशमध्ये जसा Oxford चा शब्दकोश बहुतांशी प्रमाण मानला जातो तसा मराठीचा एक शब्दकोष असायला हवा.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 06/18/2018 - 21:23 नवीन
लक्षात आलं. खरंतर अोतार हा एकच शब्द द्यायचा होता.समुहात चर्चेदरम्यान घेतलेला होता विदावती.त्यामुळे तो ही आला.क्षमस्व!
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 06/18/2018 - 21:37 नवीन
आमचेच शब्द प्रमाण मानावेत असा मुळीच आग्रह नाही.इतरांनीही सुचवावेत.त्यावर चर्चा होऊन सर्वांतून एकच शब्द अंतिमत: निश्चित करुन तोच पुढे जायला हरकत नाही. पण याहून महत्त्वाचं म्हणजे एखादा नवीन शब्द तयार होऊन तो सातत्यानं वापरात येणं.मी वर शब्द सुचवताना कोणते निकष असावेत ते सुचवलं आहेच.ते पटण्यास हरकत नसावी. अर्धशिक्षित,अशिक्षित किंवा खेड्यातल्या लोकांना हे शब्द सहज म्हणता यावेत हा उद्देश आहे. कारण शहरी लोकांपेक्षा हेच लोक मराठी भाषा टिकवायला तुलनेने अधिक मदत करतात. त्यांना डावलून हा उपक्रम यशस्वी होऊच शकत नाही.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Mon, 06/18/2018 - 04:40 नवीन
नवीन शब्द * उच्चारायला सोपा असावा. * जास्तीतजास्त ४ किंवा ५ अक्षरे असावीत. * एकच अखंड शब्द असावा.शब्दांचे दोन गट नकोत. १. पेनड्राईव्ह २. बॅककव्हर ३. स्मार्ट टिव्ही ४. इलेक्ट्रिक स्क्रू ड्रायव्हर ५. Printed circuit board(PCB) ६. Monitor ७. Card reader ८. हेडफोन्स ९. हेल्मेट १०. USB
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 06/18/2018 - 08:10 नवीन
Monitor ला दृश्यदर्शक ?
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 06/18/2018 - 13:14 नवीन
Otg cable - ओतार तशी Data Cable - डीतार / डातार/दातार/देतार पेनड्राईव्ह - पांडाव /पनडाव/पेंडाव USB - असबी मला कदाचित जमत नसेल परंतु मराठीकरण करताना मराठी उच्चार हा इंग्रजी शब्दाच्या जवळ जाणारा असावा भले त्याला मरीठीत काही अर्थ नसला तरी चालेल असे वाटते. इतर सदस्यांना काय वाटते?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 06/19/2018 - 08:24 नवीन
पेनड्राईव्ह - पांडाव /पनडाव/पेंडाव
'पांण्डू हवालदार', पण हरकत नाही :) , (हवालदार मंडळींनी हे फायली सांभाळण्याचे काम ह. घ्यावे)
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Tue, 06/19/2018 - 10:37 नवीन
कारण धागा कर्त्याने 4 अक्षरी शब्द सुचवावयास सांगितला आहे.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 06/18/2018 - 16:07 नवीन
चांगला प्रयत्न. शक्य सगळं आहे. फार पुर्वी आकाशवाणीवर क्रीकेटचं धावतं समालोचन ऐकायचो. त्यानंतर टीवीवरचे हींदी समालोचनही ऐकले आणि त्यानंतर असं वाटलं की क्रीकेट्चे जास्तीत जास्त शब्द भाषांतरीत झाले असतील तर ते फक्त मराठीतच. रन - धावा, स्टंप - यष्टी,धावचित, यष्टीचीत, गोलंदाज, फलंदाज, अजून बरेच... आजच्या पीढीला जर खेळपट्टी, सीमारेषा असे शब्द ऐकवले तर बघत बसेल. विषेश म्हणजे हे शब्द अगदी चपखल बसले, कोणाला ते कठीण वाटले नाहीत की कोणी आक्षेप घेतला नाही की नाके मुरडली नाहीत. अशा प्रकारचं भाषांतर झालं तर कधीही स्वागतार्हच असेल...
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 06/19/2018 - 03:34 नवीन
धागा वाचून यष्टिचित झालो.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Tue, 06/19/2018 - 20:55 नवीन
मी त्रिफळाचित झालो.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 06/19/2018 - 05:47 नवीन
१. इलेक्ट्रिक स्क्रू ड्रायव्हर = विमचा ~ विद्युत मळसूत्र चालक २. हँड स्क्रू ड्रायव्हर = हामचा ~ हाताने वापरायचा मळसूत्र चालक ३. Printed Circuit Board(pcb) = छापटी ~ छापील परिपथ पट्टी ४. Monitor = चित्रक ~ चित्र दाखवणारा ५. USB = जुतार ~ अन्य साधनांची संगणकाशी जुळवणी करायला मदत करणारी तार
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 06/19/2018 - 11:34 नवीन
हार्दिक , ओतार , विदार वगैरे नवीन शब्द रुढ करणे ही नंतरची पायरी असावी असे मला वाटते. टू स्टार्ट विथ ज्या इंग्लिश शब्दांना मराठीत ऑलरेडी शब्द आहे निदान ते तरी रुटीन कॉनव्हर्सेशनमध्ये रेग्युलरली युज करुयात..व्हाट यू से ? ओह.. माफ करा. असो. असो , मला काय म्हणायचं ते तुम्हाला कळालंच असेल तर आता आपण या उपक्रमाला सुरुवात करुयात का ? मिपावरील इतर धाग्यांवरही मूळ लेख , प्रतिसाद यांत विनाकारण आलेल्या इंग्लिश शब्दांना जमेल तशी'भाषादुरुस्ती" सुचवूयात. काय म्हणणे आहे ? इंग्लिश शब्दांप्रमाणेच 'लोक्स' , वीकांत अशा शब्दही टाळता येतील का ? वीकांत ऐवजी साप्ताहिक सूटी/सूट्या हा आधीच प्रचलित असलेला शब्दप्रयोग करता येईल. लोक्सची तर अजिबातच गरज नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 52 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 4 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 6 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 8 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 12 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा