घडवणूक शब्दांची!
मराठीत भाषेत अन्य भाषांमधून होणारी आवक आपल्याला नवी नाही.महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमधे बोलल्या जाणार्या भाषांपासून ते फारसी,इंग्लिश,पोर्तुगीज,अरबी अशा बर्याच भाषांमधून ही आवक झालेली आहे.
काही शब्द तर मूळचे मराठी नाहीत हे सहजपणे लक्षातही येणार नाही इतके ते मराठी भाषेत बेमालूमपणे मिसळले आहेत,स्वीकारले गेले आहेत.
ही आवक अजूनही सुरुच आहे.
पण ही आवक किती होऊ द्यायची यालाही काही मर्यादा असाव्यात,त्यामागे निश्चित असे धोरण असावे असे वाटू लागले आहे.
खालील वाक्ये पहा.
"हार्डडिस्क केबलनं लॅपटॉपला अॅटेच केली की विदीन टेन सेकंद लॅपटॉप आपोआप बंदच होतो."
"पावसाडा सुरु होऊनही मुंबईच्या रस्त्यांमदले गढ्ढे महापालिकेने न भरल्याने पुन्हा एकदा महापालिकेची पोल खुललेली आहे. - अखिलेश मिश्रा ------- न्यूजसाठी"
"पिल्लू तिकडे नको जाऊ.तिकडे अँटस असतील,त्या तुला बाईट करतील."
"अगं मी बोलली होती त्याला, मला जाताना पिकअप कर म्हणून!"
अशीच मराठी वाटू शकणारी काही वाक्ये तुमच्याही कानावर बर्याचदा पडत असतील. या वाक्यांमधे काही मोजके शब्द मराठी आहेत,क्रियापदे मराठी आहेत.पण सोबतच इंग्लिश आणि हिंदी शब्दांचाही नको इतका भरणा आहे.
अशा भाषेला आपण मराठी का समजावं? मोजकेच मराठी शब्द आणि क्रियापद मराठी आहे म्हणून? अशी भाषा ही खरंतर इंग्लिश किंवा हिंदीची बोलीभाषा म्हणून जास्त शोभेल असं नाही का वाटत?
मराठीच्या अशा धेडगुजरी रुपाबद्दल खंत व्यक्त करुन हळहळण्यापेक्षा आपणच काही केलं तर? प्रयत्न करुन पहायला हरकत काय आहे? याच इच्छेतून सुरु झालेला हा उपक्रम "घडवणूक शब्दांची!"
१) परकीय आणि स्वकीय भाषेतून आलेले क्लिष्ट, लांबलचक, उच्चारायला अवघड असे शब्द
२) परकीय भाषेतून आलेल्या वैज्ञानिक,तांत्रिक पारिभाषिक संज्ञा
३) समान,नेमका अर्थ दर्शवणारा शब्द आधीपासूनच मराठीत उपलब्ध असूनही तोच अर्थ दर्शवणारा मराठीतर शब्द
वरील तीन प्रकारच्या शब्दांसाठी अचूक मराठी शब्द सुचवणे किंवा त्यांचे मराठीकरण करणे आणि हे करताना नवीन निर्माण केला जाणारा शब्द लांबीला कमी, उच्चारायला सोपा, अर्थवाही असेल याचाही विचार करणे म्हणजे "शब्दांची घडवणूक!"
आपणही या उपक्रमात सामील होऊ शकता.
हे निर्माण झालेले नवीन शब्द मुक्त वापरासाठी सर्वांकरिता उपलब्ध असतील.असे शब्द सुचविणार्यांबद्दल कृतज्ञता नक्कीच असेल,श्रेय देण्याजोगे असेल.
या उपक्रमात आपण कशाप्रकारे सहभागी होऊ शकता?
१) हा धागा बनवलाच आहे.इथेच आपण असे शब्द बनवून प्रकाशित करु शकता.इतरांनी बनवलेल्या शब्दांवर चर्चा,काथ्याकूट करु शकता.
२) "घडवणूक शब्दांची!" याच नावाने एक व्हॉटसअॅप समुहसुध्दा बनवला आहे.तिथे बरेचसे सदस्य हे मिपाकरच आहेत.तिथे सामील होऊ शकता.सामील होण्यासाठी आपण आपलं नाव आणि व्हॉटसअॅप नं व्यनिद्वारे मला पाठवू शकता.
३) सर्वात महत्वाचा मुद्दा: - हे शब्द केवळ बनवून उपयोग नाही तर ते सर्वत्र पसरले पाहिजेत,त्यांचा प्रसार झाला पाहिजे,मराठीजनांनी ते बोलण्यातून,लेखनातून वापरले पाहिजेत.हे शब्द रुळणे हे या उपक्रमाचं खरं यश म्हणता येईल. आंतरजाल,संभाषण,लेखन,समाजमाध्यमे अशा मार्गांनी हे शब्द पसरवण्यास,रुळवण्यास मदत करु शकता.
दर सोमवारी व्हॉटसअॅप समुहावरील अंतिमत: निश्चित झालेले शब्द इथे दिले जातील,किंवा निश्चित न झाल्यास आलेली समस्या अधिक चर्चेसाठी इथे दिली जाईल. जेणेकरुन अधिक मार्गदर्शन मिळेल.
असाही प्रश्न पडू शकतो की याआधी असे शब्दनिर्मितीचे प्रयत्न झालेले आहेत.वि.दा.सावरकरांनी भाषाशुद्धीच्या माध्यमातून हे प्रयत्न पूर्वी केले आहेत.तुम्ही असं वेगळं काय करताय?
याचं उत्तर असं की आम्ही संपूर्णतः नवीन असं काहीच करत नाही आहोत.फक्त याआधीच्या प्रयत्नांमधल्या त्रुटी दूर करण्याचा आपापल्या क्षमतेनुसार प्रयत्न करणे आणि नवीन,सोप्या शब्दांचा प्रसार,प्रचार करुन हे शब्द रुळवण्यास यथाशक्ती प्रयत्न करत आहोत.
असा प्रयत्न करुन सावरकरांची बरोबरी करण्याचे धाडस करावे हा उद्देश यामागे नसून सावरकर ही यामागची प्रेरणा असून नवशब्दांची गंगा वाहती ठेवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.
अशा नवीन शब्दांचा प्रसार,प्रचार करताना ते रुळवताना काही वेळा थट्टा,मस्करीही होईल.ती याआधीच्या प्रयत्नांवेळीही झालेली आहे.सदर आक्षेपक मस्करी करण्याऐवजी सकारात्मकपणे या उपक्रमात सामील झाल्यास अधिक आनंद होईल.
सर्व सकारात्मक सुचनांचे,सल्ल्यांचे स्वागतच आहे.
उदा. 'स्वछतागृह ' खूप पूर्वीच रूढ झालेला असताना आपल्या तोंडी पट्कन 'toilet' च येते.अश्या शब्दांच्या बाबतीत आपण खूपच लाजरेबुजरे आहोत. याविरुद्ध, मलेशियन लोक बघा, क्वालालंपूर आंतरराष्ट्रिय विमानतळावर सगळीकडे चक्क "Tandas (टंडास) असे लिहिलेले आहे.आधुनिक इंग्लिश चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत (सुमारे ६०० वर्षे) ब्रिटिश राजघराण्याची, सरदार-उमरावांची आणि राजदरबाराची भाषा लॅटिन व फ्रेंच होत्या. तोपर्यंत, हुच्च लोकांत, इंग्लिश बोलणे गावंढळ समजले जात असे ! उत्तम इंग्लिश बोलणार्या पहिल्या इंग्लिश राजाची (Henry III; १२१६-१२७२) ती मातृभाषा नव्हती. Henry IV (१३९९-१४१३) हा इंग्लिश मातृभाषा असलेला पहिला इंग्लिश राजा होता. (अ) औद्योगिक क्रांतीमुळे व (आ) वसाहतवादातील इंग्लंडच्या यशामुळे जसजसे इंग्लंडचे, युरोपच्या व नंतर जगातल्या राजकारणातले महत्व वाढत गेले; तसतसे इंग्लिशमध्ये आयात केल्या जाणार्या शब्दांचा ओघ वाढत गेला. ब्रिटिश साम्राज्य जगभर पसरलेले असल्याने कोणताही एक देश या आयातीस वर्ज्य समजला गेला नाही. तेव्हा सद्याच्या इंग्लिश शब्दांचे मूळ आशियातील व आफ्रिकेतील भाषांत असणे ही आश्चर्याची गोष्ट नाही. सद्याच्या आधुनिक इंग्लिशमध्ये सुमारे ८०% शब्द (विज्ञान व तंत्रज्ञानासंबंधीत शब्द पकडले तर हे प्रमाण ९०% इतके वर जाते) जगभरातील इतर भाषांतून घेतलेले आहेत... त्यामुळे, या "अनधिकृत जागतिक भाषा" समजल्या जाणार्या भाषेला "उसनी घेतलेली भाषा (borrowed language)" असे गमतीने म्हटले जाते. :) लॅटिन आणि ग्रीक भाषांचा इंग्लिशमधला शिरकाव या भाडोत्री शब्दांच्या आवकीतून झालेला आहे. इथे त्या सावकार भाषांची सूची मिळेल. तेव्हा, दुसर्या भाषेतून आपल्या भाषेत शब्द येणे हे तितकेसे वाईट आहे असे नाही. जी भाषा अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण इत्यादींवर प्रभुत्व मिळवते ती जास्तीत जास्त सहजपणे लोकांच्या तोंडी येते. त्याबरोबरच, हे पण समजून घेतले पाहिजे की, हा भाषेचा प्रवाह उलट दिशेनेही वाहतो... म्हणून तर इंग्लिशमध्ये आशियायी आणि आफ्रिकन भाषांमधील शब्दांचा सहज शिरकाव झालेला आहे !
तुमचं शब्द घडवणाचं कार्यक्रमामुळे महाराष्ट्रीय समुदायालाहीं महाराष्ट्राचं बाहेर राहणार मराठी समुदायालाहीं एकत्र मिळणं शक्य झालं तर उदंड आनंदावाणीं असेल. तुमचं प्रयत्नांस शुभेच्छा..!!
गेलं ३५० वर्षांत मराठी भाषांत भरून शब्द परिवर्तन झालं त्यामुळे महाराष्ट्राचं मराठींतहीं तंजावूराचं मराठींतहीं उदंड व्यत्यास येऊन गेलं आहे. तसं व्यत्यास आलं त्यामुळे तंजावूराचं मराठीहीं महाराष्ट्राचं मराठीहीं दोघेहीं मराठीच असलं तरीपणहीं दोघांला मिळाला साध्य वाटत नाही… त्यामुळे उत्पन्न झालं ते कष्टाला हे वीडियोंत दक्षिणी मराठी वर्णन करलों आहों. दया करून ते वीडियो पहांत.
वीडियोंत्सून एक परिच्छेद...
"तरीपणीं... इतिहास साक्ष आहें.. आमच्या तंजावूर राज्याचं छत्रपति श्रीमद् भोंसलें महाराजांच्या वंशावळींत जन्मलें ते अख्खेहीं राजे-महाराजे संस्कृत भाषावरं उदंड प्रीति करलेंत. आमच्या महाराजांनी संस्कृतांतून लिव्हालापणहीं उदंड प्रोत्साहन करलेंत, स्वतःपणी संस्कृतांतून साहित्य लिव्हलेंत. आणखी एक विषय काय म्हणजे, “संस्कृत भाषा हे एक देवाचं भाषा, तसंच आमचं मराठी भाषापणहीं एक साधु – संतांचं भाषा आहे.. साधु – संतांला कसं देवाचं सोयरिक.. तसं आमचं भाषालापणहीं संस्कृताचं सोयरिक” असं म्हणून सांगतीलं आमचं महाराजा.. त्याच्यामुळं भरून जुनं शब्द, मूळ शब्द आहेंत, आमच्या तंजावूर मराठींत.. गेलं साडेतीनशे वर्षं आम्हीं राहात असाच्या ठिकाणांत कुठंपणहीं मराठी भाषाचं चलनं-वलनं नाहीं तरींपणहीं, मराठी लिवाला-वांचाला येणारं लोकं उदंड उणं असलं तरींपणहीं.. आमचं लोके कित्ती यत्न करून आमच्या जुनं मराठीच्या शब्दांला सांभाळून ठिंवलेंत? हे आमच्या लोकांला उदंड अभिमान, फार गर्व भोगाचं विषय...."
पूर्ण वीडियो पहांत हे ठिकाणांत...!!