ग्रामीणांचा आहार
- डॉ. सुधीर रा. देवरे
बाजरीची भाकरी आणि कोणतीही भाजी हा गावातल्या लोकांचा रोजचा मुख्य आहार असायचा. भाजीला पूर्वी या परिसरात अहिराणी भाषेत शाक म्हटलं जायचं. ऋतू कोणताही असो दररोज बाजरीची भाकर जेवणात असायची. भाकर गरम पडते वा डांजते असं कधी चुकूनही कोणाकडून ऐकायला मिळायचं नाही. आणि आजारी पडल्यावर असं निदान इथल्या डॉक्टरनेही कधी केलं नाही. या परिसरात त्यावेळी बाजरी मुबलक प्रमाणात पिकत असल्यामुळे इथल्या जेवणात बाजरीच्या भाकरी शिवाय अजून काही पर्याय असू शकतो अशी कल्पनाही कोणाला नव्हती. इथं गहूही पिकायचा. पण घरचा गहू असूनही कोणी रोज चपात्या खात नव्हतं.
अशा जेवणा व्यतिरीक्त कुठं वेगळं जेवण दिसलं की ती खाण्याची चैन समजली जायची. नातेवाईकांकडे- भावबंदांकडे पाहुणे आले की पाहुण्यांना जेवण सांगण्याची पध्दत होती. पाहुण्याला त्यातल्यात्यात उजवं जेवण म्हणून भजींची आमटी, भाकर, भात, लोणचं, पापड, कांदा असं ताट भरून वाढलं जायचं. ज्या पाहुण्याला जेवायला बोलवलं त्याला कोणी बाहेर विचारलं, ‘काय जेवण होतं’, तर तो पाहुणाही केवळ भजींची आमटी न म्हणता ताट भरून आलेल्या सगळ्या जीनसांची नावं सांगायचा.
भात हा अलिकडील जेवणात नैसर्गिक पदार्थ समजला जात असला तरी, खिचडी- भात त्याकाळी इथल्या जेवणाचा भाग नव्हता. लोकांकडे केवळ सणाच्या दिवशी सार सोबत भात खावा लागतो म्हणून दुकानातून तेवढ्यापुरता बिटेभर वा चिटेभर तांदुळ मागवला जायचा. तांदळाचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्या प्रकारानुसार त्याची किंमत ठरलेली असते हे ही त्यावेळी माहीत नसायचं. दुकानदार जो काही बिटेभर तांदूळ देईल आणि जी किंमत सांगेल तो तांदुळ भातासाठी घेतला जायचा. म्हणजे गावात तांदळाच्या व्हरायट्या दुकानदाराकडे नसत.
भाकरी सोबत आजच्या काही भाज्या त्या काळात दिसत होत्या तरी तेव्हा रानभाज्यांचे प्रमाण जेवणात जास्त प्रमाणात होतं.
ज्याला कदान्न म्हटलं जाईल अशा प्रकारचे पदार्थ त्यावेळी नाइलाज म्हणून खावे लागत असले तरी तो एक पारंपरिक खाद्य पदार्थांचा आणि लोकजीवनाचाच अविभाज्य भाग बनून गेला होता. म्हणून ते कदान्नही आवडीने खाल्लं जायचं. यापैकी काही पदार्थांना सणसणीत चव असायची.
सोलासनं बट्ट, सोलासनं तिखं, लसुननं तिखं, कोंडाळं, घाटा, बेसन, सुघरं भुगरं, मटमुंगना वडानं बट्ट, मिरचीना खुडा, कुळीदनी घुगरी, कुळीदना मुटकळा, लोंचाना खार, मिरचीना ठेचा, काळा समार, तेलगुळना काला, चिखल्या, गुळ टाकून शिजवलेले शिळ्या भाकरीचे तुकडे अशा प्रकारचे पौष्टीक नसलेले आणि काही बेचव असलेले पदार्थ कांदा तोंडी लावून भाकरी सोबत खाऊन लोक आपल्या कामाला लागायची. झिंदरं आणि वांगानं भरीत त्यातल्या त्यात चविष्ट पदार्थ असायचे.
आता सांगितलेले अनेक खाद्य पदार्थ आज एकतर नामशेष झाले आहेत वा आपल्या जीवनातून हद्दपार होण्याच्या बेतात आहेत. आजचा आहार हा समतोल आहाराऐवजी गरजेपेक्षा जास्त आणि चमचमीत चवीचा आहार दैनंदिन जेवणात घेतला जातो. मात्र हा आहार दुर्गम खेड्यातले गरीब लोक अजूनही घेत आहेत. असं कदान्न खाऊनही ते अर्धपोटीच राहतात. ज्यांची स्थिती आज मध्यमवर्गीय म्हणता येईल अशी प्रगती केलेले लोक हे पदार्थ विसरून गेले आहेत.
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
💬 प्रतिसाद
(62)
प
प्रसाद_१९८२
Fri, 02/16/2018 - 10:05
नवीन
सिंदगी, विजापूर व बिदर वगैरे साईडला मी साखर कारखान्याच्या कामानिमित्ताने जात असतो. तिकडे ज्वारी, बाजरीची भाकरी थापून, तीला उन्हात कडक होइपर्यंत वाळवतात व नंतर खायच्या वेळेस, जसे आपण पापड भाजतो तसे चुलीवर किंव्हा इतर प्रकारे भाजून हि डाळ, भाजी वा चिकन-मटणाच्या रस्स्यात कालवून हि भाकरी खायला घेतात. एकदा वाळवून ठेवलेल्या ह्या भाकर्या म्हणे वर्षेभर टिकतात.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 02/16/2018 - 10:25
नवीन
सजुगर्याची कडक भाकरी म्हणतात. लै भारी लागते कुडकुडीत खायला.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Fri, 02/16/2018 - 19:03
नवीन
एखादा बेळगाव किंवा धारवाड ला उतरलो असताना अशी भाकरी ठेच्या बर एका मेस कम हॉटेल मध्ये खाल्लेलं आठवतंय, जबरदस्त चव होती.
- Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा…
Fri, 02/16/2018 - 13:18
नवीन
वाचतो.धन्यवाद.
- Log in or register to post comments
ज
जागु
Fri, 02/16/2018 - 09:53
नवीन
आम्ही सवय लावतोय स्वतःला. मी रोज चपाती आणि ज्वारी-बाजरी-नाचणी भाकरी दोन्ही रोज बनवते. एक होत की सकाळी केलेली भाकरी संध्याकाळी थोडी कडक होते. पण चालत तेवढ. मुलिंनाही आवडायला लागलेय आता भाकरी. एकत्र कुटुंब असल्याने ज्यांना चपाती लागतेच त्यांच्यासाठी करावीच लागते.
- Log in or register to post comments
ग
गवि
Fri, 02/16/2018 - 10:29
नवीन
बाजरीची भाकरी आणि शक्य असल्यास पांढरा ताज्या लोण्याचा गोळा. सर्वात उत्कृष्ट प्रकार.
सोबत भोगीची भाजी, मटण रस्सा, भरीत, खरडा, ठेचा, गूळ खडा असं काहीतरी.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 02/16/2018 - 11:20
नवीन
कालच बाजरीची भाकरी लोणी गुळाचा खडा मिरचीचा ठेचा शेंगदाणे आणि लसणीची चटणी आणि शेवग्याच्या शेंगांचं पिठलं हा मेनू होता.
- Log in or register to post comments
ग
गवि
Fri, 02/16/2018 - 11:35
नवीन
वाह हुजूर. क्या बात है..
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Fri, 02/16/2018 - 12:51
नवीन
मज्जाय तुमची! भाकरीसोबत कोणतीही भाजी जरा जास्तच चांगली लागते असे मला वाटते.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/16/2018 - 11:27
नवीन
कोकणात गहू, ज्वारी, बाजरी ही धान्ये अगदी रेशनची दुकाने (संदर्भ : पीएल ४८०) सामान्य होईपर्यंत (बहुतेक १९६०च्या दशकामध्ये केव्हातरी) असलीच तर अत्यंत विरळ होती. घराघरात तर ही धान्ये अजिबात वापरली जात नव्हती. फारतर, पाहुणे म्हणून गेल्यावर, मुंबईत देशभरातील सर्व राज्यांतील लोक राहत असल्याने तेथे ही धान्ये कधीमधी दिसायची. मी तर पहिल्यांदा ज्वारी-बाजरी, खानदेशात एका लग्नाला गेलो होतो तेव्हा १९६३-६४ मध्ये केव्हातरी, पाहिली व खाल्ली होती.
कोकणात न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यांत सर्वच जेवणांतच नव्हे तर मधल्या वेळेच्या खाण्यात (पोहे, चिवडा, इ) तांदळाचेच पदार्थ असत. भात (कोलम, आंबेमोहोर, इ) व भाकरी (जाडा, राता, इ) साठी तांदुळांचे वेगवेगळे प्रकार वापरले जातात. शेतावर काम करणार्यांसाठी खास जाडसर असलेला व पचायला जरा जड असलेल्या तांदुळाचा भात बनवला जाई... कोलमचा भात सहज पचून कामकर्यांना दोन तासात परत भूक लागे, त्यामुळे ते लोक कोलमच्या भाताला नकार देत !
तांदळापासून बनणारे शाकाहारी आणि मांसाहारी (मटण/कोंबडी/मासे) भाताचे असंख्य (कमीत कमी १०-१२ तरी) प्रकार लहाणपणी सणसमारंभांनुरूप खाल्लेले आठवतात. शिवाय तांदळाचे (थंड पाण्यातली आणि उकडीची) भाकरी, घावण, आंबोळ्या, मोदक, कानवले, इत्यादी अनेक प्रकार असत.
त्याशिवाय, वर्षभरासाठी लागणारी तांदाळाचे/पोह्यांचे पापड, फेण्या, कुरडया, इत्यादी उपान्ने दर मे महिन्यांत घरातल्या आणि आजूबाजूच्या स्त्रिया एकमेकाला सहकारी तत्वावर मदत करून बनवत असत... आम्ही छोटी मंडळी त्यात पीठ कुटणे, वाळत टाकलेल्या मालाची राखण करणे आणि जमेल तशी इतर धमाल करणे, हे करत मदत/अडथळा करत असू !
अवांतर : बाजरीची भाकरी मला आवडते, पण तिला पश्चिम महाराष्ट्र अथवा विशेषतः कोकणाचे मुख्यान्न म्हणणे हे चूक आहे ! :)
- Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा…
Fri, 02/16/2018 - 13:21
नवीन
खूप छान.धन्यवाद
- Log in or register to post comments
ज
जागु
Sat, 02/17/2018 - 07:39
नवीन
बरोबर. आम्ही अजूनही कोलम रोजच्या जेवणासाठी वापरत नाही. कारण त्याची सवयच नाहीये. गावाला पिकतो तो थोडा जाडसर तांदूळच असतो. तो संपला की थेट गिरणीतून जाडसर तांदूळ आणतो. कोलम फक्त पुलाव, मसालेभात अशा पदार्थांसाठी किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर तेव्हा.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2