ट्रोपोनिन : ‘हार्ट अॅटॅक’ वर शिक्कामोर्तब
अनुक्रमणिका | इन्सुलिनचा शोध : वैद्यकातील नवलकथा | मोबाईल फोन आणि कर्करोग : वादग्रस्त गृहितक | कोलेस्टेरॉल : एक लाडावलेला वलयांकित पदार्थ ! | हिमोग्लोबिन : आपल्याला जगवणारे प्रोटीन | रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर | बिलिरूबिन : काविळीतला पिवळा डँबिस | युरिआ व क्रिअॅटिनीन : मूत्रविकारांचे प्रगतीपुस्तक | ट्रोपोनिन : ‘हार्ट अॅटॅक’ वर शिक्कामोर्तब
आपणा सर्वांना शब्दरुपी तिळगूळ देउन सादर करीत आहे या लेखमालेतील ८वा लेख...
* * *
पहाटेचे पाच वाजलेत. तुम्ही मस्तपैकी साखरझोपेत आहात. नित्यनेमाने तुमच्या मोबाईलमधील गजर सकाळी साडेसहाला वाजणार आहे. पण आज अचानक फोनच्या रिंगने तुम्ही दचकून जागे होता. गजर झालाय की फोन वाजलाय या संभ्रमात तुम्ही फोन उचलता. पलिकडून एकजण घाईघाईत उत्तेजित स्वरात तुम्हाला सांगतो, “अरे, काकांना आत्ताच अॅडमिट केलंय, आयसीयूत ठेवलंय, तू लगेच निघ”. तुम्हाला त्याच्या परिस्थितीची जाणीव होते आणि तुम्ही तडक तिथे जायला निघता.
मग त्या हॉस्पिटलात घाईत शिरून आयसीयूच्या बाहेरच्या खोलीत पोचता. तिथे ‘काकां’चे काही आप्तेष्ट आधीच पोचलेत. त्यातला एकजण तुम्हाला त्याने आताच खालच्या फार्मसीतून ‘ते’ पाच अंकी रुपये किंमतवाले भारी इंजेक्शन आणून नर्सला दिल्याचे कौतुकाने सांगतो. बाकी एक-दोघे मोबाईलवरून नातेवाइकांना खबर देत आहेत. दरम्यान काकांच्या मुलाने ‘भारत विमा कं’ च्या एजंटला फोन लावलाय आणि तो त्याला “काय ते तुमचे बघा, सर्व काही कॅशलेस व्हायला पाहिजे”, असे खडसावून सांगतोय.
तिकडे आयसीयूच्या आत ते काका बेडवर पहुडले आहेत. त्यांच्या हातात सलाईनच्या नळ्या आणि छातीवर जेलीचा ओलावा या अवस्थेत अनेक वायरींच्या जंजाळात आणि मॉनिटर्सच्या गराड्यात ते झोपलेले दिसताहेत. हॉस्पिटल स्टाफची आत-बाहेर धावपळ चालू आहे.........
मित्रहो, हा वरचा प्रसंग काय तुम्हाला चित्रपटातला वाटतोय का? अंहं ! हा तर तुमच्या-माझ्या घरीदारी, शेजारीपाजारी कधीना कधी हमखास घडणारा प्रसंग आहे. कदाचित आपल्यातील कुणाच्या वाट्याला त्यातल्या रुग्णाची भूमिकासुद्धा वाट्याला आली असू शकेल.
या प्रसंगातल्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आलेला आहे. या आजाराचे शास्त्रीय नाव आहे Myocardial Infarction (MI). Myocardium = हृदयाचे स्नायू आणि Infarct = मृत पेशींचा समूह. एखाद्या करोनरी रक्तवाहिनीत झालेल्या गुठळीने होणारा हा आजार.
MI चे निदान डॉक्टरला अत्यंत जबाबदारीने करावे लागते. रुग्णाच्या बाजूने त्याला भावनिक आणि आर्थिक पैलू असतात. या घटनेपूर्वीचा आणि नंतरचा ‘तो’ यात बऱ्यापैकी गुणात्मक फरक पडणार असतो. एकूणच त्याच्या कुटुंबातली ही मोठी घडामोड असते. तर एखाद्याच्या बाबतीत अशा पहिल्याच तीव्र झटक्यात त्याचे आयुष्यही संपू शकते.
तर हे महत्वाचे निदान करताना रुग्णतपासणी बरोबर रक्तचाचण्या, इसीजी आणि इतर काही चाचण्या तातडीने केल्या जातात. त्यापैकी ‘ट्रोपोनिन’ या प्रथिनाची रक्तपातळी मोजणे ही अत्यंत महत्त्वाची चाचणी होय. तिच्या रिपोर्टवर तुम्ही रुग्णावर MI चे शिक्कामोर्तब करणे हे बरेचसे अवलंबून असते.
मग काय आहे हे ‘ट्रोपोनिन’ प्रकरण? नादमधुर नाव असलेले हे प्रथिन नक्की कुठे असते व काय करते?
पुढचा सर्व लेख त्यासाठीच समर्पित आहे. या विषयाचे चार भागात विभाजन करतो:
१. ट्रोपोनिन : स्नायूंमधले एक प्रथिन
२. ट्रोपोनिनची रक्तपातळी आणि MI चे निदान
३. ट्रोपोनिनच्या मर्यादा आणि
४. MI च्या रक्तचाचण्या : आढावा
ट्रोपोनिन : स्नायूंमधले एक प्रथिन
आपल्या शरीरात तीन प्रकारचे स्नायू असतात. त्यांच्या अधिकृत नावांना आपण थोडी लाडिक मराठी नावे देऊ:
• skeletal muscle = हाडस्नायू ( म्हणजे biceps वगैरे)
• cardiac muscle = हृदयस्नायू आणि
• smooth muscle = मऊस्नायू ( म्हणजे ‘आतड्याचे’ वगैरे)
यापैकी हाड- व हृदयस्नायूंमध्ये ट्रोपोनिन हे प्रथिन असते आणि ते त्यांच्या आकुंचनात मदत करते. त्या दोन्ही ठिकाणच्या ट्रोपोनिनमध्ये थोडाफार फरक असतो. इथे आपण फक्त हृदयस्नायूंमधील ट्रोपोनिनचाच (cardiac Tn) विचार करणार आहोत.
या ट्रोपोनिनचे तीन प्रकार असतात: T, I व C. त्यापैकी T व I हेच फक्त MI च्या निदानामध्ये उपयुक्त असतात. निरोगी अवस्थेत ट्रोपोनिन हे स्नायूंच्या पेशींमध्ये भरपूर असते तर रक्तात अत्यल्प प्रमाणात. जेव्हा रुग्णास MI होतो तेव्हा ठराविक हृदयपेशी मरतात आणि त्यांच्यातले ट्रोपोनिन रक्तात सोडले जाते. म्हणून अशा वेळी आपल्याला त्याची रक्तपातळी वाढलेली दिसते. ही वाढीव पातळी ठराविक दिवस टिकून मग कमी होत जाते.
ट्रोपोनिनची रक्तपातळी आणि MI चे निदान
करोनरी हृदयविकाराची लक्षणे असणारा रुग्ण जेव्हा दाखल होतो तेव्हा तातडीने त्याचे रक्त घेतले जाते आणि त्यातील हृदय-ट्रोपोनिनची पातळी मोजली जाते. त्यासाठी ट्रोपोनिनच्या T किंवा I या दोन प्रकारांपैकी कुठलेही एक निवडता येते. संबंधित प्रयोगशाळेचा तो निर्णय असतो. याच्या जोडीला रुग्णाचा इसीजी पण काढला जातो. या दोन्ही तपासण्या महत्वाच्या आहेत. तरीही ट्रोपोनिनची चाचणी ही इसीजीला काहीशी वरचढ मानली जाते. किंबहुना एवढे महत्वाचे निदान हे एकाच चाचणीवर करायचे नाही असा दंडक आहे.
MI चे निदान करण्यासाठी त्याची सार्वत्रिक व्याख्या करण्यात आली आहे ती अशी:
MI चे शिक्कामोर्तब करण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता व्हायला हवी:
१. रक्तातील पुरेसे वाढलेले ट्रोपोनिन
आणि
२. खालीलपैकी किमान एक घटना :
अ) करोनरी-विकाराची विशिष्ट लक्षणे रुग्णात दिसणे
आ) इसीजीतील विशिष्ट बदल किंवा
इ) हृदयाच्या ‘इमेजिंग’ तंत्राने मिळालेला पुरावा
वरील व्याख्येतून ट्रोपोनिनच्या चाचणीला सर्वोच्च महत्व दिले आहे हे लक्षात येते. या लेखाची व्याप्ती ट्रोपोनिनपुरती मर्यादित आहे.
सध्या प्रयोगशाळेत हृदय-ट्रोपोनिन मोजण्याचे अतिसंवेदनक्षम तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णास त्रास झाल्यापासून तीन तासांच्या आतच ट्रोपोनिनचे वाढलेले प्रमाण दिसून येते. या अद्ययावत तंत्राने MI चे निदान लवकर करणे शक्य झाले आहे.
ट्रोपोनिनची रक्तचाचणी दोन प्रकारे करता येते:
१. रुग्णाचे रक्त काढून ते प्रयोगशाळेत पाठवणे. तिथे रीतसर ट्रोपोनिनचे प्रत्यक्ष प्रमाण मोजले जाते. ते विशिष्ट ‘कट-ऑफ’ च्यावर असले की मग MI चे निदान पक्के होते.
२. थोड्याशा रक्तावर रुग्णाच्या वार्डातच छोट्या स्ट्रिपवर झटपट चाचणी करणे. यात ते वाढलेले आहे किंवा नाही आणि असल्यास त्याच्या प्रमाणाची अंदाजे माहिती मिळते.
वरील दोन्हींमध्ये अर्थातच पहिला प्रकार श्रेष्ठ आहे.
ट्रोपोनिनच्या मर्यादा
एखाद्या रोगनिदानाची निर्णायक चाचणी कोणती असते? तर अशा रक्तघटकाची चाचणी की जो फक्त एकाच रोगात वाढतो आणि अन्य कुठल्याही रोगात नाही. पण बऱ्याच चाचण्या या निकषाला १००% उतरत नाहीत. ट्रोपोनिनही त्याला अपवाद नाही. MI व्यतिरिक्त हृदयस्नायूला अन्य मार्गाने इजा झाल्यासही ते वाढते.
तसेच पूर्णपणे वेगळ्या रोगांतही ते वाढते, उदा.: फुफ्फुस-रक्तप्रवाहाचा आजार, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार, काही केमोथेरपीचे दुष्परिणाम, इ. म्हणूनच MIचे निदान करताना नुसते ‘वाढलेले ट्रोपोनिन’ एवढा निकष पुरेसा नसतो तर, विशिष्ट ‘कट-ऑफ’ च्यावर ते वाढलेले लागते.
MI च्या रक्तचाचण्या : आढावा
१९६०पासून MIच्या निदानासाठी विविध रक्तचाचण्या प्रचलित आहेत. सुरवातीस रक्तातील काही एन्झाईम्स मोजली जात. प्रथम खूप उपयुक्त वाटलेल्या एखाद्या एन्झाइमच्या मर्यादा नंतर स्पष्ट होत. मग एकेक एन्झाइम मागे पडे व नवे त्याची जागा घेई. आता ती जागा ट्रोपोनिनने पटकावली आहे.
गेली सुमारे २५ वर्षे ही चाचणी वापरात आहे. त्यात अनेक सुधारणा होत आज हृदय-ट्रोपोनिन मोजण्याचे अतिसंवेदनक्षम तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. आजच्या घडीला तरी ही सुयोग्य चाचणी आहे. अर्थात विज्ञानात ‘अंतिम’ असे काहीच नसते. त्यामुळे १००% ‘स्पेसिफिक’ चाचणीचा शोध अजूनही चालू आहे. त्यासाठी काही नव्या रक्तघटकांवर संशोधन चालू आहे. भविष्यात त्यातून नक्की काही निष्पन्न होईल अशी आशा आहे.
*****************************************************************************
💬 प्रतिसाद
(58)
ह
हेमंतकुमार
Tue, 10/18/2022 - 02:12
नवीन
स्त्री आणि हृदयविकाराचा झटका : काही निरीक्षणे
पुरुषांशी तुलना करता स्त्रियांच्या झटक्यामध्ये खालील वैशिष्ट्ये आढळतात:
1. वयाच्या 40 च्या आत स्त्री : पुरुष हे प्रमाण १ : १० असे आहे. वय 45 नंतर स्त्रियांचा धोका वाढू लागतो. वयाच्या साठीत तुलना केली तर स्त्री-पुरुष हे गुणोत्तर समान होते. त्या पुढच्या वयोगटात स्त्रियांचे प्रमाण काकणभर अधिकच आहे.
2. लक्षणविरहित झटका येण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असल्याने बऱ्याचदा लवकर निदान होत नाही.
3. बऱ्याच रुग्णांना झटक्या दरम्यान छातीवर मोठा धोंडा ठेवल्या इतका दाब जाणवतो. परंतु स्त्रियांच्या बाबतीत या दाबाची तीव्रता खूप कमी असते.
4. प्रत्यक्ष झटका येण्याच्या एक-दोन महिने आधी शरीरात ‘काहीतरी बिघडले किंवा बिनसलेय’ अशी एक भावना बऱ्यापैकी येऊन जाते.
5. पहिल्या झटक्यात मृत्यूचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक आहे.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
गुरुवार, 12/01/2022 - 06:33
नवीन
भारतात थंडी पडू लागलेली आहे. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. जेव्हा चोवीस तासातील तापमान एकदम तीन अंश सेल्सिअसने खाली जाते तेव्हा ही शक्यता अधिक वाढते. तसेच पूर्वी झटका येऊन गेलेला असल्यास पुढचा झटका येण्याची शक्यताही बळावते.
स्पष्टीकरण :
1. हिवाळ्यात Sympathetic चेतासंस्था अधिक कार्यरत होते >> रक्तवाहिन्या आकुंचन पावतात>> रक्तदाब वाढतो. वृद्धांमध्ये या गोष्टी अधिक प्रमाणात होतात.
2. रक्तातील प्लेटलेट्स अधिक सक्रिय होतात तसेच रक्ताचा घट्टपणा वाढतो.
- Log in or register to post comments
B
Bhakti
गुरुवार, 12/01/2022 - 08:26
नवीन
+१
माहिती आणि स्पष्टीकरण!
प्लेटलेट्सचा पण रक्तदाबावर परिणाम होतो का?
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
गुरुवार, 12/01/2022 - 09:11
नवीन
प्लेटलेटचा रक्तदाबावर नाही परिणाम होत.
त्यांच्या एकत्र येण्याच्या प्रवृत्तीमुळेमुळे रक्ताचा घट्टपणा
( viscosity ) वाढतो.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Wed, 05/24/2023 - 04:43
नवीन
करोनरी हृदयविकाराच्या झटक्याचे अचूक निदान केवळ एका ट्रोपोनिन तपासणीवरून करता येईल काय?
या संदर्भात मशीन लर्निंगचा वापर करण्यासंबंधी संशोधन प्रगतीपथावर आहे. संभाव्य लक्षणे असलेला रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्या रक्तावरील ट्रॉपोनिन चाचणी एकदाच केली जाईल आणि रुग्णाची इतर सर्व माहिती मशीन लर्निंग यंत्रणेला पुरवली जाईल.
त्यातून अचूक निदान केले जावे अशी अपेक्षा आहे.
- Log in or register to post comments
ग
गवि
Sat, 05/27/2023 - 12:32
नवीन
यात एक तार्किक अडथळा जाणवतो. विशेषत: ट्रोपोनिन हाय असेल तर लक्षणे कितीही सौम्य असोत, तीव्र असोत अथवा वेगळी असोत.. इसीजी काही म्हणत असो का नसो.. troponin high = हृ वि झ हीच शक्यता गृहीत धरून "unless proven otherwise" angioplasty सुरू केली जाते. कारण इतर काही कारण असले तरी ते थोडे नंतर बघितले तरी चालणार असते.
याउलट troponin सामान्य आहे किंवा किंचित बॉर्डर लाईन आहे.. पण एक तरी लक्षण आहे (छातीत दुखणे) .. तरी त्या टेस्टवर न विसंबता हृ वि झ गृहीत धरून उपचार सुरू होतात.
म्हणजे इथे एक जरी निरीक्षण positive असेल तरी कोणीही जराही रिस्क, चान्स घेऊ इच्छित नाहीत. अशा वेळी AI वर कोणी अवलंबून राहू शकेल असे वाटत नाही.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sat, 05/27/2023 - 12:42
नवीन
सध्या तो प्रकार संशोधन अवस्थेत आहे.
जिथे हृ वि झची शक्यता कमीतकमी वाटते आहे अशाच रुग्णांचे बाबतीत त्याचा उपयोग होईल असे वाटते
सर्वात महत्त्वाचे म्हणजे,
उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे स्वतःचे अनुभवावर आधारित मानवी मत हे कधीही अधिक महत्त्वाचे राहील.
मागे मी अन्यत्र म्हटले तसे, कृत्रिम बुद्धिमत्ता हे ज्यूरीसमान आहे. अंतिम न्यायाधीश हा मानवी डॉक्टरच असेल.
बाकी, हृ वि झ
हे लघुरुप अत्यंत आवडले आहे. इथून पुढे नियमित करण्यात येईल ..
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sat, 05/27/2023 - 12:53
नवीन
इथे आहे.
पूरक मदत. अंतिम निर्णय नाही.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2