पांढरा कावळा

झोळी पाठीवर घेतली. एक हात जमिनीवर टेकवून सावकाश उठलो. सूर्य टाळ्यावर आला होता. खडकाळ डोंगर. मृगजळांचं राज्य असलेली ती टेकाडं. हे बाभळीचं झाड किती वाळून गेलंय. कुठे एखादी पालवी दिसतेय का बघितलं. पण व्यर्थ.
खालच्या तुटक्या फांदीवर कावळा बसलेला आढळला. तो 'काव काव' असं दोनदा ओरडला. आणि इथेच आक्रीत घडलं.
देऊळ फारसं लांब नव्हतं. त्यावरची भगवी पताका अजूनही उंच फडकत होती. तिथूनच हात जोडले. सगळी त्याची कृपा. जगात कोट्यवधी कावळे आहेत. झाडून सगळे काळे. मग हाच कसा पांढरा?
"बगळा बिगळा आसंल, न्हाय तर काय" फटफटीवरचा इजारवाला म्हणाला.
"न्हाय न्हाय, वरडला त्यो. काव काव करून. आयच्यान" मी तुटकं चप्पल अंगठ्यात गच्च धरून म्हणलो.
"त्या तिथं टपरीवर च्यापाणी करा. येवढ्या उनाचं डोकं धरलंय तुमचं" इजारवाला काही ऐकायलाच तयार नव्हता.
"चला, दाखवतो तुमाला. आजून बसला आसंल"
"ये, सरक बाजूला. हात लावायचा नाय गाडीला. म्हनं पांड्रा कावळा. डोकंबिकं फिरलं काय?"
माणसाला इश्वास नाय. आमालाबी नसता. पण या डोळ्यांनी बघितलं हाय. त्यो पांढराच हुता.
फटफटीवाला गेला, तसं टपरीवर गेलो. टपरी कसली, लाकडी खांबांवर उभारलेलं नुसतंच एक छप्पर. तिथल्या म्हाताऱ्या बाईनं स्टोला पंप मारून चहा बनवला.
"या भागात पाण्याची लय आबाळ" मी घोट घेत विषय काढला.
"आवो, आठ येकार जिमीन हाय. समदी पडीक. दुनी ल्याक गेल्यात शेरात. मला म्हातारीला येकलं सुडून. आता ह्ये हाटेल टाकून कसंबसं जगायचं बघा." म्हातारी झोपेतनं उठल्यासारखी नुसती बडबडत सुटली.
"तसं नव्हं. ह्या भागात लैच वणवण" मी आणखी एक घुटका घेतला.
"काय सांगू तुमाला, ह्या सरकारचा मुडदा बशिवला. धरान बांदलंय तिकडं मंबैलान पुण्याला. हिकडं आमी आमच्या मौतीनं मरणार.."
मी तिला मध्येच थांबत म्हणलं."कावळं लय हिकडं. है ना?"
"आं?" वय झालंय म्हातारीचं.
"कावळा दिसला मगाशी, पांढराच. त्या तिथं बाभळीवर" मी बाहेर येऊन ती बाभळ दिसतीय का बघितलं.
"आसं व्हय" लहान लेकराला बोलावं तशी ती म्हातारी बोलली.
"पण पांढराच हुता."
"कायकी. काय लागलं तर सांगा. बिडीकाडी बी ठिवलीय. मी जरा लवांडती." म्हातारीनं पोतं हातरलं होतंच. तशीच लवांडली.
मग झोळी घेऊन पुन्हा उठलो. फुफाट्याच्या वाटेनं मैलभर चाललो. मातीची बरीचशी घरं लागली. एकाच्या पडवीत लाल डब्बा दिसला. कुतूहलाने तिकडं गेलो. लगेचंच एक पोरगं पळत आलं. "यीतू का लावायला फोन? का दीव लावून?"
म्हटलं, काय हे? "काइनबॉक्स हाय" तो पोऱ्या म्हणाला.
मी चिठोरं बाहेर काढलं.
"गांजा पिलाय का तू? का हातभट्टी?"
"आरं, खरंच तर"
"काय खरंच? आसं कुठं आसंतंय व्हय"
"तू यिवून बघ"
"फूटू काढलाय का?"
"कशाचा?"
"कावळ्याचा!"
"बॅटरी संपलीय"
"मजी तू पेलाय"
"आसल्या ठिकाणी यिवून कोण कशाला पील?"
"मग फेसबुकवर अपडेट टाक. फुटू काडून. चल ठेवतो."
मी फोन ठेवला, तेव्हा ते पोरगंही भेदरून गेलं होतं.
सूर्य मावळायला अजून अवकाश होता. देऊळ आता टप्प्यात आलं होतं. दिवसाउजेडी गाठणं चांगलंच. राती चोराचिलटांची भीती. झोळी उचलली आणि पुन्हा चालू लागलो. मैलभर चाललो असेल नसेल, मागून एक टेम्पो ट्रॅक्स भरधाव आली. आतून एक अवखळ स्त्री हातात माईक घेऊन खाली उतरली. तिचा पुरुषी पेहराव बघून माझी पाचावर धारण बसली.
रोल! कॅमेरा! अॅक्शन!
"क्या आपने वाकई हरे कौवेको देखा है?"
"आज की ताजा खबर!! इस गांव मे रहेते है हरे कौवे"
"MAN BEHIND THE WHITE CROW!!"
"हे, आर यू दॅट पर्सन, हू सीन ए व्हाइट क्रो?" ताज हॉटेलमध्ये मला एकाने विचारलं.
"Yes, of-course. Actually I am going to temple named Datta. and I saw the crow. I am the lucky."
"वहाव..!" शँम्पेनची बॉटल फोडून आख्खी माझ्या हातात देत तो म्हणाला.
मी एक घोट घेतला, तेव्हा पोर्चमधल्या चिअर्सलीडर्सनी जल्लोश सुरू केला. "एंजॉय" म्हणून तो एक जण निघून गेला. नंतर मला कळलं की तो शेन वॉटसन का कुणी होता.
"ही कावळ्यांची अतिशय दुर्मीळ जमात आहे. अश्मयुगात जेव्हा नियँडरथल शिकारीला बाहेर पडला, तेव्हा त्याने हत्यारे वाहून नेण्यासाठी या कावळ्यांचा उपयोग केला. अंटार्क्टिकाच्या बर्फाळ प्रदेशात यांचे वास्तव्य होते. ते अणकुचिदार चोचीने सील माशांची शिकार करीत. मानवाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणारे हे कावळे ख्रिस्तपूर्व ४००० साली नामशेष झाल्याचे उल्लेख आहेत. आजच्या युगात त्याचे दिसणे ही ऐतिहासिक घटना आहे. हा पुरुष नाही, महापुरुष आहे." बोट दाखवून प्रोफेसरांनी माझे अभिनंदन केले. ऐंशी किलोचा हार माझ्या गळ्यात पडला. त्याचे चिक्कार फोटो देशोदेशींच्या वृत्तपत्रांत छापून आले.
आठमजली माझ्या घरात मी टॉप फ्लोअरला राहतो. वरती कावळ्याची भव्य प्रतिकृती टांगलेली आहे. त्याच्या दर्शनाला पंतप्रधान जेव्हा आले होते, तेव्हाच मी खालच्या मजल्यावर आलो होतो. एरव्ही कधी येत नाही. प्रधानमंत्री स्वतः म्हणाले होते, "आप जैसे लोगोंकी इस देस को जरूरत है|" मी भावविवश होऊन त्यांना कडकडून मिठीच मारली. पंतप्रधानांनी कावळ्यावर संशोधन करण्यासाठी मला अडीच हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. तो चेक मी पाठीमागच्या खिशात ठेवला. हॉलच्या एका कोपऱ्यात डोनाल्ड आणि मेलेनिया उभे होते. मी त्यांच्याकडे गेलो, तेव्हा "लव्हली, लव्हली.." म्हणून ते टाळ्या पिटायला लागले.
"Just tell me bro. What exactly you have seen. I wanna hear it again & again" मेलेनियाला चुप करत डोनाल्ड म्हणाला आणि सारा आसमंत दुमदुमला.
"पांढरा कावळा! मी पांढरा कावळा बघितला!!" मराठी बाणा जपत मी आरोळी ठोकली.
"क्काय?? पेलाय का तू? का गांजा फुकून आलाय?" दत्ताच्या मंदिरातला पुजारी घामाघूम होऊन म्हणाला.
"खरंच दिसला वो. दोन कोसावर बाभळीचं झाड हाय. तिथंच बसला हुता." झोळी खाली ठेवत मी म्हणालो.
"आसंल. मग?"
"मग काय? पांढरा हुता त्यो."
"आरं, पांढरा आसला म्हूणून काय त्याचं लोणचं घालू?"
जरा डोकं खाजवलं. पुजारी राग देऊन निघून गेला. बाजूची म्हातारीकोतारी सावरून बसलेली. मी गोधडी काढून फरशीवर हातरली. उशीला झोळी घेतली. दिवसभर चालून चालून खूपच दमून गेलो होतो. पडल्या पडल्या डोळा लागला. तेवढ्यात मला गदागदा हलवून उठवत रविना टंडन म्हणाली, "सोने से पहेले एक गुडनाईट किस तो बनता है बॉस"
आणि मी "अभी नही, जाओ" करत पायथ्याशी बसलेल्या कुत्र्याला लाथ घातली.
