Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक ५ : माझी मी जन्मले फिरुनी

श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक ५ : माझी मी जन्मले फिरुनी

ज

ज्योति अळवणी

सदस्य
213 लेखन
1505 प्रतिक्रिया
2015 पासून
📅
सदस्य झाले
28 January 2015
🕐
अखेरची भेट
01 Apr 2023

या सदस्याने अद्याप परिचय लिहिलेला नाही.

या सदस्याचे लेखन पाहण्यासाठी येथे Views block ठेवा.

ज्योति अळवणी यांनी
Wed, 08/30/2017 - 06:09  ·  लेखमाला
लेखमाला

माझी मी जन्मले फिरुनी

१९९३चा मे महिना होता. जळगावचं रणरणतं ऊन मी म्हणत होतं. त्यात माझ्या चुलतबहिणीचं लग्न असल्याने आणि साडी नेसण्याची हौस असल्याने मी सकाळपासूनच झकास तयार होऊन मिरवत होते. मार्चमध्ये बारावीची परीक्षा दिली होती. त्यामुळे आता सिनिअर कॉलेजला जाणार, म्हणजे मोठी झाले आहे... असा माझा एकूण आविर्भाव होता. मे महिन्याची एकोणतीस तारीख होती, पण अजून बारावीचा निकाल लागला नव्हता. आदल्या वर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात निकाल जाहीर झाला होता, त्यामुळे मनातून खूप धाकधूक होती. सकाळपासून दोनदा जवळच्या S.T.D. बूथवर जाऊन मी मुंबईच्या मैत्रिणीला फोन करून निकाल कधी लागणार आहे ते विचारलं होतं. पण तोपर्यंत काही कळलं नव्हतं. संध्याकाळी कार्यालयातून निघताना मी हट्टाने परत एकदा मैत्रिणीला फोन करायला गेले. आईच्या मते इतक्यात निकाल लागणार नव्हता. तसेही आम्ही तीस मेला, म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निघणार होतो. त्यामुळे मी उगाच फोन करते आहे असं तिचं मत होतं. तरीही मी फोन केलाच.

माझ्या मैत्रिणीने तिसऱ्या फोनच्या वेळी मला सांगितलं की निकाल उद्या संध्याकाळी, म्हणजे तीसलाच आहे. हे ऐकताच मी खूपच अस्वस्थ झाले. मला लगेच मुंबईला जायचं होतं. घरी पोहोचल्याबरोबर मी आई-वडिलांना रडक्या आवाजात सांगितलं की निकाल उद्याच आहे आणि मला आजच... आत्ता निघायचं आहे. निकाल लागणं म्हणजे त्या वेळी मोठी गोष्ट होती. आजकालची मुलं online निकाल बघून घेतात आणि निकाल लागला तरी अ‍ॅडमिशनदेखील online असल्याने निवांतच असतात. निकाल लागणं ही आमच्यावेळी खूपच मोठी गोष्ट होती.

माझा हट्ट कमी होत नव्हता. माझी आत्या आणि काका त्याच दिवशी रात्री साडेनऊच्या ट्रेनने निघणार होते. त्यांचं रिझर्वेशन होतं, त्यामुळे आई-बाबांनी मला त्यांच्याबरोबर पाठवावं असं माझं म्हणणं होतं. शेवटी माझी आत्या मध्ये पडली आणि म्हणाली की “मी घेऊन जाते तिला. ट्रेनमध्ये बघू काय करायचं ते.”

ठरल्याप्रमाणे मी, आत्या आणि काका रात्री स्टेशनवर आलो. पोहोचल्यावर आम्हाला कळलं की ट्रेन लेट होती. मी आणि आत्या दिवसभराच्या लग्नाच्या गडबडीमुळे खूपच दमलो होतो. त्यामुळे एका बाकड्यावर बसलो आणि डुलक्या काढायला लागलो. आमच्या या डुलक्यांमुळे काका फारच वैतागले होते. अचानक काका ओरडले, "उठा... ट्रेन आली." आम्ही दोघी धडपडत उठलो. आत्याने माझ्या हातात एक लहानशी हँडबॅग दिली. माझी बॅग आणि इतर सामान आत्या आणि काकांनी उचललं. काका माहिती काढून आले होते की ट्रेन फक्त पाच मिनिटंच उभी राहते. त्यामुळे आम्ही धावत पळत आमच्या डब्याजवळ गेलो. ट्रेनमधून उतरणारे आणि चढणारे यांची एकच झुंबड उडाली होती. प्रत्येकालाच घाई होती. खरं तर माझ्या डोळ्यावरची झोप अजून उडाली नव्हती. त्यामुळे आत्याचा हात धरून मी तिच्या मागून खेचल्यासारखी चालत होते. अचानक आत्याचा हात सुटला आणि माझ्या काही लक्षात यायच्या आत आत्या आणि काका ट्रेनमध्ये चढलेदेखील. मी गोंधळून गेले. त्यातच ट्रेनमधून उतरणाऱ्या लोकांनी मला मागे लोटलं. त्यामुळे मी ट्रेनपासून लांब ढकलले गेले. अचानक ट्रेन सुटली आणि मी तशीच फलाटावर उभी राहिले. माझ्या डोळ्यासमोरून ट्रेन जात होती आणि मी गोंधळून मोठ्याने रडत आत्याला हाका मारत होते.

ट्रेनमधून उतरणाऱ्या लोकांनी मला “काय झालं?” म्हणून विचारलं. मी कसंबसं रडत काय झालं ते सांगितलं. त्यावर 'बिच्चारी' असं म्हणत सगळेच निघून गेले. तोवर रात्रीचे साडेअकरा होऊन गेले होते. पाचच मिनिटांत संपूर्ण फलाट रिकामा झाला. आता फलाटावर रडणारी मी आणि समोरच्या फलाटावरच्या स्टेशन मास्तरच्या कार्यालयातले स्टेशन मास्तर असे दोघेच उरलो होतो. काय करावं मला सुचत नव्हतं. स्टेशन मास्तर मला बघून रेल्वे लाईन क्रॉस करून माझ्याकडे आले. त्यांना मी झालेला प्रकार सांगितला. त्यांनी मला विचारलं, "मग आता तू काय करणार?" मला काहीच सुचत नव्हतं. त्यांनी एकदा उजवी-डावीकडे बघितलं आणि म्हणाले, "चल, माझ्या ऑफिसमध्ये ये. मग बघू काय करायचं ते." मी नकळत त्यांच्या मागून चालायला लागले. आम्ही फलाटाच्या एका टोकाला आलो. आता रूळ पार करून समोरच्या फलाटावरच्या त्यांच्या ऑफिसमध्ये जायचं होतं. तेवढ्यात समोरून एक तरुण पोलीस आला. मला स्टेशन मास्तरांबरोबर बघून त्याने मला विचारलं, "कोण गं तू? आणि या वेळी इथे काय करते आहेस?" मी काही बोलायच्या आतच स्टेशन मास्टर म्हणाले, "तिचे नातेवाईक ट्रेनने गेले. ही चुकून मागे राहिली आहे. मी तिला माझ्या ऑफिसमध्ये घेऊन जातो आहे. मग ती ज्यांच्याकडे उतरली आहे त्यांना फोन करून बघीन. नाहीतर मग काय ते बघावं लागेल."

त्या पोलिसाने स्टेशन मास्तरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि मला विचारलं, "अशी कशी राहिलीस गं? खरंच कोणी होतं तुझ्याबरोबर की खोटं बोलते आहेस?" मी परत रडायला लागले आणि उलट त्यालाच विचारलं, "मी तुम्हाला घरातून पळून आलेली वाटते का? आणि पळून आले असते तर असे पैसे नाहीत, कपडे नाहीत अशी गोंधळून रडले असते का? मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी आले होते. बारावीचा निकाल उद्या लागणार म्हणून घाईने आत्या आणि काकांबरोबर निघाले. पण ते ट्रेनमध्ये चढले आणि मी राहिले. काय करू आता?" माझ्या बोलण्याने त्याला काय वाटलं कोण जाणे, पण तो हसला आणि त्याने मला विचारलं, "तू इथे ज्यांच्याकडे उतरली आहेस त्यांचा फोन नंबर आहे का तुझ्याकडे?" मी परत रडवेली होत नकारार्थी मान हलवली. त्यावर त्याने विचारलं की, "घर कुठे आहे माहीत आहे का?" त्यावरदेखील मी 'नाही' म्हणून मान हलवली. मग तो पोलीस स्टेशन मास्तरांकडे वळला आणि त्यांना विचारलं, "मास्तर, परत ट्रेन आहे ना आता?" मास्तरांनी माझ्याकडे न बघता त्याला उत्तर दिलं, "हो, आहे! अजून तासाभराने. हवं तर तिला तिच्या घरी सोडायची सोय मी करतो." पण मास्तरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत तो पोलीस मला म्हणाला, "हे बघ, जर तुझी आत्या किंवा काका पुढच्या स्टेशनवर उतरून मागे आले आणि तू दिसली नाहीस, तर ते घाबरतील. त्यामुळे तू आता इथेच या फलाटावर थांब. समजा, ते आलेच नाहीत, तर तासभराचा प्रश्न आहे. मग इथूनच मुंबईसाठी पुढची ट्रेन आहे. मी त्यात तुला बसवून देईन. पण आता इथून हलायचं नाही. मी इथेच आहे गस्तीवर. त्यामुळे तुला घाबरायचीदेखील गरज नाही." त्याचं बोलणं ऐकून मास्तरांनी एकदा माझ्याकडे बघितलं आणि ते पलीकडच्या फलाटावर त्यांच्या कार्यालयात निघून गेले.

त्या पोलिसाचं बोलणं ऐकून मला खूपच धीर आला. खरं तर तो पोलीस अगदीच तरुण होता आणि स्टेशन मास्तर जवळजवळ माझ्या वडिलांच्या वयाचे होते. तरीदेखील का कोण जाणे, मला त्याचं म्हणणं पटलं. मी त्याच्यामागून परत फलाटावर आले आणि एका बाकड्यावर बसले. आता झोप पार उडून गेली होती. समोरच्या बाजूने परतीची एखादी ट्रेन येते आहे का आणि त्यातून आत्या-काका येतात का, याची मी वाट बघत होते. कदाचित ते परत येतील असं माझं मन मला सांगत होतं. समोरून एक ट्रेन आली आणि मी उठून उभी राहिले. पण ट्रेन आली तशी गेली. मात्र उतारूंमध्ये माझे काका किंवा आत्या नव्हते. तो पोलीसदेखील माझ्याजवळ येऊन उभा होता. त्याने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. मी त्याच्याकडे बघत, ‘नाही’ म्हणून मान हलवली. त्यावर तो म्हणाला, "अगं, त्यांना ही ट्रेन मिळाली नसेल. तू चिंता करू नकोस. आता मुंबईकडची ट्रेन येते आहे. मी त्यात तुला नक्की बसवून देतो." त्यावर मी “बरं” म्हणून परत बाकड्यावर जाऊन बसले.

थोड्या वेळाने एक ट्रेन आली. इतक्या उशिराच्या ट्रेनसाठी कोणीही चढणारे नव्हते. फलाट पूर्ण रिकामा होता. तो पोलीस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, “जो डबा समोर येईल त्यात आपण चढू या. मग मी तुझी बसायची सोय करीन.” ट्रेन थांबली आणि आम्ही समोरच्या डब्यात चढलो. आता मात्र माझं नशीब बलवत्तर होतं. आम्ही चढलो तो डबा पोलिसांसाठी राखीव होता आणि अनेक पोलीस त्यांच्या कुटुंबांबरोबर मुंबईला जात होते. त्या तरुण पोलिसाने समोर असणाऱ्या एका पोलिसाला घडलेला एकूण प्रकार सांगितला आणि मला मुंबईला उतरवून द्यायला सांगितलं. मग माझ्याकडे वळून तो म्हणाला, "मुंबईला उतरलीस की काय करशील? घरी एकटी जाऊ शकशील का?" मी पहिल्यांदा हसत म्हणाले, "अहो, मी मुंबईचीच आहे. रोज लोकलने प्रवास करते. नक्की जाईन मी घरी." त्याने माझ्या खांद्यावर थोपटलं आणि मला “सुखरूप जा” असं म्हणून खाली उतरला, तोवर ट्रेनदेखील सुरू झाली होती. मी त्याला हात हलवून निरोप दिला.

एका पोलिसाने मला त्याच्या बायकोशी ओळख करून दिली. तिच्यासमोरचा त्याचा स्वतःचा बर्थ मला देत म्हणाला, "इथे झोप तू. ट्रेन दादरला थांबते. तू कोणाकडे जाणार आहेस मुंबईला?" मी म्हणाले, "माझ्या आत्याच्या घरीच जाईन. कारण अजून माझे आई-बाबा जळगावलाच आहेत. ते उद्या रात्री निघून परवा येतील." एकदा ट्रेनमध्ये बसल्यानंतर मी एकदम निवांत झाले होते. थोड्या वेळाने तर मला डुलकीदेखील लागली. साधारण सकाळी आठच्या सुमाराला ट्रेन दादरला आली. मला त्या पोलिसच्या बायकोने उठवलं आणि उतरायला सांगितलं. मी पटकन उठून त्यांचे दोघांचे आभार मानले आणि खाली उतरले. आत्या सांताक्रूझला स्टेशनच्या अगदी जवळ राहायची. माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते. पण मी फार विचार केला नाही. सरळ लोकल ट्रेन पडकली आणि सांताक्रूझला स्टेशनला उतरून मी चालत आत्याच्या घरी पोहोचले.

मी गेटजवळ पोहोचताच आत्याला मोठ्याने हाक मारली आणि घराकडे धावले. आत्या आणि काका माझा आवाज ऐकून धावत बाहेर आले. आत्या आणि काका पाहाटे पाचलाच मुंबईला पोहोचले होते. त्यांनी दादर स्टेशनहूनच जळगावला काकांच्या शेजाऱ्यांकडे फोन केला होता आणि मी स्टेशनवर राहिल्याचं कळवलं होतं. त्यांना वाटलं होतं की मी परत घरी गेले असेन. पण मी तिथे नाही म्हटल्यावर आत्या खूप घाबरली होती. तिथे आई आणि आजीला काहीच सांगितलं गेलं नव्हतं. पण माझा भाऊ, वडील, काका सगळेच मला शोधायला बाहेर पडले होते. घरतल्या पुरुषांमध्ये तणावाचं वातावरण होतं. मला मात्र ट्रेनमध्ये बसल्यानंतर एकदम निवांत वाटायला लागलं होतं. त्यामुळे बाकी काय गोधळ झाला असेल याचा विचारदेखील मी केला नव्हता.

मला बघितल्याबरोबर आत्या रडायला लागली. काका मात्र आत धावले आणि त्यांनी लगेच जळगावला फोन लावला. मी सुखरूप घरी आल्याचं त्यांनी कळवलं. काय झालं-कसं झालं ते सांगण्यासाठी फोन माझ्या हातात दिला. मी वडिलांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. मी घरी सुखरूप आल्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

मात्र हा प्रसंग इथेच संपत नाही. कारण साधारण - वर्षभराने जुलै १९९४मध्ये जळगावमध्ये घडलेलं सेक्स स्कँडल एकदम समोर आलं. माझ्या मते वर्तमानपत्रातून जगासमोर आलेलं हे पहिलं सेक्स स्कँडल होतं. शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना फसवून त्यांच्यावर बलात्कार केला गेला होता. त्यांची व्हिडिओ टेप बनवून त्यांना धमकावलं गेलं होतं आणि अनेक मुलींची विक्री केली गेली होती.
सकाळीच वर्तमानपत्रातली ती बातमी वाचून माझी आई एकदम रडायला लागली. मला जवळ घेऊन ती म्हाणाली, "वर्षभरापूर्वी तू एकटीच त्या एकलकोंड्या स्टेशनवर होतीस. काय झालं असत गं तुझं? मला विचारही करवत नाही. भलं व्हावं त्या तरुण पोलिसाचं. अगदी देवासारखा पावला गं तो तुला. त्याने तुला ट्रेनमध्ये बसवून दिलं, म्हणून माझी लेक काही वाकडंतिकडं न घडता सुखरूप घरी परतली."
त्यानंतर माझी आई आणि वडील मुद्दाम जळगावला त्या पोलिसाला शोधायला आणि त्याचे आभार मानायला गेले. पण त्याचा पत्ता लागला नाही.

ज्या वेळी मी स्टेशनवर राहिले होते किंवा ट्रेनमध्ये बसले किंवा अगदी आत्याच्या घरी पोहोचले, तरी मला एकूण मी केलेल्या पराक्रमाचा भयंकर परिणाम कळला नव्हता. मात्र जळगाव सेक्स स्कँडलबद्दल कळल्यानंतर मात्र माझं मला मनापासून वाटलं, ‘खरंच............ माझी मी जन्मले फिरुनी.’


वाचनखूण लावा
| 29151 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 29151 views

Recent comments

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा