Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

श्रीखंडाच्या वड्या

श्रीखंडाच्या वड्या

दिवाळी अंक Sat, 10/31/2015 - 14:02

.
.
प्रत्येक घरात किंवा आपल्या नातेवाईक, मित्रमंडळ यांच्यात प्रत्येक व्यक्तीची काही ना काही खास पदार्थाची खासियत असते. काकूच्या हातचे काही, मामीच्या हातचे काही, आजीचे काही.. न संपणारी यादी. बरेचदा मग सवयीने आपल्याला तो पदार्थ त्याच व्यक्तीच्या हातचा आवडतो, अशीच आमच्या समस्त गोतावळ्यात 'श्रीखंडाच्या वड्या' हा माझ्या आईच्या काही पेटंट पदार्थांपैकी एक. आता याचा शोध तिला कसा लागला आणि ती कशी शिकली, याचीही कथा रोचक आहे. घराजवळच राहणारी एक आजी, तिच्या ओळखीतल्या कुणी एक काकू या वड्या करायच्या आणि विकायच्या. त्या काही पाककृती सांगायच्या नाहीत, कारण त्याना त्यांचा कॉपीराईट वाटत असावा किंवा ते त्यांचे उत्पन्नाचे साधन असल्याने त्या सहजी देत नसाव्यात. मग आता प्रयत्न करायचा म्हणून आई आणि आजी, या दोघींनी ठरवले की हा प्रकार शिकू या. आपल्याला काही या विकायच्या नाहीत, पण यायला हव्यात. मग दोघींनी प्रयोग सुरू केले. अगदी वाटीभर चक्का आणायचा आणि करून बघायचे. मग या प्रयोगात त्या कधी सपशेल बिघडल्या. कधी थोड्या जमल्या, तर कधी परफेक्ट जमल्या. असे करत करत काही वर्षात दोघींचाही हात बसला आणि मग काही वेगळे करायचे असेल तर या वड्या करायला सुरुवात झाली. मग श्रीखंडाच्या वड्या म्हणजे आईच करणार असे आमच्या घरात समीकरण झाले. ज्यांच्यासाठी हा प्रकार नवीन असतो आणि आवडतो - विशेषतः गोडघाशी मंडळी - त्यांच्याकडून मग नेहमीच वाहवा मिळते आणि आईला समाधान. पण यात गंमत अशी की माझ्या जिभेचे आणि या वड्यांचे काही कधी जमले नाही. मी नावाला एखादी वडी खायचे फक्त. त्यामुळे घराघरात ऐकावे लागणारे "एवढ्या मेहनतीने करायचे आणि हिचे नखरे" हे मीही ऐकून घ्यायचे आणि अजूनही घेते. किंबहुना आता जास्तच ऐकावे लागते, कारण… जावयाला हा प्रकार भयंकर आवडला. तेव्हापासून तर विचारायलाच नको. त्यामुळे प्रत्येक वेळी "जावई येती घरा, श्रीखंडाच्या वड्या करा" हे कसोशीने पाळले जाते. आग्रहही केला जातो आणि येताना 'त्याला आवडतात ना, मग घेऊन जा जास्तीच्या' असे ऐकून चार वड्या जास्तच डब्यात भरल्या जातात. तर अशी ही यामागची कहाणी.

आजवर या प्रकाराच्या वाट्याला मी कधी गेले नव्हते. मुळातच वड्या, लाडू हे प्रकार अवघड वाटतात. पण रुची अंकातला 'अन्नपूर्णेचा वारसा' वाचून आई, मामी यांचे जे पदार्थ आठवले, त्यात हाही आठवला. मग ठरवले की प्रयत्न करू या, जमल्या तर देऊयात दिवाळी अंकात. आता जमले हे तुम्हाला लक्षात आले असेलच. तर बघा पुढे साहित्य आणि कृती.

साहित्य :
चक्का - १ वाटी (मला इथे चक्का मिळत नाही. दह्याचा चक्कासदृश एक प्रकार मिळतो, पण तेही तसेच्या तसे वड्यांना उपयोगी नाही. म्हणून ते आणून स्वच्छ कपड्यात बांधून ठेवले आणि सगळे पाणी काढून मग तो चक्का वापरला.)
साखर - २ वाट्या (दिवाळी आहे, जरा जास्त गोड चालतं ;) )
वेलदोडा (वेलची) पूड
थोडी पिठीसाखर, मिश्रण कोरडे होऊन वड्या थापण्यासाठी सोपी म्हणून (मी घेतली नाही, त्याऐवजी चमचाभर तूप वापरले)
सजावटीसाठी केशर, पिस्त्याचे काप, बदामाचे काप.. यातले काहीही आवडेल ते.

.

कृती:
चक्का आणि साखर एकत्र करून गरम करायला ठेवा. सतत ढवळत राहा.

.

मिश्रण जरा घट्ट झाले किंवा बुडबुडे येऊ लागले की चमच्यावर घेऊन हाताने अंदाज घ्या. ते हाताला कोरडे लागले पाहिजे किंवा कढईच्या कडा कोरड्या होताना दिसल्या पाहिजे. हे झाले की गॅस बंद करा आणि बाजूला घेऊन पुन्हा तेवढ्याच पेशन्सने ढवळत राहा. हे फार महत्त्वाचे, कारण जर जास्त वेळ गॅसवर राहिले, तर जास्त कडक होतात. त्यापेक्षा गॅस थोडा आधी बंद करून नंतर जास्त वेळ ढवळले तर चालते किंवा थोडे कमी झाले तर एकवेळ मऊ वड्या खाता येतात. वेलदोडा (वेलची) पूड घाला. आता घट्ट गोळा होईल असे वाटले की एका ताटलीत पिठीसाखर भुरभुरवा किंवा तूप लावा. त्यावर हे मिश्रण ओतून सेट होऊ द्या. वरूनही थोडी पिठीसाखर लावू शकता, म्हणजे त्या पटकन कोरड्या होतात.

.

व्यवस्थित गार झाले की वड्या पाडा. आपल्या आवडीप्रमाणे सजवा. श्रीखंडाच्या वड्या तयार आहेत.

.

सर्व मिपाकरांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!!

फोटो सौजन्य - नवरा
.

  • Log in or register to post comments
  • 29928 views
  • Log in or register to post comments
  • 29928 views

Recent comments

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा