Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

कृष्णमयी मीरा !!!

व
विशाल कुलकर्णी
Fri, 01/30/2015 - 05:02
💬 52 प्रतिसाद
संत ज्ञानेश्वरांपासून ते गाडगेबाबांपर्यंत आपल्याकडे अनेक संत महात्मे होवून गेले. या सगळ्यांनी मराठीतील भक्तीसाहित्य समृद्ध केलेले आहे. पण मराठी भाषेच्या पलिकडे जावुन जर पाहिले तर इतर भाषांतही त्या त्या प्रांतातील संत महात्म्यांनी प्रचंड साहित्य निर्मीती केलेली आहे. मग ते संत तुलसीदासांचे 'तुलसी रामायण' असो, सुरदासाचे काव्य असो, कबीर्-रहिमचे दोहे असोत वा मीरेची पदे असोत. या सगळ्यांनीच भारतीय भक्ती साहित्याला एका विलक्षण उंचीवर नेवुन ठेवलेले आहे. मला स्वतःला मात्र यापैकी संत कबीर आणि संत मीराबाई यांच्याबद्दल एक विलक्षण आकर्षण आहे. खरेतर या दोघांचे आयुष्य अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने व्यतित झालेले आहे. कबीर अतिशय सामान्य घरात वाढले, त्यांच्यासमोरच्या समस्या वेगळ्या होत्या, तर मीरा राज घराण्यात जन्माला आलेली, तिच्या समस्या पुर्णपणे निराळ्या... पण या दोघांमध्येही एक विलक्षण साम्य आढळते, ते म्हणजे अनन्यभक्ती ! इतर कुठल्याही शास्त्राला, धर्मकर्माला, कर्मकांडाच्या अवडंबराला गौणत्व देवुन स्वानुभुतीला पुजण्याची, स्वानुभुतीबद्दल असलेली अपार निष्ठेची भावना !! आज आपण मीराबाईबद्दल बोलणार आहोत... Meera (छायाचित्र आंतरजालावरून साभार) संत मीराबाई भज मन चरणकमल अविनासी जे ताई दीसे धरण-गगन बिच तेताई सब उठ जासी कहा भयो तीरथ व्रत कीन्हे कहा लिये करवत कासी इण देही का गरब न करणा माटी में मिल जासी यो संसार चहर की बाझी सांझ पड्या उठ जासी कहा भयो है भगवा पहर्‍यां घर तज भये संन्यासी जोगी होय जुगती नहिं जाणी उलटि जनम फिर आसी अरज करी अबला कर जोरे स्याम तुम्हारी दासी मीरा के प्रभु गिरिधर नागर काटो जम की फांसी भज मन चरणकमल अविनासी मराठी अनुवाद : विशाल कुलकर्णी भज मना रे तू, ते चरणकमळ अविनाशी धरा-अंबरामध्ये दिसे जे, ते सर्व असे विनाशी हवे कशाला व्रत-तीर्थाटन, मोक्षास हवी का काशी? अहंकार वृथा हा देहाचा, रे अखेर मातीस मिळशी दिन ढळतो रे हा हा म्हणता, संसार नसे अविनाशी हवी कशाला भगवी वस्त्रे, वृथा संन्यास का घेशी? योगी होवुन मंत्र न जाणे मोक्षाचा, भवचक्रात अडकशी विनवणी करतसे कर जोडुनि अबला, केशवा तव दासी गिरिधर प्रभो, गुंतवू नको मीरेला, भवसागरा तळाशी भज मना रे तू, ते चरणकमळ अविनाशी मीरेचा जन्म राजकुळात झालेला. माहेर असो वा सासर, सुख्-समृद्धी, सोयी सुविधा कायम दासासारख्या हात जोडून समोर उभ्या. पण मीरेच्या वृत्तीवर या कशाचाच परिणाम झालेला दिसत नाही. सदैव पाण्यात राहूनही कोरडे राहणार्‍या कमलदलासारखी निर्लेप वृत्ती घेवुनच ती जगली. एकच ध्यास आयुष्यभर होता.... "मेरे तो गिरधर गोपाल, दुसरा न कोय!" एकच आस कायम मनात होती. त्या गिरिधर गोपाळाच्या चरणकमळाची. वरील पदात ती 'मनाला' सांगते. "ही धरा आणि आकाश यांच्यामध्ये जे काही आहे ते सर्व नश्वर आहे. मग त्याचा मोह कशाला हवा? कशाला हवे फुकाचे कर्मकांड आणि व्यर्थ तिर्थयात्रा, कशाला हवेत ते संन्यास धर्माचे अट्टाहास आणि जप-तपे. या देहाबद्दल वृथा आसक्ती, अहंकार कशाला हवा? वेड्या, अरे मातीतून जन्माला आलास शेवटी मातीतच जायचास. अरे ...केवळ संन्यास घेवुन मोक्ष नाही मिळत. मोक्षासाठी आवश्यक असते ते परमात्म्याशी मिलन, ते समर्पण. हि साधी युक्ती जोपर्यंत तुला समजत नाही तोवर ही भगवी वस्त्रे, हे जपतपाचे कर्मकांड सगळे व्यर्थ आहे. म्हणून शेवटी ती हरिलाच विनंती करते की परमेश्वरा मला या भवचक्राच्या फेर्‍यात अडकवु नकोस, मला तुझ्या पायाशी जागा दे. अन्य काही नको!" मीरा... खरेतर या नावाचे आपल्या पुराणात, इतिहासात कुठेच आणि कसलेच संदर्भ सापडत नाहीत. बरेचसे लोकांच्या मते हे एक मुस्लीम नाव आहे. मीरासाहिब म्हणुन एक महान मुस्लिम फकीरही होवून गेलेले आहेत. पण तरीही हे नाव कधी कुणाला खटकलेले नाही. कारण मीरेने स्वतःच्या समर्पण वृत्तीने, तेजस्वी भक्तीने या नावालाच कृष्णपद प्राप्त करुन दिले आहे. लहानपणी आईने थट्टेने कृष्णाच्या मुर्तीकडे बोट दाखवून सांगितले.... "वो देख, वो है तेरा दुल्हा!" भाबड्या, निरागस मीरेने त्या क्षणी जगाशी नाते तोडले आणि ती कृष्णमय झाली...कृष्ण झाली. मुळातच समन्वयवृत्ती आणि समर्पण हाच स्वभाव असल्याने मीरेला कोणी कधीच कुठल्याच बंधनात, मोहात बांधू शकले नाही. तिला मोहात पाडू शकणारी एकच गोष्ट होती या जगात... "मेरे तो गिरधर गोपाल दुसरो न कोई जाके सिर मोरमुकुट मेरो पति सोई" मीरेची सगळी साधना कृष्णापाशी सुरू होते आणि कृष्णापाशी येवुन संपते. तिची प्रेमभक्ती हे तिच्या साधनेचे बलस्थान होते. पण तिने साधनेचे सर्व प्रकार अनुभवलेले दिसतात. ते तिच्या कवनांमधून प्रकर्षाने जाणवत राहते. योगसाधना, उपासना, ज्ञानसाधना अगदी टोकाची अशी वैराग्यसाधनादेखील तीने आपल्या प्रेमसाधनेच्या कसोटीवर, निकषांवर तपासून पाहीलेली असल्याचे जाणवत राहते. एक गोष्ट तिच्या लक्षात आलेली होती की आपल्यासाठी महत्त्वाचे आहे ते गिरिधर नागर गोपाळाशी मिलन. मग त्यासाठी तिला काहीच वर्ज्य नव्हते. त्यासाठी मीरा आजन्म साधनारतच राहिली. घडी एक नहिं आवडे तुम दरसण बिन मोय तुम हो मेरे प्राण जी कासूं जीवण होय धान न भावै नींद न आवै बिरह सतावे मोय घायलसी घूमत फिरूं रे मेरो दरद न जाणै कोय ती म्हणते "हे हरि, तुला पाहिल्याशिवाय एक क्षणभरही चैन पडत नाही मला. तू माझे प्राण आहेस, तूच नसशील तर या जगण्यात काय अर्थ आहे. तहान्-भूक विसरली. निद्रेने साथ सोडली , त्यात हा नित्य तुझा विरह. वेड्यासारखी अवस्था झालेय पण कुणाला माझी व्यथा कळतच नाही." मीरेची कृष्णाशी असलेली सायुज्यता कधी कुणाला कळलीच नाही. तिची कृष्णाविषयीची निरलस वृत्ती, निरपेक्ष भक्ती, ते निरागस प्रेम, ती जगावेगळी निष्ठा कधी कुणाला कळलीच नाही. पुराणानुसार मुक्तीचे चार प्रकार सांगितले जातात. सलोकता, समीपता, सरुपता आणि सर्वात श्रेष्ठ अशी 'सायुज्यता'. उदाहरणच द्यायचे झाले तर कैलास लोकात अथवा वैकुंठात राहायला मिळणे ही झाली सलोकता. तिथे राहून शिवाच्या अथवा श्रीविष्णुंच्या सान्निद्ध्यात राहून त्यांची सेवा करण्याची संधी मिळणे ही झाली समीपता. कायम ईश्वरा च्या जवळ राहिल्याने एक वेळ अशी येते की त्रयस्थ माणसाला हा देव आणि हा भक्त असे वेगवेगळे भेद कळतच नाहीत. दोघेही सारखेच वाटायला लागतात ही झाली सरुपता...... आणि खुप कमी भाग्यवंताना लाभते ते म्हणजे परमेश्वरातच मिसळून जाण्याची, त्याच्याशी एकरुप होण्याची क्षमता... ती सायुज्यता ! माझ्या माहितीनुसार हे भाग्य लाभलेले दोनच संतश्रेष्ठ होवून गेले एक मीराबाई आणि दुसरी कान्होपात्रा ! मीरेच्या कवनांमधून सर्व प्रकारचे रस डोकावतात. मुळातच प्रेमभक्ती हा तिच्या उपासनेचा, साधनेचा मुळ पाया असल्याने राग, मोह, विरह, वैराग्य आणि श्रुंगार असे बरेचसे रस तिच्या कवनांनधून ओसंडुन वाहताना दिसतात. तुम्हरे कारण सब सुख छांड्या अब मोहिं क्युं तरसावौ बिरहबिया लागी उर अंतर सो तुम आय बुझावौ (हे कृष्णप्रिया, तुझ्यासाठी सगळ्या सुखांचा त्याग केला तरी तू असा का त्रास देतोयस मला. विरह व्यथेने जळणारी या मीरेची ही अवस्था तडफड तुझ्या लक्षात येत नाही का? ही सगळी तळमळ, हा दाह शमवण्याची क्षमता फक्त तुझ्या स्पर्शातच आहे रे !) श्रुंगाररसातून देखील मीरेची भक्ती, तिची निष्ठाच जाणवत राहते. अब छोड्या नहिं बनै प्रभुजी हंसकर तुरत बुलावौ मीरा दासी जनम जनम की अंग सूं अंग लगावौ (अता क्षणाचाही दुरावा सहन नाही होत. बस्स तू एकदा हंसून तुझ्याजवळ बोलाव. ही मीरा जन्मो-जन्मीची तुझी दासी आहे.... अंगाला अंग भिडू दे आता!) राजघराण्यात वाढलेल्या मीराबाईचा काळ हा तत्कालिन मोघल आणि हिंदुंच्या संघर्षाचा काळ होता. कायम लढाया, हल्ले, कापाकाप्या यांचे ते दिवस होते. सतत होणार्‍या मोघलांच्या स्वार्‍या, राजस्थानातील स्थानिक राजसत्तांची होणारी परवड ती आपल्या डोळ्यांनी पाहात होती. पण एवढे हल्ले होवूनही राजस्थानातील हिंदू राजे मुघलांविरुद्ध कंबर कसण्याच्या ऐवजी आपली परस्पर वैर-वैमनस्ये विसरायला तयार नव्हते. एकेक राज्य उध्वस्त होत चाललं होतं पण एकत्र येवुन सगळी शक्ती मुघलांविरुद्ध एकवटण्याची राजस्थानातील विखुरलेल्या हिंदु राजांची तयारी नव्हती. हे सगळे भोगत, अनुभवत असलेल्या मीरेच्या संवेदनशील मनावर विलक्षण परिणाम होत होता. ऐहिक गोष्टींची नश्वरता आणि व्यर्थता तिला बरोबर कळली होती. म्हणून तिने स्वतःला बहुदा कृष्ण साधनेत, प्रेम साधनेत गुंतवून घेतले. प्रेमसाधना वाटते तशी आणि तेवढी सोपी नाही बरे. इथे भक्ताला आपल्या प्रिय ईश्वराच्या भेटीची आस असते. ईश्वरप्राप्तीसाठी तो तळमळतो. प्रभुचा तो दुरावा त्याला सहन होत नाही. परमेश्वर अगदी कसुन परीक्षा घेतल्याशिवाय कुणालाही आपली समीपता देत नाही. एखाद्या ज्योतीप्रमाणे, धुपाप्रमाणे प्रभुसाठी जळत राहण्याची तयारी ठेवावी लागते. त्या कोवळ्या वयात मीरेने कृष्णाला आपला पति मानले आणि त्यानंतरचं तिचं सगळं आयुष्यच कृष्णमय होवून गेलं. ऐसी लगन लगाई कहां तूं जासी तुम देखे बिन कल न परति है तलफि तलफि जिव जासी तेरे खातर जोगण हुंगी करवत लूंगी फासी मीरा के प्रभु गिरिधर नागर चरणकंवल की दासी "तुझ्या प्राप्तीसाठी जोगीण बनेन, वेळ पडल्यास मरण पत्करेन. गिरिधरा, ही मीरा तुझ्या चरणांची दासी आहे रे!" तिचा ठाम विश्वास होता की प्रभुचे नामस्मरण, त्याचे भजन किर्तन हीच त्याच्या प्राप्तीची गुरुकिल्ली आहे. त्यासाठी मथुरा-काशीला जाण्याची गरज नाही. तीर्थयात्रांची आवश्यकता नाही. बस्स प्रभुंचे नामस्मरण यातच मोक्ष आहे. आणि हे सुत्र तीने आयुष्यभर अंगी भिनवले होते. भजन भरोसे अविनाशी मै तो भजन भरोसे अविनाशी जप तप तीर्थ कछुए ना जाणूं करत मै उदासी रे मंत्र ने जंत्र कछुए ना जाणूं वेद पढ्यों न गइ काशी मीरा के प्रभु गिरधर नागर चरणकमल की हूं दासी भजन भरोसे अविनाशी मै तो भजन भरोसे अविनाशी! हे झालं मीरेच्या स्वतःबद्दल, तिच्या कृष्णभक्तीबद्दल. पण स्वतः कृष्णाबद्दल सांगताना मात्र तिची काव्यप्रतिभा विलक्षण बहरते. श्रीकृष्णाबद्दल बोलताना तिला काय सांगु आणि काय नको असे होते. यदुवर लागत है मोहिं प्यारो मथुरा में हरि जन्म लियो है गोकुल में पग धारो जन्मत ही पुतना गति दीनी अधम उधारन हारी यमुना के नीरे तीरे धेनु चरावै ओढे कामरि कारो सुंदर बदन कमलदललोचन पीतांबर पट वारो मोर मुकुट मकराकृत कुंडल करमें मुरली धारो शंख चक्र गदा पद्म बिराजै संतन को रखवारों जल डुबत ब्रज राखि लियो है करपर गिरिवर धारो मीरा के प्रभु गिरिधर नागर जीवनप्राण हमारो 'मीरा' मुळात 'मीरा' राहिलीच नव्हती. ती पुर्णतः कृष्णमयी होवून गेलेली होती. त्यामुळे तिच्या कवनांमधुन जिथे तिथे कृष्ण ओथंबून भरलेला दिसतो. तिचा प्रत्येक क्षण हा हरिच्या मिलनासाठी आसुसलेला आहे. कुठलीही सुखे तिला तिच्या या साधनेपासुन परावृत्त करू शकत नाहीत किवा तिच्या मनातील प्रभुबद्दलची प्रिती कमी करु शकत नाहीत. हरि मेरे जीवन प्रान-अधार और आसरो नाही तुमबिन तीनूं लोक मंझार आप बिना मोहिं कछु न सुहावै निरख्यौं सब संसार मीरा कहै में दासि रावरी दीज्यौ मती बिसार हरि मेरे जीवन प्रान-अधार मोहि लागी लगन हरिचरनन की चरन बिना कछुवै नहिं भावे जग माया सब सपननकी भवसागर सब सुखि गयो है फिकर नही मोहिं तरनन की मीरा के प्रभु गिरिधर नागर आस वही गुरु सरनन की मोहि लागी लगन हरिचरननकी वर सांगितल्याप्रमाणे 'मीरा' हे सायुज्यतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ती कृष्णाशी एवढी एकरुप होवू गेली होती की स्थळ्-काळाचे देखिल भान विसरून बसे. कधी ती स्वतःला वृंदावनातील गोपी समजते तर कधी राधा. कृष्णाच्या लीलांना कंटाळलेल्या एखाद्या गोपिकेप्रमाणे ती लडिवाळ तक्रारही करते. हलकेच आपल्या प्रियाला लटका रागही दाखवते. छांडो लंगर मोरी बाहिया गहौ ना मै तो नार पराये घर की मेरे भरौसे गुपाल रहौ ना जो तुम मेरी बहियां धरत हो नयन जोर मेरे प्राण हरौ ना बृंदाबन की कुंजगली में रीति छोड अनरीति करौ ना मीर के प्रभु गिरिधर नागर चरणकमल चित टारे टरौ ना जावा दे गुमानी कृष्ण म्हांरे घर काम छे थें हो लंगर नंद महर के व्रजबरसाने म्हांरो गाम छे जानो नहीं तो पूंछ लीजो श्रीराधा म्हारो नाम छे मीर के प्रभु गिरिधर नागर नाम थांको बदनाम छे मीरेची सगळी कवने ही एक प्रकारची आर्त विनवणीच असल्याने ती खुप लवकर तोंडात रुळतात. मनाला भावतात. तिच्या कवनात त्या गोपालाचे वर्णन असते, त्याच्याविषयी लडिवाळ तक्रार असते. तिच्यासाठी तिचा कृष्ण सार्‍या आसमंतात सामावलेला आहे. पशु-पक्ष्यांच्या किलबिलीत तिला कृष्णाची मुरली ऐकु येते. ऋषीमुनींच्या मंत्रपाठात तिला कृष्ण जाणवतो. गोहनें गुपाल फिरूं ऐसी आवत मन में अवलोकत बारिज बदन बिबस भई तन मन में मुरली कर लकुट लेऊं पीर बसन धारुं काछी गोप भेष मुकुट गोधन संग चारूं हम भई गुलहामलता वृंदावनरैना पसु पंछी मर्कट मुनी श्रवन सुनत बैना गुरुजन कठिन कानि कासों री कहिए मीरा प्रभु गिरिधर मिली ऐसे ही रहिए ! तर कधी हिच मीरा विरहाने व्याकुळ होते. काय वाट्टेल ते करा पण आपल्या चरणी स्थान द्या अशी प्रभुचरणी विनंती करते. तुम सुनो दयाल म्हांरी अरजी भौसागर में बही जात हूं काढो तो थांरी मरजी यो संसार सगो नही कोइ सांचा रघुवरजी मातपिता और कुटुंबकबीला सब मतलब के गरजी मीरा के प्रभु अरजी सुन लो चरण लगाओ थांरी मरजी!! सखी रीं मोहिं लाज बैरन भई चलत लाल गोपाल के संग काहे नाहीं गई कठिन क्रूर अक्रूर आयो साजी रथ कहं नई रथ चढाय गोपाल लैगो हाथ मीजत रई कठिन छाती स्याम बिछुरत बिदरि क्युं ना गई दासी मीरा लाल गिरिधर बिरह तें तन तई !! मै बिरहणी बैठी जागूं जगत सब सोवै री आली बिरहणी बैठी रंगमहल में मोतीयन की लड पोवै इक बिरहिणी हम ऐसी देखी अंसुवन की माला पोवै तारा गिन गिन रैण बिहानी सुख की घडी कब आवै मीरा के प्रभु गिरिधर नागर मिलके बिछुड न जावै !! 'मीरा' हे खरोखर एक अजब रसायन आहे. त्याग, समर्पण, निष्ठा, प्रेम या गुणांचे आदर्श उदाहरण. मीरेचे जीवन अनेक अद्भुत घटनांनी भरलेले आहे. मीरेच्या आयुष्याला, तिच्या कहाणीला उठाव देण्यासाठी बहुतेक कथाकारांनी तिच्या कथेत अनेक चमत्कारही घुसडलेले दिसुन येतात. पण खरेतर मीरेचे जीवन इतके स्वच्छ आणि शुद्ध आहे की त्यात चमत्कारांना जागाच नाही. स्वच्छ पाण्याप्रमाणे तिचे जीवन पारदर्शक आहे. इथे लपवण्यासारखे काही नाही. प्रेम आणि निष्ठा हे तिच्या साधनेचे, तिच्या आयुष्याचे मुलभुत घटक आहे. मीरेची साधना प्रकट आहे. तिचा पदांमध्ये भक्तीरस ओथंबून वाहतो आहे. पदांमध्ये श्रुंगाराचा भावही आहे पण नटवेपणा नाही. मीरेचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य म्हणजे तिच्या पदांमध्ये काव्यत्मकता असली तरी प्रेमभक्तीच्या बारकाव्यांत ती शिरत नाही. तिची पदे भक्तिरसपुर्ण असली तरी त्यात कसलीही कृत्रिमता नाही. सच्ची भावना, त्यांचे पावित्र्य या दोन्ही गोष्टी मीरेमध्ये काठोकाठ भरलेल्या आहेत आणि त्या तिच्या काव्यातुन कायम भेटत राहतात. त्यामुळे आपोआपच एका सनातन राजघराण्यात जन्मलेली, वाढलेली ही राजकन्या तथाकथित रुढी परंपरांच्या चौकटीत न अडकता त्यापेक्षाही मोठी बनुन जाते. कृष्णमयि म्हणवता म्हणवता स्वत:च कृष्ण बनून जाते. मै तो राजी भई मेरे मन में मोहिं पिया मिले इक छन में पिया मिल्या मोहिं किरपा कीन्हिं दीदार दिखाया हरिने सतगुरू शब्द लखाया अंसरी ध्यान लगाया धुन में मीरा के प्रभु गिरिधर नागर मगन भई मेरें मनमें..... मगन भई मेरें मनमें.....!!! संदर्भ : काव्यसंग्रह - 'मीरा' - श्री. मंगेश पाडगावकर मी मराठी दिवाळी अंकात पुर्वप्रकाशित विशाल कुलकर्णी. पुणे. .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 16267 views

💬 प्रतिसाद (52)
म
मांत्रिक Wed, 09/16/2015 - 13:40 नवीन
ते ज्ञानेश्वरांनी आत्महत्या केली म्हणणारे तुम्हीच वाटतं? तुम्ही पण चांगलेच एकांगी आहात मग. असो.
  • Log in or register to post comments
म
मारवा Wed, 09/16/2015 - 15:20 नवीन
विशाल कुलकर्णींनी मीरेची जी एक बाजु फोकस करुन दाखवलेली आहे ती सुंदर आहे. कुठली बाजु फोकस करावी हा त्यांचा अधिकार आहे. मी त्यांच्या शैली चा चाहता आहे. जर त्यांनी दुसरी बाजु निवडली असती तर त्यांनी किरण नगरकर पेक्षा ही सुंदर रीतीने ककल्ड ची व्यथा मांडली असती असे सुचवायचे होते. अर्थात जनरीतीत आपण बोलतो तसे उदाहरण अशी पत्नी लाभली असती तर असे म्हणालो ते अर्थातच हायपोथेटीकल आहे. एक रीत आहे बोलण्याची शब्दशः खर नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 16 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 21 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा