गुरुजिंचे भावं विश्व! भाग- १९
Book traversal links for गुरुजिंचे भावं विश्व! भाग- १९
(या मागिल भागापासून सांधा जरा बदलला गेला असल्यामुळेच ,नविन भाग लिहायला हा बराच वेळ-गेलेला आहे.त्याबद्दल प्रथमच क्षमा मागतो.. आणि पुढे वाचायची अगत्यपूर्वक विनंती करतो. :) )
मागिल भाग- १८
याला कारण असं की आमच्या काकाचा "माणूस चुकतो" ह्या घटनेवर जबरदस्त विश्वास होता. वास्तविक कोकणातल्या एका छोट्या खेड्यात कुठल्याच प्रकारचं फारसं शिक्षण न झालेला हा माणूस. पण त्याचा स्वतःचा एक असा काहि कार्यक्रम त्याच्या जीवनक्रमात लागलेला आणि बहरत गेलेला होता,की हल्लीच्या व्यक्तिमत्व विकास वाल्यांनी ह्या असल्याच लोकांच्या जिवनपटांवरून स्वतःचे कार्यक्रम बेतलेले आहेत की काय? अशी दाट शंका यावी!पुढे चालू.... ====================== वर्ष दोन वर्ष पुढे सरकली ,आणि मी माझ्या आवडिच्या विषयात म्हणजे दर इयत्तेत एकदा नापास होण्यात पास होऊ लागलो. प्रथम पाचविला दणका खाल्ला,तेंव्हा 'नसेल झेपलं या वर्षी' म्हणून जवळ जवळ सगळ्यांनीच दुर्लक्ष केलेलं होतं. पण सखाराम काका मात्र चिडला नाही तरी यावर लक्ष ठेऊन होता. मूळचा गुप्तहेरच तो! हतातल्या त्या ब्याट्रीनी तो अंधारातली जनावरं जशी एका फ्लॅश मधे कोण/कुठची? हे ओळखायचा.तशीच बारिक आणि शोधक नजर त्याला माणसांचे अंगिभूत गुण आणि सवई तपासण्यात सहज लाभलेली होती. त्यामुळे मी पाचवीला एकदा आणि सहावीतून सुटून..सातवीला सलग दुसर्यांदा हापटल्यावर माझ्या आयशी पासून ते मावशी पर्यंत आणि वडलांपासून ते (हा काका वगळता) सगळ्या काका आणि अत्यांपर्यंत आपल्या कुटुंबावर काहितरी सावट आलय. अशी भावना झालेली होती. काकानी ,घरातल्या सगळ्यांना ''मला हात लावायचा नाही!'' ,अशी सख्त ताकिद दिलेली असल्यामुळे..मी तेंव्हा आईच्या रागानी पाठीत घातलेल्या कड्क चार धपाट्यां शिवाय कुणाचाही मार खाल्लेला नव्हता. रिझल्ट नंतरचे एक/दोन दिवस सुन्नावस्थेत गेले आणि मग काकानी काहि घडलेची नाही या आविर्भावात मला बैलगाडीत बसवून धा कि.मि.वरच्या तालुक्याच्या गावी नेले. जाताना गप्प .. तिकडे गेल्यावर त्याची पोस्टातल्या कसल्याश्या कागदपत्रांची चौकशी वगैरे जुजबि काम झाल्यावर मला तो व्हिडिओ दाखवायला घेऊन गेला. मी ही खुश्श झालो..तो दिड रुपयातला अख्खा शिनेमा! नंतर बंदरावरचा..उलथन्यानी पाव कापून चटणी लावलेला वडापाव,मग पेप्शी..एव्हढं सगळ मिळाल्यावर माझी गाडी ट्रॅक्टरच्या वेगानी पळायला लागली. आणि याची चाहुल लागली ,तशी काकानी मला हळूच पहिली गुगली टाकली.. "आत्मू... तुला काय काय करायला आवडतं रे?" मी:- नक्कल करायला आवडते..पण आई करु नाय देत..मारते सारखी सारखी! :( काका:- तिला बघतो हां मी... पण तू गाणी म्हणतोस ना गाणी..? मग..मगाचच्या पिच्चरातलं म्हण ना एक! .. मी:- (आनंदून) पर्बत के उस पार..पर्बत के इस पार.... ढुंढती छम छम छम .. मेरी पायल की झंकार ...आ...आ...आ..आ...आ... ,ओ..ओ..ओ..ओ... ढुंढती छम छम छम .. मेरी पायल की झंकार ... काका:- (मनमुराद हसत..) छान हो.. आत्मू कि शोर कुमार। बायांची गाणी पण चांगली गातोस हां..फक्त ते ढुंढती... नैय्ये मेल्या.... गूँज उठी आहे... घरी जाईपर्यंत म्हण बोटे घालून मी:- ह्हूं..!माझं कुठे चुकलं त्यात...? तसंच्च ऐकू आलेलं ना? :( काका:- होय का ? मग आता जाता जाता गाण्यांची पुस्तक घेऊ हां आपण! बघू किती पाठ म्हणातायस ती? क्का..य? मी:- चालेल.. मग त्या दिवशी मी घरी जाई पर्यंत त्या पर्बता पासून ते तोहफा...तोहफा...तोहफा...तोहफा...लाया...लाया...लाया...लाया... पर्यंत चांगली चार/पाच गाणी काकाला झोपाळ्यावर बसल्या बसल्या पाठ म्हणून दाखवली. आईला आणि घरातल्यांना हा नेमका काय प्रकार चाल्लाय यांची काहिच कल्पना येत नव्हती. आज्जी तर पडवीतनच काकावर ओरडली..."अरे सख्या ..तो आत्मू नापास झालाय आणि त्याला दहा वेळा रामरक्षा म्हणवायची सोडून ,ही शिनेमातली गाणी कशाला घोकून घेतोयस त्याच्या कडून्???,तुझंही डोकं फिरलं कि काsssय? यावर काका मला 'तिथेच' बसायची ऑर्डर देऊन्,या सगळ्यांच्यात - आत गेला .आणि जाता जाता आईला "त्याच्या बापसाला काय समजवायचे ते मी समजावतो" असं काहिसं बोलत ,हतात दुध आणायची क्याटली घेऊन "जेवायला उशिरा येइन मी आज" असं म्हणत.. माझ्याकडे पहात ,गमतिनी डोळे मिचकवून चपला घालून आंगणयातून सायकलला टांग मारून अदृष्य झालाही!... मला मात्र त्या दिवशी रात्री झोपताना, आई मधुनच काहिसं रडत तर कधी आनंदुन जात, माझ्या डोक्यावरनं हात फिरवत झोपि का गेली?.. ते..., काहि कळलं नाही. होता होता सुट्टिचा काळ संपला,आणि माझी शाळा सुरु व्हायच्या दोन दिवस आधी काकानी मला वाडित गाठलन. "अरे आत्मूsss .. हिकडे ये आधी" मी आपला नेहमी सारखा 'काकानी बोलावलय्,म्हणजे काहिच प्रॉब्लेम नसणार ' अश्या अंदाजानी गेलो. तर काका मला म्हणाला " हे बघ आत्मू ..तुला ते शाळा वगैरे आवडत नाही की नाही?" मी:- "हो..नाहिच्च आवडत." काका:- "हम्म्म्म्म...म्हणूनच तुझ्यासाठी मी आपल्या साखरदांड्या'त दुसरी शाळा शोधलीये..उद्या आपण तिकडे जाऊ या ... येशील ना? " मी काकानी शोधलीये, म्हणजे.. 'मला न आवडणारी नक्किच नसणार'.. इतकच मनात आल्यामुळे "हो!" म्हणालो. आणि मग मला नंतर कळलं , की काकानी माझी बदली वेदपाठशाळा नावाच्या दुसर्या वेगळ्याच जगात केलीये. त्यावेळी त्यातलं बर वाइट काय? इत्यादी काहिही कळायचं वय आणि बुद्धी असण्याचा प्रश्नच नव्हता. पण ते माझ्या मनाविरुद्ध नव्हतं! आणि काकाच्या घरच्यांना पटवण्याच्या डायलॉग मधल्या महत्वाच्या वाक्या नुसार ते -मला जमणारं होतं. आणि मग काय विचारता माझा तो घर-सोडण्याच्या दिवसाचा शीन!? ...अगदी आधुनिक टिव्हि मालिकेत शोभावा असाच एपिसोड तो!. मला एकिकडे लिहायच्या कट्कटीच्या अभ्यासातून सुटका झाल्याचा आनंद ,तर दुसरीकडे कायम पंचा नेसावा लागणार आणि शेंडी(टकला सह!) ठेवावी लागणार अश्या अनेक औत्सुक्यपूर्ण गोष्टींचं भययुक्त दु:ख्ख किंवा दुख्ख युक्त भय! मला दुपारी २ च्या गाडीनी काका तिकडे नेऊन सोडणार..म्हटल्यावर सकाळी ६ वाजता उठल्यापासून आईच्या डोळ्याला पाणी! सारखं मला जवळ घे..रड..असले प्रकार सुरु झाले.काका तर आईला बोलल्ला ही त्यावरन :- "अगो... तुझ्या कार्ट्याला वनं-वासात नैय्ये हो सोडत मी! कायतरी विश्वास धरत जा दुसर्या माणसाचा! हे एव्हढं वैट वाटणं बरं नाही!..मग तिकडे राहिल का तो..पहिला महिना तरी!!! शाळेतल्या सुट्टी सारखा दिवाळी/मे महिन्याला परतही येणारे तो. कायमचा नै चाल्ला काहि गुरु-गृही!" या त्याच्या ओरड्याला आईनी सहन केलं. पण आज्जी आगदी पारंपारिक डायलॉगांचा भाता त्याच्यावर रिकामा करायला सरसावली "हो.....तुला कशाला मेल्या कळतील बायकांची दुख्ख!?" "पोटचं पोर असं जंगलात गाय सुधा सोडत नाही!" "येणार असला सहा सहा महिन्याला घरी म्हणून काय कौतुकं सांगतोस?" "सहा महिने म्हणजे काय चेष्टा आहे का?" "शिवाय आपल्यापेक्षा खेडं-असलेलं गाव ते!" "तिथे काळजी कोण घेइल पोराची!???- असं वाट्णार नैss?" दगड्या काळजाचा मेला पुरुष तू,तुला काय समजायचं त्यातलं?" यावर काकानी आज्जीसमोर (युद्धात पड खाल्लेल्या मुद्रेनी) एक साष्टांग लोटांगण घातलं... आणि आईपासून सगळी जणं तो प्रसंग पाहून,त्या तसल्या रडव्या चेहेर्यानीच खळ्ळकन हसली. दुपारची जेवणं झाली. मला जेवताना अगदी यथेच्छ.. उकडीचे मोदक आणि तिकडे गेल्यावर संध्याकाळला काही..म्हणून पार्सल, असे देत माझी बोळवणीची तयारी झाली. मी "देवांना आणि सग्ळ्या मोठ्यांना नमस्कार कर!" अश्या आईच्या हुंदकेयुक्त आज्ञेचं शिरसावंद्य पालन केलं आणि काकाबरोबर पाठिला ती प्ल्याश्टिकच्या कापडाची,कपड्यांची पिशवी घेऊन ..सायकलच्या मागे क्यारियरवर बसलो सुद्धा! काकानी घरासमोरच्या रस्त्यानी सायकल येश्टीश्टॉपच्या दिशेनी हाणायला घेतली..आणि आई अंगणातून बाहेर..झरझर चार पवलं आमच्या मागे येऊन.. तितक्याच वेगानी पदर डोळ्याला घेत पुन्हा घरात गेली!... मी मात्र..."चेहेर्यावर तिकडे जायचा आनंद, आणि मनात आईचा तो टाटा करायला आलेला चेहेरा".. घेऊन.... त्या मला आवड असलेल्या नव्या जगाच्या दिशेनी निघालो..ते पुन्हा सहा महिने परत न येण्यासाठीच! काकानी मग मला , रितसर साखरदांड्याच्या वेदंपाठशाळेत नेलं. आणि पहिल्यांदा तिथे असलेल्या मुख्य गुरुजिंच्या पायावर घातलं. गेल्या गेल्या हा प्रसंग तिथे माझ्या आधी आलेल्या इतर विद्यार्थ्यांना नवा नव्हताच! पण ते मात्र माझ्याकडे.. "आला हा (आपल्यात!) अजुन एक.." अश्या नजरेनी पाहात होते. मग पहिला एक तास गेल्यावर मला काकानीच "आता हे नाही! ..-हे कपडे घालायचे!" म्हणून माझ्या भोवती पंचा गुंडाळून त्या शर्टंचड्डीतुन मला सोडवलं. करगोट्याला अगदी चारबोटं रुंद अशी लंगोटीही घातली. आणि आता पंचा गोल नेसवावा की काष्टी मारून? या विचारात तो असताना,तेथील एका शिनियर विद्यार्थ्यानी...हातातली छडी बाजुला ठेवत .. काकाला " बघतो मी ते,द्या इकडे त्याला" असा काकाला काहिसा जरबयुक्त आदेश दिला. एव्हढं सगळं होईपर्यंत मुख्य गुरुजी आले. आणि माझ्या एकंदर तिथल्या शिक्षणाच्या योग्यते बद्दल काकाशी बोलायला लागले. मग काकानीही त्यांना माझी पाठांतरातली प्रथमा - सांगितली. आणि त्यावर आमच्या गुरुजिंनी स्मितहास्य करीत, मी,काका आणि तेथिल बाकिच्या विद्यार्थ्यांना.. "जेवायला चला" असे खुणेनीच सांगितले. ती रात्र काका पाठशाळेतच थांबला. आणि दुसर्या दिवशी सकाळी..मला त्याच गावातील न्हाव्याकडे घेऊन 'नी...ट गुळगुळीत गोटा करवून' (शेंडी सह!) गुरुजिंच्या हवाली करता झाला. आणि त्यानंतर काहि वेळातच मला प्रेमानी जवळ घेऊन... "नीट रहां हं ..मी आता पुढच्या पौर्णिमेला येणारे..तेंव्हा येताना तुला ती मोठ्ठ्यातली-क्याडबरी आण्णारे!" असं म्हणून आमच्या पाठशाळेतून , जायला निघाला...मी मात्र आता अत्यंत दाटलेल्या गळ्यानी, "काका...येताना क्याटबरी नक्को..गाण्याची पुस्तकंsssss!!!!" असं उंबर्यातून ओरडलो, आणि टच्च भरलेल्या डोळ्यांनी ..काका दिसेनासा झाल्यावर गप्प चेहेरा करून ..गुरुजिं समोर त्या लालमातिच्या ग्गार भिंतीला पाठ टेकवून बसलो! ======================= क्रमशः ....
कारण हे सगळं तुमच्याबद्दल आहे.
>>> कृपया गैरसमज नको. :) ह्यातले काहीही व्यक्तिश: माझे किंवा माझ्यावर बेतलेले नाही. हे आंम्हा भटजी लोकांचे प्रातिनिधिक आत्मकथन आहे. जे मी ललितलेखानाच्या आधारे मांडत आहे. :)