यापैकी कोणीही नाही! NOTA
लोकसभा निवडणुका लवकरच येत आहेत आणि यावेळी पहिल्यांदाच मतदान करताना आपल्याला मतदान पत्रिकेवर 'यापैकी कोणीही नाही' हा पर्याय अधिकृतपणे निवडण्याची संधी मिळणार आहे.
२००९ मध्ये निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार त्यांची (निवडणुक आयोगाची) मतदान पत्रिकेवर 'यापैकी कोणीही नाही' हा पर्याय देण्याची तयारी आहे, जे सरकार सहसा मान्य करत नाही. २७ सप्टेंबर २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मतदान पत्रिकेवर मतदारांसाठी 'यापैकी कोणीही नाही' हा पर्याय असणे गरजेचे आहे, ज्यामुळे मतदारांचा निवडणुक प्रक्रियेतला सहभाग वाढु शकतो. न्यायमुर्ती पी सदासिवम यांच्या खंडपिठाच्या म्हणण्यानुसार "यामुळे निवडणुक प्रक्रियेत नियमितता येईल आणि राजकीय पक्षांना योग्य उमेदवार देणे भाग पडेल. लोकशाहीमध्ये पर्याय असणे गरजेचे आहे आणि यामुळे मतदारांना नकारात्मक मताचा अधिकार मिळेल."
सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक आयोगाला दिलेल्या आदेशानुसार मतदान पत्रिकेवर 'यापैकी कोणीही नाही' हा पर्याय देणे अनिवार्य केले आहे. निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे. निवडणुक आयोगाच्या माजी प्रमुखाच्या म्हणण्यानुसार नकारात्मक मतदाना पेक्षा हे भिन्न आहे. निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार "NOTA' अर्थात 'यापैकी कोणीही नाही' हा पर्याय निरुपयोगी मत 'invalid vote' म्हणुन गणले जाईल.
संदर्भ:-
१
२
म्हणजे मतदानपत्रिकेवर इतर उमेदवारांबरोबर शेवटी 'यापैकी कोणीही नाही' हा पर्याय निवडणुक आयोग आपल्याला देणार आहे.
आता हे वाचा.
समजा, एखाद्या मतदार संघात फक्त (अ, ब, क) असे ३ उमेदवार आहेत आणि 'यापैकी कोणीही नाही' हा (ड) चौथा उमेदवार! अ उमेदवाराला २०%, ब उमेदवाराला ३०%, क उमेदवाराला १०% आणि 'यापैकी कोणीही नाही' ला ४०% मते मिळाली आहेत. निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 'जर यापैकी कोणीही नाही या पर्यायाला सर्वात जास्त मते मिळाली तर बाकीच्या उमेदवारांपैकी ज्याला जास्त मते मिळाली असतील तो उमेदवार विजयी घोषित केला जाईल.
अरे काय फालतुपणा आहे हा? मग कशाला 'यापैकी कोणीही नाही' हा पर्याय मतदान पत्रिकेवर दिला?
वरील उदाहरणात जर सर्वात जास्त ४०% लोकांनी 'यापैकी कोणीही नाही' हा पर्याय निवडला आहे तर ३०% मते मिळवणाऱ्या ब उमेदवाराला विजयी घोषित करणार! हा कुठला न्याय?
म्हणजे, जर मला उपलब्ध उमेदवारांपैकी कोणीही उमेदवार योग्य वाटत नसेल आणि मी 'यापैकी कोणीही नाही' हा पर्याय निवडला तर माझे मत 'निरुपयोगी मत' म्हणुन धरले जाणार आहे! मग कशाला करू मी मतदान? निवडणुक आयोग अप्रत्यक्षरित्या मला 'यापैकी कोणीही नाही' हा पर्याय निवडण्याची संधी न देता इतर उपलब्ध उमेदवारांपैकी एक निवडण्याची सक्ती करत आहे.
ज्या मतदार संघात 'यापैकी कोणीही नाही' या पर्यायाला जास्त मते मिळाली असतिल तेथे फेरमतदान घेऊन आधीच्या उमेदवारांना निवडणुक प्रक्रियेतुन बाद करणे आणि यापुढे जाऊन या उमेदवारांच्या नातेवाईकांना / सग्या सोयऱ्यांना निवडणुक लढवण्याची संधी मिळणार नाही हे पहाणे गरजेचे नाही आहे का?