पुन्हा सगुणोपासना
प्रथम सर्व मिपाकरांना मिपावर हे वर्ष वाद-संवादाचे आणि बौद्धिक आनंदाचे जावो ही शुभेच्छा. मिपालाही शुभेच्छा. या वर्षी सुद्धा अनेक शतकी-द्विशतकी धागे निघोत, साद-प्रतिसादांनी मिपा समृद्ध होवो.
तर पुन्हा सगुणोपासना. ही सगुणोपासना आम्हांला इतकी आवश्यक का वाटते? आत्मभान हा सोपा मार्ग आम्हांला का नको?
आत्मज्ञान ह्या शब्दाच्या अर्थाविषयी पारमार्थिक आणि ऐहिक अशा दोन्ही पातळ्यांवर विवेचन करता येइल. सगुणोपासनेच्या आवश्यकतेचीसुद्धा दोन कारणे सांगितली जातात. एक म्हणजे भोळ्याभाबड्या जनतेला निर्गुण असे काही कल्पिणे कठिण जाते आणि दुसरे म्हणजे सगुणोपासना हे एक साधन आहे, पायऱ्या आहेत, आणखी कुठेतरी पोचण्यासाठीच्या.
भोळीभाबडी जनता म्हणजे तरी कोण? आपण आंतरजालावर वादविवाद करू शकणारे प्रज्ञावंत खरोखरच भोळेभाबडे आहोत का? की तिसऱ्याच कोणाच्यातरी वतीने त्यांना गृहीत धरून आम्ही बोलतो आहोत? सगुणोपासना हे साधन मानता मानता साध्यच होऊन बसले आहे हे आमच्या लक्षात का येत नाही आहे? अमुक वेळा पारायणाचा, अमुक हजार नामजपाचा, वेगवेगळ्या नेमांचा संकल्प सोडायचा, आणि तो सिद्ध करायचा, असेच चालते ना? आणि ह्याचेच अवडंबर माजते ना? गणेशचतुर्थीसाठी एकच दिवस रजा असते. उत्सवाच्या उरलेल्या दिवसांत घाईघाईने पूजा आटपायची, मंत्रोच्चार, अथर्वशीर्ष, आरती, नैवेद्य सारे उरकायचे आणि 'हुश्श! झाले एकदाचे' म्हणून बाकीच्या कामाला लागायचे असेच बहुतेक सर्वत्र असते ना? म्हणजे पूजा-उपचार हेच साध्य. अष्टसात्त्विक भाव जागृत होतच नाहीत. कारण ते साध्य नसतेच.
विपश्यनेमध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करावयास सांगतात. दर क्षणीचा श्वास ही किती साधी गोष्ट. पण आपल्याला तिची जाणीव नसते. आपल्या देहव्यवहाराची, आपली स्वतःची जाणीव नसते. श्वासाचा कोहं-सोहं नित्य चाललेला असतो. हृदयाचा अनाहत नादही सदैव चालू असतो. हा आघाताविना होणारा नाद आम्ही ऐकतो का? सगळे सांगतात,' दिलकी सुनो'. आम्ही ऐकतो का? "नादबिंदू के पीछे जमया पानी..."(य.कु.ची आठवण येतेय) नादाचा केंद्रबिंदू म्हणजे हृदय बाष्पगद्गद झालेय. सद्गदित झालेय. अगदी सहज अवस्था. हे 'स्व'चे 'स्व'शी अनुसंधान कायम राखायचे, 'स्व'च्या आनंदात, निजानंदात तल्लीन व्हायचे. त्यासाठी कोणत्याच पायऱ्यांची आवश्यकता नाही. निज म्हणजे तरी काय? आत्म, स्व, निज सारे एकच. अध्यात्म म्हणजे आधी आत्म असे विनोदाने म्हणतात. पण अधि आत्म तर आहे? "आत्मा वा अरे द्रष्टव्यः, श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यः| आत्मनो वा अरे दर्शनेन, श्रवणेन, मत्या विज्ञानेन इदं सर्वं विदितम।" अरे, हा आत्मा पाहावा, ऐकावा, त्याचे मनन करावे. त्याच्या दर्शनाने, श्रवणाने आणि बुद्धीने जाणण्याने बाकी सर्व जाणले जाते. आत्मज्ञान हेच अंतिम ज्ञान होय. आपण हा स्व पाहत नाही. त्याला अनेक अवगुंठनांआड, मुखवट्यांआड लपवतो. सर्व मुखवटे, पटले, आवरणे दूर केली की स्व-रूप कळते. 'घूंघट के पट खोल रे, तोहे पिया मिलेंगे'. निखळ स्व-रूप हेच पिया आणि प्रेयसीही तीच. अद्वैतच आहे. आपण कशासाठी बाहेर शोधतो? एकदा का स्व-रूपाची ही जाणीव स्थिर झाली की सगळे लख्ख दिसू लागते असे संत सांगतात. 'कुणाचे हे घर? हा देह कवणाचा? आत्मा राम त्याचा, तोचि जाणे'. रम चा प्रधान अर्थ आनंदी असणे असा आहे. राम म्हणजे आनंददायक, रम्य, सुंदर. जिथे स्वतःच्या ठायी नित्य आनंद आहे, (तिथे) त्याने हे सर्व जाणले.
आता या सर्व प्रक्रियेमध्ये मूर्तिपूजा, स्तोत्र, आरती यांचे स्थान कोणते? माणसामधला विवेक जागवणे हे साध्य या उपायांनी कधी तरी साध्य होईल का? उलट ती जनता एका गुंगीत राहील. आपण पूजाअर्चा करतो आहोत, यात्रा, व्रतेवैकल्ये करतो आहोत, काहीही करायचे बाकी ठेवीत नाही आहोत, ही ती गुंगी.
ही भोळीभाबडी जनता साध्या आजारावरच्या औषधासाठी डॉक्टरकडे गेल्यावर साध्या,स्वस्त गोळ्यांनी समाधान पावत नाही . तिला महागडे इंजेक्शन हवे असते. जरूर नसताही लोकाग्रहास्तव इंजेक्शन देणारा डॉक्टर मोठा. साध्या गोळ्या देणारे छोटे आणि खोटे. ही जनता एका डॉक्टरचे ऐकत नाही, मग अनेक डॉक्टरांनी 'इंजेक्शनची जरूरी नाही' असे पुन्हा पुन्हा सांगायला नको का? (हे एक उदाहरण)
भोळ्याभाबड्या जनतेला उच्चज्ञानप्राप्तीचा मार्ग सोपा व्हावा म्हणून सगुणोपासना चालू राहावी असे आपण म्हणतो तेव्हा सगुणोपासना ही अडाणी जनतेला दिलेली मुभा, सूट, सवलत आहे हे मान्य करतो. एके काळी अशी सवलत असेलही, पण आज दीडदोन हजार वर्षांनंतरही ती चालू राहावी का? शिवाय या सवलतीचा आज दुरुपयोग होऊ लागलाय. पाठ, सप्ताह, यज्ञ, तीर्थयात्रा यासाठी आज प्रायोजक मिळू लागलेत. हे आयते चालून आलेले प्रायोजकत्व राजकीय पक्षांनी न स्वीकारले तर नवल. सध्या मोफत किंवा अत्यल्प खर्चात (उदाहरणार्थ) शिरडी यात्रा घडवण्याची टूम आहे. मोफत बसगाड्या, मोफत निवास, मोफत जेवण. नंतर त्या बदल्यात काहीतरी मिळायचे/मिळवायचे असतेच. लोकांना गुंगीत ठेवण्याचा, मिंधे राखण्याचा, 'जैसे थे' राखण्याचा हा एक डाव आहे. इतरही अनेक क्षेत्रात असे होते पण तिथे बदलासाठी निवडणुका, पोलिस, कायदे इ. अनेक प्रकार उपलब्ध असतात. इथे मात्र विवेकाने मतपरिवर्तन हा एकच मार्ग.
जनता गुंगीत राहणे हे काही जणांच्या फायद्याचे ठरू शकते हा एक लहानसा आणि गौण मुद्दा आहे. मुख्य मुद्दा हा आहे की जनतेने सदैव भोळे-भाबडे का राहावे? भोळेभाबडे असणे/रहाणे ही सगुणोपासनेसाठी पळवाट बनते आहे का? 'आम्ही बुवा अडाणी माणसे. आम्हाला आत्मज्ञान वगैरे काही समजत नाही' असा आम्ही सुशिक्षित लोक आव आणतो आहोत का? की वेड पांघरतो आहोत? विवेकाने येणारी प्रेम, त्याग आणि विश्वास ही त्रयी आम्हाला रोजच्या जीवनात नको आहे का?
व्यावहारिक पातळीवरही हे आत्मभान आपल्याला कितीतरी मदत करू शकते. सवयीमुळे घडणाऱ्या क्षुल्लक अशा वाईट गोष्टी आपण टाळू शकतो. आपण काय करतो आहोत त्याची जाणीव असली तर रस्त्यात थुंकणे, कचरा टाकणे, विनातिकीट प्रवास करणे, भेसळ करणे, लाच देणे/घेणे, काम न करणे या गोष्टी आपल्या हातून होणार नाहीत. प्रत्येक व्यक्तीचे आत्मभान जागृत होऊन एक 'राष्ट्रभान' बनू शकते. एक कल्याणकारी व्यवस्था निर्माण होऊ शकते.
हा अखंड सावधानतेचा सोपा मार्ग आपणां प्रज्ञावंतांना का नको?
ता. क. : या विषयावर सध्यातरी आणखी धागे काढणार नाही. मिपाकरांनी आश्वस्त राहावे.!
(वेळ झाल्यावर आणि इच्छा असल्यास)वेळ ही नाही आणि इच्छा तर अजिबात नाही,तस्मात आमचा पास ! आम्ही आमच्या अज्ञानात अत्यंत सुखी आहोत आपण आपले " देखो" चालू ठेवावे. आमचे काहीही म्हणणे नाही! एक शंका: "ग्यानी क्या टंकता है उसे पढो" असे ओशो नी म्हंटले आहे का ? तसे असल्यास जरुर सांगावे आम्ही आपले टंकन अतिशय लक्षपूर्वक वाचू. जमल्यास दोन्ही हात जोडून स्व-कडे बघत बघत अतिशय भक्तिभावाने .. पण वाचायचे असल्याने डोळे मिट्ता येणार नाहीत, ते चालेल का ?अहो पक्के लबाड हो ते!प्यार्या.. सांभाळून हां.. भारतात परत येणार हैस ना..??लीमाऊ? अहो पक्की भांदकुदळ आहे ती.चेष्टेत म्हणाला असलास तरी लै लै वेळा सहमत!!!! +९९९९९९९^९९९९९९९९९९९