Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

दिल्लीतील सत्तापालट म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात?

ग
गंगाधर मुटे
Sun, 12/29/2013 - 06:28
🗣 89 प्रतिसाद
दिल्लीतील सत्तापालट म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात?

       अपेक्षेप्रमाणे दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होऊन अरविंद केजरीवालांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला. त्याचबरोबर विधानसभेच्या त्रिशंकू स्थितीमुळे दिल्लीत नव्याने निवडणुका होण्याची शक्यता काही काळापुरती का होईना पण संपल्याचे संकेत मिळत आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे चांगले संकेत मानायला हवे. बदलती राजकीय स्थिती आणि प्रादेशिक पक्षांचा वाढता प्रभाव यामुळे देशात वारंवार त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणे आता यापुढे नित्याचेच ठरणार आहे. त्यावर वारंवार निवडणुका हा काही पर्याय असू शकत नाही. विभिन्न विचाराचे आणि प्रचंड राजकीय वैचारिक विरोधाभास असला तरी काही पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणे, हाच यावर एकमेव इलाज आहे. अशा बिकट प्रसंगी जर अपरिहार्यतेने विरोधाभासी पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करत असेल तर याला संधीसाधूपणा म्हणता येणार नाही.

       केजरीवाल मुख्यमंत्री झाल्याने आता त्यांना जनतेला दिलेले महागाई व कांद्याचे भाव वगळता अन्य अभिवचन पूर्ण करणे फारसे कठीण नाही, कदाचित शंभर टक्के यश मिळणार नाही पण एक पारदर्शक आणि "लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकांचे राज्य" असे म्हणण्याइतपत चांगले सरकार ते नक्कीच देऊ शकतात. त्यामुळे लोकाभिमुख राज्यकारभाराचा एक अत्यंत चांगला पायंडा पडण्यास सुरुवात होण्याची नक्कीच शक्यता आहे.

       मला अरविंद केजरीवालांच्या वागण्याच्या पद्धतीत, बोलण्यातील ढबीत आणि पेहरावाच्या स्टाइलमध्ये एक "महात्मा" दिसत होता. ही त्यांची नौटंकी की निसर्गदत्त गुणविषेशता हे काळाच्या ओघात स्पष्ट होईलच. पण सध्यातरी माझा भ्रमनिरासच झाला आहे कारण सत्तेच्या माध्यमातून लोकनेता होणे आजवर कुणालाच शक्य झाले नाही. केजरीवालांना शक्य होईल, हेही शक्य वाटत नाही त्यामुळे आता ’महात्मा’ व ’युगपुरुष’ होण्याची त्यांनी संधी गमावलीच आहे. मात्र त्यांना चांगला ’राजकारणी’ होता आले तर ती भारतीय लोकशाहीला कलाटणी देण्याची लोकाभिमुख सुरुवात ठरेल.

       केजरीवाल उत्साही आहे, मेहनती आहे आणि विषय समजून घेण्यासाठी अभ्यास करण्याची प्रवृत्ती आहे. सोबत साधी राहणी आणि निर्धोकपणा या त्यांच्या जमेच्या बाजू आहे. देश घडवण्यासाठी लागणारी कळकळ आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी परिणामास सामोरे जाण्याची तयारी आहे. मात्र त्यांचा धूर्तपणा यात सर्वात मोठा अडसर ठरेल असे मला वाटते. दिनांक १७/१२/२०१३ च्या फेसबुकवरील एका पोस्टमध्ये मी असे म्हटले होते की, "कोणाचा पाठिंबा घेणार नाही, कोणाला पाठिंबा देणार नाही" या डावपेचामागे भाजपाला सत्तेपासून अडवणे आणि विधानसभेच्या त्रिशंकू अवस्थेचे सर्व सूत्र संचलन आपल्या हातात घेणे, हा उद्देश केजरीवालांचा आहे, आणि नेमके तेच आज ते खरे झाले आहे. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर

       ’आप’ला २८ जागा मिळाल्याने देशातील जनतेच्या आशा पालवल्या होत्या. अरविंद केजरीवालांच्या रूपाने एक प्रामाणिक नेता देशाला मिळाल्याची भावना व्यक्त व्हायला लागली होती. दिल्लीतून सुसाट निघालेला अश्वमेघाचा घोडा आता भारताच्या खेड्यापाड्यापर्यंत घोडदौड करून भारतीय राजकारणाला एक खंबीर आणि स्वच्छ पर्याय उपलब्ध करून देईल, अशी शक्यता निर्माण व्हायला लागली होती. मात्र त्रिशंकू विधानसभेतून सत्तेचा मार्ग शोधण्यात केजरीवालांनी धूर्तपणाच्या ज्या तिरक्या चाली खेळल्यात, त्या चाली आणि कॉग्रेस व भाजपाच्या मुत्सद्देगिरीच्या तुलनेत धूर्तपणाच्या होत्या, यात मुत्सद्देगिरी खचितच नव्हती. त्रिशंकू विधानसभेत "आप" निर्णायक स्थितीत असताना आणि सरकार स्थापनेचे भवितव्य ’आप’च्या हातात एकवटले असताना ’आप’ची ही भूमिका लोकशाहीला पोषक नव्हती. आपची ही भूमिका प्रामाणिकपणाची नव्हती तर भाजपला रोखून स्वतःचे सरकार स्थापन करण्यायोग्य वातावरण निर्मिती करण्यासाठी खेळलेली ’आप’मतलबी व धूर्तपणाची खेळी होती, असे माझे स्पष्ट मत आहे.

       निवडणुकांच्या निकालानंतर भाजप सर्वात जास्त जागा जिंकून दिल्ली विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला होता. प्रचलित व्याख्येनुसार जनादेश भाजपला मिळालेला होता. भाजपने सरकार स्थापन करणे व इतर पक्षांनी त्यांना पाठिंबा देणे, हा सरळसोपा आणि प्रामाणिकपणाचा मार्ग होता. मात्र कॉग्रेसच्या मुत्सद्देगिरीने आणि केजरीवालांच्या धूर्तपणाने हा डाव उधळला गेला. याच कारणाने माझ्या नजरेत केजरीवालांचा प्रामाणिकपणा संशयाच्या भोवर्‍यात आला आहे. पण एवढ्याशा कारणाने त्यांच्या डोक्यावरील गांधीटोपीला गालबोट लागले, असे काही म्हणता येणार नाही. त्यांच्या डोक्यावर गांधीटोपी काँग्रेसवाल्यांच्या डोक्यावरील टोपीपेक्षा जास्त उठावून दिसते, हे सुद्धा तेवढेच खरे आहे.

       केजरीवालांना आणि भारतीय शोषित जनतेला अपेक्षित असलेले व्यवस्था परिवर्तन सत्ताप्राप्तीतून साध्य होण्याची शक्यता नाही. तरीही केजरीवाल सत्तेच्या मैदानात उतरले. आता सत्तेतूनही व्यवस्था परिवर्तन साध्य होऊ शकते हे सिद्ध करण्याची जबाबदारी केजरीवालांची आहे. नाहीतर भारतीय जनतेचा परिवर्तनवादी चळवळीवरीलच विश्वास डळमळीत होईल.

       सध्या देशात भ्रष्टाचारविरोधी वातावरण तापवण्यात केजरीवालांना आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला आल्यामुळे देशासमोरील एकमेव समस्या म्हणजे भ्रष्टाचार असे चित्र निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. या गदारोळात शेतमालाच्या भावाचा प्रश्न पार मागे ढकलला गेला आहे. तरीपण सध्यातरी देशात केजरीवाल वगळता राष्ट्रीय पातळीवर दुसरा कोणताही अन्य आशेचा किरण उपलब्ध नाही, त्यामुळे परिवर्तनवादी घटकांनी अरविंद केजरीवालांना सक्रिय समर्थन देण्याची सक्त गरज निर्माण झाली आहे. ही ऐतिहासिक संधी आपण गमावता कामा नये.

       महाराष्ट्रात आम आदमी पक्ष, शेतकरी संघटना, विदर्भ संयुक्त कृती समिती, काही रिपब्लिकन पक्ष व आणखी काही संघटना एकत्र आल्यास राज्यात एक ताकदवान दबावगट निर्माण होऊन व्यवस्था-परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकले जाऊ शकते, एवढी मला नक्कीच खात्री आहे.

                                                                                                                          - गंगाधर मुटे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 24210 views

🗣 चर्चा (89)
ब
बॅटमॅन Mon, 12/30/2013 - 22:35 नवीन
अहो केजरीवाल मिपा वाचतात. "जनलोकपाल विधेयक एक जलेबी है" असे त्यांचे वाक्य टीव्हीवर ऐकले तेव्हाच कळालं होतं ते. तो धागा इंचा-इंचाने वाचूनच त्यांनी त्यांची पॉलिसी तयार केलेली आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 01/01/2014 - 04:52 नवीन
ते मिपा वाचत असतील. पण तो धागा वाचून Kashmir is an intergral part of India हे तात्पर्य निघणं अवघड आहे. मला तर तो धागा वाचून भारतच काश्मिर मध्ये घुसखोर आहे असं वाटलं होतं.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 01/01/2014 - 08:09 नवीन
अहो ते "जलेबी" मुळे म्हणलो होतो. बाकी त्या ४७५ इंची धाग्यात नक्की कोण काय म्हणतंय तेच कळेना गेलं मायला =))
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 12/31/2013 - 06:44 नवीन
मोहल्ला सभांचे कामकाज कसे चालेल, त्या स्थानिक गोष्टींसाठीचा अर्थसंकल्प कसा ठरवतील/वापरतील आदी गोष्टींसाठी लागणार्‍या नवीन कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी केजरीवाल यांनी मध्य प्रदेशच्या भूतपूर्व मुख्य सचीव एस सी बेहेर यांना बोलावले आहे. हे बेहेर साहेब इकॉनॉमीक टाईम्सच्या बातमीप्रमाणे आजही दिग्विजय सिंग यांच्या खाजगी-अंतर्गत वर्तुळातील आहेत. अर्थात हा निव्वळ योगायोग आहे. ;)
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 12/31/2013 - 16:46 नवीन
प्रत्येक बाबतीत अगदीच मोहल्ल्ला सभा बोलावली पाहिजे असे नाही. उदा. काशमीर प्रश्नाचे काय करायचे याचे उत्तर कामकरी शेतकरी देणार नाही. त्यासाटी वेगळ्या वर्गाचा विचार घ्यावा लागेल. नुकतेच श्री जयंत नारळीकर यानी असे म्हटल्याचे वाचले आहे की " खगोल शास्त्रा" चा समावेश शिक्षणात करावा. या बाबतीत शिकणार्‍यांचा सल्ल्ला घ्यावा नारळीकर सरांचा नव्हे. उद्या पंडित जसराज म्हणतील शास्त्रीय संगीताचा समावेश अभ्यासक्रमात करावा. हमीद दाभोलकर म्हणतील अंधश्रद्धा न्रिर्मूलन शाळेत शिकवावे. हे बरोबर नाही. यासाठी चा सल्ला ते त्यांच्या सोयीप्रमाणे देत असतात. आपल्या देशात अशा तज्ञ लोकाना अकारण फारच महत्व आले आहे. मग हेलमेटची सक्ती जन्माला येते. व बारगळते. पोल्यूशन सर्टीफिकेट खोटे मिळते. वि. सू, - मला स्वता: ला खगोशास्त्राची आवड आहे पण त्यासाठी मी ते शाळेतच कशाला शिकायला पाहिजे? म्हणजे एक पुस्तक वाढले. दोन वह्या वाढल्या.
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 12/31/2013 - 16:53 नवीन
आपल्या देशात अशा तज्ञ लोकाना अकारण फारच महत्व आले आहे. सहमत. पण तरी देखील मी म्हणेन की तुम्ही दिलेल्या सर्वच उदाहरणातील प्रत्येक व्यक्ती ही त्या विषयात किमान तज्ञ तरी आहे. पण अमर्त्य सेन, नारायण मूर्ती, कधी काळी शबाना (सध्या बाईसाहेब गप्प असतात असे वाटते) असे अनेक दाखवता येतील ज्यांना उठसूठ कशावरही प्रश्न विचारले जातात. या सर्वांबद्दल आणि त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल आदर आहे, पण म्हणून उगाच प्रत्येक गोष्ट काय म्हणून त्यांनी सांगितली म्हणून ग्राह्य मानायची?
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 01/01/2014 - 04:56 नवीन
एक माणूस/नागरिक म्हणून वेगवेगळ्या गोष्टींवर मतं असतीलच प्रत्येकाची. ती ग्राह्य मानावीच असही काही नाही. दोष ती मतं अकारण मोठी करणार्‍या, म्हणजे प्रसार माध्यमांचा असावा.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Wed, 01/01/2014 - 07:45 नवीन
मित्रांनो, आपणासर्वांस २०१४ वर्षा निमित्त हार्दिक शुभेच्छा.... आप च्या कारकिर्दीचा लेखा जोखा घ्यायला निदान100 दिवस थांबावे. तोपर्यंत ते सरकार पडेल तरी किंवा काही अदभूत निर्णय घेऊन जनतेची मने जिंकेल तरी. तिकडे तोवर राहूलजींच्या खांद्यावर धुरा आली की ते कसे वागतात व भ्रष्टाचाराला चटावलेल्या नेत्यांना कसे वठणीवर आणतात ते पाहणे रंजक ठरेल.
  • Log in or register to post comments
व
विद्युत् बालक Wed, 01/01/2014 - 15:21 नवीन
तिकडे तोवर राहूलजींच्या खांद्यावर धुरा आली की ते कसे वागतात व भ्रष्टाचाराला चटावलेल्या नेत्यांना कसे वठणीवर आणतात ते पाहणे रंजक ठरेल. पप्पू ची पण नाडी पहिली कि काय तुम्ही?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 01/01/2014 - 17:59 नवीन
ए खुदा उनको सबकुछ मालूम होता है। नाडी देखना तो बस इक बहाना है॥
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Fri, 01/03/2014 - 06:16 नवीन
एका चांगल्या चर्चेला विनाकारण फाटे फोडता आहात. नाडी हा चावून चोथा झालेला विषय आहे. कशाला परत ??
  • Log in or register to post comments
द
देव मासा Wed, 01/01/2014 - 17:28 नवीन
विषयाला वांज़ोठा फाटा नाही पाडत, पन चार एक प्रशाना सठि वेग्ळा धागा का कढ़वा ?म्हनून इथेच विचारावे म्हानटले ओबमानि जेव्हा अमेरिकेत सत्ता हाती घेतली तेव्हा तिथलि परिस्थिति काय होती?, किंवा साम्य फक्त आप्ल्या रंगाचा आहे ? लोक किति साशंक होते? ओबमणनि काय वचाने दिले होते ? आनी ती त्यानी पाळ्लित का? विरोधकनी ते सत्तेवर आल्या नंतर त्याना किति साथ दिली किवा नुस्ताच खिंडीत पकड़नयचा प्रयत्न केला का ? तिथल्या आनी इथ्ल्या परिस्थित काय तफावत आही किवा होती ? किंवा ही तुलनाच चुकीची आहे काय? कुनी तरी या गोष्टी वर प्रकाश टाका वाचायला आवडेल
  • Log in or register to post comments
व
विद्युत् बालक Wed, 01/01/2014 - 18:19 नवीन
तुम्ही सरळ गुगल मराठी टायपिंग का नाही वापरत ? एकदम सोपे आहे !
  • Log in or register to post comments
द
देव मासा Wed, 01/01/2014 - 19:21 नवीन
आता पासून वापरीन *i-m_so_happy* *HAPPY* :happy: :HAPPY: :Happy: ^^
  • Log in or register to post comments
द
देशपांडे विनायक गुरुवार, 01/02/2014 - 14:44 नवीन
अभिनंदन करण्यास उशीर नको आप दिल्ली सरकार बनले . विधानसभेत विश्वास मिळाला श्री केजरीवाल यांचे अभिनंदन . कॉग्रेसला धन्यवाद आप सरकारला शुभेछ्या
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 01/02/2014 - 17:19 नवीन
भरपूर आश्वासाने आणि आस्वासक प्रतिमेने केजरीवाल आल्याने त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष राहणार हे वास्तव आहे... खालील चित्रफित बघण्यासारखी आहे. पूर्ण वेळ बघायची नसेल तर सुरवातीचे मिनिटभर बघून नंतर ५:२८ मिनिटांनी बघा. काय आहे त्यात. सुरवातीची पाच मिनिटे केजरीवाल यांचे अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांच्या उपस्थितीतले भाषण ज्यात त्यांनी शीला दिक्षित यांच्यावरील आरोपांचे ३७० पानी पत्र तक्रार म्हणून केल्याचे सांगितले तसेच काही सहज सिद्ध होऊ शकतील अशी भ्रष्टाचाराची त्यातली उदाहरणे सांगितली. फास्ट फॉरवर्ड पोस्ट इलेक्शन्स... त्यांना पत्रकारांनी विचारले की त्या आरोपांचे काय झाले? तर म्हणतात की हर्षवर्धनना सांगा की पुरावे द्या, आम्ही दोन तासात अ‍ॅक्शन घेऊ!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 01/03/2014 - 05:56 नवीन
केजरीवाल यांनी कितीही वेगळे राजकारण म्हटले तरी ठराविक चौकटी भेदणे त्यांना खरेच शक्य होतेय का ते पहायचे! :)
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 01/03/2014 - 06:27 नवीन
+१. राजकारणी लोकांचे हेतू कितीही प्रामाणिक असले तरी आपली सरकारी नोकरशाही महाबिलंदर असते.कुठल्या आदेशाचे ताबडतोब पालन करायचे, कुठली कामे रेंगाळत ठेवायची हे ठरवण्यात सरकारी बाबू हुशार असतात.मोदींना गुजरातमधील सरकारी बाबू घाबरतात तसे (बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर!) कर्तृत्व केजरीवाल ह्यांना दाखवावे लागेल.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 01/03/2014 - 14:59 नवीन
बाबूंना ताळ्यावर आणायला वेळ लागला तर मला नाही वाटत कुणाला काही वाटेल. ते लोकं समजू शकतील आणि त्यांच्या विरोधकांनी त्यावरून हल्ले केले तर ते उलटू शकतील. येथे प्रश्न आहे तो राजकीय तडजोडींचा आणि ज्या तत्वांवर तुम्ही जनतेला स्वतबद्दल convince केले आहे ती तत्वे मोडीत काढण्याचा अथवा दिशाभूल करण्याचा. खालील मुद्दे पहाण्यासारखे आहेत. (यातील सर्व मुद्दे हे मेनस्ट्रीम माध्यमात वाचलेल्या बातम्यांमधूनच घेतलेले आहेत... :) ) आधी म्हणाले शीला दिक्षित आणि कॉमनवेल्थ गेम्स चा भ्रष्टाचार बाहेर काढणार कारण ३७० पानी पुरावा आहे. आता भाजपाच्या हर्षवर्धन यांनी पुरावा द्यावा मग आम्ही कारवाई करू. आधी सरकारी बंगला घेणार नाही म्हणून मोठ्ठयांदा सांगितले पण आता स्वत:च्या मतदारसंघात असलेले सरकारी अधिकार्‍यांसाठीची दोन घरे एकत्र करून घेतली. आता म्हणतात की पण शीला दिक्षितांसारखा बंगला घेतला नाही. आधी म्हणाले की लालबत्ती वाली गाडी नाही, वगैरे. शपथविधीस मेट्रोमधून आल्याने गोड गैरसमज झाला की काही घेणार नाहीत. आता आप चे मंत्री सरकारी गाड्या (इनोवा) घेत आहेत. पण म्हणताहेत की त्यावर लालबत्ती नाही म्हणून! वीजदर कपातीसाठी इतर खात्यातला पैसा कमी करावा लागणार आहे पण त्यावर काहीच बोलायल तयार नाहीत. पाण्याचा फायदा हा सुखवस्तू अथवा उच्चपदस्थ रहात असलेल्या भागात जास्त होणार आहे असे म्हणले जात आहे. गरीबांना होणारच नाही. मागासवर्गीयांसाठी रिक्षांची परमिट्स देऊन एका अर्थाने नवीन प्रथा चालू करत आहेत. अशी देणे योग्य का नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण गरीबांसाठी करतो हे दाखवायचे. पण गरीबांकडे पैसा उपलब्ध आहे का? नसल्यास परत ते त्याच चक्रात अडकणार अथवा केवळ मागासवर्गीय असल्याच्या नावाखाली श्रीमंतांनाच फायदा होणार. हे सर्व सत्तेवर आल्यावर पहील्या ५-६ दिवसात!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 01/04/2014 - 03:37 नवीन
विश्वासमत मिळवण्याच्या आधी आणि नंतरच्या केजरीवाल यांच्या अ‍ॅक्शन्स यात जाणवण्याइतका फरक आहे. आणि तो दुर्दैवी आहे हे खरं
  • Log in or register to post comments
व
विद्युत् बालक गुरुवार, 01/02/2014 - 17:59 नवीन
आता केजरीवाल म्हणत आहेत कि शीला दिक्षित च्या सरकार मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे आम्हाला द्यावेत मग आम्ही लगेच कारवाई करू ! अरे मुडद्या , निवडणुकीच्या आधी उगाचच प्रेस कॉन्फेरेंस घेऊन कागदी घोडे नाचावायाचास का ? ह्याची लायकी काश्मीर व बाटला हाउस च्या विधानावरूनच कळली होती अरविंद केजरीवाल म्हणजे कोन्ग्रेस ने भारतीय राजकारणांत घुसवलेला "लादेन "च आहे
  • Log in or register to post comments
क
कौन्तेय Fri, 01/03/2014 - 06:21 नवीन
पण यांपैकीच कुणाचा तरी अवतारी पुरूष आहे असे वाटू लागले आहे -
  • Log in or register to post comments
म
मोहन Fri, 01/03/2014 - 06:25 नवीन
आआपला बहूमत मिळाले नाही तर त्यांना कुणाचा तरी पाठींबा घ्यावा लागणारच ( किंवा मग जबाबदारी पासून पळण्याचे आरोपही लागले असते) . मग ज्याचा पाठींबा घेतला त्याला झुकते माप लोकतंत्रात अपरिहार्य आहे . म्हणूनच केजरीवाल सरकार स्थापने करता फार उत्सुक दिसत नव्हते. आता त्यांना ५-६ महिन्याचा अवधी मिळाला तर जर दम धरु व मग ठरवू या. हा एक जनतेने केलेला प्र्योग म्हणून मला उत्सुकता आहे. यशस्वी झाला तर फार समाधान वाटेल.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 01/03/2014 - 07:31 नवीन
मौनव्रत सुटले maunee
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 01/03/2014 - 23:18 नवीन
सध्या फेसबुकवर केजरीवाल आणि पर्रीकरांची तुलना जोरात चालू आहे... त्यातील खालचे मला फारच भावले म्हणून येथे टाकत आहे. माध्यमे कशी मोठी करतात, दुर्लक्ष करू शकतात याचे हे एक उदाहरण आहे... Image removed.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 01/04/2014 - 01:59 नवीन
एकदम काही मोठे बदल करतील इतकी अचाट सत्ता केजरीवाल यांचेकडे नाही कारण ते एका शहरी भागाचे मुख्यमंत्री आहेत. व ते सुद्धा एक कुटील पक्षाच्या आधारावर .दुसरे असे की त्यानी व त्यांचे मंत्र्यानी गाडी वा बंगला घेतला वा घेतला की नाही हे महत्वाचे नाही. ते सरकारी खर्चात काटकसर करतात की नाही ते महत्वाचे.ते नोकरशाहीला सरळ करतात की नाही ते महत्वाचे. ते सामान्य लोकाना शिस्त लावतात की नाही हे महत्वाचे. केजरीवाल हा एक प्रयोग आहे. हा प्रयोग करणारा हात दिल्लीकराचा आहे.
  • Log in or register to post comments
द
देव मासा Mon, 01/06/2014 - 14:12 नवीन
ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी, वीज देते टाळी फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा नाच *dance4* *DANCE* :dance: *dance4* *DANCE* :dance:
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 01/11/2014 - 12:44 नवीन
केजरीवालंना थोडा वेळ द्यायला पाहिजे हे खरेच. पण त्यांनी घोषणाबाजी आणि राजकीय स्टंट यापासून लांब राहून काम करायला सुरुवात करावी हे बरे. नाहीतर काँग्रेसला वाटलं की त्यांच्या सरकारला राजकीय अपघात व्हायला वेळ लागणार नाही! त्यांचे सरकार आल्यावर दुसर्‍या दिवसापासून केजरीवालच्या तब्बेतीची बुलेटिन्स टीव्हीवर बघून कंटाळा आला होता. हे सगळं थांबवून दिल्ली सरकार सुरू झालं आहे का? त्यांच्या मंत्री आणि पुढार्‍यांची वक्तव्ये ऐकून जुन्या समाजवादी लोकांची आठवण येत आहे. विकास यांनी म्हटल्यासारख्या पर्रीकर आणि केजरीवाल यांच्या तुलना सगळ्याभर आता यायला लागल्या आहेत. पण गोव्यातल्या कोणालाही पर्रीकरांच्या वागण्याचं आश्चर्य वाटणार नाही. पर्रीकरांचं सरकार आल्या दिवसापासून राज्य सरकारच्या कचेर्‍यातले कर्मचारी ऑफिसचा संपूर्ण वेळ जागेवर दिसायला लागले एवढी एकच गोष्ट पर्रीकरांबद्दल बोलायला पुरेशी आहे!
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 01/11/2014 - 14:28 नवीन
"काँग्रेस" जे आहे ते आहे कारण लोकांनी आता ते मान्य केले आहे. :( भाजपा स्वतःला पार्टी विथ डीफरन्स म्हणत पुढे आला आणि आदर्शच्या जास्तच गप्पा मारत "डिफरन्स"च्या बाबतीत "इन्डीफरन्स" दाखवू लागला तर त्यावर लक्ष ठेवणारे त्यांचे विरोधक, टिकाकार आणि शंका घेणारे निघाले. आता त्याच पद्धतीने "आप" चे आणि मुख्यत्वे "केजरीवाल" यांचे होत असताना दिसत आहे. खालील चित्रफित बघण्यासारखी आहे. आधी काय शब्द दिले होते आणि आता वास्तवात काय करत आहेत... सार्वजनिक संवादाच्या जमान्यात आपण जे काही बोललो होतो ते परत वरती येऊ शकते याची एक चु़णू़क त्यात दिसते....
  • Log in or register to post comments
स
सचीन Sat, 01/11/2014 - 16:08 नवीन
मोदिन्वरचा फोकस केजरीवाल ह्यांच्यावर वळल्याने मोदी बी-ग्रेड मध्ये अस्वस्थता आहे. आपचा फायदा कॉंग्रेसला होणार हे निश्चित.
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Sat, 01/11/2014 - 17:03 नवीन
आज शोध लागला बाजीराव तुमच्या होराभुषणपणाचा, आता नक्क्क्कीच तसे होणार यात काय शन्का. आता कोणीतरी त्या मोडीला कलविले पाहीजे कि तु देव पाण्यात घालुन ठेव, कोणी मिपाकर मित्र त्या मोडीला ह्या होराभूषणाचा हा प्रतिसाद आणि त्यावरचा माझा प्रतिप्रतिसादाची लिन्क पाथवील का ??? *new_russian**new_russian**new_russian**new_russian*
  • Log in or register to post comments
स
सचीन Sat, 01/11/2014 - 17:09 नवीन
आप, राजसाहेब, नि नितीश कुमार ह्यामुळे मोदी हे विरोधी पक्षनेते बनण्याची दाट शक्यता आहे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 01/12/2014 - 14:06 नवीन
>>> आप, राजसाहेब, नि नितीश कुमार ह्यामुळे मोदी हे विरोधी पक्षनेते बनण्याची दाट शक्यता आहे तुम्ही यापूर्वी असं लिहिलं होतं की भाजप तिसर्‍या व काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर असेल. पण आता लिहिताय की भाजप दुसर्‍या क्रमांकावर असेल. इतक्यात टोपी पण फिरविलीत! पवारसाहेब सुद्धा इतक्या कमी काळात पक्षांतर करत नाहीत!!!
  • Log in or register to post comments
स
सचीन Sun, 01/12/2014 - 14:27 नवीन
भाजपला मोदी मुळे ह्या लोकसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त ७० जागा मिळतील आणि त्यांची जी आघाडी असेल त्यातील पक्षांना ३०. भाजपा आघाडी १०० मध्ये आटपेल. आणि ह्या आघाडीतील मोठा पक्ष असल्याने मोदी हे विरोधी पक्ष नेते होवू शकतात. परंतु माझ्या मते ते विरोधी पक्ष नेते होण्यापेक्षा पुंन्हा गुजरातचे मुख्यमंत्री होणे पसंत करतील. एका सर्वेत अहमदाबादेत पंतप्रधान कोण असावा ह्या प्रश्नाला 'केजरीवाल' हे उत्तर आघाडीवर होते.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sun, 01/12/2014 - 14:39 नवीन
तुम्ही सरांच्या बरोबर असता काय हो?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 01/13/2014 - 15:51 नवीन
>>> भाजपला मोदी मुळे ह्या लोकसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त ७० जागा मिळतील आणि त्यांची जी आघाडी असेल त्यातील पक्षांना ३०. भाजपा आघाडी १०० मध्ये आटपेल. अत्यंत बिनडोक अंदाज >>> आणि ह्या आघाडीतील मोठा पक्ष असल्याने मोदी हे विरोधी पक्ष नेते होवू शकतात. विरोधी पक्षनेता कोण होऊ शकतो याची सुतराम कल्पना तरी आहे का? >>> परंतु माझ्या मते ते विरोधी पक्ष नेते होण्यापेक्षा पुंन्हा गुजरातचे मुख्यमंत्री होणे पसंत करतील. एका सर्वेत अहमदाबादेत पंतप्रधान कोण असावा ह्या प्रश्नाला 'केजरीवाल' हे उत्तर आघाडीवर होते. साफ चूक. अहमदाबादेत केजरीवालांना अंदाजे ३० टक्के लोकांची पसंती होती, पण मोदींना ६० टक्क्यांहून अधिक लोकांची पसंती होती.
  • Log in or register to post comments
स
सचीन Tue, 01/14/2014 - 05:51 नवीन
मोदी प्रधानमंत्री होणे अशक्य दिसतेय.
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 01/14/2014 - 16:46 नवीन
तिळगुळ घ्या आणि गोड बोला.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 01/12/2014 - 07:26 नवीन
आप दिल्लीत आल्यामुळे म्हणा किंवा कसे सामान्य 'माणसाचा विचार केवळ निवडणूका आल्यानंतरच करता येणार नाही. आता लोक पाच ही वर्षे आपल्यावर आर टी आय, आंदोलने, पब्लिक क्राय पिटीशन्स, खटले, एफ आर आय यांचा सढळ उपयोग करून आपल्याला तंग करणार आहेत.' त्याना हलके घेऊन उपयोग नाही हे सत्ताधार्‍याना व सर्व राजकारण्याना कळायला सुरूवात झाली आहे.त्यात लोकपाल ई यंत्रणा कार्यरत झाल्या की आणकीच धमाल येईल. कित्येक जाणते अजाणते पुढारी गजाआड जाण्याचीही शक्यता आहे. आम आदमी हा अगदी आदर्श पक्ष झाला नाही तरी त्यानी निवडलेला विषय म्हणजे सुशासन व भ्रष्टाचार निर्मूलन जो जात धर्म , प्रांत या पलिकडचा विषय आहे. त्यानी सध्यामुस्लीम,दलित याचे लांगूलचालन करणारे वर्तन केले नाही व त्याना दुखविलेही नाही , प्रांतवाद केला नाही तर त्याना भाजपा, शिवसेना, मनसे आर पी आय. व सगळे प्रादेशिक पक्षाचे मतदार येऊन मिळू शकतात. सध्याची काँग्रेसची व भाजपाची मंत्री, खासदार, कर्यकर्ते यांचेच साटेलोट असणारी संस्कृति कोपर्‍यात भिरकावली जाउ शकते. थोडक्यात आप ला सत्तेचा मार्ग मोकळा झाला नाही तरी त्ते किंग मेकर वा किंग कंट्रोलर होउ शकतात.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 16 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 21 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा