Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य

म
माहितगार
Sun, 12/29/2013 - 05:23
🗣 106 प्रतिसाद
अगदी अलिकडे पर्यंत गीतारहस्य म्हणजे लोकमान्य टिळकांनी लिहिलेला ग्रंथ एवढच सामन्यज्ञान होत.पण एकेकाळी ह्या ग्रंथाने विक्रिचे तत्कालीन विक्रम केले असावेत असे वाटते. लोकप्रभा साप्ताहीकातील एका लेखात डॉ.यशवंत रायकर यांनी, '१९१५च्या जून महिन्यात प्रसिद्ध झालेल्या गीतारहस्याच्या सर्व प्रती संपल्यामुळे लगेच सप्टेंबर महिन्यात पहिले पुनर्मुद्रण करावे लागले.' अशी माहिती दिली आहे.या ग्रंथाचा जो भाग (बहुधा शेवटील भाग) ऑनलाईन उपलब्ध झाला ते १९२४ सालचे पुर्नमुद्रण आहे त्यावर ५००० प्रती असा आकडा आहे. लोकप्रभा साप्ताहीकातील डॉ.यशवंत रायकर यांचा हा लेख इतर बाबीकरता वाचनीय (आणि चर्चा करण्याजोगा) आहेच पण त्यात रायकरांनी एखाद्या विषयावर लेखन करताना एखादा परिपेक्ष,एखादी बाजू कशी सुटून जाऊ शकते याचा उहापोह केला आहे. रायकरांचा लेख आणि गीतारहस्याचा ऑनलाईन उपलब्ध भाग वाचताना अजून एका गोष्टीकडे लक्ष गेल ते म्हणजे लोकमान्य टिळकांनी अवलंबिलेली संस्कृत ते मराठी अनुवादाकरता अवलंबलेली पद्धतपण उल्लेखनीय आहे. गीतारहस्याचा ऑनलाईन उपलब्ध भाग मराठी विकिस्रोत प्रकल्पात या दुव्यावर उपलब्ध केला आहे.(मराठी विकिस्रोत प्रकल्पात पिडिएफ फॉर्मॅटचे वाचन करताना युनिकोडीकरण करत लिहिण्याची म्हणजे ग्रंथ बारकाव्याने अभ्यासण्याची संधी सुद्धा उपलब्ध होते) गीतारहस्याचा उपलब्ध सदर ऑनलाईन भाग आणि रायकरांचा लेख याच्या वाचना नंतर काही प्रश्न पडले ते असे १) गीतारहस्य ग्रंथाचे अधिकृत नाव श्रीमद्भभगवद्गीतारहस्य असे आहे का ? २) गीतारहस्य ग्रंथाचे एकुण भाग किती ? (अर्काइव्ह डॉट ऑर्गवरून विकिस्रोतावर आणलेली मूळ प्रतीचे १९२४चे पुनर्मुद्रण गीतारहस्य ग्रंथ आहे पण पृष्ठ संख्या कमी आहे का हा गीता रहस्याशी संबंधीत ग्रंथ आहे आणि सुयोग्य आवृत्ती आहे यास दुजोरा/खात्री करून हवी आहे.कारण प्रथम पृष्ठावर ह्या ग्रंथाचा शेवटील भाग असा उल्लेख दिसतो आहे.) *(कुणाकडे गीतारहस्याचे अजून भाग असतील तर ते मराठी विकिस्रोत प्रकल्पात युनिकोडीकरणाकरता पिडिएफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून देऊ शकल्यास हवे आहेत) *(ऑनलाईन उपलब्ध (दुसर्‍या का शेवटच्या ?) भागात काही पृष्ठे रिकामी दिसताहेत.२रे, १६वे व १८वे पान रिकामे आहे ह्यातील एखादे पान गहाळ नसून मूळातूनच रिकामे असल्याची खात्री करून हवी आहे.) ३) उपरोक्त ग्रंथाच्या प्रथमपृष्ठावर "कर्मविपाकसिद्धांत" असा ग्रंथ नामोल्लेख दिसत नाही मग तो कुठून येतो ? ४) लोकप्रभेतील रायकरांच्या लेखात "मीमांसाशास्त्रातले ग्रंथतात्पर्य काढण्याचे सात नियम" असा उल्लेख येतो ते सात निय्म कोणते इत्यादी माहिती हवी आहे.गीतारहस्य बद्दल इतर माहिती चर्चा झाल्यास स्वागतच असेल. उपलब्ध झालेली माहिती मराठी विकिपीडियावरील लेख लिखाणात वापरण्याचा मानस आहे. येत्या वर्ष २०१४ करता आपण सर्व आणि मिपा परिवारास शुभेच्छा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 57722 views

🗣 चर्चा (106)
म
माहितगार Tue, 12/31/2013 - 02:06 नवीन
नमस्कार, आपण दिलेल्या लिंकवर गेलो पण तिथे दिलेल्या पिडिएफ उघडता आल्या नाहीत.त्यांनी पिडिअ‍ॅफ मध्ये मूळ ग्रंथ जसाच्या तसा दिला असेल तर कॉपीराईटचा प्रश्न नाही. आपल्या ब्लॉगवरील टिपा माहितीपूर्ण आहेत.अर्थात मराठी विकिपीडियावरील श्रीमद्भवद्गीतारहस्य लेखात या टिपा वापरताना कॉपीराईट संबंधी आणि इतर अडचणी येण्याची संभावना आहे. आपल्या सवडीनुसार म.वि. वरील श्रीमद्भवद्गीतारहस्य लेखात काही माहिती लेखन करता आल्यास अथवा विकिस्रोत प्रकल्पात पुढेचालून मजकुर पडताळण्यात साहाय्य मिळाल्यास स्वागत असेल. माहिती आणि प्रतिसादाकरता धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
सुधीर Tue, 12/31/2013 - 05:20 नवीन
काही महिन्यांपूर्वी ती लिंक चालत होती. मी त्यावेळेस डाऊनलोड केले होते. माझ्या कडे ते ४रही खंड पिडीएफ मध्ये आहेत. पण प्रत्येक पीडीएफची साईज १५ एमबी आहे (टोटल ६०एमबी). पीडीएफ छापील ग्रंथाप्रमाणे जशास तसं आहे. तुम्ही विकीवर लिहून झाल्यावर जरूर कळवा. वाचायला आवडेलच.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 12/31/2013 - 05:29 नवीन
आपणास एक व्यनि पाठवला आहे.शक्य झाल्यास सहकार्याची विनंती.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 12/31/2013 - 05:20 नवीन
(दैनिक तरूण भारतवर) खालील प्रमाणे आढळून आला. टिळक म्हणतात: ‘स्वकीयांबरोबर युद्ध करणे हे मोठे कुकर्म म्हणून खिन्न झालेल्या अर्जुनास त्याच युद्धास प्रवृत्त करण्यासाठी सांगितलेल्या गीतेत भक्तीने मोक्ष कसा मिळवावा याचे,म्हणजे नुसत्या मोक्षमार्गाचे विवेचन कशाला, ही शंका मनात येऊन तीच उत्तरोत्तर बळावत चालली. कारण, गीतेवरील कोणत्याही टीकेत त्याचे योग्य उत्तर आढळून येईना, तेव्हा टीकाकारांच्या छापेतून सुटका होऊन मूळ गीता निवृत्तीपर नसून कर्मयोगपर आहे, असा बोध झाला.’’ ‘‘महाभारत, वेदान्तसूत्रे, उपनिषदे आणि वेदान्तशास्त्रावरील इतर संस्कृत व इंग्रजी ग्रंथांच्या अध्ययनानेही तेच मत दृढ होत जाऊन (मूळ गीता निवृत्तीपर नसून कर्मयोगपर आहे), ते लोकात प्रसिद्ध केल्याने या विषयाचा अधिक ऊहापोह होईल,अशा बुद्धीने या विषयावर चार-पाच ठिकाणी निरनिराळ्या वेळी जाहीर व्याख्याने दिली. यापैकी एक व्याख्यान नागपुरात १९०२ सालच्या जानेवारीत झालेले असून, नागपूर येथे दिलेल्या व्याख्यानाचा गोषवाराही तेव्हा वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेला आहे.’’ ‘‘सांसारिक कर्मे गौण किंवा त्याज्य ठरवून, ब्रह्मज्ञान, भक्ती वगैरे नुसत्या निवृत्तीपर मोक्षमार्गाचेच गीतेत निरूपण केलेले आहे, हे मत आम्हास मान्य नाही.’’ ‘‘कर्मे कधीच सुटत नाहीत व सोडूही नयेत.’’ ‘‘गीतेवर पहिल्या टीका कर्मयोगपर असाव्या, या टीका आता उपलब्ध नाहीत;म्हणून गीतेचे कर्मयोगपर व तुलनात्मक हे पहिलेच विवेचन आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.’’ ‘‘केल्याविण काही होत नाही,’’ हा सृष्टीचा नियम लक्षात आणून तुम्ही मात्र निष्काम बुद्धीने कर्ते व्हा म्हणजे झाले.निव्वळ स्वार्थपरायण बुद्धीने संसार करून थकल्याभागल्या लोकांच्या कालक्रमणार्थ किंवा संसार सोडून देण्याची तयारी म्हणूनही गीता सांगितलेली नसून,संसारच मोक्षदृष्ट्या कसा केला पाहिजे व मनुष्यमात्राचे संसारातले खरे कर्तव्य काय, याचा तात्त्विकदृष्ट्या उपदेश करण्यासाठी गीताशास्त्राची प्रवृत्ती झालेली आहे. म्हणून पूर्ववयातच गृहस्थाश्रमाचे किंवा संसाराचे हे प्राचीन शास्त्र जितक्या लवकर समजून घेणे शक्य असेल तितक्या लवकर प्रत्येकाने समजून घेतल्याखेरीज राहू नये, एवढीच आमची शेवटी विनंती आहे.’’ (लो. टिळक लिखित ग्रंथ-प्रस्तावनेतून : सन १९१५) उपरोक्त उतारा कुणी पडताळून मूळाबर हुकूम असल्याचा दुजोरा दिल्यास विकिस्रोत प्रकल्पात घेता येईल
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 12/31/2013 - 08:16 नवीन
कालच आमच्या मित्राने , कोल्हापुर येथील अजव प्रकाशनने प्रकाशित केलेले गीतारहस्य भेट दिले आहे ...आता वाचायला घेतो ... मग प्रतिसाद टाकेन ! :)
  • Log in or register to post comments
आ
आशिष दा Tue, 12/31/2013 - 10:32 नवीन
चांगला धागा. थोड्या वेगळ्या अनुषंगाने विचार केल्यावर असा जाणवलं की स्वामी विवेकानंद पुण्यात दोन दिवस टिळकांकडे राहायला होते त्या वेळच्या त्यांच्यातल्या विचारांच्या आदान प्रदानाबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. २ महानायक- त्यांच्यात काय बोलणं झाला असेल? कदाचित कर्मपर जीवन हा लोकमान्यांचा दृष्टीकोन आणि ईश्वरप्राप्तीसाठी सन्यस्त जीवनाला पर्याय नाही हा स्वामी विवेकानंदांचा या मुलभूत फरकामुळे त्यांचे फार धागे जुळले नाहीत. स्वामीजी पुण्यात फारसे रमले नाहीत. एक दिवस लोकमान्यांना सांगून अचानक निघून गेले.
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 12/31/2013 - 15:30 नवीन
लोकमान्यांच्या आठवणींवरचे जे ते गेल्या नंतर लगेच संकलीत केलेले पुस्तक आहे, त्यात या संदर्भात आठवण आहे. घरी बघून नंतर जमल्यास येथे टाकेन. (त्यात विषयांचे इंडेक्सिंग नसल्याने शोधायला अवघड जाते). पण आत्ता रामकृष्ण मिशनच्या संस्थळावर हा दुवा मिळाला, त्यातील टिळकांनी लिहीलेला भाग खाली चिकटवत आहे. About the year 1892, i.e., before the famous Parliament of Religions in the World’s Fair at Chicago, I was once returning from Bombay to Poona. At the Victoria Terminus a Sannyasin entered the carriage I was in. A few Gujarati gentlemen were there to see him off. They made the formal introduction and asked the Sannyasin to reside at my house during his stay at Poona. We reached Poona, and the Sannyasin remained with me for eight or ten days. When asked about his name he only said he was a Sannyasin. At home he would often talk about Advaita philosophy and Vedanta. The Swami avoided mixing with society. There was absolutely no money with him. A deerskin, one or two clothes and a kamandalu were his only possessions. In his travels some one would provide a railway ticket for the desired station. The swami also believed like me that the Shrimad Bhagavad Gita did not preach renunciation but urged every one to work unattached and without the desire for fruits of the work Two or three years thereafter Swami Vivekananda returned to India with worldwide fame owing to his grand success at the Parliament of Religions and also after that both in England and America. He received an address wherever he went and on every one of such occasions he made a thrilling reply. I happened to see his likeness in some of the newspapers, and from the similarity of features I thought that the Swami who had resided at my house must have been the same. I wrote to him accordingly inquiring if my inference was correct and requesting him to kindly pay a visit to Poona on his way to Calcutta. I received a fervent reply in which the Swami frankly admitted that he was the same Sannyasin and expressed his regret at not being able to visit Poona then. Once after this, during one of the Congress sessions at Calcutta, I had gone with some friends to see the Belur Math of the Ramakrishna Mission. There Swami Vivekananda received us very cordially. We took tea. In the course of the conversation Swamiji happened to remark somewhat in a jocular spirit that it would be better if I renounced the world and took up his work in Bengal while he would go and continue the same in Maharashtra. "One does not carry," he said, "the same influence in one's own province as in a distant one." - पिकते तिथे विकत नाही! :(
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 01/01/2014 - 07:07 नवीन
नमस्कार, मिपा सदस्य सुधीर यांच्या बहुमोल साहाय्यामुळे,जवळपास संपूर्ण गीतारहस्य मराठी विकिस्रोत प्रकल्पात चढवून; मराठी विकिस्रोतावरील https://mr.wikisource.org/wiki/श्रीमद्भवद्गीतारहस्य हे पान अद्ययावत करता आले असून तेथे श्रीमद्भवद्गीतारहस्य हा ग्रंथ वाचन आणि युनिकोडीकरण टंकनाच्याही दृष्टीने जि़ज्ञासूंकरीता ऑनलाईन उपलब्ध झाला आहे. अर्थात ऑनलाईन उपलब्ध झालेल्या प्रतींचे पुर्नमुद्रण/प्रकाशन बहुधा १९२४ आणि १९२६ सालचे असून १९२४ आणि १९२६ सालच्या प्रकाशकांनी पृष्ठ आकारात काही बदल तसेच नवीन काही पाने जोडल्याच्या शक्यतेमुळे १९१५ सालच्या आवृत्तीतील पृष्ठ संख्या आणि ऑनलाईन उपलब्ध झालेल्या आवृत्तीतील पृष्ठ संख्येच्या बेरजेत तफावत येते आहे. १) १९१५ सालची आवृत्ती उपलब्ध असलेल्या गीतारहस्य वाचक आणि चाहत्यांकडून पृष्ठसंख्येतील फरक मेळ घालून देण्यात, त्यांच्या सवडीनुसार साहाय्य हवे आहे. २) १९१५ सालची आवृत्तीचे आणि १९२६ सालच्या आवृत्तीचे मुखपृष्ठात फरक असण्याचीही शंका वाटते त्याबाबतही मार्गदर्शन हवे आहे. ३) लोकमान्य टिळक ग्रंथाच्या प्रस्तावनेच्या सुरवातीसच म्हणतात "श्रीमदभगवद्गीतेवर अनेक संस्कृत भाष्यें ,टीका आणि प्राकृत भाषांतरें अगर विस्तृत सर्वमान्य निरुपणें असतां हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे कारण काय हें जरी ग्रंथारंभीच सागीतले आहे,..." ऑनलाईन उपलब्ध झालेल्या आवृत्तीत प्रस्तावनेपुर्वी, मुखपृष्ठा नंतर आतले मुखपृष्ठ,प्रकाशक मुद्रकाची ओळखपृष्ठ आणि अर्पणपत्रिका असलेले 'अथ समर्पण' अशी तीनच पृष्ठे दिसतात.तर मग येथे ग्रंथारंभ असलेले एखादे पृष्ठ गहाळ आहे का लोकमान्यांचा निर्देश मुखपृष्ठावरील श्लोकाकडे आहे का 'अथ समर्पण' कडे या बद्दलही मार्गदर्शन जाणकारांनी करावे अशी नम्र विनंती आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 01/01/2014 - 07:22 नवीन
उत्तम काम. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 01/01/2014 - 07:32 नवीन
उत्तम! अभिनंदन. फलाची आशा न धरता, मिपावर चर्चा चालू काय करता आणि त्यातून असे सकारात्मक फळ काय मिळते! ;) हे सर्व पाहून खूप आनंद झाला आहे. :)
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 01/01/2014 - 08:17 नवीन
नव वर्षाची उत्साही सुरुवात झाली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Fri, 01/03/2014 - 16:20 नवीन
+१
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 01/04/2014 - 17:35 नवीन
+२ छान काम!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/02/2014 - 02:39 नवीन
काम आवडलं....!!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
ग्रेटथिन्कर Wed, 01/01/2014 - 07:17 नवीन
छान चागले काम केलेत, पूढील कामासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Wed, 01/01/2014 - 07:53 नवीन
तपश्चर्या वाया जात नाही या अर्थाचा श्लोक गीतेत आला आहे कुणाला माहीत असेल तर सांगावा...
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 01/01/2014 - 10:22 नवीन
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति । कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥९- ३१॥
तुम्हाला हा श्लोक अपेक्षित आहे काय ??
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 01/02/2014 - 05:11 नवीन
नमस्कार, नववर्षारंभी काम पुड्।ए गेल्याचा आणि एका पाठोपाठ आलेल्या शुभेच्छांनी आनंद वाटला आणि प्रोत्साहन आणि साहाय्या बद्दल आपणा सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद.मायबोली संकेतस्थळावर कुणीतरी विनोबांच्या गीताईवर काम केल्या नंतर अभिनंदन स्विकारताना सांगीतल की खर श्रेय गीताई लिहिणार्‍या विनोबांच तस या वेळच खर श्रेय स्वतः लोकमान्य टिळकांचच, गीतारहस्याच्या पिडिएफ बनवणार्‍या अनाम अनुदिनी लेखकाच आणि त्या पिडिएफ उतरवून जतन करून योग्य वेळी उपलब्ध करणार्‍या मिपा सदस्य सुधीर यांच आणि भरभरून प्रतिसाद देणार्‍या मिपाकरांच.आम्ही फक्त समन्वय साधण्याच निमीत्त मात्र काम केल. गीतारहस्यातील प्रस्तावनेत गीतारहस्यात जे होऊ शकले नाही आणि बाकी आहे त्या बद्दल टिळकांच्याच शब्दात ‘‘कृतान्तकटकाऽमल ध्वज जरा दिसो लागली। पुर:सरगदांसवे झगडिता तनू भागली।। - (कविवर्य मोरोपंत) अशी आमची स्थिती असून संसारातील सहचरीही पुढे निघून गेले. यासाठी आपल्याला उपलब्ध असलेली माहिती व सुचलेले विचार लोकांस कळवावे, कोणीतरी समानधर्मा सध्या अगर पुढे ते पुरे करील या समजुतीने हा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.’ गीतारहस्या बद्दल अजून बरच काही चर्चा करण्या सारख बाकी आहे.त्या प्रमाणेच आपल्या सारखेच कोणीतरी समानधर्मा सध्या अगर पुढे मराठी भाषेतील जुने दस्तेवज मराठी विकिस्रोत आणि इतर माध्यमातून आंतरजालावर उपलब्ध करण्याचे काम पुढे नेतील. आपणा सर्वांनाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि धन्यवाद
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 01/02/2014 - 08:26 नवीन
नरहर कुरुंदकरांनी १९७० मध्ये आकाशवाणीवर "कर्मयोगी टिळक" या विषयावर भाषण दिलं. ते पूर्ण स्वरूपात आंतरजालावर इथे आढळल. त्यातील या धागा चर्चा आणि समीक्षेकरता आवश्यक तेवढाच भाग खाली देत आहे. त्यात कुरुंदकरांच्या मते
लोकमान्यांनी नुसता कर्मयोग नव्हे तर भगवद्गीतेत ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे असे सांगितले
जन्मभर टिळक जे आचरण करीत आले, त्याचे तात्त्विक स्पष्टीकरण करण्याचा योग मंडालेच्या तुरुंगवासामुळे आला. लोकमान्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला. या गीतेच्या सूक्ष्म व्यासंगामुळे गीतेचे प्रतिपाद्य कर्मयोग आहे, या निर्णयावर ते आले असा प्रकार नाही. खरा प्रकार असा आहे की, ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग लोकमान्य जन्मभर आचरणात आणीतच होते. योग आला म्हणून गीताभाष्य त्यांनी लिहिले. गीतेवरील रहस्य भाष्य न लिहिता ‘माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान’ या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला असता तरी त्या ग्रंथात तीच भूमिका आली असती. भगवद्गीता हे निमित्त आहे. कर्मयोगाचे प्रतिपादन हा खरा हेतू!
हे कुरंदकरांच्या मता बद्दल आपली मते काय आहेत हे जाणून घ्यावयास आवडेल. समीक्षा संदर्भा करिता कुरुंदकरांच्या भाषणाचा थोडा अधिक भाग : गेल्या हजार-बाराशे वर्षांत गीतेचे जे अलौकिक भाष्यकार होऊन गेले त्यात ज्ञानमार्गाचे नेते म्हणून शंकराचार्य, भक्तिमार्गाचे नेते म्हणून ज्ञानेश्वर आणि कर्ममार्गाचे नेते म्हणून लोकमान्य टिळक हे तीन भाष्यकार सर्वात महत्त्वाचे मानले पाहिजेत. भगवद्गीतेत ज्ञान, भक्ती आणि कर्म या तीनही सूत्रांचे प्रतिपादन आहे. शंकाराचार्याना कर्म आणि भक्ती यांचे महत्त्व मान्यच असते; पण त्यांच्या मते ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. टिळकांचीसुद्धा पद्धती हीच आहे. आपण लोकमान्यांनी गीतेचा अर्थ कर्मयोगपर लावला आहे, असे म्हणतो. स्थूलपणे ते खरेही आहे. पण टिळकांचे नेमके म्हणणे मात्र वेगळ्या भाषेत सांगावे लागेल. त्यांच्या मते भगवद्गीतेत ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे. लोकमान्यांचे हे ‘गीताभाष्य’ त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात प्रकाशित झाले आहे. लोकमान्यांच्या सार्वजनिक जीवनाला स्थूलमानाने सांगायचे तर त्यांच्या पंचविशीपासून आरंभ होतो. या सार्वजनिक जीवनाची पंचविशी पूर्ण होतात न होतात तोच त्यांना मंडालेच्या तुरुंगात दीर्घकाळ राहण्याचा योग आला. जन्मभर टिळक जे आचरण करीत आले, त्याचे तात्त्विक स्पष्टीकरण करण्याचा योग मंडालेच्या तुरुंगवासामुळे आला. लोकमान्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला. या गीतेच्या सूक्ष्म व्यासंगामुळे गीतेचे प्रतिपाद्य कर्मयोग आहे, या निर्णयावर ते आले असा प्रकार नाही. खरा प्रकार असा आहे की, ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग लोकमान्य जन्मभर आचरणात आणीतच होते. योग आला म्हणून गीताभाष्य त्यांनी लिहिले. गीतेवरील रहस्य भाष्य न लिहिता ‘माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान’ या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला असता तरी त्या ग्रंथात तीच भूमिका आली असती. भगवद्गीता हे निमित्त आहे. कर्मयोगाचे प्रतिपादन हा खरा हेतू! या कर्मयोगाचे स्वरूप आपण नीट समजून घेतले पाहिजे. कोणते तरी कर्म करीत राहा, कारण माणसाने कर्म केले पाहिजे, इतका एकेरी ढोबळ विचार लोकमान्यांनी कधी मान्य केला नसता. लाकूडफोडय़ा, मजूर जन्मभर कर्म करीतच असतो. आपल्यासारख्या गरीब देशात कोटय़वधी माणसांचे जीवन जन्मभर कोणते तरी काम करीतच जाणारे असते. ‘बाबा रे, आळशी बसून राहू नकोस, कोणते तरी काम कर’ हा उपदेश निराळा आणि कर्मयोग निराळा. तो स्वत: कर्मयोगी आहे. माणूस जेव्हा स्वत:च्या अस्तित्वासाठी, स्वत:च्या हितासाठी, लाभासाठी कर्म करतो तो कर्मयोग नव्हे. व्यक्तिगत स्वार्थ आणि हित या परिघाबाहेर जाऊन समूहाच्या कल्याणात स्वत:च्या स्वार्थाचा लोप जेव्हा करतो, त्या वेळी कर्म ही साधना आणि उपासना होते. कर्मयोगात स्वार्थाचा लोप हा गृहीत आहे म्हणून तर काबाडकष्ट असा शब्दप्रयोग न करता ‘कर्मयोग’ म्हणायचे. हे कर्म अज्ञानाने करून चालणार नाही. समाजाची गरज काय, राष्ट्राची गरज काय? भोवतालची परिस्थिती कोणती, त्या परिस्थितीत शक्य काय, अशक्य काय इ. विचार केलाच पाहिजे. म्हणून कर्मयोगात जे कर्म अपेक्षित आहे ते ज्ञानमूलक आहे. सर्वसामान्यपणे टिळकांच्या भूमिकेवर जो आक्षेप घेण्यात येतो त्याचा आरंभ या ठिकाणी आहे. फळाची अपेक्षा न ठेवता जर कर्म करायचे असेल तर मग कर्म बरोबर की चूक हे ठरविण्याची कसोटीच शिल्लक राहणार नाही, असे आक्षेपकांचे म्हणणे असते. हा आक्षेप घेणारी मंडळी एक मुद्दा विसरूनच जातात. लोकमान्य कर्माला फळ नसते असे म्हणत नाहीत. कर्माला फळ असते हेच त्यांचे म्हणणे आहे. जर कर्माला फळच नसते तर मग कर्म कोणतेही केले तरी बिघडले नसते. कर्माला फळ असते म्हणूनच कर्म ज्ञानमूलक असायला हवे. हा आपला देश इंग्रजांच्या ताब्यात होता. भारत स्वतंत्र असणे अगर स्वतंत्र नसणे दोन्ही बाबी सारख्याच, असे जर टिळकांचे मत असते तर त्यांना कुणी लोकमान्य म्हटलेच नसते. टिळकांना भारत स्वतंत्र हवा होता. ते स्वातंत्र्यात जन्मले असते तर ते म्हणाले असते, ‘स्वतंत्र भारत बलवान आणि स्वावलंबी झाला.’ हा हेतू डोळ्यासमोर ठेवूनच सारे काम चालणार आहे. आपण ज्या मार्गाने जात आहोत तो लोकजागृतीचा व लोकसंघटनेचा आहे हे त्यांना कळतच होतं. आजोबाच्या कष्टाचे फळ नातवाला मिळणार असते. कर्माला फळ आहे; फक्त ते आज नाही, या जन्मी नाही; आणि स्वातंत्र्यलढय़ाच्या दर चळवळीला अपयश कसे ठरल्याप्रमाणे येत असते. सर्व अपयश पचविण्यासाठी आपल्या पिढय़ा पायाभरणीत संपणार आहेत हे जाणूनही चिकाटी चालू ठेवण्यासाठी नुसता नि:स्वार्थीपणा पुरत नाही; फळाची आशासुद्धा सोडावी लागते. अशा वेळी आपण जे कर्म करतो आहोत ते बरोबर आहे की नाही हे कसे ठरणार? म्हणूनच निष्काम कृतीला भक्तीची गरज लागते. लोकमान्य निष्काम कर्मयोग सांगतात याचे कारण कर्माला फळ नसते हे नाही, तर कर्माला फळ असते हेच निष्काम कर्मयोग सांगण्याचे खरे कारण आहे. जन्मभर टिळकांचा ज्ञानमूलक भक्तिप्रधान निष्काम कर्मयोग चालूच होता. ते त्यांच्या जन्मभराच्या उद्योगाचे सूत्र होते. हे सूत्रच गीतेच्या आधारे त्यांनी सांगितले. आपले कर्तव्य कोणते हे ठरविण्यासाठी ज्ञानाची उपासना हे कर्तव्य ठरतात, भक्तिपूर्वक आचरण हा या कर्मयोगाचा पूर्वार्ध समजावयाचा आणि सततचे अपयश पचवून पुन:पुन्हा कामाला लागायचे, हा या योगाचा उत्तरार्ध समजावयचा. पारतंत्र्याच्या काळी समोर कोणतीही आशा नसताना आपल्याच अंतरंगातून प्रेरणा घेऊन जळतच जन्म काढीत असताना टिळकांचे तत्त्वज्ञान हा आधार असतो. टिळकांचे जीवन हे या तत्त्वज्ञानाचे उदाहरण असते, तर स्वातंत्र्याच्या युगात या तत्त्वज्ञानाचे महत्त्व कमी होत नाही. सर्व मोह डोळ्यासमोर दिसत असताना आपण निष्काम कर्मयोग विसरलो, तर स्वार्थाच्या या सार्वजनिक जीवनात दुसरे काही दिसणारच नाही. मग कर्मयोगही कुठे उरणार नाही. म्हणूनच लोकमान्य टिळकांसारख्या कर्मयोग्याचे जीवन व चिंतन पिढय़ान् पिढय़ा राष्ट्राला पोषक देणारे ठरते असे म्हणायचे.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 01/02/2014 - 09:47 नवीन
गीतारहस्य म्हणजे टिळकांचे स्वतःचे जीवन विषयक सूत्र आहे हे खरच आहे. आयुष्यभर टिळक हेच तत्वज्ञान जगले. गीतेत त्यांना त्याचीच अनुभूती यावी हे ही सहाजीक आहे. एक लहानसा मुद्दा असा कि टिळकांनी प्रथम गीतावाचन केलं ते आजारी माणसाच्या उशाशी बसुन, त्याच्या समाधानाकरता. ते त्यांच्या अन्कॉन्शस माईण्ड मधे कुठेतरी असणारच. पुढे आपल्या राजकीय जीवनात त्यांनी आपले सिद्धांत, कर्म गीतेतल्या तत्वांशी कंपेअर केले असणार. ते मॅच होत गेले व गीतारहस्य टीळकांच्या अंतरंगात आकार घेत गेलं. पुढे तुरुंगवासात टिळकांनी गीतारहस्य कंपाइल केलं. टीळकांच्या कुठल्याश्या चरित्र्यात मी वाचलं होतं कि त्यांना गणिती प्रमेयं मळलेल्या वाटेने सोडवण्याऐवजी स्वतः आपल्या तर्काने सोडवण्यात मजा वाटायची. कदाचीत हीच वृत्ती त्यांच्या गीताभ्यासासंदर्भात दिसुन येते.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 01/02/2014 - 11:50 नवीन
गीतारहस्य म्हणजे टिळकांचे स्वतःचे जीवन विषयक सूत्र आहे हे खरच आहे. आयुष्यभर टिळक हेच तत्वज्ञान जगले. गीतेत त्यांना त्याचीच अनुभूती यावी हे ही सहाजीक आहे.
या गोष्टीशी सहमत.पण कुरुंदकरांच्याकडून टिळकांच्या एका बाजूच उदात्तीकरण होताना त्यांच्या व्यासंगाची बाजू नकळत गौण तर होत नाहीएना.तुम्ही म्हणता तसे गीतेच लोकमान्यांकडून वाचन झाल तेव्हाच गीतेतून कर्मयोग पूर्ण आयूष्याची प्रेरणा मिळाली.ती तशी गीतेतून मिळालेली नसती तर कुरुंदकर स्वतःच म्हणतात तसे "लोकमान्यांनी, गीतेवरील रहस्य भाष्य न लिहिता ‘माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान’ या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला असता." पण त्यांना तसा गीते बद्दल लिहावा वाटला म्हणजे त्यांना गीतेचा व्यासंग होता. वर मिपा सदस्य विकास यांनी टिळकांची विवेकानंदांसोबतचे वर्णन केले आहे त्यातही,विवेकानंद कोण आहेत याची कल्पना नसताना त्यांच्याशी चर्चा झाली आहे तरीही, विवेकानंदांच्या इतर विचारांपेक्षा गीतेची कर्मयोगपरता हाच विषय टिळक उचलून धरतात ह्यातून त्यांचा व्यासंग आणि जीवन दृष्टीकोण दोन्हीही प्रगट होते आहे. कुरुंदकर कर्मयोग हा ज्ञानमुलक असावाच लागतो सोबत श्रद्धा अथवा भक्ती हवीच नुसते कर्म हा कर्मयोग नव्हे हा कुरुंदकरांचा दृष्टीकोण आणि टिळकांच्या दृष्टीकोणाशी जुळतो का वेगळा आहे ह्यावर जाणकारांनी/अभ्यासकांनी प्रकाश टाकावयास हवा. दुसरे असे कि जर कुरुंदकर विचारांनी समाजवादी होते तर ते स्वतः उपरोल्लेखीत कर्मयोग योगाची त्यांचीच व्याख्या आणि समाजवाद यांची सांगड कशी घालत. हा कुरुंदकरांशी संबंधीत तसा वेगळा मुद्दा आहे. पण टिळक त्यांच्या उत्तरकाळात बोल्शेवीकांबद्दलही चर्चा करत होते तर तेही त्यांचीही कर्मयोग व्याख्या कुरुंदकरी शैलीचीच असेल तर साम्यवादाशी सांगड कशी घालत असावेत अशा काही शंका मनात उपस्थित होतात. पुढेचालून असेही म्हणता येऊ शकते का की टिळकांच्या श्रद्धेचा भक्तीचा परीघ हा भारत आणि भारताय राजकीय स्वातंत्र्याच प्राधान्य असा होता.नवीन वर्षाच २०१४च स्वागत करताना एक मराठी विचारवंत त्यांच्या अनुदिनीवर म्हणतात कि एकाच प्रश्नास प्राधान्य देण हे इतर प्रश्नांच अजाणता घडणार सपाटीकरण अथवा अतीसुलभीकरण कि ज्यात इतर तत्कालीन प्रश्न गौण गृहीत धरले जातात. कदाचित तत्कालीन समाज सुधारंकाचे आक्षेप येण्याची जागा इथे असावी या कडे कुरंदकर ओझरता उल्लेख करताना भाषणात म्हणतात "...म्हणून कर्मयोगात जे कर्म अपेक्षित आहे ते ज्ञानमूलक आहे. सर्वसामान्यपणे टिळकांच्या भूमिकेवर जो आक्षेप घेण्यात येतो त्याचा आरंभ या ठिकाणी आहे." या कुरुंदकरांच्या विश्लेषणाकडे आपण कसे बघतो ?
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 01/02/2014 - 16:11 नवीन
सर्वप्रथम कुरुंदकरांच्या लेखाच्या दुव्याबद्दल आपल्याला दुवा! :) त्यांचे लेखन कधी कधी पटले नाही तरी नुसतेच वाचनीय नाही तर विचार करायला लावणारे आणि त्यातून आपण काहीतरी शिकलो असे वाटते... पुढेचालून असेही म्हणता येऊ शकते का की टिळकांच्या श्रद्धेचा भक्तीचा परीघ हा भारत आणि भारताय राजकीय स्वातंत्र्याच प्राधान्य असा होता. टिळकांना प्रच्छन्न सुधारक म्हणायचे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या दृष्टीने वयं पंचाधिकं शतम् म्हणजे कुणालाही न दुखावता सर्वांना एकत्र घेऊन जायचे हे धोरण होते. त्यामुळे जर ते स्वातंत्र्यानंतर हयात असते तर आगरकर अथवा इतरांसारखे रॅडीकल नाही पण समाजसुधारक नक्की झाले असते असे वाटते. तरी देखील भारतीय आध्यात्मिक तत्वज्ञान हे धार्मिक कर्मकांडाच्या पेक्षा वेगळे आहे त्यापासून स्वतंत्र आहे. त्यामुळे देव या संकल्पनेचा नेहमीपेक्षा वेगळा अर्थ लावताना आपली संत मंडळी पण दिसतील... बाकी कर्मकांडे ही त्या त्या वेळच्या पद्धती म्हणायचे आणि सोडून देयचे. टिळकांवर गीतेचा प्रभाव असावा का? तर नक्की असेल असे वाटते. (अवांतरः वर अर्धवटरावांनी कुणा आजारी व्यक्तीजवळ टिळकांनी प्रथम गीता वाचल्याचे म्हणले आहे. हा प्रसंग मला नवीन आहे आणि अधिक कळून घेण्यास नक्की आवडेल.) गीतेचा प्रभाव पब्लीकवर आहे. कारण त्यात विचाराला चालना घेयची इच्छा असल्यास मिळू शकते! विनोबा म्हणतात, "गीताई माऊली माझी, तीचा मी बाळ नेणता, पडता झडता घेई, उचलूनी कडेवरी". अर्थात जेंव्हा आयुष्यात आव्हाने निर्माण होतात तेंव्हा असे गीता भक्त गीतेत उत्तरे/मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे भले गीतारहस्यात टिळकांचे जीवनविषयक तत्वज्ञान असेलही, नव्हे ते होतेच, पण ते त्यांना गीतेतून मिळाले असे म्हणण्यात काहीच गैर नाही आणि म्हणूनच त्यांनी ते म्हणले. कुरुंदकरांच्या बाबतीत अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. की ते जितके खर्‍या अर्थाने स्वतंत्र विचारवंत होते तितकेच त्यांचा कल हा डावीकडे झुकलेला होता. ते त्यांनी देखील कधी लपवलेले नव्हते. त्यामुळे कुठेही देवधर्म म्हणणे टाळणे त्यांना कायम योग्य वाटत आले. याचे एक मस्त उदाहरण म्हणजे, "छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य". जर वाचले नसले तर अवश्य वाचावे असे ते पुस्तक आहे. आय विश, कुरंदकरांना अधिक जगायला मिळाले असते आणि या छोट्याशा पुस्तकाचा ते अधिक विस्तार करू शकले असते... पण त्यात देखील त्यांची धडपड शिवाजीने कसे हिंदवी स्वराज्य म्हणून केले नाही, हिंदू धर्माशी संबंध नाही वगैरे वगैरे करण्यात जाते. तेच येथे टिळकांच्या बाबतीत झालेले दिसते. तरी देखील त्यांचे एकंदरीत लेखन बघता त्यांच्या विचाराच्या प्रामाणिकपणावर अविश्वास दाखवावासा कधीच वाटत नाही. असो: नवा धागा काढण्याऐवजी किंचित अवांतर. अमेरीकेत हवाई राज्याच्या अमेरीकन काँग्रेससाठीच्या (खासदार) लोकप्रतिनिधी तुलसी गॅबर्ड ह्या पहील्या हिंदू लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी गीता जयंती निमित्त युट्यूबवर गीतेवरून टाकलेला संदेशः
  • Log in or register to post comments
श
श्रीनिवास टिळक Fri, 01/10/2014 - 18:13 नवीन
अर्धवटराव: एक लहानसा मुद्दा असा कि टिळकांनी प्रथम गीतावाचन केलं ते आजारी माणसाच्या उशाशी बसुन, त्याच्या समाधानाकरता... नीलकंठ खाडिलकर त्यांच्या हिंदुत्व (मुंबई: परचुरे प्रकाशन २००५: ५३-५४) या पुस्तकात लिहितात की वयाच्या सोळाव्या वर्षी आजारी वडिलांना गीतेवरील टीका वाचून दाखविताना टिळकांच्या मनात हा प्रश्न आला की युद्ध करावे यासाठी सांगितलेल्या गीतेत मोक्षामार्गाचा विचार कशाला? अवांतर: खाडिलकर पुढे लिहितात--आमचे [टिळकांचे] प्रदीर्घ वाचन-चिंतन-मनन यानंतर असे मत झाले आहे की मनात भक्ती, मस्तकात ज्ञा,आणि हातात कुशल कर्म हीच गीतेची आणि यशाची त्रिमूर्ती आहे(पृ ५४).
  • Log in or register to post comments
व
विटेकर गुरुवार, 01/02/2014 - 10:53 नवीन
माहितगार आपण उत्तम काम केले आहे ... हा ग्रंथ माझ्या नित्य वाचनात आहे आणि दासबोध आणि गीता रहस्य या दोन ग्रंथात कामालीचे साम्य मला आढ्ळले आहे ! माझ्या कडे १९१५ ची प्रत आहे तुम्हाला हवी तेव्हा उपलब्ध करुन देऊ शकेन. ही प्रत साक्षात टिळक महाराजांनी स्वाक्षरी करुन माझ्या आजोबांना ( फौजदार, औन्ध संस्थान )यांना भेट दिली आहे ! हा आमच्या घरचा अनमोल ठेवा आहे !
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 01/02/2014 - 12:11 नवीन
प्रोत्साहनाकरिता धन्यवाद.मराठी विकिबंधू प्रकल्पात गीतेचे दोन तीन मराठी अनुवाद आधीच उपलब्ध आहेत नाही असे नाही.एक अनुवाद कुठून आला आहे माहित नाही पण आजच्या सरळ सुलभ मराठीत आहे सोबत ज्ञानेश्वरी आहे (गीताई आहे पण कॉपीराईट स्टेटस साशंकतेत असल्याने वगळली जाण्याची शक्यता आहे). पण प्रत्येक शब्दाचा अर्थ सिद्ध करत अथवा व्युत्पत्ती देत केलेल्या अनुवादाकरता गीतारहस्या शिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊन हा प्रयास केला. गीतारहस्याचे युनिकोडीकरण करून उपलब्ध झाले आणी गीताईच्या कॉपीराईटचा प्रश्न मिटला तर गीतेच्या प्रत्येक श्लोकाचा आजच्या मराठीतला अनुवाद मग गीताई मग गीतारहस्यातील अनुवाद मग ज्ञानेश्वरीतील श्लोक आणि त्याचे अर्थ असे करता येऊ शकेल पण या करता मराठी विकिप्रकल्पांवर अधिक चहात्या स्वयंसेवकांची गरज असेल.केव्हा किती आणि काय काय होते ते काळ ठरवेल.आपण गाडीचा मार्गावर आपल्या क्षमतेत आहे तेवढी पुढे नेऊन सोडावयाची. मी गीतारहस्य त्याच्या प्रस्तावनेपलिकडे अद्याप फारसा वाचला नाही पण आपण म्हणतातसे दासबोध आणि गीतारहस्य दोन्हीही वेग वेगळ्या धाटणीने कर्मयोगाची मांडणी करत असल्यामुळे साम्य वाटत असावे.आपल्या सारख्या जाणकारांनी खुलासा करणे अधिक योग्य पण दासबोधातील तत्वज्ञान मुलतः वाल्मिकी लिखीत योगवसिष्ठातून येत असावे असे योगवसिष्ठ चाळताना वाटले होते.गीतेचा आणि योगवसिष्ठाचा काही सहसंबंध किंवा तत्वज्ञानात साम्य फरक आहे किंवा नाही या बद्दल फारशी माहिती नाही.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 01/05/2014 - 03:29 नवीन
गीतारहस्याच्या पहिल्या भागातील विषयप्रवेश प्रकरणातील पान क्रमांक ५ वर योग्वसिष्ठाचा उल्लेख आढळला.योगवसिष्ठाच्या शेवटच्या निर्वाण या प्रकरणात भगवदगीतेतील अनेक श्लोक आणि भगवद्गीतेचे सार जसेच्या तसे गोवले असल्याचे टिळक नमूद करतात.आध्यात्म रामायण आणि योगवसिष्ठ हे ग्रंथ विस्तृत असले तरी ते भगवद्गीतेच्या मागाहूनचे असल्याचे त्यांच्या रचनेवरून उघड होते असे मत टिळक पान क्रमांक ६वर नमुद करतात
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 01/05/2014 - 03:46 नवीन
नमस्कार, गीतारहस्याची अर्पण पत्रिका "अथ समर्पणम" लोकमान्य टिळकांनी संस्कृतातून लिहिली आहे.पूर्ण "अथ समर्पणम" चा शब्दार्था सहीत मराठी अनुवाद हवा आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 01/05/2014 - 11:53 नवीन
श्लोक १. श्रीगीतेचा अर्थ इतका खोल अन गंभीर आहे. जुन्या कवींनी आणि अनेक आचार्यांनी बहुत प्रकारे तो विशद केल्यावर त्यापुढे माझी अल्पबुद्धी ती काय? श्लोक २. तरीही माझ्या उद्धटपणामुळे जुन्या आणि उचित अशा नवीन शास्त्रार्थांना समोर ठेवून गीतार्थ सांगण्यास मी पुन्हा तयार झालो आहे. श्लोक ३ ते पुढे. काय कार्य आणि काय अकार्य याचा निवाडा करण्याची इच्छा असलेले श्रेष्ठ लोक हा गीतार्थ ऐकण्यास पात्र आहेत. अशाप्रकारे सज्जन लोकांना प्रिय अशा कालिदासाच्या भाषेत मी कथन करीत आहे. श्लोक ४. (मी) टिळककुलोत्पन्न बाळ हा गंगाधराचा मुलगा असून शांडिल्य गोत्री ब्राह्मण आहे. महाराष्ट्रातील पुण्यपुरात(पुण्यात) राहतो. श्लोक ५. (मी) शालिवाहन शकाच्या १८३७ व्या वर्षी सज्जनांचा मार्ग अनुसरून हरिवचन स्मरून, श्लोक ६. हा ग्रंथ जनतेच्या आत्मारूपी देवास समर्पित करतो आहे. या ग्रंथामुळे परम पुरुष असा देव प्रसन्न होवो. खाली बहुतेक गीतेतला श्लोक आहे त्याचा अर्थ असा: हे कौंतेया, तू जे करशील, जे खाशील, जे यज्ञात अर्पण करशील, जे दान देशील आणि जी तपश्चर्या करशील ते सर्वही मला अर्पण कर.
  • Log in or register to post comments
स
सुधीर गुरुवार, 01/02/2014 - 14:13 नवीन
खरोखरच अनमोल ठेवा!.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. गुरुवार, 01/02/2014 - 12:22 नवीन
उपक्रम बंद आणि भोग मिपाला ;)
  • Log in or register to post comments
म
मारकुटे गुरुवार, 01/02/2014 - 14:18 नवीन
अपेक्षित प्रतिसाद
  • Log in or register to post comments
र
राही Fri, 01/03/2014 - 13:41 नवीन
जवळजवळ संपूर्ण गीतारहस्य मराठी विकिस्रोत प्रकल्पात चढवून आपण एक मोलाचे काम केले आहे. नव्या वर्षाची एक सुंदर भेट या निमित्ताने आपणा सर्वांना मिळाली आहे. मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. हा धागा वाचनखूण साठवावी असा मोलाचा झाला आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 01/05/2014 - 03:41 नवीन
प्रोत्साहपूर्ण प्रतिसादाकरिता धन्यवाद
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 01/03/2014 - 14:20 नवीन
अवांतरासाठी क्षमस्व... प्रत्यक्ष विषयाला धरून नसेल कदाचीत पण लोकमान्यांच्यावर येत असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर आत्ताच पाहीला आणि येथे सांगावासा वाटला...
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 01/04/2014 - 09:11 नवीन
केतकर ज्ञानकोशात लोकमान्य टिळकांचे एक वाक्य उधृत केले आहे '' गीता म्हणजे कर्म, भक्ति व ज्ञान या तीन स्वतंत्र निष्ठांची खिचडी किंवा कापूस, रेशीम व जर यांच्या चिंध्या शिवून तयार केलेली गोधडी नसून, कापूस, रेशीम व जर यांचे निरनिराळे धागे यथास्थानी योग्य रीतीनें जमवून दिल्यावर कर्मयोग नांवाचें मौल्यवान् व मनोहर असें गीतारूपी सनंग अव्वलपासून अखेरपर्यंत 'अत्यंत योगयुक्त चित्तानें' सलग विणलेलें आहे.'' (गीतारहस्य पा. ४६२)
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 01/04/2014 - 15:51 नवीन
एकदम लॉजिकल वाक्य आहे!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 01/05/2014 - 03:38 नवीन
ना.सी.फडकेयांनीही गीतारहस्याबद्दल काही लेखन/उहापोह केले आहे असे वाचण्यात आले.त्यांच्या गीतारहस्यसंबंधीत लेखनाबद्दल/मतांबद्दल काही अधीक माहिती उपलब्ध झाल्यास हवी आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीनिवास टिळक Tue, 01/07/2014 - 13:48 नवीन
१८४९ साली ब्रीटीशांनी महाराजा दुलीप सिंग यास त्याच्याकडे असलेला कोहिनूर हिरा महाराणी Victoria हिला भेट म्हणून देण्यास भाग पाडले. तो हिरा नंतर Amsterdam येथे त्याला पैलू पाडण्यासाठी पाठवण्यास आला. पैलू पाडल्यावर तो अधिकच दिमाखाने चमकू लागला. हा संदर्भ पकडून लोकमान्यांनी लिहिले कि गीता ही कोहिनूर सारखीच दैदिप्यमान आहे आणि राहीलच. परंतु ज्या काळात आणि ज्या उद्देशानी ती अस्तित्वात आली ती परिस्थिती आज नाही. त्यामुळे तिचा स्वयंप्रकाश काही अंशी मंदावला आहे. म्हणून ज्ञानभक्तीमूलक कर्म योगाची छिन्नी घेऊन त्यांनी गीतेला नवीन पैलू पाडण्याचा प्रयत्न केला (गीतारहस्य लिहिले)जेणेकरून ती पैलू पाडलेल्या कोहिनूरप्रमाणे पुन्हा नवीन दिमाखाने चमकू लागेल.अर्थात लोकमान्यांचा यत्न किती यशस्वी झाला हे सुजाण वाचकांनींच ठरवायचे आहे. लोकमान्यांपासून स्फूर्ती घेऊन मीही Understanding karma in light of Paul Ricoeur’s philosophical anthropology and hermeneutics (Nagpur: International Centre for Cultural Studies 20006) हे ५०० पानी पुस्तक प्रकाशित केले आहे (माझं त्यांच्याशी काही नातं नाही!). थोडक्यात माझा विचार असा की प्राचीन काळी वेदांत (ज्ञानयोग) आणि कर्मांत (कर्मयोग) ही दोन स्वतंत्र (किंवा पर्यायाने परस्परपूरक = ज्ञानकर्मसमुच्चय) अशी मुक्तीची साधने होती. परंतु काळानुसार कर्मान्ताचा लोप होऊन फक्त वेदांत उरला. माझा उद्देश कर्मयोग हे स्वतंत्र (किंवा पर्यायाने ज्ञानाबरोबर पूरक) असे साधन परत उपलब्ध करून देणे हा होता. Paul Ricoeur यांची theory of action ही काही प्रमाणात आपल्या कर्म सिद्धांताशी मिळती जुळती आहे म्हणून मी तिचा आधार घेतला आहे. तसेच आपला पारंपारिक कर्म विचार आधुनिक परिभाषा आणि प्रणालीतून मांडला तर त्याला अधिक प्रतिसाद मिळेल ही पण अपेक्षा होती.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 01/07/2014 - 13:54 नवीन
रोचक! हे पुस्तक कुठे उपलब्ध आहे, कुठे मिळेल, इ.इ.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 01/07/2014 - 16:21 नवीन
पैलू पाडणे या रुपकात, मला माझे विचार(संप्रदाय) जोडावयाचे नाहीत, तर भगवदगीता जशी मूळ रूपात आहे तशी दाखवावयाची आहे, आणि गीतेच मूळरूपच पैलू पाडलेल्या कोहिनूर हिर्‍या प्रमाणे आहे आणि लोकमान्यांचा गीतारहस्य लेखना मागचा दृष्टीकोण आहे असे गीतारहस्याची प्रस्तावना वाचताना वाटले. या धाग्याच्या वाचकांकरता थोडक्यात Paul Ricoeur यांची theory of action आणि कर्मयोग यांची थोडक्यात तुलना देता आल्यास हा धागा वाचनीय आणि समृद्ध होईल. आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादांकरता धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 01/05/2014 - 03:48 नवीन
नमस्कार, गीतारहस्याची अर्पण पत्रिका "अथ समर्पणम" लोकमान्य टिळकांनी संस्कृतातून लिहिली आहे.पूर्ण "अथ समर्पणम" चा शब्दार्था सहीत मराठी अनुवाद हवा आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 01/05/2014 - 11:28 नवीन
विकिस्रोत वरिल श्रीमद्भवद्गीतारहस्य (पुस्तक) हा धागा आजच बघितला. हा एक अत्यंत चांगला आणि उपयोगी उपक्रम आहे. बर्‍याच प्रयत्नानेही न मिळणारे हे महत्वाचे पुस्तक असे उपलब्ध करून दिल्याबद्दल धागाकर्त्यांचे आभार आणि मनःपूर्वक अभिनंदन. शिवाय त्या अनुषंगाने होणारे इतर टीकाटिप्पणी आणि साधकबाधक चर्चाही रोचक होईल असे वाटते. या प्रकल्पाला मनापासून शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 01/07/2014 - 16:24 नवीन
विकिस्त्रोत प्रकल्पास भेट, प्रतिसाद आणि शुभेच्छांकरता धन्यवाद. आपल्या आवडीचे वाचन लेखन होत राहो ही शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 01/06/2014 - 09:34 नवीन
नमस्कार, अथ समर्पणम् चे युनिकोडीकरण केले पण काही अक्षरे पुसट होती अथवा जुन्या टंकांचा उपयोग होता त्यामुळे टंकलेली अक्षरे बरोबर आहेत याची करून हवी आहे. सोबतच प्रत्येक शब्दाचा शब्दार्थ आणि प्रत्येक ओळीचा अनुवाद करून मिळावा अशी जाणकारांना विनंती आहे. अनुवाद करताना अनुवाद प्रताधिकारमुक्त कॉपीराईट मुक्त करत आहोत असे लिहावे म्हणजे तो विकिस्रोत प्रकल्पात कॉपीपेस्ट करता येईल ॥अथ समर्पणम्॥ श्रीगीतार्थः क्व [खात्रीचेटंकन?] गंभीर: व्याख्यात: कविभि: पुरा । आचार्यैर्यश्च बहुधा क्व [खात्रीचेटंकन?] मेऽल्पविषया[खात्रीचेटंकन?] मति:॥ तथापि चापलादस्मि वक्तुं तं पुनरुद्यतः । शास्त्रार्थान् संमुखीकृत्य प्रत्नान् नव्यैः सहोचितैः [खात्रीचेटंकन?]॥ तमार्याः श्रोतुमर्हन्ति [खात्रीचेटंकन?] कार्याकार्य-दिदृक्षव:[खात्रीचेटंकन?] । एवं विज्ञाप्य सुजनान् कालिदासाक्षरैः प्रियैः ॥ बालो गांगाधरिश्चाऽहं तिलकान्वयजो द्विजः । महाराष्ट्रे पुण्यपुरे वसन् शांडिल्यगोत्रभृत ॥ शाके मुन्याग्नि वसुभू-संमिते शालिवाहने । अनुसृत्य सतां मार्गं [खात्रीचेटंकन?] स्मरंश्चापि वचो ऻ[खात्रीचेटंकन?] हरेः ॥ समर्पये ग्रंथमिमं श्रीशाय जनतात्मने । अनेन प्रीयतां देवो भगवान् पुरुषः परः ॥ --- यत्करोषि यदश्नासि [खात्रीचेटंकन?] यज्ज्य्द्दोषि ददासि यत् । यत्तपस्यासि कौंतेय तत्कुरुध्ध मदर्पणम् ॥
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 01/06/2014 - 09:53 नवीन
ओ साहेब, धाग्यावरचे प्रतिसाद पाहण्याचे कष्ट घेत चला की जरा. कालच टंकलाय अनुवाद, दिसला नाही का आँ???????????????????? http://misalpav.com/comment/542617#comment-542617
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 01/06/2014 - 12:55 नवीन
पुरता अगदी अगदी क्षमस्व.सध्या बर्‍या पैकी मिपावर पडिक आहे. प्रतिसाद पाहण्याचा सारखा प्रयास असूनही आपली आपली अनुवादाची एवढी सुंदर भेट देणारा अत्यंत उपयूक्त प्रतिसाद नेमका राहीला असे दिसते. आपल्याला अजून एक आग्रहाची विनंती आहे.आपण अनुवाद प्रताधिकार कॉपीराईट मुक्त करत असल्याचे नमूद केलेत तर तो विकिस्रोत प्रकल्पात घेता येईल आणि मिपा शिवाय इतर मराठी बांधवांनाही आपण केलेल्या या अनुवादाचा लाभ आणि आनंद घेणे सोपे जाईल. अनुवाद उपलब्ध करण्या बद्दल अजून एकदा धन्यवाद
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 01/06/2014 - 13:38 नवीन
अनुवाद पूर्णपणे मुक्त आहे, कसलेही हक्क राखीव नाहीत. खुशाल चढवा विकीवर.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 01/07/2014 - 16:41 नवीन
आपण करून दिलेला अनुवाद विकिस्रोतवर चढवला आहे. लोकमान्य टिळक ग्रंथाच्या प्रस्तावनेच्या सुरवातीसच म्हणतात "श्रीमदभगवद्गीतेवर अनेक संस्कृत भाष्यें ,टीका आणि प्राकृत भाषांतरें अगर विस्तृत सर्वमान्य निरुपणें असतां हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे कारण काय हें जरी ग्रंथारंभीच सागीतले आहे,..." आपण दिलेला अनुवाद वाचल्या नंतर,उपरोक्त संदर्भ 'अथ समर्पणच्या' पहिल्या आणि दुसर्‍या श्लोका बद्दल असण्याची शक्यता वाटली.तसेच, श्लोक क्रमांक ५, ६ आणि गीतेतील श्लोक सोबत वाचले तर जनतेचा आत्मा आणि हरी (इश्वर) यांना समर्पण आणि अर्पण आहे. लोकमान्यांना जनतेचा आत्मा आणि हरी यांचे अपरोक्ष अद्वैत दर्शवायचे असे काही असेल का असेही वाटून गेले. आपल्या अनमोल अनुवाद 'भेटी' करता पुन्हा एकदा धन्यवाद.
  • Log in or register to post comments
र
राही Mon, 01/06/2014 - 11:10 नवीन
बहुतेक सर्व बरोबर. क्व शब्द बरोबर आहे. क्व सूर्यप्रभवो वंशः, क्व मेs/ चाल्पविषया मति: हे रघुवंशाचे प्रथम वाक्य सुप्रसिद्ध आहे. [कुठे तो सूर्यप्रभव वंश (आणि तो वर्णू इच्छिणारी) कुठे माझी अल्पमती. मे+अल्प किंवा च+अल्प]. फक्त शेवटी गीतेतल्या श्लोकात यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् असे पाहिजे.
  • Log in or register to post comments
र
राही Mon, 01/06/2014 - 11:18 नवीन
हे प्रयत्नान् असे असावे. (मूळ प्रत समोर नाही.) अर्थाच्या अंदाजानुसार.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 16 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 21 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा