Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

ड्रॅगनच्या देशात ०५ - बायजींगमध्ये फेरफटका, सम्राटाचा बगीचा, शियानच्या दिशेने ऊड्डाण

भटकंती

ड्रॅगनच्या देशात ०५ - बायजींगमध्ये फेरफटका, सम्राटाचा बगीचा, शियानच्या दिशेने ऊड्डाण

सदस्य
— लेखन
— प्रतिक्रिया
2026 पासून
📅
सदस्य झाले
13 March 2026

या सदस्याने अद्याप परिचय लिहिलेला नाही.

या सदस्याचे लेखन पाहण्यासाठी येथे Views block ठेवा.

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 12/09/2012 - 18:02

Book traversal links for ड्रॅगनच्या देशात ०५ - बायजींगमध्ये फेरफटका, सम्राटाचा बगीचा, शियानच्या दिशेने ऊड्डाण

  • ‹ ड्रॅगनच्या देशात ०४ - बायजींग : चांगलींग थडगी, चीनची महाभित्तीका (बदालींग) , पेकींग ऑपेरा, बायजींग शहर
  • Up
  • ड्रॅगनच्या देशात ०६ - शियान... एकत्रित चीनची पहिली राजधानी ›

===================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

===================================================================

आज बायजींगमधला चौथा दिवस. दुपारी सव्वातीनला शियानचे विमान पकडायचे होते. गाईड बारा वाजता येईन म्हणाला होता. न्याहरी नऊ वाजता आटपली. नुसते लोळत पडण्यापेक्षा जरा हॉटेलच्या आजूबाजूस फेरफटका मारावे असे ठरवून बाहेर पडलो. हॉटेलच्या गल्लीतून बाहेर पडून एका प्रशस्त रस्त्यावर आलो. हा रस्ता जरा मजेशीर वाटला. कारण एका बाजूला पारंपरिक चिनी ठेवणीची दुकाने होती.


.

तर दुसरी बाजू आधुनिक संपन्न चीनचे दर्शन घडवीत होती.


.

चिनी व्यवसायाचे ठिकाण म्हटले म्हणजे भाग्य खेचून आणणारा सिंह दरवाज्यात पाहिजेच. असा दरारा असलेल्या व समृद्धीचे प्रतीक असलेल्या या राजाच्या काही खास रूपाबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. एक खास जगावेगळा सिंह... चितळाची शिंगे व खूर आणि बोकडाची दाढी धारण केलेला.

चारपाच मिनिटेच चाललो असेन तर एकदम एवढी हिरवळ व झाडी आजूबाजूला सुरू झाली की फुटपाथावर चालतोय की एखाद्या बागेतून चालतोय असा संभ्रम पडला.


.


.


.


.

मी स्वतः त्यावरून चालत नसतो तर हा मध्यवस्तीतल्या चारपदरी रस्त्याचा फुटपाथ आहे ह्यावर विश्वास बसणे कठीण गेले असते. पाचेक मिनिटे पुढे चाललो असेन तर फुटपाथ एका छोट्याशा पटांगणासारख्या मोकळ्या जागेला मिळाला. तेथे बरेच नागरिक जमा होऊन काही कार्यक्रम चालू होता. मीही बघ्यांच्या गर्दीत मिसळलो. खास गुलाबी कपडे परिधान करून बर्‍याच चिनी काकू-मावशा-आजी चिनी पद्धतीचा नाच करीत होत्या. नंतर पुढे प्रवासात कळले की ह्याला "ताई ची" म्हणतात आणि हा एक चिनी व्यायामप्रकार आहे. (अवांतर याचा मराठी 'ताई'शी कोणताही संबंघ नाही :)) .) सबंध चीनभर सकाळ संध्याकाळ चिनी लोक हा व्यायाम सार्वजनिक बागांत करताना दिसतात. विशेषतः वयस्कर मंडळी असतात, अगदी ७०-८० वर्षांचे चिरतरुण आजीआजोबा मोठ्या कौशल्याने सर्व हालचाली करतात.... तरुण फारच क्वचित दिसतात.

काय चालले आहे याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला, पण पांचव्या-सहाव्या चेहर्‍यावरसुद्धा "काय वेड्यासारखी मंगळावरची भाषा बोलतोयस ? जरा शहाण्या माणसासारखी चिनी भाषा बोल ना." असे भाव होते. पण प्रयत्न सोडला नाही. शेवटी तिथे ड्यूटीवर असलेल्या गार्डला माझी दया आली. तो इंग्रजीची मोडतोड करीत माझी मदत करू लागला. आमचे बरेचसे विनोदी संभाषण ऐकून एका मावशीबाईंनाही इंग्रजीवर अत्याचार करण्याचा मोह आवरला नाही. सर्वसाधारण चिनी माणसाचा स्वभाव तसा मनमिळाऊ आणि मैत्रिपूर्ण आहे. पण भाषेच्या अडथळ्यावर अडकून कशी विकेट जाते याचा प्रत्यय संपूर्ण प्रवासात सतत येत राहिला. असो. शेवटी येवढे कळले की रस्त्याशेजारच्या कॉलनीचा वार्षिक "community day" साजरा होत होता. ताई ची संपल्यावर एक कॉमरेड आणि कॉमरेडीण आले आणि त्यांनी भाषणे ठोकली.

ओ की ठो कळत नव्हते पण एवढी मजा आली की ३० एक मिनिटं कार्यक्रम बघत होतो. नंतर गार्डबरोबर फोटोचा कार्यक्रम झाला. चीनमध्ये चिनी तोंडवळा नसलेली माणसे अत्यंत विरळा. अगदी एवढा अगडबंब देश (भारताच्या जवळजवळ तीनपट क्षेत्रफळ), भारतापेक्षा १०-१५ कोटी जास्त लोकसंख्या, खूप मोठा पर्यटन व्यवसाय पण परदेशी प्रवाशांचे प्रमाण अगदी नगण्य म्हणजे ३-५%. चिनी (मंगोलॉईड) नसलेली चेहेरपट्टी एकदम विरळा. त्यामुळेच बहुदा बर्‍याचदा थोडीशी ओळख झाली की लगेच फोटो काढू म्हणतात. हा दस्तूरखुद्दांचा त्याच गार्डबरोबरचा फोटो.

आमच्या ग्रेट वॉलच्या ग्रुपमध्ये एक उंचापुरा (अर्थातच) गोरागोमटा इटालियन तरुण होता त्याला तर चारपाच वेळेस चिनी पोरींनी फोटो काढायला घेरले होते. तोही मजेत लगेच हो म्हणून तयार. पण दर वेळेस त्याच्या बरोबर असलेल्या त्याच्या मैत्रिणीच चेहरा मजेशीर होई.

नंतर थोडे पुढे गेल्यावर फूट्पाथची (बागेची) रुंदी जरा कमी झाली आणि बाजूचा सर्विस रोड व कॉलनी दिसू लागली.

एवढे ऐश्वर्य पाहिले आणि त्याचे गालबोटही दिसले... हा त्या बागेतल्या पाण्यात सकाळची अंघोळ आटपून घेणारा बेघर बायजींगकर.

याला इंग्लिशमध्ये एक चपखल वचन आहे: "Starvation in the midst of plenty !"

हॉटेलच्या एका बाजूचा फेरफटका संपवून दुसरी बाजू पकडली तर दोनच मिनिटात एक मोठी बाग दिसली आणि आठवले की गाईडने सांगितले होते की तुमच्या हॉटेलच्या शेजारची सम्राटाची बाग (Imperial Garden) जरूर पहा. मी चक्क विसरलो होतो की ! जर योगायोगाने येथे आलो नसतो तर केवढी मोठी चूक झाली असती याची आत शिरताक्षणीच जाणीव झाली.


.


.


.


.


.


.


.


.

गंमत अशी की ही बाग आणि बाजूची घरे यांच्यामध्ये भिंत सोडा पण एकाधे साधे कुंपणही नव्हते. शेजारच्या घरांचे दरवाजे बागेत ऊघडत होते आणि काही गल्ल्या सरळ बागेला येऊन मिळत होत्या!


.


.

बाग बघायला आलेल्या प्रवाशांची वर्दळ तर होतीच पण विशेष म्हणजे बाजूच्या घरांतील लोकही आरामात आपल्या घराचीच बाग असल्यासारखे तिचा उपयोग करत होते. बायका झाडाच्या सावलीत बसून शिवणकाम / भरतकाम करता करता शिळोप्याच्या गप्पा मारत होत्या, पुरुष पेपर वाचत बसले होते. पोरं उंडारत होती.


.

एवढे असून विशेष म्हणजे बागेत एकही गार्ड अथवा माळी दिसत नव्हता. तरीसुद्धा कमालीची स्वच्छता आणि टापटीप होती. बेपर्वाईने फेकून दिलेला एक कागदाचा कपटा किंवा कोठे कचर्‍याचा ढीग दिसला नाही, ना कुठल्या फुलझाडाची नासाडी, ना मरतुकडी फुलझाडे अथवा झाडाच्या बुंध्यावर कोरलेली नावें. बागेत फिरताना साडेअकरा केव्हा वाजते ते कळले देखील नाही आणि गडबडीत हॉटेलकडे निघालो. गाईड बरोबर बारा वाजता विमानतळावर सोडण्यासाठी आला आणि हॉटेलला बायबाय करून शियानला जाण्यास निघालो.

विमान घावपट्टीवर असताना घेतलेला बायजींग विमानतळाला बायबाय करतानाचा फोटो...

आणि हा विमानाने हवेत झेप घेतल्यावर बायजींग शहराचा...

पूर्व व दक्षिण चीन डोंगरदर्‍यांनी भरलेला भूभाग आहे. सपाट जमीन मधूनमधूनच दिसते. त्यामुळे हा भाग असंख्य नद्या-उपनद्यांनी सिंचलेला सुपीक आणि हिरवागार दिसत होता. बायजींग ते शियान संपूर्ण प्रवासात हेच चित्र दिसत होते.


.


.

असंख्य लहानमोठी धरणे चीनने केलेल्या भौतिक प्रगतीची साक्ष देत होती...


.

शेकडो किमी लांबीचा डोळ्यांच्या सीमेपर्यंत केवळ वळ्यावळ्यांचा भूभाग इतर कोठे बघितला नव्हता ! असं म्हणतात की चीनच्या इतिहासावर त्याच्या या भूगोलाचा फार मोठा परिणाम झाला आहे. पण ते पुढे केव्हा तरी.


.

मधूनच एखाद्या दरीत छोटी वस्ती किंवा एखादे मोठे शहर दिसत होते.

मधूनच अगडबंब यांगत्से नदी आणि तिच्या उपनद्या सापासारख्या वळसे घेते धावताना दिसत होत्या.


.

बायजींग-शियान हे अंतर १०३५ किमी आहे. पण चिनी निसर्गाचे हे विहंगम रूप पाहताना दीड तास भुर्रकन जाऊन शियानला विमान उतरू लागल्याची घोषणा झाली सुद्धा ! हॉटेलवर पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सात वाजले. शॉवर घेऊन जेवण करे पर्यंत ९ वाजत आले होते. खोलीवर येऊन ऊद्याच्या भरगच्च कार्यक्रमाचा बिछान्यावर पडून विचार करता करता केव्हा डोळा लागला ते कळलेही नाही.

(क्रमशः)

===================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

===================================================================

  • Log in or register to post comments
  • 9806 views
💬 प्रतिसाद

Recent comments

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा