Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म (भाग १)

कलादालन

चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म (भाग १)

च
चित्रगुप्त
Mon, 08/08/2011 - 00:23
  • कला, कलावंत आणि आपण : जाणिजे चित्रकर्म (भाग २)

Book traversal links for चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म (भाग १)

  • कला, कलावंत आणि आपण : जाणिजे चित्रकर्म (भाग २) ›

चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म
माझ्या एका चित्रावर सहज यांनी सुरु केलेल्या धाग्याला अनेक प्रकारचे प्रतिसाद लाभले. या चित्राबद्दल खुद्द चित्रकाराची काय भूमिका आहे, अशी काहींनी पृच्छा केली, त्यावर हे लेखन करतो आहे.
प्रत्यक्ष माझ्या त्या विशिष्ट चित्राविषयी काही सांगण्याआधी चित्रकलेविषयी थोडी पूर्वभूमिका:

चित्रकलेचे अनेक प्रकार, पंथ, शैली, विचारसरणी असल्या, तरी सुरुवात म्हणून एकंदर चित्रांना दोन प्रकारात विभाजित करूया:
१. वर्णनात्मक चित्रे, आणि
२. केवल चित्रे ( वा केवलात्मक चित्रे).

या दोन प्रकारच्या चित्रांची उदाहरणे: (तिन्ही चित्रे माझी)
चित्र १: एका खेडेगावातील दृश्य: हे कोणते गाव आहे, कुठे आहे, कोणत्या काळातील आहे, यात दिसणारे घर कुणाचे आहे, अश्या प्रकारचे प्रश्न विचारले जाउ शकतात, व त्यांची उत्तरेही शोधली जाऊ शकतात.

चित्र २ व ३ : केवलचित्रे :

वर्णनात्मक चित्रात एखादी घटना, व्यक्ती, वस्तू, निसर्ग, किंवा काही विचार, कल्पना, कथा इ. चे चित्रण केलेले असते. असे चित्र बघून त्या गोष्टी विषयी आपल्याला माहिती तर मिळतेच, शिवाय कलावंताच्या कलात्मक करामतीतून आनंद, विस्मय, दु:ख, कुतूहल, शांती वगैरे भावना वा रस ही उद्दीपित होऊ शकतात.
केवल चित्रात असले काहीच नसते. चित्र बनवण्याची (व बघण्याची) क्रिया हीच यातील घटना, व पूर्ण झालेले चित्र हीच एक वस्तू. असे असल्याने अश्या चित्रातून काही अर्थ व आशय शोधणे व्यर्थ असते. असे चित्र हे 'कशाचे तरी चित्र' नसून त्याचे एक स्वयंसिद्ध, स्वयंपूर्ण अस्तित्व असते. असे चित्र बघताना कोणतीही माहिती मिळत नसली, तरी सौंदर्यबोध, कलात्मक आनंद, विस्मय, वा अन्य भावनात्मक अनुभव येत असतात.
वर्णनात्मक चित्रांचा इतिहास हजारो वर्षांचा असून त्यात अनेक काळातील, अनेक देशातील, अनेक शैलीतील अनेक प्रकारची चित्रे समाविष्ट करता येतात. केवलात्मक कला त्यामानाने बरीच अलिकडची आहे.
वर्णनात्मक चित्रकलेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी दीर्घ परिश्रम व साधनेची गरज असते. रेखाटन, स्थिरवस्तू चित्रण, व्यक्तिचित्रण, निसर्गचित्रण, छाया-प्रकाशाचा आभास, पर्स्पेक्टीव्ह, शरीर शास्त्र, रंगलेपनपद्धती, मानावाकृतीचे संयोजन असे अनेक विषय दीर्घ प्रयत्नानेच साध्य होतात. हे सर्व शिकून त्यावर आधारित स्वत:ची अशी चित्रपद्धती विकसित करण्यात आयुष्य खर्ची पडते. एक एक चित्र पूर्ण करायलाही भरपूर वेळ लागतो. उदाहरणार्थ व्हरमीर चे हे चित्र बघा.
(Johannes Vermeer - Girl with a Pearl Earring)

आकाराने लहानसे असे एक चित्र करायला त्याच्या सारख्या दिग्गज कलावंताला वर्ष-सहा महिने लागत.
या 'Girl with a Pearl Earring' चित्रावर एक कादंबरी व एक सुंदर चित्रपट देखील आहे.
व्हरमीर ची आणखी काही चित्रे:

आता नेपोलियनच्या राज्याभिषेकाचे हे भव्य चित्र बघा (चित्रकार: Jacques-Louis David) असे चित्र बनवणे बरेच अवघड असते.

अश्या महत्वाच्या, प्रत्यक्ष घटनेवर आधारित चित्रात सर्व तपशील मुळाबरहुकुम असणे आवश्यक असते. उदा. नोत्रदाम या प्राख्यात चर्च मध्ये हा सोहळा झाला तेथील तपशील, तसेच तिथे उपस्थित सर्व व्यक्ती त्या काळातील मान्यवर असल्याने त्यांची चेहरेपट्टी हुबेहूब चित्रित करणे आवश्यक. एवढेच काय, राज-मुकुटात कोणकोणती रत्ने जडवलेली होती, मखमली, लोकरी वा सुती कपड्यातील फरक, असले तपशील. मामला प्रत्यक्ष सम्राटाच्या राज्यारोहणाचा असल्याने चित्रात काही कमीजास्त झाल्यास सम्राटाची खपामर्जी होण्याची शक्यता. तसेच प्रत्यक्षात नसलेले काही तपशील सम्राटाच्या मर्जीखातर रंगवणे. उदा. या प्रसंगी नेपोलियनची आई हजर राहिली नव्हती, तरी तिला या चित्रात उपस्थित दाखवलेले आहे.

डेव्हिड याचे रोमन ऐतिहासिक घटनेवर आधारित आणखी एक चित्र: यातील तपशील काल्पनिक असले, तरी जणुकाही ते चित्रकाराने प्रत्यक्ष बघून रंगवले आहेत, असे वाटावे. चित्रात डावीकडे किंकर्तव्यमूढ अवस्थेत बसलेली व्यक्ती म्हणजे ब्रूटस आहे. स्वतःच्या मुलाला म्रुत्युदंडाची शिक्षा सुनावण्याचे कठोर कर्तव्य त्याला करावे लागलेले आहे. त्या मुलाचा मृतदेह घरात आणला जात असता त्याची पत्नी विलाप करत आहे, असा या चित्राचा विषय आहे.

केवलचित्रे बनवणे त्या मानाने सोपे असते. काही तांत्रिक युक्त्या-प्रयुक्त्या योजून केवलचित्रे अल्पावधीत बनवता येऊ शकतात. अर्थात वरील सर्व विषयांचा अभ्यास न करता केवलचित्रे बनवणे शक्य असले, तरी त्यात पारंगतता मिळवण्यास सुद्धा दीर्घ साधना लागते.

गंमत म्हणून खालील युक्ती बघा:
सपाट मैदानात भला मोठा कान्व्हास पसरवून त्यावर बादल्यातून वेगवेगळे रंग ओतावेत. मग कुणाकडून तरी त्यावर वाटेल तशी झाडू, पोछां, वायपर वगैरे खुशाल चालवून घ्यावेत. मुलांना त्यावर मनसोक्त हुंदडू द्यावे, अथवा म्युनिसीपाल्टीचा रोड रोलर फिरवून घ्यावा.यातून काहीतरी केवलचित्र बनेलच.

यातील विनोदाचा भाग सोडून दिला, तरी एखादी युक्ती हाती लागली, की केवल चित्र बनवणे तसे कठीण नसते.(यामुळेच की काय, कैवल्यवादी कलावंतांचे अमाप पीक हल्ली आलेले दिसते) मात्र कलावंताची आकलनक्षमता व संवेदनशीलता जर तीव्र असेल, तर अश्या प्रयत्नातून सुंदर, प्रभावी केवलचित्रे निर्माण होऊ शकतात. (इथे थोर संगीत दिग्दर्शक ओपी नैय्यर आठवतात. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे त्यांना शास्त्रीय संगीतातले फारसे काही कळत नसले, तरी त्यांनी अद्भुत सौंदर्याने नटलेली अप्रतिम गाणी दिलेली आहेत).

आपण इथे चित्रांचे दोन टोकाचे प्रकार बघितले, परंतु अनेक चित्रे या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी असतात. गंमत म्हणजे केवलात्मकता ही आधुनिक गणली जात असली, तरी सर्व प्राचीन संस्कृतीतील चित्रे ही वर्णनात्मक असूनही केवलात्मकतेकडे बरीच झुकलेली असतात.
खालील चित्रे बघा:
प्रागैतिहासिक कला

जपानची कला:

इजिप्तची चित्र कला:

भारतीय कला

मैथिली कला:

जगभरात हजारो वर्षे या प्रकारची कलाच प्रचलित होती.
छाया-प्रकाश,पर्स्पेक्टीव्ह, वगैरे युक्त चित्रकला साधारणत: सोळाव्या ते विसाव्या शतकात युरोपमध्ये प्रचलित झाली. यात इटलीतील उत्खननातून मिळू लागलेल्या प्राचीन ग्रीक व रोमन कलेचा प्रभाव तर होताच, शिवाय ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी चर्चेसमधून येशू, मेरी व बायबलातील प्रसंगाची अगदी हुबेहूब, खरीखुरी वाटतील, अशी भव्य चित्रे रंगवण्याचेही आव्हान होते. उदा. खालील चित्र:

(भारतात ती राजा रविवर्माच्या छापील चित्रांच्या स्वरूपात घरोघर पहुचली, आणि इंग्रजी राजवटीत त्यांनी उघडलेल्या आर्टस्कूल्स मधून भारतभर पसरली). अजून सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या मनावर या कलेचा पगडाच जास्त असलेला दिसून येतो.
....फोटोग्राफीच्या उदायानंतर मात्र चित्रकला पुन्हा केवलात्मकते कडे वळलेली दिसते.

आता माझ्या या चित्राबद्दल:

हे चित्रही असेच वर्णनात्मकता व केवलात्मकता यांच्या सीमारेषेवरचे चित्र आहे. चित्रात काही स्त्रिया, मोर वगैरे जरी दिसत असले, तरी यथातथ्य शरीररचना, छाया-प्रकाशाचा आभास, प्रमाणबद्धता वगैरे गोष्टींना चित्रात स्थान न देता (मिपाकरांच्या भाषेत 'फाट्यावर मारून') चित्र- अवकाशाचे विभाजन, रेषांचा प्रवाहीपणा, रंगा - आकारांचा तोल, काल्पनिक रंगसंगती, अश्या केवलात्मक तत्वांना प्राधान्य दिले आहे.
यातील स्त्रिया कुणी विशिष्ट व्यक्ती नाहीत, यात कोणताही प्रसंग चित्रित केलेला नाही वा यातून कोणतेही मत, विचार, कल्पना, कथा इत्यादी व्यक्त केलेले नाही. यातील आकृती या केवळ निमित्तमात्र असून चित्राचा हेतु रंग - रेषा - आकारांच्या संयोजनातून एक वेगळा दृश्यानुभव निर्मित करणे, असा आहे.
या चित्रावर जे विविध प्रतिसाद आले त्यातील बहुतांश, हे एक वर्णनात्मक चित्र आहे, या दृष्टीकोनातून लिहिलेले असल्याने बऱ्याच मनोरंजक कल्पना लढवण्यात आलेल्या दिसतात. श्री धनंजय, राजेश घासकडवी, विसुनाना, पंगा, पैसा, शशिकांत ओक इ. ना चित्रातली केवलात्मकता जाणवल्याने त्यांनी केलेले चित्राचे रसग्रहण माझ्या भूमिकेशी जास्त जवळचे वाटले.

माझी अन्य चित्रे:
http://www.flickr.com/photos/sharad_sovani/

मी चित्रकार कसा बनलो:
http://misalpav.com/node/18587

चित्रकलेविषयी काही प्रश्न असल्यास जरूर विचारावेत, त्यांची उत्तरे देण्याचा यथाशक्ति प्रयत्न करेन.
आणखी पुढे कधीतरी...

  • Log in or register to post comments
  • 55977 views

वाचनखूण लावा
| 55977 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद

Recent comments

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा