Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • दोसतारः शाळेत लग्न लागते (१)
  • आणि माऊंट किनाबालू सर झाला...
  • भिवंडी ची दवंडी
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!
  • अंडा घोटाला-बालकथा
  • उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.
  • सी पी बेरार सर्किट
  • बाई माझी कंबर लचकली..
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

राडा

त
तुमचा अभिषेक
Mon, 06/30/2025 - 05:47
💬 20 प्रतिसाद

राडा
______

स्टेशनबाहेर पडलो. डोळे अर्धवट झोपेतच होते. आकाशातला प्रकाश डोळ्यावर पडला तसे आणखी आखूड झाले. अंदाजानेच गर्दीसोबत पावले टाकत चालू लागलो. अन ईतक्यात, डोळे उघडावेसे वाटणारा आवाज कानावर पडू लागला. सकाळी सकाळीच छानपैकी भांडण चालू झाले होते.

आवाज रिक्षास्टॅण्डच्या दिशेने येत होता, एक बाई रिक्षात अडून बसली होती. ना रिक्षातून उतरत होती ना रिक्षाला जाऊ देत होती. तिच्या भितीने आणखीही कोणी त्या रिक्षात चढायला धजावत नव्हते.

"रिक्षा स्टॅण्डला लावली आहे ना तुम्ही’..."
"असा धंदा करता काय?.."
"बस्स झाली ही तुमची मुजोरी, आता आणखी सहन नाही करणार.."
"पंचवीस वर्षे झाली मुंबईत आम्हाला.."
"ए, तू आवाज चढवून बोलू नकोस.. हात खाली कर आधी.."

हळूहळू चढत्या आवाजाची काही वाक्ये कानावर पडत होती. नक्की काय प्रकरण आहे. कोणाची चूक आहे, कोण मुजोरी करतेय, काही समजायला मार्ग नव्हता. कोणाला प्रश्न विचारायचा प्रश्नच नव्हता. फक्त कोलाहल वाढत होता. आणि तो कोलाहलरुपी हलाहल आवडीने पचवायला बघ्यांची गर्दी भोवताली वाढत होती. एक लांबची सीट मी देखील माझ्यासाठी बूक केली होती.

मागची ट्रेन आली तसे त्यातील दहा टक्के जनता वेळात वेळ काढून तिथे वळली. आसपासचे रिक्षावालेही जमू लागले.
"ए, तू हात तर लाऊन दाखव मला.."
"ए हरामखोर, बाईला बघून नडतोस का?"
"ईन लोगोंका अभी ज्यादा हो गया है बॉस....."

मूळ वादाशी संबंध नसलेले प्रवासी सुद्धा आता मध्ये पडू लागले होते. बायकांमुळे रामायण महाभारत घडले असे म्हणायची एक पद्धत आहे आपल्याकडे, ईथे खरोखरच एक छोटीमोठी चकमक घडायची चिन्हे दिसू लागली.

वादावादीने दुसरा गिअर टाकला आणि ते पाहून शेजारचा भजीवाला काही काळापुरता भजी तळायचा थांबला. भुर्जीवाल्याने आपली अंडी सांभाळून आत ठेवली. सरबतवाला नुसतेच सरबत घुसळत राहिला. रस्त्यावरच्या फेरीवाल्यांनी संभाव्य धक्काबुक्कीच्या भितीने आपला धंदा सावरून घेतला. मिनिटाला दोन भेल बनवणारया भेलवाल्याचेही हात थबकले. ईथे माझेही पाय थांबले. अन कान!, ते तर आधीपासूनच टवकारले होते.

"ए अंगाला हात लावायचे काम नाही भडXXव्या..."
"कॉलर सोड ए भोसXXडीच्या..."

ज्या शब्दांची, ज्या वाक्यांची मन आतुरतेने वाट पाहत होते ते आता कानात पडू लागले होते.

नक्की काय होतेय हे घोळक्यात दिसत नव्हते. पण घोळका आता डावीकडून उजवीकडे आणि पुढे मागे सरकू लागला होता. बहुधा धक्काबुक्कीला वा लाथाबुक्कीला सुरुवात झाली होती. जवळच्या पूलावरून काही मोबाईल कॅमेरे सरसावले गेले. काही साहसी स्वयंछायाचित्रकारांनी गर्दीतच हात वर करून चित्रण सुरू केले. त्यात आपल्या कोणी ओळखीचा दिसतो का हे माझी नजर शोधू लागली. जेणेकरून नंतर ते चित्रण पाहता येईल. मी पुन्हा आजूबाजूला बघ्यांच्या जमावावर एक नजर टाकली. आणि काय पाहिले तर जे कुत्रे उगाचच रोज गर्दीच्या अध्येमध्ये लुडबुडताना दिसायचे, चहापोहेवाल्याच्या आजूबाजूला आशेने घुटमळताना दिसायचे. ते आज मात्र या निर्दयी माणसांच्या भांडणात नाहक आपण तुडवले जाऊ या भितीने पूलाखालच्या कपारीत जाऊन बसले होते.

ईथे एव्हाना भांडणाने टॉप गिअर टाकला होता. लांबच्या स्टॅण्डवरून चारपाच रिक्षावाले धावत आले. आणि त्या गर्दीत मिसळले. त्यांचा आवेश पाहता आता एकदोघांच्या बॅगा हवेत फेकल्या जातील, शर्ट टराटरा फाडून उडवले जातील या आशेने मी श्वास रोखून पाहू लागलो. अचानक झाडांवरचे पक्षीही फडफड करून आडोसा शोधताहेत असे जाणवले, अन ईतक्यात ....

टप ! टप ! टप ....
धो धो धो ...
बघता बघता तो आभाळातून कोसळू लागला. रिक्षांच्या टपावर, स्टेशनच्या छतावर, टपर्‍यांच्या पत्र्यावर आणि कोरड्या पडलेल्या रस्त्यावर त्याचा नाद घुमू लागला. भिजलेल्या पानांच्या सळसळीलाही एक वजन आले. भांडणाची मजा थांबवून मी आडोसा शोधत पळू लागलो. ऑफिसची बस दूरहून येताना दिसली. धावत जाऊन त्यात चढलो. खिडकीशेजारच्या सीटवर आपले बस्तान बसवून एक नजर बाहेर टाकली आणि काय आश्चर्य!

ज्या जागी काही काळापुर्वी घनघोर युद्ध पेटले होते, जणू हाडामासांचा चिखलच जमा होईल असे वाटत होते, तिथे आता माणसांचा लवलेशही नव्हता. नुसता पाण्यामातीचा चिखल रस्त्यावरून वाहत होता आणि त्याला चुकवून दोनचार लोकं ईथेतिथे पळत होती. भजीवाल्याच्या आडोश्याला दहाबारा लोकं जमली होती. आणि त्याने संभाव्य गिर्हाईक लक्षात घेत कढईत भजी सोडली होती. पूलाखाली कुत्र्यांच्या सोबतीला आता काही माणसांनीही आसरा घेतला होता. अवेळी अन अचानक आलेला पाऊस सर्वांची धांदल उडवून गेला होता. एक वणवा पेटायच्या आधीच विझला होता. चोहीकडे फक्त पावसाचेच थैमान चालू होते. निसर्गासमोर कोणाचाच राडा चालत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले होते.

- तुमचा अभिषेक


  • Log in or register to post comments
  • 3515 views


वाचनखूण लावा
| 3515 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (20)
ग
गवि Mon, 06/30/2025 - 05:52 नवीन
वाह भाई. मजा आली. खूप क्वचित ललित लेखन वाचायला मिळतं आहे. धन्यवाद. अगदी सुंदर.
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Mon, 06/30/2025 - 07:25 नवीन
धन्यवाद गवि, बरेच काळाने उगवलो इथे. जेव्हा होतो आणि तेव्हा जेवढे आपले लिखाण वाचलेले ते फार आवडलेले. त्यामुळे पहिलाच प्रतिसाद आपला बघून छान वाटले :)
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 06/30/2025 - 07:55 नवीन
शेवटचा परिच्छेद छान आहे.मुंबईत लोकांना इतका वेळ असतो...राडा पाहण्याइतका? ;)
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 06/30/2025 - 09:25 नवीन
राडा बघायला मिळत असेल तर कोणीही वेळात वेळ काढतोच. पण मुंबईत, विशेषतः लोकल ट्रेन किंवा गर्दीच्या ठिकाणी जेव्हा शाब्दिक चकमक सुरू होते तेव्हा माझा अनुभव वेगळा आहे. इथे आसपासचे लोक अत्यंत तत्परतेने दोन्ही पार्ट्यांना आवरतात आणि छोड दे भाई, झगडा नहीं, कोई नहीं, शांती रखो भाई.. चलता है.. असे म्हणून आग विझवायचा प्रयत्न करत असतात. कदाचित खरेच तुडवतुडवी होईल आणि आपण सगळेच भरडले जाऊ अशी भीती असू शकेल. अर्थात हे अनुभव खूप जुने आहेत. हल्लीचे लोकलचे चित्र माहीत नाही.
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Mon, 06/30/2025 - 10:45 नवीन
राडा दिसला की पाय थबकने कुठल्याही शहरात स्वाभाविक असेल. त्यानंतर थांबायचे की नाही आणि किती वेळ हा ज्याचा त्याचा निर्णय. मुंबईत स्पेशली लोकलने जाणाऱ्यांकडे तो वेळ कमी असतो हे खरे आहे. पण दुनियादारी जास्त असते हे सुद्धा तितकेच खरे आहे. म्हणून सुद्धा ते मध्यस्थी करून लवकरात लवकर संपवायला बघतात. वर गवि म्हणतात ते बरोबर आहे आपल्यालाही त्रास होण्याची शक्यता असते. पण ते ट्रेन किंवा प्लॅटफॉर्मवर झालेल्या राड्यांना लागू. वरच्या घटनेतील राडा स्टेशन बाहेर रिक्षावाल्यांशी झाला. त्यांची एक वेगळी टीम असते, युनियन असते, त्यांची मुजोरी असते, ज्याला वैतागलेल्या पब्लिकचा एक गट असतो, जो संघटित नसतो म्हणून चालवून घेत असतो, मग कधी अशी संधी मिळाली तर संघटित होतो, अन ते संघटन तात्पुरते असल्याने मग असे वेगळे होत जो तो आपल्या वाटेनेही जातो.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 06/30/2025 - 12:00 नवीन
झणझणीत.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 06/30/2025 - 13:34 नवीन
झकास लिहीलंय
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 06/30/2025 - 13:45 नवीन
झकास शब्दचित्र रंगवलेय ! सगळा प्रसंग डोळ्यापुढे तंतोतंत साकारला.... खरंय ..... निसर्गासमोर कोणाचाच राडा चालत नाही ! आणखी येऊद्यात !
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 06/30/2025 - 14:02 नवीन
मुंबईत रेल्वेतही राडे होतात. मुख्य उद्देश कुठेतरी भडास काढणे एवढाच असतो.
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Mon, 06/30/2025 - 17:04 नवीन
डोंबिवली फास्ट :)
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 06/30/2025 - 15:23 नवीन
साधाच वाटणारा प्रसंग मस्तपैकी रंगवून लिहिला आहे.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Mon, 06/30/2025 - 18:40 नवीन
मस्त. साधा प्रसंग परंतु रंगवुन लिहिल्यामुळे शेवट्पर्यंत उत्सुकता राहते ... लिहिते रहा !!
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 06/30/2025 - 18:49 नवीन
आलम हिंदुस्थानात जेसीबी की खुदाई बघण्यासाठी वेळ काढणारी जनता आहे तर राड्याला प्रेक्षक का नाही मिळणार ? गोष्ट आवडली.
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Tue, 07/01/2025 - 15:14 नवीन
हा हा.. नाही, मुंबईत तरी इतका वेळ नसतो. त्याऐवजी माती तुडवत जाणे पसंद करू :)
  • Log in or register to post comments
अ
असंका Mon, 06/30/2025 - 18:53 नवीन
काय सुरेख! धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 07/01/2025 - 06:54 नवीन
वेलकम ब्याक अप्रतिम लेख आणि वर्णन राडा घाला आता इथे फुल्ल्टू
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Tue, 07/01/2025 - 10:29 नवीन
हो, धन्यवाद आणि जरूर :)
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Wed, 07/02/2025 - 12:09 नवीन
प्रसंगचित्रण आवडलं, बाकी राडे दिसले तर फार दुरून पळणाऱ्यातले आम्ही :)
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Wed, 07/02/2025 - 18:40 नवीन
आमच्यावर देखील घरचे संस्कार असेच होते. अन्याय दिसला की लढायचे. पण निसते राडे दिसले की तिथून पळायचे :)
  • Log in or register to post comments
N
nutanm Wed, 07/02/2025 - 22:36 नवीन
छान ! वर्णन!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 26 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 38 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 40 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 42 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 46 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: Adarsh
    नोंदणी: Sat, 06/03/2023 - 14:22
  • सदस्य: Ganesh Shivaji…
    नोंदणी: Tue, 05/30/2023 - 11:22
  • सदस्य: अनिल गलगली
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 20:18
  • सदस्य: Prachi Dhawade
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 16:09
  • सदस्य: मनोज28
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 08:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा