Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

कॉर्बेटचं मृगजळ

आ
आकाश खोत
Fri, 06/27/2025 - 17:50
💬 10 प्रतिसाद
गेल्या मे आम्ही उत्तराखंडला जाऊन आलो तिथे आम्ही नैनीताल आणि जवळपासच्या वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. शेवटचा दिवस आम्ही जिम कॉर्बेट अभयारण्यसाठी राखून ठेवला होता. पूर्वतयारी जिम कॉर्बेटची सफारी त्यांच्या वेबसाईट वर आधीच बुक करावी लागते. शेकडो एकर परिसर असल्यामुळे तिथे वेगवेगळे झोन आहेत. बिजरानी, झिरना, ढिकाला, ढेला अशी त्या झोन्सची नावे आहेत. अजूनही आहेत. तिथे जाण्यासाठी विमानमार्गे पंतनगर / हल्द्वानी हे विमानतळ आहे. रामनगर हे रेल्वे स्टेशन आहे. ह्याच गावाजवळ बरेच झोन आहेत त्यामुळे इथे बरीच वर्दळ असते. बहुतांश लोक याच गावात मुक्कामाला राहून कॉर्बेटला जाऊन येतात. नैनिताल या लोकप्रिय ठिकाणाहून इथे बाय रोड यायला दोनेक तास लागतात. ह्या झोन्समध्ये सफारीसाठी भारतीय नागरिकांसाठी आणि परदेशी नागरिकांसाठी वेगवेगळ्या वेळी स्लॉट उपलब्ध होतात. परदेशी नागरिकांना आपली ट्रिप सोयीस्कररित्या आखता यावी म्हणून त्यांच्यासाठी काही दिवस आधी उपलब्ध होतात. प्रत्येक झोनचे वर्षभरात ऋतूनुसार वेगवेगळ्या महिन्यात बदलणारे वेळापत्रक असतात. साधारणपणे रोज सकाळी आणि दुपारी असे दोन स्लॉट असतात. त्यापैकी आपल्या इच्छेनुसार आपण एक किंवा अधिक स्लॉट बुक करू शकतो. माझी हि पहिलीच वेळ असल्यामुळे मी यावर फार सविस्तर लिहत नाही, फक्त जुजबी माहिती देऊन हा काय प्रकार असतो ते लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करतोय. कोणी इच्छुक असल्यास आपल्या तारखांनुसार नेमकी माहिती काढावी. तर आता तिथलं मुख्य आकर्षण म्हणजे वाघ. तर उन्हाळ्यात आम्ही चाललो होतो त्या मे महिन्यात कुठले झोन चालु असतील, कुठल्या झोनमध्ये सहसा वाघ दिसतात, अशी मी इंटरनेटवर सर्च करून, ब्लॉग्स वाचुन माहिती काढत होतो. थोडी चॅट जीपीटी आणि इतर एआयची पण मदत घेतली. तिथे जाऊन आलेल्या मित्राशीपण बोललो. ढिकाला हा एक झोन असा आहे जो जंगलाच्या बराच आत आहे. तिथे जाऊन मुक्कामच करावा लागतो, आणि ज्यांना तिथे आत असलेल्या रेस्ट हाऊसचे बुकिंग मिळते त्यांनाच फक्त इथे सफारीला जाण्याची परवानगी असते. इतर झोन मध्ये जंगलात काही मोजके रेस्ट हाऊस आहेत पण तिथे राहणं बंधनकारक नाही. हा झोन सर्वात भारी आहे असं सर्वसाधारण मत दिसलं. पण त्याची बुकिंग तात्काळ तिकिटांसारखी फार लवकर फुल होते. मीही प्रयत्न केला पण मिळाली नाही. मग उरलेल्या झोनपैकी बिजरानी, झिरना हे झोन चांगले आहेत असं समजलं. आमच्यासोबत लहान मुलं असल्यामुळे आम्ही दोन तीन दिवस जिम कॉर्बेटला देण्याचा विचार नव्हताच. सफारीही महागडी होती. आम्ही बिजरानी झोनचा दुपारचा एक स्लॉट (३-६) बुक केला. सर्व लोकांचे आधार कार्ड नंबर आम्हाला ऑनलाईन फॉर्म मध्ये भरावे लागले. त्या यादीप्रमाणे सर्व आधारकार्ड प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळेस सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पडताळून पाहिले. त्यामुळे ते सर्वांनी कागदावर किंवा मोबाईलवर सर्वांना तयार ठेवावे लागतात नाही तर सगळ्यांचा वेळ जातो. सकाळचा स्लॉट पहाटे ६ वाजता आहे म्हणजे त्यावेळेस सर्वांना कॉर्बेटच्या गेटवर हजर राहावं लागतं. लहान मुलांमुळे आम्ही तो स्लॉट टाळला. आधीच्या राणीखेतच्या मुक्कामाहून आम्ही दुपारपर्यंत रामनगरला पोहोचु आणि मग तीन वाजता सफारीला जाऊ असा बेत आखला. खर्च या सफारीसाठी आम्हाला
  • ऑनलाईन बुकिंगला (प्लॅटफॉर्म, व्यवस्थापन इ.): ३४००
  • सफारी जिप्सी गाडीसाठी रोख - २७००
  • सफारी गाईडसाठी रोख - ९००
असे एकुण ७००० रुपये लागले. एका सफारी जिप्सीमध्ये ६ जण बसु शकतात. मांडीवर घेण्यासारखी लहान मुले असली तर तशी आणखी २ जण त्याच गाडीत बसु शकतात. जिप्सीच्या सर्वात पुढच्या भागात ड्रायवर आणि गाईड बसतात. मध्ये ३+१ लहान मुलं, मागे ३+१ लहान मुलं एवढे जण बसु शकतात. आधीचा अपूर्ण अनुभव माझी अभयारण्यात सफारीला जाण्याची ही पहिलीच वेळ होती. याआधी मी इंडोनेशिया मध्ये "तमन सफारी"ला गेलो होतो. i1 तिथे सिंह झेब्रा असे विविध प्राणी जवळुन बघण्याचा अनुभव घेतला होता. परंतु तो थोडा कृत्रिम प्रकार आहे. तिथे अशा प्राण्यांना थोडं ट्रेनिंग देऊन, आणि ऐकीव माहिती नुसार इंजेक्शन किंवा औषधाद्वारे थोडी भुल देऊन सोडलेलं असतं. प्रत्येक प्राणी त्याच्या विशिष्ट झोन मध्ये दिसेलच अशी व्यवस्था असते. बऱ्याच प्राण्यांना सफारीला येणाऱ्या प्रवाशांकडून काही तरी खायला मिळण्याची सवय असते. त्यामुळे ते अपेक्षेने गाडीजवळ येतात. आम्ही तरी फक्त माकड, झेब्रा अशा प्राण्यांसाठी गाजराचे जुडगे वगैरे घेतले होते. दुसऱ्या गाडीत मी सिंहासाठी मारून ठेवलेले छोटे प्राणी किंवा कच्चं मांस सुद्धा खिडकीतून सिंहाकडे भिरकावताना पाहिलं होतं. i2 i3 ह्याला सफारीचं सिम्युलेशन म्हणता येईल. प्राण्यांना न बांधलेल्या पिंजऱ्याबाहेर मोकळ्या अवस्थेत तर बघता येतं. पण त्या प्राण्यांना शिकार करण्याची, अन्न शोधण्याची नैसर्गिक धडपड करण्याची गरज नसते. त्यामुळे ते प्राणी थोडे सुस्तावलेले असतात. त्यामुळे तो अनुभवही थोडा अपूर्णच वाटतो. खऱ्या अभयारण्यात जाण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे मी या दिवसाची वाट बघत होतो. सफारीमध्ये वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायची म्हणून खास मोठी झूम लेन्ससुद्धा जुगाड करून घेऊन गेलो होतो. ती अवजड लेन्स पूर्ण ट्रिपमध्ये बॅगमध्ये सांभाळत फिरत होतो. प्रत्यक्ष अनुभव शेवटी तो दिवस उगवला. राणीखेतहुन आमचा प्रवास अपेक्षेपेक्षा लांबला, तरी आम्ही जेवणाच्या वेळेपर्यंत कॉर्बेटला पोहोचलो. लवकर गेलो असतो तर हॉटेलवर सामान उतरवून, फ्रेश होऊन मग आलो असतो. पण त्याऐवजी कॉर्बेटच्या गेटबाहेर अनेक हॉटेल्स आहेत, तिथेच जेवलो. इथे सहजरित्या सफारीच्या दोन तासांपुरत्या मिलिटरीवाले किंवा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर सर्रास घालताना दिसतात तसल्या हॅट्स भाड्याने मिळतात. ५० रुपये भाडे, आणि विकत घ्यायची असल्यास २५० रुपये. घासाघीस होऊ शकते. चांगल्या दर्जाच्या दुर्बिणीसुद्धा २०० रुपये भाड्याने सफारी पुरत्या मिळतात. आपण बुकिंग करतो त्या पोर्टलवरून आपल्याला आपल्या सफारी गाडीच्या ड्रायव्हरचा नंबर आधीच मिळतो. त्याच्याशी एक दिवस आधीपासुन संपर्क साधलेलं बरं. त्याला फोन करून आम्ही ३ च्या सुमारास गेटवर हजर झालो. ओळखपत्राची पडताळणी वगैरे सोपस्कार झाल्यावर आमचा गाईड येऊन बसला. टायगर कि तरफ से मै आपका स्वागत करता हु म्हणुन जरा वातावरण निर्मिती केली. तो युट्युब चॅनल सुद्धा चालवतो त्याची माहिती दिली. त्याला हलकेफुलके विनोद करण्याची, पांचट चारोळ्या करण्याची आवड होती त्यामुळे त्याच्या गप्पा ऐकत आम्ही आत गेलो. i4 आत गेल्या गेल्या डावीकडे एक मोट्ठा सांबार स्तब्ध उभा होता. प्रवेशद्वारापाशी पुतळा लावलाय कि खरा आहे हे आम्हाला समजायला दोन सेकंद लागले. कॉर्बेटच्या परिसर सुरु झाला कि बाहेर सुद्धा हरणं फार सहज दिसतात हे ऐकलं होतं. तसंच झालं. हरणांचे कळप चरताना दिसायला लागले. झाडांवर माकडं दिसायला लागली. i5 त्यांचे थोडेफार फोटो काढले, पण फार रमत गमत फोटो काढत बसलो नाही. तीन तासात सफारी बाहेर पोहचायला हवी असते. त्यामुळे अगदी निवांत ठिकठिकाणी थांबता येत नाही, तरी ड्रायवर मागे बसलेले प्रवासी कशात रस घेत आहेत, कशाचा फोटो काढत आहेत, त्यांचे फोटो उरकले का याचा अंदाज घेऊन थांबत किंवा निघत असतात. i6 आत जिम कॉर्बेट राहिलेला बंगला आहे. तिथे छोटा ब्रेक झाला. इथे वॉशरुम्स ची सोय आहे. इतरही काही चेकपॉईंटवर सर्व गाड्या थांबुन ड्रायवर गाईड काही तरी रिपोर्ट करून येत होते. तिथे ५-१० मिनिट थांबुन ड्रायवर गाईड एकमेकांशी बोलून कुठे काय दिसलं याचा अंदाज घेत होते. आत जाण्याचा आणि बाहेर येण्याचा मार्ग एक असला तरी आतमध्ये प्रचंड मोठा परिसर आणि कच्चे रस्ते असल्यामुळे सर्व सफारी गाड्या सारख्या रूट वर जात नाहीत. त्या त्या गाडीत बसलेले ड्रायवर गाईड मिळुन वेगवेगळ्या रस्त्यांवर गोल गोल फिरवतात, त्यामुळे इतर गाड्या आपल्याला पुन्हा पुन्हा क्रॉस होतात. त्यात बसलेले प्रवासी एक दोनदा क्रॉस झाले कि लक्षात यायला लागतात. तिथे मराठी बोलणारे लोक केसरी आणि वीणा वर्ल्डतर्फे बरेच आलेले दिसले. एका ठिकाणी कृत्रिम हौद बांधले होते, तिथे पाण्यासाठी माकड हरीण, एक पक्ष्याचं कुटुंब होतं. तिथे जरा काही इंटरेस्टिंग पाहायला मिळालं. पक्ष्याचं जोडपं आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी फार जागरूक होतं. त्यांना माकडापासून धोका वाटत होता, हरणांना मात्र ते निवांत पाणी पिऊ देत होते. माकडाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होते. त्याला वारंवार जवळ जाऊन चोचीने टोचून टोचून त्यांनी पळवुन लावलं. i7 i8 माकडं आपल्याला शहरात पण दिसतात, त्यांची इतर माकडांशी, कुत्र्यांशी किंवा माणसांशी हातापायी दिसते. पक्ष्यांशी भांडण हा पहिल्यांदाच दिसलेला प्रकार. आम्हाला हरणं दिसली, माकडं दिसली, काही पक्षी दिसले, कॅमेऱ्याचा थोडा वापर झाला. एक दीड तास होई पर्यंत जरा आम्ही उत्साहात होतो. गाईडच्या डायलॉग्सला प्रतिसाद देत होतो. डियर मंकी फुल गॅरंटी टायगर कि नो वॉरंटी.. हा डायलॉग त्याने फार मारला. नंतर नंतर आम्ही फक्त माकडं पाहून कंटाळलो. एकदा वाघ दिसेल कि काय अशी शक्यता खरोखर निर्माण झाली होती. गाईडच्या माहितीनुसार जंगलात वाघ कुठे आहे, कुठून फिरतोय याची कल्पना त्यांना बऱ्याचदा माकडांमुळे आणि इतर प्राण्यांच्या आवाजामुळे येते. याला "कॉल्स" म्हणतात. तर एका ठिकाणी आम्ही एक वळण घेतलं आणि मागच्या बाजुने आवाज ऐकु आले. ड्रायव्हरने पटकन गाडी थांबवुन सर्रकन गाडी रिव्हर्समध्येच मागे घेतली. तिथे यु-टर्नला जागा नव्हती. वळणावर गाडी पुन्हा सरळ करून आम्ही वाट बघत बसलो. एक दोन इतर गाड्या का थांबले म्हणून चौकशी करत काही वेळ थांबून गेल्या. पण वाघोबा काही आला नाही. मग आणखी एक प्रयत्न म्हणुन गाईड म्हणाला जरा डीप फॉरेस्ट मधुन नेऊन आणतो. त्याने मग आणखी दाट झाडी असलेल्या, आणखी छोटे, कच्चे रस्ते असलेल्या भागात घेऊन गेला. तिकडेही वाघोबाची गाठ पडली नाही. एक दोन गाड्या तिकडूनही येताना जाताना भेटल्या. आता दीड दोन तास होऊन गेले होते. सफारीची वेळ अर्धी अधिक होऊन गेली होती. त्यामुळे इतर गाडीतले प्रवासीसुद्धा थोडे निराश दिसत होते. त्या स्लॉट मध्ये कोणालाच वाघ दिसला नव्हता. गाड्या समोरासमोर थांबल्या कि गाईड ड्रायव्हर त्यांची रूट बद्दल चर्चा करत होते आणि आम्ही प्रवासी एकमेकांना "कुछ दिखा?" असं विचारत होतो. फिरता फिरता आम्हाला काही छान पक्षी मात्र दिसले. किंगफिशर दिसला. गाईडने विजय मल्ल्याची आठवण काढली. एका ठिकाणी एक मोर अतिशय सुंदर डौलदार पद्धतीने पोज देऊन उभा होता. प्राण्यांपेक्षा पक्ष्यांमधेच थोडी जास्त व्हरायटी पाहायला मिळाली. i9 i10 i11 तो रस्ता फार छोटा असल्यामुळे तिथे एक अगदी छोटासा रोमांचक किस्सा घडला. मी गाडीच्या उजव्या बाजुला बसलो होतो. त्याच बाजूला आम्हाला एक वानरांचं कुटुंब दिसलं. आम्ही काही सेकंड थांबुन त्यांचं निरीक्षण केलं आणि निघालो. तेवढ्यात त्यांची झाडांवर हालचाल सुरु झाली. गाईडला काय वाटलं कोणास ठाऊक त्याने त्या वानराला हटकलं.. तो थोडासा चिडला आणि दात दाखवुन गुरकावयला लागला. रस्ता छोटासा असल्यामुळे आमच्यात काहीच अंतर नव्हतं. एका छोट्याश्या उडीत तो गाडीत घुसू शकला असता. गाईडने त्याला आणखी घाबरवायचा प्रयत्न केला आणि ड्रायव्हर ने थोडी थोडी गाडी सरकवत पुढे काढली आणि आणखी काही घटना टाळली. i12 थोड्याच वेळात आम्ही पुन्हा मोकळ्या पटांगणात मोठ्या रस्त्यांवर लागलो आणि सफारी संपुन पुन्हा बाहेरच्या दिशेने निघालो. गाईड रोहित शर्मा सारखा इट्स नॉट ओव्हर अनटिल इट्स ओव्हर ची फिलॉसॉफी सांगत होता. होप रखिये सर, कभी कभी यहांसे जाते जाते गेट के पास भी दिख जाता है. पण त्या दिवशी आमचा कोणाचा व्याघ्रयोग नव्हताच. गाईडने याचं आणखी एक कारण सांगितलं. दोन दिवसापूर्वी इथे जोरदार पाऊस होऊन गेला होता. त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याची बरीच डबकी तयार झाली होती. उन्हाळ्यात प्राणी पाण्यासाठी भटकंती करतात आणि त्यामुळे जास्त शक्यता वाढते. पण आता पाण्याची ठिकाणं वाढल्यामुळे वाघाला वणवण फिरण्याची गरज नव्हती. या वर्षी पाऊस भारतात इतरत्र झाला तसाच उत्तराखंडातही मे मध्येच सुरु झाला होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या पावसामुळे आमचे आधीच्या ठिकाणचे बेतही थोडे फसले होते. त्याचा प्रभाव इथेही पडला होता. i13 वाघाचं दर्शन आणखी चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी माझ्या भावाला एक चांगली कल्पना सुचली. तो आधी कुठल्या तरी सफारीला असताना तिथले गाईड वॉकी टॉकी वर एकमेकांशी संपर्कात होते म्हणे, तिथे त्यामुळे त्यांना बिबटे फार चांगल्या प्रकारे पाहता आले. इथे गाड्या एकमेकांसमोर आल्या तरच गाईड एकमेकांशी बोलत होते. बिनतारी यंत्रणा नव्हती. आत मोबाईललाही रेंज नसल्यात जमा होती. आणि दुसरं म्हणजे आता ड्रोन उपलब्ध असल्यामुळे वाघांवर अंतर राखुन नजर ठेवता येईल आणि गाईड्स ला नेमकी माहिती मिळाली तर अचुक ठिकाणी नेता येईल. सफारी गाईड वगैरेचा खर्च तसा बराच आहे. रोज दोनदा मोठ्या संख्येने बऱ्याच गाड्या भरून पर्यटक वेगवेगळ्या झोन मध्ये जात असतात. त्यांना हि गुंतवणूक आवाक्याबाहेर नाही. अर्थात रोजच्या रोज मोठ्या संख्येने पर्यटक यायला लागलेलं वाघाला आवडेल का कोणास ठाऊक? गेट जवळ पोहोचल्यावर गाईडने माफ करना सर, आपको टायगर नही दिखा सके, म्हणुन निरोप घेऊन गेला. निघताना मला वाटलं, वाघ बघायचा वाघ बघायचा म्हणुन आपण हरीण आणि माकडांकडेही फार निवांत बघितलं नाही. दोन तीन फोटो काढले कि चालले पुढे. एवढा जड कॅमेरा धरून हलत्या गाडीत फोटो चांगले आले कि नाही हे बघणं सुद्धा अवघड. आणि ते बघण्यात बॅटरी जाते ती वेगळीच. त्यामुळे एरवी पण मी पुन्हा पुन्हा कॅमेरा मध्ये फोटो बघत बसत नाही. फक्त एरवी फरक एवढा असतो कि एवढे चटकन हलणारे प्राणी नसतात. लँडस्केप असो किंवा माणसांचे फोटो, फार तर स्माईल आणि डोळे नीट यावेत म्हणुन दोन तीन क्लिक केले कि बास. लँड्स्केपला तीही गरज नाही. तेवढा आत्मविश्वास असतो. इथे दूरच्या प्राण्यांचे फोटो काढताना फोकस करूनही त्यांची हालचाल झाली कि फोकस बिघडू शकतो. त्यासाठी अधिकच्या बॅटरी सोबत ठेवायला हव्यात म्हणजे तिथल्या तिथे फोटो बघत बसलं तरी बॅकअप राहतो. आम्ही मुलांना फक्त वाघ वाघ असं सांगितलेलं नसलं तरी तिथे बाहेर वाघाची चित्र, वाघाचे टीशर्ट, गाईड भेटल्यापासुन बोलण्यात वाघ वाघ येत असल्यामुळे चक्क ते सुद्धा माकडं आणि हरणं यात नंतर फारसा रस दाखवत नव्हते. कधी दिसेल वाघ, कधी दिसेल वाघ हेच विचारत होते. तिथे प्रवेशद्वारापाशी आठ वाघ जेवायला डायनिंग टेबलवर बसलेत असं चित्र होतं. आम्हाला वाघ दिसले ते एवढेच. i13 तीन तासाचा मर्यादित वेळ असल्यामुळे वाघाचा मागोवा घेत पुढे पुढे जात राहणं काही चुकीचं वाटत नव्हतं, पण फक्त एकच गोष्ट डोक्यात ठेवुन आपणच आपला इतर गोष्टी बघण्याचा अनुभव थोडा नीरस करतोय कि काय असंही मला वाटत होतं. कॉर्बेटचा वाघ म्हणजे आमच्यासाठी मृगजळच ठरलं. i14

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2225 views

💬 प्रतिसाद (10)
म
मारवा Sat, 06/28/2025 - 01:48 नवीन
वाघाच्या नादात खरोखर आपण बाकी इतर इतक्या सुंदर जंगलावर त्यातील इतर प्राण्यांवर फोकस करून आनंद घेऊ शकत नाही.असे होते खरे. फोटो फार सुंदर आलेले आहेत. प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बघण्याचा आनंद मोठा. पण पर्यटक कधी कधी अतिरेक करतात माणूस हा in general सर्वात नालायक प्राणी आहे. Simulated Safari प्रकार भन्नाट आहे माहिती नव्हता जमल्यास याची अजून माहिती द्यावी
  • Log in or register to post comments
आ
आकाश खोत Sun, 06/29/2025 - 15:45 नवीन
धन्यवाद. तमन सफारी बद्दल मी पूर्वी हि पोस्ट लिहिली होती: https://misalpav.com/node/31465
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/28/2025 - 03:05 नवीन
छान माहिती.
  • Log in or register to post comments
आ
आकाश खोत Sun, 06/29/2025 - 15:46 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 06/28/2025 - 17:04 नवीन
कॉर्बेट अभयारण्यात वाघ दिसतो हि एक अंधश्रद्धा आहे. माझ्या माहितीतील एकालाही वाघ दिसलेला नाही. तेथे जवळच राहणारा माझा वर्गमित्र ( लष्करातून निवृत्त झालेला) स्वच्छपणे म्हणाला कॉर्बेट पार्क च्या मध्य भागात( कोअर झोन) वाघ असतात आणि तुम्हाला सफारी मध्ये तेथे मध्य भागात( कोअर झोन) घेऊनच जात नाहीत. तुमची वनखात्यात ओळख असेल तर त्या कोअर झोन मध्ये जात येते आणि एवढं करूनही वाघ दिसेल असे नाही. त्या मानाने पेंच, ताडोबा किंवा कान्हा किसली मध्ये वाघ दिसण्याची शक्यता किती तरी पट जास्त आहे
  • Log in or register to post comments
आ
आकाश खोत Sun, 06/29/2025 - 15:47 नवीन
कॉर्बेट मधले सुद्धा व्हिडीओ येत असतात. पण तुम्ही म्हणता तसे फार आतले असतील. मी म्हटलो तो ढिकाला हा झोन, जिथे आत जाऊन मुक्काम करावा लागतो, तिकडेसुद्धा शक्यता जास्त आहे म्हणतात. बघू पुढे भविष्यात तुम्ही म्हणताय तिथे बघण्याचा योग आला तर चांगलंच आहे.
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Tue, 07/01/2025 - 09:41 नवीन
उत्तराखंडची सहल केली मात्र कार्बेट अभयारण्य सुटले आहे . बघू कधी जमतंय . कान्हाला वेगवेगळ्या झोनमध्ये तीन सफरी करूनही वाघाने दर्शन दिले नव्हते.
  • Log in or register to post comments
आ
आकाश खोत Wed, 07/02/2025 - 11:55 नवीन
माझ्या मित्राला मागच्याच महिन्यात कान्हामधे छान दर्शन झालं वाघाचं. भाग्याचा खेळ दिसतोय सगळा.. 
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 07/02/2025 - 04:19 नवीन
कार्बेट मध्ये दोन वेळा गेलो पण वाघाचे दर्शन झाले नाही. नर्मदा पुरम इथले सतपुडा अभयारण्य जास्त सुंदर आणि भरपूर प्राणी आणि पक्षी तिथे दिसतात. वाघ दिसण्याची शक्यता 90 टक्के आहे. आम्हाला दीड दिवसांत तीन वेळा वाघाचे दर्शन झाले. मधई गेट जवळ एमपी टुरिजमचे हॉटेल देनुआ नदी काठी आहे. नदी तवा बांधला मिळते. त्यामुळे पात्र मोठे आहे. वाटर सफारी ही वेगळी आहे. मगर आणि अनेक पक्षी ही नदीकाठी दिसतात. दुसर्‍या तीरावर अभयारण्याचे कोर झोन आहे. सफारी तिथून सुरू होते. वाघ गौर सांभार हरिण अस्वल काळे आणि लाल माकडे आणि अनेक पक्षी इत्यादि. निवांत वेळ घालविण्यासाठी ही हे उत्तम ठिकाण आहे. एमपी टुरिजमची व्यवस्था ही उत्तम आहे.
  • Log in or register to post comments
आ
आकाश खोत Wed, 07/02/2025 - 11:56 नवीन
माहितीसाठी आभार. ही जागा सुद्धा लक्षात ठेवीन.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 42 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा